व्यथा - २

व्यथा - २
खेडेगावातील स्त्रीच्या व्यथा उलगडताना श्री. महानोरांना ओवी छंद वापरावा लागला कारण तो तिच्या भावविश्वाशी निगडीत आहे, केवळ एक छंद देखील प्रभावीपणाने वातावरण निर्मिती करू शकतो. खेडेगाव.प्रभात, एकटेपणा सर्व काही फ़क्त ओवीने डोळ्यासमोर आणले. वाचकाला, रसिकाला दोन शब्दांच्या मधील जागेत अर्थ भरणे सोपे केले. त्याचवेळी थोडेसे भूतकाळातही ओढून नेले. ही व्यथा आजची नाही, कालची नाही, शतकानुशतकाची आहे व तिला कालाप्रमाणे स्थलाचेही बंधन नाही. सातारची, जळगावची, चंद्रपूरचीच नव्हे, ती महाराष्ट्राची आहे, पण असे एका प्रांतात तरी थांबावयास हवे का ? ती सगळ्या भारतातील ग्रामिण स्त्रीची आहे. असे का घडले ? सर्व भारतातील ग्रामिण स्त्रीयांना बांधणारा हा पदर
कोणता ? फ़ार शोधावयाला नको. या सर्वांसमोर लहानपणापासूनएकच आदर्श ठेवण्यात आला होता. सीतेचा. शेकडो वर्षे ह्या सर्व मूली कोणाकडे पहात आल्या ? गार्गीकडे, द्रौपदीकडे, राधेकडे ? गार्गी विद्वान होती, द्रौपदी तेजस्वी होती, राधेने परमात्म्याला सर्व समर्पण केले, पण त्या सीतेच्या पायरीपर्यंत पोचल्याच नाहित. पायरीपर्यंत सोडाच,जवळपास सुद्धा नाहित. सीतेच्या कोणत्या गोष्टीमुळे असे घडून आले ? मला वाटते,सीता आपल्या पतीशी सर्वार्थाने एकरूप झाली होती, अयोध्येचे राजवैभव सोडून वनवासाला जाणे, रावणाच्या सामर्थ्याला धूप न घालणे वगैरे गोष्टी किरकोळ आहेत. म्हणजे असे त्याग बरेच जण -जणी करू शकतील. तिची रामाशी खरी एकरूपता रामाने ,ती गर्भारशी असतांना, तीला न सांगता , तीचा त्याग केला, त्यावेळी, कसास लागली. अशा कठीण प्रसंगीही तिने रामाचा निषेध केला नाही. आपण दु:ख वनवासात भोगतो आहोत तेव्हढेच राम राजवाड्यात भोगतो आहे याची तिला खात्री होती.असहाय्य रामाला तिने स्विकारले आहे. तिने वनवासात मुलांना वाढविले व दुसऱ्या सत्व परीक्षेत असे दुर्धर प्रसंग परतपरत येऊ नयेत म्हणून आपल्या आईला,परत कुशीत घेण्यास सांगितले ! या कथेची मोहिनी भारतीय स्त्रीवर इतकी जबरदस्त होती की आपल्याला वाट्याला आलेल्या कष्टांना तिने स्विकारले, बंड न उभारता. दोन रट्टे देऊन करावयास भाग पाडलेल्या गोष्टीविरुध्द बंड करता येते.भावनेने स्विकारलेल्या गोष्टीविरुध्द नाही.
विसाव्या शतकात, समाजसुधारकांनी केलेल्या अथक प्रयत्नांमुळे स्त्री शिक्षण वाढले. स्त्रीया नोकरीकरता घराबाहेर पडू लागल्या.मिळवत्या झाल्या. वाटू लागले आता तरी यांचे भोग कमी होतील. चांगले दिवस पहावयास मिळतील.पण झाले भलतेच. डोळे उघडे ठेऊन बघितले तर विपरितच दिसत आहे. हा आक्रोश बघा

लक्ष्मणरेषा
सीतेपुढे एकच ओढली रेषा लक्ष्मणाने,
तिने ती ओलांडली आणि झाले रामायण.
आमच्यापुढे दाही दिशा लक्ष्मणरेषा;
ओलांडाव्याच लागतात,
रावणांना सामोरे जावेंच लागते !
एवढेच कमी असते;
कुशीत घेत नाही भुई दुभंगून !

