अतिरेकी आणि अतिरेक

हे लिहीत असताना गोष्टींची तुलना अथवा समान मानण्याचा मनोदय नाही. फक्त आपल्याकडे मानवी जीवनाचे मूल्य काय आहे हा प्रश्न पडल्यामुळे लिहीत आहे...

जुलैच्या शेवटच्या आठवड्यात बंगलोर आणि अहमदाबाद मध्ये बाँबस्फोटांची मालीका झाली ज्यात ४५-५० निरपराध व्यक्ती जीवनास अकाली मुकल्या. - कारण काय तर अतिरेकी विचारसरणी - देशाच्या, धर्माच्या, राज्यकर्त्यांच्या विरुद्ध...

आँगस्ट ०३, आज, हिमाचल प्रदेशातील नयनादेवी मंदीर येथे जाणार्‍या भाविकांमधे पुढे काहीतरी मारामारी आणि तणाव आहे अशी अफवा पसरली. परीणामी हे लिहीत असताना १४५ निरपराध व्यक्ती जीवनास मुकल्या. भक्तीने देवळात जात असताना स्वतःच्या अथवा इतरांच्यात तयार झालेल्या भितीच्या अतिरेकाला बळी पडल्या.

यातील कुठलीच गोष्ट धर्मासाठी झाली नाही आणि भक्तीपोटी झाली नाही. एक द्वेषाने तर दुसरी भितीने...

पहील्या बातमीत "आमचे स्पिरीट किती ग्रेट!" असे म्हणत तमाम जनता "पुन्हा आपुल्या कामी लागली " - मनात कुठेतरी भिती राहीली पण असेल, तसेच सामान्य माणसे काय करणार हे जितके खरे तितकेच सरकारला विचारण्याचे काम ना धड जनता करते आहे (करू शकण्याच्या मर्यादा लक्षात घेऊन) तर दुसरी कडे सर्व शक्ती हातात असून देखील माध्यमे काही करणार नाही...

दुसर्‍या बातमी संदर्भात मानवी मूल्य तर अजिबातच नाही... इतक्या गर्दीत जावे का हा मुद्दा नाही तर कुठलेच लोकशिक्षण नाही, कुठलीच "इमर्जन्सी रिस्पॉन्स सिस्टीम" नाही अथवा असून नसल्यातच जमा...

आपल्याला काय वाटते?

Comments

कळीचा मुद्दा

मानवी जीवनाचे मुल्य भारतात शुन्य नव्हे तर शुन्याच्या पलिकडले आहे हे वास्तव आहे. लोकसंख्येचा अतिरेक असल्याने लोकांना अतिरेकीपणा फारसा वेगळा वाटत नाही. भारताच्या अशा अनेक मुलभुत समस्यांचे मुळ लोकसंख्येत आहे.

संवेदनाहीनता

भारतातील लोकसंख्येच्या अतिरेकामुळे म्हणा किंवा मूलभूत / अंगभूत कातडीबचाऊपणामुळे म्हणा आपल्याला या घटनांचे काहीच सोयरसुतक वाटेनासे झाले आहे. गेंड्याची कातडी / संवेदनाहीनता वगैरे.

"आपण काय करणार?","ज्याचे जळते त्यालाच कळते", " आले देवाजीच्या मना...", "जीवनाचा काय भरवसा?" असे उद्गार ऐकू येतात त्यावेळी "हे टाळता आले असते" ही जाणीवच आता लोकांना होत नाही की काय असे वाटते.
भारतीय शामळू जनमानसाचा सुप्रसिद्ध उद्गार,"चालायचंच!"आता घराघराचा घास घेत आहे. याचे वैषम्य वाटण्याऐवजी "आमचे स्पिरीट किती ग्रेट!" असे म्हणून स्वतःची पाठ थोपटण्याचा निर्लज्जपणा आपण करत आहोत. हा निर्ढावलेपणा भारतातल्या जनतेच्या जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टीकोनातच उथळपणा आला आहे हेच सिद्ध करतो.

