गुपित - तेजी मंदीचे!

गुपित - तेजी मंदीचे!
चंद्रशेखर चितळे

(साभार-अर्थविश्व(दै.गोमन्तक))

एक होते सुंदर बेट. त्याचे नाव "सीन'. त्या बेटावर माणसे होती एकंदर तीन. त्यांची नावे इन, मीन आणि टीन. या सीन बेटाच्या कहाणीमधून उलगडेल तेजी-मंदीची वीण!
सीन बेटावर संपत्ती होती ती म्हणजे बेटाची छोटीशी जमीन आणि शंभर रुपयांच्या दोन नोटा. बस्स! जमिनीचा मालक होता इन, तर शंभर रुपयांची एक-एक नोट बाळगून होते मीन आणि टीन. मीनला वाटले आपण जमीन खरेदी करावी. त्याच्याकडील शंभर रुपयांच्या मोबदल्यात जमीन विकण्याची त्याने इनला विनंती केली. इनला सौदा मंजूर झाला. इनने शंभर रुपये घेतले आणि मीनला जमीन विकली.
म्हणजेच सीन बेटावर इन आणि टीनकडे प्रत्येकी शंभर रुपयांची एक एक नोट होती, तर संपूर्ण जमीन- जिची किंमतदेखील शंभर रुपये आहे, ती मीनच्या मालकीची होती. अशा प्रकारे सीन बेटावरची एकंदर मालमत्ता होती तीनशे रुपये मात्र!
टीनच्या मनामध्ये विचार आला, की संपूर्ण बेटावरची जमीन मीनच्या मालकीची आहे. जमिनीचे परत उत्पादन करता येणार नाही, त्यामुळे जमिनीची किंमत वाढेल, असा विचार मनामध्ये येताच त्याने इनकडून शंभर रुपये कर्जाऊ घेतले आणि त्यायोगे मीनकडील संपूर्ण जमीन दोनशे रुपयांना खरेदी केली. व्यवहार झाला.
आता इनकडची मालमत्ता होती टीनला दिलेले कर्ज शंभर रुपये. मीनकडे होते जमीनविक्री करून मिळालेले दोनशे रुपये. टीनकडे होती दोनशे रुपयांची जमीन व शंभर रुपये इनला द्यावयाचे कर्ज, अशी एकंदर मालमत्ता रुपये शंभरची. म्हणजेच सीन बेटावरील एकंदर मालमत्तेचे मूल्य झाले चारशे रुपये.
त्यानंतर इनच्या पोटामध्ये दुखू लागले. कारण त्याने शंभर रुपयांना विकलेल्या जमिनीचे मूल्य झपाट्याने वाढून झाले होते दोनशे रुपये! इनला जमीन विकल्याचा पश्‍चात्ताप झाला. सुदैवाने त्याच्याकडे टीनला दिलेले शंभर रुपये कर्ज होते. त्याने मीनकडून दोनशे रुपयांचे कर्ज घेतले आणि टीनची जमीन तीनशे रुपयांना खरेदी केली.
या व्यवहारानंतर इनकडे आली तीनशे रुपयांची जमीन व मीनला द्यावयाचे दोनशे रुपये कर्ज. म्हणजे निव्वळ मालमत्ता रुपये शंभर. मीनची मालमत्ता झाली इनला दिलेले कर्ज रुपये दोनशे. टीनला जमीनविक्रीमुळे इनचे असलेले शंभर रुपये कर्ज फिटले आणि खिशामध्ये पडले दोनशे रुपये. अशा प्रकारे सीन बेटावरील एकंदर मालमत्ता फुगून झाली पाचशे रुपयांची.