पद्मा [आकाशवेडी]

केंव्हाही वर्तमानपत्र उघडून बघा. रावणांचा उच्छाद समोर येतो. आम्ही हळहळतो आणि ..आणि पान उलटून पुढची बातमी वाचू लागतो. आजचे राम षंढ झाले आहेत. रावणाचा समाचार घेण्याचे सामर्थ्य त्यांच्यात उरले नाही. सीतेला रामाचा आधार उरलेला नाही. त्याच्या सामर्थ्याच्या बळावर रावणाला सडेतोड उत्तरे देण्यात अर्थ नाही हे तिला कळून चुकलेले आहे.
रामायणातल्या सीतेप्रमाणेच तिने रामाचे असहाय्यत्व स्विकारले आहे. आजच्या निराश सीतेची व्यथा एकच आहे .... आज ती आपल्या जन्मदात्रीवरही अवलंबून राहू शकत नाही !

शरद

लेखनविषय: दुवे:

Comments

छान

आवडले. पण आजची सीता-राम वगैरे वेगळ्या चर्चेचे विषय आहेत. येथे विषयांतर होईल.

सहमत आहे

अभिजित...
ता. कर्‍हाड जि. सातारा.

थोडी सुधारणा

शरद
थोडी सुधारणा
आजची सीता किंवा आजचा राम असे लिहतांना थोडा गैरसमज होण्याची शक्यता दिसली म्हणून माझे म्हणने थोडे विस्तारून लिहतो. आकाशवेडी हा कवितासंग्रह १९६८ चा. त्यावेळी स्त्रीयांनी नोकऱ्या करावयास सुरवात करून फ़ार दिवस झाले नव्हते. त्या काळात स्त्री सौजन्याच्या कल्पना भिन्न होत्या. आजच्या सकाळी ८-२० च्या लोकलच्या प्रचंड गर्दीत एखाद्या मुलीला धक्का लागला तो मुद्दाम असेल असेही नाही. १९६० च्या सुमारास समजुती निराळ्या होत्या व त्या वेळी असे काही घडले तर सर्वच जण अस्वस्थ होत असत.पद्मा[गोळे] यांची ही रचना त्या संदर्भात वाचली पाहिजे. त्यांनी घराबाहेर पडलेल्या स्त्रीला भेडसावणाऱ्या अडचणींबद्दल लिहताना सीतेचे रूपक घेतले. आजची सीता व आजचा राम यांचा वाल्मिकींच्या भगवान श्रीराम व सीतामाई याचा संबंध त्यांच्यावर कोसळणाऱ्या आपत्ती व असहाय्यता एवढ्या पुरताच बघावयाला पाहिजे. उलट आजची स्त्री त्रेता युगातील स्त्रीपेक्षा जास्त होरपळत आहे असाच दावा त्यांना करावयाचा आहे. आज ५० वर्षांनीही त्यात काही सुधारणा दिसत नाही व सुशिक्षित, अर्थार्जन करणाऱ्या स्त्रीची व्यथा तशीच आहे एवढेच विदारक सत्य काव्यात्मक भाषेत बघावयास मिळते.
शरद

ह्म्म्म

सुधारणे बद्दल धन्यवाद. त्या काळाला अनुसरुन लिखाण पटते. आज बरेच संदर्भ बदलत चालले आहेत. विषयांतर नको म्हणूनच फार लिहिले नव्हते. :)

 
^ वर