"दसविदानिया"
या शनिवारी पाहिलेल्या प्रस्तुत चित्रपटाबद्दल राजेंद्र यांच्या चित्रपटविषयक धाग्यावर लिहायचे म्हणून लिहायला घेतले ; पण लिहिता लिहिता नेहमीपेक्षा थोडे अधिक लिहावेसे वाटले ; म्हणून हा धागा.
तर कालच हा चित्रपट पाहिला. सर्वप्रथम , हे नमूद करायला हवे की, अनेक नव्या चित्रपटांच्या गट्ठ्यातून हाच सिनेमा पहायला निवडण्याचे एक कारण म्हणजे , कोलबेर यांनी या चित्रपटाचा मागे केलेला उल्लेख हे होय.
डिस्क्लेमर : पुढील काही परिच्छेदांत , चित्रपटाच्या कथानकादि घटकांबद्द्ल माहिती आहे. ज्यांना त्याबद्दल वाचायचे टाळायचे असेल त्यांनी वाचू नये.
तर , चित्रपटाच्या ह्या गमतीशीर नावामागे आहे "दो स्विदानिया" या , रशियन वाक्प्रचारावरील श्लेष. "दो स्विदानिया" म्हणजे भेटीअंती निरोप घ्यायचे शब्द :" गुड् बाय्" या अर्थी. "कॅन्सरने अकाली मरू घातलेल्या एका पस्तीशीच्या अविवाहित माणसाने , आपल्या शेवटच्या दिवसांत बनवलेली कामांची यादी आणि त्या कामांची पूर्तता" अशा एका ढोबळ कथासूत्रात चित्रपटाचे सार सामावते.
अर्थातच , विनय पाठक या नटाने केलेली "अमर कौल" ही या सिनेमातली मध्यवर्ती भूमिका. या नटाबद्दल , त्याने केलेल्या आधीच्या कामांमुळे विलक्षण कुतूहल आणि आदर वाटत् होताच. माझ्यापुरते म्हणायचे तर या चित्रपटाकरता , त्याने आपले सर्व कौशल्य म्हणा , अभिनयाची जाण म्हणा , एकूण जगण्याबद्दलचे भान म्हणा या सर्वांतील उत्कृष्ट म्हणता येईल ते पणास लावले , या भूमिकेचे सोने केले असे मी म्हणेन.
मृत्यूविषयक चिंतन , "मरणात खरोखर जग जगते" , "मृत्यूस कोणी हासे , मृत्यूत कोणी हासे" वगैरे वगैरे वचने या सर्व गोष्टी खरे तर नवीन नाहीत. खुद्द हिंदी चित्रपटांत सुद्धा , मृत्यूविषयक चित्रपट कमी नाहीत. दिलीप कुमार पासून शारुख खान पर्यंत , ऐन तारुण्यात मरणारे नायक आपण पाहिलेत. "आनंद" सारख्या चित्रपटावर कुसुमाग्रजांसारख्या मातबर कवीला एक चिंतनगर्भ नाटक लिहावेसे वाटले. "दसविदानिया" या परंपरेतला असेही एका अर्थाने म्हणता येईल.
मात्र , यातला नायक , कुठल्याही उत्तुंग शोकांकितेत शोभावा असा नाही. त्याच्याकडे ट्रॅजेडी किंगचा रुबाब नाही , सत्तरीमधल्या सुपरस्टारचा करिष्मा नाही , शारुख खान सारखा शेकडो कोटींचा वायदा हा चित्रपट स्वप्नात करत नाही. नायकाचे दिसणे , त्याचे कर्तृत्व , मृत्युची सावली पडायच्या आधीचा त्याचा जीवनविषयक दृष्टीकोन , इतरांना त्याच्याविषयी - इतरांनाच काय , त्याला स्वतःलासुद्धा - त्याच्याविषयी फार आदर , प्रेम , दरारा असे काहीच वाटत नाही. मात्र , मर्ढेकरांच्या कवितेतली "तू एक मुंगी , मी एक मुंगी" मृत्यूच्या छायेत वावरताना , अचानक संपत आलेल्या जीवनरसाच्या शेवटच्या थेंबाना पीताना , मुक्ताबाईच्या "मुंगी उडाली आकाशी" शी , क्षणैक का होईना , पण नाते सांगून जाते.
