जपानी उद्योजकांची ग्राहकाभिमुखता

उद्योगक्षेत्रांत जगांत आग्रगण्य असलेल्या जपान्यांची व्यावसायिक विचारसरणी कशी ग्राहकाभिमुख असते त्याचे किस्से:

एका जपानी कंपनीचं कपडे धुण्याचं यंत्र (वॉशिंग् मशीन) प्रसिद्ध होतं. त्या कंपनीनी आपल्या मशीनमध्ये आणखी काय सुधारणा करता येईल हे पाहण्यासाठी आपल्या जगभरच्या वितरकांना आपापल्या प्रदेशात सर्वेक्षण करून गिर्‍हाइकांच्या काही तक्रारी आहेत का ते पहायला सांगितलं. त्याप्रमाणे वितरकांनी आपापला अहवाल कंपनीच्या मुख्यालयाकडे पाठवला. त्यांत फक्त एका गिर्‍हाइकाकडून 'मशीन अगदी बेकार आहे. काही कामाचं नाही ' अशी तक्रार आली होती. ते गिर्‍हाइक म्हणजे दक्षिण अमेरिकेतला एक शेतकरी होता. कंपनीनी लगेच तक्रारीची चौकशी करण्यासाठी आपल्या अधिकार्‍यांना त्या शेतकर्‍याकडे पाठवलं. त्यांनी त्याला काय तक्रार आहे म्हणून विचारल्यावर तो शेतकरी म्हणाला, 'तुमचं मशीन माझ्या काही कामाचं नाही. ते बटाटे धुवत नाही'. त्यावर अधिकार्‍यांनी थोडा विचार केला नी ते शेतकर्‍याला म्हणाले, "तुमची तक्रार योग्य आहे. आम्ही या मशीनवर नुसतं 'वॉशिंग मशीन' असं लिहिलंय. त्यामुळे तुमचा गोंधळ उडणं स्वाभाविक आहे. आम्ही त्यावर "क्लोद्ज् वॉशिंग मशीन" असं लिहायला पाहिजे होतं."

आपल्याकडे? नवीन घेतलेल्या वस्तूबद्दल कंपनीकडे तक्रार केली की कंपनीचा माणूस "दुसर्‍या कोणाचीच अशी तक्रार नाही", "कंपनीची चूक नाही" इत्यादि गोष्टी सांगून "तुम्हीच नीट हाताळली नसेल, वापरली नसेल" असं सुचवत असतो.

जपानी उद्योजक मालाच्या गुणवत्तेच्या व वेळेवर पुरवठा करण्याच्या बाबतीत फार दक्ष असतात. एकदा एका अमेरिकन कंपनीनी जपानी कंपनीला ल्क्षावधी इलेक्ट्रॉनिक नगांची ऑर्डर दिली. त्यांत 'सदोष नग : दहा हजारात तीन' असं काहीसं संदिग्ध लिहिलं होतं. (ते 'दर दहाहजारी तीनपेक्षा ज्यास्त नाही' असं हवं होतं). ही ऑर्डर पुरी करायला कंपनीनी दिलेल्या वेळापेक्षा अधिक वेळ घेतला व मालाबरोबर एक क्षमायाचना करणारं पत्र पाठवलं. त्यात असं म्हंटलं होतं, " आपण ऑर्डर केलेला माल वेळेवर तयार होता. पण आपण दर दहाहजारी तीन सदोष नग सांगितले होते. आमच्याकडे सदोष नग तयार करण्याची व्यवस्था नसल्यामुळे ती करायला थोडा वेळ लागला. आपण ऑर्डर केलेले सदोष नग वेगळ्या खोक्यात पॅक केले आहेत.

आता आपल्याकडे काय होतं ते पहा :

एका कंपनीला मिश्रधातूपासून बनवलेल्या काही हजार नगांची ऑर्डर होती. त्यातील अटींप्रमाणे पूर्ण लॉटमधून रँडम् सँपल् म्हणून काढलेले तीन नग चाचणीत उतरणं आवश्यक होतं व तसं प्रमाणपत्र कंपनीनी द्यायचं होतं. सँपल् म्हणून काढलेल्या तीन नगांपैकी एखादा नगही चाचणीत न उतरल्याचं आढळल्यास पूर्ण लॉट रिजेक्ट् करायचा होता. माल ट्रकमध्ये भरल्यावर चाचणी केली नसल्याचं कंपनीच्या मॅनेजरच्या लक्षात आलं. चाचणी करून प्रमाणपत्र मालासोबत पाठवल्याशिवाय मालाचे पैसे मिळणार नव्हते म्हणून त्यानी (रँडम् नव्हे तर) वरवरचे तीन नग सँपल् म्हणून काढायला सांगितलं. ते तीन्ही नग चाचणीत उतरले नाही. म्हणजे पूर्ण लॉट रिजेक्ट् होत होता. पण मॅनेजरनी पुन्हा तीन नग काढायला सांगितले. तेही फेल् गेले. शेवटी चार-पाच वेळा प्रयत्न करून चाचणीत उतरणारे तीन नग मॅनेजरनी मिळवले व 'चाचणीत पास' असं प्रमाणपत्र तयार करून माल भरलेला ट्रक गिर्‍हाइकाकडे पाठवून दिला.

"धंदेमे उन्नीस-बीस तो चलताही है" हे आपलं बोधवाक्य आहे. पुढे 'उन्नीस-बीस'चं अठरा-बीस, पंधरा-बीस व शेवटी दस-बीस करायला वेळ लागत नाही.