परवाच येथे झालेल्या गौतमी एक्स्प्रेस अग्नीकांडातसुद्धा हा दुष्टपणाच्या जवळपास पोचणारा भावनाशुष्कपणा पोलिस, बघे, रेल्वे अधिकारी, डॉक्टर्स या सर्वांमध्येच दिसून आला. या विपरित उदाहरणे अगदी बोटावर मोजण्याइतकी. (प्रमाण १०००:१)

आता रेल्वे चौकशी होईल , ... रेल्वेत अग्नीनिरोधक यंत्रणा बसवावी, रेल्वेडब्यातील ज्वलनशील घटक - प्रामुख्याने कृत्रिम फोमच्या सीट बदलून अग्नीनिरोधक पदार्थ वापरावेत, आग लागल्यास रेल्वे आपोआप थांबेल अशी यंत्रणा बसवावी इ. इ. मागण्या होतील. ...काही दिवसांनी त्या ऐकू येणे बंद होईल....लोक विसरून जातील. मग काही दिवसांनी पुन्हा असे एक अग्नीकांड, पुन्हा आक्रोश, पुन्हा चौकशी, पुन्हा मागण्या............

परतण्याच्या बिंदूच्याही पुढे भारत पोचला आहे अशी दुष्ट शंका भेडसावते.

पुर्णपणे सहमत

सगळ्या मुद्दांशी सहमत. पण राहून राहून एक प्रश्न येतोच कि कोणासाठी किती भावना आणि कोणी दाखवायच्या? भारताची लोकसंख्या किती? हा आकडा सुद्धा वाचता येत नाही. :) त्यामुळे कधी कधी वाटून जाते कि आज इतर काही लोकं आहेत. उद्या आपला सुद्धा नंबर असेल. आणि असला तर एका अर्थाने बरे आहे असे हि वाटून जाते.
तसे पहायला गेले तर भारतात शहर/गाव यांच्या समस्या इतक्या आहेत कि त्या संपतील असे वाटतच नाहीत. का संपणार नाहीत? असे विचार केला कि उत्तर मिळते की आज एका ठिकाणी ठिगळ लावले की दुसरीकडे फाटलेले आहेच. आता ठिगळेच इतकी आहेत की नक्की खरा कपडा कुठला तेच कळत नाही. जरा कुठी ठिगळ लावायचे नाही असे वाटले मग ओरबाडून घेणारे/फाडणारे आहेतच. कधी धर्माच्या नावाखाली, जातीच्या अथवा स्तराच्या. प्रत्येकाच्या समस्या स्वतःच्या हाता बाहेर गेल्या आहेत. जगायची इच्छा प्रत्येकालाच असते. मग ज्याला जगायला मुलभुत गोष्टींची गरज भागवता येत नाही तो मग हिसकावून घेतो. अथवा देवाकडे साकडे घालायला जातो. वरच्या दोन्ही घटना काही प्रमाणात या लोकांच्या मुळे झालेल्या आहेत.
स्वतःच्याच समस्या सोडवण्यात सामान्य भारतीय इतक्या जेरीस येतात की त्यांना दुसर्‍यांच्या भावनांना किंमत द्यावी असे वाटतच नाही.

अडाणीपणा दुसरं काय !!!

इतक्या गर्दीत जावे का हा मुद्दा नाही तर कुठलेच लोकशिक्षण नाही, कुठलीच "इमर्जन्सी रिस्पॉन्स सिस्टीम" नाही अथवा असून नसल्यातच जमा...

नैनादेवी च्या दर्शनासाठी झालेली चेंगराचेंगरीत दिडशेच्या जवळपास दर्शनार्थी मरण पावले, या घटनेचे प्रचंड वाईट वाटलेच, त्याहीपेक्षा वाईट वाटले ते हे की, नैनादेवीच्या समोर मृतदेहांचा खच पड्ला तरी भाविकांच्या संखेत घट झाली नाही. पाय-यांवर मृतदेह पड्लेले असतांना भावीक दर्शनाला गर्दी करतच होते.... भक्त कोणत्या संवेदनशिलतेची असतील त्याचा विचार सारखा घोंगावतोय.
माढरदेवी यात्रेतील चेंगरा चेंगरी अशीच, पण उपाययोजना शुन्य. उपाययोजना केल्या तरी श्रद्धेपुढे आणि वाढणा-या गर्दीपुढे सर्व हतबल आहेत. अजून भविष्यात कितीतरी घटना या अशाच होणार आहेत. वरील घटनेची न्यायधंडाधिकारीय चौकशी होईल आणि पुन्हा पुढील घटनेची वाट पाहावी लागेल. श्रावणाचा महिना तर देव-धर्माचा महिना, अजून किती संकटे वाढवून ठेवली आहेत कोणास ठाऊक !!!

