आता धान्य वितरण गायब?

आता धान्य वितरण गायब?
काही दिवसांपुर्वी 'क्रिकेटपेक्षा शेतकरी व सामान्य माणूस महत्वाचा आहे' असे रास्त म्हणणे मांडणारा, शरद पवारांना मुक्त पत्र/लेख मिलिंद मुरुगकर यांनी रविवार लोकसत्ता मध्ये लिहिला होता.

मिलिंद मुरुगकरांचे लेख शेती विषयक प्रश्नांची योग्यती दखल घ्यायला लावतात यात शंका नाही. शिवाय ते शेती विषयक धोरणात्मक तरतूदी उत्तम सूचवतात. त्यामुले त्यांच्या मताला वजन आहे.

परंतु त्यांनी पवारांना पत्र लिहितांना सुचवलेला धान्य वितरण व्यवस्थाच बाद करण्याचा उपाय भयंकर आहे असे वाटले. मात्र त्याच वेळी, ही खाबुगीरीने व काळ्याबाजाराने सडलेली धान्य वितरण व्यवस्था खळबळून धुवून काढण्याचीही तेव्हढीच गरज आहे. ही व्यवस्था अस्तित्वात असणे फार महत्वाचे आहे, कारण एक प्रकारे धान्य वितरण व्यवस्था चेक बॅलन्स चे काम करते. गरिबांना हक्काचे धान्य मिळण्याचा तो एक महत्वाचा दुवा आहे.

या लेखात सरकारने गरिब लोकांना पैसे द्यावेत व हे पैसे दिल्यावर शेतकर्‍यांनी किंवा गरीब घटकांनी खुल्या बाजारातून धान्य खरेदी करावे असा सल्ला मुरुगकर यांनी दिला आहे. हा भाग धोकादायक आहे असे वाटते. गरिब माणसाला मुक्त बाजार सोडून देणे योग्य नाही.

एकुण आजवरचा मुक्त व्यापाराचा अनुभव पाहता यात अनेक घोटाळे व्यापारी व साठेबाज करतील यात शंका नाही. हा अनुभव फक्त भारतातच नाही तर जागतिक आहे. शेतकर्‍याची अडवणूक हे धोरण सगळ्या देशातील व्यापारी व कंपन्या सर्रासपणे व सांघिकरित्या राबवत असतात.
२००७ साली ऑस्ट्रेलियातील शेतकर्‍यांना याचा हिसका बसला आहे.
बेरी ही फळांचा रस काढून तो बाटलीबंद करून विकणारी मोठी बहुराष्ट्रीय कंपनी आहे. आपल्या व्यापक फळ खरेदी करण्याच्या बळावर त्यांनी संत्र्याचे भाव ऑस्ट्रेलिया मध्ये इतके पाडले की शेतकर्‍यांना संत्र्याचे पीक घेणे अशक्य झाले. त्यांनी या पाडलेल्या दरांना विरोध केला. संघटित विरोधाचा प्रयत्न केला. पण बेरी ही बहुराष्ट्रीय कंपनी बधली नाही. त्यांने हा विरोध मोडून काढण्यासाठी (ऑस्ट्रेलियात भरपूर संत्री असतांनाही) संत्री आयात करण्याचे धोरण ठेवले.
अर्थातच ज्या शेतकर्‍यांनी आपले पैसे या कंपनीच्या खरेदीच्या आशेवर पीकात अडकवले होते ते साफ झोपले, कर्जबाजारी झाले आहेत.
अर्थातच पुढच्या पिकात शेतकर्‍यांनी संत्री टाळण्याचेच धोरण ठेवले.
सर्वसाधारणपणे संत्री पिकवणेच कमी होताच इतर सुपर मार्केट चालवणार्‍या सेफवे व कोल्स या कंपन्यांनी आपापले किरकोळ विक्रीचे भाव वाढवले. हे भाव एका पातळी दरम्यान राकहता आले असते. ऑस्ट्रेलिया मध्ये अशी धान्य वितरणासाठी कोणतीही व्यवस्था उपलब्ध नाही. (मला कल्पना आहे की धान्य वितरण व फळे ही वेगळ्या संकल्पना आहे. पण व्यापारी कसे लुबाडतात हे स्पष्ट करण्यासाठी हे उदाहरण घेतले आहे.)
म्हणजेच सामान्य माणूसही झोपला आणि शेतकरीही खलास झाला.
असे भारतातही कशावरून होणार नाही? कोणत्याही व्यापाराचे ध्येय हे नफा मिळवणे व वाढवणे इतकेच असते. त्यामुळे त्यावर नियंत्रण ठेवणारी एखादी प्रणाली आवश्यक नाही काय?

