हा लेखन प्रकार कोणता?

दिनांक २६ ऑक्टोबर २००८ च्या रविवार सकाळात (सप्तरंग पुरवणी) "ज्ञानदेवांची दिवाळी" या शीर्षकाचा एक लेख छापला आहे.त्यातील एक सलग परिच्छेद असा:

".....पंचतारांकित बंगल्याला दिव्याचा झगमगाट असेल, तर स्वच्छ सारवलेल्या जमिनीवरला प्रकाश द्रौपदीच्या जरतारी चिंधीला श्रीमंत करतो.मातीच्या पणतीचे सौंदर्य अभिजात असते.मातीचा गंध पणती भरभरून देते.पणती गोठ्यात ठेवली, की गाईच्या डोळ्यांतली काकड आरती लाघवी असते.पणती तुळशीवृंदावनापाशी लावली, की सासुरवास उजळतो नि तो साठा उत्तरांच्या कहाण्या सुफळ संपूर्ण करतो.तुळशी हीच सासुरवाशिणीची सच्ची प्रियसखी असते.माहेरवाशीण तुळशीपाशी पणती लावून बसली ,की आठवणी तिच्या पापण्यांच्या अंगणात उडायला लागतात.ती त्या अधिरपणे गोळा करू पाहाते.आठवणींचे थवेच्या थवे तिच्या मनाच्या ओसरीवर भुर्रदिशी उडतात...."

यातीलः
"स्वच्छ सारवलेल्या जमिनीवरला प्रकाश द्रौपदीच्या जरतारी चिंधीला श्रीमंत करतो."
"पणती गोठ्यात ठेवली, की गाईच्या डोळ्यांतली काकड आरती लाघवी असते."
अशा वाक्यांचा अर्थ मला समजत नाही. ती अर्थहीन वाटतात. किंबहुना असले सगळेच लेखन कृतक (कृत्रिम), निरर्थक वाटते.
आपले काय मत आहे?

लेखनविषय: दुवे:

Comments

लेखन सुकाळ

हा लेखन सुकाळाचा प्रकार आहे. तरीही यातुन वाचक नसला तरी लेखक घडत असतो.
प्रकाश घाटपांडे

मग

वरचे लेखन अगम्य आहे, पण ललीत लेखनाचे काही न्यूनाधिक चालायचेच. (हा लेख माहितीपर नसावा अशी माझी अटकळ आहे. तो तसा नसल्यास प्रश्नच मिटला!)
पण मग तुम्ही प्रवीण दवणे लिखित काहीच वाचू नका.
फार भयंकर असते ते.
' मागे चूकून सूर्य पेरणारा माणूस' हे त्यांच्या कडून लिहवून घेतलेल्या पुस्तकाचा काही भाग वाचला होता, त्यानंतर हिम्मत झाली नाही काही.
-निनाद

:-)

अशी वाक्ये लिहायला सोपी* पण कळायला अवघड आहेत असे वाटते.
दुव्यावर जाऊन सदर लेख पाहिला असता लेखाचा विषय प्रकाश आहे असे कळाले. परंतू यापलिकडे लेख नेमके काय सांगतो आहे याबद्दल डोक्यात काही प्रकाश पडला नाही. या दोन वाक्यांमधील प्रचंड विरोधाभास पाहून आमचा साहित्यिक अनुभव श्रीमंत झाला, त्याला पंख फुटले आणि तो आंतरजालीय गगनामध्ये मनसोक्त विहारू लागला. (इथे थांबावे हे बरे.)
इत्यलम!

*विश्वास बसत नाही? हा घ्या पुरावा.
"भाकरी भाजताना पिठाच्या परातीवर रेंगाळणारी मुंगी न्याहारीचा अनुभव श्रीमंत करते."
"पान खाऊन बाबांनी भिंतीवर केलेले रंगकाम पाहून मराठमोळ्या संस्कृतीचा अभिनव अधिनिवेश होतो."
"चार जीबी र्‍यामवरही लंगडणारे व्हिस्टा पाहून बिल गेटसच्या अपार वैभवाला वेगळीच झळाळी चढते."

----

हहलोपो.