मीनच्या डोक्‍यामध्ये आता लख्ख प्रकाश पडला होता. जमिनीच्या मूल्यवर्धीचे त्रैराशिक त्याने अनुभवले होते. त्याला जमीन खरेदीची हाव सुटली. गाठले त्याने इनला आणि केला पक्का जमीन खरेदीचा सौदा चारशे रुपयांना.
मीनने इनला कर्जाऊ दिलेले दोनशे रुपये वसूल धरले, टीनकडून दोनशे रुपये उसने घेतले व इनला ते देऊन जमीन खरेदी केली.
सीन बेटावरील संपत्ती अजून फुगली. इनकडे आले दोनशे रुपये, मीनकडे आली चारशे रुपयांची जमीन व दोनशे रुपयांचे कर्ज, असे निव्वळ दोनशे रुपये, तर टीनकडे आली मीनच्या दोनशे रुपयांची कर्जवसुली. अबब! अशा तऱ्हेने सीन बेटाची एकंदर मालमत्ता झाली सहाशे रुपये. केवढी ही भरभराट! प्रत्येक नागरिकाची मालमत्ता वधारली. सीन बेटावरील प्रत्येक जण सुखी व आनंदी झाला.
असेच काही दिवस आनंदाने गेले. पण म्हणतात ना, सुखालाही शाप लागतो आणि भोवळ येते. तसेच झाले. टीनच्या डोक्‍यामध्ये शंकेची पाल चुकचुकली. त्याला वाटले, जमिनीच्या किमती कुठवर वाढणार? नाही वाढल्या तर मीन कर्ज फेडणार? बेटावर फक्त दोनशे रुपयेच व्यवहारामध्ये आहेत आणि खरं सांगायचं तर मीनच्या जमिनीची किंमत तशी शंभर रुपयेच होईल. इनलादेखील काहीसे असेच वाटले.
आता जमीन खरेदीस कोणीही उत्सुक नव्हते. इन दोनशे रुपये बाळगून होता. मीनला टीनचे दोनशे रुपयांचे कर्ज होते; परंतु इनने चारशे रुपयांना खरेदी केलेल्या जमिनीचा बाजारभाव शंभर रुपये झाल्याने त्याला निव्वळ शंभर रुपयांचे कर्ज झाले. टीनला दोनशे रुपये कर्ज येणे असले तरी जमिनीचा बाजारभाव कोसळल्याने त्याचे शंभर रुपये बुडीत होते आणि उर्वरित शंभर रुपये वसूल होण्याची शाश्‍वती होती. त्यामुळे सीन बेटावरील एकंदर मालमत्ता परत झाली तीनशे रुपये!
झाले! मीनने आपली दिवाळखोरी जाहीर केली. मीनला दिलेल्या दोनशे रुपयांच्या कर्जाच्या बदल्यात टीनने त्याची जमीन जप्त केली.
इनकडे राहिल्या शंभर रुपयांच्या दोन नोटा. कर्जबाजारी मीनची मालमत्ता झाली शून्य रुपये. टीनकडे आली शंभर रुपये बाजारभावाची जमीन. म्हणजेच सीन बेटाची एकंदर मालमत्ता झाली परत तीनशे रुपये! सीन बेटावरील या तेजी-मंदीच्या चक्रामध्ये मालमत्तेचे पुनर्विभाजन झाले. इन नशीबवान ठरला, मीन साफ बुडाला, तर टीन सुदैवाने वाचला.
सीन बेटावरील छोटी कहाणी आपणास मोठे धडे शिकवून जाते. जोवर फुगा फुगत असतो, तोवर सर्वच जण चैनीत व आनंदात असतात. फुगा फुगत असेपर्यंत कर्ज काढून मालमत्ता घेणाऱ्यास फायदा होतो. परंतु फुगा फुटण्यापूर्वी ज्याच्या खिशामध्ये पैसा असतो तोच विजयी ठरतो. तेजी-मंदीचे त्रैराशिक ज्याला मांडता येते त्यालाच पैशाचे गणित सुटते!

