दहशतवाद - समाज जागृती - प्रभावी उपाय

मित्रहो, चर्चेचा विषयच बरेच काही सांगुन जातो. सर्व भारतीयांच्या डोक्यात सध्या दोन विषय घर करुन आहेत.

  1. आपल्या दारापर्यंत पोहोचलेली दहशतवाद्यांची कृत्ये.
  2. आर्थिक मंदीचा माझ्यावर/आपल्यावर होणारा परिणाम.

तसे पहायला गेल्यास एकट्याने या पैकी कोणताही प्रश्न पुर्ण सुटणार नाही की फक्त सरकारवर जबाबदारी ढकलून आपण सुरक्षीत होणार नाही. दुसरा मुद्दा वेगळ्या चर्चेचा विषय आहे. पण पहिला मुद्दा भयानक आहे. दरवेळी जेंव्हा अशी एखादी घटना घडते तेंव्हा आपण खडबडुन जागे होतो. प्रसारमाध्यमे तर एकदम फॉर्मात येतात. पुढचे काही दिवस सगळेच जण याच विषयांवर तावातावाने बोलताना दिसतात. पण हे सगळ कालांतराने थंडावत ते पुढची आणखी मोठी/विदारक घटना घडे पर्यंत. मग तपास, परत सगळं तेच. यात आपण काय भुमिका घेतो? फक्त बघ्याची. हे मान्य आहे की समाजाची स्मृती ही एकदम कमकुवत असते. समाज सगळ्या गोष्टी विसरतो पटकन. जरी विसरला नाही तरी विषय पाठिमागे पडतात. पण हे सगळं सुरक्षा विषयक गोष्टींमध्ये नको व्हायला. मग हे सगळं कस साध्य करायच? तुम्हाला काय वाटत? मला वाटतं की सुरक्षा विषयक समाज जागृती ही एकदम प्रभावी असायला हवी. हि जागृती म्हणजे जीवाची भीती बाळगुन घरात कोंडून घ्या असे नकीच नाही. भारताचा प्रत्येक नागरिक जर सुरक्षेच्या बाबतीत जागरुक रहायला हवा असेल तर काय उपाय करता येतील? या चर्चेत जे मुद्दे अपेक्षीत आहेत ते हेच आहेत? कशा प्रकारे लोकांना सतत जागृत ठेवता येईल? तुम्हाला काय सुचते आहे? मी माझे मुद्दे मांडेनच, आपण सर्वांनीही आपले मुद्दे मांडा.

लेखनविषय: दुवे:

Comments

प्रतिसाद

उत्तम विषय. मुख्य म्हणजे , भडकलेल्या भावना काहीशा शमल्यावर , एकंदर लोकांवर हळुहळू नैष्कर्म्याची छाया पडायला लागल्यावर हे छेडणे जास्त योग्य.

९/११ नंतर अमेरिकेने जे केले त्याच्या काही अंशी घडायला हवे आहे असे मला वाटते.

१. मोठ्या प्रमाणावर फोन टॅप केले जातात. त्याबद्दल गहजबही झालाच. भारतात प्रायव्हसी राईट्स् वगैरेची कुणाला पर्वा आहे का नाही याची मला कल्पना नाही. पण इतक्या मोठ्या प्रमाणात टॅपीन्ग करणारी यंत्रणाच अस्तित्त्वात नसेल अशी मला शंका आहे.

२. डीपार्टमेंट् ऑफ होमलॅंड् सेक्युरीटी ही एक मध्यवर्ती संस्था अस्तित्वात आली. सरकारच्या जवळजवळ प्रत्येक खात्याला या विभागाच्या खाली यावे लागले. संकटकालात ताळमेळ राखण्याकरता हे होणे बहुमूल्य ठरते.

अमेरिकेची कॉपीच करावी असे माझे म्हणणे नाही. पण इतरांकडून शिकायला हरकत नसावी.

