फलज्योतिषाचा शास्त्रीय आधार तपासणार” – डॉ. नारळीकरांचा पुढाकार.

फलज्योतिषाचा शास्त्रीय आधार तपासणार” – डॉ. नारळीकरांचा पुढाकार. सर्व प्रकारच्या ज्योतिषांना प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन!
या शीर्षकाने दि 12 मे 2008 ला डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या अंनिस व पुणे विद्यापीठाचा संख्याशास्त्र विभाग, आंतरविद्यापीठ खगोल शास्त्र व खगोल भौतिकी केंद्र (आयुका) यांनी नवी चाचणी विकसित केली असून त्या मधून संख्या शास्त्रीय पद्धतीने फलज्योतिषाच्या यशाची शक्यता तपासण्यात येणार आहे. कोणताही पूर्व ग्रह न बाळगता येण्याऱ्या उत्तराचे आम्ही संख्याशास्त्राच्या आधारावर विश्लेषण करणार आहोत. ज्योतिषींकडून आलेल्या 40 उत्तरांच्या अचुकतेचे प्रमाण 90 टक्कयापेक्षा अधिक असेल तर फल ज्योतिषाला शास्त्र म्हणून जाहीर करण्यात येईल. 70 टक्क्या पर्यंत उत्तरे अचुक आली तर आणखी अभ्यास करण्यात येईल.
डॉ. नारळीकर म्हणाले फलज्योतिषाला शास्त्रीय आधार नाही असे जरी विज्ञानवाद्यांचे मत असले तरी ते शास्त्रीय दृष्टया सिद्ध होणे आवश्यक आहे. या संबंध परदेशात अनेक चाचण्या घेण्यात आल्या आहेत. आपल्या देशातील फलज्योतिषाचा प्रसार आणि सर्व सामान्यांच्या आयुष्यातील त्याचे स्थान पाहता भारतासाठी अशा पद्धतीची चाचणी असावी असा विचार माझ्या मनात अनेक वर्षे होता. पुणे विद्यापीठाचा संख्याशास्त्र विभाग, आयुका, अंनिसच्या माध्यमातून कोणताही पूर्वग्रह न ठेवता ही चाचणी तयार करण्यात आली असून सर्व प्रकारचे फलज्योतिषी अणि संस्थांना या चाचणीमधे सहभागी होण्याचे आवाहन मी करतो. या चाचणी मधून प्रत्येक ज्योतिषाला किंवा संस्थेला 40 मुलांच्या पत्रिका अथवा पत्रिका तयार करण्यासाठी आवश्यक माहिती पुरवण्यात येईल चाचणी देणाऱ्यांनी फक्त त्यापैकी कोणत्या पत्रिका हुषारांच्या आणि कोणत्या पत्रिका मतिमंद मुलांच्या आहेत हे ओळखून दाखवावे. (सकाळ दि १३ मे २००८)
या वार्तेवर माझे विचार फलज्योतिष शास्त्रींच्या विचारार्थ मांडत आहे.
1. ही परिक्षा का? - सध्या दोन्ही (महाराष्ट्र व अखिल भारतीय) अंनिसंकडे प्रसिद्धी मिळवण्यासाठी कोणताही हातखंडा प्रयोग नाही. डॉ. जयंत नारळीकरांना हाताशी धरून लाखो रुपयांची बक्षिसाची बोली न करता फुकटात ज्योतिषशास्त्राला बदनाम करण्याची संधी मिळवण्याकरिता, पुणे विद्यापीठाला व आयुकासारख्या संस्थांना त्यात गोवून लेखी बदनाम करण्याची ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.
2. परराष्ट्रातील ज्योतिषांना तेथील विज्ञानवाद्यांनी जर चीतपट करून त्यांचे ज्योतिषशास्त्र शास्त्र नाही असे म्हणावयाला भाग पाडले असेल तर भारतीय ज्योतिषांना त्यांच्या (वैदिक) ज्योतिष शास्त्राला मुद्दाम वेगळे चीत करण्याची गरज काय? मात्र अंनिसचे प्रथमपासून तसे धोरण असल्यांने त्यांची चाल आपण समजू शकतो. पण या तऱ्हेचा ‘छळ’ डॉ. नारळीकरांना करण्याचे काही विशेष कारण असावे. अंधश्रद्धा निर्मूलन उर्फ जादूटोणा अघोरी विद्या प्रथा निर्मूलन कायदा सध्या मेलेलाही नाही पण जीवंतही नाही असा कोमात गेलेल्या अवस्थेत असल्याने त्याला प्राणवायू देण्यासाठी ही मोहीम हाती घेणे अंनिसच्या जीवन-मरणा इतके हातघाईवर आलेले प्रकरण आहे.