सुख, समाधान, शांती, धन, मान, ऐश्वर्य, यासाठी देवाच्या दारात गर्दी करणारे पाहिले की चीड येते. जाण्याला हरकत नाही हो पण प्रचंड गर्दीत कोणतेचे नियोजन नाही, आणि श्रद्धे बरोबर स्वत:ची बेफीकीर वृती ...त्यामुळे अशा घटना घडतात,थोडा वेळ हळहळ करायची आणि पुन्हा आपण आपल्या कामाला जुंपून घ्यायचे या पेक्षा आपण करणार तरी काय ?

हेच म्हणायचे होते...

नैनादेवीच्या समोर मृतदेहांचा खच पड्ला तरी भाविकांच्या संखेत घट झाली नाही. पाय-यांवर मृतदेह पड्लेले असतांना भावीक दर्शनाला गर्दी करतच होते....

हेच म्हणायचे होते...ह्यात श्रद्धावगैरे कसली आली?

कालानुरूप विषय

(दोन विषय आहेत हे विकास यांनी स्पष्ट केलेलेच आहे.)

देश- किंवा धर्म-भक्तीच्या विपरित कल्पनांमुळे सामान्य माणसाचे माणूसपण विसरणे, त्यांना सर्वांना बळी देण्यास योग्य शत्रू मानणे, आणि स्फोट घडवणे वेगळे.

भक्तिभावामुळे गर्दी करणे, आणि चेंगराचेंगरीत आपला पाय कोणावर पडतो आहे त्याच्याकडे दुर्लक्ष देणे, ही वेगळी गोष्ट. चेंगराचेंगरीत अडकलेल्या व्यक्तीला आपण कुठे पाय देत आहोत त्याबद्दल कदाचित काहीच पर्याय नसेल. मला याचा काही वेळा प्रत्यय आला आहे. (१) मुंबईतल्या लोकलमध्ये - गर्दीच्या वेळी - विशेषतः चढता-उतरताना माझ्या पायाखाली काय आहे त्याच्याकडे माझे मुळीच लक्ष नसते. (२) हरिद्वार येथे हरकी पौडी येथे दिव्यांची आरती बघताना - याच हरकीपौडीच्या पुलावर पुढे काही वर्षांनी चेंगराचेंगरी झाली होती, मी असताना असे काही झाले असते, तर मला आश्चर्य वाटले नसते, आणि त्या गर्दीबरोबर वाहात जाण्यावेगळे मी काहीच केले नसते.

चीड येईपर्यंत वाईट कसले वाटते त्यावर बिरुटेसरांनी, विकास यांनी बोट ठेवलेले आहे:

नैनादेवीच्या समोर मृतदेहांचा खच पड्ला तरी भाविकांच्या संखेत घट झाली नाही. पाय-यांवर मृतदेह पड्लेले असतांना भावीक दर्शनाला गर्दी करतच होते....

पण सांगण्यास लाज वाटते, की काही प्रमाणात माझे वागणे असेच काही असते. हायवेवर गाडी चालवताना पुढे खूप मोठा अपघात झाला असला, वाहातुक खोळंबली असली म्हणा. तर माझ्या मनात फक्त क्षणभरच त्या अपघातात म्ररण पावलेल्या, दुखापत झालेल्या लोकांच्या विचाराने धस्स् होते, कळवळून येते. लगेच "कामाच्या ठिकाणी वेळेवर कसे पोचीन, नाटकाची वेळ चुकेल, इ.इ..." असलेच क्षुद्र विचार घोंघावू लागतात. मग "करा हो बाजूला त्या पिचलेल्या गाड्या - एक लेन तरी मोकळी असली तर मला पुढे जाता येईल" इतकाच विचार असतो. हे माझ्या मनाचे वागणे, तर मग दुसर्‍यांकडून मी काय अपेक्षा करावी? "आता इतके दूर आलो आहोत, तर देवदर्शन करूचया - मुडदे बाजूला करणे पोलिसांचे काम" असे नैनादेवीच्या भक्तांचे म्हणणे, आणि "आता एवढे दूर आलोच आहे, अपघाताच्या बाजूने गाडी काढून कामाला जाऊच या - मुडदे बाजूला करणे पोलिसांचे काम" असे माझे म्हणणे - या दोहोंत फरक काय? कोणाच्या जिवापेक्षा माझे काम महत्त्वाचे आहे काय? कोणाच्या जिवापेक्षा देवीची भक्ती महत्त्वाची का?