सहमत

अमेरिकेची कॉपीच करावी असे माझे म्हणणे नाही. पण इतरांकडून शिकायला हरकत नसावी.

मुद्दा अमेरिका कि इंग्लंड कि जर्मनी असा नाही. दहशतवाद मुळापासून उखडला गेला असं होणं मला तरी अशक्य वाटत कारण शेवटी तो विचारांवर घडलेला आहे. पण एखाद्या समाजाचे आणि आपले काही सामायिक मुद्दे असतील तर असे शिकणे कधी ही चांगलेच. पण अंधानुकरण नको. कारण सगळेच उपाय जसेच्या तसे लागु पडणार नाहीत.

डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरीटी (डिएचएस)

अमेरिकेने डिएचएस अस्तित्वात आणायच्या आधी फेडरल इमर्जन्सी मॅनेजमेंट ऍथॉरीटी (फिमा) हे एफबीआय, सीआयए, स्थानीक सुरक्षा अधिकारी आणि अग्निशमन दलाबरोबर काम करायचे. फिमा हरीकेन कट्रीना नंतर एक विनोद झाला असला तरी त्याचे कारण त्यावेळचे नेतृत्व होते. पण ९/११च्या आधी, डिएचएस स्थापनेपुर्वी, त्यांनी अतिरेकी हल्ल्यासंदर्भात सर्व स्थानीक स्वराज्य संस्थांच्या सहभागाने सर्वत्र (प्रत्येक ठिकाणी) अतिरेकी हल्ला कसा/का/कुठे घडू शकेल इत्यादीवर माहीती संकलीत केली होती, त्याला उत्तर कसे देयचे यासंबधात पण अभ्यास करायला लावला होता. न्यूयॉर्क शहराचे आराखडे काही विशेष चुकले नव्हते तरी देखील एक महत्वाची चूक झाली म्हणजे हल्ला कुठे होऊ शकतो हे समजत असूनही (व्हल्नरेबिलीटी असूनही) वर्ल्ड ट्रेड सेंटर मधेच इमर्जन्सी रीस्पॉन्सचे मुख्यालय ठेवले.

अर्थात तरी देखील अनेक चुका झाल्या, प्रामुख्याने विविध विभागांतर्गत असलेला विसंवाद हे त्याचे कारण होते. अमेरिकेचे एक वैशिष्ठ्य असे आहे की करेक्टिव्ह ऍक्शनला येथे महत्व आहे. चुका झालेल्या विसरल्या नाहीत तरी पुढे जाताना त्यावरून डोळस धडा शिकण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळेच डिएचएस जसे तयार झाले तसेच आता देशभर संवाद कसा साधावा, त्याच्या विविध पातळ्या, इत्यादीसंदर्भात आता परीक्षा आणि शिक्षण तयार केले गेले आहे. त्याचा उपयोग केवळ अतिरेकी आणि दहशतवादी कारवायांना तोंड देण्यासाठीच नाही तर इतर वेळेस जेंव्हा गंभीर दुर्घटना घडू शकतात तेंव्हा देखील त्याचा उपयोग होऊ शकतो.

त्यामुळे नुसते नविन खाते तयार करून काही होणार नाही पण सिंहावलोकन करून आधिच्या चुकातून राजकारण मधे न आणता शिकण्याची जबाबदारी सर्वांची आहे असे मला वाटते. अर्थात हे पटकन होणार नाही कारण त्यासाठी मानसीकता खूप बदलावी लागेल... अभी दिल्ली बहोत दूर है!

सर्वसामान्यांना शक्य असलेले....

