अमृतराय

प्राचिन मराठीतील काही उतारे

संत, पंत आणि तंत या लेखानंतर काही उतारे द्यावयाचे होते त्याला आता सुरवात करू.
अमृतराय [१६९८- १७५३] कटावा करिता प्रसिद्ध. त्यांनीच तो मराठीत सुरु केला म्हणावयास हरकत नाही.
बिचारा नवरा अशी बायको मिळाली तर संसाराला कंटाळून जाईल तर काय नवल !

मागे ती लुगडी सकाम बुगडी आठा दिसा बांगडी
घालिते फ़ुगडी कधी न रगडी, फ़ाडितसे आंगडी !!
खैराची शगडी तशी धडधडी तोंडाळ मोठी खुडी
सोन्याच्या लगडीस देखुनि रमे ऐशी महा धांगडी !!
दारा देत कडी, सदा बडबडी बोले महा वाकडी
दाणे चोरुन फ़ाकडी न कळता घेते मुळे काकडी !!
खाते ती जशी माकडी वसवसी दांती दिसे खोकडी
यालागी अमृतेश्वरासि रुचली गंगातिरी झोपडी !!

खरे म्हणजे एखाद्या कवियत्रीने याला उत्तर दिले तर उपक्रम छापेल सुद्धा !
शरद

लेखनविषय: दुवे:

Comments

रोचक

रोचक उतारा पण काही शब्दांचा अर्थ कळला नाही. उदा. बांगडी, खुडी, धांगडी, खोकडी इ.
याचे विवेचन केल्यास फारच मस्त.
----
"Is there a pinkish hue?" -- George Costanza

अर्थ

बुगडी ----- कर्णभूषण
शगडी ---- शेगडी असावयास पाहिजे
खुडी --- कजाग,दुष्ट, दांडगी
धांगडी --- उद्धट, आडदांड मुलगी[आणखी एक अर्थ - खोडकर घोडी ]
फ़ाकडी --वितंडवादी, फ़ाटे फ़ोडणारी
खोकड -- कोल्ह्याच्या जातीचे जनावर
बांगडी -- मला नक्की माहित नाही पण एखादी लहान मुलगी सांगू शकेल ! [ काय राव, चेष्टा करता काय ?]
जेंव्हा भक्ती आणि शृंगार रसांचेच प्राधान्य होते त्या काळात एखादी विनोदी रचना मन वेधून घेते,त्याचे उदाहरण.
शरद

चेष्टा नाही

अहो, चेष्टा नाही. बांगडीचा अर्थ माहित आहे पण त्या अर्थाने 'आठा दिसा बांगडीचा' बोध होत नाही. म्हणून वाटले की वेगळा अर्थ असावा की काय. आणि याच कारणासाठी विवेचन असावे असे वाटले होते.

सुधारणा : आता अर्थ लागला. धन्यवाद. ट्यूब पेटायला थोडा वेळ लागला.
----
"Is there a pinkish hue?" -- George Costanza

आठा दिसा बांगडी

आठा दिसा बांगडी म्हणजे दर आठ दिवसांनी नव्या बांगड्यांची पृच्छा करणारी स्त्री असे असावे.

गंमतीशीर आहे. वाचायला मजा आली. :-)

अगदी बरोबर

आठा दिसा बांगडी म्हणजे दर आठ दिवसांनी नव्या बांगड्यांची पृच्छा करणारी स्त्री असे असावे.

आठा दिसा बांगडी म्हणजे दर आठ दिवसांनी नव्या बांगडी साठी नवर्‍यामागे लकडा लावणारी स्त्री असावे.
प्रकाश घाटपांडे

खुप दिवसांनी

विस्मृतीत गेलेले काव्य खूप दिवसांनी वाचायला मिळाले. वाचताना नादमय वाटत.
प्रकाश घाटपांडे

काय कजाग बाई

-गडी, -गडी, -कडी
अगदी खटकेबाज!

(आता अमृतरायाच्या बायकोने त्याला काय म्हटले तेसुद्धा एखाद्या कवितेत नमूद झाले असते तर मजा आली असती. शरद यांच्याशी सहमत.)

मुळे काकडी खाण्याबद्दल काय तक्रार आहे? मुळे खाऊन तोंडाला वास मारू शकतो, पण काकडी खाण्याबाबत वाईट काय असेल?
घरच्या बाईने दाणे, मुळे, काकड्या खायला घेतल्या त्याला "चोरून" म्हणणे म्हणजे... तो काळ वेगळा होता, हेच खरे.

कडी लावते, गंगेकाठच्या झोपडीत गेला

ही बाई आहे, हे स्त्रीलिंगी शब्दांवरून निश्चित वाटते. दागिन्यांचा सोस वगैरे मानवांमध्ये दिसणारे व्यवहार सांगितल्यामुळे कुठल्या जनावराची मादी नसावी.

