इतक्यात काय पाहिलेत? - भाग २

बिल गेट्सच्या व्हिस्टालाही लाजवील इतकी प्रचंड लोकप्रियता 'इतक्यात काय पाहिलेत?' या चर्चेला मिळाली. त्याबद्दल सर्वांचे अनेक आभार. याचा दुसरा भाग सुरू करावा अशी मागणी आम्हाला आलेल्या लाखो विरोपांमध्ये झाली आहे. जनमताच्या रेट्याखातर आम्ही या चर्चेचा दुसरा भाग सुरू करत आहोत.

भाग १ इथे.

लेखनविषय: दुवे:

Comments

जाने भी दो यारो

इथे चेन्नईतील बर्-याच दक्षिण भारतीय मित्रांना हिंदीतील निखळ विनोदी चित्रपट कसा असतो ते माहिती नव्हते. त्यांच्यासाठी पुण्यात मित्राला सांगून कुरीयरने डीव्हीडी मागवून घेतली आणि नसिरुद्दीनचा 'जाने भी दो यारो' दाखवला.
अगदी हसून पूरेवाट प्रकार आहे...

५० लाख

५० लाख नावाचा एक हिंदी अनुवादित तेलगू चित्रपट पाहिला. सगळ्या बाजूंनी नाडल्या गेलेल्या चार मित्रांना पैसे कमावण्याची एक ऑफर मिळते. एका डॉनला देशाबाहेर फरार व्हायचे असते. तो डॉन ज्या विमानाने जाणार आहे ते विमान अपहृत करुन प्रवाशांना ओलीस ठेवून त्या डॉनला सुखरुप देशाबाहेर जाता येईल अशी व्यवस्था करायची असा हा प्लॅन.

मात्र प्रत्यक्षात काही वेगळंच घडतं. बऱ्याच नवोदित कलाकारांमुळे फ्रेश वाटणारा सिनेमा.
सिंधू तोलानी या चित्रपटात झकास दिसते.

गाणी, आयटम नृत्ये, प्रेमकथा वगैरे काही प्रकार नसूनही मसालेदार मनोरंजन आहे.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

अंडर् द बॉंम्ज

दक्षिण लेबेनानवर झालेल्या बॉंम्ब हल्ल्यांमध्ये बेचिराख झालेल्या भागात आपल्या मुलाला शोधावयास गेलेल्या आईची करूण
कहाणी. सुन्न करून टाकणारी गोष्ट !
शरद

लिटिल मॅनहॅटन

मी आताच लिटिल मॅनहॅटन नावाचा एक भारी गोड चित्रपट पाहिला. एका दहा-अकरा वर्षाच्या मुलाच्या पहिल्या प्रेमाची ही कहाणी आहे. अख्खा चित्रपटच खूप सुंदर आहे, पण त्यातले एक दृश्य मनात चांगलेच ठसले आहे- एका पायाने वेग द्यायच्या तीन-चाकी स्कूटरवर आपल्या 'गर्लफ्रेंड'ला डबलसिट घेऊन जाताना या चित्रपटातला नायक.
राधिका

धन्यवाद

चांगला दिसतो आहे.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

द ट्रुमन शो

जिम कॅरी चा केवळ अशक्य चित्रपट! अनोखा विषय आणि सुन्दर दिग्दर्शन यांनी नटलेला चित्रपट!
--- यतीन् गंभीर

हो

जिम क्यारीचे जुने चलच्चित्रपट चांगले आहेत. आता काप जाऊन भोके राहावी तसे त्याचे चित्रपट येऊ लागले आहेत. काही दिवसांपूर्वी पाहिलेला येस म्यान बघून डोके दुखायला लागले होते. अगदी शारुख खान झाला आहे जिम क्यारीचा


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

इटरनल सनशाईन ऑफ स्पॉटलेस माईन्ड

रोजच्या वैतागाला कंटाळत, आपल्या प्रेयसीच्या (केट विन्स्लेट) आठवणी हटवण्याच्या आवेशात क्लिनिकमध्ये, तिच्या काही आठवणी व तिचे आठवणीतले अस्तित्व जपण्यासाठी, स्मृतीकोषात धडपडणारा जिम 'लक्षात राहण्यासारखा'!

आठवणीमधला प्रेमाचा ठसा' आणखी ठसवणारा '५० फर्स्ट डेटस्' सारखा हाही चित्रपट 'हा ही पाहा' श्रेणीतला.