याच लेखा मध्ये त्यांनी ब्राझिल येथील स्मार्ट कार्डाची योजना उल्लेखली आहे. या द्वारे गरीब लोकांना कार्ड दिले जाते आणि या कार्डावर आधारीत इलेक्ट्रॉनीक फंडस् ट्रांसफर केले जात असावेत असे वाटते. मात्र या योजनेचे चे काही अजून विश्लेषण दिले असते तर बरे झाले असते. तेथे या योजनांच्या चालविण्यात ब्राझिलमध्ये कोणतेही घोटाळे नाहीत असे जर मानत असाल तर मग कठीण आहे.
या शिवायहे अशा प्रकार च्या योजना कुठे यशस्वी ठरल्या आहेत ते पण पाहिले पाहिजे असे वाटते.
गरिब वर्गाची क्रयशक्ती वाढविण्यासाठी गरिबांच्या खात्यात इलेक्ट्रॉनिकली पैसे जमा करणे हा उपाय सहज आणि सोपा दिसत असला तरी, त्यात अनेक घोटाळेच नजरेस पडत आहेत. आज शिधापत्रीकेच्या कागदावर सर्वांना दिसणार्‍या व समजणार्‍या असलेल्या पद्धती राजकारणी व नोकरशहा कुरतडून खात आहेत. हे सगळे धान्य वितरणाचे व्यवहार इलेक्ट्रॉनिक पडद्याआड गेल्यावर काय होईल याची कल्पनाही करणे अशक्य आहे. बोगस काऊंट्स वर इलेक्ट्रॉनिकली पैसे जमा करणे फारच सोपे होईल असे प्रथम दर्शनी वाटते.

प्रत्येक नवीन गोष्टीला विरोध केलाच पाहिजे असे नसते हे मान्य. पण नवीन गोष्ट/पद्धती येतांना त्या पद्धतीला जुन्या पद्धाती पेक्षा जास्त सक्षम असल्या पाहिजे. ही सक्षमता कशी आहे यावरही काही प्रकाश पडायला हवा, नाही का?

धान्यवितरण बाद करायचे ठरवले तर पर्याय काय असला पाहिजे?
या विषयावर आपली मते काय आहेत?

-निनाद

Comments

विचार करायला लावणारा लेख

विचार करायला लावणारा लेख
शेतकरी आणि ग्राहक यान्च्यामधला मध्यस्थ दूर केला पाहिजे.
त्याचा फायदा शेतकरी आणि ग्राहक या दोघानाही होईल.

हो

तेच म्हणतो आहे मी.
आज रेशन सारखी व्यवस्थाच रद्द करणे योग्य नाही.
रेशनच्या दुकानात काळाबाजार असेल, पण म्हणून काय रेशनची व्यवस्थाच मोडीत काढायची की तो काळाबाजार हाणून पाडायचा?

एका काळात साखर महाग झाल्यावर या दुकानांनीच सामान्य माणसांनाही आधार दिलाच ना?

रॉकेलचा काळाबाजार झाला तरी तिथे स्टो पेटवण्यापुरते तरी रॉकेल तर मिळतेच ना!?

अशी हे रेशनच्या दुकानांची व्यवस्था बंद करून हे शिधावाटप केंद्रातून मिळणारे हक्काचे चार घासही काढून घ्यायचे?
मग गरीब लोकांनी धान्य घ्यायला कुणाकडे जायचे हो? सुपरमार्केट मध्ये?
आज तिथे किंमती पाडलेले चित्र आहे. पण काही दिवसातच हे सुपर मार्केटचे वॉलमार्ट व रिलायंस सारखे सम्राट आपल्या पैशांच्या बळावर आपला एक छत्री अंमल प्रस्थापीत करतील. मग ते ठरवतील तीच किंमत आणि ते ठरवतील त्याच वस्तु घेणे भाग पडते.