काय म्हणता?

Comments

सहमत

तुमच्या म्हणण्याशी बर्‍याच अंशी मी सहमत आहे. तुम्ही दिलेल्या उदाहरणात तर 'चाचणीत पास' असं प्रमाणपत्र कंपनीनं स्वतःच द्यायचं होतं. म्हणजे खरं तर आयातदारानं आणि त्याच्या बँकेनं निर्यातदारावर खूपच विश्वास दाखवला होता. बर्‍याच वेळेस (विशेषतः आयातदार जर भारतीय निर्यातदाराकडून प्रथमच माल मागवत असेल तर) आयातदार निर्यातदाराला निर्यात करण्यापूर्वी तिर्‍हाईत निरीक्षण संस्थेकडून मालासाठी योग्य संख्या आणि योग्य गुणवत्ता प्रमाणपत्र घ्यायला सांगतो. एस जी एस ही अशा पद्धतीचं प्रमाणपत्र देणारी जगातली एक सर्वात विश्वासर्ह कंपनी. परंतू भारतात अशा निरीक्षण कंपन्यांचे अधिकारीही पैसे घेऊन निर्यातदाराच्या मनासारखं प्रमाणपत्र लिहून देतात. आणि म्हणूनच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपलं नाव खूप खराब आहे.

पण आता मागच्या चार पाच वर्षांमधे परिस्थिती झपाट्यानं बदलतीये. आपल्या विशेषतः निर्यातदारांना आता हे कळून चुकलंय की आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जर टिकाव धरायचा असेल तर मालाचा गुणवत्ता चांगला ठेवलाच पाहिजे, माल वळेवर पाठवलाच पाहिजे आणि मालाची अगदी कमीत कमीच किंमत मागितली पाहिजे. नाहीतर या बाजारपेठेतून बाहेर फेकलं जायला आपल्याला वेळ लागायचा नाही. आपल्या निर्यातदारांनीही त्यामुळे स्वतःची विश्वासर्हता बाजारपेठेत वाढवण्यासाठी पावलं उचलायला सुरुवात केली आहे. आणि याचा ठोस पुरावा म्हणजे चीनच्या पाठोपाठ वेगवान गतीनं वाढणारी आपली अर्थसत्ता. चीनी उत्पादनं त्यांच्या नीम्नोत्तम किंमतीमुळे सर्वात जास्त बाजारपेठ काबीज करतात पण गुणवत्तेबाबत जगभर आपली उत्पादनं त्यांच्यापेक्षा चांगली मानली जातात.

मिलिंद

भारतीय निर्यातदार

भारतीय कंपन्यांना माल निर्यात करून परदेशस्थ गिर्‍हाईकांशी संबंध प्रस्थापित करायचे असतील तर त्यांना मालाची प्रत प्रत्येक लॉटमध्ये समान ठेवणे गरजेचे झाले आहे.

एक अनुभव सांगायचा तर, आमचे एक मित्र अमेरिकेतील एका ट्रकचे उत्पादन करणार्‍या प्रसिद्ध कंपनीस काही लहान भाग पुरवतात. या कंपनीतील गाड्यांचे उत्पादन हे संपूर्ण ऑटोमेटेड आहे. म्हणजे यंत्रांतून असे भाग मोटारीच्या सांगाड्याला जोडले जातात. एकदा या कंपनीने यंत्रामध्ये हे लहान भाग भरले असता ते योग्यप्रकारे पुढे सरकेनात आणि अडकल्याने सुमारे दोन तासांचे काम ठप्प झाले. कंपनीने तो पूर्ण चार्ज (जो रुपयांत अनेक लाखांत होता) या आमच्या मित्राला आणि त्याच्या भागिदारांना भरायला लावला. जर अशाप्रकारचे काँट्रॅक्ट परदेशी कंपन्या करत असतील तर देशी उत्पादकांना मालाची प्रत अचूक ठेवणे भाग आहे.

मला वाटतं, इथे गिर्‍हाईक कोण आहे यावर अनेक भारतीय उत्पादकांचा व्यवहार चालतो.

वरीलप्रमाणेच गोष्ट जेव्हा अमेरिकेत खाद्यपदार्थ विकणार्‍या कंपन्यांबाबत येत असे तेव्हा बहुतांश गिर्‍हाईके ही भारतीय असल्याने मालाची प्रत घसरल्याचे पाहिले आहे. आशेचा किरण म्हणजे अनेक अमेरिकन ग्रोसरी स्टोर्स आता या भारतीय कंपन्यांशी व्यवहार करू लागल्याने मालाची प्रत घसरवण्याचा प्रयत्न या कंपन्या थांबवतील असे वाटते.

मायक्रोसॉफ्ट

लेख व प्रतिसाद यांच्याशी बर्‍याच अंशी सहमत आहे, एक सोडून. हे फक्त आपल्याकडेच होते असे नाही. आणि याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे मायक्रोसॉफ्ट. ग्राहकाला कस्पटासमान लेखणार्‍या कंपन्यांमध्ये ही कंपनी पहिल्या पाचात नक्कीच असेल. नेमकी उदाहरणे द्यायची तर लेखमालाही पुरणार नाही. फक्त व्हिस्टा इतके म्हटले तरी खूप झाले.
----

कारण

मायक्रोसॉफ्ट मधे बरेच भारतीय काम करतात असे ऐकुन् आहे.

 
^ वर