व्यथा -३

व्यथा - ३
व्यथा कोणाला टळल्या आहेत ? श्री.तुकाराम महाराजांनी म्हटले आहेच की दु:ख पर्वताएवढे ! पण असे हे पर्वताएवढे दु:खही माणसे सहन करतात. पूर्व संचित म्हणतात, पुढे चांगले दिवस येतील याची आशा करतात, जगतात, एक दिवस मरून जातात. मागचा चार दिवस शोक करतो, परत आपल्याच दु:खात गढून जातो.शेवटी येऊन जाऊन पाच पन्नास वर्षांचा छोटासा कालावधी. गणपत वाण्यासारखी माडी बांधावयाची दिवास्वप्ने बघता बघता आयुष्य संपते, ... आणि व्यथाही !
पण व्यथा काही फ़क्त व्यक्तींच्याच असतात असे थोडेच आहे ? व्यथा समाजाच्याही असू शकतात. व्यक्तिगत व्यथा पाच पन्नास वर्षात संपते पण समाजाची व्यथा इतक्या लवकर संपणारी असेलच असे नाही. आपल्याकडील अस्पॄष्य म्हटला जाणारा समाजाचा एक मोठा भाग, मोठा कसला, बहुसंख्यच म्हटले पाहिजे, शेकडो वर्षे ज्या परिस्थितीत जीवन जगत होता त्या स्थितीतल्या त्यांच्या व्यथांचा विचार कोणी केला का? व्यथा एका व्यक्तीच्या नव्हत्या; त्याच्या बरोबर त्याच्या आई-वडीलांच्या, बहिण-भावाच्या, मुला-
मुलींच्या सर्वांच्याच होत्या. आणि त्यांचे पदरही नानाविध होते. कुटुंबाबाहेर त्याने पाहिले तर सांत्वन करेल असा कोणीतरी नजरेस पडणेही अवघड होते. सगळेच गर्तेत कोसळलेले. कोण कोणाला हात देऊन वर काढणार ? आधार मिळाला तर माणूस मोठ्या दु;खावरही मात करू शकतो. पण सर्वस्वी निराधार माणसाने काय करावे ? " जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे " काव्यात ठीक आहे, प्रत्यक्षात आम्ही तर त्यांचा देवही पळवला होता ! देवळात प्रवेश दूरच राहिला, दर्शनही दुर्लभ करून ठेवलेले. " धाव धाव विठु आता, चालू नको मंद " मार खाता खाता चोखा फ़क्त एवढाच आक्रोश करू शकत होता ! सर्वत्र घनदाट काळोखच काळोख. व्यथा व्यक्त करावयालाही वाव नव्हता.
ठीक आहे. थोडे मोठे मन करून म्हणू की मध्ययुगात अस्पृश्य अन्यायाचे बळी होते तर उच्चवर्णीय अज्ञानाचे. अरे, पण आता विसाव्या शतकातही तीच परिस्थीती ? अजूनही विठ्ठल दर्शनाकरिता उपोषण करावयाची पाळी यावी ? जरा चांगले रहावयाचे ठरवले म्हणून सगळ्या कुटुंबाचा बळी जावा ? पण नाही कसे म्हणावे ? थोडासा बदल होत आहे. आता मारूती कांबळेचा आक्रोश बाहेर पडावयाच्या आधीच गाडला जात नाही. १९६०च्या सुमारास विद्रोही कविता वाचावयास मिळू लागली. सुरवातीला शिवीगाळ, तिखटजाळ शब्द होते,
आपण ज्याला अभिजात [classic] म्हणतो असे काव्यगुण, अलंकार, नव्हते, पण उत्स्पुर्तता होती, स्फ़ोट होता पण सच्चाई होती, बोली भाषा लेखनात येत होती. मराठी संमृध्द होत होती. आणि थोड्याच दिवसात विद्रोही कविता स्व:ताच्या गुणांनी सर्वमान्य होऊ लागली. श्री. यशवंत मनोहर यांनी १९७७ ला प्रकाशित केलेल्या "उत्थानगुंफ़ा " या कविता संग्रहातील एक कविता

