संस्कृतदिन

आपल्या भारतात श्रावण शु.पौर्णिमेला ''संस्कृतदिन'' साजरा केला जातो.ह्या दिवशी भारत सरकारतर्फे व महाराष्ट्र सरकारतर्फेही कांही वयोवृध्द संस्कृत विद्वानांचा यथोचित सत्कार करण्यात येतो.संस्कृतविषयानुरुप अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात.शाळा व महाविद्यालयातून हा दिन योग्यप्रकारे साजरा करण्यात यावा असे सरकारी आदेश् आहेत.संस्कृत भाषेचे महत्त्व लोकांना समजावे,हा यामागील हेतू आहे.सध्या कांही अंशी दुर्लक्षित अश्या ह्या प्राचीनतम भाषेच्या समृध्द साहित्याची लोकांना किमान ओळख व्हावी,तिच्या प्रचारासाठी व प्रसारासाठी तरूणांनी तयार व्हावे हे उद्दिष्ट आहे. अनेक शाळा व महाविद्यालयातून संस्कृत एकांकिका,सुभाषितस्पर्धा,वादविवाद इ.कार्यक्रम उत्शाहाने साजरे केले जातात.संस्कृतदिन श्रावणी पौर्णिमेलाच करण्यामागे एक कारण आहे.फार पूर्वी आपल्याकडे गुरुकुल शिक्षणपध्दती होती.शिष्य गुरुगृही राहून,गुरुची अखंडपणे सेवा करुन ,गुरुला प्रसन्न करून विद्या पाप्त करून घेत असत.उपनयनसंस्कारानंतर ह्यादिवशी म्हण्जे श्रावण पौर्णिमेला शिष्य अध्ययनाला सुरुवात करीत असे.ह्या महान परंपरेची आठवण म्हणून हा दिवस निवडला आहे.
आज ह्या भाषेकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाले आहे.असेच होत राहिले तर आपण भविष्यात एका मोठ्या ठेव्याला वंचित होऊ असे वाटते.पुढील वर्षी आपण संस्कृतप्रेमी लोकांनी संस्कृतदिन जोरात साजरा करण्याचे ठरवू या.त्यासाठी हे नम्र आवाहन.

लेखनविषय: दुवे:

Comments

मान्य आहे.

मात्र त्यासाठी पुढच्या श्रावण शु. पौ. साठी थांबूया नको. शुभस्य शीघ्रम् ।

_____________________________________________________________________
सुन्दरी च सरला च मधुरा च एषा भाषा, आगच्छन्तु, आगच्छन्तु, आस्वादयन्तु ।
तित्तित्तारा, तित्तित्तारा, तित्तित्तारा, तित्तित्तारा, तित्तित्तारा, तित्तित्तारा, तित्तित्तारा, तोम् ।।

अतिउत्तमम् !

फारच छान!त्यासाठी कांही सुचना मागविल्या तर------?

सूचना

मागवण्याची कल्पना चांगली आहे. मला पण काही सुचल्या तर नक्की सांगतो.

*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*

संस्कृतस्य महिमवर्णनेन नास्ति साधितम् । सततसंभाषणेन तस्य जीवनं स्थिरम् ।।

शब्दक्रीडा

उदा. अमरकोशाचे सहाय्य घेऊन सर्वाधिक समानार्थी शब्द शोधून काढणे. उदा. सूर्य: = प्रभाकर:, सविता, दिनकर: इ.इ.
______________________________________________________________________
सुन्दरी च सरला च मधुरा च एषा भाषा, आगच्छन्तु, आगच्छन्तु, आस्वादयन्तु ।
तित्तित्तारा, तित्तित्तारा, तित्तित्तारा, तित्तित्तारा, तित्तित्तारा, तित्तित्तारा, तित्तित्तारा, तोम् ।।

अमरकोशच का?

अमरकोशातून शब्द गोळा करून इथे चिकटवणे म्हणजे काही फार मोठे काम नाही. त्यांतले वापरातले परिचित शब्द थोडेच असणार. बरे अमरकोश हा काही संस्कृतचा एकमेव प्राचीन कोश नाही . संस्कृतचे सुमारे २०० प्राचीन कोश अमरसिंहाच्या नामलिंगानुशासनाइतकेच आपापल्या परीने चांगले आहेत. हेमचन्द्र, विश्वप्रकाश, शब्दार्थभेदप्रकाश,व्याडि, धरणि, मेदिनी , त्रिकाण्डशेष, अनेकार्थध्वनिमञ्‍जरी हे त्यातले काही. त्यामुळे असले काही करण्यापेक्षा सुभाषिते नसलेल्या काव्यांच्या काही ओळी त्यांच्या अर्थासहित इथे दिल्यास, त्या मूळ काव्याबद्दल औत्सुक्य वाटून ते मुळातून वाचण्याची इच्छा होईल.--वाचक्‍नवी

अभिजात भाषेचे तीन वर्ष

संस्कृतसाठी काही करण्यासाठी एखाद्या दिवसाचीच गरज असेल, तर तीन वर्षांपूर्वी भारत सरकारने संस्कृतला अभिजात भाषेचा दर्जा दिला होता. तमिळ भाषेला आधी (राजकीय् सोयीकरिता) हा दर्जा दिला गेला असला आणि संस्कृतला सरकारी दर्जाची गरज नसली तरी प्रगतीचा एक आढावा घेण्यासाठी म्हणून त्या दिवसाचा उपयोग आहेच.

सहमत आहे

हा दिवस जोरात आणि दिमाखात साजरा व्हावा.
मी ही सहमत आहे!

पण आत्ताच आमच्या बिरुटे सरांच्या वही मध्ये डकवलेले एक अर्थ-गर्भ चित्र पाहिले
आणि भारतीय भाषांची परिस्थिती किती भयाण झाली आहे याची जाणीव झाली.
हे चित्र म्हणजे आजच्या स्थितीचे बोचरे पण खरे विवरण आहे.

असो,

हा दिन 'सरकारी' न उरता जेंव्हा जनसामान्यांना आपला वाटू लागेल तो खरा उत्सवी दिवस असेल.
आजच्या घडील तर संस्कृत घेवून पदवी शिक्षण करणारे किती असतील याची गणतीही नाममात्रच ठरेल.
कारण त्याचे व्यावसायिक उपयोगित्व कुठे दिसून येत नाही. आणि म्हणूनच सामान्यांना त्याचे महत्व वाटत नाही असे मला वाटते.
शिवाय संस्कृत म्हंटल्यावर व्याकरण आणि पाठांतर हे महत्वाचे नावडते भागही घाबरवून सोडतात असे वाटते. तसेच 'संस्कृत म्हणजे बामणांची भाषा' हा पण सार्वत्रीक गैरसमज काही अंशी याला कारणीभूत आहे. काला परवा साप्ताहिक सकाळ मधल्या एका लेखात अशा आशयाचे मराठी विषयी एक वाक्य वाचले. (अनुभव, वंदना भागवत, पान २२, साप्ताहिक सकाळ २७ सप्टे. २००८). [ वंदनांचा हा लेखही उत्तम होता... बराच काळ विचार करायला लावणारा]
म्हणून सामान्यांना आपलेपणा वाटावा आणि सामान्यांसाठी भाषेचे उपयोगित्वही वाढावे या दृष्टीने काही काम करणे आवश्यक आहे असे माझे मत आहे.

आपला
गुंडोपंत

 
^ वर