हरवत जाणारा कला वारसा

हरवत जाणारा कलावारसा
आजी-आजोबांच्या वस्तू ही मालिका वाचतांना-बघतांना " हे आतां परत दिसणार नाही " याची एक हुरहुर मनाला लागून रहाते; तसेच वाटत रहाते महाष्ट्रातील एक कला वारसा कायमचा डोळ्याआड होणार म्हणून. मला आज सांगावयाचे आहे " भित्त्ती-चित्रां ’ बद्दल. पेशवाईच्या काळापासून मराठी राजकर्ते-सरदार यांच्या गढ्या-वाड्यांमध्यें भिंतींवर चित्रे काढून घेण्याची पध्दत होती. पूर्वी देवळांमध्येच [उदा. अजंठा}दिसणारी चित्रकला आता थोडिशी सुबत्ता आल्यामुळे व उत्तरेशी संबंध वाढल्यामुळे म्हणा घरांमध्येही दिसू लागली. मेणवलीचा नाना फ़डणींसांचा वाडा सर्वांना माहीत असलेले उदाहरण. मेणवलीच्या वाड्याची अनास्था आणि भेट देणाऱ्यांच्या मूर्खपणा - निष्काळजीपणा याने जवळजवळ वाटच लागली आहे.माझ्या माहितीप्रमाणे अजून वाईमध्ये थोडे वाडे आहेत
कीं जिथे तुम्हाला अजून या कलेचे दर्शन घडू शकते. पण काही दिवसच.लवकरच ते वाडे पडतील-पाडले जाऊन तेथे नव्या इमारती उभ्या रहातील. भर्तृहरी म्हणून गेला आहेच ’ कालाय तस्मै नम; " हे दु:खद पण अटळ आहे. असो.
आज या चित्रांची अवस्था चांगली नाही. दोनएकशे वर्षांच्या दीर्घ काळामुळे ती बरीच खराब झाली आहेत. पाश्च्यात देशांत Restore करून ती सुस्थितीत आणली गेली असती.येथे ते शक्य नाही. तरीही माझ्या अल्प मतीने फ़ोटोशॉपवर थोडा प्रयत्न केला आहे.चित्रे बघतांना, त्या काळातील चित्रकार ,त्याच्यावरील संस्कार अजाणता कसे चित्रीत करतो हे पाहण्यासारखे आहे. बहुतेक चित्रे धार्मिक प्रसंगांवरचीच आहेत. मुसलमान राजवटीचा व तत्कालीन समाज व्यवेस्थेचा परिणाम चित्रात दिसून येतो.
पहिले चित्र दशावतारावर आहे. वामन, परशुराम व राम-लक्ष्मण यांची एक पट्टिका आहे. त्यातला परशुराम - सहस्रार्जुन युध्दाचा प्रसंग खराब भाग पुन;चित्रीत केलेला [Restore] आहे. परशुराम हा ॠषींचा, वनांत रहाणारा, मुलगा. पण तो विष्णूचा अवतार म्हणून त्याला मुगुट, अलंकार व सहस्रार्जुन राजा असूनही त्याला फ़क्त[शिन्देशाही] पगडी ! परंतु दोनशे वर्षांपूर्वीच्या चित्रकाराबद्दलच कशाला बोला,विसाव्या शतकातील , चित्तपावन संमेलनातील ,परशुराम हा भारतीय वेषभूषा
घालणारा, शस्त्रे घेतलेला,पाश्चिमात्य Bodybuilder वाटतो ! Rambo !! भारतीय चित्र-शिल्प कलेशी पूर्णत; विसंगत.
Menawali  12

parashuram-4 "

दुसरे चित्र खास मराठमोळा आहे.खेडेगावामधील गढीमध्ये आंघोळीकरता पाटलीणबाई दगडावर बसल्या आहेत. पाणी काढण्यास - घालण्यास दोन दासी
आहेत. घंगाळॆ -तांब्या तयार आहे.वातावरण निर्मिती सुरेख. तीघींच्या अंगलटी,नेसूं , खास मराठी. दरवाज्यातून दृष्य एकदम त्रिमिती-भास निर्माण करण्यास सफ़ल. एखादे miniature पहात आहोत असे वाटते.
Menawali   7

Menavali-2 copy

तिसरे चित्र कृष्णाचे आहे. हा एकच अवतार असा की जो जनमानसाने पूर्णत: आपल्या भावविश्वात सामावून घेतला. घरातील आयाबायांना तो आपल्याच
माजघरांत रांगणारा बाळ वाटतो तर मुलांना आपल्या खेळातील सवंगडी ! गाई चरावयाला सोडल्यावर, जराशी मोकळी जागा बघून, सर्वजण लगोरी खेळण्यात दंग झाले आहेत. चित्र सुस्थितीत असल्याने बदल केलेला नाही.

