कै. भाऊसाहेब पाटणकर

कै.भाऊसाहेब पाटणकर ... मराठी शेर-शायरीचा उद्गाता
मराठीला गजल नवी राहिलेली नाही. जाणीवपूर्वक रचना म्हणून सुरवात जरी श्री. पटवर्धन यांनी केली असली तरी शास्त्रशुध्द रचना, कल्पनेची स्वैर भरारी इत्यादी गजलेची प्रमुख अंगे संभाळून केलेले काव्य गेल्या ३०-४० वर्षात इतके बहरून आले आहे की आजच्या काव्य निर्मितीत ५० टक्के गजलाच असतत असे म्हटले तरी चूक ठरू नये.
गजलेचे मुख्य अंग तीच्यातले शेर. एकाच गजलेमधले शेर एकमेकाशी संबंधीत असलेच पाहिजेत असे बंधन नसल्याने शेर स्वत:चे अस्तित्व गजलेशिवायही टिकवून ठेऊ शकतात.संपूर्ण गजल माहित नसली तरी त्यातील एखदा शेर आपणास माहित असतो,काही वेळा पाठही. मैफ़लीत नुसते शेरही सादर केले जातात आणि दादही मिळवतात.
मराठीत गजल मोठ्या प्रमाणात लिहली जात असताना स्वतंत्र शेर मात्र कमीच, जवळ जवळ नाहितच.गंमत म्हणजे गजलांचा सुकाळ व्हावयाच्या आधी मराठीत उच्च दर्जाचे शेर लिहणारा एक जबरदस्त शायर निर्माण झाला होता.... भाऊसाहेब पाटणकर !
हे गृहस्थ यवतमाळचे प्रथितयश वकील. संस्कृत काव्याचा, दर्शनांचा अभ्यास, शिकारीचा नाद,आणि मराठीचा व मराठी संस्कृतीचा जाज्वल्य अभिमान. माधव ज्युलिअन यांचे सुरवातीचे प्रयत्न अयशस्वी झाल्याने महाराष्ट्रात एक गैरसमज पसरू लागला होता की मराठी भाषाच या प्रकारच्या काव्याला पुरेशी पडणारी नाही. हा रस्ता आपला नाहीच.
मराठीचा असा उपमर्द होत असलेला भाऊसाहेबांना सहन होणे शक्यच नव्हते. कोणीही मार्गदर्शक नसताना त्यांनी स्वत; सुरवात केली. आणि त्यावेळीच ठरवले की शेर मराठीत लिहावयाचे तर ते इथल्या मातीशी, संस्कृतीशी नाळ जोडणारेच पाहिजेत. इथला प्रेमिक आपल्या प्रेयसीवर प्रेम करेल पण त्यात उर्दु प्रेमिकाचा,आषिकाचा लाचारपणा,
स्वत;कडॆ कमीपणा घ्यावयाची प्रवृत्ती, तीने ठुकरावून लावले तरी परत पाय चाटावयाला जाण्याची तयारी चालणार नाही. स्वाभिमान गमावून प्रेम करणे जमणारे नाही.त्यांच्या भाषेत बोलावयाचे म्हणजे
हंसतील ना कुसुमे जरी ना जरी म्हणतील ये
पाऊल ना टाकू तिथे,बाग ती अमुची नव्हे
भ्रमरापरी सौंदर्य वेडॆ आहो जरी ऐसे अम्ही
इष्कातही नाही कुठे भिक्षुकी केली अम्ही.
हा एक भाग झाला.इष्क हा विषय सोडून जीवन या सर्वव्यापी पैलूवर त्यांनी अनेक रचना केल्या.एक बघू

सोडिले ना घर कधीही गेलोच ना दुसऱ्या घरी
काळ पण आला असा, मी पाहुणा घरच्या घरी.

प्रत्यक्ष मृत्युशी बोलतानाही यजमानाने पाहुण्याशी बोलावयाची खानदानी पध्दत सोडवत नाही. वृध्दापकाळात आलेल्या मृत्युला ते म्हणतात

मृत्यो, अरे आलास जर का क्षीण मी होता असा
म्हणवेल का तेव्हा मलाही साधे तुम्हाला,या, बसा.
ज्याचे सवे अज्ञात देशी जावयाचे शेवटी
शोभेल का त्याशीच ऐसे वागून आम्हा शेवटी

विनोदालाही त्यांच्या शायरीत जागा होती.हा खवचट पणा बघा

अद्यापही मी नीलव्योमी, चंद्र नाही पाहिला
समजू नका, सांगेन तुम्हा, कोठे कसा मी पाहिला
ऐसे नव्हे,तुम्हास काही सांगू नयेसे वाटते
तुमच्या अरे, संभावितीची शंका मनाला वाटते.