अशा बाबतीत, मला वाटते, आधीच गर्दीचे उत्तम नियोजन करणे, आणि आपत्कालीन सेवा उपलब्ध असणे हे महत्त्वाचे. नागरिक म्हणून ही तरतूद आपण गर्दीत नसताना, कामाच्या घाईत नसताना करू शकतो. अशा वेळी आपण नैतिक जबाबदारी जाणून काही करण्यास समर्थ असतो. (ऐन गर्दीत आपल्या अंगात सामर्थ्य नसते, आणि घाईत आपले मन कार्यक्षम नसते.)

चाणक्य यांचा लोकसंख्येबाबत मुद्दा ठीकच आहे. पण तरी जत्रेजत्रेत फरक आहे. आता एखाद्या खेड्यातल्या दैवताला अजूनही थोडेच लोक येतात तिथे अशा मोठ्या प्रमाणात अपघात होत नाहीत. दुसर्‍या कुठल्या दैवतावर श्रद्धा असलेले, दुरून येणारे भाविक लाखोनी असतात. लोकसंख्येची बाब मनात आणून, त्यात्या दैवतासाठी ज्या प्रमाणात भाविक अपेक्षित आहेत, त्या प्रमाणात जय्यत तयारी असावी.

(दर दोन-तीन वर्षांनी हजच्या यात्रेत चेंगराचेंगरी होते, त्याची आठवण होते. तिथे तर जगाभरातले मुसलमान जातात. त्यांचा भाव आहे, तर हज बंद पडू शकत नाही. पण किती लोक येणार ते जाणून नियोजन करणे फार-फार महत्त्वाचे!)

काहीसा सहमत पण!

काहीसा सहमत आहे. शेवटी प्रत्येकाच्या आयुष्यात 'मी'च महत्वाचा असतो.

किती लोक येणार ते जाणून नियोजन करणे फार-फार महत्त्वाचे!
असे जाणीवपूर्वक नियोजन करण्याचे प्रशिक्षणच नसते. आणि कसे करणार नियोजन?
'कोणत्या देवळात वर्षातल्या विशिष्ट काळांमध्ये किती लोक येतात' याची आकडेवारी आहे का कुणाकडे?

कोणत्याही ठिकाणी आकडेवारी मिळणार नाही. कारण प्रत्येक 'संस्थाना'ला आपले देऊळ कसे जास्त पापुलर आहे हे सांगण्याची पडलेली आहे. जोवर अपघात या संदर्भात देवळाच्या विश्वस्तांना जबाबदार ठरवणारा कायदा येत नाही तोवर काही खरे नाही.
सगळीच जबाबदारी पोलिसांची कशी?
तुमचे देऊळ आहे. लोक तुमच्याकडे येतात तर त्यांना नियोजित प्रकारे दर्शन घडवण्याची तुमची जबाबदारी काहीच नाही???

आपला
गुंडोपंत

अहो असं कसं म्हणता?

विकास भाऊ, असं कसं म्हणता? भारतात मानव जीवनाला किंमत आहे तर... हे बघा विमानातून मरण पावल्यास १० किंवा १५ लाख, ट्रेन मधून मरण पावल्यास (आणि व्यक्ती बिहार ची असल्यास) किमान ५ लाख, एसटी मधून मरण पावल्यास २ लाख, चेंगराचेंगरी/अतिरेकी हल्ला ह्यामधे मेल्यास प्रत्येकी १ लाख, आणी दूर गावात नक्सलवादी हल्ल्यात मेल्यास कुणी कुत्र पण येणार नाही... अर्थात जेवढा मोठ्या साधनातून मराल तेवढी जास्त किम्मत, आणि हा सरकारी रेट आहे बरं का? आणि हे पैसे पण तेव्हां मिळतील जेव्हां कलेक्टोरेट मधील बाबुंना काही परसेंटेज मिळेल... कळलं का? "मेरा भारत महान" उगाच नाही बोंबलत...
http://sureshchiplunkar.blogspot.com

 
^ वर