"भाकरी भाजताना पिठाच्या परातीवर रेंगाळणारी मुंगी न्याहारीचा अनुभव श्रीमंत करते."
"पान खाऊन बाबांनी भिंतीवर केलेले रंगकाम पाहून मराठमोळ्या संस्कृतीचा अभिनव अधिनिवेश होतो."
"चार जीबी र्‍यामवरही लंगडणारे व्हिस्टा पाहून बिल गेटसच्या अपार वैभवाला वेगळीच झळाळी चढते."

मजा आली. कुठे मिळाली असली वाक्ये? की तुमची स्वतःची प्रतिभा?

(दुर्बोध लिहणार्‍यांचा तिटकारा करणारा आणि समीक्षा पुस्तकांपासूनही लांब राहणारा) सौरभ.

===================

'प्रत्येक प्रियकरानं आपापली प्रेयसी मारुन टाकून तिच्या कातड्याचा डफ करुन त्यावर प्रेमगीतं म्हणावी. एरव्ही नुस्तं प्रेम हे ठीक आहे.'

सहमत

(दुर्बोध लिहणार्‍यांचा तिटकारा करणारा आणि समीक्षा पुस्तकांपासूनही लांब राहणारा) सौरभ.

टीका-स्वयंवर भालचंद्र नेमाडे. सौरभदा तुम्हीही एकदा नक्की वाचा..

मला कवितेतलं फारसं कळत नाही..पण ग्रेसांच्या कविता आणि बोलणेही मला समजायला कठीण जाते. कदाचित त्याही उच्चअभिरुचीसंपन्न पद्यरसिकांसाठी श्राव्य असाव्यात..

अभिजित...
ता. कर्‍हाड जि. सातारा सध्या पुणे.

आणखी काही (खोटे) अलंकार

काही निरर्थक अलंकारिक वाक्ये :

१) "क्रांतीच्या वणव्यांत प्रगतीची फुले फुलतात"....... इति एका क्रांतिकारक पक्षाचे नेते.

२) "मी आनंद सागराच्या शिखरावर पोहत होतो" ........ एका शाळकरी मुलाने लिहिलेल्या निबंधांतील वाक्य.

३) "परदा नही जब कोई खुदासे, बंदोंसे परदा करना क्या? जब ........" एक सुपरिचित हिंदी गाणे. यांतील अर्थहीनता लक्षांत घ्या. तार्किकदृष्ट्या खुदा सर्वज्ञ असल्यामुळे त्याच्यापुढे पडदा असून नसून सारखाच. त्यामुळे त्याच्या समोर पडदा असण्याची गरज नाही हे समजण्यासारखे आहे. पण बंद्याच्या मनांत पाप येऊ शकते म्हणून त्याच्यासमोर पडदा पाहिजे. त्यामुळे खुदासमोर पडदा नाही हे बंद्यासमोर पडदा न ठेवण्याचे समर्थन होऊ शकत नाही.

४) "गंगा मेरी मॉका नाम, बापका नाम हिमाला ..... " एक हिंदी गाणे. गंगा ही हिमालयाची कन्या समजली जाते. तिला कोणी आई समजत असेल तर हिमालयाला तो बाप कसा म्हणू शकतो? त्याचा उल्लेख 'नाना' (आईचे वडील) म्हणून व्हायला पाहिजे.

हा हा हा हा हा हा हा हा

"गंगा मेरी मॉका नाम, बापका नाम हिमाला ..... " एक हिंदी गाणे. गंगा ही हिमालयाची कन्या समजली जाते. तिला कोणी आई समजत असेल तर हिमालयाला तो बाप कसा म्हणू शकतो? त्याचा उल्लेख 'नाना' (आईचे वडील) म्हणून व्हायला पाहिजे.

तसे असेल तर सावळ्या विट्ठलाला माऊली कसे म्हणायचे

आणि

कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता
बहीण, बंधू, चुलता, कृष्ण माझा

याचा अर्थ कसा लावायचा

आपला,
(संभ्रमित) आजानुकर्ण


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

अशा सर्व प्रश्नोत्तरांसाठी

अशा सर्व प्रश्नोत्तरांसाठी आणि नात्यांसाठी राजवाड्यांचे भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास हे पुस्तक वाचावे. ;-) हलकेच घ्या

या पुस्तकात राजवाड्यांनी नको तिथे नको तेव्हा भलत्याच सिक्सर्स मारलेल्या आहेत असे माझे स्पष्ट मत आहे. ;-)

बहुतेक उदाहरणे पटली, पण... ३ नाही

(३) परदा/खुदा/बंदा हा शब्दखेळ मला तरी आवडला. जी गोष्ट अतार्किक म्हणून श्री कोर्डे सांगतात, तीच चमत्कृती कवीला सांगायची आहे.

