हम दो, हमारे चार...!

राम राम मंडळी,

आजच एनडीटीव्ही इंडिया या वाहिनीवर एक बातमी पाहिली. बातमी विश्व हिंदू परिषद (व्हीएचपी) ने प्रसिद्ध केलेल्या एका पुस्तिकेबाबत होती. या पुस्तिकेत व्हीएचपी ने असे म्हटले आहे की मुस्लिम समाजात मुले होण्याचे प्रमाण हे आवाक्याबाहेरचे आहे. त्या समाजात आजही एकेका जोडप्याला पाच पाच सहा सहा मुले होतात. त्यामुळे मुस्लिम समाज संख्येने खूप आहे व त्यांची लोकसंख्या ही सतत वाढतच राहणार आहे.

व्हीएचपी त्या पुस्तिकेत पुढे असे म्हणते की संख्याबळाच्या जोरावर येत्या १०० वर्षांच्या काळात मुस्लिम समाज हिंदूंची नावनिशाणी मिटवेल, उरल्यासुरल्या हिंदूंचे सक्तिने मुस्लिम धर्मांतर करेल. मुस्लिम पुरुष हिंदू स्त्रियांशी सर्रास विवाह करतील.

हे सगळे जर थांबवायचे असेल आणि आत्तापासूनच जर याची खबरदारी घ्यायची असेल तर हिंदूंनीदेखील आत्तापासूनच आपली लोकसंख्या वाढवायला घेतली पाहिजे. प्रत्येक हिंदू कुटुंबात किमान चार मुले हवीत असे व्हीएचपीचे म्हणणे आहे. हिंदूंनी "हम दो, हमारे चार.." ही स्लोगन अंगिकारली पाहिजे असे व्हीएचपीचे म्हणणे आहे..

मला व्यक्तिश: व्हीएचपीचे हे म्हणणे पटत नाही. प्रत्येक हिंदू कुटुंबात चार मुले जन्माला यावीत हे म्हणणे माझ्या मते खूप सोपे आहे. परंतु,

१) हिंदू स्त्रियांना जो चार चार बाळंतपणांचा त्रास भोगावा लागेल याची व्हीएचपी ला काही कल्पना आहे का? खर्चाचे काय?

२) चार चार मुलांच्या पालनपोषणाची, उतम शिक्षणाची जबाबदारी व्हीएचपी घेणार आहे का?

पालनपोषण, उत्तम शिक्षण हा पुढला भाग झाला, परंतु मुळात 'हम दो, हमारे चार...' या व्ही एच पी च्या स्लोगनमागे स्त्रियांचा (येथील संदर्भात -हिंदू स्त्रियांचा) जराही विचार केला गेलेला दिसत नाही! व्ही एच पी हे आजही स्त्री म्हणजे केवळ मुले पैदा करण्याचे यंत्र समजते किंवा कसे?

शिवाय, हिंदूंच्या उपाशीतापाशी, अशिक्षित, नंग्या-अर्धनंग्या अश्या अमर्याद लोकसंख्यावाढीचा मुस्लिम समाजावर काही वचक बसेल हा व्ही एच पी चा विचार एक तर भाबडा म्हणावा लागेल किंवा आततायी म्हणवा लागेल किंवा अतिरेकी अविचार तरी म्हणावा लागेल..!

आपले मत जाणून घ्यायला आवडेल..!

असो,

आपला,
(अविवाहित हिंदू) तात्या.

लेखनविषय: दुवे:

Comments

संख्याबळ

संख्याबळ वाढवणे ही मुस्लिम समाजाची स्ट्रॅटेजी आहेच. 'मुनिक' हा चित्रपट बघितला असेल तर त्यामधला पॅलेस्टीनी म्हणतो, कधीतरी युद्धाचा निकाल आमच्याच बाजुने लागेल कारण आमची संख्या वाढतच राहील.

परंतु त्यासाठी हिंदुंनी हम दो हमारे चार असे म्हणणे मुर्खपणाचे होइल. असे करणे म्हणजे देशाला अजुन खड्ड्यात घेउन जाणे. त्यापेक्षा कायदा कडक करावा, हा त्याच्यावरचा उपाय होइल.

- राजस.

+१

राजसच्या संपूर्ण प्रतिसादाशी सहमत. अजून एकचः हा प्रकार कॅथलीक ख्रिश्चन्स मधे पण धर्माच्या नावाखाली होतो. भारतात कॅथलीक्स जास्त असल्याने तो देखील प्रश्न आहे/होवू शकतो.

