मोनिका बेदीची कबुली

८ सप्टेंबरच्या "मुंबई टाइम्स" मध्ये "सारं लपवत गेले हीच चूक झाली" या शीर्षकाखाली मोनिका बेदीच्या मनांतली सल प्रसिद्ध झाली आहे. त्यांत तिने असं म्हंटलं आहे की जेव्हा ती अबू सालेमच्या प्रेमांत पूर्णपणे गुरफटली तेव्हा एक दिवस अबू सालेमने त्याचे डी-गँगशी संबंध आसल्याचं सांगितलं. पुढे ती म्हणते, "....तेव्हा काय निर्णय घ्यावा याचा विचार करण्याची माझी कुवतच नव्हती आणि अनवधानाने माझं पाऊल चुकीच्या ठिकाणी रुतत गेलं. ......माझ्याकडून घोडचूक झाली. पण अजूनही ज्या मुली आयुष्यांत भावनेच्या भरांत नको त्या दिशेने जात असतील त्यांनी सगळ्यांत आधी पालकांना विश्वासांत घ्यावं."

मोनिका बेदीचं कथन प्रामाणिक आणि प्रातिनिधिक असेल तर अजूनही आपली तरुण पिढी संपूर्ण व्यक्तिस्वातंत्र्यासाठी पुरेशी परिपक्व झालेली नाही व जीवनसाथी निवडण्यासारखे महत्वाचे निर्णय घेतांना तिने आपलं हित चिंतिणार्‍या ज्येष्ठांची मदत घेणं आवश्यक आहे असं म्हणणं भाग आहे.

आपल्याला काय वाटतं? मोनिका बेदीचं प्रकरण अपवादात्मक म्हणून सोडून द्यावं की त्यावरून तरुणांनी धडा घ्यावा?

लेखनविषय: दुवे:

Comments

सातच्या आत घरात

विषय उत्तम आहे.
पण कोणी काही सांगतोय तर ते ऐकण्याची आणि कृतीत आणण्याची मानसिकता असल्याशिवाय उपयोग नाही. पालकांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करुन चिखलात रुतत जाणारी मोनिका बेदी ही काय पहिली व्यक्ती आहे का? तिच्या आधी आणि नंतरही अशा बर्‍याच व्यक्ती आहेतच ना. मुली किंवा मुलं दोघांनीही जाणत्यांच्या अनुभवातून मिळालेल्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करू नये. निदान एखाद्या कृत्याचे फायदे तोटे नीट पडताळल्याशिवाय ती गोष्ट करू नये. कुटुंबातला किंवा गुरु-शिष्यांतला कमी होत चाललेला संवाद हे याचे मूळ असावे असे मला वाटते. कारण संस्कारक्षम वयात हेच मुला-मुलींच्या जास्त सहवासात असतात.

अभिजित...
ता. कर्‍हाड जि. सातारा.

वाह..

वाह ... तुमचा प्रतीसाद अगदी बरोबर आहे.... अगदी योग्य मत आहे आणी नन्त्तर डोके आपटुन काही उपयोग होत नाही.

धडा घ्यावा !!!

बीग बॉसच्या निमित्ताने आम्ही मोनिका बेदी ला पाहिले. माय गॉड काय सुंदर दिसते ती. असो, तर सदरील कार्यक्रमात तिने झाल्या गोष्टीबद्दल पश्चाताप व्यक्त केला. एका कार्यक्रमाच्या निमित्ताने की चित्रपटाच्या निमित्ताने संबधीत व्यक्तीने ब्रेक दिल्यामुळे ती संबधिताच्या सहवासात आली, प्रेमात पडली. पुढे तिला त्यातून बाहेर येता आले नाही. काही चूक नसतांना विनाकारण खूप खूप संकटांना, बदनामीला, सामोरे जावे लागले. असे अनेकदा रडता-रडता ती बोलत असायची. असो, चर्चा प्रस्तावाच्या अंगाने असे म्हणावे वाटते की, समजून- उमजून प्रेम कुठे करता येतं. आणि तस्सेच असेल तर प्रेमाला आंधळे कोण म्हणेल :)

जीवनसाथी निवडण्यासारखे महत्वाचे निर्णय घेतांना तिने आपलं हित चिंतिणार्‍या ज्येष्ठांची मदत घेणं आवश्यक आहे असं म्हणणं भाग आहे.