तुषार काळभोर

लेखनविषय: दुवे:

Comments

खेळकर स्पष्टीकरण

(मूळ लेखकाकडून प्रत्यक्ष संमती मिळवणे आवश्यक आहे असे वाटते, केवळ साभार उल्लेख नाही... नेमका नियम उपक्रमपंत सांगतील.)

खेळकर पद्धतीने माहिती दिलेली आहे. कर्जातून चलन उत्पन्न होते, हे पुष्कळ लोकांना समजायला कठिण जाते, या कथेने ते समजणे सोपे जावे.

पण सुलभीकरणामुळे उत्पन्न झालेले चलन हे नेहमीच निर्"अर्थक" असते, असा गैरसमज होऊ नये. त्या जमिनीपासून उत्पन्न होत असेल, तर दोन खरेदी-विक्री व्यवहारांच्या दरम्यान कर्ज त्या उत्पन्नाच्या रूपाने फेडले जाऊ शकते. अशा प्रकारे फुगलेले चलन "अर्थ"पूर्ण होऊ लागेल. वगैरे.

पण अख्खीच्या अख्खी अर्थव्यवस्था एका लघुकथेतून कशी सांगता येईल म्हणा? अशा लहानलहान कथांमधून हळूहळू अधिक अधिक गुंतागुंतीचे मुद्दे सांगता येतील. म्हणून कथा आवडली.

अंशतः असहमत

(मूळ लेखकाकडून प्रत्यक्ष संमती मिळवणे आवश्यक आहे असे वाटते, केवळ साभार उल्लेख नाही... नेमका नियम उपक्रमपंत सांगतील.)

१) यात श्रेय लाटले नाही
२) यातुन अर्थाजन केले नाही
३) यातुन सामाजिक उद्रेक निर्माण केला नाही
सबब ही गोष्ट intelluctual property act नुसार फेअर युज सदरात मोडते. अधिक माहिती वा संदर्भ आत्ता मजजवळ नाही.
सदर माहिती मी या विषयावर् दिलेल्या ग्रंथपालांच्या कार्यशाळेत या विषयावरील व्यवसाय करणार्‍या एका फर्मच्या तज्ज्ञाने दिली आहे. ज्या कार्यशाळेला मी हजर होतो.
आता पर्याय लिंक देण्याबद्दलचा. पण यामुळे लेखनाचा प्राधान्यक्रम खालावतो.
दिलेली लिंक काम करणे ही अधिक पराधीन व लांबचा पर्याय असतो. तसेच सार्वजनिक व्यासपीठावर अगोदरच प्रसृत झालेल्या प्रत्येक गोष्टीची संमती घेत बसणे व्यवहार्य नसते. आपण फेअर युज केला कि नाही हे आपलीच सद सद विवेक बुद्धीच सांगु शकते . आमच्या मते तुषार यांनी फेअर युज केला आहे.
अन्यथा हा लेख आमच्या पर्यंत पोचलाच नसता.
प्रकाश घाटपांडे

दिल्ली उच्च न्यायालयाचा निकाल

प्रकाशकाका,

नुकताच दिल्ली उच्च न्यायालयाने सेंटर फॉर सायन्स ऍण्ड एनव्हायर्नमेन्ट या स्वयंसेवी संस्थेच्या संकेतस्थळावरून 'द् मिन्ट' या वृत्तपत्रातील विनापरवानगी चढविलेले लेख काढून टाकण्याचा आदेश दिला आहे. सीएसई ने आपण वर मांडलेले मुद्दे कोर्टात मांडले होते. त्यामुळे अशा बाबीचा नव्याने विचार करणे आवश्यक आहे असे वाटते.

जयेश

सहमत तरीही

त्यामुळे अशा बाबीचा नव्याने विचार करणे आवश्यक आहे असे वाटते.

