लीड्समधील वैद्यकीय सेवा

दोन वर्षांपूर्वी मी दोन महिने इंग्लंडमधील लीड्स या गांवी जाऊन राहिलो होतो. तिथे मला आलेले अनुभव या लेखात दिले आहेत. सुदैवाने त्या काळात मी आजारी पडलो नाही. त्यामुळे तिथल्या डॉक्टरांनी केलेले रोगाचे निदान, त्यावरील औषधोपचार आणि त्याचा उपयोग किंवा परिणाम यासंबंधी मी कांही लिहू शकत नाही. त्या जागी गरज पडल्यास कशा प्रकारची वैद्यकीय सेवा उपलब्ध होती त्याचा थोडा अंदाज तेवढा आला.

आपल्या शहरातल्या डॉक्टरांना आपण एरवी कितीही नांवे ठेवत असलो तरी मनातून आपल्याला त्यांचाच केवढा आधार वाटत असतो हे बाहेरगांवी गेल्यावर लक्षात येते. मागच्या महिन्यात मैसूरसारख्या रम्य गांवी गेलो होतो आणि चांगले मजेत रहात होतो. पण किंचित प्रकृती अस्वास्थ्य वाटायला लागताच आपल्या मुंबईला परत यावेसे वाटायला लागले. परदेशात गेल्यावर तर ही भावना अधिकच प्रकर्षाने जाणवते. मागे लीड्सला जायला निघण्यापूर्वी सर्दी खोकला, ताप, अपचन यासारख्या सामान्य रोगांवर आपल्याला लागू पडणारी सगळी औषधे आणि डेटॉल, कापूस, बँडएड आदि प्रथमोपचाराचे सामान मुद्दाम बरोबर नेले होते. मेडिक्लेमचा विमा काढला होताच. इंग्लंडमधील राहणी इथल्यापेक्षा चांगल्या दर्जाची असल्यामुळे तिथे सरस वैद्यकीय सेवा उपलब्ध असणारच असा ढोबळमानाचा विश्वासही होता, पण मनात कुठे तरी थोडी अस्वस्थता होती.

आरोग्याचा विमा काढला असला तरी पॉलिसीचा कागद कांही आपल्याला बरे करत नाही. डॉक्टरांकडून उपचार करून घेतल्यानंतर त्यावर खर्च झालेले पैसे क्लेम करण्यापुरताच त्यांचा उपयोग असतो. त्यामुळे तिथे गेल्यावर तिकडचे धन्वंतरी कुठे भेटू शकतात याचा शोध हळू हळू सुरू केला. पण आमच्या गल्लीच्या आसपासच नव्हे तर सिटी सेंटरच्या गजबजलेल्या भागातसुध्दा मला कुठल्या डॉक्टराच्या नांवाची एकादी पाटीसुध्दा दिसली नाही. आपल्याकडल्या कोणत्याही शहरात मध्यमवर्गीयांच्या वस्तीत पंधरा मिनिटे फिरलात तर डॉक्टरांच्या नांवाचे पांच दहा तरी बोर्ड दिसतात. इंग्लंडमधले डॉक्टर लोक असतात तरी कुठे आणि रोगी त्यांना कसे शोधून काढतात याची उत्सुकता मला स्वस्थ बसू देईना.

मुलाला त्याबद्दल विचारता त्याने सांगितले की तिथली सरकारी आरोग्यसेवा अत्यंत चांगली आहे आणि बहुतेक लोक त्याचाच लाभ घेतात. शहरात जागोजागी असलेली मोठमोठी हॉस्पिटले मला दिसली होतीच. ती चांगली सुसज्ज असतात आणि तिथे रोग्यांचा बजबुजाट नसतो. त्यातल्या कोठल्याही विभागात सहजपणे एपॉइंटमेंट मिळते. त्याच दिवशी भेटण्याची वेळसुध्दा तासभर आधी ठरवून ती कसोशीने पाळली जाते. आणीबाणीसाठी ट्रॉमाकेअर युनिट्स असतात तिथे मात्र रुग्ण येताच लगेच त्याचेवर उपचार केला जातो. त्याखेरीज शहराच्या वेगवेगळ्या भागात हेल्थ सेंटर्स असतात. लहान सहान तक्रारीसाठी रोगी तिथे जातात. हॉस्पिटल किंवा हेल्थ सेंटरमध्ये जाऊनच डॉक्टर त्या लोकांना तपासून त्यांचेवर उपचार करतात किंवा त्यांना औषधे लिहून देतात. पेशंटच्या घरी व्हिजिट करणे वगैरे गोष्टी तिकडे कधीच कालबाह्य झाल्या असाव्यात. डॉक्टरचे स्वतःचे खाजगी नर्सिंग होम असणे सुध्दा दुर्मिळ झाले होते.

