वान्-वंत आणि मान-मंत

वान-वंत आणि मान-मंत हे प्रत्यय 'युक्त' ह्या अर्थी लागून अनेक शब्द तयार झाले आहेत. उदाहरणार्थ बुद्धिवान, शक्तिमान वगैरे.

काहीवेळा एकाच शब्दाला पुढे वान/वंत वा मान/मंत लागून तयार झालेल्या शब्दांच्या अर्थामध्ये फारसा फरक जाणवत नाही. उदाहरणार्थ शक्तिवान आणि शक्तिमान, बुद्धिवंत आणि बुद्धिमंत, वगैरे.

एकाच शब्दाला पुढे वान वा वंत लागून त्याने होणारे दोन शब्दही काहीवेळा अर्थामध्ये विशेष फरक दाखवत नाहीत. उदाहरणार्थ बुद्धिवान आणि बुद्धिवंत, भगवान आणि भगवंत.

मला पडलेले प्रश्न -

१. वान आणि वंत तसेच मान आणि मंत हे तर-तम दाखविणारे प्रत्यय आहेत का? वानपेक्षा वंत आणि मानपेक्षा मंत हा अधिक श्रेष्ठ असे काही आहे का?

२. वान आणि मान, वंत आणि मंत ह्यांमध्ये कोणता आणि कसा फरक आहे?

३. वान-वंत वा मान-मंत पैकी कोणता प्रत्यय वापरावा ह्यासंबंधी काही नियम आहेत का?

४. वान आणि मान हे प्रत्यय अमुक गोष्टीने युक्त असलेला वा शक्यता दर्शविणारा अशा दोन्ही अर्थी वापरला जातो. उदाहरणार्थ शक्तिमान म्हणजे शक्तीने युक्त असा, तर वर्धमान म्हणजे जो वाढू शकतो असा. बुद्धिवंत म्हणजे बुद्धीने युक्त असा, तर नाशिवंत म्हणजे नाश पावू शकणारा असा. संस्कृत आणि मराठी दोन्हीमध्ये ह्या दोन्ही अर्थी हे प्रत्यय वापरले जातात का? व्याकरणदृष्ट्या हा फरक कसा दाखवता येईल?

५. वत् प्रत्यय संस्कृतातून इतर भारतीय भाषांमध्ये येताना त्याचे वान हे रूप होते आणि त्यामुळे वानयुक्त शब्द हे सहसा संस्कृत नसतात, संस्कृतात वत् चे केवळ वंत होते, वान होत नाही, हे खरे का?

लेखनविषय: दुवे:

Comments

अवांतर प्रतिसाद

वरच्या लेखातल्या एकाही प्रश्नाचे उत्तर मला माहिती नाही. जी माहिती मिळेल ती माझ्याकरता उद्बोधकच असेल.

मात्र या अनुषंगाने एक (थोड्या विनोदी अंगाने जाणारे ) उदाहरण आठवते :
"कलावंत" या शब्दाचा अर्थ कलाकार असा , साधा सरळ आहे. मात्र , याच शब्दाच्या स्त्रीलिंगाचा अर्थ - म्हणजे "कलावंतीण" या शब्दाचा अर्थ - इतका विपरित - म्हणजे "विक्रयाकरता नाचगाणे करणारी" - असा का झाला असावा , असा प्रश्न मला कधीकधी पडतो.

बाकी उत्तरे ऐकायला उत्सुक आहे.

कलावती

वंतचे स्त्रीरूप वती होते, त्यानुसार कलावंतचे कलावती व्हावे. कलावंतीण हा खास मराठी शब्द नाचगाणे करून त्यावर उदरनिर्वाह करणारी अश्या अर्थी वापरला जातो. (विक्रयाकरता नाचगाणे करणारी म्हणजे काय? कोणत्या गोष्टीचा विक्रय करण्यासाठी नाचगाणे करावे लागते?)

काही उत्तरे

विक्रयाकरता नाचगाणे करणारी म्हणजे काय? कोणत्या गोष्टीचा विक्रय करण्यासाठी नाचगाणे करावे लागते?
"विक्रयाकरता नाचगाणे करणारी" = नाचगाणे या अंगभूत कलांचा विक्रय करणारी , जेथे माणसे धन देऊन नाच-गाणे ऐकायला येतात अशा ठिकाणी नाचगाणे सादर करणारी - पर्यायाने नाचगाण्याचा विक्रय करणारी.