कायद्याच्या तांत्रिक अन्वयार्थाचा तो भाग नक्कीच आहे. समजा सेंटर फॉर सायन्स ऍण्ड एनव्हायर्नमेन्ट या स्वयंसेवी संस्थेने संकेतस्थळावरून 'द् मिन्ट' या वृत्तपत्रातील मजकुराची लिंक दिली असती तर?
सदर मजकुर जालावर नसेल पण त्याची प्रतिमा एखाद्या सर्व्हरवर संस्थेने ठेवली असती आणि ती दाखवली असती तर?
वर्तमान पत्रातील मजकुराची चिकटवही एखाद्याने केली आणी सामाजिक आशयाचा व्यक्तिगत संग्रह म्हणुन प्रकाशित केला तर?
ज्ञानाची भांडारे जर बंदिस्त राहिली तर समाजाचे नुकसानच होते. ज्ञानाची मक्तेदारी निर्माण होते. म्हणुनच मी म्हटले की फेअर युज चे उत्तर सदसदविवेक बुद्धीच देउ शकते.

प्रकाश घाटपांडे

सैद्धांतिक आणि कायदेशीर मुद्दे वेगळे मानावेत

> ज्ञानाची भांडारे जर बंदिस्त राहिली तर समाजाचे नुकसानच होते. ज्ञानाची मक्तेदारी निर्माण होते.
हा सैद्धांतिक मुद्दा आहे, आणि याच्याबद्दल वाद नाही.

बाजार पद्धतीच्या अर्थव्यवस्थेत आर्थिक फायदा, मर्यादित एकाधिकार काही मर्यादित काळापर्यंत लेखक/कल्पनानिर्माता यांच्यापाशीच राहावा, हा सुद्धा सैद्धांतिक मुद्दा आहे.

या दोन उलट सिद्धांतांची तडजोड सदसद्विवेकबुद्धीने लावायची आहे, हे प्रकाश घाटपांडे सरांचे मत योग्यच आहे. एकाधिकाराच्या या सदसद्विवेकी मर्यादांनाच "फेअर यूज" (रास्त वापर) असे म्हणतात.

अशा बाबतीत वेगवेगळे लोक आपापले निकष लावून ज्या मर्यादा आखतात, त्या कमालीच्या वेगवेगळ्या ठिकाणी आखतात. वेगवेगळ्या काळात ज्या मर्यादा रास्त मानल्या जातात, त्या कमालीच्या वेगळ्या असतात. अशा वेळी तटस्थ सरकारी विधानसभा, किंवा न्यायालय काही मर्यादा स्पष्ट करतात. या कायद्याचे त्या काळात तरी पालन करणे आवश्यक असते. पुढच्या-मागच्या पिढीची, आणि माझी व्यक्तिगत सदसद्विवेकबुद्धी काही वेगळी मर्यादा का सांगेना.कायदा नेमकी मर्यादा जी सांगतो, ती मर्यादा सैद्धांतिक नसते - कामचलाऊ असते.

वरील प्रश्नांची उत्तरे (वेगवेगळ्या देशांतल्या) कायद्याने काही प्रमाणात दिलेली आहेत.

> वृत्तपत्रातील मजकुराची लिंक दिली असती तर?
चालते.
लिंकचा दुवा म्हणजे महाजालावरील एक पत्ता. पत्त्याची मालकी ही घरमालकाची नसते. (म्हणजे "१७६० शुक्रवार पेठ" या घराचा मालक कोणीही असो, त्या पत्त्याची [त्या माहितीची] मालकी महानगरपालिकेची आहे. महानगरपालिकेने हे पत्ते बदललेसुद्धा आहेत - घराची मालकी न बदलता.) महाजालाच्या पत्त्यांवर वर्तमानपत्राचा मालकी हक्क नसतो - तो दुवा मी माझ्या लेखनात देऊ शकतो. आता त्या पत्त्यावर पोचलेल्या पाहुण्याला दार उघडायचे की नाही, हा हक्क घरमालकाचा असतो. आपले संकेतस्थळ वाटेल तेव्हा बंद ठेवून संकेतस्थळाचा मालक हा अधिकार गाजवू शकतो. मी दुवा दिल्यामुळे संकेतस्थळ मालकाचा अधिकार यत्किंचितही कमी होत नाही.