आज ऑट्रेलियामध्ये तरी कोल्स आणि सेफवे यांना तसा काही पर्यायच उरलेला नाहीये. त्यामुळे कितीही ओरडा आरडा केला तरी त्यांची माजोरी वागणूक सहन करण्या शिवाय कोणताच पर्याय सामान्य माणसाकडे नाही.

-निनाद

छान

छान लेख!.. विचार करायला लावणारा!

रेशनच्या दुकानात काळाबाजार असेल, पण म्हणून काय रेशनची व्यवस्थाच मोडीत काढायची की तो काळाबाजार हाणून पाडायचा?

बरोब्बर.. हे म्हणजे दगड टोचतात म्हणून चपला घालण्या ऐवजी न चालण्याचा निर्णय घेण्यासारखे आहे

ऋषिकेश
------------------
जगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणारे आणि न समजणारे

चांगला लेख्

विचार करायला प्रव्रुत्त केले.

शिधावाटप

लहानपणी रॉकेल आलं, सणासुदीला साखर आली की रेशनच्या दुकानासमोर लागणार्‍या लांबलचक रांगा आठवतात. मुख्य करून या दोन गोष्टी आम्ही रेशनच्या दुकानातून घ्यायचो. बाकीचे धान्य इ. आमच्या कार्डावर कामवाली घेऊन जायची. नंतर आम्ही रॉकेल आणणं बंद केलं (आधी दोन सिलेंडर नंतर गॅसची पाईपलाईन आली) आणि रेशनच्या दुकानाशी संबंध तुटला.

आता बरेच वर्षे बाहेर राहिल्याने फारसे आठवत नाही परंतु घर-उत्पन्नानुसार रंगीत रेशन कार्डे आली होती असे आठवते, त्यातून अमुक उत्पन्न असणार्‍या कुटुंबाला रेशन मिळत नाही असेही कळले होते.

गरीबांना या शिधावाटप केंद्राचा अजूनही लाभ होतो असे वाटते परंतु याबद्दल अधिक माहिती आवडेल.

अजून तरी

भारतात गरीब लोकांसाठी कसेही का होईना शिधावाटप व्हावे असेच वाटते.
आमच्या कुटुंबाचे मित्र दुकान चालवीत. प्रियालीप्रमाणेच लहानपणी रॉकेलच्या आणि साखरेच्या रांगा पाहिल्या आहेत, आणि त्या रांगांत उभे पण राहिल्याचे आठवते.. नंतर आम्हाला त्याचा जास्त उपयोग नसल्याने असे आठवते की आमचे कार्ड घेऊन आमच्या घरच्या कामाच्या बायका जात आणि त्यांच्या घरासाठी वस्तू आणीत. ते दुकान म्हणजे एक चावडीच असे.

भारतात गरीब लोकांसाठी ...

खरे तर कोठेतरी गरीब आणि गरीबी दुर झाली पाहिजे. त्यासाठी लोकसंख्या नियंत्रण, शिक्षण, रोजगाराच्या सर्वांना संध्या, साधनसामग्रीचे योग्य वाटप इत्यादीवर विचार आणि कृती व्हायला हवी.

छे!

त्यासाठी लोकसंख्या नियंत्रण, शिक्षण, रोजगाराच्या सर्वांना संध्या, साधनसामग्रीचे योग्य वाटप इत्यादीवर विचार आणि कृती व्हायला हवी.

छे छे!
इतके सगळे काही करत बसण्यापेक्षा फक्त श्रीमंतीच जरा कमी केली तर आपोआपच गरीबी दूर नाही का होणार? ;))

असो,
अहो साहेब, हा अजेंडा तर फार जुना झाला. अगदी १९५०/६० पासून सगळे हेच मुद्दे आहेत आणि होते. पण गरिबी दूर झालीच नाही. गरीबी दूर करण्याचा एकच मार्ग, तो म्हणजे आपल्या देशात(च) पैसा कसा येईल हे पाहणे.