अर्थात एकजण खड्ड्यात जात आहे म्हणून दुसर्‍याने त्याच्यापेक्षा मोठा खड्डा स्वतःसाठी खणावा का प्रश्न आहे.

मात्र या बातमीमधे एनडीटीव्ही वार्ताहराने स्वतःचे काही मुद्दे अथवा मत मांडले का? केवळ व्हिएचपीची थट्टा अथवा त्यांच्यावर टिका होती का हा प्रकारपण वास्तव आहे (मुस्लीम लोकसंख्या) ह्याबद्दल पण, त्यांच्या समाजव्यवस्थेबाबत (मी राजकारण म्हणून म्हणत नाही आहे) हे पण जाणून घेयला आवडेल.

याचे आकडे

मी पूर्वी बघितले होते.

भारतातील हिंदू आणि मुसलमान दोन्ही समाजातले जन्मप्रमाण दर वर्षी कमी होत आहे. यातही शहरी/ग्रामीण हा फरक आहे. (शहरी भागात दोन्ही समाजांत जन्मप्रमाण त्यांच्या-त्यांच्या ग्रामीण जन्मप्रमाणापेक्षा कमी आहे.)

मुसलमान जन्मप्रमाणाचा ग्राफ हिंदू जन्मप्रमाणाच्या ग्राफपेक्षा साधारण १० वर्षे मागे आहे. (म्हणजे मुसलमान समाजातले १९८५ मधले जन्मप्रमाण हिंदूंच्या १९७५ मधील जन्मप्रमाणाइतके, वगैरे.) त्यामुळे हिंदूंची लोकसंख्या स्थिरावेल त्याच्या १० वर्षांच्या आसपास मुसलमानांची लोकसंख्या स्थिरावेल.

लोक सामूहिक अस्मितेसाठी मुले उत्पन्न करतात अशी कल्पना कित्येकांना असते. (स्वतःच्या ओळखीच्या कोण्या कुटुंबाने असे केल्याचे माहीत नसले, तरी अनोळखी लोक असे करत असावेत, याबद्दल काहींचा दृढ विश्वास असतो.) राष्ट्रीय हितासाठी लोक कमी मुले उत्पन्न करत नाहीत, तर आपल्या कुटुंबाची सोय (काँडोम/कॉपर टी/ऑपरेशनची कटकट कितपत वाटते, तेही कारण महत्त्वाचे) बघून लोक त्या दृष्टीने पोरे काढतात.

युरोपात पैसे देऊनही कुटुंबे १पेक्षा अधिक मुले उत्पन्न करत नाहीत. जपानी लोक अन्य आगंतुकांबद्दल घृणा करतात, जर्मनीतले लोक तुर्कांची वीण फार म्हणून आरडा-ओरडा करतात, पण सुखवस्तू लोक स्वतः अधिक मुले जन्माला घालत नाहीत.

जर कोणाचे असे मत असेल की "अमुक जातीचे/जमातीचे लोक आपली लोकसंख्या वाढवण्यासाठी मुले काढतात", तर ते मत साधारणपणे आकडे ऐकून बदलणारे नसते. "हम दो हमारे चार"असे म्हटले म्हणून कोणीही हिंदू त्या कारणासाठी अधिक मुले उत्पन्न करणार नाही. खेड्याकडचे कोणी अधिक मुले उत्पन्न करत असेल, तर आधीच्याच कारणांमुळे, या घोषणेमुळे नव्हे.

कॅथोलिक समाजाबद्दलही (अन्य देशांत) असा विचार केलेला आढळतो. पुढील आकृती बघावी.

aa

दोनतीन देशांचे सोडले, तर बहुतेक देशांतले जन्मप्रमाण त्यांच्या आर्थिक स्थितीवर अवलंबून असते. यात मुसलमान-प्रधान आणि कॅथोलिक-प्रधान देशही वेगळे नाहीत. (सौदी अरबस्तान, इस्रायल, यांचे अपवाद दाखवलेलेच आहेत.)

