संतांची कविता-४

आजपावेतो घेतलेली तीन पदे तशी अप्रचलित म्हणावयास हरकत नाही.शेवटची दोन पदे प्रचलित व अतिशय लोकप्रिय अशी आहेत. सुंदर चाली व आकर्षक आवाज यांची भुरळ पडून शब्दांकडे व त्यांतील सौंदर्याकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता असते.श्री. ज्ञानेश्वर महाराजांनी हा धोका लक्षांत घेऊन श्रोत्यांना विनवणी केली आहे की. शब्द सौंदर्याकडॆ लक्ष देऊन विषयाकडे दुर्लक्ष करूं नका. विष्णुदास नाम्यांचे पद असे आहे

रात्र काळी,घागर काळी,यमुना जळे ती काळी हो माय !
बुंथ काळी,बिलवर काळे, गळामोती एकावळी काळी हो माय !
मी काळी, कांचोळी काळी, कांसे कांसिली ती काळी हो माय !
एकली पाणीया नच जाय साजणी, सवे पाठवा मूर्ती सावळी हो माय !
विष्णुदास नाम्याची स्वामिनी काळी, कृष्ण्मूर्ति बहु काळी हो माय !

बुंथ --चुंबळ, गळामोती एकावळी --गळ्यातील मोत्यांचा एकपदरी हार, कांचोळी -- चोळी, कांसे कांसिली --नेसूचे लुगडॆ
.

प्रसंग कसा नाट्यमय आहे बघा.काळोख्या रात्रीची वेळ निवडून, एक गोपी काळ्या यमुनेवर पाणी भरावयास निघाली. चांगली तयारी करून निघाली. म्हणजे चुंबळ,घागर आहेतच, पण बिलवर, गळ्यातील मोत्यांचा हार, हेही आवर्जून घेतले आहेत. अभिसारिका असल्याने सर्व गोष्टी निवडून काळ्या रंगाच्या घेतल्या. पण तरीही एक राहिलेच. ती स्वत: गोरीच होती. मग, मांजर डोळे मिटून दूध पिते, त्याप्रमाणे तिने ठणकावून सांगितले,"मी काळी". वाद मिटला. आतां जाण्यास अडचण काय? तीही तीने लगेच सांगितली." मी भित्री. एकटी कशी काय जाणार? सोबत नको? सखे, त्या सावळ्याला बरोबर धाड ना !" च्या;
आपण घरांतल्या लग्नाच्या मुलीला काळी असेल तर सावळी, सावळी असेल तर गहूवर्णी, गहूवर्णी असेल तर चक्क गोरी म्हणतो. पण येथे ही बिलंदर गोपी स्वत:ला गोरी असून काळी व बाहेरच्या "कृष्णा"ला सावळी म्हणून मोकळी! विष्णुदास नाम्याला हा चावटपणा पसंद नाही. तो साफ़ सांगतो " माझी स्वामिनी काळी नाही बहूकाळीच आहे.
या पदातली लय लक्षणीय आहे. तळ्यातील पाण्यावर दगड टाकला कीं तरंगाची वर्तुळे मोठी मोठी होत जातात त्याप्रमाणे प्रत्येक ओळीतील काळ्या रंगाचे विशेष्य मोठे होते; रात्र-घागर-यमुना जळ; बुंथ-बिलवर-गळामोती एकावळी; मी-कांचोळी-कांसे कासिली. मस्त जमलय कीं नाही?

समित्पाणी

अवांतर : विष्णुदास नाम्या आणि नामदेव बिन दामुशेठ हे वायले वायले.

लेखनविषय: दुवे:

Comments

छान

हे पद आणि त्या शीर्षकाचे पुस्तक याआधी वाचनात आले होते, पण पदाचा पूर्ण अर्थ माहीत नव्हता. तो उलगडून सांगितल्याबद्दल अनेक आभार. अभिसारिका, गौरवर्ण इ. वाचून 'मोरा गोरा अंग लई ले' गाणं आठवलं.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

गोविंद पोवळे

गोविंद पोवळे आणि त्यांचे सहकारी ह्यांनी मिळून ही गवळण अतिशय सुंदर चालीत म्हटलेली आहे.

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

गोविंद पोवळे आणि सहकारी

येथे ऐका.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

सुरेख विवेचन

काळ्या रंगाची मोठी गंमत करून सांगितली आहे नामदेवांनी.

असेच

असेच म्हणतो. सुरेख विवेचन.

विष्णू-दास नामा

हे विष्णू-दास नामा, 'येई वो विठ्ठले माझे माऊली ये' वालेच का?


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

विष्णुदास-नामा - एक गौळण

विष्णुदास नाम्याची एक मस्त गौळण सांप्रदायिक भजनात म्हटली जाते. मी ऐकलेली आठवेल तशी देतो. कोणाकडे मूळ गौळण असेल तर कृपया द्यावी.