3. ही परिक्षा घेण्याचा यांना अधिकारच काय?
ही परीक्षा ज्या संस्थेतर्फे, ज्या प्रख्यात व्यक्तींच्या देखरेखीखाली केले जाणार आहे, त्यांनी ‘ज्योतिष’ हे शास्त्र तर नव्हेच मात्र ‘थोतांड’ आहे असे सिद्ध केल्याचे दावा मांडणारी पुस्तके बाजारात उपलब्ध आहेत. अशांनी ही ज्योतिषांची परिक्षा पुर्वग्रह न ठेवता करणार असल्याचे सांगणे म्हणजे मनी मावशीने उंदराला मी सध्या ‘उपवास’ करत हे म्हणून तुला मुळीच खाणार नाही असे आश्वासन देण्यासारखे आहे.
4. ज्या पुणे विद्यापीठाने ज्योतिषशास्त्राला शैक्षणिक दर्जा देण्यास ठाम नकार दिला आहे, त्या विद्यापीठातील संख्याशास्त्र विभाग या परिक्षेचा निकाल ठरवणार (की लावणार?) असल्याने ही परिक्षा खरोखरच निःपक्षपाती असणार कि नाही याची सर्वसामान्यांना कल्पना आहे. मात्र ही चाल उलट पडून ज्या सामान्य लोकांचे मत परिवर्तन करण्यासाठी हा खटाटोप केला जात आहे, ते सामान्य लोक ज्योतिष शास्त्राच्या आणखी जवळ करण्याची शक्यता आहे. भले ज्योतिष शास्त्र असो वा नसो ज्या ज्योतिषांच्यामुळे आम्हाला मानसिक व भावनिक आधार मिळतो त्यांना नष्ट करणाऱ्या संस्था व प्रसिद्ध व्यक्तीं बाबतचा आदर कमी होऊन त्यांच्या अन्य क्षेत्रातील भरीव कार्याबद्दल आमच्या मनात एक प्रकारची अढी बसवण्याची कामगिरी या परीक्षेमुळे नक्की होणार आहे.
५) पुर्वी गावागावातून वादविवाद करून विजयपत्रे मिळवून हत्तीवरून फिरून दरारा व प्रसिद्धी मिळवली जायची त्याचीच ही आधुनिक आवृत्ती आहे.
ज्योतिषांना विनंती
१) ही परिक्षा हा एक सापळा आहे. जे ज्योतिषी वैयक्तिकरित्या खोट्या व तात्कालिक लोकप्रियतेच्या आमिषाला बळी पडतील त्यांच्यामुळे ज्योतिष शास्त्राचे हसे होईलच पण भविष्यकाळात अन्य भारतीय (हिंदू) विद्या उदा. आयुर्वेद, योगासने, अध्यात्म व अन्य शास्त्रे, यांच्यावर हल्ला करण्यासाठी विरोधकाना धारदार शस्त्र मिळाल्यासारखे होईल.
२) हे आव्हान ज्योतिषशास्त्राला आहे. त्यामुळे त्याला संस्थांतर्गत उपाय योजना करून तोड काढली पाहिजे. त्यासाठी सर्व ज्योतिषशास्त्र संचलन करणाऱ्या महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतभरातील संस्थांनी एकत्र येण्याची ऐतिहासिक गरज निर्माण झाली आहे. वैयक्तित मतभेद वा मतांतरांना आत्ता स्थान नाही. या निमित्ताने एक संयुक्त समिती स्थापन करून ह्या आव्हानाला एकत्रित व कायमचे बंद करायला हवे आहे.
३) महाराष्ट्राबाहेरील चौबे-पांडे, त्रिवेदी, श्रीमाली टाईप उत्तर भारतीय ज्योतिषी अशा आव्हानांना तात्काळ बळी पडण्याची शक्यता जास्त आहे. कारण त्यांना समोरील पक्ष किती बनेल व धूर्त आहे याची नीट कल्पना नाही. मात्र मराठी लोकांना विरोधकांचे छक्केपंजे चांगलेच ज्ञात आहेत.
