व्यथा - १

व्यथा - १
खेडेगावातील पहाट. सकाळ व्हावयाला, सूर्य उगवावयाला, अजून थोडा अवधी आहे. घरात जागी आहे फ़क्त घरधनीण. चार साडेचारला उठून दळावयाला घेतलेले पायली- दीड पायली दळण संपले आहे. दळणाबरोबर सुरु केलेल्या ओव्याही संपल्या असाव्यात ....

सरल दळण...
ओवी अडली जात्यात,
साऱ्या जन्माचा उमाळा
कळ सोसून डोळ्यात.
[ना.धों. महानोर]

दिवसाभरात मिळणारा एकांत संपला. सोबतीला असलेली ओवी... तीही जात्यात अडकली. अडकली.. ही जशी संसारात अडकली आहे तशी ? लहानपणच्या, माहेराच्या, भावंडांच्या,मैत्रीणींच्या, आई-वडीलांच्या मायेच्या, नवीन संसाराच्या गुलाबी स्वप्नाच्या आठवणी जागी करणारी, ओवी, तीचीही साथ संपली. आता चारचौघांमध्ये करावयाचे नेहमीचे काबाडकष्ट,
गोठा-पाणी,सडा-सारवण..... . पण आता सगळ्यांत वावरावयाचे आहे. लहान-मोठे आजूबाजूला असणार आहेत. मनातला कढ आता चेहऱ्यावर सुध्दा कुणाला दिसता कामा नये. इतकी वर्षे काढली, किती ? बरीच असावीत. कारण सुरवातीला " दिस येतील, दिस जातील, भोग सरेल, सुख येईल " अशी आशा तरी वाटावयाची. पण पुसट होत,होत तीची तर आता आठवणही राहिलेली नाही. आपला सारा जन्मच सुपातून जात्यात पडणाऱ्या दाण्यासारखा गेला. सारे सारे, जे भोगले ते, त्याची हृदयात भळभळणारी कळ , तो उमाळा, सगळ्यांना डोळ्याची " लक्ष्मण रेषा " आखून दिली आहे ! गृहिणीचे जीवनच असे की ह्यातून सुटकेची आशा सोडाच, कल्पना करणेही अशक्य झाले आहे.
श्री. महानोरांनी ग्रामीण घरधणीनीची व्यथा अकरा शब्दात मांडली आहे. वातावरण निर्मिती, भावनेचा ताण, असहाय्यता, अटळ भविष्य, सारे सारे सुचवावयाला फ़क्त अकरा शब्द ! दोन शब्दांमधील जागेत काय काय अर्थ भरावयाचा तुम्हीच ठरवावयाचे.
शरद

Comments

वा

सुंदर ओवी आणि रसास्वाद!
राधिका

सहमत

नेमका रसास्वाद आवडला.
पुलेशु.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

सहमत

अजून येऊ दे!

+१

हेच म्हणतो . सुंदर रसास्वाद

- ऋषिकेश

सुंदर

विवेचन खूप आवडले. पुढील भागांच्या प्रतिक्षेत.
----

सुरेख

सुरेख.
विवेचन आवडले.

"जो करी घर घर त्याले घरोट म्हनावा"
बहिणाबाईंच्या ' घरोट' ची आठवण झाली.

आपला
गुंडोपंत

वा

सुरेख रसग्रहण.

मालिकेतील पुढील लेखाच्या प्रतीक्षेत.

असेच म्हणतो.

सुरेख रसग्रहण.

मालिकेतील पुढील लेखाच्या प्रतीक्षेत.

 
^ वर