गर्दीच्या ठिकाणी बाँबस्फोट करुन संहार करण्याचे प्रकार भारतात वेळोवेळी घडलेले आहेत.
लोकलमध्ये प्रवास करताना सुरुवातीलाच ती पूर्ण रिकामी असल्याची खात्री करणे. रॅकवर ठेवलेलं सामान/बॅगा ज्या कुणाचं आहे त्याने उतरताना बरोबर घेतल्याची खात्री करणे . एकट्या दुकट्याने असं करण्याऐवजी डब्यातल्या सगळ्या लोकांना, रोज ही तपासणी करायला दोन मिनिटंही लागणार नाहीत
सार्वजनिक ठिकाणी एखाद्या व्यक्तीचे वर्तन संशयास्पद वाटल्यास संबंधितांना कळवणे असाही उपाय करता येईल.
मी स्वतःपासून अशी सुरुवात केलेली आहे.

-(सामानावर लक्ष ठेऊन असलेला) सौरभ.

==================

'उलट ही लेणीबिणी, ताजमहाल लवकर फुटून जाईल तर बरं. काहीही कायम करायला बघणं म्हणजे मूर्खपणा आहे.'

क्या बात है!!

अशीच सुरुवात व्हायला हवी स्वतः पासुन. मुंबई सारख्या ठिकाणी लोकलमध्ये प्रत्येकाने बिनवेषातल्या पोलिसाप्रमाणे भुमिका केली तर मस्तच. याचा अर्थ एकमेकांवर संशय असा नाही. तर सतर्कता हाच असायला हवा.

आपल्या आर्थिक व्यवहाराची कल्पना द्यावी.

घरातील आपल्या सहसदस्यांना आपल्या आर्थिक व्यवहाराची पूर्ण कल्पना द्यावी.( जीवन बिमा निगम, भविष्य निर्बाह निधी, बचत पत्रे इत्यादी).

आपण कधी अशा ठिकाणी सापडल्यास न घाबरुन जाता कोपर्‍यामधे जावे. चेंगराचेंगरीत अडकण्याचा शक्यता असते.

लिफ्टचा वापर करु नये.

अफवा पसरवु नये, मानसिक तोल जाणार नाही याची काळजी घ्यावी.

पोलिसांच्या कामात अडथळे होईल असे वागु नये.

घरातील लहान मुलांसमोर, वृद्धांसमोर घटनेतील भयानकता, वर्णने करु नये.

आपल्या आप्तस्वकिय, मित्र, नातेवाईक यांचा बळी गेलाच तर आता त्यांचे कसे होणार अशी चर्चा घरच्यासमोर करु नये.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपले आंतरिक सामर्थ्य वाढवण्यासाठी प्रार्थना, जप याचाही उपयोग करणे.

अतिशय महत्वाचे...

पोलिसांच्या कामात अडथळे होईल असे वागु नये.

अतिशय महत्वाचे आहे. ही सामाजीक शिस्त आहे. जेंव्हा एखादा "क्राईम सीन" असतो तेंव्हा त्या भागात जायला बंदी हवी त्यासाठी पण पोलीसांना ठेवणे महत्वाचे वाटते. नरीमन हाउसपासचा गोंधळ आणि कसाबला पकडतानाचा म.टा. मधे दाखवलेला गोंधळ बघता हे जास्तच वाटते.

भारतात आणि इतर युरोप/अमेरिकेत घडणार्‍या/घडू शकणार्‍या अतिरेकी घटनांमधील फरक इतकाच असू शकतो की अतिरेकी हे जर मध्यपूर्व आणि पाकीस्तानातील आहेत असे समजले तर ते ओळखणे इतर देशात भारतापेक्षा कधिही जास्त सोपे जाते. भारतात पोलीसांना ३ दिवस दहशतवाद्यांशी सामना करायला लागायचे एक कारण असेही सांगितले जाते, की ह्या दहशतवाद्यांना सर्व चेहर्‍यातून शोधणे अवघड जात होते.

सामाजीक शिस्त

सामाजीक शिस्त हा भारतात मोठा सामाजीक चेष्टेचा प्रकार आहे. मुळात शिस्तच मान्य नाही लोकांना. तेथे पुढे बोलणेच खुंटते.

सहमत आहे.