सहमत आहे. जेष्ठांचा विचार घेतलाच पाहिजे.

भावनेचा भर, प्रेम वगैरे वगैरे

मोनिका बेदी चित्रपटांत येऊ लागली तेव्हा विशीत होती. सुमारे पंचविशीत ती अबू सालेमच्या प्रेमात पडली म्हणजे अननुभवी, निरागस नक्कीच नसावी. चित्रपटसृष्टीत वावरणार्‍या तारका वयाच्या १६-१८व्या वर्षीही निरागस नसाव्यात. दिव्या भारती अनभिज्ञ असावी असे तिच्या वयामुळे मानण्यास जागा होती. तिचा अंत कसा झाला याबाबत अनेक अटकळी बांधल्या जातात. मोनिका बेदीला जे चित्रपट मिळाले तेही सालेमच्याच कृपेने असे सांगितले जाते. तेव्हा विशुद्ध प्रेमाच्या गोष्टींबद्दल थोडीशी शंका येते.

आपला स्वार्थ साधताना आपण नेमके काय करत आहोत, आपल्याच पायावर धोंडा मारून घेत आहोत का याचा सारासार विचार करणे ही सज्ञान व्यक्तीची जबाबदारी आहे. जर पंचविशीत पिढी पुरेशी परिपक्व नसेल तर ती पंच्याहत्तरीतही होणार नाही.

असो,

आपलं हित चिंतिणार्‍या ज्येष्ठांची मदत घेणं आवश्यक आहे असं म्हणणं भाग आहे.

हे तर कोणीही, कोणत्याही वयांत करावे. झालाच तर फायदाच होईल. (ज्येष्ठ म्हणजे वयाने असेच नव्हे तर कार्याने, अनुभवाने वगैरे)

सौ चुहे खाके बिल्ली चली हज को...

बिग बॉसची स्क्रिप्ट ज्याने लिहिली त्याला मानले पाहिजे.
मोनिका - रडते? सल्ले देते? हे सगळे टी.आर.पी. वाढवण्याचे धंदे आहेत.

चित्रपटसृष्टीत वावरणार्‍या तारका वयाच्या १६-१८व्या वर्षीही निरागस नसाव्यात.

या चित्रतारका निरागस वगैरे असू शकतात? मोनिकाच्या 'सुरक्षा' या पहिल्या चित्रपटाअगोदर ती काय करत होती ते विचारले पाहिजे.
मोनिकाच्या तोंडी हे पालकांच्या महत्त्वाचे सल्ले देणे शोभत नाही.

आपलं हित चिंतिणार्‍या ज्येष्ठांची मदत घेणं आवश्यक आहे असं म्हणणं भाग आहे.
हे तर कोणीही, कोणत्याही वयांत करावे. झालाच तर फायदाच होईल. (ज्येष्ठ म्हणजे वयाने असेच नव्हे तर कार्याने, अनुभवाने वगैरे)

याबाबत एकमत!

अगदी बरोबर.

।आपला स्वार्थ साधताना आपण नेमके काय करत आहोत, आपल्याच पायावर धोंडा मारून घेत आहोत का याचा सारासार विचार ।करणे ही सज्ञान व्यक्तीची जबाबदारी आहे. जर पंचविशीत पिढी पुरेशी परिपक्व नसेल तर ती पंच्याहत्तरीतही होणार नाही.

कदाचित या मुली इतक्या गुरफटून जात असतील की त्यांना सुटकेचा काही मार्ग दिसत नसेल.--वाचक्‍नवी

जनरलाझेशन वाटते आहे

मोनिका बेदीचं कथन प्रामाणिक आणि प्रातिनिधिक असेल तर अजूनही आपली तरुण पिढी संपूर्ण व्यक्तिस्वातंत्र्यासाठी पुरेशी परिपक्व झालेली नाही

एका मोनीका बेदी वरुन आपली तरुण पिढी पुरेशी परिपक्व नाही असे म्हणणे जरा पटत नाही.