स्वतःला जपून असलेला हा माणूस शेवटच्या दिवसांमधे गिटार शिकतो , मोटार घेतो , नोकरीला लाथ मारतो (आणि नोकरीला लाथ मारताना संवेदनाहीन बॉसलाही) हेसगळे तर ठीकच. पण त्याचबरोबर महत्त्वाचे म्हणजे , अशा अनेक गोष्टी करतो , ज्या एरवी स्वभावजन्य भीड , "इन्फेरियॉरिटी कॉम्प्लेक्स्"मुळे त्याने केल्या नसत्या. उदाहरणार्थ , जिच्यावर बालपणापासून प्रेम केले, त्या , आता एका मुलीची आई झालेल्या आपल्या मैत्रीणीला तो सांगतो की , "तुझे आताचे आयुष्य दृष्ट लागण्यासारखे सुंदर आहे खरे ; पण मी मात्र तुझ्यावर प्रेम केले - अगदी लहानपणापासून." आणि एखादी लढाई जिंकल्याच्या आनंदात पावसात निघून जातो. आपल्या एकेकाळच्या जीवलग मित्राला १२ वर्षांनी भेटण्याकरता रशियाला त्याच्या आलिशान घरी जातो . त्याच्या बायकोला वाटते , हा फुकट ट्रीटमेंट मागायला आलाय. तर तो कुणावरही न चिडता शांतपणे त्या घराबाहेर पडतो . नंतर आपल्या त्याच मित्राला अगदी शांतपणे सांगतो : "तुला भेटायचे होते , ते भेटलो. याहून काही नको होते. तुझ्या बायकोला भेटण्याइतका आता वेळ नाही , तिलाही माझा नमस्कार सांग"
माझ्या दृष्टीने , जर या चित्रपटाचे काही यश असेल तर , ते हेच की , अरे , लिस्टा बनवायच्या तर "गीझर दुरुस्त करायचाय्" , "ऑफिसात अमुक रिपोर्ट् अमुक तारखेपावेतो द्यायचाच आहे" असल्या गोष्टींचाच नका करू फक्त. हेच करत रहायचे असेल तर मग आणखी ४ महिने जगलो काय आणि ४० वर्षे जगलो काय , काय फरक पडतो ? "या जन्मावर , या जगण्यावर शतदा प्रेम करावे" या ओळी ऐकून ऐकून जर सवयीच्या होत असतील आणि आपण काडेचिराईताचे आयुष्य सोडणार नसू , तर काय उपयोग आहे या ओळींचा ?
हे झाले चित्रपटाच्या अस्तिपक्षी. काही गोष्टी टाळता आल्या असत्या. मुद्दाम रडू आणण्याचा प्रयत्न केलेले ("टीअर जर्कींग्") काही प्रसंग , रशियात , मित्राच्या घराबाहेर पडल्यावर एका वेश्येबरोबर घालवलेला काळ , तिने त्याला निराशेपोटी करत असलेल्या आत्महत्येपासून परावृत्त करणे इ. इ. भाग अतिरंजित वाटू शकतो. मात्र एकूण पटकथेचे हलकेफुलके , सहज स्वरूप , पाठकसकट सगळ्यांनी केलेला अभिनय , मृत्युविषयक भाष्याला कठोपनिषद-सदृष् अतिगंभीर , किंवा सामुदायिक हंबरडेवजा स्वरूप देण्याचे टाळून , त्यातल्या विसंगतींना नर्म विनोदाच्या शिडकाव्याने रंगविणे यामुळे , एकूण सकारात्मक बाबींचे पारडे माझ्या हिशेबाने जड ठरले.
Comments
विनय पाठक
'भेजा फ्राय' हा चित्रपट पाहिल्यापासून विनय पाठक माझाही आवडता कलाकार झाला आहे. देखणे रुपडे किंवा ग्लॅमर नसूनही (जीएंच्या भाषेत सांगायचे झाले तर) पडद्यावर आल्यानंतर हा माणूस चंगीझखानाप्रमाणे सगळे बळकावून बसतो. दसविदानिया अनेक सायटींवर उपलब्ध असूनही पाहण्याची वेळ जमून आली नाही. मात्र हा लेख वाचून आजच पाहावासा वाटत आहे.