शिवाय

देहविक्रय हासुद्धा ध्वनित केला जातो.

संस्कृतातले नियम मराठीत तसेच नाहीत

पण दोन्ही भाषांत या प्रत्ययांचा अर्थ "याचे [याच्यापाशी] अमुकतमुक आहे" (तद् अस्य अस्ति) असा सर्वात अधिक दिसतो. (तर-तमभावाच्या दृष्टीने वापरलेले माझ्या माहितीत नाहीत.)

याच्यापाशी बुद्धी आहे, तर हा बुद्धिमान् (मूळ रूप बुद्धिमत्, संस्कृत)/बुद्धिमान (मराठी)
याच्यापाशी लक्ष्मी आहे, तर हा लक्ष्मीवान् (मूळ रूप लक्ष्मीवत्, संस्कृत)/लक्ष्मीवान (मराठी)

या शब्दांच्या संस्कृत विभक्तिरूपांत -न्त- असा ध्वनी येतो.
बुद्धिमान्, बुद्धिमन्तम् ... (बुद्धिमान, बुद्धिमानाला...) त्या दृष्टीने मराठीत त्या शब्दापासून दोन वेगवेगळे तद्भव शब्द बुद्धिमान आणि बुद्धिमंत हे आलेत. संस्कृतात वापरत नाहीत ते बुद्धिवान आणि बुद्धिवंत हे शब्दसुद्धा मराठीत वापरात आहेत (मोल्सवर्थ शब्दकोश). त्यामुळे मराठीत हे वेगवेगळे प्रत्यय पूर्ण विकल्प असल्यासारखे वाटतात. (किंवा विकल्पबाहुल्य असलेले - कोणत्याही एका कुटुंबात चारपैकी एकच कुठला मोठ्या प्रमाणात वापरलेला दिसेल.) मराठीमध्ये संस्कृतचे नियम पाळायला पाहिजे असे मुळीच नाही.

संस्कृतात -वत् आणि -मत् पैकी कुठल्याही परिस्थितीत एकच वापरला जाऊ शकतो. हे एकमेकांचे स्थान घेतात तरी वाटेल तो निवडता येत नाही. आदल्या शब्दरूपाच्या अंत्य ध्वनीवर अवलंबून -वत् किंवा -मत् यांच्यापैकी एकच अनिवार्य होतो.

अंत्य स्वर असला, तो 'अ'/'आ' असला, तर -वत् (उदाहरण : धनवान्)
रूप व्यंजनांत असले, अंत्य व्यंजन 'म्' असले, तर -वत् (सामान्य उपयोगातले उदाहरण नाही)
रूप व्यंजनांत असले, उपांत्य स्वर 'अ'/'आ' असला, तर -वत् (उदाहरण : पयस्वान्)
अंत्य कुठलाही स्वर असला, उपांत्य व्यंजन 'म' असले, तर -वत् (उदाहरण : लक्ष्मीवान्)

रूप व्यंजनांत असले, अंत्य व्यंजन 'झय्' असले, तर -वत्
झय् = क्, ख्, ग्, घ्, च्, छ्, ज्, झ्, ट्, ठ्, ड्, ढ्, त्, थ्, द्, प्, फ्, ब्, भ् (म्हणजे ङ्, ञ्, ण्, न् सोडून पहिल्या २५ मधली सर्व)
उदाहरण कुमुद्वान्

बाकी सर्व ठिकाणी -मत्
उदाहरणे - बुद्धिमान्, आयुष्मान् वगैरे. (बुद्धि-, आयुष्- मध्ये अंत्य किंवा उपांत्य वर्ण वरील यादीतले नाहीत.)

(काही अपवादात्मक शब्दांत "तद् अस्य अस्ति" असा अर्थ निघत नाही - तद्+मतुप्-वतुप् = तावान् = त्याच्या परिमाणाचा = तेवढा. अशा प्रकारचे अपवादात्मक अर्थ मराठीत मला आठवत नाहीत.)

(मराठीत बाहुल्य म्हणजे जे रूढ तोच नियम - आयुष्मान् पासून तद्भव "औक्षवंत" असा आहे, "[चूक] औक्षमंत" हा वापरात नाही.)

