ज्योतिषशास्त्रात गुरू ग्रहाचे वैशिष्ठ्य

ज्योतिषशास्त्रात गुरू ग्रहाचे वैशिष्ठ्य

फलज्योतिषशास्त्रात गुरू हा अत्यंत पवित्र ग्रह मानण्यात आलेला आहे. गुरू हा अनेक चांगल्या गोष्टींचा कारक आहे.

गुरू हा सूर्यमालेत सूर्यापासून पांचवा ग्रह आहे. बहिर्वर्ती ग्रहांमध्ये तो पृथ्वीपासून दुसरा ग्रह आहे. पृथ्वीच्या १२८१ पट मोठा आहे. म्हणून पूर्वाचार्यांनी त्याला "बृहत तनु" असे म्हटले आहे. ह्याला चार उपग्रह आहेत. तो किंचीत स्वयंप्रकाशित आहे. रंग पिवळसर आहे. त्याचा मध्यम व्यास ८६००० मैल आहे. सूर्याभोवतीचा प्रदक्षिणाकाळ बारा वर्षे आहे. त्याचा अक्षप्रदक्षिणा काळ ९ तास ५५ मिनीटे २० सेकंद आहे. तो रविपासून पुढे १४० अंशांवर असता त्याची गती कमी कमी होते. रविपासून ६/७/८ स्थानात असता तो वक्री होतो. तेव्हा त्याचे तेज जास्त दिसते कारण तो पृथ्वीच्या जवळ येतो.

ज्योतिषशास्त्रात त्याचे स्वगृह मीन, मूलत्रिकोण राशी धनू राशीचे पहिले २० अंश, पुढे २० ते ३० अंश स्वगृह. त्याची उच्च राशी कर्क मानली गेली आहे तर मकर ही त्याची नीच राशी मानली गेली आहे. त्याचे मित्रग्रह रवि, चंद्र व मंगळ आहेत. सम ग्रह शनी आहे. शत्रू ग्रह बुध शुक्र आहेत. शुक्राचा रंगेलपणा आणि भोगवृत्ती ही गुरूला न मानवणारी आहे. पुनर्वसु, विशाखा आणि पूर्वाभाद्रपदा ही त्याची नक्षत्रे आहेत.

गुरूला ज्योतिषशास्त्रात तीन दृष्टी आहेत . त्या म्हणजे पंचम, सप्तम आणि नवम दृष्टी.

गुरूच्या सहवासापेक्षा त्याचा दृष्टीयोग महत्वाचा आहे.

गुरू हा आपल्या अमृतदृष्टीने मातीचे सोने करण्याची किमया करणारा ग्रह आहे. त्याच्या कृपाप्रसादाने अंगी सद्गुण येतात व जातकाची नैतिक पातळी उंचावते. हा संततीकारक आहे.

वेदांत, तत्वज्ञान, मीमांसा ह्यावर गुरूचा अंमल आहे. कीर्ति, यश, तर्कशास्त्र, ज्योतिष, वडील भाऊ, गुरूजन, तप, धार्मिक कृत्ये, निस्पृहता, तीर्थक्षेत्रे, पवित्र स्थाने, राजकृपा, मानसन्मान, सुखशांती ह्या सर्व गोष्टी गुरूवरून पाहिल्या जातात.

ह्या गुरूचे वैशिष्ठ्य म्हणजे तो ज्या स्थानात असतो त्या स्थानाची हानी करतो.

लोक प्रश्न विचारतात की आमच्या पंचमात गुरू आहे. तरी संततीसंबंधी समस्या का? त्याचे उत्तर हे आहे.

लग्नात असलेला गुरू माणसाला चांगले रूप देत नाही.

पंचमात संततीबाबत चिंता निर्माण करतो. एकतर संतती होत नाही, झाल्यास फार उशीरा होते, त्याला पापग्रहांची जोड असेल तर संततीत काही वैगुण्य असण्याची शक्यता असते.

सप्तमातला गुरु वैवाहिक जीवनाबाबत कष्ट देतो. विवाहास विलंब होतो. सप्तमात गुरू-राहू एकत्र असतील (ह्याला चांडाळ योग म्हणतात) तर राहू गुरूला अजून बिघडवतो आणि वैवाहिक सौख्याची होळी करतो.
ज्या स्थानात ही युती होते, त्या भावाचे कारकत्व असलेया गोष्टी बिघडतात.

पापग्रहांच्या दृष्टीयोगाने अगर युतीने बिघडलेल्या सप्तमस्थानात जर मंगळ शुक्र युती असेल तर माणूस अनैतिक संबंध ठेवणारा व बाहेरख्याली असतो.

आपला,
(शास्त्रीबुवा) धोंडोपंत

लेखनविषय: दुवे:

Comments

काहि शंका

श्री धोंडोपंत,
सप्रेम नमस्कार,

आपले सर्व लिखाण वाचले. आवडले.

या लेखामधील काहि शंका :

"ह्या गुरूचे वैशिष्ठ्य म्हणजे तो ज्या स्थानात असतो त्या स्थानाची हानी करतो." या विधानाचे तात्विक स्पष्टीकरण करावे अशी विनंती.
कारण, स्थानापेक्षा, स्थानात ज्या नक्षत्रात आहे, त्यावरून त्याचे परीणाम अधिक कळतात असा माझा अभ्यास आहे.

गुरू + शुक्र + राहू / केतू हा शापयोग असतो असे माझे वाचन आहे. याबद्दल काहि माहिती द्यावी.

जय हिन्द !
विपुल

स्थानदोष

नक्षत्रानुसार मिळणारे फलादेश हे सर्व ग्रहांना लागू होतात. पण गुरूला स्थानदोष आहे. तो ज्या स्थानात असतो त्या स्थानाच्या कारकत्वाची हानी करतो.

उदाहरणार्थ लग्नात मेषेचा गुरु असेल तर नक्षत्रचरणानुसार अश्विनी, भरणी आणि कृतिकेच्या प्रथम चरणानुसार तो त्याचे रंग दाखवील.

पण प्रथम स्थानाचे कारकत्व ज्यात आहे, त्या गोष्टीत वैगुण्य निर्माण करेल. ही गुरूची नकारात्मक फल देण्याची प्रवृत्ती आहे.

धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

 
^ वर