कालचा पाऊस आमच्या गावात आलाच नाही
सदरहू पीक आम्ही आसवांवर काढले आहे.
कालपर्यंत पावलांनी रस्त्यांपाशी तक्रारी मांडल्या नाहीत
झाडे करपली, माथी हरपली.
नदीच्या काठाने सरण शोधीत फ़िरलो
आयुष्याच्या काठाने सरण नेसून भिरभिरलो
... कालचा पाऊस आमच्या गावात आलाच नाही.
उत्थानगुंफ़ा[१९७७]

व्यथा श्री.यशवंत यांची एकट्याची नाही. गावकुसाबाहेरच्या उपेक्षित समाजाची आहे. हा समाज शेकडो वर्षे दुर्लक्षित आहे, दारिद्र्यात पिचत पडला आहे. आता स्वातंत्र्य मिळाल्यावर माफ़क आशा वाटू लागली की आता तरी थोडे बरे दिवस येतील. पंचवार्षिक योजनांमधून पडणारा समृध्दीचा पाऊस आपलीही शेते भिजवेल. पण कसले काय, पाऊस वेशीबाहेर आलाच नाही. गंगा गावातच अडकून राहिली. पीके काढण्यासाठी फ़क्त डोळ्यातील आसवेच उपयोगी पडली. आयुष्यातील वणवण भटकंतीत कधी तक्रारी मांडल्या नव्हत्या. नाहीतरी कोणाकडे मांडावयाच्या होत्या म्हणा. नदीच्या काठाने फ़िरलो.. स्वत;चे सरण शोधावयाला ! पाणी इतरांकरताच होते. जगलो तरी कसे जगलो ? मढ्याने जगावे तसे, तेही काठाकाठाने. आनंदाची कल्पनाच करणे अवघड तेथे आयुष्यात झोकून काय देणार ? शेवटी हातात आलेले दाहक सत्य काय होते ? कालचा पाऊस आमच्या गावात आलाच नाही !
सुरवातीचा विद्रोही कवितेमधील उद्रेक आता नाही दिसत. दिसते फ़क्त विषण्णता. असहाय्यता. दारूण निराशा. सर्व आयुष्याचा जमाखर्च [की वजाखर्च ] संयत भाषेत मांडला आहे. अस्सल गावरानी शब्दात. येथे कुसुमे कोमेजत नाहीत, झाडे करपतात. नदीच्या काठी फ़िरावयाचे ते " पाठीवरील मोकळे केस " पहावयास नाही, सरण शोधावयाला. रस्त्यावर काटे आहेत पण अनवाणी पावलांनी तक्रार करावयाची नाही.

उत्थानगुंफ़ा एक सुरेख संग्रह आहे.शिरवाडकर, पु.ल., कुरुंदकर, रा.ग.जाधव आदी मान्यवरांनी भरभरून कौतुक केले आहे. अवष्य वाचा.

शरद

Comments

वा!

उत्थानगुंफ़ा! वाचनाचा परीघ (गावकुसाबाहेर) वाढवताना काहि अनिवार्य पुस्तकांमधे समाविष्ट करावा असा हा संग्रह..

एका छान कवितेच्या उदाहरणातून घेतलेला संग्रहाचा नेटका वेध आवडला..

ऋषिकेश
------------------
जगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणारे आणि न समजणारे

उत्तम

उत्थानगुंफेची नेटकी ओळख करून दिलीत. या कवितेबद्दल प्रथम 'आहे मनोहर तरी'मध्ये वाचले होते, तेव्हापासून हा संग्रह वाचायचे ठरवतो आहे. तुमच्या लेखाने पुन्हा त्या संकल्पाची आठवण करून दिली.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

विद्रोही कवीची कविता

यशवंत मनोहरांची 'कालचा पाऊस आमच्या गावात आलाच नाही' कविता खूपच आवडते.
बी.एच्या अभ्यासक्रमात बरेच वर्ष ही कविता होती.
बाकी उत्थानगुंफ़ा संग्रह वाचायचा आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुंदर

प्रतिसादांशी सहमत. सुरेख विवेचन.

----

धन्यवाद..

धन्यवाद शरद! आपल्या लेखामुळे पुस्तक मिळवून वाचावे म्हणतो.

-सौरभ.

==================

'प्रत्येक प्रियकरानं आपापली प्रेयसी मारुन टाकून तिच्या कातड्याचा डफ करुन त्यावर प्रेमगीतं म्हणावी. एरव्ही नुस्तं प्रेम हे ठीक आहे.'

 
^ वर