फार्शीत

संस्कृतातले नियम मराठीत तसेच नाहीत.
अगदी. मराठी ही एक स्वतंत्र भाषा आहे हे अजूनही काही जणांनी मान्य केलेले नाही.

दोन्ही भाषांत या प्रत्ययांचा अर्थ "याचे [याच्यापाशी] अमुकतमुक आहे" (तद् अस्य अस्ति) असा सर्वात अधिक दिसतो. (तर-तमभावाच्या दृष्टीने वापरलेले माझ्या माहितीत नाहीत.)

याच्यापाशी बुद्धी आहे, तर हा बुद्धिमान् (मूळ रूप बुद्धिमत्, संस्कृत)/बुद्धिमान (मराठी)
याच्यापाशी लक्ष्मी आहे, तर हा लक्ष्मीवान् (मूळ रूप लक्ष्मीवत्, संस्कृत)/लक्ष्मीवान (मराठी)

ह्यावरून :
फार्शीत वान (किंवा बान) ह्या प्रत्ययाचा अर्थ केवळ पाशी असा नसावा. पीलवान (ज्यापासून पैलवान हा शब्द आला) ह्या शब्दाचा अर्थ मग ज्याच्यापाशी हत्ती (पील म्हणजे हत्ती) आहेत असा होईल. वान हा प्रत्यय वाला ह्या प्रत्ययाचा पर्याय म्हणूनही वापरताना (हिंमतवान) ऐकलेले आहे.

वान-बान-वाला

मराठीत हे प्रत्यय विविध शब्दांत दिसून येतात. त्यांच्या उपयोगांत अर्थात बरीच गल्लत होत असावी. दरबान(दरवान, दारवान), बागवान(की बागबान?), मेहेरबान, मेजबान, पहिलवान(पैलवान), दौलतवान, पासबान, सारवान, निगाहवान(की बान?) इ.इ.

मराठीतही फारसीमधून आलेले वंत/वंद/मंद आहेत. गरजवंत, दर्दवंत, फ़िकिरवंद, अक्कलमंद, खुदावंद, दौलतमंद, एहसानमंद, रजामंद, दारूवाला, गांजावाला, भांडेवाली वगैरे वगैरे. या सगळ्यांचे मूळ संस्कृतात असेल का?--वाचक्‍नवी

तर-तम प्रत्यय मत्-वत् च्या पुढे जोडले जाऊ शकतात

बलवत्/बलवत्तर/बलवत्तम
बुद्धिमत्/बुद्धिमत्तर/बुद्धिमत्तम

पण हे मराठीत होत नाही. मराठीत हे शब्द तत्सम, पण वेगळ्या अर्थाने येऊ शकतात.

"नशीब बलवत्तर असेल तर..." म्हणजे "नशीब खूप बलवान असेल तर..." असा अर्थ निघतो. "नशिब 'क्ष'पेक्षा अधिक बलवान असेल तर..." असा अर्थ फारच ओढूनताणून काढावा लागतो.

वान, मान

वान आणि मान वाली रूपे संस्कृतात नसतात असे एक विधान आधी खाजगीत बोलताना केले होते, परंतू नंतर दुसर्‍या कुणाशी तरी चर्चा करताना लक्षात आले की मी रूपांत काहीतरी गोंधळ घातला आहे. पुन्हा रूपे म्हणून पाहिली. वान वाला शब्द हा प्रथमा एकवचन असतो आणि वंत वाला शब्द हा प्रथमा बहुवचन असतो. अर्थात या शब्दांचे ध्वनिरूप थोडे बदललले असते. म्हणजे भगवान हा शब्द नसून भगवान् हा शब्द आहे आणि भगवंत हा शब्द नसून भगवंतः हा शब्द आहे, हे अर्थतच संस्कृत मधे.

संस्कृतचे नियम आणि मराठीचे नियम भिन्न आहेत या बाबतीत धनंयज रावांशी सहमत.

वान-वंत किंवा मान-मंत यांत तर-तमवाचक भाव मुळीच नाही.

