या जातींचं करायचं काय?

जग दिवसंदिवस सुशिक्षित होत चालले आहे. या सुशिक्षितपणाबरोबरच माणसांच्या डोक्याचे होत असलेले यांत्रिकीकरण हा ही एक कळीचा मुद्दा आहे. माणसात येत असलेल्या या यंत्रवतपणामुळे संवेदनशीलता ही नावालाच शिल्लक उरली आहे. उरलेली ही संवेदनशीलता ही मनात निबरपणाच्या कित्येक थरांखाली दडून बसलेली आहे. जून्या गोष्टी बदलत चालल्या आहेत. पण सर्वथा टाकून द्यावी असावी जात ही काही कुणाला सोडाविशी वाटत नाही. या जातीला प्रत्येक मनातून व समाजातून हद्दपार करण्याचे आजवर असंख्य प्रयत्न झाले. पण जी जात नाही ती जात अशी जातीची व्याख्याच काहींनी करून टाकली आहे. या लेखाचे शीर्षक वाचल्याबरोबरच बहूतेकांच्या (आशावादी विचासरणीमुळे सर्वांच्या असे टाईपवत नाही.) मनात आपली जात आली असेल. ही जात संकल्पना गोंजारून समाजात निर्माण होणा-या निरर्थक भींती आपणाला पाडायच्या असतील तर प्रत्येकाने आपली जातीनिहाय ओळख सोडायला हवी ( समाजात डॉक्टर आणि इंजिनीयर असा वेगवेगळा दर्जा असलेली माणसे असतील तर त्यांच्यातली भींत ही निरर्थक म्हणता येणार नाही. परंतु एक अ जातीचा डॉक्टर आणि दूसरा ब जातीचा डॉक्टर यांच्यात असणारी भींत ही बाष्कळच ठरते. म्हणून याच प्रकारच्या निरर्थक भींती किंवा भयंकर, विवेकहिन व असंस्कृत अर्थ असणा-या अशा भींती आपण पाडायला नको का?) तर सर्वच सुशिक्षित आणि त्याहूनही स्वतःला विवेकी म्हणवणारे आपली जातीनिहाय मिळणारी ओळख टाळायला तयार आहेत का? दूर्देवाने असे लोक भेटतच नाही. स्वतःला जातपात न माननारे दर्शवतांना स्वतःची जात दाखवून देणा-या अशा धूरीणांची नालस्ती करून त्यांचा जातीवंतपणा त्यांना दाखवून द्यायला हवा व खुल्या मनाने जातींना प्रभावहीन करण्याच्या चळवळीत येण्याचे निमंत्रण द्यायला हवे.
जाती दाखवून देण्याचे काही नमूनेदार प्रकार (माझ्या माहितीतले) खाली देत आहे. यात वाचक भर टाकू शकतील. ही अशी वागणूक का? असा प्रश्न खालील वर्तन करणा-यांना विचारायला हवा. जातीचा अभिमान हे एक उत्तर त्याला बहूतांशी येण्याची शक्यता आहे. तो आपण आपल्या पूर्वजांचा अभिमान म्हणून दर्शवू शकत नाही काय? ही जात कशाला? असो. तर नमुने पहा.
१. नविन माणूस भेटल्यानंतर त्याची जात जोखणारे काही प्रश्न विचारले जातात.
कुठल्या गावचे आपण?, आपले आडनाव काय? (प्रत्येक वेळी वरील उद्देश नसतो.)
२. मराठा लोकांची जात दाखवण्याची पद्धत.
आडनाव सांगतांना पाटील लाऊन सांगतील. वाहनावर जयशिवाजी, द ग्रेट मराठा, राजे तुम्ही पून्हा जन्म घ्या, छत्रपती अशी अक्षरे लिहून घेतील. (असे सांगतांना प्रत्येकवेळी जात दाखवण्याचाच उद्देश), नमस्काराऐवजी रामराम करतील (प्रत्येक वेळी वरील उद्देश नसतो.)
३. ब्राह्मण लोकांची जात दाखवण्याची पध्दत.
साठे, मुळे, शेटे ही आडनावे साठये, मुळये, शेटये अशी लिहितील. मध्यंतरी ब्राह्मणांनी जात लपविण्यासाठी गावाचे नाव आडनावात वापरणे सुरू केले होते. उदा. मंगरूळकर, सिर्सीकर इ. पण आता आडनावात गावाचे नाव वापरण्याची पद्धत ही ब्राह्मण आहोत हे दाखवण्यासाठी किंवा आहे ती जात लपवण्यासाठी वापरली जाते. (असे सांगतांना प्रत्येकवेळी जात दाखवण्याचाच उद्देश) स्वामी समर्थ, समर्थ रामदास, सावरकर यांचे उपासक वा समर्थक आहोत हे मुद्दामहून दर्शवतील. घरावर , वाहनावर पेशवा, रघूवंश, आर्यवंश असे लिहीतील. (प्रत्येक वेळी वरील उद्देश नसतो.)
४.सोनार लोक देवा तुझा मी सोनार असे वाहनावर लिहून घेतात. घरावर नरहरी कृपा असे लिहीतात.
५.चांभार लोक संत रविदासांची उपासना दर्शवतात. वाहनावर असे नाव लिहून घेतात.
६.नवबौद्ध लोक जयभीम असे अभिवादन करतात.
या सर्व प्रकारात ब्राह्मण आणि मराठा यांना पराकोटीचा जातीचा अभिमान असल्याचे बहूतांशी आढळून येते. या जातींमधले मोठमोठे विचारवंतही आपली जात दाखवण्याच्या प्रकारापासून स्वतःला रोखू शकले नाहीत. जातीत अभिमान बाळगण्यासारखे तसे काहीच नाही. मूळात जात ही संकल्पना गोंजारणेच चुकीचे आहे. आपला दर्जा आपल्या कार्यावरून जोखायला हवा, अभिमान आपल्या सर्वच पूर्वजांचा बाळगायला हवा. असा अभिमान बाळगतांना पूर्वजांच्या कार्याची विवेकी मिमांसाही करायला हवी. सर्वांनी जात या संकल्पनेला मुठमाती देण्याचा संकल्प करून हा उद्देश तडीस नेण्यासाठी अजून काय करता येण्यासारखे आहे यावर विचार करायला हवा.

लेखनविषय: दुवे:

Comments

जात

जाती दाखवून देण्याचे काही नमूनेदार प्रकार (माझ्या माहितीतले) खाली देत आहे. यात वाचक भर टाकू शकतील.
मी महाविद्यालयात प्रवेश घेताना जो फॉर्म भरला तिथे मला माझा धर्म आणि जात यांचा रकाना भरावा लागला. हे सरकारी धोरण आहे. जोपर्यंत हे चालू आहे तोपर्यंत जात कशी जाणार? हा मुद्दा अर्थातच आरक्षणाशी निगडीत आहे. आणि आरक्षणावर सर्व संकेतस्थळांवर लोक म्हातारे होईपर्यंत चर्चा झाल्या आहेत. परत त्यावर चर्चा करून काहीही निष्पन्न होईल असे वाटत नाही.

तसेही चर्चा करून काय निष्पन्न होते? चर्चेमुळे एकही मत बदलल्याचे आजवर पहाण्यात नाही.
----
रंध्रात पेरीली मी, आषाढ दर्द गाणी

पटले!