यावरुन आठवलेः
जॅक निकल्सन आणि मॉर्गन फ्रीमन यांसारखे दिग्गज असूनही, साधारणपणे "आपल्या शेवटच्या दिवसांत बनवलेली कामांची यादी आणि त्या कामांची पूर्तता" याच कथासूत्रावर आधारित "द बकेट लिस्ट" हा सिनेमा मात्र माफक मनोरंजनापलीकडे फारसे काही देत नाही. यातील अनेक विनोद शिळे आणि वास मारणारे होते. रात्रीचे न संपलेले जेवण सकाळी गरम करुन वाढल्यासारखा प्रकार!
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
सुरेख
परीक्षण आवडले. विनय पाठकने केलेली आधीची कामेही सुंदर आहेत. एकूणात पिच्चर बघायच्या यादीत टाकला आहे.
----
मलाही आवडला..
मलाही हा चित्रपट भयंकर आवडला होता! विनय पाठक आवडतोच. पण या चित्रपटात त्याने कमाल केलीय!!
सुंदर परिक्षण
सुंदर परिक्षण! 'स्वतःला जपून असलेला हा माणूस' हा उल्लेख विशेष आवडला अगदी चपखल आहे.
आजकालच्या बॉलीवुड पटांमध्ये नक्कीच उजवा वाटणारा चित्रपट.
सुंदर परीक्षण
डिस्क्लेमर वाचूनही पुढे परीक्षण वाचले, आणि तरी चित्रपट बघायची इच्छा बळावलीच.
+१
सुंदर परिक्षण
अरे , लिस्टा बनवायच्या तर ".." मग आणखी ४ महिने जगलो काय आणि ४० वर्षे जगलो काय , काय फरक पडतो ? "..तर काय उपयोग आहे या ओळींचा ?
टाळ्या.
परीक्षण वाचुन सिनेमा बघायचा [पैसे, वेळ वाचवल्याचा ] आनंद मुक्तसुनीत नक्कीच मिळवुन देतात :-)
चित्रपट बघायची इच्छा नव्हतीच व ती शेवटच्या परिच्छेदामुळे पक्की. त्यामुळे धन्यवाद :-)
सहमत
आहे. अजून पिक्चर पाहिलेला नसला, तरी परीक्षण वाचले. आता संधी मिळताच नक्की पाहीन.
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
परिक्षण्
परिक्षण आवडले. चित्रपट सुद्धा चांगला आहे.
- सूर्य.
थोडा वेगळा
चित्रपटाची थीम तशी फारशी वेगळी नाही, परंतू सादरीकरण आवडले. अमर नेहाकडे आपले प्रेम व्यक्त करतो, ते दृश्य हळवे आणि खूपच सुंदर आहे. मला या चित्रपटातली जी गोष्ट सर्वाधिक आवडली ती म्हणजे, नायकाचा मृत्यू होताना त्यात दाखवलेले नाही. शेवटी एकदम फोटोला हार घात्लेली तस्बीर दिसते. मृत्यूवर फोकस करून चित्रपट मेलोड्रॅमॅटिक न बनवता जीवनावर फोकस करून संयत बनवला आहे. आणखीही काही काही दृश्ये चांगली आहेत. जसे आपला मित्र राजीव याला शेवटची कडूकडून मिठी मारून अमर पुन्हा भारतात यायला निघतो. हे दृश्य पाहताना वाटतं, आपल्या जवळच्या व्यक्तीला आपण आता बघतो आहोत, ते शेवटचे हे जाणवत असताना किती दु:ख होत असेल.
एकुणात चांगला चित्रपट.
राधिका
उत्तम
दसविदानिया उत्तम चित्रपट आहे. परीक्षणही छान आहे.
आवडले !
परिक्षण आवडले. चित्रपट जरुर पाहीन !
+१
+१
नक्की पाहिन!
आपला
गुंडोपंत
दस्विदानिया
हा चित्रपट अद्याप पहाता न आल्याचे शल्य होतेच. आता ते वाढले आहे. आता पाहिलाच पाहिजे.
उत्तम परीक्षण, रसग्रहण, काय म्हणाल ते.
सन्जोप राव