जे सांगायचे आहे, ते सांगितले, तर ठीकच आहे. अलंकाराचा रसपोषक उपयोग आहे. वाचकाला पाठ्याचे अंतिम गंतव्य पटो ना पटो.

आणि नाहीतरी, हा तर्कही काहींना पटण्यासारखा वाटला आहे. खलील जिब्रानने "मन शुद्ध असेल तर लाजेखातर कपड्यांची गरज नाही" अशा प्रकारचा युक्तिवाद "द प्रॉफेट" या पुस्तकात प्रेषिताच्या तोंडी घातला आहे. खुदा/बंदा/परदा मध्ये हाच तर्क वेगळ्या प्रतिमांची उपमा घेऊन सांगितला आहे. पुनश्च तर्क नाही पटला तरी चालेल. ते अलंकार-रसग्रहणाचे क्षेत्र नाही.

पटलेले उदाहरण :
आनंद सागराचे शिखर...

जो काय अलंकार वापरायचा आहे, तो अभावितपणे ऍब्सर्ड झाला, तर शैलीच्या दृष्टीने हुकला.

कधीकधी मात्र पूर्ण काव्यच "एब्सर्ड" करणे, किंवा चमत्कृतीने भरणे, हेच कवीचे उद्दिष्ट्य असले, तर असे अलंकार रसपरिपोष करणारे ठरू शकतात, हे लक्षात असू द्यावे. ("काट्याच्या अणी वर" हे मुद्दामून घडवलेल्या चमत्कृतीचे उत्कृष्ट आणि सफल उदाहरण म्हणावे.)

तसेच

पण तसेच मला हे ही कळले नाहीये

"मी प्रश्न टाकिला अंती भ्रांत नभास,
दे कवण दीपिका मार्ग दर्शिका खास
ठेचाळतात जी मुले तमी त्या नियती?
आंधळी बुद्धी! हे उत्तर दे आकाश"

अक्षाभोवती भ्रमण करणार्‍या आकाशाला मी ओरडून प्रश्न विचारला ' नियतीची लहान मुले, जी अंधारात चाचपडत आहेत, त्यांना मार्गदर्शन् करण्यासाठी नियतीकडे कोणता दीप आहे?
त्यावर आकाश उत्तरले ' आंधळी समज, अंध बोध'

म्हणजे काय बॉ?

आपला
गुंडोपंत

द्राक्षकन्या (अर्थात् उमरखय्यामच्या रुबाया)

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
उमरखय्यामच्या निवडक रुबायांचे कवि माधव ज्यूलियन् यांनी "द्राक्षकन्या" नावाचे पद्यमय भाषांतर लिहिले. या द्राक्षकन्येचे पुनर्प्रकाशन २००६ साली झाले.त्यात समाविष्ट केलेला रुबायांचा गद्य अनुवाद मी लिहिला आहे.
श्री.गुंडोपंत यांच्या प्रतिसादात तोच अनुवाद आहे ("अक्षाभोवती........अंधबोध"). तो समजण्यास तसा अवघड नसावा.(काय समजले ते व्यक्त करणे कदाचित् अवघड असेल.पण काहीतरी समजते आहे एव्हढे समजते). ते असो. पण द्राक्षकन्येतील त्या चार ओळींच्या पद्याचा प्रामाणिक अनुवाद आणखी कसा करावा? 'भ्रान्तनभ' शब्दाचा अर्थ 'अक्षाभोवती भ्रमण करणारे आकाश' असा केला आहे, त्याविषयी दुमत असू शकेल.

विशेषणबाजी

यनावाला सर,

आपण अतिशय महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला आहे.

