सामाजिक उपक्रम

आज समाजात जिथे केवळ भ्रष्ट राजकीय व्यवस्थेला शिव्या घालून आपली जबाबदारी टाळण्याकडे कल दिसतो, त्याचवेळी अनेक व्यक्ती व संस्था निरलस वृत्तीने काम करुन आपाआपल्या परीने 'सकारात्मक बदल' घडविण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशा अनेक संस्था आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये वाखाणण्याजोगे काम करीत आहेत. त्यांच्या कामामध्ये नावीन्य आहे, प्रयोगशीलता आहे आणि अगदी प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा प्रामाणिकपणे आपला समाजकार्याचा वसा चालू ठेवण्याची जिद्द आहे.

परंतु विविध संसाधनांच्या अभावी त्यांचे कार्य समाजाच्या व्यापक स्तरापर्यंत पोहचलेले नाही. संसाधने म्हणताना मला केवळ पैसा किंवा उपकरणे इतकेच मर्यादित अर्थाने म्हणायचे नसून या लहान संस्थांना तज्ञ मार्गदर्शनाची (mentoring), मनुष्यबळ प्रशिक्षण, इत्यादी बाबींचीही नितांत आवश्यकता आहे.

फुकटचे सल्ले देणं सोपं असतं असे विनोदाने म्हटले जाते, परंतु सामाजिक क्षेत्रात धडपडणार्‍या व विशेषत: सूदूर ग्रामीण भागात काम करणार्‍या संस्था व व्यक्तींना आज पैशांपेक्षाही त्यांच्या कार्याला योग्य दिशा देणार्‍या अनुभवी सल्ल्यांची / मार्गदशनाची आवश्यकता आहे.

इंटरनेट हे ज्ञानाचे भांडार आहे आणि आपल्या सर्वांचे सामायिक बलस्थानही आहे. आपल्या हातातील या शक्तीशाली माध्यमाचा उपयोग करुन आपण सामाजिक उपक्रमशीलतेला आपल्या पद्धतीने मदत करुया.

सामाजिक उपक्रमाच्या या समुदायामध्ये केवळ भारतातीलच नव्हे तर जगभरातील सामाजिक उपक्रमांच्या उल्लेखनीय कार्याची ओळख आपण करुन द्यावी अशी अपेक्षा आहे.

टूगेदर, वी कॅन मेक अ डिफरंस!

 
^ वर