संस्कृतचे मारेकरी

एकदा आम्ही आपल्या संस्कृत वर्गात निरोप समारंभाला प्रमुख पाहुणे कोण बोलवायचे याची आपसांत चर्चा करत होतो. तो वर्ग आम्ही ज्या सामाजिक संस्थेच्या सहकार्याने घेत होतो त्याचे पदाधिकारी चटकन म्हणाले, "आमच्याच संस्थेच्या अध्यक्षांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवा".

ह्यावर मी म्हणालो की बोलवायला हरकत नाही पण श्री. कखग यांचा संस्कृतशी काही थेट संबंध आहे का? त्यावर ते पदाधिकारी म्हणाले म्हणजे काय, अगदी लहानपणापासून, अनेक संस्कृत विषयीच्या संस्थांशी त्यांचा घनिष्ठ संबंध आहे.

त्यावर आम्ही ठीक आहे म्हटले आणि श्री. कखग प्रमुख पाहुणे म्हणून येतील असे ठरले.

निरोप समारंभात हे श्री. कखग बोलायला उभे राहिले व म्हणाले, "संस्कृतचा आणि माझा लहानपणापासून संबंध. माझी आजी रामरक्षा म्हणायची ती मी ऐकायचो. मला प्रणम्य
शिरसा पण वाचून म्हणता येते".

आम्हाला हे सर्व ऐकून हसावे की रडावे तेच कळेना. ह्या २ ओळीत त्यांचा आणि संस्कृतचा संबंध संपला. ह्या २ ओळींमुळे त्यांनी श्रोत्यांच्या मनात संस्कृतविषयी नक्की काय प्रेम जागृत केले?

आजही हे गृहस्थ व त्यांच्या सुविद्य पत्नी अनेक संस्कृतभाषेविषयीच्या संस्थांमध्ये अधिकारी म्हणून कार्यरत (?) आहेत. असे संस्कृतचे मारेकरी आपल्याला जागोजागी आढळतात.

१) पाठ्यपुस्तक मंडळ -असे म्हटले जाते, जे शिकवतात ते पाठ्यपुस्तके बनवत नाहीत व जे पाठ्यपुस्तके बनवतात ते शिकवत नाहीत. मुलांच्या मनांत संस्कृत विषयी घृणा निर्माण कशी होईल हे पाहाणे हे एकमेव कार्य ही पाठ्यपुस्तकी विद्वान मंडळी करतात.

२) जागोजागी अवजड संस्कृतभाषा वापरून समोरच्याला गारद करू पाहाणारे

३) संस्कृत परिषदांमध्ये आपले प्रबंध इंग्लिशमधून वाचणारे

४) संस्कृतच्या विद्यार्थ्यांना शिकवताना टोचून बोलणारे

५) संस्कृत भाषेत सलग ४ वाक्ये सुद्धा न बोलता येऊ शकणारे (जी बोलली जाते ती भाषा, जी लिहिली जाते ती भाषा नव्हे) पण मोठ्या कागदी पदव्या मिळवलेले

६) "भूतकाळातील संस्कृत आणि तत्कालीन समाज" ह्या विषयीचे दोष उकरून काढणारे पण संस्कृत भाषेचा वर्तमानकाळ व भविष्यकाळ ह्या संबंधी एक शब्दसुद्धा बोलू न इच्छिणारे

७) संस्कृतचे धडे व कविता नवनीत, २१ अपेक्षित, विकास इ. मार्गदर्शके हातात घेऊन शिकवणारे शिक्षक

८) भाषांतर पद्धतीने संस्कृत शिकविणे अवलंबणारे सरकारी (मेकॉलेकृत) शैक्षणिक धोरण.

९) संस्कृत शिकवताना व्याकरणावर अवाजवी भर देणारे (लहान मूल पण आधी भाषा शिकते मग तिचे व्याकरण)

संस्कृतला वाचवायचे असेल तर ह्या मारेकर्‍यांना आधी संपविले पाहिजे नाही का?

लेखनविषय: दुवे:

Comments

हम्म!

परंतु संस्कृत लहानपणापासून बोलणारा दुसरा कुठला मुलूख आज नसावा.

हम्म! का बरं नसावा? आणि नसलाच तर हे त्या भाषेचं अपयशच आहे असं म्हणता येणार नाही का?

आपला,
(कालिदासाचा संगीतकार!) तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

खरे आहे,

कर्नाटकात मठूर अग्रहारात लोक संस्कृत बोलतात असे ऐकून आहे. परंतु संस्कृत लहानपणापासून बोलणारा दुसरा कुठला मुलूख आज नसावा.

लहानपणापासून बोलत असतीलच असे नाही पण सध्या पूर्ण गाव बोलत आहे अशी अनेक उदाहरणे आहेत.

भारतात तर अनेक गावांत संस्कृत बोलतातच उदा. राजस्थान, मध्य प्रदेश, कर्णाटक इ.इ. पण नुकतेच वाचले की जपान मध्ये सुद्धा एका गावात सर्व संस्कृत बोलतात.

*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*

संस्कृतस्य महिमवर्णनेन नास्ति साधितम् । सततसंभाषणेन तस्य जीवनं स्थिरम् ।।

"संस्कृत ब्लॉग"

असं टाइप करुन गूगला वरती शोधलं आत्ताच.
कुठेही संस्कृत मध्ये लिहिलेले ब्लॉग सापडले नाय बॉ.
मंजी जर आपन जर समजा ढोबळ मानाने
१.संस्कृतचे मारेकरी (त्ये भिती पसरविणारे खवीस) पहिले
२.त्यांच्या पासुन् संस्कृतला वाचवणारे दुसरे ( म्हणजेच संस्कृत बद्दल काही करण्याची प्रामाणिक तळमळ असणारे
प्रस्तुत चर्चेच्या लेखकासारखे,किंवा विकासरावांनी उल्लेख केलेले श्री .कृष्णशास्त्रीं वगैरे.)
३.आणि आमच्या सारखे गरीब बिच्चारे अ-संस्कृत(संस्कृत बद्दल् फारसे ज्ञान नसलेले गरीब जनसामान्य )
अशा पार्ट्या(बाजु,टीम्स) गृहित धरल्या तर,

पार्टी २ आघाडीवर आहे. ती लोकांना घाबरवत् सुट्ली हाये (संस्कृत बद्दल.)