आयडेंटिटी

हा दुवा पहा

बहु-व्यक्तिमत्व एक काया आजारावर आधारित असणारा हा चित्रपट. यावर एक हिन्दी चित्रपट निघाला होता, तो महाभिक्कार होता!
हा मस्त आहे. थोडा भयपट थोडा सस्पेन्स असणारा आहे.
--- यतीन गंभीर

परसुट ऑफ ह्यापिनेस्...

कसा आहे? बरेच दिवस बघण्याचे मनात आहे.
-सौरभ.


ताजी बातमी!

उपक्रमावर स्पॅम मेल्सचा धुमाकूळ!
एका सदस्याला आले लाखो विरोप!
सदस्यत्व डिलीट करण्याची उपक्रमपंतांना विनंती!
जनमताच्या रेट्याला वैतागल्याने काही काळ अज्ञातवासात घालवणार! ;-)

==================

मस्त...

बघाच!

पाहाच

'ड्रामा' किंवा सत्यघटनेवर आधारित अशा चित्रपटांची आवड असेल तर हा चित्रपट नक्की आवडेल.

द रीडर

राल्फ फाएंझ् आणि केट विन्स्लेट यांच्या भूमिका असणारा 'द रीडर' आजच पाहिला. पंधराव्या वर्षी आपल्या वयाच्या दुपटीहून मोठ्या असणार्‍या स्त्रीच्या प्रेमात पडलेल्या मुलाला, पुढे कायद्याचे शिक्षण घेत असताना तीच स्त्री जर्मन युद्ध गुन्हेगार म्हणून सामोरी येते, एवढे रसभंग न करता सांगता येईल.

चित्रपट चांगला आहे. कथानकात विशेष कलाटण्या किंवा मुख्य व्यक्तिरेखेचे समर्थन असला काही प्रकार नाही, पण मुख्य अभिनेत्यांच्या कामासाठी पाहण्यासारखा आहे. दुसर्‍या महायुद्धाचा काळ, राल्फ फाएंझ्, हॅना हे नाव आणि एका व्यक्तीला दुसरी व्यक्ती पुस्तकांतून काही वाचून दाखवते आहे असे प्रसंग यामुळे थोडी 'द इंग्लिश पेशंट'ची आठवण येते.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

संपादक मंडळाला विनंती

लेखातील भाग १ ला जाणारा दुवा चुकला आहे. दुरूस्ती करता येऊ शकेल काय?
धन्यवाद.
----

गार्डन स्टेट

कालच हा चित्रपट पाहिला. त्यामागची कल्पना फारच वेगळी वाटली आणि आवडली. आपल्याला एखाद्या छोट्याशा गोष्टीमुळे कधीकधी खूप आनंद किंवा खूप दु:ख होते, तेव्हा वाटते की आपल्याला भावनिक स्थितप्रज्ञता आली असती तर बरे झाले असते. या चित्रपटातील नायकाला आयुष्याची १५ वर्षे सतत मूड स्टॅबिलायझर्स आणि ऍन्टि- डिप्रेसन्ट्स घेऊन अशीच भावनिक स्थितप्रज्ञता आली आहे. आपल्या आईचा मृत्यू झाला तरीही त्याच्या डोळ्यातून एक अश्रूदेखिल बाहेर पडत नाही. तेव्हा तो म्हणतो, "मला कशाचं वाईट वाटत नाही, याचंच मला वाईट वाटतं." ही कहाणी आहे त्याच्या जागे होण्याच्या प्रक्रियेची. त्या गोळ्या बंद केल्यावर हळूहळू त्याला राग-लोभ, सुख-दु:ख या सगळ्या भावना जाणवू लागतात व तो जगू लागतो. एक वेगळी आणि विचार करायला लावणारी कल्पना.

आज विकिवर पाहिल्यावर कळलं की 'स्क्रब्स' या मालिकेत मध्यवर्ती भूमीका साकारणार्‍या झॅक ब्राफने या चित्रपटाची पटकथा लिहिली आहे (तीही त्याचे शिक्षण चालू असताना), दिग्दर्शन केले आहे, आपली आवडती गाणी संकलित करून ती चित्रपटात वापरली आहे व स्वतः नायकाची भूमिकाही केली. हे वाचल्यावर या चित्रपटाचे आणखीनच कौतुक वाटले. आणखी एक मजेदार गोष्ट म्हणजे या चित्रपटाच्या सुरवातीलाच "सूर्यकोटी समप् रभ" हा श्लोक पार्श्वसंगीतात वापरला आहे.

राधिका

अवांतर: द मॅट्रिक्स रिवॉल्युशन्स

मॅट्रिक्स मालिकेतील या तिस-या चित्रपटाच्या शेवटी जे थीम साँग वाजविले जाते, ते 'तमसो मा ज्योतिर्गमय' वर बेतलेले आहे.