तुमचे निरिक्षण अगदी बरोबर आहे. लोकांना आपली जात दाखवण्याचा किती उत्साह असतो (विशेषतः मराठा आणि ब्राह्मण) हे ऑर्कुट मध्ये पाहुन थक्क झालो. जाती विषयक अक्षरशः लाखो कम्युनिटीज् ऑर्कुटवर असुन लोक सर्रास असल्या कम्युनिट्यांचे सभासद झालेले दिसतात. बर्‍याच जणांचा आपल्या प्रोफाइलमध्ये ही जातीविषयक कम्युनिटी टाकुन आपली जात दाखवणे हा एकमेव हेतू असतो. एकदा तर मी एक 'धनगर इंजिनियर्स ' अशी कम्युनिटी देखिल बघीतली होती, त्यावरुन् जातीव्यवस्थेचा मुळे अजुनही किती घट्ट रुजली आहेत ते लक्षात यावे.

'अबाउट मी' ह्या रकान्यामध्ये बर्‍याचदा दिसलेली ही माहिती बघा...

मी मराठा आहे!

होय, मी तोच मराठा ज्या कुळात "छत्रपती शिवाजी महाराज" जन्माला आले. मी तोच मराठा जिथे रक्त शिंपून "महाराष्ट्र" उभा केला राजांनी!

असंख्य अडचणींवर मात करत, सर्वांना सोबत घेत चालू असलेला हा मराठयांचा प्रवास सर्वांर्थाने ऐतिहासीक आहे.
ह्या मातीनं आम्हाला शिकवलंय निधड्या छातीनं जगायला. अर्थ दिलायं आम्ही "सहिष्णुतेला".

दुर्द्म्य इच्छाशक्त्ती असलेल्या आमच्या ह्या डोळयात आईच्या पदराआड कोरडे होण्याची "संवेदनाही" भरलीयं. आमच्या कणखर मनगटांनी लढतानाही आयुष्यातला "शॄंगार" कधीचं गमावला नाहिये.

घरादाराच्या आठवणी बाजूला ठेवून सीमेवर उभी आहेत आमची कित्येक माणसं. नव्या आधुनिकतेला गरज आहे आमची.
पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून वावरतानाही आमच्या मुली शालीनतेच्या प्रतिक आहेत.

घाम गाळून नांगर ओढणाऱ्या नवऱ्याची साथ फक्त हीच स्त्री देवू शकते अऩ भरसकाळी रांगोळी हिच्याच हाताने सजते.

इतिहास तर आहेच पण आम्ही आता एक "उज्ज्वल" भविष्य घडवीत आहोत कारण हल्ली इथे श्वास विसरत चाललायं जगण्याचा अर्थ, आकुंचल्या आहेत इथे माणुसकीच्या कक्षा.

आणि हे बदलण्याची ताकत आहे "मराठयांच्या मनगटात"...

सुशिक्षीत, संगणक/ इंटरनेट वापरणार्‍या लोकांच्या मनातुन देखिल जात गेलेली नाही दुसरे काय?

अनेकदा चर्चा होऊनही "जात" नाहि असा हा विषय :)

जात, अथवा जातीव्यवस्था ह्याचा मी विरोधक नाहि हे सुरवातीलाच सांगतो. मात्र समर्थकहि नाहि. "साचलेल्या" जात ह्या संकल्पनेला माझा विरोध आहे. जात अस्तित्त्वात कशी आली तर विविध लोकांच्या व्यवसायावरून. भारतीय समाजाच्या विकासाचा क्रम बघता एखाद्याचा व्यवसाय काय यावरून त्याची प्रकृती, प्रवृत्ती (व्यक्तीगत प्रवृत्ती नव्हे)वगैरे गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी ती एक सोपी पद्धत होती. व्यवसाय कोणता यावर रोटी-बेटी व्यवहार ठरत कारण लहानपणापासून एकाच संस्कारात वाढलेली मुलगी अचानक वेगळ्या संस्कारांत रमणार नाहि हा (फोल?) विश्वास. याशिवाय लिखित दस्ताऐवजीकरण नसल्याने मुलाने बापाकडून कला, व्यवसाय शिकणे भाग होते. तेव्हा ठराविक काळा पर्यंत आहे ती जाती व्यवस्था उत्तम होती. असे वाटते.

जातींचा इतिहास मला माहित नाहि. मात्र चतुर्वर्णांपासून प्रत्येक व्यवसायासाठी वेगळी जात व पुढे अगदी उपजात इतका जातींचा प्रवास झाला असे वाटते. त्यामुळे तो पर्यंत जात हि संकल्पना प्रवाहि होती असे म्हणण्यास वाव आहे. त्यानंतर मात्र जात संकल्पना साचली. का? कसे? ते कळत नाहि. जुलुम-जाच वाढले, एका जातीचे इतरांशी पटेनासे वगैरे झाले.
अर्थातच पुढे इंग्रज आल्यावर त्यांनी ह्या जातीव्यवस्थेला नावे ठेवली. आपल्याकडील सुशिक्षित वर्गाने (जे इंग्रजी शाळांत शिक्षण घेतलेले होते) त्यांनीहि तृटी दूर करण्याऐवजी मग पूर्ण जातीव्यवस्थेलाच वाईट ठरवले. चांगले-वाईट असे वर्गीकरण झाले की होतात ते फक्त वाद! आणि या वादाने सर्वात नुकसान झाले ते जात या संकल्पनेचे. ती "साचलेली"च राहिली.

जर जातीला प्रवाहि करायचे असेल तर पुन्हा "जुन्या" जाती विसरून तुमचा व्यवसाय हि तुमची जात असे ठरवावे लागेल. मग "तंत्रज्ञ" हि जात आणि "आय टी तंत्रज्ञ", "इलेक्ट्रीकल तंत्रज्ञ" आदि पोटजाती किंवा "चालक" जात व "रेल्वे गार्ड", "रिक्षाचालक" आदी पोटजाती असे स्वरूप येईल (आणि मग हवंच तर आरक्षण/शिष्यवृत्त्या या नव्या जातींना द्यावे. जसे फेरीवाल्यांच्या मुलांना सवलत वगैरे) दर ५/१० वर्षांनी जातीचे पुनरावलोकन करून काहि जाती (आरक्षणे/शिष्यवृत्त्या) रद्दबातल कराव्यात / वाढवाव्यात.

ऋषिकेश
------------------
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोऽहे

राजकारणी

राजकारणी ही सर्वात महत्वाची नवी जात विसरलास वाटतं? आजच्या जाती व्यवस्थेला बळकट (म्हणजे लोकं आपली जातं न विसरण्याचे विचार घट्ट करणे ) करण्याचे काम ही जात न चुकता करते. आपले काँग्रेसचे लोकं जसे म्हणतात की दहशतवादाला धर्म नसतो. तसे या राजकारण्यांना पोटजात नसते. सगळे एकाच जातीचे आहेत. स्वार्थी राजकारणी जात ....





असहमत

जात, अथवा जातीव्यवस्था ह्याचा मी विरोधक नाहि हे सुरवातीलाच सांगतो.

मग भंग्याने आयुष्यभर (आणि पुढील सर्व पिढ्या) भंगीकामच करावे, चांभाराने चप्पलच शिवावी ह्याचे पण तुम्ही समर्थन करता का? कारण जाती व्यवस्थेचा तो अविभाज्य घटक आहे.

जर जातीला प्रवाहि करायचे असेल तर पुन्हा "जुन्या" जाती विसरून तुमचा व्यवसाय हि तुमची जात असे ठरवावे लागेल. मग "तंत्रज्ञ" हि जात आणि "आय टी तंत्रज्ञ", "इलेक्ट्रीकल तंत्रज्ञ" आदि पोटजाती किंवा "चालक" जात व "रेल्वे गार्ड", "रिक्षाचालक" आदी पोटजाती असे स्वरूप येईल (आणि मग हवंच तर आरक्षण/शिष्यवृत्त्या या नव्या जातींना द्यावे. जसे फेरीवाल्यांच्या मुलांना सवलत वगैरे) दर ५/१० वर्षांनी जातीचे पुनरावलोकन करून काहि जाती (आरक्षणे/शिष्यवृत्त्या) रद्दबातल कराव्यात / वाढवाव्यात.