सुदैवाने माझ्या मुलाला किंवा सुनेला डॉक्टरला भेटण्याची फारशी गरज पडली नव्हती, पण नियमित तपासण्या करून घेण्यासाठी किंवा उपचारासाठी मुलींना डॉक्टरांकडे घेऊन जावे लागत असे. 'बर्ली सेंटर' नांवाच्या जागी त्याच्या कुटुंबातील सर्वांच्या नांवाची नोंदणी झाली होती. ती जागा घरापासून दोन अडीच किलोमीटर लांब असल्यामुळे इंग्लंडच्या हवामानात इतके अंतर चालत जाणे शक्य नव्हते. प्रत्येक वेळी ते फोनवर अपॉइंटमेंट घेत आणि कार किंवा कॅबने तिकडे जाऊन येत. " आम्हाला गरज पडली तर काय करायचे?" या प्रश्नाचे उत्तर त्याच्याकडे तयार नव्हते. त्याच्या एका मराठी मित्राचे आईवडील नुकतेच येऊन तीन चार महिने तिथे राहून गेले होते. त्याने काय केले याची चौकशी केल्यावर त्यांनी 'हाइड पार्क सर्जरी'मध्ये रजिस्ट्रेशन केले होते असे समजले. ही जागा वाहनांच्या रस्त्याने आमच्या घरापासून दूर असली तरी टेकडी उतरून पायी गेल्यास शॉर्टकटने दहा मिनिटांच्या अंतरावर होती. प्रत्यक्ष आजारी पडून आवश्यकता निर्माण होण्यापूर्वी धडधाकट असतांनाच आपण चौकशी करावी म्हणून आम्ही दोघे तिथे चालले गेलो.

रस्त्यावरून पाहतांना 'हाइड पार्क सर्जरी'ची इमारत दवाखान्यासारखी दिसत नाही. मला ते एक लहानसे क्लबहाउस वाटले. समोर सात आठ मोटारी उभ्या होत्या आणि आंत सगळी मिळून तितकीच माणसे होती. प्रशस्त अशा कॉरीडॉरमधून थोडे आंत गेल्यावर छोटीशी आच्छादन केलेली मोकळी जागा होती. तिच्या एका कोप-यात रिसेप्शन काउंटर होते आणि आजूबाजूला वीस पंचवीस लोकांनी बसण्याची व्यवस्था होती. पण त्यावर तीन चार लोक आपला नंबर येण्याची प्रतीक्षा करत बसले होते. सुंदर रंगीत चित्रे आणि छायाचित्रांनी सजवलेली गुळगुळीत पृष्ठांची खूप मॅगेझिन्स एका जागी ठेवली होती. त्यातले आपल्याला पाहिजे ते घेऊन चाळत बसाले आणि वाचून झाल्यावर पुन्हा जागेवर ठेऊन द्यावे. मुले, स्त्रिया आणि वृध्दांचे विकार, एड्स किंवा कँसरसारखे घातक रोग, थंडीपासून बचाव, धू्म्रपान आणि मद्यपानाचे दुष्परिणाम अशा विविध विषयांसंबंधी लोकशिक्षणार्थ तयार केलेली एक दोन पानाची आकर्शक पँफ्लेटस जागोजागी ठेवली होटी. त्यातली आपल्याला हवी ती घेऊन वाचावी किंवा घरी नेऊन इतरांमध्ये त्यांचा प्रसार करावा. एका कोप-यात अगदी लहान मुलांसाठी मिकी माउस, डोनाल्ड डक, बार्बी डॉल्स, हत्ती, घोडे, उंट, मोटारी, विमाने यासारखी भरपूर खेळणी ठेवली होती. मुलांनी ती पाहिजे तशी हाताळावीत, तिथे बसावे, लोळावे, नाचावे, बागडावे असे कांही करायला पूर्ण मुभा होती. पण ते करायला अलीकडे फारशी लहान बाळेच तिकडे दिसत नाहीत. देशाची सरासरी जनसंख्या प्रौढ होत चालली आहे.