हे मनमोहन सिंगांनी १९९१ पासून 'अर्थ' खुले केले आणि आपण वाचलो.
हेच काम जर स्वातंत्र्य मिळाल्या बरोबर केले असते आणि आपण अमेरिकेचे मित्र झालो असतो तर हीच श्रीमंती ४० वर्ष आधी आली असती की नाही?
पण नेहरूंसारख्या माणसाला रशिया आणि चीन सारखे फालतू देश जवळचे वाटले. आपण बसलो मुर्खा सारख्या कधीच न संपणार्‍या रशियन पंचवार्षीक योजना राबवत!
ही रेशनची घाण पद्धती पण तेथून आलेली आहे.
मी तर म्हणतो की ही पध्हती बादच केली पाहिजे.
का नाही प्रत्येकाला इतके पैसे मिळू, की बाजार भावाने जी काही असेल ते खरेदी करता यावे?
मला नाही वाटत मूळ लेखात ला मुद्दा काही चुकीचा आहे. योग्यच आहे,
कशाला हवी दरिद्री शिधा वाटपाची यंत्रणा?

अमेरिकेचे धोरण कसेही असो, पण जे देश त्यांचे मित्र आहेत त्या सर्वांनी आर्थिक सुबत्ताच पाहिली आहे हे विसरून चालणार नाही.

स्वातंत्र्या नंतर नेहरू सत्ते वर नसून कुणी जागतिक अर्थ- राजकारणाची 'किमान माहिती' असलेला माणूस जरी सत्तेवर असता, तर ही वेळ न येती.
१९४४ मध्ये इंग्लंडाला जाणीव झाली होती की आता आर्थिक सत्तेचे युग सुरु होते आहे. त्यांनी त्यावेळीच पावले टाकून आंतर राष्ट्रीय नाणेनीधी आणि जागतिक बँकेची स्थापना केली. जागतिक खनिज संपत्तीवर कंपन्यांच्या आधाराने नियंत्रणे स्थापन केली. जी अजूनही अबाधित आहेत. ही अप्रत्यक्ष जागतिक सत्तेची सुरुवात होती.
आजही जगातले बहुतेक सोने इंग्लंडच विकते (आणि आपण त्यातले ६०% सोने इंग्लंडाला नफा देवून आपणच विकत घेतो, पण इंग्लंडाला बाजूला सारून द. आफ्रिकेबरोबर आपले व्यवहार आपणच साधू शकत नाही!)

अजूनही वेळ गेलेली नाही,
समजून घ्या बदलते जग! बाद करा या जूनाट पद्धती आणि येवू द्या मुक्त अर्थ व्यवस्थेचे वारे
उडून जाऊ द्या ही समाजवादाची शिधावाटप जळमटे!

आपला
गुंडोपंत

अशंतः मान्य...

गुंडोपंत,

आपला प्रतिसाद अशंतः पटला. जेथे वेगळे वाटले तितकेच येथे लिहायचा प्रयत्न करतो:

समजून घ्या बदलते जग! बाद करा या जूनाट पद्धती आणि येवू द्या मुक्त अर्थ व्यवस्थेचे वारे उडून जाऊ द्या ही समाजवादाची शिधावाटप जळमटे!

"मुक्त अर्थव्यवस्था ही येयलाच हवी जी आली आहे ती रहायला हवी आणि सातत्याने योग्य दिशेने बदलायला हवी," असे मत असेल तर अगदी सहमत! पण मुक्त अर्थव्यवस्था म्हणजे अमेरिकेशी जवळीक इतकाच दृष्टीकोन ठेवला तर आपली अवस्था पांगुळगाडा वापरणार्‍या व्यक्तिसारखी होऊ शकेल. याचा अर्थ अमेरिकेशी जवळीक/मैत्री नको असा भाग नाही तर नक्की आपण देश म्हणून आपल्याला आणि आपल्या माणसांना काय योग्य याचा विचार करायला हवा...

इतके सगळे काही करत बसण्यापेक्षा फक्त श्रीमंतीच जरा कमी केली तर आपोआपच गरीबी दूर नाही का होणार? ;))

ह्या संदर्भात असे गमतीत म्हणले जाते की समाजवादी विचारसरणीत सर्वांना वैभवी होण्यासाठी प्रवृत्त करण्या ऐवजी सर्वांनी दरीद्री रहाण्यासाठी प्रोत्साहन दिले गेले...