गुळाला चिकटलेल्या मुंगळ्यांप्रमाणे अशी विशेषणे चिकटवलेल्या लेखनाला मराठी साहित्यवर्तुळात अतिशय मान मिळतो. सौंदर्यलक्षी शब्दकळा, किंवा अभिव्यक्तीचा भावसंपृक्त अविष्कार असे अशा लेखनाला म्हटले जाते. विशेषत: जेव्हा काय लिहायचे आहे हे लिहिणाऱ्याला आणि काय लिहिले आहे हे वाचणाऱ्याला अजिबात कळत नाही तेव्हा त्याला ही असली विशेषणे गोचिडीप्रमाणे येऊन चिकटतात.

या विषयाचा विस्तृत उहापोह मंगेश विट्ठल राजाध्यक्ष यांनी 'भाषाविवेक' या पुस्तकात केला आहे.

श्री. ऑरवेल यांनीही यांच्या या निबंधात या विषयाबाबत सुंदर लिहिले आहे.

असो.

केवळ नक्षीदार शब्दांमुळे कवितेत यश मिळत नसते. सुबक, गोंडस व नक्षीदार शब्दांमुळे कविता सुंदर होत नसते आणि शब्दांचा थयथयाट घातला म्हणून कविता शक्तिशाली बनत नसते.
- सुरेश भट


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

गाईच्या डोळ्यांतली काकड आरती

हाहाहा!!! भयंकर विनोदी शब्दरचना. असे अलंकारिक लिहिणारे, नको तिथे लाडीक लिहिणारे, नको तिथे गंभीर शब्दरचना करणारे आणि अशाप्रकारच्या अनेक बाधांनी पिडीत अनेक लेखक सापडतात.

आजानु म्हणतो तसे,

विशेषत: जेव्हा काय लिहायचे आहे हे लिहिणाऱ्याला आणि काय लिहिले आहे हे वाचणाऱ्याला अजिबात कळत नाही तेव्हा त्याला ही असली विशेषणे गोचिडीप्रमाणे येऊन चिकटतात.

आणि हे असे केले की वाहवा! कित्ती कित्ती अचाट कल्पनाशक्ती असे म्हणणारे प्रतिसादही येतात. ;-) - वाचक असे घडतात.

अवांतरः

भोपळ्याच्या डोळ्यांतील काकड आरती अशी दिसत असावी. ;-)

DSC00786

+१

असे अलंकारिक लिहिणारे, नको तिथे लाडीक लिहिणारे, नको तिथे गंभीर शब्दरचना करणारे आणि अशाप्रकारच्या अनेक बाधांनी पिडीत अनेक लेखक सापडतात.

अगदी बरोबर... अलंकार हे सौंदर्य वाढवण्यासाठी असतात त्यांचा (शरीरावर अथवा लेखनात)पसारा घालण्यापेक्षा योग्यवेळी योग्य अलंकार वापरणे कधीही योग्य.

अवांतरः हा भोपळा यंदाचा का?

ऋषिकेश
------------------
जगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणारे आणि न समजणारे

असेच म्हणतो

'गोचिडी' हे विशेषणाचे विशेषण भन्नाट आवडले.

पण विशेषणे 'गोचिडीसारखी' चिकटतात म्हणजे नेमके काय? ती 'नामा'तले कोणते रक्त शोषून घेतात? असे 'शास्त्रीय' प्रश्न पडले. ;)(ह.घ्या.)

यशवंत पाठक

या उतार्‍याचे लेखक श्री. यशवंत पाठक हे एके काळी अतिशय सुंदर लेखन करत. ते संतसाहित्याचे अभ्यासक आहेत. त्यांचे "अंगणातले आभाळ" हे आत्मचरित्र माझे अत्यंत आवडते पुस्तक आहे. तसेच पूर्वी त्यांनी रामदासी पंथातल्या तसेच इतर संतसाहित्याच्या अभ्यासकांची असंख्य व्यक्तिचित्रे रंगवली आहेत.

हा लेख कृत्रिम आणि बोजड झाला आहे हे खरे आहे पण त्यामुळे एका उतार्‍यावरून त्यांना मी मोडीत काढणार नाही.