खरे सांगायचे झाल्यास सहा महिन्याचा व्हिसा घेऊन परदेशातून आलेल्या माणसाला तेथे कोणी उभे राहू देईल असे मला वाटले नव्हते. त्यातून माझ्या मुलाचे रजिस्ट्रेशनसुध्दा तेथे नव्हते. त्यामुळे आमची नांवे रेशनकार्डाप्रमाणे त्याच्या खात्यात जोडण्याची सोय नव्हती. तरीही नक्की कुठे जाऊन काय करावे लागेल हे तरी समजून घ्यावे एवढ्या उद्देशाने तिथे गेलो. बरोबर पासपोर्ट आणि व्हिसा मिळवण्यासाठी दिलेली सर्व कागदपत्रे असलेली फाईल नेली. सरकारी मामला म्हणजे केंव्हा कोणती माहिती आणि पुरावे लागतील याचा नेम नाही असा आपला अनुभव असतो. 'हाइड पार्क सर्जरी'मध्ये गेल्यावर रिसेप्शन काउंटरवरल्या मुलीने आधी "एपॉंइंटमेंट घेतली आहे कां?" असे विचारताच आता नन्नाचा पाढा इथूनच सुरू होणार असे वाटले. पण तसे झाले नाही. "नाही" म्हंटल्यावर तिने मला थोडे बसून घ्यायला सांगितले आणि तिच्या हांतातले काम आटोपताच मला बोलावून घेतले.

मी भारतातून आलो असून चौकशी करण्यासाठी आलो आहे म्हणताच तिने एक छोटासा फॉर्म देऊन तो भरायला सांगितले. त्यात नांव, पत्ता, टेलिफोन नंबर, मुलाचे नांव एवढेच भरायचे होते. मी तिथला रहिवासी आहे की पाहुणा आहे तेसुध्दा लिहिण्याची गरज नव्हती. त्यानंतर अनेक रोगांची किंवा ऑपरेशन्सची यादी दिलेली होती आणि त्यातल्या कोणकोणत्या गोष्टी माझ्या शरीराने अनुभवल्या आहेत त्यावर टिक करायची होती. त्यामुळे तिथेच बसल्या बसल्या फॉर्म भरून मी तिला तो फॉर्म सुपूर्द केला. तिने लगेच संगणकावर आमची नांवे घालून आम्हाला तीन चार दिवसानंतर येण्याची तारीख आणि वेळ सांगितली. पासपोर्ट, व्हिसा, राहत्या जागेबद्दल कोणतेही कागदपत्र असला कसलाच पुरावा तिने मागितला नाही. आपल्याकडे जिकडे तिकडे फोटो आयडेंटिटी आणि अड्रेसप्रूफ मागतात आणि ते असल्याशिवाय पान हलत नाही. मी भरलेला फॉर्मदेखील त्यातील माहिती इनपुट झाल्यानंतर त्या पेपरलेस ऑफीसमध्ये नष्ट केला गेला असणार.

आम्ही ठरलेल्या तारखेला ठरलेल्या वेळी तिथे गेलो. आमची ती एपॉइंटमेंट एका नर्सबरोबर आहे हे तेथे गेल्यानंतर समजले. त्या वयस्कर नर्सबाईंना सगळेच लोक डॉक्टर्सपेक्षाही जास्त मान देत होते असे दिसत होते. बाई हंसतमुख, मनमिळाऊ आणि बोलक्या होत्या. त्यांनी पटापट आमची उंची, वजन, रक्तदाब, नाडीचे ठोके, वगैरे तपासून त्याच्या नोंदी केल्या. रक्ताचे नमूने काढून तपासणीसाठी ठेऊन घेतले. हात पाय हलवून आणि नजर फिरवायला सांगून त्याच्या हालचाली पाहिल्या. पुन्हा एकदा भयानक आजारांची लांबलचक यादी वाचून त्यातले कोणकोणते आम्हाला होऊन गेले आहेत ते विचारले. त्यातली कित्येक नांवेसुध्दा मी ऐकलेली नव्हती. त्या अर्थी बहुधा मला ते झाले नसणार. पण हे सगळे अगदी खेळीमेळीने चालले होते. आम्ही परदेशातून आलो आहोत म्हंटल्यावर अगत्याने आमच्या कुटुंबाबद्दल ती विचारपूस करत होती. तिचे इंग्रजी उच्चार समजण्यात थोडी अडचण होत आहे हे पाहून सावकाशपणे बोलत होती. वर्णद्वेषाचा लवलेशही तिच्या वागणुकीत नव्हता.
त्यानंतर आठवड्यानंतर पुन्हा बोलावले होते. हा सगळा रजिस्ट्रेशनच्या प्रोसेसचा भाग होता. तोपर्यंत रक्ताची तपासणी होऊन त्याचा रिपोर्ट येईल अशी अपेक्षा होती. पण दोन दिवस आधी टेलीफोन करून एपॉइंटमेंट कन्फर्म करायची होती. ती विचारणी करता रक्ताच्या तपासणीचा रिपोर्ट आला नसल्याचे समजले आणि त्याचे सँपल पुन्हा द्यावे लागले. तिकडे सुध्दा असे मानवी चुकांचे घोटाळे होतात. चालायचेच म्हणा! शिवाय सगळे कांही कॉम्प्यूटरमध्ये बंद असल्यामुळे नक्की काय झाले असेल याची कोणाला कांही माहिती नसते. आमची तपासणी रूटीन असल्यामुळे आणि 'माहितीसाठी माहिती' अशा प्रकारची असल्यामुळे कोणाला त्याची पर्वा करण्याची जरूर नव्हती.