सामाजीक शिस्त हा भारतात मोठा सामाजीक चेष्टेचा प्रकार आहे. मुळात शिस्तच मान्य नाही लोकांना. तेथे पुढे बोलणेच खुंटते.

लोकांना एखाद्या घटनेची इतकी उत्सुकता असते की विचारु नका ( जिज्ञासा असावी पण प्रसंगाचं भान असावं ना ) जे काय घडेल त्या घटनेचे प्रत्यक्ष साक्षीदार होण्यासाठी जनु काही चढाओढ लागलेली असते. त्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागते, हे मात्र खरं आहे.

-दिलीप बिरुटे

प्रत्यक्ष साक्षीदार

जे काय घडेल त्या घटनेचे प्रत्यक्ष साक्षीदार होण्यासाठी जनु काही चढाओढ लागलेली असते.

हे मात्र खरे आहे. त्यापेक्षाही गंमत म्हणजे प्रत्यक्ष साक्ष द्यायच्या वेळी सगळे मुग गिळुन गप्प.

जागरुकता

जागरुकता निर्माण करण्याविषयी सर्वांचे एकमत असते. शासन ,नागरिक, लोकप्रतिनिधी वगैरे . आता जागरुकता दाखवणार्‍या नागरिकाकडे "कटकट्या" म्हणुन इतर नागरिक शासकीय यंत्रणा पहात असते. कारण त्याच्या जागरुकतेतुन निर्माण झालेले बाळंतपण हे त्यांना कराव लागत. त्यामुळे त्याची जागरुकता ही संवेदनाहीनतेत कशी रुपांतरीत होईल हेच पहात असतात. तुमची जागरुकता ही अनाठायी भीती आहे अस सांगुन तुम्हालाच विकृतीच भय दाखवतात. कधी तुमच्या जागरुकतेची परिणिती ही तुमच्या नुकसानीत करुन तुमची जागरुकता ठेचुन टाकतात. कुणाला हे विचार निगेटिव्ह थिंकिंग वाटु शकतात. केवळ जागरुकता चालणार नाही ती पेलण्याची क्षमता आपल्यात निर्माण झाली पाहिजे. अर्थात त्यासाठी किंमत मोजली पाहिजे.
प्रकाश घाटपांडे

कटकट्या..

आता जागरुकता दाखवणार्‍या नागरिकाकडे "कटकट्या" म्हणुन इतर नागरिक शासकीय यंत्रणा पहात असते. कारण त्याच्या जागरुकतेतुन निर्माण झालेले बाळंतपण हे त्यांना कराव लागत.

एव्हढे सामान बँगांमधे घेऊन कुठे निघालास असे दोन तरूण दिसणार्‍या मुलांना धक्क्यावर एका कोळीणीने विचारले आणि ते मग्रुरीत दुर्लक्ष करून निघून गेले. त्या बाईने जाऊन पोलीस ठाण्यावर सांगितले पण "कटकटी" समजत दुर्लक्ष केले गेले...

त्याही आधी म.टा. मधील एका बातमीनुसार (दुवा मिळाल्यास देईन), डोंबिवलीतील एका विद्यार्थीनीच्या मुस्लीम मित्राने, जीने तीला एसएमएस करून सगळे सोडून जात आहे असे आधी सांगितले होते आणि ऑक्टॉबरच्या शेवटाला रेल्वेतून प्रवास करू नकोस म्हणून एक "हितचिंतक" म्हणून एसएमएस पाठवला... तीने नागरी कर्तव्य करत पोलीसांना सांगितले, पण कटकटी असल्याने दुर्लक्ष केले. परीणामी काय झाले ते माहीत आहेच....

आता थोडे अमेरिकेतीलः अमेरिकेतील म्हणून आदर्श समजू नका पण घेण्यासारखे नक्कीच वाटते म्हणून लिहीत आहे. (इथला आचरटपणा पण संगू शकेन पण ते विषयांतर होईल, म्हणून नंतर कधी तरी!)