विनायक

लेख

वरील वाक्यांचा अर्थ नुसतीच ती वाक्ये इथे वाचली तर कळत नाहीये. परंतु सकाळ वर तो लेख पुर्ण वाचला तर कळतायत. त्यामुळे लेखन अर्थहीन वाटत नाही. लेख थोडा कॄत्रिम असेल परंतु अर्थहीन नाही.

राजस.

मिश्र उपमा/रूपके

(सामान्यपणे इंग्रजी लेखनातील शैली सुधारताना शिकवतात, पण अन्य भाषांनाही लागू असावे.) मिश्र उपमा/रूपके ही शक्यतोवर वापरू नयेत, असे शिकवतात. म्हणजे दोन वेगवेगळी उपमाने सरमिसळ करून वापरलीत, तर नेमके कसले सादृश्य कुठल्या बाबतीत आहे, असे कळत नाही.

शैलीबद्दलचे सर्वच नियम ढोबळ असतात - पण फार-फार क्वचितच मिश्र उपमा/रूपकांनी रसपोष होतो, असा माझा अनुभव आहे.

...आठवणी तिच्या पापण्यांच्या अंगणात उडायला लागतात.ती त्या अधिरपणे गोळा करू पाहाते.आठवणींचे थवेच्या थवे तिच्या मनाच्या ओसरीवर भुर्रदिशी उडतात...

पापण्यांचे आंगण... त्यात उडणार्‍या आठवणी (मनाच्या ओसरीवर भुर्रकन उडणारे म्हणजे पाखरे, की अंगणात उडणारा पाचोळा???)... त्या गोळा करायच्या (आंगणात पाखरे गोळा केल्यासारखी पापण्यांत आठवणी गोळा करायच्या??? दृष्टांत मला तरी मुळीच कळण्यासारखा राहिलेला नाही.)

मला वाटते अशा प्रकारच्या उपमा-रूपकांनी रसपोष होत नाही. पण तो होतो की नाही, हे "सकाळ"चे संपादक, आणि अंततोगत्वा "सकाळ"चे वाचकच ठरवणार.

शब्द शक्ती !!!

मराठी भाषेची आवड आहे. मराठी भाषेतील शब्दावर हुकुमत गाजवण्याची कला आहे, इ.इ. विशेषणे, असे अलंकारिक लिहिणा-याला प्राप्त होते. असो, असे लेखन ललित या प्रकारात मोडते. असे लेखन कवितेशी अधिक नाते सांगते. कमी शब्दातून अधिक आशय व्यक्त करण्याचा प्रयत्न असे अलंकारिक लिहिणार्‍याचा असावा असे वाटते. शब्दशक्तीमुळे सौंदर्य निर्माण होत असते अशा शब्दांचा विचार अलंकारशास्त्रामधे केलेला आहे. त्यावरुनच शब्दांच्या विविध शक्ती आणि त्यामुळे प्राप्त होणार्‍या अर्थाला साहित्यव्यवहारात महत्व आहे, असे वाटते.

उदा. 'बुद्धगयेचा पिवळा वारा' या मर्ढेकरांच्या उक्तीमधे लक्षणा आणि व्यंजना या दोन्ही शब्दशक्तींचा सुंदर संयोग दिसतो. 'पिवळा' हा शब्द बुद्धभिक्षूंच्या पीतवस्त्रासाठी आलेला आहे. ही लक्षणा झाली. पण पिवळा म्हणजे केवळ पीतवस्त्र नाही तर बुद्धाच्या निवासाने पवित्र झालेली बुद्ध गया भारतीयांचे क्षेत्रस्थानी गंगा नदीवरुन वाहात येणारा वारा पावित्र्याचे उद्दात्त वातावरण निर्माण करतो तो केवळ 'वारा' राहात नाही ,बुद्धाला ज्या ठिकाणी ज्ञानप्राप्ती होते ते ठिकाणचे महात्म 'पिवळा वारा' ध्वनित करतो.

किंवा...