कालांतराने दुसरे रिपोर्ट आले आणि नवी एपॉइंटमेंट घेतली. सगळे कांही आलबेल होते. लहान मुलांना जसे नियमितपणे रोगप्रतिबंधक लशी देतात तसे तिकडे वरिष्ठ नागरिकांनाही देतात. त्यानुसार आम्हाला 'फ्ल्यूजॅब' घ्यायला सांगण्यात आले. आम्हीसुध्दा मुकाट्याने ते घेऊन टाकले. एवीतेवी आम्ही दवाखान्यात जात होतोच त्यामुळे या सेवेचा उपयोग करून पहावा असे ठरवले. पत्नीला थोडा सर्दीखोकल्याचा त्रास होत होता म्हणून डॉक्टरची भेट घेतली. त्याने तपासणी करून त्यावर कोणतेच औषध दिले नाही. वाटल्यास लॉझेंजेस घेऊन चघळायचा सल्ला दिला आणि ताप आल्यास घेण्यासाठी चार गोळ्यांचे प्रिस्क्रिप्शन लिहून दिले.
आपल्याकडे मोठ्या रस्त्यावरसुध्दा केमिस्टची लहान दुकाने दिसतात. तिकडे तशी दिसत नाहीत. मॉल किंवा डिपार्टमेंट स्टोअरमध्ये कॉस्मेटिक्सच्या बाजूला कोठेतरी फार्मसी असते किंवा बारक्या गल्लीत एकादे फार्मसीचे दुकान असते. असेच एक दुकान सापडले तिथे ते प्रिस्क्रिप्शन नेऊन दिले. तो दुकानदार बहुधा भारतीय असावा. त्याने सांगितले की या प्रिस्क्रिप्शनप्रमाणे हे औषध दिले तर त्याचे साडेपांच पौंड पडतील. सरकारी दवाखान्यातून आलेल्या दर प्रिस्क्रिप्शनमागे तेवढेच पैसे घेतात आणि ते पैसे सरकारजमा होतात. त्या औषधाची किंमत कितीही असो, त्याचे साडेपाच पौंडच पडतात. फार्मसिस्टला कांही कमिशन किंवा ठराविक सेवाशुल्क मिळत असेल. दिलेल प्रिस्क्रिप्शन फार्मसिस्ट आपल्याकडे ठेवून घेतो आणि तेच औषध पुन्हा हवे असल्यास नवे प्रिस्क्रिप्शन द्यावे लागते. मात्र आम्हाला लिहून दिलेले औषध 'एटीसी म्हणजे एक्रॉस दि काउंटर' या प्रकारात मोडते आणि हवे असल्यास ते प्रिस्क्रिप्शनशिवाय एक दीड पौंडाला मिळेल. विकत घेऊन त्यावरील मजकूर वाचल्यानंतर ते 'क्रोसिन' चेच वेगळे नांव होते हे समजले. म्हणजे तो पौंडसुध्दा अक्कलखात्यातच जमा झाला, कारण आम्ही क्रोसिन नेलेले होतेच.