वर उल्लेखलेले सगळे 'व्यवसाय' (प्रोफेशन्स) आहेत. त्या जाती होऊ शकत नाहीत. रेल्वे गार्डच्या मुलाने रेल्वे गार्डच बनले पाहिजे असे समाजाचे बंधन असेल तरच त्या जाती होतील.

रोटी, पण तसेच बेटी-व्यवहार

रोटी-बेटी-व्यवहार हे जातींचे वैशिष्ट्य.

जातीबद्ध रोटीव्यवहार आजकाल पुष्कळ प्रमाणात मोडकळीस आलेला दिसतो. तरीही बेटीव्यवहार पुष्कळ प्रमाणात तसाच चालू आहे, असे वाटते.

त्रुटी नसलेली, प्रवाही जातिव्यवस्था कशी असावी? आजच्या साचलेल्या व्यवस्थेत काय बदल घडावा? ऋषिकेश यांच्या मताबद्दल मला कुतूहल आहे.

तंत्रशिक्षणाच्या बाबतीत पुत्राने बापाकडून शिक्षण घ्यावे काय? स्वानुभवाने असे वाटते की माझे बहुतेक व्यावसायिक शिक्षण शाळा-महाविद्यालयांतच झाले. आडनावाचा व्यवसाय ६ पिढ्यांपासून बंद पडला आहे. (आई-वडलांकडून समाजात वावरण्याचे शिक्षण मिळाले, त्याचे मी मुळीच अवमूल्यन करीत नाही - पण ते व्यावसायिक शिक्षण नव्हे.)

तंत्रज्ञ, चालक (यांच्यात विमानचालक आणि हातगाडीचालक या पोटजाती ;-) ) वगैरे नव्या जाती जर बनवल्यात, तर त्यांच्यात रोटी-बेटी-व्यवहार-मर्यादा व्हाव्यात काय?

:-)

"हमाल" आणि "वेठबिगार" यांपैकी नेमकी कशाची पोटजात आहे यावर तज्ज्ञांत मतभेद आहेत.
आम्हाला वाटत होते की पीएचडीचे विद्यार्थी आणि पीएचडी झाल्यानंतर पोस्टडॉक करणारे हे अनुक्रमे हमाल आणि वेठबिगार यांच्यात मोडतात. पण आता लक्षात आले या जातींचा आवाका बराच मोठा आहे. :-)

----
रंध्रात पेरीली मी, आषाढ दर्द गाणी

आणखी उदाहरणे

१. सिंहाच्या जबड्यात, घालून हात
मोजीन दात, ही जात मराठ्याची

(मला वाटते हे मराठा सेवा संघ की कोणा संघटनेचे ब्रीदवाक्य आहे.)

२. अजुनही बोथट झाली नाही धार पेशव्यांच्या तलवारीची
कुणाचीही हिम्मत नाही ब्राह्मणांना संपवण्याची,
घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला,
ब्राह्मणांशिवाय पर्याय नाही महाराष्‍ट्राच्या मातीला !!!

३. अजूनही बोथट झाली नाही धार शिवबाच्या तलवारीची,
कुणाचीही हिम्मत नाही मराठयांना संपवण्याची,
घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला,
मराठ्यांशिवाय पर्याय नाही महाराष्‍ट्राच्या मातीला !!!

४. होय, मी तोच धनगर ज्या कुळात " श्री बिरदेव महाराज" जन्माला आले.
मी धनगर ,मरकर भी नही हटा, वो धनगर !!!
एक धनगर !!

मी धनगर ... या दोन शब्दात माझी ओळख आहे..
मी धनगर असल्याचा मला अभिमान आहे.

धनगर मोडेल पण वाकणार नाही
पेटतील मशाली वीझतील मशाली
सुर्या कधीच विझनार नाही
प्रयत्न करा किती ही पण
हे कधीच घडणार नाही
धनगर मोडेल पण वाकणार नाही
धनगर मरेल पण शरण आलेल्याना मारणार नाही
धनगर मायेने रडेल पण संकाटाना भिवून पळणार नाही
आणि हो दुसर्याना बेघर करून घर स्वाताचे भरणार नाही
धनगर महाराज्यान पुढे श्वासाची ही किमत धरणार नाही
शिवांसाठी वेळ आली तर मरूनही मरणार नाही
आसतील लाख मतभेद पण वेळ आल्यावर ते उरणार नाही
संपातील सारे पण स्वराज, धनगर कधी ही संपणार नाही

अशीच अनेक उदाहरणे नामदेव महाराज, तुकाराम महाराज, उमाजी नाईक, सावतामाळी, गोरा कुंभार, सेना न्हावी असे प्रत्येक जातीचे मानबिंदू शोधून केलेली आहेत. मजकुरात काही फरक नाही फक्त जातीचे/मानबिंदूचे नाव फाईंड अँड रिप्लेस करायचे.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

संत रविदास?

५.चांभार लोक संत रविदासांची उपासना दर्शवतात. वाहनावर असे नाव लिहून घेतात.

रविदास की रोहिदास?


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

अनेक माहितीपूर्ण प्रतिसाद..

हे असले प्रकार मला आजपर्यंत माहितच नव्हते. कोलबेर यांनी दिलेले मी मराठा आहे.... वाचून हसावे का रडावे कळेना!
==असंख्य अडचणींवर मात करत, सर्वांना सोबत घेत चालू असलेला हा मराठयांचा प्रवास सर्वांर्थाने ऐतिहासीक आहे.
==अर्थ दिलायं आम्ही "सहिष्णुतेला".
==दुर्द्म्य इच्छाशक्त्ती असलेल्या आमच्या ह्या डोळयात आईच्या पदराआड कोरडे होण्याची "संवेदनाही" भरलीयं. आमच्या कणखर मनगटांनी लढतानाही आयुष्यातला "शॄंगार" कधीचं गमावला नाहिये.
==घरादाराच्या आठवणी बाजूला ठेवून सीमेवर उभी आहेत आमची कित्येक माणसं. नव्या आधुनिकतेला गरज आहे आमची.

या वाक्यांचा काहीच अर्थ कळला नाही.

राजे वगैरे लिहलेल्या गाड्या ९९% स्कॉर्पियो असतात. आणि नंबर प्लेटींवर अक्षरं दिसावेत असे आकडे असतात.:-)

==पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून वावरतानाही आमच्या मुली शालीनतेच्या प्रतिक आहेत.
==घाम गाळून नांगर ओढणाऱ्या नवऱ्याची साथ फक्त हीच स्त्री देवू शकते अऩ भरसकाळी रांगोळी हिच्याच हाताने सजते.

हे सर्व डोक्यावरुन गेले.

बाबासाहेब जगताप, तुमचे लेखन मला आवडते. कळकळीने लिहलेले जाणवते. मागचा पिढ्यानपिढ्या रक्तात भिनलेले देवाचे भूत हा लेखही असाच होता.

-सौरभ

==================

सर्व आयांनी जर आपापल्या मुलांना लहानपणीच योग्य शिकवण दिली, तर जगात युद्धं कशाला होतील? सर्व संस्कृती आयांच्याच हातात नसते काय?