Pat  Wada  Wai - Lagori समित्पाणी

लेखनविषय: दुवे:

Comments

सुरेख !!!

माहिती आणि भित्तिचित्रे सुरेख !!! फ़ोटोशॉपवर कोणते बदल केले ते कसे कळणार आम्हाला !!!
अर्थात असे बदल कळू नये हीच तर खरी कारागिरी !!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुंदर लोककला

काही भोळी काही बिलंदर, काही अल्लड काही भावूक... हे लोककलेचे वैशिष्ट्य.
सहस्रार्जुनाला शिंदेशाही पगडी घातली ती मोठी गमतीदार आहे. पौराणिक कथा कलाकाराच्या कल्पनेत समकालीन झालेली (पुलंच्या हरितात्यांसारखी) जगण्यात एक सौंदर्यानुभव आहे, तो या चित्रांत सापडतो आहे.

शरद यांनी जमतील तितक्या भित्तिचित्रांना कॅमेर्‍याने नोंदवून ठेवावे. चित्रांचा संच प्रकाशित करावा. माझ्या बघण्यात ही चित्रे नाहीत, पण पुन्हा कधी जुन्या वाड्यांत जायचा प्रसंग आला तर आता माझ्या डोळ्यांना चित्रे शोधणारी नजर आली आहे. धन्यवाद!

(ता.क. फोटोशॉप केलेले आणि न केलेले असे दोन्ही प्रकार प्रकाशित संचात असावेत.)

सुरेख माहितीपूर्ण लेख! | सिक्स पॅक ऍब

शरदराव, आणखी एक सुंदर माहितीपूर्ण लेख! रिस्टोरेशनचा प्रयत्न चांगला जमला आहे.

विसाव्या शतकातील , चित्तपावन संमेलनातील ,परशुराम हा भारतीय वेषभूषा घालणारा, शस्त्रे घेतलेला,पाश्चिमात्य Bodybuilder वाटतो ! Rambo !! भारतीय चित्र-शिल्प कलेशी पूर्णतः विसंगत.

हो ती चित्रे पाहिली होती. सिक्स पॅक ऍब असलेले आणि पैलवानाच्या पोजमध्ये अभे असलेले परशुराम पाहून गंमत वाटली :)

माहितीपूर्ण लेख

लेख आणि चित्रे दोन्ही आवडली.

पाटलीण बाईंच्या चित्राबद्दल आपल्याला खात्रीलायक माहिती मिळाली की केवळ अंदाजाने लिहिले आहे?

माझ्या अंदाजाप्रमाणे पाटलीण बाई आंघोळीला बसल्या नसून त्यांची मुलगी किंवा घरातील कोणी तरूण नातेवाईक आंघोळीला बसली आहे. स्वतः मालकिणबाई तिला साबण(?) /दगड/ रिठे असे काहीसे चोळत आहेत आणि दासी पाणी घालत आहे. बसलेल्या स्त्रीचा साजशृंगार बघा. ती काही दासी नाही. दागिन्यांनी मढलेली आहे. तिच्या डोक्यावर पदर नाही. केसांचा खोपा असावा म्हणजे बाई ब्राह्मणी वाटते. पाणी घालणार्‍या बाईच्या अंगावर दागिने बघा - फार कमी आहेत, डोक्यावर पदर आहे. ही दासी असावी.

चू. भू. द्या. घ्या.

पाटलीणबाई

शरद
एकदम मान्य,प्रियालीताई. खात्रीलायक माहिती मिळावयास ही वस्तु-संग्रहालयातील चित्रे नाहीत. अंदाजाने लिहले हे खरेच.
शिवाय, आई हौसेने लेकीला न्हाऊं घालते आहे ही कल्पनाही जास्त रम्य आहे. विशेषत: माहेरवाशिणीला,वा ! छान !
आतां खोपा घातला म्हणून " ब्राह्मणी " याबद्दल काहीच माहिती नाही; पण चौकशी करीन. [कुणाकडे ? ]
अवांतर : प्रियालीताई, आम्ही लक्ष्मणाच्या पंथातील पांथस्थ. स्त्रीयांच्या दागिन्यांकडे लक्ष नसते हो !
समित्पाणी

लक्ष्मणपंथ :-)

खात्रीलायक माहिती मिळावयास ही वस्तु-संग्रहालयातील चित्रे नाहीत. अंदाजाने लिहले हे खरेच.

