संतांची कविता-५
श्री.ज्ञानेश्वर,नामदेव व तुकाराम यांच्या पदांनंतर आपण आज श्री. एकनाथ महाराज यांचे एक पद घेऊन संतांच्या कविता या मालिकेचा निरोप घेऊ.
एकनाथांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या लिखाणातील विविधता. गौळणी,भारुड आदी लोकवांग्मय [?] लिहावे तर एकनाथांनीच. इतर कवी या क्षेत्रांत त्यांच्या जवळपासही येऊ शकत नाहीत. त्यांची एक अतिशय लोकप्रिय गौळण म्हणजे :
वारियाने कुंडल हाले डोळे मोडित राधा चाले !
फ़णस जंबीर कर्दळी दाटा हाती घेऊन नारंगी फ़ाटा !
हरि पाहून भुलली चित्ता राधा घुसळी डेरा रिता ! !धृ!
राधा पाहून भुलले हरि बैल दुभवी नंदाघरी !!धृ!
ऐसी आवडी मिनली दोघा एकरूप झाले अंगा !
मन मिनलेसे मना एका भुलला जनार्दना ! !धृ!
जंबीर-- लिंबू, दुभविणे -- धार काढणे, मिनणे -- एकजीव होणे
मधुरा भक्तीने जें रूप बंगाल-ओरिसामध्ये अंगिकारिले ते महाराष्ट्रीय संतांना बिलकूल पसंद नव्हते. त्यांनी विठ्ठलाला माऊली म्हणून स्विकारले. फ़ारच कमी पदे अशी आहेत कीं ज्याना आज आपण अश्लील म्हणू. गाथा सप्तशतीतील गाथांशी नाते सांगणार्या या पदात दोन प्रेमिकांचे वर्णन आहे.दोघांचेही चित्त सैरभैर झाले आहे. खास ग्रामिण बाजामध्यें, नायिका ताक घुसळतीय; फ़क्त डेरा रिकामा आहे एवढेच ध्यानांत नाही! गोपाळाचीही तीच गत.बिचारा दूध काढावयाला बसलाहे खरा पण गाई ऐवजी बैलापाशी ! प्रेमाची एवढी एकरूपता झाल्यावर असे होणारच. पण प्रेमिकांची अशी अवस्था झाली तरी रसिकाने त्यांतच वाहून जाऊ नये म्हणून एकनाथ लगेच आसूड उगारल्यासारखे सांगतात " एका भुलला जनार्दना". अरे, हे प्रेम माझे माझ्या गुरुवर आहे तसे आहे.
खास ग्रामिण ढंग ही ह्या पदाची खासियत. राधा उघड उघड डोळॆ "मोडत" , नेत्र कटाक्ष टाकत चालली आहे, कानातले डूल वार्याने हलत आहेत असे म्हटले असले तरी आपण कल्पना करूं शकतो हा बहुदा ठुमकत चालण्याचा परिणाम असावा. दोघांनी एकमेकांना गल्लीमध्येच पाहीले असणार पण त्याचा असर काय झाला त्याचे वर्णन मात्र दोघे आपापल्या घरी पोचल्यानंतरचे आहे. दोन ठिकाणी असूनही दोघेही एकजीव झालेले आहेत.
शृंगाररसामध्ये डुंबलेल्या लावणीफ़डावर आणि भक्तरसांत चिंब झालेल्या भजनी मंडळात एकाच वेळी गायले जाण्याचे भाग्य अशा एखाद्याच रचनेला लाभते.
समित्पाणी
Comments
भाटकर बुवा!
ही गौळण भाटकर बुवांनी मस्त गायलेय.
हे भजन त्यांचे विशेष प्रिय होते. "राधा पाहून भुलले हरी,बैल दुभवी नंदा घरी" हे संत एकनाथांचे शब्द एखाद्या प्रणयी कवीला लाजवणारे आहेत की नाही, असा प्रश्न विचारून ते दुसर्याच्या हातावर टाळी द्यायचे.
काट्याच्या अणीवर...हे भजनही ते फार प्रेमाने गायचे.
मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
सर्व लेख आवडले
लेखमालेतील सर्व लेख वाचले. संतकवींच्या कवितांतले 'काव्य' आपण अगदी अचूक टिपले आहे.
लेखमाला अजून पुढेही चालवावी.
अवांतर -
लोकवाङ्मय 'ङ्म' = shift G + m + a
अतिसुंदर
आजच ही लेखमाला पाहिली. कोण आनंद झाला म्हणून सांगू? अतिसुंदर! मनापासून आभार!!
लेखमालेतील सर्व लेख वाचले. संतकवींच्या कवितांतले 'काव्य' आपण अगदी अचूक टिपले आहे.
लेखमाला अजून पुढेही चालवावी.
अगदी असेच...
(संत)एकलव्य
असेच म्हणतो
विसुनानांच्या म्हणण्याशी अक्षरशः सहमत आहे.
+१
असेच म्हणते.
लेखमाला सुंदर!
सार
शरदरावांनी समर्पक शब्दात सार दिले आहे.
प्रकाश घाटपांडे
शरदराव
काय योगायोग आहे. कालपरवाच हा अभंग मी कुठेतरी वाचला. जयदेवांचे गीतगोविंद बंगालमध्ये प्रसिद्ध झाले तर महाराष्ट्रात शृंगाररसाने कसे वेगळे वळण घेतले असे त्या लेखात लिहिले होते.
जंबीर आणि मिनणे या शब्दांचे अर्थ इथे विचारणारच होतो. तर तुम्ही हा अभंग इथे दिला.
अतिशय सपर्पक शब्दांत तुम्ही अर्थ दिला आहे. ही मालिका अशीच पुढे चालू राहिली तर फार आवडेल.
या मालिकेतील नामदेवांच्या बरोबर ही चित्रमय कविताही फार आवडली.
अनेकानेक धन्यवाद.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
असेच
असेच म्हणतो.. सुंदर चालु आहे लेख माला.. रसास्वाद उत्तम
ऋषिकेश
------------------
जगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणारे आणि न समजणारे
पाणंदी
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.शरद यांच्या 'संतांच्या कविता' या मालेतील पाचही कविता उत्तम आहेत. प्रस्तुत गीत "वारियाने कुंडल..." ची चाल परिचित असल्याने ते छानच वाटते. अर्थ तसा सोपा असला तरी"फणस जंबीर करदळी दाटा ,हाती घेऊनि नारंगी फाटा |" याचा संदर्भ समाधानकारक लागत नाही. मला वाटते राधा ज्या वाटेने जात आहे तिथल्या निसर्गाचे हे वर्णन असावे.श्री. शरद लिहितातः "दोघांनी एकमेकांना गल्लीमध्येच पाहीले असणार ..." मला वाटते राधा एखाद्या पाणंदीतून जात असता समोरून हरी आला. दृष्टादृष्ट झाली.
...दोन्ही बाजूला दाट शेते/झाडी आणि मधून जाणारी अरुंद पायवाट. कोकणीत या साठी पाणंद/पाणंदी असा शब्द आहे. घाटावर पांदी म्हणतात.कवि यशवंत यांच्या "अजुनी कसे येती ना परधान्या राजा |" या कवितेत हा शब्द आहे.
...दोन्ही बाजूंना फणस, जंबीर, रानकेळी यांची दाटी असलेल्या पायवाटेवरून राधा चालली होती.तिच्या हातात नारींगीची छडी (फाटा/फोक)होती...(डोक्यावर दही ,दुधाचा घडा असला तर कावळ्या कुत्र्याचा त्रास संभवतो. म्हणून हाती फाटा..)