भाऊसाहेबांनी शायरी लिहलीच, पण त्याच बरोबर नवोदितांना मार्गदर्शनही केले. त्यांच्या मते शेरामध्ये कल्पनेची भरारी पाहिजेच पण त्याच बरोबर तंत्रही संभाळले पाहिजे.दोन ओळींचे चार भाग पाडले तर शेवटच्या चौथ्या भागात असा धक्का बसला पाहिजे की वाचणाऱ्या/ऐकणाऱ्याच्या तोंडून उत्स्फ़ुर्तपणे वाहवा यावयास पाहिजे. पहा.

पेड वेणीचे तुझ्या वक्षावरी तू सोडले
रक्षिण्या धन यौवनाचे नाग जैसे सोडिले
जाणतो प्राणाहुनीही, या धना सांभाळिसी
नाकळे आम्हास, तुमची " Dog in the manger policy "

वेणीचे पेड= नाग, धन यौवनाचे = वक्ष, युवती त्या धनाला प्राणाहून सांभाळणार हे आपल्याला झटकन कळले;त्यामुळे चौथ्या ओळीच्या सुरवातीस कवीने " नाकळे आम्हास "
असे म्हटल्यावर आपण बुचकळ्यात पडतो की यात कवीला न कळण्यासारखे काय ? आणि इंग्रजी म्हण वाचल्यावर लक्षात येते की," च्या,खरेच की, या धनाचा भोक्ता ती युवती नव्हेच ! ’ हा धक्का व त्यामुळॆ मिळणारा विस्मयाचा आनंद हे शेराचे खरे सौंदर्य ! नेहमीची कविता आणि शायरी यात हा फ़रक.
शेवटी लेख भाऊसाहेबांच्या शायरीवर असल्याने त्यांचे काही शेर देऊनच थांबावे हे बरे .

१] दिनकरा येते दया, मजला तुझी आधी मधी
आहेस कारे, पाहिली तूं, रात्र प्रणयाची कधी. सूर्याला ही मस्करी सहन न झाल्याने तो म्हणतो
आम्हासही या शायराची कींव येऊ लागते
यांच्या म्हणे प्रणयास यांना रात्र याअवी लागते
ना म्हणू की इष्क त्याला आहे जराही समजला
इष्कातही दिवसास जो रात्र की रात्र नाही समजला.

२]लाजावयाचे जें काय सारे पहिल्याच दिवशी लाजली
वाट्टेल ते केले आम्ही, नाही पुन्हा ती लाजली.

३] उर्दूतील प्रसिध्द शेर "... बोसा लिया था ख्वाबमे तसबीर का " सगळ्याना माहित आहेच [नसेल तर जनाब " तो " ना विचारा ] भाऊसाहेबांच्या कल्पनेची उडी थोडी जास्तच !

नुसती जशी डोक्यांत आली चुंबनाची कल्पना
गोऱ्या तिच्या गालावरी उमटल्या साऱ्या खुणा
पाहुनि हा परिणाम माझे काळीज जैसे थांबले
कल्पनेचे खेळ माझे तेथेच नव्हते थांबले.

४] दोस्तहो, दुनियेस धोका मेलो तरी आम्ही दिला
येवूनही नरकात पत्ता कैलासचा आम्ही दिला
हाय, हे वास्तव्य माझे, सर्वास कळले शेवटी
सारेच हे सन्मित्र माझे येथेच आले शेवटी.

५] भीड मज बाई कुणाची, मोडवत नाही कधी
सुचवता कोणी कसेही,नाहीच ना म्हणवे कधी
एकदा सांगून बघते, " हे बघा ऐका जरा "
सांगते खुश्शाल मग मी " काय वाट्टेल ते करा "

शरद

Comments

क्या बात है!

कै. भाउसाहेब पाटणकर यांची ओळख करुन देणारा उत्तम छोटेखानी लेख.

कॉलेजचे दिवस आठवले

मझा आला!

व्वा! छेडियल्या तारा!

भाउसाहेब पाटणकरांचे नाव कोणी घेतले की मला त्यांच्या ह्या ओळी आठवतात -

"छेडतात बोटे जरी ही सतारीस आता
छेडायचे त्यांना प्रिये तुझे केस होते"

 
^ वर