ज्या कारणाने प्रसार्/जागृती होणे तर् दुरच पण तिचा प्रत्यक्ष वापर घटत आहे.
त्ये भामटे संस्कृतचा जीव घेउन र्‍हायले हायेत् हळु हळु.

पार्टी ३ :- आमि तर बोलुन चालुन अडाणी.अज्ञानी.

म्हणजे जर कुणी त्या संस्कृतचा गळा घोटतो आहे,तर तो तर दोषी आहेच हो.
पण संस्कृत प्रेमी कुठे आहेत? वाचवीत का नाहित?
म्हणजे माझं म्हणणं एवढच आहे की ही टिप्पणी सकारात्मक पद्धतीने घेउन आता तरी
संस्कृत वाचवायची विच्छा असणारे लोक (स्वतःच्या मतावर् श्रद्धा ठेउन)संस्कृत थेट नेट वर वापरु लागतील.
पार्टी १ ने मग शक्य तेवढे लोक पार्टी ३ कडुन स्वतःकडे वळवावेत.
(माझ्या माहिती प्रमाणे बहुसंख्य जनता आज पार्टी ३ मध्ये आहे.)

(उपक्रमाय स्वाहा.
इदम् न मम.)
जन सामान्यांचे मन

हा घ्या

कुठेही संस्कृत मध्ये लिहिलेले ब्लॉग सापडले नाय बॉ.

जयतु जयतु संस्कृतम्

आणि ही बातमी पण वाचा

Blogging in Sanskrit binds Indian students overseas

'संस्कृत ब्लॉग"

कोण म्हणतो संस्कृत ब्‍लॉग नाहीत? मी संस्कृत ब्लॉग असे लिहून गूगलले तर मला ३५,४०० इतकी 'स्थळे' सुचवली गेली. संस्कृतसंबंधीची सर्व संकेतस्थळे अनुदिन्या नाहीत, पण त्यातली थोडी स्थळे नक्की आहेत. --वाचक्‍नवी

भाषा आणि सत्य

माझ्यापुरते म्हणाल तर - संस्कृत भाषा आहे एक माध्यम , एक किल्ली म्हणा हवे तर. हजारो वर्षे या भाषेत काम झाले, एका वैचारिक दृष्ट्या प्रगत अशा संस्कृतीतल्या लोकांनी पिढ्यानुपिढ्या आपले विचार या भाषेत मांडले आहेत. त्या त्या काळातल्या , पहिल्या दर्जाच्या विचारवंतांचे विचार , त्याना सृष्टिबद्दल , जीवनाबद्दल जाणवलेली सत्ये या भाषेत मांडलेली आहेत. आज या सगळ्या खजिन्याबद्दलची माझ्यासारख्याची अवस्था आहे प्रचंड मोठ्या जलाशयासमोर उभ्या असणार्‍या तहानलेल्याची. कारण या खजिन्याची किल्ली जी संस्कृत भाषा , तीच माझ्याकडे नाही. कदाचित ही किल्ली अवगत करण्यासाठी आवश्यक असणारी पात्रता माझ्यात नसेल ; पण म्हणून हा सगळा सांस्कृतिल दस्तावेजच मूल्यविरहित असे म्हणायला मी धजावणार नाही. तसे म्हणायला अंगात अलोट धैर्य हवे.

जर संस्कृत भाषेच्या शिकविण्याच्या पद्धतीमधे (ऋजु आणि इतर लोक म्हणत आहेत त्याप्रकारचे ) बदल करून जर का ही किल्ली जास्त जास्त लोकांना सहजसाध्य होणार असेल , तर तसे बदल व्हायलाच पाहिजेत. कुठलीही गोष्ट तेव्हाच जिवंत राहील जेव्हा ती जास्त जास्त लोकांपर्यंत पोचेल, त्या गोष्टीचे लोकाभिसरण होईल.

... असे बदल उद्या घडतील न घडतील. आमची मात्र संस्कृत भाषेची गाडी चुकलीच. पुढची गाडी या आयुष्यात कधी पकडणार आणि त्या गाडीने "खजिन्याच्या" देशापर्यंतचा प्रवास कसा आणि केव्हा घडणार कोण जाणे :-)

विनंती

मी हा प्रतिसाद लिहीस्तोवर ६७ प्रतिसाद झाले आहेत. नवे प्रतिसाद वाचताना त्रास होतो आहे. पुढील प्रतिसादकाने कृपया नवा विषय सुरू करावा.

क्रमांक ६

"६) "भूतकाळातील संस्कृत आणि तत्कालीन समाज" ह्या विषयीचे दोष उकरून काढणारे पण संस्कृत भाषेचा वर्तमानकाळ व भविष्यकाळ ह्या संबंधी एक शब्दसुद्धा बोलू न इच्छिणारे "

हे संस्कृतचे मारेकरी कसे ठरतात?

हममम....

संस्कृत भाषा इतर भाषांप्रमाणेच आम्हाला प्रिय आहे. इतर अनेक भाषांच्या मानाने अधिक साहित्य संस्कृतमध्ये उपलब्ध आहे. संस्कृत शिकवण्याची पद्धत तितकीशी योग्य नाही हे खरे. यातून मार्ग कसा काढायचा यावर विचार व्हावा. आणखी एक व्यावहारिक विचार सुचतो; सर्वांनाच एकदम सहज बोलायला येण्याइतपत संस्कृत जरी आले नाही तरी सहजतेने वाचून समजेल इतपत संस्कृत सुरुवातीला आले तरी प्रयत्नांचे चीज झाले असे म्हणता येईल.