स्वातंत्र्या नंतर नेहरू सत्ते वर नसून कुणी जागतिक अर्थ- राजकारणाची 'किमान माहिती' असलेला माणूस जरी सत्तेवर असता, तर ही वेळ न येती.
नेहरूंनी समाजवादी अर्थव्यवस्था अथवा "सुवर्णमध्य" असलेली अर्थव्यवस्था आणली म्हणून फार काही त्याकाळासाठी चुकले असे वाटत नाही. पण त्यांच्या स्वप्नाळू वृत्तीचा आणि देशापेक्षा परदेशात स्वतःची प्रतिमा तयार करण्याच्या वृत्तीचा जास्त तोटा सहन करावा लागला असे वाटते. (भारताला आणि व्यक्तिगत त्यांना देखील).

आपण अमेरिकेचे मित्र झालो असतो तर हीच श्रीमंती ४० वर्ष आधी आली असती की नाही?...अमेरिकेचे धोरण कसेही असो, पण जे देश त्यांचे मित्र आहेत त्या सर्वांनी आर्थिक सुबत्ताच पाहिली आहे हे विसरून चालणार नाही.

हे तितकेसे पटले नाही. अमेरिका स्वतःचा स्वार्थ अगदी जाहीरपणे बघते इतर कशालाही त्यांच्या दृष्टिने दुय्यम दर्जा असतो. यातील दुसरा भाग बरोबर की चूक याबद्दल वाद होऊ शकेल पण पहीला भाग (राष्ट्रीय स्वार्थ) हा योग्यच वाटतो. जे देश अमेरीकेचे मित्र झाले त्यांच्याकडे कसली सुबत्ता आली? - पाकीस्तान पहा, ब्राझील/द. अमेरिकेतील अनेक राज्ये पहा, किंबहूना एक कॅनडा आणि पश्चिम युरोप सोडल्यास इतरांना काही त्यांचा सरळ उपयोग झाला (मैत्रीमुळे) असे वाटत नाही.

अमेरिका

मल अभिप्रेत आहे तीअर्थिक मैत्री.
आपल्या,
भारताच्या आर्थिक स्वार्थासाठी जी काही साधता येईल ती मैत्री.
अशी मैत्री आज चीनने साधलीच आहे ना? चीनही अमेरिकेला जागतिक राजकारणात दुय्यम दर्जाच द्यायचा प्रयत्न करतो.

आज चीन ने पेट्रोलसाठी सुदान शी संधान बांधले आहे. शिवाय व्हेनेझुएलाशी खास संबंध प्रत्यक्षात आणले आहेत. त्यांनी अमेरिकेला कुठेही भीक घातली नाही.
यात तर भारत कुठेच दिसत नाही.राअपली आंतरराष्ट्रीय होण्याची प्रक्रिया म्हणजे रशिया किंवा अमेरिकेचे बाहुले इतकीच?

शेवटी आपण स्वयंभू होणे महत्वाचेच आहे. ही जाणीव आपल्या धोरणात कधी दिसायची?
आपण देश म्हणून आपल्याला आणि आपल्या माणसांना काय योग्य याचा विचार करायला हवा...
तो विचार फार कमी दिसतो.
या समाजवादी भंपक शिधावाटपापेक्षा प्रत्येकाकडे इतके पैसे येणे महत्वाचे की ते खाण्याचे पदार्थ खरेदी करू शकतील.

आपला
गुंडोपंत

येथे समाजवाद म्हणजे नेमके काय?

> या समाजवादी भंपक शिधावाटपापेक्षा प्रत्येकाकडे इतके पैसे येणे महत्वाचे की ते खाण्याचे पदार्थ खरेदी करू शकतील