औषधविक्रीबाबत तिथे फारच कडक नियम आहेत आणि त्याचे कसोशीने पालन होते. फारच थोडी औषधे 'एटीसी'खाली येतात. इतर औषधांसाठी प्रिस्किरप्शन आवश्यक असते आणि एका प्रिस्किरप्शनवर दुस-यांदा ते औषध मिळत नाही. आपल्याला एकच औषध डॉक्टरला न विचारता पुन्हा पुन्हा घेण्याची संवय असते. तसे तिकडे चालत नाही त्यामुळे ते जांचत वाटते. ग्राहकाच्या स्वातंत्र्यावर गदा आल्यासारखी वाटते. सर्दीखोकल्यासाठी तिकडे कोणतेच औषध देत नाहीत. त्या हवामानात बॅक्टीरिया एवढे वाढत नाहीत त्यामुळे त्यांच्या इन्फेक्शनचा संभव कमी असतो आणि व्हायरसवर अजूनही म्हणावी तेवढी परिणामकारक औषधे निघालेली नाहीत. शरीराची ताकद वाढवून त्यांचा प्रतिकार करणे हाच त्यावर उपाय आहे. रोग बळावल्यामुळे ताप आला, फुफ्फुसावर परिणाम झाला, रक्तदाब कमीजास्त झाला वगैरेवर सिम्प्टोमॅटिक उपचार करून ते काबूत आणले जातात.

तिकडच्या सा-या तपासण्या आणि रोगप्रतिबंधक उपाय संपेपर्यंत आमची परतीची तारीख आली होती. आम्ही अखेरच्या भेटीत नर्सला ते सांगून तिचा प्रेमळ निरोप घेतला. तिनेही "आता पुन्हा लवकर परत या आणि जास्त काळ इथे रहा." असे अगत्याने सांगितले. "तुम्हाला हेच करायचे होते तर माझा इतका वेळ फुकट कां घालवला?" असा खडूसपणाचा प्रश्न विचारला नाही. आमच्याच मनात तो विचार आला होता. तिला तसे वाटले की नाही कोणास ठाउक. कदाचित यालाच सेवाभाव म्हणत असावेत. समोर जो आला असेल तो कोण आहे आणि काय करणार आहे याचा विचार न करता आपले कर्तव्य करत रहायचे, आणि तेसुध्दा हंसतमुख राहून!

लेखनविषय: दुवे:

Comments

मस्त लेख!

वा! अत्यंत छान लेख लिहिला आहे. :) अनुभव आवडला
त्यात

आपल्या शहरातल्या डॉक्टरांना आपण एरवी कितीही नांवे ठेवत असलो तरी मनातून आपल्याला त्यांचाच केवढा आधार वाटत असतो हे बाहेरगांवी गेल्यावर लक्षात येते

क्या वाक्याशी मात्र १००% सहमत. माझ्याही सुदैवाने अमेरिकेतील सव्वा वर्षात डॉक्टर कुठे बसतो हे देखील पाहवं लागलं नाही. परंतु जर आजारी पडलो तर या विचाराने मात्र अस्वस्थ व्हायचं हे नक्की. त्यात त्वरीत अपॉईंटमेंट न मिळणे, डॉक्टर्स औषधे देत नाहित फक्त आराम करा सांगतात आदी ऐकीव कहाण्यांमुळे तर भारतीय वैद्यकीय संस्थेची खूपच आठवण येत असे ;)

ऋषिकेश
------------------
जगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणारे आणि न समजणारे

कंटाळा

च्यामारी "तिकडे(च) सगळं कसं भारी असतं"
हे वाचण्याचा आता लै कंटाळा आलाय राव!
तुम्च्या आधीच्या धडाड् धूम सारखे काही चांगले ल्हिवा!

आपला
गुंडोपंत

न्हाई वो

"तिकडे(च) सगळं कसं भारी असतं" असं म्या लिवलेलं न्हाई. तिकडली मानसंबी चुका करत्यात, डागदर अवशद द्येत न्हाईत, इकडची लई आठवन येते असंबी लिवलंय्.
माज्या पानावर म्या पंडरीच्या इटूबापासून आबाळातल्या इमानापत्तुर चौखूर उधळलो हाय. जमलं तर वाचा. पत्ता खाली हाय.

इथे

किंवा इथे

झक्कास!

असं म्या लिवलेलं न्हाई.
ह्ये बरुबर नाय!
इकडची लई आठवन येते असंबी लिवलंय्
हे बरुबर हाय!
पन तुम्ची हनुदिनी भारीच लिवताय की राव तुमी!

आवो सायबा आता हितं काय तरी आसं
ल्हिवा का मज्जाच यायला पायजे वाचून!

नाय तं हायेच मंग हवेवरच्या गाड्या तसलंच काय तरी!
आपला
गुंडोपंत

चांगला लेख.

आवडला.

 
^ वर