मुंबई मेरी जान

मुंबई .... देशाची आर्थिक राजधानी, कधीही न झोपणारे शहर, मुंबईत कोणी उपाशी झोपत नाही, घड्याळाच्या काट्यावर धावणारे शहर, इथे कोणाला कोणासाठी वेळ नाही पण अडचणीच्या वेळी मुंबईकरांच्या मदतीस धावून जाणारे मुंबईकर, कठीण प्रसंगातून उभे राहणारे 'मुंबई स्पिरिट' .... मुंबई आणि मुंबईकरांविषयी अश्या अनेक कथा आपण ऐकत असतो. मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये ११ जुलै २००६ रोजी झालेल्या बॉम्बस्फोटाची पार्श्वभूमी घेऊन आलेला नवा चित्रपट 'मुंबई मेरी जान' हा चित्रपट या आणि अश्या अनेक गोष्टींवर भाष्य करतो.

हल्ली बर्‍याच बॉलिवूडपटात दिसणारा प्रकार - एकमेकांशी संबंधित नसलेल्या वेगवेगळ्या व्यक्ती, त्यांच्या आयुष्यात घडणारे वेगवेगळे प्रसंग पण या सर्वातून येणारा एकच फील - 'मुंबई मेरी जान' मध्येही वापरला आहे.

'डोंबिवली फास्ट' चे दिग्दर्शक निशिकांत कामत यांचा हा पहिलाच हिंदी चित्रपट. कलाकारांची निवड या धर्तीच्या चित्रपटासाठी अतिशय योग्य अशी आहे. परेश रावल, के के मेनन, इरफान खान, आर माधवन आणि सोहा अली खान असे कलाकार यात आहेत.

स्पॉइलर वॉर्निंग : चित्रपट रहस्यमय वगैरे नसला तरीही काही घटना/प्रसंग या लेखातून उघड होऊ शकतात.

....

परेश रावल हा एक हवालदार आहे. त्याची निवृत्ती अगदी जवळ आली आहे. पोलिस खात्यात इतकी वर्षे राहिल्यामुळे किंवा वयानुसार आलेल्या प्रगल्भतेमुळे असेल, जीवनाकडे बघण्याचा त्याचा दृष्टिकोन 'हे असेच चालायचे' असा आहे. इतकी वर्षे पोलिस खात्यात राहून विशेष काही करू शकलो नाही याची खंत कुठेतरी त्याच्या मनात आहे. या टोचणीला कधी तात्विक मुलामा, कधी विनोदाची झालर तर कधी अनुभवाचे कव्हर घालून लपवण्याचा त्याचा प्रयत्न असतो. बॉम्बस्फोटानंतर नव्या दमाच्या, गरम रक्ताच्या हवालदाराच्या बरोबर असताना आपल्या नाकर्तेपणाची सल अचानक उफाळून येते. परेश रावलचा अभिनय (आणि काही टाळ्या-घेऊ वनलायनर्स) आणि तरूण हवालदार कदम याचा अस्वस्थपणा प्रेक्षकांना भिडतो.

....

इरफान खान हा एक गरीब मद्रासी. मुंबईत रात्री सायकलवरून कॉफी, बिडीकाडी विकून गुजराण करणारा. एकदा आपल्या कुटुंबासह एका मॉलमध्ये गेल्यावर त्याचा अपमान करून बाहेर काढण्यात येते. बॉम्बस्फोटानंतर पसरलेल्या मानसिकतेचा फायदा घेऊन त्याचा बदला घेण्याचा प्रयत्न, आपल्या कृतीमुळे लोकांना झालेला त्रास पाहून पालटलेले मन आणि आपल्या चुकीची थोडीफार भरपाई करण्याचा प्रयत्न हे सर्व इरफान खान ने समर्थपणे आणि कमीतकमी संवादात दाखवले आहे.

....

माधवन हा एक तरूण आणि वेल सेटल्ड प्रोफेशनल आहे. समाजाविषयी, लोकांविषयी जागरूक असणारा, प्लॅस्टिकची कॅरीबॅग देणार्‍या फेरीवाल्याला समजावून सांगणे असो किंवा अधिकाधिक लोकांनी सार्वजनिक परिवहनाचा वापर करावा असे सांगून गाडी घेणे शक्य असूनही लोकलने प्रवास करणे असो किंवा परदेशात जाण्याच्या अनेक संधी नाकारून भारतातच राहण्याचा आग्रह असो. बॉम्बस्फोटाच्या दिवशी सुदैवाने, एका परिचिताच्या आग्रहाने फर्स्ट क्लास् ऐवजी सेकंड क्लास मध्ये आल्याने बॉम्बस्फोटातून तो वाचतो. पण ही दुर्दैवी घटना जवळून पाहिल्यानंतर, अनुभवल्यानंतर त्याला जबरदस्त मानसिक धक्का बसतो. नंतर लोकलने जायला घाबरणारा, पॅरानॉयिक झालेला, परदेशात न जाण्याविषयी पूर्वी ठाम असलेला पण आता परदेशातून आलेल्या आपल्या मित्राला 'तू तिथे खरच आनंदी आहेस का?' असे अगतिकपणे विचारणारा असा आपणच आपल्याला घातलेल्या तात्विक बंधनांविषयी संभ्रमित झालेला निखिल माधवनने खूप सुरेख उभा केला आहे.