९/११ च्या नंतर लगेचच ऍन्थ्रॅक्स ह्या जैविक रसायनाच्या भुकटीने काही जणांचे प्राण घेतले. (कालांतराने समजले की ते एका अमेरिकन शास्त्रज्ञाच्या विकृतीचे काम होते/दहशतावादी हल्ला नव्हता. ह्या शास्त्रज्ञाने नंतर आत्महत्यापण केली). माणसे खूप घाबरायला लागली. काही वेळेस ऍबॉर्शन क्लिनिक्स वर खोटी भुकटी पाठवून हल्ले चालू झाले, काही वेळेस सामान्यांकडून पोलीसांना फोन येऊ लागले. एकदा तर एका शहराचा पोलीस महाव्यवस्थापक एका होमलँड सिक्युरीटीच्या आधिवेशनात वैतागून म्हणाला की, "८० वर्षाच्या सामान्य बाईच्या घरी डिव्हीडी प्लेयरच्या जवळ, कोणी तरी खिडकीतून उडी मारून येऊन अँथ्रॅक्सची पांढरी भुकटी कशाला टाकणार आहे? अथवा एखाद्या गाडीत जर पांढरी भुकटी पायाखाली दिसली तर ती तुम्हीच आधी खाल्लेल्या डोनट्सची नसेलना याचा कधी विचार करतात का?" तरी देखील अशा गोष्टींकडे दुर्लक्ष न करता, तेथे जाऊन तपासणी होत होती. बाकी काही नाही मिळाले तरी त्यातून पोलीस, फायर कर्मचार्‍यांना आपोआप सवय (प्रॅक्टीस) होत होती, अशा हल्ल्याच्या वेळेस कसे जावे, कसे पहावे आणि यंत्रणे अंतर्गत संवाद कसा साधावा...

सहमत

प्रतिसादांशी सहमत आहे. आणखीही उपाय सुचतील पण वर मांडलेला सामाजिक शिस्तीचा मुद्दा महत्वाचा आहे असे वाटते. आणि हे लोकांना पटवून कसे द्यायचे हे सर्वात कठीण काम आहे. कारण जोपर्यंत लोकांना आतून असे वागण्याची इच्छा होत नाही तोपर्यंत यातील सहभाग मर्यादित राहील असे वाटते. याची कित्येक उदाहरणे रोज दिसतात. बसला रांग न लावणे, वाट्टेल तिथे, वाट्टेल तशी अस्वच्छता करणे. वाहतुकीचे नियम पाळणे हाच एक विनोद असतो. आणि पुन्हा आम्ही असेच वागणार, काय करायचय करून घ्या असे याचे समर्थनही होते.

----
"This is Linus Torvalds. I announce Linux."

वाहतुकीचे नियम

पुण्यात तर वाहतुकीचे नियम न पाळणे हाच एकमेव वाहतुकीचा नियम आहे असे वाटते. जो पाळायला जातो तो जगावेगळे काहीतरी करतो आहे असे वाटुन तो सुद्धा हळूहळू जगा सोबत जाऊ लागतो.

प्रत्येक

देशाचा प्रत्येक नागरिक असा जागरूक राहणे ही अपेक्षा असली तर ती पूर्ण होणे हे अशक्य नाही तरी कठीण आहे. पण ज्यांना ही समज आहे, किंवा हे प्रश्न महत्त्वाचे वाटतात, त्यांनी ते वेगवेगळ्या माध्यमांद्वारे (न कंटाळता) लोकांपुढे मांडत राहणे महत्त्वाचे.

प्रभावी उपाय

सर्व प्रथम प्रतिसाद देणार्‍या सर्वांचे आभार. अनेक चांगले मुद्दे आले आहेत. अमेरिकेसारख्या देशात केले जाणारे सरकारी उपाय सुद्धा काही प्रमाणात कळले. मी माझी काही मते देत आहे.

