उकार (ऊकार) ?

नमस्कार मंडळी,
लहानपणापासून मला भेडसवणारे काही व्याकरणातील प्रश्न आहेत.
उ आणि ऊ वापरण्याचे व्याकरणामध्ये काही नियम आहेत का?
उदा.
पूर्व की पुर्व?
सुरु की सूरू?
माणुस की माणूस?
व्याकरणचे यासंबधी काय नियम आहेत.

वेलांटी संबंधीत असेच नियम काय आहेत?
(अडाणी ) रम्या.

लेखनविषय: दुवे:

Comments

शुद्धलेखनाचे नियम

नियम ६
र्‍हस्व-दीर्घ नियम
मराठी शब्दातील शेवटचे अक्षर दीर्घ असेल तर त्याचा उपान्त्य (म्हणजेच शेवटच्या अक्षराच्या अलीकडचा) इकार किंवा उकार र्‍हस्व लिहावा.

उदाहरणार्थ किडा, विळी, पिसू, इथे, निघो, फुगा, खुनी, सुरू, कुठे, उठो.
मात्र तत्सम शब्दांना हा नियम लागू नाही. तत्सम शब्दातील उपान्त्य इकार किंवा उकार मुळाप्रमाणे र्‍हस्व किंवा दीर्घ लिहावेत.
उदाहरणार्थ: पूजा, गीता, अनुज्ञा, दक्षिणा

स्रोतः विकिपेडिया.

अधिक माहिती

मराठी भाषकांचे राज्य म्हणून १९६० साली महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर,मराठी साहित्य महामंडळाने पुरस्कृत केलेल्या मराठी लेखनविषयक चौदा नियमांना महाराष्ट्र शासनाने १९६२ साली मान्यता दिली. पुढे १९७२ मध्ये आणखी चार नवीन नियमांची भर घालून पूर्वीच्या नियमांतील त्रुटी महामंडळाकडून दूर करण्यात आल्या . मराठी साहित्य महामंडळ हे महाराष्ट्रातील साहित्य संस्थांचे प्रातिनिधिक मंडळ असल्यामुळे त्याने केलेल्या नियमावलीला महाराष्ट्र राज्य शासनाने मान्यता दिली आणि राज्यकारभारात व शिक्षणाच्या सर्व क्षेत्रांत तिचे पालन करण्याचे ठरविले.
(स्रोतः विकीपेडिया)

आपला
अभिजित

अवांतर

'रु' असताना 'ऋ','हॄ'/आणि 'न्ग' असताना 'ङ'(ड शेजारी टिंब), 'ञ' ही अक्षरे का शोधली असावीत याबद्दल शंका आहे.
लोकमंगल ला त्याच्या नावात लिहीलेले अक्षर न कळल्याने 'लोकमडगल', 'वांग्मय' या उच्चाराच्या शब्दाला ते अक्षर न कळल्याने 'वाडमय' आणि हॄदय ला घाईघाईत 'हद्य' असे वाचणारी लोकं पाहिली आहेत. ('हद्य' वाली मूर्ख मी स्वतः!)
या अक्षरांची बाराखडीत खरोखर गरज आहे का?
'ऋ' आणि दीर्घ 'ॠ' कुठेकुठे वेगवेगळे वापरले जातात?
'ऌ' आणि 'ॡ' मधला फरक काय? ते कुठे वापरले जातात?
'ञ' कुठे वापरला जातो? त्याचा उच्च्चार काय?

'ञ' कुठे वापरला जातो? त्याचा उच्च्चार काय?

'ञ' ...म्हणजे यत्र तत्र सर्वत्र मधल त्र तर् नाही ना?

नाही हो.

तो वेगळा आणि हे अक्षर वेगळे.
अधिक माहितीसाठी लिहीण्याची पद्धत या पर्यायाखाली असलेला टंकलेखन साहाय्याचा दुवा पहा.

ङ आणि ञ

ङ हा उच्चार क-ख-ग-घ वगैरे उच्चार करताना करतात तसाच करावा परंतु नाकाने हवा बाहेर सोडावी.

'ञ' हा उच्चार च-छ-ज-झ वगैरे उच्चार करताना करतात तसाच करावा परंतु नाकाने हवा बाहेर सोडावी. नाकाने 'य" चा उच्चार करावा त्याच्या जवळपास जाणारा ह्याचा उच्चार आहे.

मराठीतील ज्ञ हे व्यंजन ज् आणि ञ यांच्या संयोगाने तयार झाले आहे.

ङ आणि ञ यांचा तमिळ भाषेत खूप वापर होतो.

ऋ चा उपयोग ऋषी, ऋण वगैरे परिचित शब्दात पाहिला आहे.
ञ चा उपयोग संस्कृतमध्ये पञ्चरुप्यकाणि असा (पाच रुपये) पाच रुपयाच्या नोटेवर पाहावयास मिळेल.
मात्र दीर्घ ॠ, 'ऌ' आणि 'ॡ' बद्दल फारशी माहिती नाही.