कंटाळा आला

आता प्रतिसाद द्यायचा कंटाळा आला आहे. उपक्रमावर याची अनेकवेळा चर्चा झाली आहे. नवीन पोस्ट देण्यापुर्वी या विषयावर येथे काय चर्चा झाली आहे ते पहावे.
बाकी राजेंद्र ऋषिकेश आजानुकर्ण यांनि सांगितल्या प्रमाणेच्
प्रकाश घाटपांडे

चर्चा

उपक्रमावर याची अनेकवेळा चर्चा झाली आहे.

लोक कळत नकळत आपली जात कशी 'मिरवतात' हा मुद्दा ह्या चर्चेतच नविन दिसला. बाकी जातीव्यवस्था/आरक्षण वगैरेवर भरपूर चर्चा झाले आहे हे मान्य आहे.

कंटाळा

प्रकाशरावांशी सहमत सहमत आहे.
मात्र त्याच वेळी भाषेचा पोत बदलून ' मी तुमच्यातलाच एक' असा बनून फायदा उचलणारेही कमी नाहीत असे वाटते.
असो, चालू द्या...

आपला
तद्दन जातीयवादी, कर्मठ वगैरे वगैरे
गुंडोपंत

अभिमान सोडा

जातींबद्दल अभिमान सोडा आणि जिव्हाळा बाळगा, कदाचित प्रश्न सुटू शकेल.

अभिमानापेक्षा

जातींबद्दल अभिमान सोडा आणि जिव्हाळा बाळगा, कदाचित प्रश्न सुटू शकेल.

मला वाटते जातीयवादाचा प्रश्न हा स्वतःच्या जातीबद्दलच्या अभिमानापेक्षा इतर जातीच्या व्यक्तींकडे चष्म्यातून पहात असताना होणार्‍या दुस्वासातून अथवा द्वेषातून होतो.

घोडं कुठे अडलं?

मला वाटते जातीयवादाचा प्रश्न हा स्वतःच्या जातीबद्दलच्या अभिमानापेक्षा इतर जातीच्या व्यक्तींकडे चष्म्यातून पहात असताना होणार्‍या दुस्वासातून अथवा द्वेषातून होतो

.

दुसर्‍या जातींबद्दलही जिव्हाळा बाळगा, प्रश्नाची तीव्रता कमी होईलच.

त्यापेक्षा

दुसर्‍या जातींबद्दलही जिव्हाळा बाळगा, प्रश्नाची तीव्रता कमी होईलच.

त्यापेक्षा जातींचा विचारच किमान समाजात वावरताना करू नये असे मला वाटते. हे वैयक्तिक जीवनात कुठले संस्कार, आचार पाळतो याच्याशी संबंधीत नाही तर बाहेरच्या जगात वावरताना संदर्भात म्हणत आहे.

या संदर्भात पण थोडे वेगळे - पण काही अमेरिकेतील कृष्णवर्णीय लोकांकडून वेगवेगळ्या वेळेस ऐकलेले आहे की जेंव्हा कधी कधी गोरे लोकं आमच्याशी मुद्दामून चांगले वागताना दिसतात तेंव्हा आम्हाला आमचा वेगळेपणा जास्त जाणवतो. याच अर्थाचे संवाद "ए टाईम टू किल" मधे पण सॅम्युअल जॅक्सन आणि मॅथ्यू मॅकनॉघे(?) मधे घेतले आहेत.

तीच गोष्ट धर्मासंदर्भात होताना दिसते. परधर्मियांना जेंव्हा वास्तवात भेटतो (अपवाद अमेरिकेत अमेरिकन माणसांशी बोलताना होत असावा कारण ते सारखेच संपर्कात असतात) तेंव्हा देखील आपण नकळत त्याच नजरेतून बघतो. मग हिंदू मुसलमानाला आणि उलट, वगैरे... वास्तवात म्हणायचे कारण इतकेच की शहारूख खान, अमीर खान जेंव्हा चांगले काम करतात तेंव्हा आपण ते एन्जॉय करत असताना ते मुसलमान आहेत असा विचार करत नाहीत की सलमानने जेंव्हा निष्पाप लोकांवर (नशेमधे) गाडी चालवली तेंव्हापण त्याचा मुसलमान म्हणून विचार केला नाही. तेच हिंदू आणि इतर धर्मीय कलाकारांचे....

हम्म! विशेष पटले नाही.

त्यापेक्षा जातींचा विचारच किमान समाजात वावरताना करू नये असे मला वाटते.

समाजात वावरताना आज बरेच लोक जातीचा विचार करत नाहीतच. ट्रेनमधून जाताना, बसमध्ये, चित्रपटगृहात इ. ठिकाणी कोणीही* बाजूच्याकडे पाहून त्याची जात कोणती असावी असा विचार करत नसावा. नोकरी देतानाही जातीचा विचार करून दिली जातेच असे वाटत नाही. (आरक्षणाचा संबंध येथे नाही) मात्र, हा मराठी, तो पंजाबी, तो दाक्षिणात्य असा विचार करत असावा आणि हे किंवा इतर वर्गीकरण लोकांच्या मनातून जाणे सहजी शक्य नाही.

एखाद्या गोष्टीचा विचार न करण्याची सक्ती करण्यापेक्षा (म्हणजेच धर्मप्रसार करायचा ना तर संन्यासी रहा) संयतपणे तो विचार करावा हे कधीही चांगले.

जातीचा विचार रोटी-बेटी व्यवहारात येतो आणि आम्ही तुमच्यापेक्षा भारी हे दाखवण्याची वेळ येते तेव्हाच येतो. तेव्हा असल्या अभिमानापेक्षा प्रेम बाळगून बघितले तर फरक पडू शकेल.

* हे सर्वसामान्य विधान आहे. १००% खरे असेलच याची शाश्वती नाही.

सक्ती करा असे म्हणले नाही

एखाद्या गोष्टीचा विचार न करण्याची सक्ती करण्यापेक्षा (म्हणजेच धर्मप्रसार करायचा ना तर संन्यासी रहा) संयतपणे तो विचार करावा हे कधीही चांगले.

मी सक्ती करा असे म्हणले नाही. पण त्याची सुरवात स्वेच्छेने व्हावी असे मात्र माझे नक्कीच म्हणणे आहे. आपण सार्वजनीक ठिकाणासंदर्भात बोललात की जेथे कोणी कोणाला ओळखत नसते तेथे आता जात बघणे नक्कीच थांबले. याबद्दल मी सहमत आहे. मात्र जेथे (घर-काम-शाळा-सामाजीक काम-सोशलायझिंग इत्यादी) एकमेकांबरोबर काम अथवा सहवास असतो तेथे नकळत सुशिक्षित माणसेही जातीचे चष्मे घालू लागतात. त्यातून नकळत तुलना, तुलनेतून इरिशिरी अशी घसरगुंडी सुरू होते. मग एखाद्या व्यक्तीकडे पहाताना व्यक्तीतील गुणदोषांपेक्षा त्या व्यक्तीच्या जातीतील गुणदोष लावून त्या व्यक्तीच्या आचार-विचारांकडे पाहीले जाते. म्हणून त्यावर एकच उपाय राहून राहून वाटतो की सुशिक्षित आणि अधुनिक झालेल्या व्यक्ती ज्यांना आता धर्मातील चुकीच्या प्रथा आणि त्यांचा फोलपणा लक्षात आला आहे, किमान त्यांनी तरी त्या अनंत चुकीच्या प्रथांबरोबर ही धर्माबरोबरच आलेली अनिष्ठ प्रथापण स्वेच्छेने सोडून द्यावी. अर्थात आधी म्हणल्याप्रमाणे याचा अर्थ कुटूंबातील/पिढ्यानपिढ्याचे संस्कार, आवडणार्‍या गोष्टी, सोडाव्यात असा नव्हे.