संस्कृतला होणारा विरोध अज्ञानमूलक आहे. नव्याने शिकताना चायनीज किंवा जर्मन भाषाही क्लिष्ट, किचकट आहेत वाटेल पण या किचकटपणाला भाषेचे शॉर्टकमिंग म्हणता येणार नाही. भाषा जितकी प्रगल्भ, सामर्थ्यवान असेल तितकी ती शिकायला अवघड असणारच. हे लक्षात न घेतले तर हा दुराग्रह, हटवादीपणा होईल. मला न जमणारी भाषाच कशी चुकीची आहे हे पटवण्याचा प्रयत्न हास्यास्पद आहे.

संस्कृत मेली, नष्ट झाली असे समजणार्‍यांनी तसे खुशाल समजावे पण आपल्या समजाला वास्तवाशी ताडून आपण एकटेच 'नंदनवनात' नाही ना हेही पाहावे. संस्कृतभाषेतील प्रचंड साहित्य उपलब्ध असेपर्यंत भाषा संपणार नाही. मुक्तसुनीत यांनी म्हटल्याप्रमाणे :

>> हजारो वर्षे या भाषेत काम झाले, एका वैचारिक दृष्ट्या प्रगत अशा संस्कृतीतल्या लोकांनी पिढ्यानुपिढ्या आपले विचार या भाषेत मांडले आहेत. त्या त्या
>> काळातल्या , पहिल्या दर्जाच्या विचारवंतांचे विचार , त्याना सृष्टिबद्दल , जीवनाबद्दल जाणवलेली सत्ये या भाषेत मांडलेली आहेत.

संस्कृतच्या मारेक-याचा समारोप

वेद-वाड:मय प्राचीन ऋषींचा वारसा आहे, त्याबद्दल आम्हाला आदर आहेच. द्रवीड आणि आर्य संस्कृतीने इथे अनेक विचार मांडले आहेत. मुर्तीपुजाचे तत्त्वज्नान देणारे द्रवीडी आणि ऋग्वेदीकालीन आर्यांनी वैद्यक, काव्य, ज्योतिष,इत्यादी शास्त्राबाबतची बरीच प्रगती त्याची इतिहासात नोंद आहेच.

वेदांचे अर्थ कळत नव्हते म्हणुन किंवा जड तत्त्वज्नान असल्यामुळेच त्याही काळात ' ब्राह्मणग्रंथ' लिहिल्या गेले. अर्थात असे टिका करणारे ग्रंथ तेव्हाही होते. कदाचित वेदातील तत्त्वज्ञान, वेदाचा अर्थ स्पष्ट करण्यासाठी अशा ग्रथांची निर्मिती झाली असावी. पण संस्कृत आणि तत्त्वज्ञान कधीच सोपे नव्हते या आमच्या भाबड्या मतावर आम्ही कायम आहोत.

वेदातील मंत्राचा उच्चार करणे कठीण जाऊ लागले तेव्हा उच्चार समजावण्यासाठी छंद, व्याकरण, ज्योतिष याची निर्मीती झाली हेही सर्वशृत आहे.वेदकाळातील एका वर्णांचे वर्चस्व, जातिव्यवस्था, सामान्यांना न समजणारे तत्त्वाज्ञान, कर्मकांड, यामुळे संस्कृत ही जनसामान्यांची भाषा होऊ शकली नाही. पुढे जैनधर्माने सामान्यमाणसाची सुटका केल्याचे स्मरते.

वैदिककाळातील यज्ञाचे अवास्तव महत्त्व, संस्कृत ग्रंथाचे वर्चस्व, आणि वैदिक वाडःमयक्लिष्टता यामुळे सामान्य जनता त्रस्त होती. पुढे या त्रासामुळेच वेगवेगळे पंथ निर्माण झाले आणि संस्कृत भाषेपासुन लोकांची सुटका झाली असावी. आणि त्याच्या पुढे मागधी भाषापर्यंतचा प्रवास अभ्यासकांना माहित असावाच !!!

जी भाषा वैदीककाळातही सामान्य माणसाची भाषा होऊ शकली नाही ती भाषा आजच्या काळात सर्वांची भाषा व्हावी यासाठीच्या प्रयत्नाची आम्हाला मात्र दयाच येते.

पुन्हा हमम..

वेदांचे अर्थ कळत नव्हते म्हणुन किंवा जड तत्त्वज्नान असल्यामुळेच त्याही काळात ' ब्राह्मणग्रंथ' लिहिल्या गेले. अर्थात असे टिका करणारे ग्रंथ तेव्हाही होते. कदाचित वेदातील तत्त्वज्ञान, वेदाचा अर्थ स्पष्ट करण्यासाठी अशा ग्रथांची निर्मिती झाली असावी. पण संस्कृत आणि तत्त्वज्ञान कधीच सोपे नव्हते या आमच्या भाबड्या मतावर आम्ही कायम आहोत.

वैदिक संस्कृत आणि नंतरच्या काळातील संस्कृत यामध्ये फरक असणे स्वाभाविक आहे. कोणत्याही भाषेला ते लागू होते. फार कशाला ज्ञानेश्वरांच्या काळची 'मराठी' आजच्या बहुसंख्य लोकांना समजत नाही. ते समजवायला टीकात्मक ग्रंथ लिहिले जातात.
तत्त्वज्ञान आणि भाषा यांची गल्लत करू नये. ज्ञानेश्वरी किंवा गीताई वाचूनही एखादी कल्पना आपल्याला (म्हणजे तुम्हा-आम्हाला) कळणार नाही असे होऊ शकते.

वेदकाळातील एका वर्णांचे वर्चस्व, जातिव्यवस्था, सामान्यांना न समजणारे तत्त्वाज्ञान, कर्मकांड, यामुळे संस्कृत ही जनसामान्यांची भाषा होऊ शकली नाही.