इनसाईड मॅन

इनसाई मॅन चे शीर्ष संगीत छैंया-छैंया आहे. चित्रपट पाहण्यासारखा आहे. बँकेवरच्या दरोड्याची, बाहेरच थांबलेल्या पोलिसांना गुंगारा देणारी पद्धत खास.

छैंया छैंया

इनसाइड मॅन पाहिलेला नाही पण चित्रपटाची सुरूवात पाहिली आहे. तिथे छैंया छैंया ऐकताना थोडे विचित्र वाटले. कदाचित या गाण्याचे शब्द अप्रतिम आहेत म्हणूनही असेल. म्हणजे डीप पर्पलच्या कॉन्सर्टला जावे आणि त्यांनी गिटार वगैरे फेकून देऊन 'युगे अठठावीस विटेवरी उभा' म्हणायला सुरूवात करावी तसे काहीसे. :-)

अवांतर : यूट्यूबवर* टोपीकरांचे प्रतिसाद वाचून त्यांना छैंया छैंया आवडल्याचे दिसते आहे.
अंदाजे ५ किमी अवांतर : यूट्यूबचे कृपया यूनळी असे मराठीकरण करू नये. ते कंपनीचे नाव आहे. आणि तसे करायला सुरूवात केली तर झेरॉक्स, नायकी वगैरेंवर दांड्या उडतील हा भाग वेगळाच.

----
"Is there a pinkish hue?" -- George Costanza

अप्रतिम जर्मन चित्रपट "गुडबाय लेनिन"

कथासूत्र : अलेक्झांडर केर्नर हा पूर्व जर्मनीतील टीव्ही तंत्रज्ञ. त्याचे वडिल तो लहान असताना पश्चिम जर्मनीला पळून गेलेले असतात. इथे जुलमी कम्युनिस्ट राजवट अलेक्झांडरच्या आईला त्रास द्यायला सुरवात करते. त्याचा परिणाम म्हणून मुलांच्या सुरक्षिततेसाठी ती कट्टर कम्युनिस्ट कार्यकर्ती बनते.

अलेक्झांडर मोठा होतो आणि त्याला कम्युनिस्ट राजवटीचे खरे रुप कळते. तो कम्युनिस्टांविरुद्ध निदर्शनांच्यात भाग घेतो. असेच एका निदर्शनात स्टासी त्याला जबर मारहाण करतात आणि ते दृश्य त्याची आई पाहाते आणि बेशुद्ध पडते. काही महिन्यांनी ती शुद्धिवर येते. मात्र मध्यंतरीच्या काळात बर्लिनची भिंत पडून दोन जर्मनी एक झालेले असतात. डॉक्टर अलेक्झांडरला सांगतात, तिच्या मनाला ताण येईल असे काहीही घडू देऊ नकोस, तिची प्रकृती नाजुक आहे आणि इथे खरा चित्रपट चालू होतो.

आईला कम्युनिस्ट राजवट कोसळली हे समजू न देण्यासाठी बिचारा अलेक्झांडर आकाश पाताळ एक करतो. आईला आनंद व्हावा म्हणून आपल्या वडिलांना शोधून आणतो. त्या सर्वांतून अनेक गमती जमती घडत राहतात.

मात्र विनोदाची झालर असलेला हा चित्रपट अधूनमधून पूर्व जर्मनांच्या दु:खाची जाणीव करून देतो. त्या चित्रपटाविषयी इथे, इथे आणि इथे अधिक वाचता, पाहता येईल.

_______________________________________________
भो भद्र कृतं मौनं कोकिलैर्जलदागमे ।
वक्तारो दर्दुरा यत्र तत्र मौनं हि शोभनम् ।।

मार्क्स ब्रदर्स

मार्क्स ब्रदर्स अर्थात ग्राउचो, फिप्पो, चिको, हार्पो मार्क्स यांचे डक सूप, ऍनिमल क्रॅकर्स हे चित्रपट धमाल आहेत. यात कथानकाला काहीही अर्थ नाही. कथा आपल्या गतीने चालू असते आणि प्रत्येक वाक्यावर ग्राउचोचे पीजे चालू असतात. मधून मधून गाणीही असतात.

----
"Is there a pinkish hue?" -- George Costanza

नाईट ऍट द् ऑपेरा!

डक सूप भन्नाट होता. नाईट ऍट......... बघितला नाही तरी चालेल.