"प्रत्येकाकडे पैसा यावा" याचा हिशोब कोण करणार? (बहुधा सरकार, कारण प्रत्येकाकडे चौकशी करायला प्रत्येक नागरिकाकडे साधन नसते. अर्थात एखाद्या नफा तत्त्वावर चालणार्‍या कंपनीकडून ही चौकशी करता येईल, पण तिचे बिल करदाता/सरकारच भरेल.)
"प्रत्येकाकडे पैसा येणे महत्त्वाचे" या महत्त्वाला जाणून कारवाई/प्रयत्न करायचे बळ कोणाकडे आहे? ती जबाबदारी कोणाची? (बहुधा सरकारची, कारण कुणा एका व्यक्तीकडे फक्त स्वतःकडे, थोड्याच लोकांकडे पैसा येऊ करण्याचे बळ असते. मी खुद्द माझ्या ओळखीच्या दोनचार लोकांपेक्षा अधिक, म्हणजे सर्व, लोकांकडे पैसा यावा याची वैयक्तिक जबाबदारी सपशेल नाकारतो.)
आणि हा प्रयत्न म्हणजे नेमके काय करावे? ठीक आहे - शिक्षण द्यावे, कायदा-सुव्यवस्था राखावी, आणि लोकांना स्वतःच्या बळावर रोजीरोटी कमावू द्यावी. पण मग तरी सुशिक्षित बेकारी दिसून आल्यास नेमके काय करावे? "पैसा येणे महत्त्वाचे" म्हणून शिधावाटपाऐवजी पैसा-वाटप करावा का?

खरे म्हणजे तुमच्या वाक्यात "प्रत्येक" वगैरे उल्लेख, आणि त्या प्रत्येकाबद्दल सहानुभूती ही एका प्रकारे समाजवादाचेच द्योतक आहे. यात "भंपक काय?" वगैरे विचार न करता, "कार्यक्षम काय?" हा विचार अधिक फलदायी ठरावा.

शिधावाटप संस्था जर कार्यक्षम असती तर तिचे बाजाराचा चढ-उतार नियोजित करण्यात दोन वेगवेगळे उपयोगी पैलू असतात.
१. शेतकर्‍यांना बाजारभावाच्या वार्षिक चढउतारातून सौम्य संरक्षण देणे. बहुतेक शेतकरी वर्षाचे-वर्षाला अर्थनियोजन करतात. एखाद्या वर्षी धान्याचे भाव पडले, तर तो तोटा पचवून पुढच्या भाववाढीच्या वर्षासाठी पेरणी करण्याइतपत त्यांच्याकडे बचत नसते. स्वस्त-बाजारभावापेक्षा थोडी अधिक, पण महाग बाजारभावापेक्षा कमी किमतीची हमी असली, तर किमतीचे वार्षिक चढउतार शेतकर्‍याला काही प्रमाणात चालवून घेता येतात. किमतीची ही हमी शिधावाटप संस्था देऊ शकते.
२. गिर्‍हाइकांना बाजारभावाच्या वार्षिक चढउतारातून सौम्य संरक्षण देणे. बहुतेक गिर्‍हाईक वर्षाचे-वर्षाला अर्थनियोजन करतात. एखाद्या वर्षी धान्याचे भाव वधारले, तर तो तोटा पचवून पुढच्या स्वस्ताईच्या वर्षासाठी मजुरी करत राहाण्याइतपत त्यांच्याकडे बचत नसते. स्वस्त-बाजारभावापेक्षा थोडी अधिक, पण महाग बाजारभावापेक्षा कमी किमतीची हमी असली, तर किमतीचे वार्षिक चढउतार गिर्‍हाइकाला काही प्रमाणात चालवून घेता येतात. किमतीची ही हमी शिधावाटप संस्था देऊ शकते.

बहुतेक आधुनिक देशांत शिधावाटप संस्था असते. अगदी भांडवलशाही राज्यांचा अग्रणी असलेल्या अमेरिकेतसुद्धा. (गरीब लोकांसाठी "फूड स्टँप्स"चा कार्यक्रम अमेरिकेच्या केंद्र सरकारचा शेतकी विभाग चालवतो. तसेच सरकार शेतकर्‍यांना "सबसिडी" पुरवते.) उलट भांडवलशाही नसलेल्या गरीब देशांत शिधावाटप संस्था एक तर नसतेच, किंवा अकार्यक्षम असते.

पुनश्च : यात "समाजवाद/भंपकपणा काय?" वगैरे विचार न करता, "कार्यक्षम/अकार्यक्षम काय?" हा विचार तुमच्याच सहानुभूतीच्या मतांचा परिपोष करण्यासाठी अधिक फलदायी ठरावा.

भारतातील गरिबीचा अनुभव.