मला वाटते हे तुमच्या संस्कृतविरोधाचे मूळ आहे. असे असेलही कदाचित पण त्या परिस्थितीचा आणि संस्कृत भाषेचा काय संबंध आहे कळले नाही. इंग्रजांचे वर्चस्व, गुलामगिरीनंतरही, सामान्यांची होऊ न शकलेली त्यांची भाषा आपण शिकतोच ना?

पुन्हा हमम.. आणि समारोप

ज्ञानेश्वरांच्या काळची 'मराठी' आजच्या बहुसंख्य लोकांना समजत नाही.

खरंय आपले म्हणने, पण तेव्हा ज्ञानेश्वरांची मराठी (प्राकृत) तेव्हाच्या लोकांना कळणारी होती. संस्कृतविषयी तसे नव्हते ते ग्रंथ देवघरात पुजेचे ग्रंथ होते. आणि सामान्य माणसांची भाषा ही प्राकृत तर पंडितांची भाषा ही संस्कृत असावी. तेव्हाच्या प्राकृत भाषेतील वाडःमय हे धार्मिक आणि लौकिक अशा दोन प्रवाहांनी बहरलेले होते. कथाकाव्य, दंतकथा,स्फुट कविता यांची लयलुट प्राकृतात आढळते. आपले भाषिक गंड आणि आग्रह बाजूला ठेवले तर संस्कृतचा कितीही बोलबाला झाला किंवा डांगोरा पिटला गेला तरी ती जनसामान्याची भाषा कधीच नव्हती ही सर्वमान्य गोष्ट आहे.
पुढे जे धर्म निर्माण झाले त्यांच्या धर्मात वाड:मयातुन गोपनीय व लपवण्यासारखे काही नव्हते त्याचा परिणाम असा झाला की बहुजनसमाजात त्यांना झपाट्याने मान्यता मिळाली. याउलट संस्कृत मधील ज्ञान गोपनीय ठेवण्याकडे अधिक कल होता. पुढे नवधर्मउदयामुळे वैदिक धर्म व संस्कृत काही काळापर्यंत स्तिमित झाली याची नोंद इतिहासात आहेच.
काही विचारवंत तर प्राकृतच स्वाभाविक अशी लोकभाषा होती आणि त्यावर मुद्दाम संस्कार करुन राजाश्रय प्राप्त करुन पंडितांनी काढलेली संस्कृत भाषा असाही विचार मांडतात. अर्थात भाषा विज्ञानाच्या निकषाने हा विचार तर्कसंगत आणि पटणारा आहे.

मला वाटते हे तुमच्या संस्कृतविरोधाचे मूळ आहे.

विषयाच्या अभ्यासकाला जातीची पायतानं घालायची गरज नसते आणि ती आम्ही घालत नाही. इतिहासाचा अभ्यास करतांना जर काही जातीधर्माचे उल्लेख आले तर त्याला अशा जातीयवादीच्या नजरेतुन पाहणे संकुचित विचाराचे लक्षण वाटते.

तत्त्वज्ञान आणि भाषा यांची गल्लत करू नये.

संस्कृत भाषेतुन येणारा कोणताही विचार मग नाटक असो की तत्त्वज्ञान तो जर सामान्यांची रुची वाढवणारा नसेल तर ती भाषा प्रवाही कशी मानायची.

परिस्थितीचा आणि संस्कृत भाषेचा काय संबंध

वर्णव्यवस्थेत तत्कालीन काळात संस्कृत सामान्य माणसाची भाषा का झाली नसेल त्याचा एकदा आपण अभ्यास करावा असे वाटते.
भाषा शिकणा-यांनी भाषा जरुर शिकावी पण संस्कृत भाषा ही येत्या काळात संवादाची भाषा होईल असे म्हणने हास्यास्पद ठरेल असे वाटते.

समारोप

सामान्य माणसांची भाषा ही प्राकृत तर पंडितांची भाषा ही संस्कृत असावी.

तुम्ही 'असावी' असे म्हणताय. चांगले आहे.

तेव्हाच्या प्राकृत भाषेतील वाडःमय हे धार्मिक आणि लौकिक अशा दोन प्रवाहांनी बहरलेले होते. कथाकाव्य, दंतकथा,स्फुट कविता यांची लयलुट प्राकृतात आढळते.

नक्कीच आढळत असावे. प्राकृत भाषाही समृद्ध होत्या हे त्यातून समजले पण एखादी भाषा समृद्ध झाल्याने दुसर्‍या भाषेला न्यूनत्व येते का?

आपले भाषिक गंड आणि आग्रह बाजूला ठेवले तर संस्कृतचा कितीही बोलबाला झाला किंवा डांगोरा पिटला गेला तरी ती जनसामान्याची भाषा कधीच नव्हती ही सर्वमान्य गोष्ट आहे.

अरे वा सर्वमान्य वगैरे आहे का? काही संदर्भ देता आले तर बघा. मुळात संस्कृत भाषा जनसामान्यांची होती की नव्हती हा या चर्चेचा विषय नाही. इंग्रजीचे उदाहरण घेतले तर इंग्रजी ही भारतातील जनसामान्यांची भाषा नव्हती आणि नाही पण या गोष्टींचा एखादी भाषा शिकण्या न शिकण्याशी काय संबंध आहे?

पुढे जे धर्म निर्माण झाले त्यांच्या धर्मात वाड:मयातुन गोपनीय व लपवण्यासारखे काही नव्हते त्याचा परिणाम असा झाला की बहुजनसमाजात त्यांना झपाट्याने मान्यता मिळाली. याउलट संस्कृत मधील ज्ञान गोपनीय ठेवण्याकडे अधिक कल होता. पुढे नवधर्मउदयामुळे वैदिक धर्म व संस्कृत काही काळापर्यंत स्तिमित झाली याची नोंद इतिहासात आहेच.