मोनिका बेदी वरील कबुलीतुन वाटते तेवढी साधीसुधी अजिबात नसावी. पण त्याचबरोबर "झाले तिचे आयुष्याचे वाटोळे" अशी तरी काही परिस्थीती आहे असे वाटत नाही. बर्‍याच लोकांची आयुष्ये असतात अशी "धक्कादायक". असो अजुनही तिचे आयुष्य बर्‍यापैकी कंट्रोल मधे आहे असे वाटते. तिला भावी आयुष्याकरता शुभेच्छा!

हां, यावरुन धडा जरुर घ्यावा. प्रियाली म्हणतात त्याप्रमाणे वयाने असेच नव्हे तर कार्याने, अनुभवाने वगैरे जेष्ठांचा सल्ला नेहमीच जमेल त्या बाबत घ्यावा.

पण सालेम सारखा देशद्रोही इतका फोफावणे, मोनीकाच्या प्रेमाची नेमकी व्याख्या [सत्ता, पैसा, हवे ते देणारा] भारतीय समाजाने मुल्ये, कायदा सुव्यवस्थेत अशी ढील ठेवली तर कोणी ना कोणी अपरिपक्व तरुण त्या खड्यात पडणारच की. बर ते ठीक आहे सगळे काही परफेक्ट नसते पण महत्वाचे हे आहे की मोनिका सारख्या तरुणांना आयुष्य सुधारायची दुसरी संधी मिळाली पाहीजे.

अवांतर - अनुभव सांगतो की कुठल्याही देशात, कुठल्याही काळात अश्या मोनीका बेदी असणारच.

सहमत

हे सरसकट जनरलायझेशन केले गेले आहे. मो.बे. च्या बाबतीत एक मुद्दा आणखीन लक्षात घ्यावा की ती नॉर्वेमध्ये वाढली आहे. स्वातंत्र्य = स्वैराचार असा कोणी अर्थ घेत असेल तर त्यात परिपक्वता अथवा इतर मुद्दे गौण आहेत. या उलट असे म्हणणे चुक ठरणार नाही की, चुक तिच्या पालकांची आहे. तिला विचारांचे स्वातंत्र्य दिले, वागण्याचे दिले म्हणजे त्यांनी नक्की काय केले?
मो.बे. खरे बोलते असे मानले तर ती स्पष्ट मानते की मी पालकांना फसवले. म्हणजेच मी माहित असुन सुद्धा शेण खाल्ले. प्रत्येक देशातले पालक आपल्या पाल्यांना काय चांगले काय वाईट हे सांगत असतात. मो.बे. ला स्वतःची अक्कल नक्कीच होती. चुक तिची आणि पालकांची सुद्धा आहे. असे अनेक किस्से शोधल्यावर सापडतील. हे आत्ता जे काही चालले आहे ते प्रसार माध्यमांच्या आणि तिचा स्वतःच्या प्रसिद्धीपोटी चाललं आहे अस वाटत.

अवांतरः भारतात एक फक्त हिंदूंसाठी एक पत्नीत्वाचा कायदा अस्तित्वात आहे. तरिसुद्धा अनेक पतिराज बाहेरख्याली/अय्याश असतात. या बद्दल आपल्याला काय वाटतं? अशी प्रकरणं अपवादात्मक म्हणून सोडून द्यावीत की त्यावरून तरुणांनी धडा घ्यावा? घेतला तर कोणता?

"बीईंग् कूल"

बेदीबाईंच्या नव्याने प्रकाशात आलेल्या कैफियतीमधे मीडीयाचे नाट्यीकरण किती, स्वत: त्या बाईंच्या प्रामाणिकपणाबद्दल , सत्यासत्याशी मनाला कितपत ग्वाही केले या सगळ्याबद्दल तुम्ही-आम्ही केवळ वितर्कच करू शकतो.