४) हुशारी हा निकष लावण्यातील त्यांची ‘हुशारी’ लक्षात घेण्यासारखी आहे. ८० टक्केवाला ढ, ९० टक्केवाला बरा व फक्त गणितात १०० गुण मिळवणारा खरा हुशार असे म्हणून ‘मार्कशीट’ वरून हुशारीची प्रतवारी करून / पाडून ज्योतिषीय अंदाज खोटे पाडण्यासाठी खेळी म्हणून त्याचा उपयोग केला जाऊ शकतो.
५) या ऐवजी असे निकष असावेत की जे तात्काळ व प्रत्यक्ष पडताळता येतील शिवाय ज्योतिषशास्त्रातही त्याची पडताळणी करण्यासाठी विशिष्ट असे आडाखे उपलब्ध असतील. (सहज सुचले म्हणून - आंधळा, पाय वा अन्य अवयव तुटका, पोलिओ, पांढरे कोडवाला व्यक्ती)
६) जो जिंकेल त्याला काय मिळणार?
अंनिस आणि पार्टी ही परिक्षा जिंकणार हे ठरवून ठेवलेले उत्तर असल्याने ‘ज्योतिषाचा धंदा कायदेशीररित्या बंद करावा’ ही अट स्वाभाविकपणे मान्य करायला लावणे ही त्यातली मेख आहे. ९० टक्यांखाली उत्तरे बरोबर आली तर ती लढाई ‘अनिर्णित’ झाली असून जोवर अंनिसकडून तिचा ‘निकाल’ लागत नाही तोवर ती खेळली पाहिजे, असा धर्मराजाला शेवटपर्यंत द्यूत खेळायला भाग पाडणारा व त्याला पुरते नागवले जाण्याला प्रवृत्त करणारा हा आधुनिक शकुनीमामांचा घाट आहे.
७) पण याही परिस्थितीत ज्योतिषांनी ही परिक्षा जिंकली तर?
अशी अट घालता येईल - अंनिस व त्यांच्या विचारांच्या जगातील सर्व संस्थांतर्फे ‘पराजयपत्र’ दिले जावे. शिवाय यापुढे अन्य कुठल्याही प्रांतात, नव्हे जगात कुठेही जर कोणी अशी परिक्षा करण्याची शक्कल काढेल तर त्याला डॉ. नारळीकर व डॉ. दाभोलकर त्यांच्या अखत्यारीतील सर्व ज्योतिषशास्त्र विरोधी संस्था जातीने ज्योतिषशास्त्राच्या बाजूने लढतील व ज्योतिष ‘शास्त्र’ कसे आहे याचे प्रात्यक्षिक करून त्यावेळच्या विरोधकांची तोंडे बंद करतील. असा लेखी ‘कबूलनामा’ त्यांनी द्यायला हवा. तसे काही न करता जर ही परिक्षा केली जाणार असेल तर ती क्रिकेटच्या कसोटी सामन्याप्रमाणे एक न संपणारी कसोटी ची मालिकाच ठरेल.
८) भविष्य काळात जर सर्व अटी मंजूर झाल्या तर अशा परिक्षेसाठी प्राचार्य अद्वयानंद गळतगे. मु. पो. भोज. जि. बेळगाव. कर्नाटक. पिन – ५९१२६३. (फोन ०८३३८-२९३३९९ व मो. ०९८८६६७८१८३) यांना अन्य पंचांसमावेत नियुक्त केले जावे. ते पंच बनण्यासाठी अत्यंत लायक असण्याची दोन कारणे आहेत.
१. पूर्वी सांगलीत गिरिश शहांच्यातर्फे अशा तऱ्हेच्या ज्योतिष शास्त्राच्या कसोटीसाठी प्रा. अद्वयानंद गळतग्यांनी पंच म्हणून काम करण्याचे उत्स्फूर्तपणे मान्य केले होते. ‘त्यावेळी डॉ दाभोलकरांनी शहांना आव्हान देऊन पलायन केले’ असे वर्णन त्यांनी त्यांच्या ‘विज्ञान व अंधश्रद्धा निर्मूलन’ या अंनिसच्या फसलेल्या मोहिमांवर आधारित पुस्तकात केले आहे.
२. प्राचार्य अद्वयानंद गळतग्यांनी १२-१३ वर्षापूर्वी डॉ. नारळीकरांना शास्त्रीय कसोटी करण्याला आवाहन करण्यासाठी लागोपाठ पाच सविस्तर पत्रे पाठवून मनधरणी केली होती. (ती पाचही पत्रे ‘बोध अंधश्रद्धेचा’ पुस्तकात समाविष्ट आहेत) त्यावेळी त्यांनी दाद दिली नव्हती. कदाचित त्यामुळे त्यातून त्यांना प्रेरणा मिळाली असेल. कारण आता ते म्हणतात की बऱ्याच काळापासून त्यांच्या मनात असे करण्याचे घाटत होते!
समस्त ज्योतिषशास्त्रींच्या विचारार्थ.