....

के के हा एक सुशिक्षित पण आर्थिकदृष्ट्या अडचणीत असणारा तरूण आहे. मुस्लिम समाजाविषयी पूर्वग्रह असणारा, बॉम्बस्फोट झाल्यावर मदतीस धावून जाणारा, मुसलमानांकडे संशयाने बघणारा आणि संशय येताच त्याचा स्वतःच पाठपुरावा करण्याचा प्रयत्न करणारा, व्यवसायाची चालून आलेली संधी केवळ आपल्या पूर्वग्रहामुळे नाकारणारा, पुढे काही प्रसंगातून गैरसमज नाहीसा होऊन मोकळेपणाने वागणारा सुरेश के के ने चांगला उभा केला आहे.

....

सोहा अली खान ही एका हिंदी वृत्तवाहिनीची निवेदिका आहे. बाजारू/गल्लाभरू प्रवृत्ती आणि प्रत्येक गोष्टीचा तमाशा करण्याचे बिझनेस मॉडेल, 'अब आप कैसा मेहसूस कर रही है?' हा कुप्रसिद्ध प्रश्न वगैरे टिपिकल वृत्तवाहिनीसाठी ती काम करत असते. तिचा प्रियकर तिला तसे एकदा बोलूनही दाखवतो. बॉम्बस्फोट झाल्यावर तो 'कव्हर' करण्यासाठी ती तातडिने घटनास्थळी पोचते. तिथेही 'कुचकामी प्रशासन, कुचकामी पोलिस' वगैरे टिपिकल सुरू होते. पण त्याच बॉम्बस्फोटात तिचा प्रियकर बळी पडला आहे हे समजल्यानंतर ती बातमीदाराची 'बातमी' होते. प्रियकर गेल्याचे दु:ख, बातमीदार म्हणून त्रयस्थपणे पाहिलेल्या घटना आपल्याबरोबर घडल्यानंतर तिच्या दृष्टिकोनात झालेला बदल सोहा ने चांगला निभावला आहे. तिच्या अश्या अवस्थेतून बातमी मिळवण्याचा प्रयत्न आणि तिच्या कथेवर 'प्राइम टाइम स्टोरी' यातून हिंदी वृत्तवाहिन्यांची बाजारू वृत्ती ठळकपणे चित्रपटात दाखवली आहे.

....

निशिकांत कामत यांचा 'डोंबिवली फास्ट' बराच गाजला होता. प्रेक्षक आणि समीक्षक दोघांकडूनही त्या चित्रपटाने वाहवा मिळवली होती. पण तो चित्रपट बर्‍याच ठिकाणी 'लाउड' वाटला होता. 'मुंबई मेरी जान' मध्ये मात्र वाहवत जाण्यासारख्या बर्‍याच जागा असूनही निशिकांतने कुठेही चित्रपट 'लाउड' किंवा उपदेशपर होणार नाही याची काळजी घेण्याचा पुरेपुर प्रयत्न केला आहे असे वाटते. 'मुंबई मेरी जान' अगदी परफेक्ट नसला तरी पहण्यासारखा नक्कीच आहे.

Comments

उत्सुकता

हे वाचल्यानंतर, चित्रपट बघावासा वाटत आहे. डोंबिवली फास्ट मात्र मला लाऊड वाटला नव्हता. :)
वरील चित्रांंपैकी परेश रावलचे चित्र फारच जबरा आले आहे.

जीवनाकडे बघण्याचा त्याचा दृष्टिकोन 'हे असेच चालायचे' असा आहे

हे त्या चित्रातून स्पष्टपणे दिसते.

अवांतरः काही म्हणा पण हिंदी चित्रपटांचे पोस्टर, ट्रेलर आणि प्रोमो आजकाल झकासच असतात. चित्रपट साधारणतः फालतू असतात. पण हा वेगळा दिसतोय.

असो.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

पूर्ण चित्रपट नाही

डोंबिवली फास्ट मात्र मला लाऊड वाटला नव्हता.

पूर्ण चित्रपट नाही पण काही प्रसंग लाउड वाटले.

वरील चित्रांंपैकी परेश रावलचे चित्र फारच जबरा आले आहे.

परेश रावल एक उत्कृष्ट कलाकार आहे. नव्या दमाच्या अभिनेत्यांमध्ये केके आणि इरफान मस्त आहेत. माधवन तर मुरलेला कलावंत आहेच. सोहाही अश्या ऑफबीट व्यक्तिरेखा बर्‍या करते.