चालू दे!

संपूर्ण चर्चेतून माझ्या एका साध्या वाक्याचा किस पाडून आपले म्हणणे पटवून द्यायचा प्रयत्न आवडला. चालू दे. :-) माझ्याकडून विषय संपला.

जातीनिहाय वैशिष्ट्ये आणि उच्चनीचता

एक गोष्ट आधीच स्पष्ट करायला हवी : बाबासाहेब जगताप यांच्या लेखाशी , त्यातील भावनेशी १००% सहमत आहे. मात्र जातींबद्दल विचार करताना मला काही मुद्दे जाणवतात. याबद्दल जो आहे तो थोडा संभ्रमच आहे. अनेक गोष्टी एकमेकांना छेद देताना दिसतात.

१. जातीव्यवस्था आणि उच्चनीचता : हा जातिव्यवस्थेतला सगळ्यात त्याज्य घटक. हिंदुसंस्कृतीची हजारो वर्षे चिघळणारी जखम. अस्पृष्यांवर पिढ्यानुपिढ्या झालेले अन्याय . हा मुद्दा चिरपरिचित आहे. दुमत व्हायचे कारण नाही.

२. विशिष्ट जातींनी बाळगलेला अभिमान : यामधे अनेक रंग आहेत असे मला वाटते. उच्चनीचभाव (Hierarchy ) या गोष्टीची छटा जिथे येत असेल ते ते त्याज्य. (मराठा सर्वश्रेष्ठ किंवा ब्राह्मण सगळ्यात श्रेष्ठ वगैरे वगैरे. ) बाकी एक ओळख (Identity) या बाजूने विचार केला तर त्यात काही लक्षणीय सापडावे. जागतिकीकरण , शहरीकरण , औद्योगिकरण यांच्या प्रचंड गतीने वाढणार्‍या प्रभावाखाली , अशा जातीनिहाय Identity ला धुमारे फुटावेत ही घटना मला प्रतिक्रियात्मक वाटते. जुनी व्यवस्था तर मोडकळीला आलीच आहे/येतेच आहे , पण त्यात जातीनिहाय वैशिष्ट्ये , चालीरीती यांनाही तिलांजली मिळत असेल तर ती अशा सामूहिक प्रयत्नांतून टिकण्याची शक्यता. (व्यक्तिशः बोलायचे ,तर पाककृती , आहारादि गोष्टी ही एकमेव बाब मला अशी वाटते की जिच्याबाबतीतली जातीनिहाय वैशिष्ट्ये काळाच्या उदरात गडप होऊ नयेत ! तोच मुद्दा लोककलांच्या बाबतीत. प्रत्येक जातीजमातीत या दोन आघाड्यांवर अपरिमित विविधता आहे. हा सगळा वारसा, हे सगळे धन आपण हरवता कामा नये !) अर्थात , अनेकदा रूढी आणि वैशिष्ट्ये हीसुद्धा प्रतिगामी मूल्यांची जोपासना करणारीच असतात, तीदेखील त्याज्यच ठरतात ही गोष्ट अलाहिदा.

३. राजकीय समीकरणे /आरक्षणादि बाबी यांकरता केलेले जातीनिहाय समूहीकरण : या सगळ्याचे विपरित परिणाम दिसत आहेतच : एकेका पोटजातीने आपापल्या फायद्यासाठी बनवलेले गट , त्यातून निर्माण झालेली जातीवाचक तेढ. समाजाच्या विघटनाला जबाबदार ठरणारी एकूणच गर्हणीय बाब.

तर वरील मुद्द्यांचा विचार करता, जातीनिहाय अस्मिता बाळगणे या बाबीचा जमाखर्च मांडला असता जमा थोडी , नुकसान मात्र प्रचंड असे काहीसे मनात येते. मात्र , असेही वाटते की, हजारो वर्षे चालू असलेला हा चिखल काही दशकातच समूळ नाहीसा होईल हा आशावाद थोडा अति वाटतो. तसा तो व्हायला हवा आहे , तसे करण्याकरता घटनेची , कायद्याची , शासकीय यंत्रणांची चक्रे फिरत आहेत हेदेखील खरेच. पण समाजाचा गाडा हा हळुहळू फिरतो हेही खरे.

वरील विवेचन हे जातीव्यवस्थेकडे एका सामाजिक दृष्टीकोनातून पहाताना केलेले आहे. याखेरीज जातीनिहाय अस्मितेबद्दल थोडे अवांतर बोलता येईलच.

- "मानव तितुका एकच आहे " या विचारांना सानेगुरुजीसदृष प्रतिमा आताच्या काळात प्राप्त झाली आहे : अशी गोष्ट जिला कसलीच व्यावहारिक बाजू नाही. थोडेसे "सत्यमेव जयते" सारखे. सत्याचा विजय "अंतिमत:" होतोच हो , सत्य आणि जय एकमेकांचे नंतर पाहून घेतील , सध्या आम्ही मात्र ज्याचा फायदा होतोय तेच करू , असा एक स्वल्पदृष्टीचा विचार यात आहे.

- कोतेपणा , कूपमंडूक वृत्ती : जातीविषयक अभिमानातून कोतेपणाच्या प्रवृत्तीचे दर्शन घडते असे म्हणता येईल. गुणवत्तेऐवजी (मेरीट) जातीला महत्त्व देणे या सारख्या गोष्टींना ज्ञानाच्या , विकासाच्या , नवनिर्माणाच्या क्षेत्रात काहीही स्थान नाही याचा इथे विसर पडलेला दिसतो.

+१

+१
मुक्त सुनित यांचे हे मुक्त चिंतन आवडले.

व्यक्तिशः बोलायचे ,तर पाककृती , आहारादि गोष्टी ही एकमेव बाब मला अशी वाटते की जिच्याबाबतीतली जातीनिहाय वैशिष्ट्ये काळाच्या उदरात गडप होऊ नयेत ! तोच मुद्दा लोककलांच्या बाबतीत. प्रत्येक जातीजमातीत या दोन आघाड्यांवर अपरिमित विविधता आहे. हा सगळा वारसा, हे सगळे धन आपण हरवता कामा नये !

अगदी खरयं . पण यावर ज्यांना जातीयवादाच्या जखमा चिघळत ठेवायच्या आहेते ते लोक असे म्हणतील कि हीच ती ब्राह्मणी मनोवृत्ती. विविधतेच्या नावाखाली लोकांना जातिंच्या जंजाळात अडकुन ठेवण्याचा कावा!
हीच ती पुरुषी मनोवृत्ती ; स्त्रीला देवीचे रुप देउन देव्हार्‍यात ठेउन तिला बंधनात ठेवण्याचा कावा! असे म्हणून स्त्री पुरुष समानतेच्या बाबत म्हणता येते.
जातीच्या अस्मिते बरोबर अस्तित्वाच्या मुद्द्या बाबत असेही म्हणता येते कि तु अमुक जातीचा आहेस असे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष रित्या इतरांनी सतत जाणीव करुन देत राहाणे. हा देखील दुर्लक्षित करता येण्यासारखा नाही. तुम्ही पुष्कळ जात धर्म पंथ मानत नाहीत पण जन्माधिष्टित चिकटलेले हे मुद्दे इतर तुमच्या संदर्भात मानत असतील तर?
तुम्ही वाहतुकीचे नियम पाळत असाल पण तुमच्या सहप्रवासातील इतरांनी ते पाळले नाहीत तर त्याचा फटका तुम्हाला बसू शकतो.