> सदर मजकुर जालावर नसेल पण त्याची प्रतिमा एखाद्या सर्व्हरवर संस्थेने ठेवली असती आणि ती दाखवली असती तर?
प्रतिमा करून साठवण्यासाठी सर्व्हरमालकाला मूळ मालकाची अनुमती लागते. गूगलसारखा सर्वभक्षी सर्व्हर जगभरची प्रतिमा करत असेल, तर ती प्रतिमा पुन्हा वितरित करण्यासाठी मूळ मालकाची अनुमती जरुरीची असते. हल्ली काही संकेतस्थळांची गूगलवर साठवलेली प्रतिमा गूगल दाखवत नाही. (अनुमती नसल्यामुळे.)

> वर्तमान पत्रातील मजकुराची चिकटवही एखाद्याने केली आणी सामाजिक आशयाचा व्यक्तिगत संग्रह म्हणुन प्रकाशित केला तर?
बेकायदा. ही त्या वर्तमानपत्राच्या पत्रकारितेविषयी समीक्षा असेल, तरच तो मजकूर शब्दशः पुन्हा सांगणे आवश्यक आहे. नाहीतर चिकटवही-संग्राहकाला त्यातील माहिती प्रसारित करायची असेल, तर स्वतः नवीन लेख लिहून त्यात ती माहिती [वर्तमानपत्राचा "संदर्भ" म्हणून उल्लेख करून] द्यावी. (माझ्या सदसद्विवेकबुद्धीला हे पूर्णपणे पटत नाही, तरी हा कायदा आहे. वर्गात शिकवताना वर्गापुरत्या वापरासाठी अशा चिकटवह्यांच्या प्रती शिक्षकाने करणे फेअर यूज आहे - त्यामुळे दुसर्‍या कोणीतरी सदसद्विवेकबुद्धी वापरून कायदा केला आहे. त्यांनी ठरवलेली मर्यादा माझ्या विचारांपेक्षा वेगळी आहे, काय करावे?)

हा अवांतर उपप्रतिसाद मी येथेच संपवतो.

पूर्व-परवानगी

तुषार काळभोर

नमस्कार,
मी मूळ लेखकाची परवानगी घ्यायला हवी होती, असे वाटते. मात्र त्यापेक्षा हा लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावा अशी इच्छा होती, त्यामूळे ती न घेताच लेख इथे चढवला. जर माझे चुकत असेल तर मूळ लेखकाची माफी मागण्यात मला काही गैर वाटत नाही.(अर्थात, त्यांनाही हा लेख या माध्यमातून इतक्या लोकांपर्यंत पोहचल्याचा आनंदच होईल, अशी आशा आहे.)

Sorry.....चंद्रशेखर चितळेजी!

मस्त / कथेचे मूळ

तुषारराव, कथा मस्त आहे. पण ही कथा चंद्रशेखर चितळ्यांची निर्मिती आहे असे वाटत नाही. ही कथा आणि सारांश ढकलपत्रांतून फिरत होती. आजकाल ढकलपत्रांतून येणारी मनोरंजक माहिती सर्रास मराठी वर्तमानपत्रात 'विशेष' सदरांतून देतात (मूळ स्रोत सांगत नाहीत हे वेगळेच.) असो. पण कथा मस्त आहे. when the bubble bursts the person with the cash is the king असा काही विषय होता विरोपाचा. हवी असल्यास इंग्रजी कथा गूगलून मिळेल.