'माझ्या ग दारा वरनं ! कोण्या राजाचा हत्ती गेला'

सारांश, शब्दाचे वाच्यार्थ बोलणार्‍याला किंवा ऐकणार्‍याच्या दोघांच्याही मनात नसून दुसरेच अर्थ असतात. हे त्या शब्दाचे सरळ अर्थ नव्हेत यांनाच लक्षणार्थ म्हणतात. अर्थाच्या या सुक्ष्म छटा लेखक आणि रसिकाच्या ठिकाणी निर्माण होतात.शब्दाच्या तीन शक्ती आहेत, अभिधा, लक्षणा, व्यंजना, त्याची चर्चा पुढे कोणत्या तरी तासाला करु ;)

-दिलीप बिरुटे
(सूटीच्या दिवसात उपक्रमवर एक्स्ट्रा तासेस घेणारा प्राडॉ)

आलंकारिक लेखन

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
लेखनात उपमा रूपकादि अलंकार वापरणे, तसेच प्रतिमा योजणे याला विरोध नाही.मात्र लेखनात यांचा अतिरिक्त वापर असू नये या श्री. धनंजय यांच्या विचाराशी मी सहमत आहे.चर्चाप्रस्तावात उल्लेखिलेले लेखन हे आलंकारिक नव्हेच.ते खोटे ,पोकळ आहे. त्यांत कोणताही विचार मांडलेला दिसत नाही.म्हणून असल्या लेखनाला विरोध आहे.(आम्ही 'सकाळ' विकत घेऊन वाचतो.)
..या संदर्भात श्री. आजानुकर्ण यांचा प्रतिसाद आणि त्यांनी दिलेला दुवा अगदी समर्पक आहेत. त्यांनी तात्काळ हा दुवा कसा दिला याचे आश्चर्य वाटते.त्यांचे वाचन अफाट आहे आणि त्यांना योग्य ते वेळीच आठवते, असेच म्हणावे लागेल.श्री.ऑरवेल यांनी जसा सोदाहरण लेख लिहिला तसा एखाद्या सिद्धहस्त मराठी साहित्यिकाने लिहून अशा लेखनाविषयी अधिकारवाणीने सांगावे.

अंगणातले आभाळ

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री. विनायक लिहितातः--
"या उतार्‍याचे लेखक श्री. यशवंत पाठक हे एके काळी अतिशय सुंदर लेखन करत. ते संतसाहित्याचे अभ्यासक आहेत. त्यांचे "अंगणातले आभाळ" हे आत्मचरित्र माझे अत्यंत आवडते पुस्तक आहे. "
...श्री.यशवंत पाठक यांनी प्रसंगपरत्वे सकाळ मधून लिहिलेले अनेक लेख मी वाचले. सगळे याच पठडीतील आहेत.त्यांचे आत्मचरित्र मी वाचलेले नाही. श्री. विनायक म्हणतात त्याप्रमाणे ते वाचनीय असेलही. पण चर्चाप्रस्तावात उल्लेखिलेल्या लेखनप्रकाराची बीजे ,या आत्मचरित्राच्या शीर्षकात दिसून येतात.

वालाशेठ,

वालाशेठ,

समजत नसलेल्या गोष्टी चक्क सोडून दिलेल्या काही वेळेला ब-या असतात! काय म्हण्ता? :)

तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

हेच म्हणतो!

समजत नसलेल्या गोष्टी चक्क सोडून दिलेल्या काही वेळेला ब-या असतात!

आत्ताच ही चर्चा वाचली आणि हाच विचार डोक्यात आला आणि तेव्हढ्यात तात्यांचा वरील प्रतिसाद पाहीला!

अतिअलंकृत भाषा, तसेच क्लिष्ट लेखन वाचनात आले तर बर्‍याचदा सोडून देणे परवडते. अर्थात अपवाद फक्त मी समिक्षा करायला वाचत असलो तर...वरच्या चर्चाप्रस्तावातील वाक्ये जर मी आपणहून वाचायला गेलो असतो तर त्या कडे माझे दुर्लक्षच झाले असते आणि पुढे गेलो असतो... अर्थात तो लेख आवडला वगैरे कुणाला सांगायचा प्रश्नच येत नाही. अर्थात ते आवडणारे पण लोकं असतात.

एखादे साहीत्य एखाद्याला आवडते आणि एखाद्याला आवडत नाही... पण त्याने काही फरक पडतो असे वाटत नाही. उ.दा. मला कविता वाचायला आवडतात... माडगुळकरांचे पुरीया वाचताना काही कविता आवडतात तर काही क्लिष्ट वाटतात...त्याकडे दुर्लक्ष करून पुढे जातो. तेच जी ए कुलकर्णींच्या बाबतीत, तेच ग्रेस यांचे... तरी देखील यातील तेच लेखन इतर कुणाला आवडू शकते....