हमम.. हे वाचून संस्कृत भाषा म्हणजे वैदिक धर्माच्या षडयंत्रात सक्रीय सहभागी असलेली कोणी व्यक्ती आहे असे वाटू लागले आहे. संस्कृत भाषेची वैदिक धर्माशी सांगड घालून वैदिक धर्माचे गुणदोष भाषेला चिकटवण्याचे कारण काय? संस्कृत भाषेत लिहिल्या गेलेल्या अधार्मिक साहित्याचे काय?

काही विचारवंत तर प्राकृतच स्वाभाविक अशी लोकभाषा होती आणि त्यावर मुद्दाम संस्कार करुन राजाश्रय प्राप्त करुन पंडितांनी काढलेली संस्कृत भाषा असाही विचार मांडतात. अर्थात भाषा विज्ञानाच्या निकषाने हा विचार तर्कसंगत आणि पटणारा आहे.

संस्कृत भाषेचा इतिहास सर्वांना सहज उपलब्ध आहे. अशी ठरवून भाषा तयार करून घेता येते का? तुम्ही म्हणता तसा शोध लावणारे विचारवंत कोण आहेत आणि ते कोणत्या आधारावर हे जाणून घ्यायला आवडेल.

विषयाच्या अभ्यासकाला जातीची पायतानं घालायची गरज नसते आणि ती आम्ही घालत नाही. इतिहासाचा अभ्यास करतांना जर काही जातीधर्माचे उल्लेख आले तर त्याला अशा जातीयवादीच्या नजरेतुन पाहणे संकुचित विचाराचे लक्षण वाटते.

जातीपातींकडे ऍकेडमिक इंटरेस्टने पाहण्यात काही गैर नाही. पण उच्चवर्णियांविषयी असलेले पूर्वग्रह भाषेला चिकटवण्याचा प्रयत्न होऊ नये एवढेच वाटते.

संस्कृत भाषेतुन येणारा कोणताही विचार मग नाटक असो की तत्त्वज्ञान तो जर सामान्यांची रुची वाढवणारा नसेल तर ती भाषा प्रवाही कशी मानायची.

इतरांची रुची कश्यात आहे कश्यात नाही याबाबत इतके स्वीपिंग स्टेटमेंट मी तरी करणार नाही.

भाषा शिकणा-यांनी भाषा जरुर शिकावी पण संस्कृत भाषा ही येत्या काळात संवादाची भाषा होईल असे म्हणने हास्यास्पद ठरेल असे वाटते.

संस्कृत ही येत्या काळात संवादाची भाषा होईल असे संस्कृतचे अभ्यासकही म्हणणार नाहीत.

परस्परसंबंध पटला नाही

मला वाटते हे तुमच्या संस्कृतविरोधाचे मूळ आहे. असे असेलही कदाचित पण त्या परिस्थितीचा आणि संस्कृत भाषेचा काय संबंध आहे कळले नाही. इंग्रजांचे वर्चस्व, गुलामगिरीनंतरही, सामान्यांची होऊ न शकलेली त्यांची भाषा आपण शिकतोच ना?

इंग्रजीही जगभरात अनेक ठीकाणी बोलली जाणारी "ग्लोबल" भाषा मानता येईल. अगदी, जपान-जर्मनी-फ्रान्समध्ये ती बोलली जात नसली तरी परदेशींशी बोलताना ज्यांना तिची गरज लागते ते ती जुजबी भाषा बोलतातच. दुसरे असे की ब्रिटिशांनी इंग्रजी शिकवण्यावर भर दिला. भले याचे कारण त्यांना राज्य चालवायला बाबू हवे होते असेही असेल. त्यात अमुकांनी ती शिकावी आणि अमुकांनी ती शिकू नये असे नियम घातले नसावेत. (चू. भू. दे. घे.) स्वतः ब्रिटिश आपल्या नोकरांशी बोलताना हीच भाषा वापरत गेल्याने ती रुळत गेली. जनसामान्यांची भाषा म्हणून प्रस्थापित झाली नाही तरी ज्ञानभाषा म्हणून फुलत गेली आणि म्हणूनच आपण इंग्रजी शिकतो. मराठी शाळांत पोरांना न घालता इंग्रजी शाळांत घालतो कारण हीच भाषा त्यांना देशा-परदेशात वापरायची आहे. याच भाषेत बरेचसे ज्ञान एकत्र झाले आहे.

संस्कृताचे असे कधीच झाल्याचे आठवणीत नाही. एखाद्या विशिष्ट काळात ती जनसामान्यांची भाषा होती हे दाखले अद्यापावेतो कोणी दिलेले नाहीत. ज्यांनी ते द्यायचा प्रयत्न केला त्यांचे पाये ठिसूळ असल्याचे दिसून आले. त्यामुळे संस्कृताची इंग्रजीशी तुलना पटली नाही.

संस्कृत शिकायला आणि शिकवायला कोणाचीही ना असण्याचे कारण नाही, परंतु, संस्कृत येत नाही म्हणजे खूप मोठा अपराध झाला, किंवा हजारो वर्षांच्या इतिहासातून लोकांच्या मनात निर्माण झालेला रोष एका क्षणात निघून जावा असे होणे व्यावहारिक वाटत नाही.

ज्यांना संस्कृत शिकवता येते त्यांनी ती इतरांना जरूर शिकवावी. ज्यांना ती शिकायची इच्छा आहे ते ती आनंदाने शिकतील. ज्यांना शिकायची इच्छा नाही ते नाही शिकणार.

नमनाला आतापर्यंत पिंपभर तेल वाहून गेले आहे. निदान यानंतर तरी संस्कृताचे पाठ सुरु होतील अशी आशा करू.

तुलना नाही

इंग्रजीची संस्कृतशी तुलना करायची नाही. "जनसामान्याची भाषा नसणे हे एखादी भाषा न शिकण्याचे कारण म्हणता येणार नाही" या विधानाच्या समर्थनार्थ दिलेले उदाहरण होते.