प्रकाश घाटपांडे

धर्माचीही अशीच् बोंब

बाबासाहेब जगताप ,तुमचे निरिक्षण अगदी बरोबर आहे. लोकांना आपली जात दाखवण्याचा जसा उत्साह असतो तसाच आपला धर्म दाखवण्याचा देखील उत्साह असतो .
आपला धर्म दाखवण्याचा देखील उत्साह असतो याचीही जरा चर्चा व्हावी.

मजेची गोष्ट अशी

कालच एक उतारा वाचला त्यात भारतातील किंवा हिंदू समाजातील जातीव्यवस्थेची बळकट मुळांचे मजेदार उदाहरण दिले होते. केरळात ख्रिश्चन धर्मप्रसार सुरू झाल्यानंतर सुरुवातीला काही ब्राम्हण जातींनी धर्मबदल करवून घेतला व आपापली चर्चे स्थापन केली. पुढे एळावा (Ezhava), थिय्या(Thiyya) वगैरे अनेक मागासजातींनीही धर्मांतर केले. मात्र आधी धर्म बदलवून घेतलेल्या ब्राम्हणांना हे दलित ख्रिश्चन आपल्या चर्चमध्ये आलेले चालत नव्हते म्हणून दलित ख्रिश्चनांसाठी वेगळी चर्चे बांधावी लागली. धर्मबदलानंतर दोन्ही जाती आता ख्रिश्चन कॅथलिक असूनही एका चर्चात जाऊ शकत नव्हते. धर्म बदलला तरी जात कायम. :)

तसलाच प्रकार केरळातील ज्यूंबाबतही दिसतो. त्यांच्यामध्ये व्हाईट, ब्लॅक आणि ब्राऊन असे तीन प्रकार आहेत (भारताव्यतिरिक्त इतरत्र आहेत की माहीत नाही) पण व्हाईट ज्यू हे ज्यूंमधील उच्चवर्णीय. इस्रायलच्या स्थापनेनंतर भारतातील अनेक ज्यू इस्रायलमध्ये कायमनिवासी म्हणून गेले व इथेच राहिलेल्या अनेक व्हाईट ज्यूवांना लग्नासाठी पोरी मिळणे अवघड झाले. हिंदू संस्कारित प्रथेनुसार शिल्लक राहिलेल्या ब्लॅक ज्यूवां*मधील कोणाशी लग्न करण्यापेक्षा अविवाहित राहणे हे जास्त योग्य होते. (वर्णसंकरापेक्षा वंशनाश उत्तम असे धोरण पाळण्यात आले.)

जातीव्यवस्थेच्या उतरंडीची अनेक उदाहरणे भारतातल्या मुसलमानांमध्येही सापडतात.

*(ऊ पासून ऊवांना प्रमाणे चालवलेला)


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

गंमत

अशीच एक गंमत म्हणजे नवबौद्ध. धर्म बदलल्यावर सुद्धा जाती नष्ट नाहीत आणि आरक्षण सुद्धा. सगळीच गंमत आहे.





नवबौद्धांचे आरक्षण

आरक्षणाची तरतूद ही फक्त हिंदूधर्मीयांसाठीच आहे असे नाही व नवबौद्धांचे आरक्षण हे घटनेनुसारच दिलेले आहे. त्यामुळे ते तसे चुकीचे नाही.

मुसलमानांमध्येही (खाटीक वगैरे) इतर मागासवर्गीय जाती आहेत ज्यांना महाराष्ट्र व केंद्र सरकारातील विविध योजनांमध्ये इमावच्या २७ टक्के आरक्षणात अंतर्भूत करण्यात येते.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

तसे नाही

असे काही घटक आहेत का? जे आधीपासुन हिंदुंचे आरक्षण घेत आहेत पण धर्म बदलल्यावर सोडत नाहीत. हा एक मला पडणारा नेहमीचा प्रश्न आहे.





हिंदूंचे आरक्षण हा चुकीचा शब्दप्रयोग

हिंदूंचे आरक्षण हा चुकीचा शब्दप्रयोग आहे. आरक्षण हे भारतीय घटनेने दिलेले असून त्यासाठी हिंदूंच्या धर्मपीठांची किंवा शंकराचार्यांची संमती घेतलेली नाही. जातीव्यवस्थेची सुरुवात हिंदू धर्मामध्ये झालेली असली तरी त्याचा संसर्ग भारतातील ख्रिश्चन, मुसलमान, ज्यू, जैन, बौद्ध, शीख अशा सर्वधर्मीयांना झालेला आहे. समाजव्यवस्थेतील उतरंडीमध्ये सर्वात खाली असणाऱ्यांना प्रतिष्ठा प्राप्त करुन द्यावी. त्यांना सन्मानाने जगण्याची संधी उपलब्ध करुन द्यावी हा आरक्षणामागचा हेतू आहे हे लक्षात घेणे आवश्यक आहे.

बाबासाहेबांनी बौद्ध धर्मात प्रवेश केल्यानंतर घटनेत विशेष सुधारणा करुन नवबौद्धांना आरक्षण देण्यात आले आहे. त्याचा हिंदू आरक्षणाशी(?) संबंध नाही.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

चेष्टा

हिच तर भारतीय लोकशाहीची चेष्टा आहे. आरक्षणाचा विचार होताना हिंदू धर्मात झालेला त्रास/मागासलेपणाचा विचार झाला हे तरी निदान मान्य असायला हरकत नाही. त्यामुळे आरक्षण हि संकल्पनाच हिंदू धर्मामुळे उत्पन्न झाली असे माझे ठाम मत आहे. शब्दांचे खेळ केले तर बरेच काही लिहिता येईल. मुळात आरक्षण हि संकल्पना कालबाह्य करण्याची गरज आहे. त्याने भले अनेकांचे झाले आहे. पण आजच्या घडीला भले होण्या ऐवजी स्वार्थासाठी वैचारिक मागासलेपण आले आहे. समाजातली दरी उलट जास्त वाढत चालली आहे हे सत्य आहे.





असेच

तुषार ह्यांना जो प्रश्न पडला आहे तोच प्रश्न मलाही पडला आहे.
हिंदू (व मुस्लिम) धर्मातील काही जाती मागासवर्गीय आहेत. जातींची पद्धत ही ही हिंदू धर्मामध्ये आहे (मुस्लिमांमध्येही जातीव्यवस्था आहे?). मग एखाद्याने बौद्धधर्म स्वीकारला, जो जात मानत नाही, तर हा नवबौद्ध मागासवर्गीय जातीमध्ये कसा मोडू शकतो? बौद्धधर्मीयांमध्ये बौद्ध आणि नवबौद्ध अशा दोन जाती आहेत का? जातीवर आधारित आरक्षणाचे फायदे ज्या धर्मामध्ये जातीच नाहीत अशा धर्मीयांना कसे काय मिळू शकते? नवबौद्धांना आरक्षण देणे घटनेनुसार असेल पण, वरील प्रश्नांचे उत्तर शासन कसे देते?
माझ्या माहितीनुसार जातीव्यवस्थेचा उबग आला म्हणून लोक नवबौद्ध होतात. मग धर्म बदलला तरी जात कायम राहणार असेल तर धर्म बदलण्याने नेमके काय साध्य होते? तुषार ह्यांनी विचारलेला सरसकट सर्व नवबौद्धांना (मग पूर्वाश्रमीच्या सवर्णाने बौद्ध धर्म स्वीकारला तर त्यालाही) आरक्षणाची तरतूद घटनेमध्ये आहे का? हा प्रश्न मलाही पडला आहे.