तेव्हा वरील चर्चेतल्या कल्पनेने (की मुसलमानांची संख्या वाढतच जाणार आहे), किंवा विहिंप ज्या मजेदार घोषणेने (हम दो हमारे चार) कोणाला स्वतःच्या मनाला त्रास करून घ्यायचा असेल, त्रागा करून घ्यायचा असेल, त्यांनी जरूर करून घ्यावा - यातच व्यक्तिस्वातंत्र्य आहे. मनःशांती हवी असेल, तर दुर्लक्ष करावे. खरोखर कुतूहल असेल, तर आकड्यांसहित अभ्यास करावा. या सर्व बाबतीतही व्यक्तिस्वातंत्र्य आहे. (कोणी सरकारी अधिकारी, प्लॅनिंग कमिशनचा सदस्य वगैरे असेल तर त्यांनी आकडेशास्त्रासहित अभ्यास करावाच, त्यांना या बाबतीत "पदाच्या कर्तव्यामुळे" व्यक्तिस्वातंत्र्य नाही, असे मला वाटते.)

कॅथलीक्स

लोक सामूहिक अस्मितेसाठी मुले उत्पन्न करतात अशी कल्पना कित्येकांना असते. (स्वतःच्या ओळखीच्या कोण्या कुटुंबाने असे केल्याचे माहीत नसले, तरी अनोळखी लोक असे करत असावेत, याबद्दल काहींचा दृढ विश्वास असतो.) राष्ट्रीय हितासाठी लोक कमी मुले उत्पन्न करत नाहीत, तर आपल्या कुटुंबाची सोय (काँडोम/कॉपर टी/ऑपरेशनची कटकट कितपत वाटते, तेही कारण महत्त्वाचे) बघून लोक त्या दृष्टीने पोरे काढतात.

:))))

लोकं जाणून बुजून असे करतात असे वाटत नाही. पण धर्माच्या नावाखाली जेंव्हा उपदेश केला जातो तेंव्हा अधिक प्रजोप्तादनाचा उपदेश असतो. त्याची कारणे सामान्यांना समजत नाहीत. पण धार्मिक संस्था मात्र जाणून असतात. लोक पाद्र्याचे अथवा इमामाचे ऐकून वागतात. सुदैवाने भटजीचे कोणी ऐकत नाही (अगदी सत्यनारायणाच्या कथा चालू असल्या, त्याही मराठीत, तरी हळूच घड्याळाकडे बघतात!) आणि कुटूंबनियोजनाचा भर हा जाणून बुजून असे मला वाटत नाही, पण बहुसंख्य असल्यामुळे हिंदूंवर देण्यात आले, ज्यांच्यात पण पुर्वी देवाची कृपा, "अष्टपुत्रा सौभाग्यवती भव" वगैरे म्हणायची प्रथा होती. "लेकुरे उदंड झाली, तो ते लक्ष्मी निघूनी गेली, बापुडे भिकेस लागली, काही खाय मिळेना" हे सतराव्या शतकापासून सांगणे चालू आहे....

विकास कॅथोलिक समाजाचा उल्लेख करतात.

माझे वाक्य केवळ भारतापुरते मर्यादीत होते आणि ते असे होते: "भारतात कॅथलीक्स जास्त असल्याने तो देखील प्रश्न आहे/होवू शकतो. "

अजून पण संदर्भ मिळू शकतील पण New census data in India show a slight increase in the proportion of Christians in that country-- and a much more marked increase in the number of Christian women. ही बातमी पहा.

अजून नंतर.

उत्कृष्ट प्रतिसाद

खास धनंजय शैलीतील उत्कृष्ट प्रतिसाद! दुर्दैवाने धर्माच्या नावावर तर्काला बासनात गुंडाळणार्‍या विहिप किंवा तत्सम कॅथलीक संघटनांना इतके मुद्देसुद सुचायचे सोडाच समजायचे देखिल कठीण आहे. तेव्हा दुर्लक्ष केलेलेच उत्तम!

केवळ धर्माचा प्रश्न नाही...

दुर्दैवाने धर्माच्या नावावर तर्काला बासनात गुंडाळणार्‍या विहिप किंवा तत्सम कॅथलीक संघटनांना इतके मुद्देसुद सुचायचे सोडाच समजायचे देखिल कठीण आहे. तेव्हा दुर्लक्ष केलेलेच उत्तम!