संस्कृतदीपिका

संस्कृतदीपिका हे सांगलीच्या ज्ञानदीप इन्फोटेक यांचे संकेतस्थळ प्राथमिक संस्कृत व्याकरण, शब्दार्थ आणि भाषांतर (संस्कृत-मराठी-इंग्रजी) यासाठी उपयोगी ठरेल असे वाटते. (या संकेतस्थळावर ध्वनिविभागही आहे असे दिसते पण चाचणी घेता आली नाही.)

सहज शोध घेतल्यावर हा ब्लॉग दिसला.

माझे मत

ॠजु,
तुम्ही वर मांडलेल्या मतांपैकी काही मतांशी मी सहमत आहे. १, ४, ६ आणि ७ यांना खरोखरच संस्कृतचे मारेकरी म्हटले पाहिजे. परंतू बाकी मुद्द्यांशी मात्र मी माझी नम्र असहमती दर्शवू इच्छिते.

माझ्या मते प्रत्येक व्यक्तीत एखाद्या भाषेचा पॅसिव्ह कॉम्पिटन्स किंवा ऍक्टिव्ह कॉम्पिटन्स असतो. म्हणजे मला गुजराती भाषा समजते पण मी बोलू मात्र शकत नाही हा पॅसिव्ह कॉम्पिटन्स झाला, तर मी हिंदी भाषा बोलू सुद्धा शकते आणि ती मला समजते सुद्धा, हा ऍक्टिव्ह कॉम्पिटन्स झाला. आपल्याला आवडणार्‍या प्रत्येक भाषेचा ऍक्टिव्ह कॉम्पिटन्स आपल्यात असलाच पाहिजे आणि नुसताच पॅसिव्ह कॉम्पिटन्स असणे कमीपणाचे किंवा त्या भाषेवर प्रेम नाही असे दर्शविणारे नाही. शेवटी एखाद्या भाषेचा कोणत्या प्रकारचा कॉम्पिटन्स आपल्यात असेल, हे वेगवेगळ्या गोष्टींवरून ठरत असतं, उदा. ती भाषा बोलण्याची कितपत गरज आहे, ती भाषा बोलता आली नाही तर एका विशिष्ट समाजात व्यवहार करण्यात अडथळे येतील का, ती भाषा कोणत्या पद्धतीने शिकवली गेली आहे, कुणाकडून शिकवली गेली आहे, आपल्या आजूबाजूला कोण ती भाषा बोलतं, कोणत्या सामाजिक स्तरातील माणसं ती भाषा बोलतात वगैरे.

दुर्दैवाने, संस्कृत ही भाषा कुणाचीही मातृभाषा नसते. अपवादात्मक कुटुंबे सोडता ती कुणाच्याही घरी बोलली जात नाही. त्यामुळे इथेच संस्कृतच्या ऍक्टिव्ह कॉम्पिटन्सला पहिला पायबंद बसतो. पुढे शाळेतही ही भाषा योग्य पद्धतीने शिकवली जात नाही, उलट इतक्या वाईट पद्धतीने शिकवली जाते की तात्या, बिरुटे साहेब यांच्या मनात जसा आहे तसा टोकाचा दुराग्रह आणि तिरस्कार काहींच्या मनात निर्माण होतो. इथे दुसरा पायबंद बसतो. पुढे आसपासचं कुणीही संस्कृत बोलत नसल्याने व नेहमीचे व्यवहार करण्यासाठी संस्कृतची काहीच गरज उरली नसल्याने संस्कृतचा ऍक्टिव्ह कॉम्पिटन्स मिळवण्याची निकडही भासत नाही. या सर्व कारणांमुळे आज ९९% जनतेकडे संस्कृतचा पॅसिव्ह कॉम्पिटन्स असला तरी ऍक्टिव्ह कॉम्पिटन्स नाही.

केवळ पॅसिव्ह कॉम्पिटन्स असणे यात गैर काहीच नाही. एखाद्या भाषेबद्दल प्रेम निर्माण व्हायला ती केवळ समजली तरी पुरे असते. ज्यांना समजत नाही, त्यांची मते तात्यांसारखी होतात. अर्थात यांमुळे संस्कृतभाषेचे फारसे नुकसान होत नाही. जी भाषा आधीच मृत झालेली आहे, ती बोलली गेली नाही, तर त्या भाषेला काहीच फरक पडत नाही. आता मी संस्कृत भाषा मृत आहे असं म्हटल्यावर मला संस्कृतबद्दल मुळीच प्रेम नाही असं वाटू शकेल. परंतू मी म्हणेन एखाद्या गोष्टीवर प्रेम करताना सुद्धा आपण वास्तववादी असलं पाहिजे. कोणतीही गोष्ट पर्फेक्ट असत नाही. आपल्याला फक्त पर्फेक्ट गोष्टीच आवडतात का, तसं असतं तर आपल्याला काहीच आवडलं नसतं. आपल्याला जी गोष्ट आवडते ती तिच्या सद्गुणांसकट आणि वैगुण्यांसकट. तसंच माझ्याबाबतीतही आहे. मला संस्कृत आवडते ती तिच्या सद्गुणांसकट आणि वैगुण्यांसकट. या भाषेवर लोक मुर्खासारखी टीका करतात, ही भाषा आता जिवंत राहिलेली नाही, माझ्याकडे या भाषेचा ऍक्टिव्ह कॉम्पिटन्स नाही, अधिकाधिक नियमांमधे बांधली गेल्याने या भाषेचा प्रवाहीपणा संपला, इतर भाषांतून शब्द न घेण्याच्या आडमुठेपणामुळे तिचा विकास थांबला अशी सर्व वैगुण्ये असुनही ही भाषा मला आवडते.