अशी चित्रे तुम्हाला मिळत गेली तर इथे जरूर लावत जा. ती बघायला, त्या निमित्ताने त्याकाळातील संस्कृती समजून घ्यायला आवडेल. मेणवलीच्या वाड्यात आणखीही काही चित्रे आहेत का?

ब्राह्मणी स्त्रिया केसांचा खोपा घालत. श्रीमंत स्त्रिया त्यात सुवर्णफूल वगैरे खोवत. ब्राह्मण स्त्रिया कधी डोक्यावरून पदर घेत नाहीत. ही प्रथा मराठ्यांची आणि बिगर ब्राह्मण जातींची(बहुधा काही मुसलमानी प्रथा अंगवळणी पडल्याने असावी)

अवांतर :

प्रियालीताई, आम्ही लक्ष्मणाच्या पंथातील पांथस्थ. स्त्रीयांच्या दागिन्यांकडे लक्ष नसते हो !

हाहा! एक क्षण लक्ष्मणपंथाचा अर्थ लागला नाही पण कळला चटकन.

लक्ष्मणपंथ

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
रावण सीतेला आकाशमार्गे लंकेला नेत असता सीतेने आपले काही अलंकार खाली टाकले.ते वानरांना सापडले. त्यांनी रामलक्ष्मणांना दाखवले.त्या प्रसंगी लक्ष्मण म्हणतो:

नाहं जानामि केयूरे,नाहं जानामि कुण्डले|
नूपुरे त्वैव जानामि नित्यं पादाभिवन्दनात् |

केयूर = बाहुबंध (बाजूबंद)
....आपल्या भाभीचे पायलागू अभिवंदन करणारा देवर हिंदी चित्रपटांत/मालिकांत आजही दिसतो.

मस्त

विसंगत चित्रकला मजेशीर व तुमचा फोटोशॉप टच दर्जेदार!

शरदजी तुमच्या नजरेला व कलेला दाद देतो.

तुमचे लेख नेहमीच वैशिष्ट्यपुर्ण असतात.

सहमत

आहे. लेख आवडला.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

कलेचा वारसा

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.शरद् यांचा "लोप होत चाललेला कलावारसा'' हा लेख नावीन्यपूर्ण आहे. फोटोशॉपच्या सहाय्याने त्यांनी चित्रांचा जीर्णोद्धार उत्तम केला आहे.कलास्वादाविषयींचे त्यांचे लेखनही वाचनीय आहे.मात्र ते त्रोटक वाटते. अधिक विस्ताराने लिहिले असते तर वाचायला आवडले असते.
प्रियाली यांनी नोंदवलेले पाटलीण चित्राचे निरीक्षण अगदी पटण्यासारखे आहे.चित्रात काय पाहावे याचा हा लहानसा वस्तुपाठच आहे.त्यांनी चित्रांच्या रसग्रहणाविषयी सचित्र लेख लिहावा.
श्री.शरद यांनी दिलेल्या चित्रांत प्रत्येक व्यक्तीचा चेहरा बाजूने(प्रोफाईल) दाखवला आहे.ही एक प्रकारची चित्रशैली असावी.'रामविजय' , हरिविजय, अशा ग्रंथांत या प्रकारची चित्रे(कृष्णधवल) पाहिल्याचे स्मरते.

नवनाथ

नवनाथांच्या पोथीमध्येही अशा प्रकारची चित्रे पाहिली आहेत. मच्छिंद्रनाथ, गोरखनाथ, कानिफनाथ यांची द्विमिती चित्रे फार मनोरंजक होती. गुरुला आवडणारे वडे मिळवण्यासाठी स्वतःचा डोळा काढून देणारा गोरक्ष (अगदी डोळ्यावर हात वगैरे ठेवून आणि बाजूला रक्ताचे थेंब खाली पडत आहेत वगैरे) फारच मस्त.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

फार उत्तम

फार उत्तम आणि नाविन्यपूर्ण लेख. अभिनंदन.

