आपद्धर्म

नमस्कार,

कोणी जाणकार शास्त्रातील आपधर्मावर माहिती देउ शकेल काय ? मी बर्‍याच वेळा हा शब्द् वाचला आहे. हा शब्द सन्कटकाळी कसे वागावे याबाबत आहे काय ?

लेखनविषय: दुवे:

Comments

शास्त्रार्थ

आपद्धर्म
आपदि कर्तव्यो धर्म ; आपद्धर्म. चातुर्वर्ण्य पद्धतीत प्रत्येक वर्णाचा व्यवसाय ठरवून दिला आहे.दुष्काळ, स्थलांतर इत्यादि आकस्मित कारणांनी समाज व्यवस्था विस्कळीत झाली असतांना जर विहित कर्मे आचरून जगता येत नसेल तर अपवाद म्हणून अन्य धर्माचा व्यवसाय स्वीकारायला हरकत नाही.या सोयीला आपद्धर्म म्हणतात.उदा. मनुस्मृतीत आपद्धर्म म्हणून ब्राह्मण-क्षत्रीयांना कलाकुसरीची कामे, नोकरी, गोपालन, शेती, भिक्षा मागणे, सावकारी इत्यादींना परवांगी दिली आहे. निरनिराळ्य़ा आचार्यानी वेगळी वेगळी
कामे करावयास परवांगी दिली आहे.मात्र कोणीही काही करावे अशी सर्रास परवांगी नाही. हा झाला शास्त्रार्थ. व्यवहारात आणखी एका प्रकाराला आपद्धर्म म्हणतात.काही वेळी धर्माने वागल्याने अनर्थ घडावयाची शक्यता असते. अशा वेळी अधर्माने वागणे योग्य असेल तर त्याला आपद्धर्म म्हणून परवांगी आहे. उदा. चोरांनी विचारले म्हणून धन कोठे आहे ते सांगू
नये. खरे बोलणे हा धर्म, या ठिकाणी खोटे बोलणे हा आपद्धर्म.
शरद

दुरुस्ती

वर अपवाद म्हणून " अन्य धर्माचा व्यवसाय स्विकारायला " लिहले आहे तेथे " अन्य वर्णाचा व्यवसाय " असे वाचावे.
शरद

आपद्धर्म

धन्यवाद शरद,

मला नक्की आठवत नाही पण हा शब्द सामान्यत : रुढीबाह्य विवाहा बाबत देखील वापरला जातो काय ? ह्यावर थोडा प्रकाश टाकू शकाल काय ?

नक्कीच

विवाह ही गोष्ट धर्म या सदरात मोडते. सबब आपद्धर्म येथेही लागु आहे.
२००१ मध्ये पंचांगात मुहुर्त नव्हते
आता एखाद्या पंचांगात जर मे,जून मध्ये मुहूर्त नाहीत म्हणून काय त्या काळात लग्न व्हायचीच नाहीत असे थोडे आहे. ज्यांना कसही करून करायचचं आहे ते कशाला मुहूर्ताची वाट बघतायतं? पण ज्यांना करायची तर इच्छा आहे पण मुहूर्ताची रूखरूख वाटू नये त्यासाठी रूईकर पंचांग लगेच पुढे सरसावले त्यांनी याकाळात सुद्धा 'शास्त्राधार` देउन मुहूर्त दिले आहेत. असे एखादे धर्मसंकट कोसळले की शास्त्राधार शोधले जातात व ते मिळतातही. या शास्त्रांच अगदी कायद्या सारखं आहे वाटा तेवढया पळवाटा. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला धर्मपंडितांनी नकार दिल्यावर सुद्धा काही धर्मपंडितांनी 'शास्त्राधार` शोधून त्यावर तोडगा काढलाच ना! हा सगळा आपद्धर्मच
प्रकाश घाटपांडे

आपद्धर्म

धन्यवाद प्रकाश !

आपद्धर्म

काही वाचनीय सन्दर्भ मिळू शकतील काय ?

सन्दर्भ

अशा बाबतीत मनु-याज्ञवल्क्य स्मृतींचे सन्दर्भ दिले तरी उपयोगी पडतील का ? मला वाटते सांस्कृतीक गोष्टीं बद्दल माहिती पाहिजे
असेल तर भारतीय संस्कृती कोश[ कै. महादेवशास्त्री जोशी], मराठी संत तत्वज्ञान कोश [डॉ. शेनोळीकर] अशी पुस्तके जी सहज
मिळतात [व मराठीत आहेत !] त्यांचा उपयोग करावा.
शरद

छांदोग्य उपनिषदातील उदाहरण

हे उदाहरण मी आपद्धर्माचे म्हणून वाचले होते - पण मूळ उपनिषदाच्या संहितेत "आपद्धर्म" हा शब्द वापरला नाही.

ही कथा छांदोग्य उपनिषदाच्या पहिल्या अध्यायात दहाव्या खंडात सापडते.
- - -
उषस्ति चाक्रायण नावाचा एक ऋषि दुर्भिक्षात भुकेपोटी उष्ट्या कडधान्याची भीक मागतो, पण मग जेवणारा उष्टे पाणीही देऊ करतो, तेव्हा उषस्ति नकार देतो. दान देणार्‍याला आश्चर्य वाटते - "उष्टे कडधान्य चालते, तर मग उष्टे पाणी का नाही चालत?" उषस्ति उत्तर देतो, की हे कडधान्य मी खाल्ले नसते, तर मी जगलो नसतो - पाणी मात्र मी केवळ इच्छेमुळे पीणार होतो." (ते अन्नदुर्भिक्ष असावे, उष्टे नसलेले पाणी उपलब्ध असावे.)
- - -

ही कथा मी वाचली त्या लहान मुलांसाठीच्या पुस्तकात त्यातून असे तात्पर्य काढले होते - जीवनमरणाचा प्रश्न असला तरच धर्मनियम मोडता येतात (- त्या उष्ट्या अन्नाशिवाय उषस्ति मेला असता). पर्याय उपलब्ध असेल, किंवा जीवनमरणाचा प्रश्न नसेल, तर धर्मनियम मोडता येत नाहीत (- म्हणून पाणी नकारले.) कथेचे नाव "आपद्धर्म" होते, म्हणून मला ही कथा आठवली.

जीवनमरणाचा प्रश्न असला तरच धर्मनियम मोडता येतात

धन्यवाद धनंजय,

जीवनमरणाचा प्रश्न असला तरच धर्मनियम मोडता येतात हे अगदी मान्य !

आपद्धर्म

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.शरद आणि श्री. धनंजय यांनी लिहिलेल्या प्रतिसादांतून आपद्धर्माची नेमकी ओळख सोदाहरण होते. श्री.प्रकाश घाटपांडे यांनी सांगितलेल्या पळवाटा म्हणजे आपद्धर्माची तत्त्वे नव्हेत.(मात्र त्यांनी लिहिले आहे ते अगदी व्यवहार्य आहे. अशा प्रसंगी तसेच करावे यात शंका नाही.)
खरे तर धर्माज्ञांची ढोबळ ओळख पुरेशी आहे. त्या शिरोधार्य आणि अनुल्लंघनीय मानण्याची आवश्यकता नाही. कोणत्याही प्रसंगी आपल्या सदसद्विवेक बुद्धीला अनुसरून वागावे . "योग्य अयोग्यासी बुद्धी केली ग्वाही| मानीयले नाही धर्ममता|" हेच योग्य होय असे मला वाटते.

 
^ वर