या भाषेवर मला अधिकाधिक वाचता यावं, तिला अधिकाधिक समजून घेता यावं, तिला लोकांपर्यंत अधिकाधिक चांगल्या पद्धतीने पोचवता यावं यासाठी मी मला आणि इतर अनेक जणांना येणार्‍या भाषांचा आधार घेते. यात मला कुठलाच कमीपणा वाटत नाही. उलट मला यात अनेक फायदे दिसून येतात. जर मी संस्कृत बद्दल संस्कृत भाषेतच लिहिले तर आपल्याकडच्या प्राचीन शास्त्रांत उपलब्ध असलेली टर्मिनॉलॉजी मला वापरावी लागेल. म्हणजे संस्कृत भाषेचे व्याकरण हे मला त्या व्याकरणाच्या चौकटीतच केवळ समजावून सांगता येईल. परंतू जर मी इंग्रजीचा आधार घेतला, तर संस्कृत भाषेच्या व्याकरणाला आधुनिक टर्मिनॉलॉजीच्या खिडकीतून पाहून आणखी नवनवे कंगोरे शोधता येऊ शकतील.

संस्कृत शिकवताना आणि शिकताना भाषांतर पद्धतीचा अवलंब काही काळ करावाच लागतो. तसा तो कुठलीही भाषा शिकताना करावा लागतो. जर शिक्षकांनी मुद्दाम भाषांतर पद्धतीने शिकवलं नाही, तरी विद्यार्थ्याच्या मनात नवीन भाषा समजून घेताना तिला आपल्या भाषेशी ताडून पाहणे, आपल्या भाषेच्या माध्यमातून नवी भाषा शिकणे अशी प्रक्रिया चालल्यामुळे भाषांतर पद्धतीचाच वापर नकळत होत असतो. यात गैर काहीच नाही. नवी भाषा ऐकल्यावर नैसर्गिकपणे दिली जाणारी प्रतिक्रिया आहे ही. परंतू भाषांतर पद्धतीचा उपयोग कुठे थांबवावा याला फार महत्त्व आहे. क.भू.धा.वि. रुपे म्हणजे मराठीतली '-लेले' रुपे हे एकदा कळले की पुरे. पुढे प्रत्येक ठिकाणी क.भू.धा.वि. रुप वाचल्यावर डोक्यात '-लेले' रुप उमटत असेल, तर लागलीच त्याची दखल घेऊन हा प्रकार थांबवायचा प्रयत्न करावा. कारण किती झाले तरी, क.भू.धा.वि. आणि '-लेले' यांत अर्थसाधर्म्य असले तरी ते पूर्णपणे एकसारखे आहेत असं कोणीच म्हणू शकणार नाही. त्यामुळे भाषांतर पद्धती ही महत्त्वाची आहे, परंतू मर्यादित प्रमाणातच.

संस्कृत शिकवताना व्याकरणावर अवाजवी भर देणार्‍यांबद्दल बर्‍याचदा लोक नाराज दिसतात. परंतू मला वाटते, एखादी भाषा शिकवताना आधी त्या भाषेत संभाषण करण्यास शिकवणे ही जशी भाषाअध्यापनाची एक पद्धत आहे, तशीच व्याकरण शिकवणे ही दुसरी पद्धत असू शकते. अर्थात, आपल्याला संस्कृत शिकवण्याचा माझ्याहून अधिक अनुभव आहे असे आपल्या लिखाणातून कळते, त्यामुळे योग्य-अयोग्य तुम्हालाच माहित. परंतू माझा अनुभव असा, की व्याकरण आधी शिकवल्यास, संस्कृत भाषा नेमकी आहे तरी कशी हे कळतं आणि मग त्या भाषेतला कुठलाही नवा उतारा दिला, तरी गाईड्सची मदत न घेता, फार फार तर शब्दकोशाची मदत घेऊन तो उतारा पूर्णपणे समजून घेता येतो. एकदा का आपल्याला संस्कृत भाषेत लिहिलेले काहीही वाचता येते याचा आत्मविश्वास आला, की विद्यार्थी अधिक आवडीने संस्कृत शिकतात व थोडे प्रोत्साहन दिल्यास संस्कृतमधे लिहायला सुद्धा लागू शकतात, असा माझा वैयक्तिक अनुभव आहे. केवळ व्याकरण न समजल्याने संस्कृतबद्दल नावड निर्माण झालेली अनेक उदाहरणे माझ्या पाहण्यात आहेत. परंतू व्याकरणावर भर न देणे हा त्यावरचा उपाय नसून, व्याकरण अधिक सोपे आणि रंजक करून शिकवणे हा त्यावरचा उपाय आहे, असं मला वाटतं.

मी माझ्या विद्यार्थ्यांना शब्द पाठ करायला मुळीच सांगत नाही. काही सोप्या युक्त्या सांगते, ज्यायोगे शब्द पाठ न करताही कोणताही शब्द ते घडाघडा चालवून दाखवू शकतात, किंवा कोणतेही रूप ओळखू शकतात, कोणतेही रूप सांगू शकतात. समोरच्याला संस्कृतखेरीज कोणत्या विषयात रस आहे ते मी जाणून घेते, आणि त्या विषयाच्या भाषेत शक्य असल्यास व्याकरण समजावून सांगते. उदा. एखाद्याला विज्ञान आवडत असल्यास, मी संधी समजावून सांगताना विज्ञानातील संयुगे आंणि मिश्रणे या संकल्पनांचा आधार घेते तर एखाद्याला गणित प्रिय असल्यास एकसामायिक समीकरणांतील संकल्पना वापरून शिकवते. या पद्धतीने व्याकरणाचा बागुलबुवा न वाटता, ते लगेच आत्मसात होते, असा माझ्या अनुभव आहे.