मी मागे एकदा मेणवलीला मित्रासोबत गेलो होतो. माझ्या मित्राला वाड्यातील या भित्तीचित्रांविषयी माहिती होती आणि तो त्यांचे महत्त्वसुद्धा जाणतो. वाड्याच्या दारातच आम्हाला फडणवीस भेटले. त्यांनी उत्सूकतेने आमची विचारपुस केली आणि आम्हाला वाडा आणि चित्रे बघायची आहेत हे ऐकून कौतूकाने एका माणसाला आमच्या सोबत आत धाडले. त्याने खोल्यांची कुलुपे उघडून आम्हाला ती चित्रे दाखवली. पण कॅमेरा सोबत नसल्याने चित्रे टिपता आली नाहित.

आपण केलेले काम महत्त्वाचे आणि स्तुत्य आहे.

वाईच्या काही देवळांवर (उदा. ढोल्यागणपती) आणि वाड्यांवर चून्यातून केलेली भिंतीवरील शिल्पे आहेत त्यांना 'थक्कू' की असेच काही नाव आहे. (मला विशेष माहिती नाही..अशीच ऐकिव !) ती सुद्धा कालौघात वाहून विरुन जाणार.
--लिखाळ.

पौराणिक पात्रांच्या वेशभूषा

विषयाशी थोडे अवांतर होईल परंतु ,शरद यांनी लेखात लिहिल्याप्रमाणे पौराणिक पात्रांच्या वेशभूषा हा एक अभ्यासाचा (का विनोदाचा?) विषय व्हावा.

परशुराम हा ॠषींचा, वनांत रहाणारा, मुलगा. पण तो विष्णूचा अवतार म्हणून त्याला मुगुट, अलंकार व सहस्रार्जुन राजा असूनही त्याला फ़क्त[शिन्देशाही] पगडी ! परंतु दोनशे वर्षांपूर्वीच्या चित्रकाराबद्दलच कशाला बोला,विसाव्या शतकातील , चित्तपावन संमेलनातील ,परशुराम हा भारतीय वेषभूषा घालणारा, शस्त्रे घेतलेला,पाश्चिमात्य Bodybuilder वाटतो ! Rambo !! भारतीय चित्र-शिल्प कलेशी पूर्णत; विसंगत.

उदा. परशुरामाचे हे आणखी एक चित्र बघा

बर्‍याचदा चित्रकार आपल्या समोर येणार्‍या व्यक्ती, पोशाख, राहणीमान हेच चित्रांत दर्शवतात. त्याचबरोबर त्यांच्या मनातील सुप्त प्रतिमाही तिथे मूर्त स्वरूप घेते. चित्राचा काळ, तत्कालीन जीवनमान इ. चा त्यांना विसर पडताना दिसतो. सिक्स ऍब्जवाला परशुराम कोणा नवशा-गवशाने काढला असे मानले तरी मोठमोठ्या चित्रकारांनीही बरेचदा असा विचार केल्याचे आढळत नाही. किंबहुना, त्यांनी तो विचार केला असता तर त्यांची चित्रे लोकांना आवडली असती का हा प्रश्न उद्भवतो.

राजा रविवर्मा यांची चित्रे यांत मोडतील. उदा. हे टेलरमेड ब्लाऊज घातलेल्या सरस्वतीचे चित्र.

किंवा कृष्ण यशोदेचे हे चित्र. यातील यशोदा ही ५००० वर्षांपूर्वीच्या स्त्रिचे दागिने, आभूषणे, वस्त्रे ल्यालेली नसून अठराव्या-एकोणिसाव्या शतकातील स्त्रिचा पोशाख ल्यालेली आहे हे समजते.

परंतु रवि-वर्मांची चित्रे अतिशय प्रसिद्ध होण्याचे एक कारण ती तत्कालीन संस्कृतीशी साधर्म्य साधणारी होती हे ही असावे. चू. भू. दे. घे.

सहमत

कलाकारावर तत्कालिन विचारांचा प्रभाव असतो आणि तेच त्याच्या कलेतून अविष्कृत होते याबद्दल सहमत. त्याचमुळे त्या त्या कालखंडातील कलाविष्कार समाजिक आचार, विचार, निष्ठा यांवर प्रकाश पाडत असतात.
रविवर्म्याच्या चित्रातील यशोदा ही काही वर्षांपूर्वीची मासिकाच्या पृष्ठावरिल नागरी, पुरुषप्रधान समाजातील 'आई' दिसते. गोकुळातली य्शोदा मात्र या पेक्षा जास्त स्वच्छंदी, मुक्त आणि बाळकृष्ण अधिक अवखळ असेल.
--लिखाळ.

 
^ वर