शब्दकोडी ... लहान मुलांकरता

शब्द कोडी मुलांकरता
माझी धाकटी नात इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जाऊ लागली तेंव्हा सर्व आजी-आजोबांच्या मनात असते तशी [निरर्थक] भीती माझ्या मनातही निर्माण झाली " आता हीच्या मराठीचे काय ?" शेजारची मुले-मुली मराठीच होती पण तीही इंग्रजी माध्यमाच्या शाळेमधलीच! तेंव्हा आता ही जबाबदारी आजी-आजोबांचीच असे ठरवून एक ठरवले की तीच्याशी
बोलतांना आपण इंग्रजी शब्द टाळावयाचे. तीलाही तसेच सांगावयाचे. पण एवढे पुरेसे वाटले नाही. . वर्ष दोन वर्षे गेली. मग आम्ही एक निराळा खेळ सुरु केला. तीला तीन-चार अक्षरांचा मराठी शब्द द्यावयाचा व त्यापासून, त्यातील अक्षरे घेऊन निरनिराळे शब्द बनवावयाचे. उदा.मगर पासून मग, गर, मर, रग,गम वगैरे. सुरवातीला इंग्रजी-हिंदी शब्द करावयासही मुभा दिली. काही दिवस आम्ही शब्द देत असू व तीला शब्द बनवावयास सांगत असू. नंतर थोडा बदल केला.
शब्दकोड्यासारखे पहिल्या दोन अक्षरांपासून बनणाऱ्या शब्दाचे [clue]शोधसूत्र, तिसऱ्या व पहिल्या अक्षरांपासून तयार होणाऱ्या शब्दाचे शोधसूत्र , इत्यादी सांगावयाचे व तीने मुख्य शब्द ओळखावयाचा. उदा. तीन अक्षरी शब्द.पहिले व दुसरे अक्षर = गरम उबदार पांघरुण, दुसरे व तिसरे अक्षर = किल्ला, पहिले व तिसरे अक्षर = भोकाड पसर. उत्तर = रगड. तीचा उत्साह वाढू लागला. व आता तीच आम्हाला कोडी घालते.
परवा तीने आम्हाला घातलेली कोडी देत आहे. तुम्हीही सोडवा.
[१] तीन अक्षरी शब्द. पहिले व दुसरे अक्षर घेतले की एक पेय,पहिले व तिसरे घेतले की अनोळखी माणसाला आपण विचारतो तो प्रश्न, दुसरे व तिसरे घेतले की बारीक तुकडा.

[२] तीन अक्षरी शब्द. पहिले व दुसरे अक्षर घेतले की पक्षाचा आवाज, दुसरे व तिसरे घेतले की खाण्याचा पदार्थ, पहिले व तिसरे घेतले की रागवा, तिसरे व दुसरे घेतले की खेळी.

पोरखेळ कसा वाटतो ?
शरद

ता.क. तीचे नाव सांगावयाचे राहिलेच ! माणसाच्या प्राथमिक गरजा घेतल्या की तीचे नाव तयार होते.
शरद

लेखनविषय: दुवे:

Comments

खुपच छान.

मराठी अवनीवर असे प्रयत्न चालु आहे याचा वाचतांना खुपच आनंद वाटतो. शक्य असेल तर तिला एक मराठी शब्दकोष आणुन द्या.

वरदा प्रकाशनामध्ये ४/५ प्रकारचे शब्द कोष मिळतात.

वा! वा!

वा! वा! मस्त खेळ..

कोकण चा चिवडा अवनी ला आवडतो वाटतं :)

खेळ खूपच आवडला :)

(खेळकर)ऋषिकेश

हेच म्हणतो

मस्त रे...

आवडला

खेळ खूपच आवडला :)

असेच म्हणते! मुलांसाठी छान खेळ आहे हा. याचा प्रयत्न घरी करून पाहीन.

उत्तर

१. कोकण
२. चिवडा
तिचे नाव अन्न वस्त्र निवारा वरुन 'अवनि' असायला हवे. पण अवनि नसुन 'अवनी' आहे. कारण 'नि' मध्ये ईंटरनेटचा ई मिसळला आहे.

छान,

डोक्याला छानच शाब्दिक खुराक आहे, सदर आवडले! :)

तात्या.

--
शक्ति म्हणे आता, उरलो शब्दकोड्यापुरता! :)

अरे व्वा!

हा प्रकार कसा वाटला ते कळण्यासाठी हे कोडे सोडवावे लागेल.