थोडक्यात वरील अतिअलंकृत अथवा शब्दबंबाळपणा हा मला मराठीत आणि कदाचीत इंग्रजीत देखील काही अपवादात्मक अथवा एकाच विचारात वगैरे आढळणारा आहे असे वाटत नाही...म्हणून दुर्लक्ष करून असे लेखन वाचनात आले तर सोडून देतो!

अनाकलनीय?

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.तात्या म्हणतात :"समजत नसलेल्या गोष्टी चक्क सोडून दिलेल्या काही वेळेला ब-या असतात! "
श्री.विकासही याला दुजोरा देतात.
...मी याविषयी सहमत आहे. समजत नाहीत अशा अनेक गोष्टी आपण सोडून देतोच. पण त्या समजण्यास अवघड आहेत, आपल्या ग्रहणशक्तीच्या बाहेर आहेत, हे आपल्याला समजते.
प्रस्तुत लिखाणाला ते लागू नाही. "पणती गोठ्यात लावली म्हणजे गाईच्या डोळ्यांतील काकड आरती लाघवी असते."
हे क्लिष्ट नाही. अति अलंकृत नाही. शब्दबंबाळ नाही. अनाकलनीय नाही. हे आहे कृतक ,पोकळ,निरर्थक विधान. संपूर्ण लेख असाच आहे. कोणतीही मध्यवर्ती कल्पना नाही. कोणताही विषय नाही. असे लेख वारंवार येतात म्हणून त्याविषयी लिहिणे आले.

बरोबर्

>हे क्लिष्ट नाही. अति अलंकृत नाही. शब्दबंबाळ नाही. अनाकलनीय नाही. हे आहे कृतक ,पोकळ,निरर्थक विधान. <
अगदी पूर्ण सहमत आहे..
अशी वाक्ये वाचली की डोळे धूवून यावेसे वाटते :)
--लिखाळ.

यनाकाका

यनाकाका, पण नक्की या चर्चेचा उद्देश काय आहे. हा लेख नक्की कसा पाहीजे होता असे आपले मत आहे. मी लेख २-३ दा वाचुन बघितला. असा काय फार भारी लेख आहे असे काही नाही. परंतु, कोणत्याही दैनिकाच्या पुरवणीत एखाद-दोन तरी लेख असे सापडतलीच. त्यात चर्चा काय करायची असं म्या पामर म्हणतो.

- राजस.

तेच म्हणायचे होते...

परंतु, कोणत्याही दैनिकाच्या पुरवणीत एखाद-दोन तरी लेख असे सापडतलीच. त्यात चर्चा काय करायची असं म्या पामर म्हणतो.

मला देखील तेच म्हणायचे होते आणि तेच म्हणत आहे.

चर्चाप्रस्तावाचा उद्देश

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री..राजस यांनी विचारणा केली आहे की या चर्चाप्रस्तावाचा उद्देश काय?
या प्रश्नाचे उत्तर लिहिण्यास काही कारणांनी (मुख्यत्वेकरूनन भारनियमन) विलंब झाला .तरी क्षमस्व.
चर्चाप्रस्तावाचा हेतू थोडक्यात असा:
”सकाळ’ वृत्तपत्रात असे लिखाण गेली काही वर्षे सातत्याने छापले जात आहे.मला ते अर्थशून्य वाटत होते. पण लेखक उच्चविद्याविभूषित असल्याने , सकाळकडे प्रतिक्रिया पाठविण्या पूर्वी माझेच काही चुकते आहे की काय ते पाहाण्यासाठी उपक्रम वर चर्चा प्रस्ताव मांडला.
सर्वश्री.सौरभदा, अभिजित,शरद कोर्डे,आ'कर्ण,ऋषीकेश,विसुनाना,धनंजय,लिखाळ तसेच प्रियाली यांच्या प्रतिसादांतून माझ्या विचारांना पुष्टी मिळाली.यापुढे कधी या प्रकारचा लेख आल्यास सकाळला, तसेच तिथून लेखकांचा पत्ता घेऊन त्यांना माझे स्पष्ट मत कळवीन.तुम्ही म्हणाल"एव्हढे काय त्यात? लेखन आवडले नाही तर त्याकडे दुर्लक्ष करावे."तर तसे नव्हे. इथे लेखन आवडण्या न आवडण्याचा प्रश्न नाही.ते भोंगळ आहे. त्यातून कोणताही विचार व्यक्त होत नाही म्हणून छापू नये असे म्हणणे आहे.