दुसरे म्हणजे आपण लिहिताना वर्धमान या शब्दात मान हा प्रत्यय युक्त या अर्थाने आलेला आहे असे म्हणत आहात. ते काही अंशी खरे आहे, परंतू ज्या स्तरावर बुद्धीमान मधील मान हा शब्द युक्त या अर्थाने वापरला जातो त्या स्तरावर वर्धमान मधील मान हा शब्द युक्त या अर्थाने वापरला जात नाही. कृतवान वगैरे रुपांचा अर्थ तो करता झाला असा काहीसा होतो. वर्धमान वगैरे रूपांचा र्थ वाढणारा असा काहीसा झाला, वाढण्याच्या क्रियेने युक्त हा अर्थ काही अंशी त्यात समाविष्ट असला, तरीही तसा तो धातूला लागणार्‍या जवळ जवळ प्रत्येक प्रत्ययात असतो, जसे वाढलेला इ. तेव्हा क्रियापदाला लागणारा 'मान' हा प्रत्ययदेखील युक्त या अर्थाने आहे असे म्हणाल्यास ते योग्य ठरणार नाही.

राधिका

बरोबर : -मान बद्दल्, सोप्या युक्त्या

ज्यांना संस्कृत उच्चार चांगले आठवतात, त्यांनी एक युक्ती लक्षात ठेवायला हरकत नाही.
-मान की -मान् हा ध्वनी नीट आठवून खात्री करावी (मराठीत दोन्ही ध्वनी एकसारखेच आहेत.)
"-मान" म्हणजे ती क्रिया करणारा. (-मान् नव्हे)
"वर्धमान" म्हणजे वाढणारा
"यजमान" म्हणजे यजन करणारा
(किंवा या शब्दांचे संस्कृतातले स्त्रीलिंगी रूप आठवत असल्यास ते पडताळा : वर्धमाना, यजमाना, वगैरे)

पण "-मान्" हे शब्दकोशातील "-मत्" असलेल्या शब्दांचे एक रूप आहे
"-मत्" म्हणजे "ते याच्यापाशी आहे"
श्रीमान् (श्रीमत् चे रूप) म्हणजे याच्यापाशी श्री आहे
बुद्धिमान् (बुद्धिमत् चे रूप) म्हणजे याच्यापाशी बुद्धी आहे
(किंवा या शब्दांचे संस्कृतातले स्त्रीलिंगी रूप आठवत असल्यास ते पडताळा : श्रीमती, बुद्धिमती, वगैरे)

कृतवान् बद्दल राधिका यांचे विवेचन स्पष्ट आहे. (सोपी युक्ती म्हणजे येथे प्रत्यय -तवत् आहे -वत् नव्हे)

ज्यांना व्याकरणाचे थोडे अधिक आठवते, त्यांना "वर्धमान/कृतवान्" ही कृदन्ते आहेत (कोण काय क्रिया करते/भोगते/करण्यायोग्य आहे ती कृतिशील माहिती कृत्-अंतातून मिळते) हे लगेच समजेल.
श्रीमान्/धनवान् ही तद्धिते आहेत (ते/तो/ती अशा कुठल्या नामधेयाला [क्रियेला नव्हे] बदलून [हित करून], तद्-संबंधी संबंधित माहिती तद्-हितातून मिळते) हेसुद्धा लगेच समजेल.

ज्यांना सवयीने सुयोग्य बोलायला येते, त्यांना "शुद्धते"साठी मुद्दामून व्याकरण शिकायची गरज नाही, हे माझे मत लक्षात असू द्यावे :-)

धन्यवाद् आणि ह्या अनुषंगाने...

सर्व प्रतिसादकर्त्यांचे आणि माहितीदात्यांचे आभार.

ह्या चर्चेच्या अनुषंगाने (ज्यांच्यापुढे मत् वा वत् प्रत्यय लागतो अश्या) काही शब्दांच्या अर्थांविषयीही चर्चा करता येईल. प्रत्येक वेळी ज्या शब्दापुढे मत्/ वत् लागला आहे त्या शब्दाचा अर्थ माहीत असतोच असे नाही. काही शब्दांना तो प्रत्यय लागलेला नसूनही तसा तो असावा की काय असे वाटू शकते. काही वेळा हा शब्द म्हणजे अमक्या देवाचे एक नाव वगैरे गुळगुळीत अर्थच माहीत असतात व नेमके अर्थ माहीत नसतात. तेव्हा अश्या शब्दांचे अर्थ जाणून घ्यायला आवडतील.
हे शब्द मत्/वत् प्रत्यय लागून तयार झाले आहेत वा नाहीत, असल्यास ज्या शब्दांना हे प्रत्यय लागले आहेत त्या शब्दांचे मूळ अर्थ कृपया सांगावे तसेच ह्या शब्दांमध्ये भरही घालावी. मराठी वा संस्कृत दोन्ही भाषेतील शब्दांविषयी चर्चा करता येईल.
१. सरस्वती
२. विवस्वान/विवस्वंत
३. हनुमान

काही देवांची नावे

सरस्+वत्+ई (अनेक तळी याची आहेत, अशी स्त्री) सरस्वती नदी सपाट पाणथळ भागांतून तळी-तळी साचवत वाहायची.