मुसलमानांमध्येही जाती आहेत

होय मुसलमानामध्येही जाती आहेत. आमच्या गावात खाटीक, मोमीन, बोहारी, गोरे, इनामदार अशा वेगवेगळ्या आडनावाच्या मुसलमानांमध्ये बेटीव्यवहार होत नसत. खाटीक वगैरे जातींना इतर मागासवर्गीय समजण्यात येत होते.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

समाजिक आणि आर्थीक बाजू

हिंदू धर्माच्या सर्वात खालच्या आणि आर्थीक, सामाजिक, राजकिय एवढेच नाही तर सगळ्याच मानवी मुल्यांची हजारो वर्षे हेळसांड सहन करीत दलीत समाज जगत राहिला. त्यांचं आयुष्य जनावरांपेक्षा वाईट परिस्थितीत होतं. उदाहरण द्यायचं झाल्यास ज्या चवदार तळ्यावर जनावरांना पाणी पिण्याची मुभा होती तेथे दलितांना मात्र मनाई होती. असे अनेक उदाहरणे देता येतील.
चवदार तळ्याचा संघर्ष करून शेवटी बाबासाहेब आंबेडकरांना एका गोष्टीची खात्री पटली की हिंदू धर्मात आपल्या जातीला आणि त्याजातीच्या लोकांना सामाजीक दर्जा मिळण्याची शक्यताच नाही. सन्मान सोडाच मात्र माणूस् म्हणून सुध्दा कुणी मान्यता द्यायला तयार नव्हतं. ही सामाजीक दरी बुजवण्यासाठी बाबासाहेबांनी १९३५ साली धर्मांतरणाचा इशारा दिला होता. मात्र तेव्हापासून ते १९५६ पर्यंत हिंदूधर्मातील कुठल्याच व्यक्ती,संस्थेला किंवा पंथाला त्यांच्या विषयी सोयर सुतक नव्हतं. बाबासाहेबांनी दलीत समाजाला सामाजीक दर्जा देण्यासाठी धर्मांतरण केलं, हे धर्मांतरण जरी असलं तरी ते सामाजिक होतं यात शंका नाही.
आता राहिला शिक्षण आणि नोकर्‍यांमधील आरक्षणाचा प्रश्न. आरक्षणासाठी नवबौध्द ही रचना आहे. नवबौध्द म्हणजे जे पुर्वी महार होते. त्यांना धर्मांतरणानंतर नवबौध्द म्हटल्या जातं. धर्म बदलल्यामुळे अचानक सगळी आर्थीक विवंचना दूर झाली असं थोडीच होतं? त्यासाठी विशेष उपाय योजना करायला हवी. ती करण्यासाठी म्हणजेच दलीतांना आर्थि़क दृष्ट्या सक्षम होण्यासाठी आणि त्यांना आपल्या पायावर उभे राहण्यासाठी, मदत देण्यासाठी, विश्वास देण्यासाठी ह्या आरक्षणाची तरतुद करण्यात आलेली आहे.
त्यामुळे आर्थीक पाठबळ मिळण्यासाठी देण्यात आलेल्या आरक्षणाची धर्म आणि जाती व्यवस्थेशी सांगड घालून गोंधळून जाऊ नका. याला प्रत्यक्ष व्यवहार पातळीवरचा प्रश्न म्हणून बघाल तर हे सहज लक्षात येईल.

नीलकांत

धर्मांतराची मानसिकता

वर लिहिल्या प्रमाणे धर्मांतराची मानसिकता हि हवा असलेल्या बदलापेक्षा द्वेष अथवा न्युनगंडातुन जास्त जाणवते. बाबासाहेबांचा काळ आणि आजचा काळ यात आता बराच फरक पडला आहे. तसेच बाबासाहेबांचे अनुयायी म्हणवणारे आज काय करतात ते जगजाहीर आहे. एकिकडे सर्वधर्म समभाव म्हणायचे आणि एकिकडे जातीव्यवस्था खोलवर रुजवत जायची याला काय अर्थ आहे?
वरती अजानुकर्णाने हिंदू आरक्षण शब्दाला आक्षेप घेतला आहे. पण हिंदू दहशतवादी या संकल्पनेला विरोध करताना कोणीच दिसत नाही. असे का? आज दहशतवादाला शस्त्राने/संहाराने उत्तर देण्याची मानसिकता वाढीस लागते आहे. कालचे दलित आज सुद्धा बाबासाहेबांच्या आधीची उदाहरणे विसरत नाहीत. विसरण्या ऐवजी उलटे घाव जास्तच भळभळणारे करत आहेत. उद्याच्या भारतात ऍट्रोसिटी कायद्याने ज्यांच्या कुटुंबे उध्वस्थ झाली त्यांचे वंशज ते विसरतील?
सरसकट काही गरजू नसलेल्यांना सवलत देणे कितपत योग्य आहे? अशाने उद्याचे चित्र नक्कीच वास्तववादी वाटत नाही तर उलटे जास्तित जास्त विदारक वाटते.
धर्म बदलायचा पण मानसिकता बदलतच नाही तर काय करणार? धर्म म्हणजे नक्की काय हे कोणी सांगेल काय? सांगितल्यास धर्मांतराने नक्की काय होते या बद्दल विचार करता येईल. तसेच जे नवबौद्ध आहेत त्यांना जुने बौद्ध समान दर्जा देतात का या बद्दल सुद्धा वाचायला/माहिती करुन घ्यायला आवडेल.
बाबासाहेबांनी धर्म बदलण्या पुर्वी काही महत्वाच्या नेत्यांची भेट घेतली होती. त्या बद्दल काही माहिती उपलब्ध आहे का?

कृपया या प्रतिसादाचा आवाका फक्त मत-मतांतर इतकाच घ्यावा. आकस असा अजिबात नको.





धर्मांतर

वर लिहिल्या प्रमाणे धर्मांतराची मानसिकता हि हवा असलेल्या बदलापेक्षा द्वेष अथवा न्युनगंडातुन जास्त जाणवते.
द्वेश नव्हताच हा एक चिड किंवा राग कुठेतरी असु शकतो. मात्र बाबासाहेबांनी केलेले धर्मांतर हे पुर्णविचाराअंती होतं ती तात्कालीक प्रतिक्रिया नव्हती त्यामुळे द्वेश अथवा न्युनगंड असण्याची शक्यता नाहीच.
राग नको पण बाबासाहेबांचे अनुयायी सुध्दा तेच करताहेत जे इतर कुठल्याही मोठ्या मानसाचे अनुयायी करताहेत. तुम्ही फक्त नाव घ्या.

धर्मांतर हे सामाजिक होते हे सांगण्यातच तुमच्या अनेक प्रश्नांची उत्तरे आलीत की, समान दर्जा, बदललेली मानसिकता आदी. आरक्षणाचा फायदा अद्याप गरजू लोकांपर्यंत पोहोचलेला नाहीये. कारण कोण आणि उपाय काय यावर चर्चा होईल. मात्र या आरक्षणाच्या पुनर्निमाणाच्या गोष्टी ज्या करताहेत त्यांच्या मूळ हेतू बाबतच शंका आहे त्यामुळे असा विषय निघाला की प्रतिक्रिया ही अधीक आक्रमक येते.

बाकी जेथे जेथे मी नवबौध्द समाजात पाहिलेले आहे तेथे आधीचा बौध्द समाज मला दिसलाच नाही. त्यामुळे या दोन समाजात एकमेकांबद्दल वागणूक कशी असते ते माहिती नाही. अनेक बौध्द घरात देवपुजे पासून सगळेच हिंदू सणवार साजरे करतांना मी बघतोय. (धर्मांतर हे सामाजिक आहे. आपल्याला वेळीच जाग आली असती तर आपण हे मोठं नुकसान टाळू शकलो असतो. आम्ही तेव्हाही अक्कल शिकलो नव्हतो आणि या पातळीवर आजही काही विशेष करतो आहोत असं नाही.