-सौरभदा

==================

द ग्रेट डिबेटर्स

नुकताच पाहिलेला लक्षात राहिलेला चित्रपट म्हणजे द ग्रेट डिबेटर्स. आंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्धेतील कृष्णवर्णीयांच्या सहभागाच्या माध्यमातून तात्कालीन कृष्णवर्णीयांच्या अवस्थेवर भाष्यकरणारा सत्यघटनांवर आधारीत हा चित्रपट नक्कीच पाहण्याजोगा.

मस्त चर्चा

चर्चा खूपच मनोरंजक वाटली. अशीच चालू दे. धूमकेतूसारखी उपक्रमाला भेट दिली आणि चर्चेने खिळवूनच टाकले.
माझ्या आवडत्या चित्रपटांमधे सामील असलेले काही चित्रपट :

डियर फ्रँकी
काम करणारे सर्वच लोक फारसे प्रसिद्ध नसूनही सगळ्यांनीच अतिशय सुरेख कामे केली आहेत.

द इल्ल्युजनिस्ट
एडवर्ड नॉर्टन आणि गिमेटी यांची कामे अफलातून. शिवाय चित्रपटाची हाताळणीही वेगळी आहे.

ऍनिमेशनपटांमधे तोत्तोरो नावाचा एक जपानी चित्रपट आहे. मी तो जपानी संवाद ऐकण्यासाठी पहायला घेतला आणि नकळत त्याच्या प्रेमात पडले. युनिव्हर्सिटीमधे संशोधन करणारे एक बाबा आणि त्यांच्या आठ - नऊ आणि तीन-चार वयोगटातल्या दोन कन्या एका नव्या गावातल्या घरात रहायला येतात. त्या मुलींची आई आजारी असल्यामुळे जवळच्या इस्पितळात असते हे नंतर कळतं. त्यातल्या धाकट्या मुलीची बागेतल्या वनदेवाशी( की स्पिरिट. जपानी लोक निसर्गपूजक असल्यामुळे त्यांच्यात अशा स्पिरिट्सच्या संकल्पना असतात. की = झाड) मैत्री होते. त्या वनदेवाचं नाव तोत्तोरो. तो त्या दोघी मुलींना कशी मदत करतो याची अतिशय नेत्रसुखद कथा म्हणजे तोत्तोरो. कदाचित तोनारिनो तोत्तोरो असंही नाव असू शकेल याचं.

लिट्ल मिस सनशाईन आणि फाईंडिंग नेव्हरलँड हे यापूर्वी उल्लेख येऊन गेलेले सिनेमेही मस्त आहेत. विशेषत। फाईन्डिंग नेव्हरलँड आणि पायरेट्स ऑफ द कॅरीबियन लगोपाठ बघितल्यामुळे या दोन्ही चित्रपटांमधे जॉनी डेप या एकाच माणसाने काम केलंय यावर विश्वास ठेवणं कठीण झालं होतं. चार्ली ऍन्ड द चॉकोलेट फॅक्टोरी मधे मात्र विली वोंका म्हणून त्याने अगदी निराशा केली. हा चित्रपट कृपया बघू नये.
बाकी कूजो कोणी पाहिलाय का ? कसा आहे? ते पुस्तक वाचायचा प्रयत्न केला होता पण त्यांची गोष्ट बहिणीने आधीच सांगून रसभंग केल्यामुळे पुढे काही वाचलं नाही.

--अदिती

ता.क. वरच्या यादीत घालायला विसरलेला चित्रपट म्हणजे मि. बीनचा हॉलिडे . रोवेन अट्किन्सन चा अतिशय बोलका चेहरा अप्रतिम आणि हास्यस्फोटक हेवेसांनल. खास करून समुद्रकिनारा पाहिल्यावर त्याने चेहर्‍यावर दाखवलेले अतिशय निरागस आनंदाचे भाव पाहताना क्षणभर डोळ्यात पाणी येईल असंच वाटलं. आणि दुसर्‍या दिग्दर्शकाची अतिशय मिस्कीलपणे खेचलेली टांग तर दाद देण्याजोगी... बहुतेक लोकांनी पाहिला असेलच, नसल्यास आवर्जून बघावा

द पार्टी

पहिल्या भागातील प्रतिसादात पीटर सेलर्स चे नाव वाचून त्याचा 'द पार्टी' (१९६८) नावाचा चित्रपट आठवला. एक भारतीय नवकलाकार एका उच्चभ्रू पार्टीचा कसा बट्ट्याबोळ करतो हे दाखवले आहे. पीटर सेलर्स ने व्हरुंडी बक्शीच्या रोलमध्ये गंमत केली आहे. विशेषतः त्याचा (दक्षिण)भारतीय ऍक्सेंट. अगदी अवश्य पाहावा असा नसला तरी एकदा पाहण्यासरखा.