दाराची कडी लावते म्हणजे वेश्याही नसावी.

ज्या दाराची कडी लावते, त्या दारावर तिचा काही राहाता हक्क असावा असे वाटते.

अमृतराय गंगातिरी झोपडीत राहायला रुचते म्हणजे नपेक्षा त्या बाईच्या संगतीत दार असलेल्या कुठल्या ठिकाणी राहात असे. दार असलेली अशी राहाती वास्तू घर असेल असे वाटते. त्यावेगळ्या कल्पना करता येतात, पण खूपच अद्भुत होऊ लगतात. शिवाय बाईला त्या ठिकाणहून घालवण्याऐवजी खुद्द कवीच गंगातिरावरच्या झोपडीचा विचार करतो, म्हणजे पुन्हा त्या बाईचा त्या घरावर काही हक्क असावा.

अशा परिस्थितीत "घरची बाई" असा निष्कर्ष बर्‍यापैकी ठोस वाटतो. अर्थात जोवर अमृतराय "घरची बाई" हा शब्दप्रयोग करत नाही, तोवर हा कयासच राहातो. कुठलीतरी अद्भुतरम्य कल्पना कल्पून सर्व वाक्यांचा वेगळा अर्थ लावताही येईल.

"तो काळ वेगळा होता" आणि "तो काळ असाच होता" ही दोन्ही सामान्यीकरणे कधीही तर्कदुष्टच असणार. म्हणून काही "आमच्या काळात असे नव्हतं" आणि "पूर्वीपण असंच बघितंय मी" म्हणायचे लोक थांबणार नाहीत, आणि संदर्भ बघून त्यातूनही काही तथ्यात्मक अर्थ ऐकणारे काढतच राहातील. "अर्थ काढू शकणारे श्रोते राहातीलच" हे सामान्यीकरणही चुकीचे आहे हे सांगणे नलगे.

दारा देत कडी

मला वाटते अमृतरायांचा खरा राग " दारा देत कडी " यालाच असावा. वैराग्यही त्यामुळेच ! बाकी सारे बहाणे .
शरद

कडी

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |

श्री.शरद् लिहितात त्याप्रमाणे कवीच्या त्राग्याचे कारण "दारा देत कडी" हेच असावे.कडी नसती तर हीच खादाड आणि रांगडी पत्नी कवीला अप्सरेसमान भासली असती. तिच्या प्रत्येक कृतीतून( चोरून खाणे, कपडे रगडून न धुता धोपटून धोपटून फाडणे इ) त्याला सौंदर्याचे दर्शन झाले असते.वैराग्याचा विचार शिवला नसता.मग आपल्या भाग्याचे वर्णन करताना कवीने लिहिले असते:

"कोठी ठेवितसे अखंड उघडी,ऐसा सुखी हा गडी|"
अथवा,
"खोली ठेवितसे सदैव उघडी,ऐसा सुदैवी गडी|"

किंवा असेच काहीतरी.

अमृतरायाला झोपडी का प्यारी झाली

ह्याचे कारण काय असेल ते असो पण त्याच्या बायडीची काय तक्रार असू शकेल हे आम्ही जाणतो! ;)

माझा हा घरगडी धुवे न लुगडी आठी असे वाकडी
फुंके ना शेगडी सदाच मुरडी, चर्या पहा बोकडी !!
होता दोन घडी कशी कडमडे तोंडात ह्याच्या बिडी
बाजूच्या गधडीस देखुनि रमे ऐसाच चालू गडी !!
दारु घेत सडी, सदा बडबडी लोळे पहा वरकडी
कामे टाळुन दे पडी न कळता लावून दारी कडी !!
खातो हा जसा माकडी वसवशी उलटी असे खोपडी
यालागी हकलून आज दिधले 'रंग्यास' त्या झोपडी!!

चतुरंग

हाहा - उत्तम

उत्तम प्रतिसाद!

क्या बात है !

रंगासेठ, लै भारी !

+१

हेच म्हणतो ! उत्तम प्रतिसाद !

शार्दूलविक्रीडित?

मूळ काव्य शार्दूलविक्रिडितात आहे का?

मध्ये मध्ये छंदोभंग झाल्यासारखा वाटतो - टंकनदोष आहेत का?

त्या मानाने चतुरंग यांच्या कवितेत शार्दूलविक्रीडित पटण्यासारखे आहे. लेखात छंदोभंग झाला आहे, त्याच ठिकाणी त्यांनीही छंदोभंग करून विडंबनाचे नियम काटेकोरपणे पाळले आहेत.

हेच म्हणतो

हे विडंबन ओठातल्या ओठात पुटपुटून पाहिले अगदी लयबद्ध वाटले.

प्रकाश घाटपांडे

 
^ वर