शशिकांत ओक

लेखनविषय: दुवे:

Comments

ज्योतिषवाद्यांना अंनिसला गारद करण्याची सुवर्णसंधी

लेख विचार करण्याजोगा आहे खरा. वाचल्यावर काही प्रश्न डोक्यात आले-


ज्योतिषींकडून आलेल्या 40 उत्तरांच्या अचुकतेचे प्रमाण 90 टक्कयापेक्षा अधिक असेल तर फल ज्योतिषाला शास्त्र म्हणून जाहीर करण्यात येईल. 70 टक्क्या पर्यंत उत्तरे अचुक आली तर आणखी अभ्यास करण्यात येईल.

हे तर्कशास्त्राला अनुसरूनच आहे असे वाटले. ५० टक्के बरोबर अंदाज तर सामान्यपणे येतोच. ७०%ना अधिक अभ्यास आणि ९०%ना शास्त्र म्हणून मान्यता यात काहीच चुकीचे वाटत नाही. ज्योतिष हे शास्त्र आहे असे जाहिर होण्याची शक्यता न वाटण्याचे कारण समजले नाही. मला वाटते ज्योतिषांकडे तेवढा आत्मविश्वास असला पाहिजे.
उलट 'अंनिस'ला गारद करण्याची ही सुवर्णसंधीच आहे. ती ज्योतिषांनी दवडू नये असे वाटते. पाहिजे तर वाटाघाटीने ९०%ची अट ८०% वर आणणे शक्य आहे.

पुणे विद्यापीठाला व आयुकासारख्या संस्थांना त्यात गोवून लेखी बदनाम करण्याची ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.

असे त्यांना वाटत नाही. म्हणून तर ते या मोहिमेत सामिल झाले आहेत.


वैयक्तित मतभेद वा मतांतरांना आत्ता स्थान नाही. या निमित्ताने एक संयुक्त समिती स्थापन करून ह्या आव्हानाला एकत्रित व कायमचे बंद करायला हवे आहे.

असे म्हणून पुढच्याच वाक्यात -

महाराष्ट्राबाहेरील चौबे-पांडे, त्रिवेदी, श्रीमाली टाईप उत्तर भारतीय ज्योतिषी अशा आव्हानांना तात्काळ बळी पडण्याची शक्यता जास्त आहे.

असे म्हटले आहे. हा विरोधाभास जाणवतो. हे 'टाईप 'महाराष्ट्रीय ज्योतिषांपेक्षा कमी दर्जाचे मानले जातात का? आव्हानांना बळी पडणे म्हणजे नेमके काय? समजा या 'टाईप'च्या लोकांनी नारळीकरांचे आव्हान जिंकले तर महाराष्ट्रीय ज्योतिषांवर त्याचा काय परिणाम होईल?


हुशारी हा निकष लावण्यातील त्यांची ‘हुशारी’ लक्षात घेण्यासारखी आहे. ८० टक्केवाला ढ, ९० टक्केवाला बरा व फक्त गणितात १०० गुण मिळवणारा खरा हुशार असे म्हणून ‘मार्कशीट’ वरून हुशारीची प्रतवारी करून / पाडून ज्योतिषीय अंदाज खोटे पाडण्यासाठी खेळी म्हणून त्याचा उपयोग केला जाऊ शकतो.

असे वाटत नाही. हुशार आणि मतिमंद यांच्या बुद्ध्यांकातला फरक लक्षणीय असतो. फारतर बुद्ध्यांकाची सीमारेषा अगोदर नक्की करता येईल. उदा. ४० पेक्षा कमी 'ढ', ८० पेक्षा जास्त 'हुशार' वगैरे...


ज्योतिषाचा धंदा कायदेशीररित्या बंद करावा’

आव्हानात असे कुठे म्हटलेले आढळले नाही. फक्त ज्योतिष हे शास्त्र नाही इतके मान्य करावे लागेल. ती एक कला आहे असाही त्याचा अर्थ होऊ शकतो. कोणत्याही नैतिक व्यवसायावर कायद्याने बंदी आणणे तितके सोपे नाही.


पण याही परिस्थितीत ज्योतिषांनी ही परिक्षा जिंकली तर?

ज्योतिषवादी पक्षाला अटी घालण्याची पूर्ण मुभा असावी. त्याबद्दल नारळीकर आणि अंनिस यांच्याशी चर्चा करून अटी ठरवाव्यात.


प्राचार्य अद्वयानंद गळतगे यांना अन्य पंचांसमावेत नियुक्त केले जावे.


पंच दोन्ही बाजूंनी सुचवावेत. तसेच सर्व विदा प्रसिद्धी माध्यमांमधून सामान्य जनतेसमोर ठेवला जावा. पारदर्शक व्यवहार असावा. एकूण किती पत्रिका असतील तेही जाहिर व्हावे.