अरे खरच की

लोक कथा या अशाच प्रसृत होतात. मौखिक् परंपरेतून . त्या कुणीतरी शब्द बद्ध करतं. त्यात कुणी 'देश काल वर्तमाने' बदल करत त्या पुन्हा प्रसृत होतात. बोधकथांचेही तसेच आहे. आपापल्या विचारांचे रंग त्यात भरत त्या पसरत जातात. एखाद्या प्रसंगाला अनुकुल अशा बोधकथा बुंदी पाडल्या सारख्या पाडल्या जातात. बुवा लोक यात चतुर असतात. 'प्रयत्ने वाळुचे कण रगडिता तेल ही गळे' यावर एखादी बोधकथा पाडली जाते. तर 'दगडावर डोके आपटुन दुसर काय होणार?' यावर ही बोध कथा पाडली जाते.
कुठली ही साहित्य कृती ही स्वतंत्र प्रतिभा आहे असे नसते. त्याच्या निर्मितीमुल्यात अनेकांचा अप्रत्यक्ष वाटा असते. श्रेय मात्र लेखकाला जाते आणि पैसा प्रकाशकाला.
भाकित-२००९ मध्ये intelluctual property act च्या गुंतागुंती मुळे अनेक वित्तहानी जिवित हानी यासारखे गंभीर गुन्हे घडतील.

अवांतर- घडले नाहीत तर त्याची नोंद झाली नाही असे समजावे. नाही तरी अनेक गुन्ह्यांची नोंद होत नाही हे आपण जाणताच.

ज्योतिषी
प्रकाश घाटपांडे

सिन

बेटाचे नाव सिन पाहून शंका आलीच होती पण फारशी शोधाशोध केली नाही. कथा मस्त आहे याबद्दल सहमती. अशीच एक मेलेल्या उंदराची तेनाली रामनची (की बीरबल?) कथा वाचल्याचे पुसटसे आठवते.

मूळ मुद्दा बाजूला

मूळ विषय बाजूला राहीला. दूसरा चर्चेचा विषय होउ शकेल ईतपत चर्चा फेअर न्युज या मुद्द्या वर होत आहे.

मी देखिल तेजी मन्दी व आपण असा एक मुद्दा चर्चेला ठेवला होता. त्यावर अपेक्षित मुद्दे आलेच नाहीत. कारण समजले नाहीच.

कदाचित आमच्या सदस्याना मन्दीची झळ बसली नसावी .
चर्चेत रस नसावा
विषयाची माहिती नसावी.
किवा नावाला ग्लमर नसावे ( चर्चेचा मुद्दा ठेवणा-याचे) , कशाला उगाच लीहा ?

माझी वैयक्तिक निराशा झाली. क्रुपया गैरसमज नसावा.

धन्यवाद !
अविनाश रायकर
दूर्जनांच्‍या दुष्‍कृत्‍यांपेक्षा सज्‍जनांची निष्क्रीयता जास्‍त भयावह

गोष्ट आवडली

"गोष्ट आवडली" यापेक्षा अधिक प्रतिसाद देता येत नाहि कारण

विषयाची माहिती नसावी

हे कारण माझ्यापुरते खरे आहे.

असो. तरीही गोष्ट आवडली

ऋषिकेश
------------------
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोऽहे

फेअर न्यूज

अविनाशजी,
अशा बाबतीत संमतीचा मुद्दा उपस्थित होणे क्रमप्राप्तच होते. आजकाल बौध्दिकसंपदा संदर्भात समाजात विशेष जागरुकता दिसून येते. त्यामुळे विनापरवानगी असे लेखन अन्य संकेतस्थळावर चढविणारी व्यक्ति व त्याचबरोबर ज्यावर लेख चढविला गेला ते संकेतस्थळ उगीचच कायदेशीर अडचणीत येऊ शकते. तुषार यांनी मूळ लेखकाचा संदर्भ सुरुवातीलाच दिला आहे, त्यामुळे त्यांच्या उद्देशाबद्दल मुळीच शंका नाही. तसेच त्यांनी याबाबत दिलगीरीही व्यक्त केली आहे.
जयेश

 
^ वर