आनंद यादव यांचे लेखन

महाराष्ट्र टाईम्समधील बातमीनुसार ज्येष्ठ लेखक डॉ. आनंद यादव यांची अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यांचे हार्दिक अभिनंदन.

डॉ. आनंद यादव यांच्या झोंबी या आत्मचरित्रातला काही भाग आम्हाला दहावीच्या अभ्यासक्रमात होता. त्यातून त्यांच्या लेखनाची ओळख झाली. पुढे झोंबी मिळवून वाचून काढले. त्याच्या प्रस्तावनेत पुलंनी लिहिलेले वाक्य अजूनही लक्षात आहे. "वाचकाला अस्वस्थ करणाऱ्या अशा साहित्यानेच मराठी साहित्याला समृद्ध केले आहे."

आनंद यादव यांची झोंबी मालिकेतील नांगरणी, घरभिंती व काचवेल ही पुस्तके तर गोतावळा आणि माळावरची मैना हे कथासंग्रह वाचल्याचे आठवते आहे.

त्यांच्या आत्मचरित्रपर पुस्तकांमधून आधी शिक्षणासाठी आणि नंतर शहरात आल्यावर स्थिरस्थावर होण्यासाठी केलेले कष्ट आणि तडजोडी यांचे प्रामाणिक दर्शन होत राहते.

आनंद यादव यांच्या पुस्तकांबाबत व लेखनाबाबत चर्चा करावी यासाठी हा चर्चाप्रस्ताव सुरु करत आहे.

लेखनविषय: दुवे:

Comments

स्पर्शकमळे

'स्पर्शकमळे' हा शृंगारीक लेखांचा संग्रह प्रत्येकाने वाचावा असा आहे.
हा नाजुक विषय मस्त हाताळला आहे.
नऊवारीवरचा लेख तर अप्रतिम !!!

माहीत नव्हते

स्पर्शकमळे या संग्रहाबद्दल माहीत नव्हते. सांगितल्याबद्दल आभारी आहे. हे लेख आधी कुठे प्रसिद्ध झाले होते काय?


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

कविता..

आजानुकर्ण, पुलंच्या प्रस्तावनेतच यादवांच्या 'तळची भाकर' या कवितेबद्दल लिहले आहे. छान आहे ती कविता. काही ओळी इथे देतो.....

ऐकलं काय हो, उशीर करुनच न्याहारीला जावा;
जेऊ द्यात दीर मामांजी आदी. त्यान्सी वाढतात थोरल्या जावा.
कोणबी न्हाई वागत जिवाभावानं माझ्यासंगं
खाऊ द्यात ती दाल्ला-बायकू सोनं-रुपं आनंदानं.
जाऊन शिस्तीनं जेवायला तुम्ही हळूच उचला तळची भाकर.
आणि तिच्या पापडाखालचं लोणी, सांडगं खावा अगुदर.
ठावं न्हाई कुणाला गुपीत सासूबाईलाबी हे नका बोलू;
त्याबी घालतात दिरा-नणंदास्नी..."आणता नव्हं मला दिवाळीत शालू?"

आनंद यादवांच्या आत्मचरित्रपर कादंबरीतला 'झोंबी' हा पहिला भागच मला सर्वात आवडला. त्यांचा हिरवे जग हा कविता संग्रहही वाचावा म्हणतो.

अलीकडे शंकर सारडांनी यादवांचे साहित्य आत्मकेंद्री आहे तसेच त्याला वाड्मय मूल्य नसल्याची निवडणूकीत टीका केली होती. याबाबत तुम्हाला काय वाटते?
आणि शंकर सारडांच्या लेखनाबद्दल काय? त्यांचे तर एकही पुस्तक (मला) माहित नाही. कुणी वाचली आहेत काय?

सौरभ
==================

शंकर सारडा

शंकर सारडा हे समीक्षक आहेत.

अभिजित यादव
ता. कर्‍हाड जि. सातारा.

कविसुद्धा

शंकर सारडा हे कविसुद्धा आहेत. आणि ते साक्षेपी बरोबरच किती खवचट समीक्षक आहेत हे सुद्धा अध्यक्षीय निवडणूकीच्या भाषणांच्या निमित्ताने स्पष्ट झाले आहे.

शंकर सारडा

शंकर सारडा हे समीक्षक आहेत.

अभिजित यादव
ता. कर्‍हाड जि. सातारा.

लोकसखा ज्ञानेश्वर

आनंद यादवांना अतिशय प्रल्गभतेच्या अवस्थेत तटस्थपणे लिहीलेली इतिहासाधारीत कादंबरी म्हणजे लोकसखा ज्ञानेश्वर होय.
संत ज्ञानेश्वरांच्या कार्याच्या विस्तारल्या कक्षा आनंद यादवांनी अतिशय उत्कटपणे व खासकरून निर्हेतुकपणे चितारल्या आहेत.
एकीकडे ज्ञानेश्वरांना मर्यादित करण्याचे कारनामे सुरू असतांना त्यांचे लोकसौख्य ज्या प्रांजळपणे आनंदयादवांनी पटवून दिले आहे. त्याला तोड नाही.

वा वा

बाबासाहेबांनी चांगली माहिती दिली आहे.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

निवडणुक लढणार नाही....

@नारायण सुर्वे यांच्याविरुध्द् आनंद यादव पराभूत झाले होते.
@मी आयुष्यात कधीच अ.भा.सा.सं. अध्य़क्षपदाची निवडणूक लढविणार नाही अशी कबुली सप्टेंबर१९९१जामखेड जि.अहमदनगर येथे दिली होती .याची उगीचच् आठवण झाली.

हे माहीत नव्हते

यंदा निवडणुकीला उभे राहताना यादव यांनी याबाबत काही स्पष्टीकरण दिले होते काय?


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
 
^ वर