केवळ एकांगी विचार न मान्य करता डॉ. नारळीकर आणि अंनिसच्या बाजूनेही विचार करून त्यानुसार आव्हानाबाबत योग्य तो निर्णय घ्यावा.
'ज्योतिष हे शास्त्र आहे की नाही?' या प्रश्नाचा योग्य तो अखेरचा सोक्षमोक्ष लावण्याची ही सुवर्णसंधी ज्योतिषांनी दवडू नये आणि डॉ. दाभोलकरांनी सांगलीला जसा पळ कढला तसाच पळ त्यांना आणि डॉ. नारळीकरांना येथेही काढायला लावावा ही आग्रहाची विनंती.

अवांतर -
सहज सुचले म्हणून - आंधळा, पाय वा अन्य अवयव तुटका, पोलिओ, पांढरे कोडवाला व्यक्ती
अशी दुखावणारी भाषा कृपया वापरू नये.

संयमित प्रतिसाद

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री. विसुनाना यांचा हा प्रतिसाद तर्काला पटणारा आहे.मूळ लेखन कितीही भडक असले तरी प्रतिसाद संयमित शब्दांत आहे. श्री. विसुनाना यांनी अवांतर म्हणून लिहिले आहे:

.... - आंधळा, पाय वा अन्य अवयव तुटका, पोलिओ, पांढरे कोडवाला व्यक्ती
अशी दुखावणारी भाषा कृपया वापरू नये.

या विचाराशी मी शतप्रतिशत सहमत आहे.
....माझे अवांतरः
प्रतिसादाचे शीर्षक "ज्योतिषवाद्यांना अंनिसला गारद करण्याची सुवर्णसंधी" ऐवजी :
" अंनिसला गारद करण्याची ज्योतिषवाद्यांना सुवर्णसंधी " असे हवे होते.

चाचणी

फलज्योतिषाला विज्ञानाचा पाया आहे का? हा सर्व जगभर बहुचर्चित विषय आहे. परदेशात याबाबत अनेक संशोधनेही झाली आहेत. पण भारतात आता अधिकृतपणे अशी पहिली संशोधन चाचणी सुप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ डॊ. जयंत नारळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आली आहे.त्यामध्ये आयुका ही खगोलशास्त्राची भारतीय पातळीवरील संस्था, पुणे विद्यापीठाचा संख्याशास्त्रीय विभाग व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिति यांचा सहभाग रहाणार आहे.चाचणीचे स्वरुप सरळ व सोपे आहे.मतिमंद शाळेत शिक्षण घेणा-या १०० जन्मवेळा त्यांच्या पालकांच्या सहीने जमा करण्यात आल्या आहेत. शाळेत सातत्याने ७० टक्के व यापेक्षा अधिक गुण मिळवणा-या विद्यार्थ्यांच्या जन्मवेळा याच प्रमाणे जमा केल्या आहेत. मतिमंद असणे वा बुद्धिमान असणे हे व्यक्तिच्या बाबत अत्यंत वेगळी व स्पष्टपणे भिन्न अवस्था आहे. त्याचे प्रतिबिंब आयुष्यातील महत्वाच्या घटनांवर भाष्य करणा-या पत्रिकेत उमटावयास हवे. असे चाचणी संयोजकांचे मत आहे. नामवंत ज्योतिषी, फलज्योतिष संस्था वा हा व्यवसाय करणारी कोणीही व्यक्ती यांना चाचणीत सहभागी होण्याचे आवाहन जाहीरपणे करण्यात आले आहे. ज्यांच्या कडून अनुकूल प्रतिसाद लाभेल त्यांना सर्वसाधारणपणे चाळीस जन्मपत्रिका व जन्मवेळेचा तपशील या दोन्ही बाबी पाठवल्या जातील. या तपशीला मुळे आवश्यक वाटल्यास चाचणी देणारी संबंधीत व्यक्ती स्वत:देखील कुंडली बनवू शकेल.त्या कुंडलीद्वारे संबंधीत कुंडली ही मतिमंद मुलाची आहे कि बुद्धिमान मुलाची आहे एवढेच सांगावे अशी अपेक्षा आहे.चाचणी साठी दिलेल्या पत्रिकांतील काही पत्रिका या मतिमंद मुलांच्या तर काही पत्रिका या हुषार मुलांच्या असतील. ज्योतिषांनी कोणती पत्रिका कोणाची हे ९०% अचूक ओळखल्यास फलज्योतिष या विषयाकडे शास्त्र म्हणुन पहाण्यास मर्यादित अनुकुलता प्राप्त होईल.७०% पेक्षा कमी प्रमाणात उत्तरे बरोबर आली तर या केसमध्ये फलज्योतिष हे शास्त्र नाही हे आपोआपच सिद्ध होईल. ७०% ते ९०% प्रमाणात ज्योतिषाची भाकिते अचूक ठरल्यास आणखी मोठ्या सॆंपल सह चाचणी घेण्यात येईल. कुंडलीच्या आधारे आपले निष्कर्ष पाठवण्यास संबंधितांना पुर्ण एक महिना देण्यात येईल. ही चाचणी पुणे विद्यापीठ संख्याशास्त्र विभाग हा 'डबल ब्लाईंड टेस्ट' या पद्धतीने घेईल. ज्योतिषांनी डॉ. सुधाकर कुंटे, संख्याशास्त्र विभाग , पुणे विद्यापीठ , पुणे ४११००७ याच पत्त्यावरुन कुंडल्या मागवायच्या आहेत. ही चाचणी पुर्णत: विनामुल्य आहे. मात्र कुंडल्यांचे झेरॊक्स व पोस्टेज यासाठी सहभागी होउ इच्छिणा-यांनी ११'' * ९'' आकाराचे, रुपये ३५ ची तिकिटे लावलेला स्वतःचा पत्ता असलेला लिफाफा पाठवणे गरजेचे आहे. याच स्वरुपाच्या आणखी काही चाचण्या पुढील काळात घेण्याचा मनोदय आहे. ही सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे.त्यामुळे फलज्योतिषाला वैज्ञानिक पाया आहे का? यावर अधिक प्रकाश पडू शकेल. ही प्राथमिक चाचणी आहे अंतिम चाचणी नव्हे.