लेख छापतानाचे उद्देश

एखाद्या धंदेवाईक प्रसिद्धी माध्यमात जेंव्हा एखादा लेख छापून येतो, तेंव्हा त्याची अनेक कारणे असू शकतातः

  1. एखादा लेखक/लेखिका (या संदर्भात निव्वळ लेख लिहणारा/री) खूपच लोकमान्य/राजमान्य आहे - उ.दा. पु. ल., लता मंगेशकर, भिमसेन, सचीन तेंडूलकर, शरद पवार, बाळासाहेब ठाकरे आदी (मुद्दामून विविध क्षेत्रातील नावे येथे घेतली आहेत). अथवा,
  2. कधी कधी लेखक/लेखिकेचे व्यवस्थापनाशी मैत्रीपूर्ण संबंध असतात. अथवा,
  3. ज्या संदर्भात लेख असतात तसे लिहीणारे कोणीतरी माध्यमाला हवे असते. अथवा,
  4. वरील सर्व/अथवा त्यातील काही मुद्दे + ते लेख आवडणारा वाचक वर्ग असतो.

कुठलेही धंदेवाईक माध्यम बहुतांशी उगाच काही छापणार नाही - जर त्या छापण्याचा धंद्याला फायदा होत नसेल तर.

आता दुसरा भाग झाला तो लेखन स्वातंत्र्याचा... आपण वर म्हणत आहात की, "”सकाळ’ वृत्तपत्रात असे लिखाण गेली काही वर्षे सातत्याने छापले जात आहे.मला ते अर्थशून्य वाटत होते. पण लेखक उच्चविद्याविभूषित असल्याने , सकाळकडे प्रतिक्रिया पाठविण्या पूर्वी माझेच काही चुकते आहे की काय ते पाहाण्यासाठी उपक्रम वर चर्चा प्रस्ताव मांडला." तसे जर आपल्याला वाटत असेल तर आपल्याला तसे लिहायचे स्वातंत्र्य आहे. त्या लेखावर/लेखकावर टिका करायचे स्वातंत्र्य देखील अर्थातच आहे. आणि तसे लिहीण्याआधी इतरांच्या प्रतिक्रीया काय होतात ते आजमावण्याचे स्वातंत्र्य देखील आहे.

मात्र तसेच स्वातंत्र्य (या चर्चेसंदर्भात) त्या लेखकाला देखील आहे असे वाटते आणि आपल्या पैशाने आपण चालवत असलेल्या धंद्यातील माध्यमात काय छापायचे ह्या संदर्भात प्रसिद्धीमाध्यमाला आहे असे देखील वाटते. म्हणूनच आपले शेवटचे विधान, "..ते भोंगळ आहे. त्यातून कोणताही विचार व्यक्त होत नाही म्हणून छापू नये असे म्हणणे आहे." हे लेखन स्वातंत्र्याच्या दृष्टीने आपण लिहीणे मान्य होत असले तरी, त्यातील इतरांना लिहीण्याचे, छापून देण्याचे, स्वातंत्र्य नकळत कुठेतरी नाकारत आहे असे वाटले. इतकेच म्हणावेसे वाटते...

थोडक्यात जर एखादे लेखन आक्षेपार्ह वाटले अथवा आवडले नाही, तर त्या विरुद्ध मुद्देसूद टिका करत त्यावरील निर्णय हा ते छापणार्‍या मालकावर आणि ते वाचावे का न वाचावे हे वाचकावर सोडणे हे खरे स्वातंत्र्य वाटते...

आपला,

(लिबरल) विकास

+१

उत्तम व संतुलित प्रतिसाद. आवडला.

- राजस.

 
^ वर