हे १००% पटत असले तरी अशा कुतर्कांना बासनात गुंडाळून प्रश्न सुटत नाही. सुदैवाने विहीपचे ऐकून उद्या कोणी मुले जन्माला घालायला लागणार नाहीत (अगदी विहीपचे कार्यकर्तेपण!), पण ते इतरांबाबत नाही...ह्या विषयावर जे काही मी लिहीले / लिहीत आहे ते एक धर्म विरुद्ध दुसरा धर्म असे नाही आहे. त्याचे सामाजीक परीणाम पण होत असतात. दहशतवाद हा मुसलमानांच्या संदर्भात म्हणला जाऊ शकणारा परीणाम आहे. मी सुशिक्षित मुसलमानांकडून असेही ऐकले आहे की गरीबी आणि शिक्षणाचा अभाव यामुळे तरूण वाट चुकतात वगैरे आणि ते काही अर्थी खरे देखील आहे. पण अगदी गरीब झोपडीत राहणार्‍या मुसलमान कुटूंबाकडेपण पंधराएक वर्षापुर्वी गेलो होतो ज्यांनी प्रेमाने त्यांची स्पेशल खीर खायला दिली होती आणि कुठेच कसलाच धर्मांधपणा नव्हता (धर्माळूपणा असेल). तेच ख्रिश्चनांच्या बाबतीत.

आता भारताबाहेर आपल्या लाडक्या राष्ट्राध्यक्षांचेच पहा: बूश याने आल्यावर एड्स ला मदत ही गर्भप्रतिबंधक देणे जे चालायचे त्यावर बहुतांशी मर्यादा आणल्या आणि अफ्रिकेत त्या मदतीतून नैतिक शिक्षण देणे गरजेचे केले! अर्थात असे नैतिक शिक्षण काही डॉक्टर्स देत नाहीत म्हणजे ही मदत कोणाला आणि कशासाठी मिळाली आणि त्याचे सामाजिक परीणाम काय याचा विचार येतो...

सहमत आहे..

तेव्हा वरील चर्चेतल्या कल्पनेने (की मुसलमानांची संख्या वाढतच जाणार आहे), किंवा विहिंप ज्या मजेदार घोषणेने (हम दो हमारे चार) कोणाला स्वतःच्या मनाला त्रास करून घ्यायचा असेल, त्रागा करून घ्यायचा असेल, त्यांनी जरूर करून घ्यावा - यातच व्यक्तिस्वातंत्र्य आहे. मनःशांती हवी असेल, तर दुर्लक्ष करावे. खरोखर कुतूहल असेल, तर आकड्यांसहित अभ्यास करावा. या सर्व बाबतीतही व्यक्तिस्वातंत्र्य आहे.

सहमत आहे! धन्याशेठ, तुम्ही उत्तम प्रतिसाद लिहिला आहे...

काल त्या चित्रवाहिनीवर ती बातमी पाहताना अशोक सिंघल वगैरे मंडळींना त्या पुस्तिकेच्या प्रकाशन सोहळ्यात पाहून मला अंमळ गंमतच वाटली! :)

असो,

तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

प्रश्न पडला

धनंजयांचा प्रतिसाद आवडला तरी ऊसगावात आल्यापासून प्रश्न पडतो आहे तो इथे जाणवला.

हिंदू स्त्रियांना जो चार चार बाळंतपणांचा त्रास भोगावा लागेल याची व्हीएचपी ला काही कल्पना आहे का?

इथे सुखवस्तू कुटुंबातही ३-४ मुले आढळतात. अमेरिकन बायांना हिंदू स्त्रियांएवढा त्रास भोगावा लागत नाही की कसे? त्यातून इथे एकत्र कुटुंबपद्धतीही नाही. पालनपोषण म्हणजे फक्त आर्थिक सोयींचा पुरवठा असं नसावं ना!

- राजीव.

अप्रस्तुत

इथे अमेरीकेचा काहीच संबंध नाही

अप्रस्तुत का बोवा

अहो सामान्य काका,

प्रश्न अप्रस्तुत असं का बरें म्हणता!! हिंदू स्त्रियांना चार बाळंतपणाचा त्रास होतो हे मान्य आहेच तर अमेरिकन स्त्रियांना तो होत नसावा का? त्यांना तीन-चार पोरे जन्माला घालण्याची हौस असावी असं तर नाही ना. त्यांनाही कष्ट होतच असावेत तर मग अमेरिकन कुटुंबात अधिक मुलं का असतात?

अप्रस्तुतच

कारण चर्चा ही हींदुंच्या बद्दल् चालु आहे. अमेरिकेचा ह्या चर्चेशी काय् संबंध् ?

मी कुठे नाही म्हणतो

माझा प्रश्नही हिंदुंवरच आहे. मी अमेरिकेत आल्यावर इथल्या कुटुंबातील ३ किंवा अधिक मुलं बघून मला प्रश्न पडला. विषयाशी थोडा संबंध राखणारा नसला तरी कुठे प्रतिसाद ओसंडून चालले आहेत. होऊ दे की ही देखील चर्चा. चर्चालेखक तर असे काही म्हणताना दिसला नाही.

 
^ वर