एक जरा बोचणारं वाक्य आहे मात्र जरा विचार कराल तर ते खरे आहेच हे लक्षात येईल. नवबौध्द समाजाला शैक्षणीक, राजकीय आणि नोकर्‍यांत आरक्षण नसतं तर त्यांच्या बद्दल काहीच चर्चा झाली नसती. सगळ्या चर्चा ह्या त्यांना आरक्षणाची गरज आहे का? त्यांनी आरक्षणाचा लाभ कधी पर्यंत घ्यायचा. अश्या स्वरूपाच्या असतात. कुठेही त्यासमाजातील आजही तळागाळात असलेल्या घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काय करता येईल ? अश्या स्वरूपाच्या चर्चा मी कुठेही ( अनेक आंबेडकरी मंचावर सुध्दा) ऐकलेल्या अथवा वाचलेला नाहीत.

चाणक्य राव, शेवटची ओळ काही रुचली नाही बॉ. माझ्या कुठल्याही चर्चेत आकस नसतो. :)

नीलकांत

आकस

अरे आकस हे मी कोणाला व्यक्तिगत लिहिलेले नाहीये. माझं म्हणण आहे की आरक्षणाची मानसिकता लोकांना मानसिकरित्या अधु बनवते आहे. ६० वर्षे हा मोठा कालावधी आहे. आता सर्वांना समान संधी द्यायला हव्यात. राष्ट्रीय पातळीवरचे कोणतेच फायदे तळागाळापर्यंत पोहोचत नाहीत. आपले राजकारणी कसे आहेत आपण चांगलेच जाणतो.
तात्विक दृष्ट्या द्वेष जाणवत नसेल. पण तो असतो असे मला तरी वाटते. जातीय वाद नाहीसा करणे हे आपण सर्वांनी कर्तव्य म्हणून पाहिले तर ते जास्त लवकर जमेल. नाहीतर मग आधी आम्ही दबलेले होतो मग तुम्ही मग आम्ही मग तुम्ही ही न संपणारी साखळी अशीच राहिल आणि समाज विभागलेलाच राहिल.





सहमत

जातीय वाद नाहीसा करणे हे आपण सर्वांनी कर्तव्य म्हणून पाहिले तर ते जास्त लवकर जमेल. नाहीतर मग आधी आम्ही दबलेले होतो मग तुम्ही मग आम्ही मग तुम्ही ही न संपणारी साखळी अशीच राहिल आणि समाज विभागलेलाच राहिल.

सहमत

आरक्षणासंदर्भात....

एखादा हिंदू मागासवर्गीय जर धर्मबदल करून नवबौद्ध झाला, तर त्याचे आरक्षण कायम राहते. मग हे आरक्षण तो मागासवर्गीय होता म्हणून मिळते का तो नवबौद्ध आहे म्हणून? जर दुसरे कारण अधिक योग्य असेल तर एखादा उच्चजातीय व्यक्ती नवबौद्ध झाला तर त्याला आरक्षण मिळेल काय?

इतर देशातील जाती जमाती.

इतर देशातही अशी जातनिहाय उतरंड असते का?

जातीचा फायदा / नुकसान बेटी / रोटी यासाठीच होत असतो का?

लेखाचा मुख्य विषय म्हणजे आरक्षण टाळावे का? आता असा निर्णय कोणी घेऊ शकेल का? जोपर्यंत भारत स्वतंत्र आहे तो पर्यंत असे आरक्षण चालूच राहणार्. सध्या मराठा समाजही आरक्षण मागत आहे, काही काळाने ब्राह्मण समाजही आरक्षण मागेल आणि सर्वच जण आरक्षित झाले तर???

पाट्यांचे नमुने

मध्यंतरी पुण्यात दादा (4141), नाना (9191) मामा (५१५१), राज (2151) अशा पाट्यांची फ्याशन आली होती. कालच अजून काही नमुनेदार पाट्या मिळाल्या. आपली जात अधोरेखित करायला पाट्या कशा वापरल्या जातात त्याचेच हे नमुने.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

कारवाई

या जातीभेदावर कारवाई केल्याचे ऐकिवात नाही.
प्रकाश घाटपांडे

अंमळ मजेशीर

अंमळ मजेशीर प्रकार वाटला.

अक्षरे आणि क्रमांक ह्यांच्या करामत्या करुन आपले नाव गाडीच्या नंबर प्लेटीवर टाकण्याचा लोकांचा उत्साह बघून मजा वाटली.

पण ह्यात एखाद दुसरी पाटी सोडली तर जात मिरवणारी पाटी दिसली नाही.

मंगलसेवा देणारे

उर्फ कॅटरर्स लग्नात जेवण द्यायचा विषय आला की सर्वप्रथम बिनदिक्कत जात विचारतात. उदा. कोणी म्हटले की देशस्थ मराठा की त्यांच्या कागदावर मोठ्या अक्षरात लिहितात देशस्थ मराठा आणि पुढे "लाल तिखट, सुके खोबरे, शेंगदाणे, गरम मसाला" इ.इ. कोणी म्हटले, कोकणी सारस्वत की मोठ्या अक्षरात लिहितात "हिरव्या मिरच्या, ओले खोबरे, कोकम, गोडा मसाला" इ.इ. बरे ही जात विचारण्यात त्यांना काही गैर आहे असे वाटत नाही आणि ग्राहकाला पण काही गैर वाटत नाही. आहे की नाही मजा?

असो. मी स्वत: "तुम्ही आम्ही सकल हिंदु बंधु बंधु" ह्या पंथातील असल्यामुळे आजपर्यंत यच्चयावत सर्व अर्जांवर जात ह्या रकान्यात हिंदु असेच लिहित आले आहे. कारण ज्या क्षणी आपण तिथे आपली जात लिहितो त्या क्षणी आपण जातिभेदाला आपल्याकडून प्रोत्साहन देत असतो.

_______________________________________________
भो भद्र कृतं मौनं कोकिलैर्जलदागमे ।
वक्तारो दर्दुरा यत्र तत्र मौनं हि शोभनम् ।।

जाती आणि व्यवसाय

जाती आणि व्यवसाय यान्चा सम्बन्ध होता.
सुतार, चाम्भार, भन्गी, ब्राह्मण, क्षत्रिय, वाणी, वगेरे.
मी मध्यन्तरी गीतेत वाचले होते :
चातुर्वर्णम् मया सृष्टम् गुण कर्म विभागशह्|
इति श्रीभगवान उवाच.
येथे स्पष्ट पणे गुण कर्म असे म्हणलेले आहे.
काम आणि तदनुरूप गुण असणे हा एखाद्या जातीत प्रवेश घेण्याची प्रवेश परीक्षा होती.
आताच्या कालाचा विचार केला तर ही व्यवस्था मनाला पटते. ईन्जिनीअर् डॉक्टर आर्कीटेक्चर् होण्यासाठी नाही का सेम थिन्ग्?
तात्पर्यामधे वाचले होते की, जातीव्यवस्थेमधे जन्मानुसार जात ठरविण्याचा दोष निर्माण झाला तेन्व्हा भगवान बुद्धान्नी सम्पूर्ण वेदिक परम्पराच मोडित काढली आणि
केवळ जन्माने ब्राह्मण असणार्‍या वर्चस्व गाजविणर्‍या समाज घटकाला वठणीवर आणले.

आणि आपण अजूनही जन्माधारीत जात पकडून बसलो आहोत.
जात जात नाही कारण ती शासन दरबारी नोन्दली जाते.
ज्या दिवशी हे बन्द होईल त्यादिवशीपासून जात हळूहळू जात राहिल.

 
^ वर