प्रकाश घाटपांडे
चाचणी प्रकल्प समन्वयक

फलज्योतिषचिकित्सा - रा ज गोखले

रा ज गोखले या भुगोलाचे शिक्षक असलेल्या गृहस्थांनी १९३५ साली लिहिलेल्या "फल्ज्योतिष चिकित्सा" या पुस्तकातील उतारा पहा. त्याकाळी देखील चाचणीचे प्रयत्न झाले होते.

FaljyotishaChikitsa 020
FaljyotishaChikitsa 021a
FaljyotishaChikitsa 021b
FaljyotishaChikitsa 022 a
FaljyotishaChikitsa 022 b

प्रकाश घाटपांडे

अभिनंदन

नारळीकरांच्या या स्त्युत्य उपक्रमात आपले उपक्रमी श्री प्रकाश घाटपांडे यांचा "ज्योतिषी आणि उपक्रमाचे समन्वयक" म्हणून सहभाग आहे (स्त्रोतः मटा "http://maharashtratimes.indiatimes.com/rssarticleshow/3033323.cms") याचा मला एक उपक्रमी म्हणून अतिशय आनंद होतो आहे. :)
या अश्या स्वरुपाच्या उपक्रमात समन्वय साधणे हे फार धैर्याचे काम घाटपांडे यांनी आपल्या शिरावर घेतले आहे ; त्याबद्दल त्यांचे अभिनंदन!

प्रकाशराव,
या उपक्रमात येणार्‍या अनुभवांवर वेळोवेळी उपक्रमावर लिहावेत अशी विनंती आहे!

-ऋषिकेश

मनःपूर्वक अभिनंदन!!

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
ज्योतिषाचे दावे तपासण्याचा हा वैज्ञानिक प्रकल्प स्वागतार्हच आहे.या प्रकल्पाचे समन्वयक श्री. प्रकाश घाटपांडे आहेत ही उपक्रमींच्या दृष्टीने आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे.
श्री. प्रकाश घाटपांडे यांचे हार्दिक अभिनंदन! हा कार्यभार सांभाळण्यास ते सक्षम आहेतच.
...पूर्वानुभवाचा विचार करता या योजनेला ज्योतिषांचा कितपत प्रतिसाद लाभेल हा प्रश्न आहे.

प्रकल्प वैज्ञानिक नाही

प्रकल्प वैज्ञानिक नसून सांख्यिकीवर आधारीत आहे.

वेज्ञानिक

म्हणजे? सांख्यिकी वैज्ञानिक नाही?

आहे

आहे

आपला
गुंडोपंत

+१

या प्रकल्पाचे समन्वयक श्री. प्रकाश घाटपांडे आहेत ही उपक्रमींच्या दृष्टीने आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे

असेच म्हणतो.

महाराष्ट्र ज्योतिष परिषदेच्या विचारार्थ,

“फलज्योतिषाचा शास्त्रीय आधार तपासणार” – डॉ. नारळीकरांचा पुढाकार. सर्व प्रकारच्या ज्योतिषांना प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन!

या वार्तेवर माझे विचार फलज्योतिष शास्त्रींच्या या परिषदेच्या चर्चा सत्रात विचारार्थ मांडत आहे.