वि+वस् (प्रकाश देणे किंवा सतेज असणे) प्रकाश देणारा विवस्वत्

हनु+मत् (याचा जबडा आहे) हे बहुधा त्याच्या वानरांचे जबड्याचे हाड पुढे आलेले असते, त्यासंदर्भात असावे. वायुदेवाने या मुलाच्या हनुवटीवर ठोसा देऊन ती वाकडी केली होती का?

हा शब्दकोश मला फार मदत देतो :
मोनियर विल्यम्स (दुवा)

देवी

सरस्वती नदीसाठी अनेक तळ्यांचा संदर्भ व्यवस्थित लागला. देवी सरस्वतीचा तळ्यांशी काय संबंध असावा?
वस् म्हणजे प्रकाश देणे असेल हे माहीत नव्हते. वस् चा अर्थ वसणे असा वाटला होता. जाताजाता, वसु शब्द ह्या वस् पासून तयार झाला आहे का? वसुमती म्हणजे काय? प्रकाश देणारी? की वसतीयोग्य?

वसु

वसु म्हणजे कृत्रिम तळे. शिवाय, वसु म्हणजे संपत्ती, म्हणून वसुंधरा, वसुधा, वसुमती वगैरे. वसु म्हणजे (आठ)देवताविशेष. --आप, ध्रुव, सोम, धर, अनिल, अनल, प्रत्यूष, प्रभास. असेच आणखी काही अर्थ. पण या वसु चा वस्‌ या धातूशी काही संबंध नाही.--वाचक्‍नवी

शतृ-शानच्

चालू वर्तमानकाळासाठी संस्कृतमध्ये प.प. साठी शतृ प्रत्यय असतात आणि आत्मनेपदासाठी शानच् प्रत्यय असतात.

शतृ = श्+अ+त्+ॠ = पहिले (श्) व शेवटचे (ॠ) अक्षर काढून टाकले की उरतो तो अत् प्रत्यय.

शानच् = श्+आ+न्+अ+च् = पहिले (श्) व शेवटचे (च्) अक्षर काढून टाकले की उरतो तो आन प्रत्यय. मात्र ह्या आन ला कधी कधी म् हा उपसर्ग लागतो (मुक् आगम) आणि त्याचे मान हे रुप होते व तो प्रत्यय लागून वर्धमान, कम्पमान, वन्दमान अशी रुपे होतात.

त्याचा अष्टाध्यायी अनुसार सर्वसाधारण नियम असा -

"तृ.पु.ए.व. मध्ये "ते" पूर्वी असलेला स्वर जर र्‍हस्व अकार असेल तर आणि तरच आन प्रत्ययाला मुक् आगम होऊन त्याचा मान प्रत्यय होतो. मात्र हा प्रत्यय तृ.पु.ब.व. च्या रुपातील शेवटच्या पदाच्या ("ते/न्ते") पूर्वीच्या शब्दाला लागतो.

उदा. :

तृ.पु.ए.व. तृ.पु.ब.व. "तृ.पु.ए.व. मध्ये "ते" पूर्वी असलेला स्वर" तृ.पु.ब.व. मधील "ते/न्ते" पूर्वीच्या रुपाला लागणारा प्रत्यय (आन/मान)
चि-चिनुते चिन्वन्ते उकार: चिन्वानः
वर्धते वर्धन्ते र्‍हस्व अकार: वर्धमानः
कुरुते कुर्वते उकार: कुर्वाणः
भुङ्क्ते भुञ्जते ककारः भुञ्जानः
अधीते अधीयते ईकारः अधीयानः
म्रियते म्रियन्ते र्‍हस्व अकार: म्रियमाणः

मात्र वत् प्रत्यय ही बाब पूर्णपणे वेगळी आहे. मान आणि वत् ह्या दोघांची सांगड घालण्यात हशील नाही. उगाच गोंधळ वाढेल.

 
^ वर