  1. भारताचा एकूण विस्तार, प्रत्येक पातळीत मुरलेला भ्रष्टाचार, धार्मिक/जातीय विविधता, सरकारचा धर्मनिरपेक्षपणा आणि लोकसंख्या, या आणि अशा मुद्यांचा विचार केल्यास भारतात कुठे ही, कधी ही कोणतेही दहशतवादी कृत्य करणे फारसे अवघड नाही. पण त्यामुळे प्रत्येकाने घाबरुन जगावे असे सुद्धा नाही. अथवा एकमेकांकडे शंकेने पहावे असे ही नाही. तसेच असे हल्ले पुर्णपणे टाळणे सुद्धा शक्य नाही.
  2. अनेक चर्चांमध्ये एक मुद्दा येतो की सगळे मुसलमान अतिरेकी नसतात पण सगळे अतिरेकी मुसलमान असतात. हा मुद्दा खोडण्यासाठी आपल्याकडे जोरदार प्रयत्न झाले. पण असे प्रयत्न होण्या ऐवजी भारतात राहणार्‍या मुसलमानांना आधी मनाने भारतीय मुसलमान बनवणे गरजेचे आहे. त्यामध्ये राजकारण न आणता खरेखुरे प्रयत्न होणे गरजेचे आहे. हा झाला एक तात्विक आणि दिर्घ पल्ल्याचा उपाय.
  3. रोजच्या सुरक्षेसाठी सर्वांनीच सावध राहणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रत्येक क्षणी सावध असणे हे महत्वाचे. नाहीतर एखादी घटना घडते. मग त्यासाठी उपाय योजनांची जोरदार चर्चा. मग त्यासाठी अहवाल. उपाय योजनांसाठी आर्थिक तरतुद. त्याच्या अंमल बजावणीमध्ये भ्रष्टाचार. हे सुरुच राहते आणि सामान्य भारतीय नेहमीच लक्ष साधायला सोपा बनतो. या सर्व निराशाजनक चित्रात काही सोपे आणि कमी खर्चिक उपाय सुद्धा आहेत.
  4. भारतात साक्षरते बद्दल, पल्स पोलिओसाठी ज्या प्रकारे लोकजागृती करण्यात आली त्याच प्रकारे अशा प्रकारच्या हल्ल्याच्या वेळी सावध कसे असावे? साधे सोपे उपाय करुन आपण अतिरेक्यांना कसे हेरु शकतो या बद्दल सतत जाहिरातीं द्वारा लोकजागृती करणे अशक्य नाही. त्यामुळे लोकांच्या मनात सदैव सावधानतेची भावना राहिल. सर्वात लोकप्रिय मालिका, बातम्या, चित्रपट गृह आणि अशी सर्व ठिकाणे जेथे लोकांना लक्ष करणे शक्य आहे अशा सर्व ठिकाणी सतत लोकशिक्षण देणार्‍या जाहिराती, फलक लावणे सुद्धा शक्य आहे. नेते मंडळींच्या वाढदिवसाला शुभेच्छा देणार्‍या फलकांपेक्षा असे फलक लोकांची निदान मदत तरी करतील.
  5. या प्रकारच्या प्रसारणांमध्ये लोकांना अनेक सुचना देता येतील. जसे की, आपल्याला संशयास्पद - अनोळखी व्यक्ति दिसल्यास काय करावे? आपले घर भाड्याने देताना काय करावे? इत्यादीची माहिती देणे सहज सोपे आहे. अशी प्रसारणे सतत झाल्यास लोकांमध्ये आपोआपच स्वतःची सुरक्षा करण्याची भावना तयार होईल.
  6. प्रत्येक घरातला, गल्लीतला भारतीय जर सर्व प्रकारे सुरक्षा जागरुक झाला तर असे हल्ले होताना दहशतवादी अनेकदा विचार करतील. एका हल्या नंतर काही काळ जागरुक राहणार्‍या भारतीया पेक्षा सदैव जागरुक राहणारे भारतीय बनवणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे.
 
^ वर