फल ज्योतिषाबद्दल जनसामान्य लोकांत संशय व भ्रम उपस्थित करून ज्योतिषशास्त्राला बदनाम करण्याची युक्ती अंनिस सारख्या संस्था वारंवार करत असतात. अंनिसने सुचवलेली तपासणी प्रक्रियाच पुढे करून त्यांचा डाव त्यांच्यावर उलटवणे आपल्याला शक्य आहे. त्यासाठी परिणामकारक व कायमचा तोडगा शोधण्यासाठी आपण इथे उपस्थित राहून विचार करणार असलो तर खालील प्रस्ताव मांडू इछितो.
1. अंनिस व त्यांच्या समविचारांच्या लोकांनी पोलिसी खाक्याने हे कुंडल्यांची तपासणी करण्याचे ठरवल्याने तसे करण्याचा त्यांचा अधिकार व योग्यता हा प्रश्न पुढे करून अशी तपासणी करण्याचे परिषदेने मान्य न करणे अगदी स्वाभाविक आहे. तथापि सामान्य जनांमधे आपल्या ज्योतिषशास्राच्या कार्याबद्दल आस्था कायम राहावी, त्यांच्या भावना व श्रद्धेला तडा जाऊ नये. लोकांची मनोधारणा ज्योतिषशास्त्राच्या विरोधात जाणार नाही, याची खबरदारी घेण्याची जबाबदारी परिषदेवर आहे.त्यामुळे अशी तपासणी करण्याचे आव्हान परिषदेला टाळून चालणार नाही. नाही तर विरोधकांनी लढाई न करताच विजय मिळवल्यासारखे होईल. भविष्यकाळात ते आणखी कुरापती काढण्याला उद्युक्त होतील. हे परिषद नाकारू शकणार नाही.
2. प्रस्ताव –
अ) या पुढे अंनिसने तपासणी असा शब्द न वापरता एकत्रितपणे हाती घेतलेले शोधकार्य असा उल्लेख सर्वत्र व नेहमी करण्याचे बंधनपूर्वक मान्य करावे.
आ) परिषदेतर्फे सर्व संस्थांच्या ज्योतिषींना प्रतिनिधित्व मिळेल अशा संख्येचा संघ तयार करावा. त्याच प्रमाणे अंनिसच्या बाजूने ज्यांनी ज्योतिष शास्त्राचा अभ्यास केलेला आहे पण काही कारणाने त्या शास्त्राला न मानणाऱ्या व अंनिसच्या विचाराने प्रेरित अशा तितक्याच प्रतिनिधींना उपस्थित करावे. आता दोन्हीकडून ज्योतिषशास्त्राचे अभ्यासक प्रतिनिधी असल्याने परिषदेची शास्त्राच्या मूलभूत तथ्यांची प्रत्यक्षात शहानिशा (तपासणी नव्हे) करण्यास हरकत नसावी.
इ) अंनिसला ही अट मान्य होईल तर चांगलेच. तथापि, त्यांनी तसे मानायला नकार दिला (तेच जास्त शक्य आहे) तर परिषदेने आपणहून अंनिसने सुचवलेली कसोटी आपल्यातर्फे राबवावी. त्यामुळे लोकांच्या आपेक्षांची पूर्तीही होईल व अंनिस कशी अडेल तट्टू आहे, याचा प्रत्यय ही लोकांना येईल. ज्योतिषशास्त्राची महानता लोकांना पटवून देण्याला परिषदेला आयतीच संधी मिळेल.
ई) अंनिस मागे हटली तर – १) परिषदेने पुढाकार घेऊन १०० मंदमती किंवा सव्यंग व्यक्तींच्या वेगळ्या कुंडल्या मिळवाव्यात. त्या पत्रिकांमधून ग्रहस्थिती व ज्योतिषशास्त्र पध्दतीच्या अन्य आडाख्यांवरून एक सर्वमान्य कोष्टक करावे. त्यामधून जमवलेल्या कुंडल्यांचा त्या कोष्टकाशी कसा मेळ बसतो, ते दाखवून देण्याचे कार्य करण्याचे घोषित करावे. तसे करत असताना काही कुंडल्या या आडाख्यांशी न जुळणाऱ्या आढळल्या तर त्यांचे स्पष्टीकरण ही करून दाखवले जाईल असे ही प्रसिद्ध करावे. २) त्या कुंडल्या ज्या व्यक्तींच्या होत्या त्यांची नावे व शक्य झाल्यास त्या सव्यंग व्यक्तींना प्रसारमाध्यमांसमोर प्रत्यक्ष उभे करून उत्तर द्यावे. म्हणजे परिषदेने जमवलेल्या पत्रिका ज्योतिषांनी आपल्या मनाने बनवलेल्या आहेत असा आक्षेप विरोधकांना घेता येणार नाही.
उ) लाजेकाजेस्तव जर अंनिसने एकत्रित होण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली तर त्यांच्या तर्फेच्या नेमलेल्या ज्योतिष शास्त्रींना परिषदेने उभे केलेले साक्षी पुरावे कसे अशास्त्रीय, तकलादू व भ्रामक आहेत ते साधार सिद्ध करावेच लागेल. शिवाय त्यांच्या त्या वक्तव्यावर परिषदेला प्रत्यावाद करायला वाव मिळेल. शिवाय अंनिस बावबतचे पुढील ध्येय धोरण ठरवता येईल.
ऊ) या प्रस्तावामुळे अंनिसचे तोंडाळ नेते व उपद्वापी कार्यकर्ते, थोर शास्त्रज्ञ, शैक्षणिक संस्था मधे पडू शकत नाहीत हे ही आपोआप सिद्ध होईल.
ए) ज्योतिष परिषदेला आवश्यक मान व दरारा मिळवण्यासाठी व पुढे तो तसाच राखण्यासाठी अशा तऱ्हेच्या शोधकार्याला वेगवेगळी क्षेत्रे निवडून वाहून घेणे भाग पडेल. एक सांघिक वेळापत्रक आखून, महाराष्ट्रभरातील वेगवेगळ्या ज्योतिषशास्त्राचे शिक्षण देणाऱ्या संस्थांतर्फे अशा तर्हेचे शोधकार्य करून त्याचे काय पडताळे आले, हे साधार दाखवून देण्याची संधी प्राप्त होईल. न जाणो या शोधकार्याला अंनिसच्या तर्फे ज्योतिषशास्त्राचे काम पाहाणारेही आपणहून साद देतील.
ऐ) अंनिस व परिषद एकत्र येऊन शोधकार्य करू इच्छित असतील तर सध्या आवाहन देणाऱ्या थोर व्यक्ती व शैक्षणिक संस्थांचा योग्य मान राखला जावा यासाठी त्यांची व परिषदेतर्फे परस्परांच्या सहमतीने ठरवलेल्या व्यक्तींचे एक मंडळ शोधकार्याचा ऑफिशियल निर्णय घोषित करण्यास बांधिल राहतील.