बघीतला

चित्रपट आजच बघीतला. चाकोरीबाहेरचा आणि बर्‍यापैकी वास्तवदर्शी असल्याने बरा वाटला. ऑस्कर विजेत्या क्रॅश चित्रपटाचा दिग्दर्शकावर प्रभाव जाणवला. पात्र निवड सुयोग्य आहे आणि त्यामुळे अभिनयाची बाजू सशक्त आहे. इरफानचे पात्र मात्र तमिळ का दाखवले आहे ते समजले नाही. इरफान हा अतीशय उत्कृष्ट अभिनेता असला तरी तो कोणत्याही अंगाने तमिळी वाटत नाही. परेश रावलचे संवाद मस्त जमले आहेत. 'रुपाली बनी रुदाली 'वगैरे प्रसंगातुन सध्याच्या बाजारु न्यूज चॅनल्स वरती चपखल टीका केली आहे. एकंदरीतच अगदी परफेक्ट नसला तरी पहण्यासारखा नक्कीच आहे हे पटले.

का बरे?

इरफान सारखे दिसणारे अनेक तमिळी बांधव आम्ही पाहिले आहेत.

अवांतरः एका तमिळी मित्राचे नावही इरफान आहे.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

इरफान

इरफानने आता पर्यंतच्या ज्या ज्या भुमिका वठवलेल्या मी पाहिल्या आहेत त्यामूळे मनात जी एक प्रतिमा उभी रहिली ती माहित नाही का ते, पण तमिळी वाटत नाही. तसेच इरफान सारखे दिसणारे तमिळी बांधव माझ्या पहाण्यात नाहित त्यामूळे देखिल असे झाले असावे.

हो

'रुपाली बनी रुदाली 'वगैरे प्रसंगातुन सध्याच्या बाजारु न्यूज चॅनल्स वरती चपखल टीका केली आहे.

हो. ते विसरलोच. रुपाली बनी रुदाली (त्यात तो आजतक वाल्यासारखा दाढीवाला निवेदक) आणि एसएमएस पोल वगैरे चपखल घेतले आहे.

ठिक वाटला

विकांताला हा आणि फुकटात मिळाला म्हणून मान गये मुगले आझम असे दोन चित्रपट पाहिले
मुंबई मेरी जान ठिक वाटला.. पण फार प्रभावित नाहि करू शकला.. डों.फा. मला यापेक्षां नक्कीच जास्त आवडला होता.


बाकी मान गये मुगले आजम !!! .. फुकटात दाखवले तरीही थेटरात जाऊब बघु नये.. घरी केबलवर लागल्यास करमणूक म्हणूनही (दुसरे काहिच बघण्यासारखे नसल्यास) बघावा.. कलाकारांच्या ताकदीच्या मानाने अतिपुचाट चित्रपट

ऋषिकेश
------------------
जगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणारे आणि न समजणारे

परीक्षण आवडले

मोजक्या पण योग्य शब्दांत केलेले परीक्षण आवडले.

अवांतर

बाकी मान गये मुगले आजम !!! .. फुकटात दाखवले तरीही थेटरात जाऊब बघु नये.

अनुभवाचे बोल का काय? -;)

मागमुआ

मागमुआ ची कास्ट तशी चांगली आहे. कथेमध्ये मार खाल्ला असावा. असो. सल्ल्याबद्दल धन्यवाद ;)

कास्ट्

कास्ट धोकादायक असते. रणवीर शौरी आहे म्हणून अग्ली (चित्रपट) और पग्ली (कथा) पाहण्याचा विचार देखील करू नये.

कास्ट .. नका बघु ;)

मागमुआ ची कास्ट तशी चांगली आहे

कास्ट पाहूनच तर मित्राला स्वतःसाठीही रु.२०० भरायला लावले ;) (प्रियालिताई, कसं काय बॉ ओळखलं की चित्रपट चकटफू पाहिला म्हणून ;) )एकदा बाहेर निघायचं पण ठरवलं.. पण भरलेल्या पैशांना (मित्राच्या) स्मरून नशिबाला दोष देत चित्रपट बघत बसलो (चला आपण नशिब वगैरे बोलून अविवेकी आहोत हे जगजाहिर केलं आहे ;) )

ऋषिकेश
------------------
जगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणारे आणि न समजणारे

शशांकराव,

परिक्षणे आवडली , मुंबई मेरी जान पाहावा लागेल. डोंबिवली फास्ट आवडतो.
'दे धक्का' पेक्षा 'दोघात तिसरा आता सगळं विसरा' बरा वाटला. :)

बघावा लागणार...

हा चित्रपट नक्कीच बघण्यासारखा दिसतोय. कधीतरी डिव्हीडी मिळेल अशी आशा करतो.

सुंदर..

सुंदर परिक्षण. हा चित्रपट नक्की पाहणार!

तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

अप्रतीम चित्रपट

शशांक,

तुम्हि जो सार लीहला आहे तो तन्तोतन्त खरा आहे, माझ्या मते फुंक आणी अगली ओर पगलि सारखे चित्रपट बनवण्या ऐवजी

असे चित्रपट तयार करुन लोकांना सत्य परिस्थिति ची जाणीव करुन द्यायला हवी.

चित्रपट व परिक्षण दोन्ही आवडले.

चित्रपट व परिक्षण दोन्ही आवडले...

झकास चित्रपट.. तसंही माझं मुंबईवर प्रेम आहेच. :)

नीलकांत

 
^ वर