मागच्या वर्षी उत्तरांचल या प्रदेशात जाण्याचा योग आला होता. रेल्वेने प्रवास करताना बाजूला एक महिला बसली होती. ( वय ४५-५० असावे.) तिने आपले केस पूर्णपणे काढले होते त्यामूळे तिला विचारले की आपण तिरुपतीला गेला होता काय? तिने सांगितले की कर्करोगावर औषध योजना चालु असल्यामूळे तिचे पूर्ण केस गळालेले आहे. मग अश्याच गप्पा चालु असताना कळाले की तिचे मोलमजूरीचे मासिक उत्पन्न २५०० रुपये असुन तिच्या नवर्‍याचे विजेचा धक्का बसुन काही वर्षापूर्वीच निधन झाले होते. तिला एक २४/२५ वर्षाची मुलगी आणि तिला २/३ वर्षाचा मुलगा आहे. तिच्याही मुलीचा नवरा असाच बांधकामवरुन पडून मरण पावला होता.

अश्या लोकांना भेटल्यावर आजही आपल्या देशातील समस्या, गरिबी आणि असमानता किती आहे याचा सर्वजाणकार लोकांनी विचार करावा.

मुक्त अर्थव्यचस्थाची सुरवात आणि शेतकर्‍यांची आत्महत्या, निवृत्तांचे व्याजावरचे हलाखीचे जिणे, तरुणाची मुक्त उधळण इत्यादीचा सर्वानी विचार करावा.

अवांतर : वरील अनुभवाच्या अगोदरच आमच्या कंपनीत अंदाजे लाखाची पगारवाढ झाली असतांना अनेक लोक नाराज होते याचाही विचार व्हावा. ( पुण्यामुंबईत चांगल्या आस्थापनेत ८ लाखाच्या आसपास वेतन मिळते अशी माहिती आहे. त्यात नवरा आणि बायकोचे वेतन पकडले तर ते १० लाखाच्या वरही जाते.)

मनाला

आपला प्रतिसाद मनाला भिडला!
अशी माणसं भेटली, पाहिली की मग माझेही सगळे भांडवलवादी विचार जिरूनच जातात कुठे तरी...
(ते परत् येतात आणि मग कुठून तरी!)
अशी मदत बंदच करावी असे मला म्हाणायचे नव्हते हो!
मला इतकेच म्हणायचे होते की सिस्टीम अशी का नसावी की ज्या मध्ये सगळ्यांनाच पोटभर खायला मिळू शकेल. किमान गरजा भागतील?
वृद्धपकाळाची काही तरी सोय असेल?
भारतातल्या लोकांना हा हक्कच नाही का?

माझा राग शिधावाटप यंत्रणेवर नाही हो... पण ती यंत्रणा इतकी विस्कळीत पणे चालवून सामान्य माणसाला लाचार अणि गरिब करून सोडणार्‍या नोकरशहांवर आहे.

म्हणून नको तो समाजवाद असे वाटते.

आपला
गुंडोपंत

अश्रु.

अजूनही ती स्त्री डोळ्यासमोर आली की डोळ्यात अश्रु येतात. कदाचित असे लोक आपल्याला रस्त्यारस्त्यावर भेटत असतील. असो.

आपल्याला यावर मुलभुत मार्ग शोधला पाहिजे. कोणत्याही देशाची भ्रष्ट नक्कल करुन ही समस्या संपणार नाही. आपल्या देशातील गोरगरिबांना न्याय मिळेल असे बघावे लागेल.

बर्‍याच दिवसापासून माझ्यामनात काही विचार घोळत असतात. आपल्या भारतात खरे तर चार वर्ण. पुरुषार्थाच्या कसोटीवर शोर्य ( स्वरक्षण -> दुबळ्यांचे रक्षण करणे ), ब्रह्मज्ञान ( शिक्षण देणे - घेणे), वैश्य ( पैसे मिळविणे ->दान धर्म करणे ) आणि शुद्र ( सेवा करुन समाजाचा पाया स्थिर करणे) इत्यादी.

याचा विचार करुन परत आपल्याला भारताची अर्थव्यवस्था बांधता येईल का? अर्थातच अगोदर झालेल्या जातीपातीच्या जाचक आणि मानवता विरुद्ध गोष्टींना टाळूनच.

गांधी / गोळवळकर यांचे वर्ण्यविषयक विचाराचा परत मागोवा घ्यायला काय हरकत आहे?

 
^ वर