अनुनासिकें

श्री.योगेश यांनी अनुनासिकांच्या उच्चारांसंबंधी दिलेली माहिती योग्य आहे.मराठी त ३६ व्यंजने आहेत . 'क" ते 'म' या पहिल्या पंचवीस व्यंजनांचे पाच पाचचा एक असे क,च,ट,त,प असे पाच वर्ग आहेत.प्रत्येक वर्गातील शेवटचे व्यंजन अनुनासिक आहे. जसे:
क् ख् ग् घ् ङ्
च् छ् ज् झ् ञ्
ट् ठ् ड् ढ् ण्
त् थ् द् ध् न्
प् फ् ब् भ् म्
अनुस्वार असलेल्या अक्षरापुढे ज्या वर्णातील अक्षर येते त्या वर्णातील अनुनासिकासारखा त्या अनुस्वराचा उच्चार होतो. उदा:
अंक --> अङ् क (अन्क नव्हे)
भंग --> भ् ङ् ग
पांचजन्य --> पाञ् चजन्य
घंटानाद --> घण्टानाद (घन्टा नव्हे)
अनुस्वार युक्त अक्षरापुढे त आणि प वर्गांतील व्यंजन आल्यास अनुस्वाराचा उच्चार अनुक्रमे न् आणि म् होतो.

..................यनावाला

अधिक माहिती मिळेल का?

श्री यनावाला,

र्‍हस्व व दीर्घ ॠ, र्‍हस्व व दीर्घ 'ऌ' बद्दल अधिक माहिती मिळेल का?

यांचा उच्चार नक्की कसा करावा?

दीर्घ ॠ, र्‍हस्व व दीर्घ 'ऌ' यांचा वापर कोणत्या शब्दात केला आहे?

आभार

योगेश व यनावाला,
माहितीबद्दल आभार.(मनातल्या मनातल्या अनुनासिक उच्चार करुन पाहत आहे..)

ऋ,ॠ,ॡ, ॡ विषयीं

श्री.योगेश ,
वरील चार स्वर आहेत ,याची तुम्हांला कल्पना आहेच. ॡ स्वराचा वापर ज्यात आहे असा एकच शब्द आठवतो
तो म्हणजे कॢप्‍ती (kRluptee) युक्ती, करामत या अर्थी हा श्ब्द प्रौढ मराठीत रूढ आहे.आणखी आठवल्यास कळवीन.
..........यनावाला

माफ करा, पुन्हा प्रश्न...

माफ करा मंडळी,
माझे प्रश्न कदाचित फारच प्राथमिक स्वरुपाचे वाटतील.
पण हे -हस्व-दीर्घ प्रकरण पुन्हा एकदा स्पष्ट केलं तर बरं होइल.

मराठी शब्दातील शेवटचे अक्षर दीर्घ असेल तर त्याचा उपान्त्य (म्हणजेच शेवटच्या अक्षराच्या अलीकडचा) इकार किंवा उकार र्‍हस्व लिहावा.

विळी या शब्दातील 'वि' हा र्‍हस्व म्हणावा का? आणि 'ळी' हा दीर्घ म्हणावा का?
उत्तर जर 'हो' असेल तर 'किडा' या शब्दातील 'डा' ला दीर्घ कसे म्हणावे?
थोडक्यात र्‍हस्व आणि दीर्घ ची व्याख्या पुन्हा एकदा समजावून सांगीतलंत तर बरं होइल.

रम्या

र्‍हस्व-दीर्घ

'किडा' या शब्दातील 'डा' ला दीर्घ कसे म्हणावे?

डा हा कवितेतील गुरू आहे, म्हणजे तो म्हणायला (नुसत्या ड पेक्षा) जास्त वेळ लागतो. बाराखडीतले अ, इ, उ हे र्‍हस्व बाकी दीर्घ असे लक्षात ठेवायला हरकत नाही. अं, अः साठी थोडे वेगळे नियम आहेत, तरी.

पूर्व, माणूस, सुरू हे बरोबर. शेवटचे अक्षर र्‍हस्व असेल तर पहिल्या अक्षरातली वेलांटी, किंवा उकार दीर्घ होतो. उदा, सूर्य, कणीस. तसेच शेवटी वेलांटी, उकार आला तर तो दीर्घ लिहिला जातो. उदा कवी (संस्कृत कवि), वायू, पाणी वगैरे.

रम्या

रम्या,

तुला नको ते बरेच प्रश्न पडतात असे दिसते. पण चांगल आहे. अशाच शंका विचारीत रहा. त्यातून शिकायला मिळतं.

(विद्यार्थी) बापू

'न' आणि 'ण' या विषयी

चांगला विषय आहे हा!
यात माझे पण दोन शब्द!

'न' आणि 'ण' या विषयी,

'न' कुठे वापरायचा आणि 'ण' कुठे याविषयी बराच गोंधळ असतो.
यातला सोपा नियम - सर्वसाधारण पणे 'र' नंतर येतो तो 'ण' .

उदा. मरण, तारण, धारण, साधारण, पूर्ण, पुराण.

पण मग 'न' कधी येतो?
याविषयी अजून सोपा खुलासा कोणी करेल का?

-निनाद

न आणि बाल्या

"न" आणि "ल" कोकणातल्या बाल्यांच्या भाषेत येतो.

बाले लोक म्हणजे मुंबईचे रामा गडी. अर्थी चड्डी घालून बाल्या डान्स करणारे.

उदाहरणार्थ, आमच्या "चिपलून"चे बाले असे बोलतात.

"(मजकूर संपादित केलेला आहे) रातभर डोल्याला डोला नाही हो !"

"त्या नलाच्या बाजूच्या तलाच्या खोलीत पानी सांडलाव, ती मोरी झाली बुलबुलीत......"

(बाल्या) बापू

 
^ वर