आज मागे वळून बघताना मला वाटते , वयात येणार्‍या मुला-मुलींमधे आणि त्यांच्या आईबापांमधे एक मोठीच मानसिक दरी असते. आईबापांचे एकूण वागणे हे कितीही आदर्शवत् , आणि प्रेमाचेही असले , तरी मित्र-मैत्रिणींच्या वर्तुळाचा एक जबरदस्त पगडा मुलांच्या मनावर तेव्हा असतो. आपले एकंदर वर्तन हे आपल्या समवयीन लोकांच्या संदर्भात कितपत "कूल" आहे (येथे "कूल" या शब्दाचा अर्थ थंड असा अर्थातच नसून, फ्याशनेबल, अप-टू-डेट् , वगैरे वगैरे अर्थाने घ्यावा) , आपल्या पिअर्स् च्या संदर्भात , त्यांच्या साच्यात आपण कितपत फिट्ट् बसतोय याने त्या वयात आपल्या मनाचा एक मोठाच भाग व्यापलेला असतो. तुमचे मित्रमंडळ अभ्यासू असेल , तर त्यांच्या यशाच्या कमानीशी आपले यश मेळ खाते का हा विचार असतो. तुमचा गट हुल्लडबाजीचा असेल तर आपण पुरेसे गट्स् दाखवतो की नाही याचा एखादा मुलगा विचार करत रहातो. आणि तुमच्या गटावर एकूणच छानछौकीचे , नटण्या-मुरडण्याचे , फॅशनेबल रहाण्याचे आणि फॅशनेबल मुला-मुलींबरोबर मिसळण्याचे प्राबल्य असेल तर मग आपण पुरेसे "मॉड्" आहोत ना ? गटातल्या रुबाबदार/सुंदर मुलाच्या/मुलीच्या आपण पसंतीस उतरतो आहोत ना या गोष्टीवर तुम्ही आपले सर्व लक्ष केंद्रित करता. या सार्‍या संदर्भात बर्‍या-वाईटाचा विचार फार मुले करू शकत नाहीत. आणि एकंदर नॉर्म्स् च्या संदर्भात जर आपण कमी पडत आहोत असे जाणवले - मग ते परीक्षेतले यश असो की स्वरूपसुंदर मुलाच्या/मुलीच्या हृदयातले स्थान असो - तर मग पौगंडावस्थेतच डीप्रेशनला सामोरे जावे लागते. ही अवस्था कसेही करून टाळण्याचा आटापिटा मग मुले/मुली करताना दिसतात. बेदी बाईंच्या बोलण्यावर विश्वास ठेवायचा तर सालेमच्या संदर्भात हे असले काही घडले असावे.

मोनिका बेदीने तरूण पिढीचे प्रतिनिधित्व करू नये

मी जर तरुण असतो तर "मोनिका बेदी माझी प्रतिनिधी नाही, आणि मी तिच्याइतका उथळ नाही!" असे ठणकावून सांगितले असते.

पण मी आता तरुण नाही - हा हंत हंत...

माझ्या कॉलेजमधल्या जवळजवळ सर्व मुलींनी गुंडांशी दुसरे लग्न केले नाही, आणि माझ्या भाच्या-पुतण्यांपैकी कोणी (सध्या तरी) गुंडांशी सूत जुळवले नाही. (ज्यांनी प्रेमविवाह केलेत, करियर-माइंडेड कॉलेजमित्रांशी केलेत.)

मोनिका बेदीचे उदाहरण सिनेतारकेचे म्हणून चविष्टपणे चघळावे - आपल्यापेक्षा देखणे आणि श्रीमंत लोक गोची करतात तेव्हा मला तरी चटपटीत मजा वाटते. फुकटात (वेटिंगरूममध्ये) मिळालीत तर सिने-मासिके मी आवर्जून वाचतो. त्यामुळे मोनिका बेदीकडे दुर्लक्ष करावे असे माझे मत नाही. पण त्यावरून तरुणांना काय धडा मिळेल ते काही सांगता येत नाही.

+१

मोनिका बेदीचे उदाहरण सिनेतारकेचे म्हणून चविष्टपणे चघळावे

+१ :)
बेदी काहि हल्लीच्या तरुणांचं प्रतिनिधित्त्व करत नाहि

ऋषिकेश
------------------
जगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणारे आणि न समजणारे

खरे तर

एका वाक्यात सांगायचे झाले तर, केलेल्या चुकांचे प्रायशचीत करताना ही , आपण कसे चुकीचे नव्हतो हे बोलने सहजच येत असते. असे

मानसशास्त्र सांगते.

 
^ वर