शब्द: तीन अक्षरी.
पहिले दोनः अनेक चाकू
दुसरा व तिसरा: रेषा
पहिला व तिसरा: हे बर्‍याचदा जवाएवढे तर याचा काऊंटर पार्ट पर्वताएवढा असतो. ;-)

-भरसौदा.

============

'प्रत्येक प्रियकरानं आपापली प्रेयसी मारुन टाकून तिच्या कातड्याचा डफ करुन त्यावर प्रेमगीतं म्हणावी. एरव्ही नुस्तं प्रेम हे ठीक आहे.'

सुरेख!

मस्त खेळ हं! :-)

मोठ्यांसाठी

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
आपणा सर्वांची संमती गृहीत धरून एकच कोडे लिहितो.क्षमध्वम् !*
पहिले अथवा, ते सोडून दुसरे. तीनही घेतल्यास उपयोग होऊ शकेल.

(* व्याकरणानुसारः क्षमस्व = तू क्षमा कर. क्षमध्वम्= तुम्ही सर्वांनी क्षमा करावी.)

वापर?

याचे उत्तर 'वापर' का?

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

सुरेखच

शरदजी हा पोरखेळ भारीच.

घ्या अजुन एक

शब्द: तीन अक्षरी.
पहिले दोनः ओढणे
दुसरे व तिसरे अक्षर मिळुन: खाण्याची क्रिया
तिसरे व दुसरे अक्षर मिळुन: उभारणी[बांधणे,संगीत, कविता ]

हे नाव ऐकताच काहींचा तिळपापड होतो असे देखील ऐकण्यात आहे ;-)

हाहाहा

काय खेचताय राव आमची ! चरचरले ना आम्हालाही !

:)

हे नाव ऐकताच काहींचा तिळपापड होतो असे देखील ऐकण्यात आहे ;-)

चालायचंच! :)

कावळ्यांच्या शापानी खेचरं मरत नसतात अशी काहीशी म्हण आहे म्हणे! :)

असो, कोडं आवडलं..

आपला,
विसोबा खेचर.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

स्प्ष्टीकरण

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
इथे मोठ्यांसाठी एक कोडे देताना सर्वांची क्षमा मागितली त्याचे कारण संदिग्ध राहिले. ते कारण असे: श्री. शरद यांचा प्रारंभीचा लेख "लहान मुलांसाठी शब्द कोडी" असा आहे. त्यांनी त्याला पोरखेळ असेही म्हटले आहे. इतरांनी दिलेले प्रतिसाद आणि कोडीही शीर्षाकाला समर्पक आहेत. अशा स्थितीत त्यात मोठ्यांसाठी असलेले कोडे घुसवणे हे अतिक्रमण आहे. त्याकरिता क्षमा मागणे आवश्यक वाटले.

वापर

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्रीं. नंदन यांनी दिलेले कोड्याचे उत्तर अगदी बरोबर आहे. मात्र "याचे उत्तर 'वापर' का?"
असे लिहिण्यापेक्षा "याचे उत्तर 'वापर' आहे." असे लिहिणे अधिक योग्य दिसले असते.

मजा

नंदन यांनी उत्तर दिले असते, तर वरील टिप्पणी योग्य मानावी. नंदन यांनी प्रश्न विचारलेला दिसतो. त्या प्रश्नाचे उत्तर "होय, उत्तर 'वापर' आहे" किंवा "नाही, उत्तर 'वापर' नाही" असे कोणीतरी द्यावे.

मजा सोडल्यास : मला वाटते की प्रश्नाचा आदरार्थक वापर प्रसिद्ध आहे. "येऊ का आता?" किंवा "बसूया का जेवायला?" अगदी प्रश्नार्थक हेलाने बोलले जातात. पण संदेशन "येतो", किंवा "बसूया जेवायला" असे साधे विधानात्मकच होते.

कोडे छानच आहे, ते सांगणे नलगे.

वापर

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
'वापर'हे उत्तर श्री. शरद यांनीही कळविले आहे.

प्रश्नार्थक उत्तर

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
"...... प्रश्नाचा आदरार्थक वापर प्रसिद्ध आहे." असे श्री. धनंजय म्हणतात ते खरेच आहे.पण श्री. नंदन यांचे उत्तर वाचून त्यांच्या मनात उत्तराविषयी संदेह आहे की काय असे वाटण्याचा संभव आहे म्हणून लिहिले.

 
^ वर