कान्होबा कान्होबा
निवडी आपुली गोधने
पाच पाच पोळ्या तीन भाकरी
दीड कानुला एकच पुरी
आम्हा धाडिले दुरिल्या घरी
आमची फसवून खाल्ली शिदोरी .... १

कान्होबा ओढाळ तुझ्या गाई
होत्या नव्हत्या कळंबा ठाई
शिव्या देते तुझी आई (?)
शिव्या देते तुझी आई ....२

************* (?)
तुझा बैल चुकला म्होरा
सांगू गेलो तुझिया घरा
पाठी लागला तुझा म्हातारा ....३

विष्णुदास नामाचा (आ?)हे
तूच बाप आणि माये
अखंड माझे हृदयी राहे
अखंड माझे हृदयी राहे .... ४

विष्णुदास नामा-एक गौळण

शरद

हे पद "हुंबरी" सदराखाली दिले आहे.
कान्होबा निवडी आपुली गोधने !!धृ !!
पांच पांच पोळ्या तीन भाकरी दीड कानवला एक पुरी !
आम्हा धाडिले वैल्या दुरी आमची ठकवून खाल्ली शिदोरी !! कान्होबा.
परियेसी शारंगधरा तुझा बैल चुकला मोरा
सांगू गेलो तुझ्या घरा पाठी लागला तुझा म्हातारा !! कान्होबा.
परियेसी हृषिकेषी गाई म्हशीचें दूध पिशी
वासरे प्याली म्हणून सां गशी उद्या ताक नाही आम्हासी !! कान्होबा.
कान्होबा ओढाळ तुझ्या गाई होत्या नव्हत्या कळंबा ठायी
शिव्या देती तुझी आई !! कान्होबा.
विष्णुदास नामा साहे देवा तूची बापमाये
अखंड माझे हृदयी राहे !! कान्होबा.

समित्पाणी

मस्त!

कान्होबा म्हटले की फक्त 'कान्होबा तुझी घोंगडी' इतकेच आठवते. ही गौळण सुरेख आहे.

वैल्या म्हणजे वायले-वेगळे असे का?

धन्यवाद शशांक आणि शरद.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

वा! धन्यवाद/हुंबरी, कळंबा?

शरदराव, मूळ पद इथे दिल्याबद्दल अनेकानेक धन्यवाद! मी ऐकलेल्या गौळणीत काही शब्द इकडेतिकडे तर काही पदरचे होते असे दिसते. परंपरागत चालत आलेल्या सांप्रदायिक भजनांतून मूळ रचनेत बदल होणे स्वाभाविक आहे. तसेच झालेले दिसते.

काही शंका आहेत, जसे की 'हुंबरी' चा अर्थ काय आणि या पदामध्ये 'कळंबा'चा अर्थ काय? (कोल्हापूरमध्ये कळंबा नावाचा एक तलाव आहे.)

हुंबरी

हुंबरी किंवा हुंबळी म्हणजे हमामा. धूमश्चक्रीचा किंवा अव्यवस्थित रासक्रीडेसारखा एक खेळ खेळताना, वारकरी गातात तो गीतप्रकार.
कळंबा म्हणजे कळंबाचे झाड. माधुरी पुरंदरे(बाबासाहेब पुरंदरे यांच्या कन्या) यांनी गायलेले हमामागीत अतिशय प्रसिद्ध आहे.
संतांच्या रचनांना विविध नावे आहेत. अभंग, आर्या, दोहा, भजन, आरती, ओवी, गौळण, गोंधळ, फुगडी, जोहार तशीच ही हुंबरी. --वाचक्‍नवी

क्या बात है!!

तळ्यातील पाण्यावर दगड टाकला कीं तरंगाची वर्तुळे मोठी मोठी होत जातात त्याप्रमाणे प्रत्येक ओळीतील काळ्या रंगाचे विशेष्य मोठे होते

क्या बात है शरदराव!!
निरुपणाच्या नावाखाली अतिरिक्त शब्दबंबाळपणा काही आधुनिक शब्दपुराणिकबुवा करतात. मात्र Beating around the bush प्रकारची विशेषणबाजी न करता अल्पाक्षरी शैलीमध्ये तुम्ही नेमके आणि सुरेख विवेचन केले आहे. अतिशय सुंदर!!


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

रात्र काळी घागर काळीः प्रथमेशच्या आवाजात

प्रथमेशच्या सुरेख आवाजात हा अभंग ऐकता येईल.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

धन्यवाद

धन्यवाद आजानु
शरदरावांनी जर याचे शब्द व अर्थ जर सांगितले नसते तर या गाण्याचा रसास्वाद घेता आला नसता. आठवण ठेउन योग्य वेळी प्रतिसाद दिल्यामुळे बर वाटलं.

प्रकाश घाटपांडे

खरं आहे

शरदरावांनी दिलेला अर्थ समोर ठेवून ऐकायला फारच मजा आली. नाहीतर काहीच समजले नसते. (तिथेतरी कितीजणांना समजले असेल) मुलांनी दिलेला कोरसही मस्त.

(एखादे ज्येष्ठ संगीतज्ञ असते तर त्यांनी या गाण्याबाबत शरदरावांनी दिलेल्या माहितीप्रमाणे पुस्ती जोडली असती. अवधूत-पल्लवी-वैशालीकडून हे अपेक्षिणे फारच होईल. :) )


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
 
^ वर