महाराष्ट्र ज्योतिष परिषदेच्या विचारार्थ,

शशिकांत ओक

त्रयस्थ हवा.

कोणत्याही वादात निर्णय देणारा त्रयस्थच हवा आणि त्याच्या क्षमतेबद्दल आणि सत्यप्रियतेबद्दल दोन्ही बाजुंमध्ये विश्वास आणि आदर असावा.
ज्योतिषी आणि अंनिस हे दोघेही वादी-प्रतिवादी असतील तर मग अंनिस कसे काय खरे/खोटे ठरवू शकते? योग्य काय आणि अयोग्य काय हे ठरवण्यासाठी एखाद्या त्रयस्थ व्यक्ती(न्यायाधीश)अथवा समिती समोर दोघांनी आपले म्हणणे मांडावे आणि तो न्यायाधीश जो निर्णय देईल तो मानावा.
अर्थात न्यायाधीश म्हणून असणारी व्यक्ती आणि समिती सदस्य त्या विशिष्ट विषयांतले तज्ञ असायलाच हवेत. तरच कदाचित(कदाचित एवढ्याच साठी की तो निर्णय बंधनकारक असावा/असेल असे दोघांपैकी कोणीही मानेल असे वाटत नाही.)वाद सुटण्याची शक्यता आहे

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

वस्तुनिष्ठता

हे न्यायालय नव्हे. हा वाद सुटणारा नाही. पण वस्तुनिष्ठ चाचणी घेणे काही प्रमाणात शक्य आहे. अशा प्रकारची चाचणी या प्रकारे झाली नाही. जी झाली ती व्यक्तिगत पातळीवर वि म दांडेकरांनी केली होती.
पाश्चात्य जगात या चाचण्या होत असतात. अंनिस तर सोडुनच द्या पण ज्योतिषातच सर्वमान्य असलेली चाचणी तयार होणे अवघड आहे हे आम्ही जाणतो. हा प्रयत्न त्यातल्या त्यात असा आहे. प्राथमिक पातळीवरचा आहे.
प्रकाश घाटपांडे

सत्य

हा वाद सुटणारा नाही
हेच सत्य आहे.
हा वाद अतिशय पुरातन आहे.

कुणी तरी जगात पहिल्यांदा जोतिष सांगतो म्हणाले, त्या क्षणीच या वादाचाही जन्म झाला आहे.

आपला
गुंडोपंत

सत्य

हा वाद सुटणारा नाही
हेच सत्य आहे.
हा वाद अतिशय पुरातन आहे.

कुणी तरी जगात पहिल्यांदा जोतिष सांगतो म्हणाले, त्या क्षणीच या वादाचाही जन्म झाला आहे.

आपला
गुंडोपंत

 
^ वर