काही चित्रफिती : , , , ,

पार्टी

पार्टीचे काही भाग यूट्यूबवर पाहिले आहेत. पीटर सेलर्स अफलातून आहे.

अवांतर : शीर्षकावरून मला रोहिणी हट्टंगडी-गोविंद निहलानीचा पार्टी आठवला.
----
काय? तुम्ही चित्रपट पाहिलेत? आणि वर फोटोही काढलेत? स्वतःला भौतिकशास्त्रज्ञ कसे म्हणवते तुम्हाला?

वॉल-ई

यंदा ऑस्कर नामांकन असलेला वॉल-ई हा ऍनिमेशन चित्रपट. एका वाक्यात सांगायचे तर भविष्यकाळातील एक कचरा गोळा करणारा यंत्रपुरूष आणि यंत्रस्त्री यांची लव्ह-ष्टोरी. पण हे वर्णन म्हणजे महाभारताची कथा चुलत भावांची भांडणे होतात असे सांगण्यासारखे आहे. दोन्ही रोबो विशेष बोलत नाहीत पण हावभाव आणि देहबोली यातून आपले अनेक कुमार, खान पोतंभर संवाद ओतूनही जो परिणाम साधत नाहीत तो लीलया साधला जातो. याचबरोबर पर्यावरणाकडे दुर्लक्ष केल्याचे दुष्परिणामही बघायला मिळतात. डग्लस ऍडम्सच्या हिचहायकर्स गाईडमधल्या मार्विन ह्या रोबोची बरेचदा आठवण होते.
दीड तास निखळ मनोरंजन करणारा सुंदर चित्रपट.
भर : भाग एकमध्ये याबद्दल लिहीले गेले आहे. त्यापेक्षा माझे मत वेगळे आहे असे आत्ताच लक्षात आले. :)

----
काय? तुम्ही चित्रपट पाहिलेत? आणि वर फोटोही काढलेत? स्वतःला भौतिकशास्त्रज्ञ कसे म्हणवते तुम्हाला?

पिंक पँथर टू

कालच पाहिला. डोके बाजूला ठेवून फक्त विरंगुळा म्हणून २ तास हसायचे असेल तर सिनेमा उत्तम आहे.चित्रपटाची कथा जुनीच आणि फारसा विचार करून पाहण्यासारखी नाही परंतु प्रत्येक वाक्याला विनोद आणि पंचेस आहेत.

स्टीव मार्टीन हा आमचा प्रचंड लाडका असल्याने तो नुसता पडद्यावर अवतरला तरी आम्हाला हसू फुटते ही खरी गोम. पिंक पँथर १ हा पिंक पँथर २ पेक्षा चांगला असला तरी हा पिंक पँथरही चित्रपटगृहात जाऊन इतरांबरोबर हसताहसता बघण्यालायक नक्कीच आहे. म्याडम ऐश्वर्या मात्र विनोदाशी आपले काहीच देणे घेणे नसल्याच्या आविर्भावात पूर्ण चित्रपटात वावरतात. आपली हेअरश्टाईल बदलण्याबाबत त्यांनी गांभीर्याने विचार करावा निदान अध्येमध्ये बारीक केसात, अध्येमध्ये पोनीटेलमध्ये वावरणार्‍या नवर्‍याकडून काही टिप्स घ्याव्यात असा आमचा त्यांना आगाऊ सल्ला आहे. ;-)

चित्रपटाबद्दल दोन शब्दांत सांगायचे झाले तर - तू गूद!

आऊटसोर्स्ड

आताच हा चित्रपट पाहिला. सौम्य विनोदी चित्रपट आहे. अमेरिकेतून भारतात आऊटसोर्स्ड झालेली कॉल सेंटर्स आणि एका अमेरिकन माणसाला भारतात येऊन कॉलसेंटरमधील लोकांना प्रशिक्षण देण्यात आलेल्या अडचणी, अनुभव यावर आधारित पठडीतील कथा असली तरी वेळ घालवण्यासाठी मजेशीर चित्रपट आहे. मला खूप आवडला.

जरूर पहावा.

आऊटसोर्स्ड

कॉलसेंटर्स विनोदी लघुपट

कॉलसेंटर्स संबंधी हा विनोदी लघुपट पाहिला आहे का? नक्की बघा मजेशीर आहे.

लघुपट आवडला

लघुपट पाहिला. खूपच धमाल आहे :)

 
^ वर