असो. अर्थात हे माझे मत आहे. सर्वच जण याच्याशी सहमत असतील असे नाही, तशी माझी अपेक्षाही नाही. परंतू आपल्याकडच्या तत्त्वज्ञानपरंपरेत अंतिम सत्य जाणून घेण्यासाठी जसे अनेक मार्ग सांगितले जातात, तसेच संस्कृत समजून घेण्याचेही अनेक मार्ग आहेत. त्यातला कुठलाही एक मार्ग श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नाही. त्यामुळे संस्कृत संभाषणाचा पुरस्कार करणार्‍यांनी व्याकरणावर भर देणार्‍यांचा तिरस्कार करू नये, व व्याकरणावर भर देणार्‍यांनी संस्कृत संभाषणाचा पुरस्कार करणार्‍यांचा आदर करावा.

राधिका

असहमती

राधिकाबाई,

तुम्ही वर मांडलेल्या मतांपैकी काही मतांशी मी सहमत आहे. १, ४, ६ आणि ७ यांना खरोखरच संस्कृतचे मारेकरी म्हटले पाहिजे. परंतू बाकी मुद्द्यांशी मात्र मी माझी नम्र असहमती दर्शवू इच्छिते.

तुमच्या असहमत असण्याशीच मी असहमत आहे. हा तर विरोधासाठी विरोध झाला. अहो ग्योट
इंस्टिट्युट मध्ये सुद्धा जर्मन भाषा ही जर्मन भाषेतूनच शिकवतात. इंग्रजीचा वापरच करत नाहीत. म्हणूनच आजही भारतात ग्योट इंस्टिट्युटमध्ये जर्मन शिकणे प्रमाणभूत मानले जाते.

पुढे शाळेतही ही भाषा योग्य पद्धतीने शिकवली जात नाही, उलट इतक्या वाईट पद्धतीने शिकवली जाते की तात्या, बिरुटे साहेब यांच्या मनात जसा आहे तसा टोकाचा दुराग्रह आणि तिरस्कार काहींच्या मनात निर्माण होतो.

छे, छे. टोकाचा दुस्वास असता तर तथाकथित द्वेष्ट्या लोकांनी ह्या लेखाला परत परत भेट दिली नसती आणि आपुलकी नसती तर ह्या विषयाकडे ढुंकून ही पाहिले नसते. त्यांचे संस्कृतवर प्रेम आहे मात्र त्यांनी (अंतू बर्वासारखे) कोणापाशी ही कधी ही प्रेम व्यक्त केले नसेल बहुदा म्हणून ते नीटपणे आपल्या भावना मांडू शकत नाहीत. चालायचे, हा तर व्यक्तीदोष झाला, स्वभाव दोष नव्हे.

जी भाषा आधीच मृत झालेली आहे, ती बोलली गेली नाही, तर त्या भाषेला काहीच फरक पडत नाही.

हा मात्र खोडसाळ अपप्रचार झाला. संस्कृत आजही बर्‍याच घरांत बोलली जाते. मी तर म्हणेन बेडूक निसर्ग प्रतिकूल असतो म्हणून उन्हाळ्यात जमिनीत खोलवर जातो आणि अन्न पाण्याविना समाधी घेतो म्हणजे तो मृत होत नाही असे विज्ञान म्हणते त्याचप्रमाणे कालौघात संस्कृतने समाधी घेतली आहे. (फार कशाला लांब जा, पावसला स्वामी स्वरुपानंद ह्यांनी जरी समाधी घेतली असली तरी ते भक्तांच्या हाकेसाठी सदैव जागरूक आहेत असे जनसामान्य म्हणतात).

त्यामुळे संस्कृत संभाषणाचा पुरस्कार करणार्‍यांनी व्याकरणावर भर देणार्‍यांचा तिरस्कार करू नये, व व्याकरणावर भर देणार्‍यांनी संस्कृत संभाषणाचा पुरस्कार करणार्‍यांचा आदर करावा.

व्याकरणाचा तिरस्कार नव्हे पण लहान मूल प्रथम भाषा बोलायला शिकते व नंतर ८-१० वर्षांनी व्याकरण हे वैश्विक सत्य आपण लक्षात घ्याल तर बरे.

चू. भू. द्या. घ्या.

ऋजु.

*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*

संस्कृतस्य महिमवर्णनेन नास्ति साधितम् । सततसंभाषणेन तस्य जीवनं स्थिरम् ।।

वास्तव


संस्कृत आजही बर्‍याच घरांत बोलली जाते.


बर्‍याच म्हणजे किती? संस्कृतच्या प्रेमापोटी वास्तवापासून किती दुर जायच? तात्या व बिरुटे सर हे काही संस्कृतचे विरोधक नव्हेत. पण संस्कृत विषयीच्या अस्मिता जेव्हा टोकदार व्हायला लागतात त्यावेळी त्यांची असहमती म्हणजे विरोध असे समीकरण बनले जाते.
बेडकाच्या उदाहरणात बेडकाचा सुप्तावस्थेत असलेला कालावधी हा समजा संस्कृतच्या अस्तित्वाला दिलासा देणारा वाटला तरी तो केवळ भाषिक वारसा जतन करण्यासाठी उपयोगाचा आहे. न जाणो भविष्यात संस्कृतला उर्जितावस्था आली तर ? भाषिक संचलनालयाला उद्या पुराणभाषा जतन केंद्र स्थापन करायला लागले तर नवल नाही. संस्कृत, पाली, अर्धमागधी सारख्या अनेक बोली व प्रमाण भाषा व लिप्या जतन करण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न होतील आणि व्हावेत.

प्रकाश घाटपांडे

शंकासमाधान

बर्‍याच म्हणजे किती? संस्कृतच्या प्रेमापोटी वास्तवापासून किती दुर जायच?

कर्नाटकातील मुत्तुर आणि होसहळ्ळी ह्या गावातील अठरापगड जातीतील लोक १००% संस्कृत
बोलतात. आज जगभरात २० लाख लोक सोप्या संस्कृतमध्ये बोलू शकतात त्यात पाश्चात्यांचा पण समावेश आहे. उदाहरणच पाहिजे असेल तर माझी खरडवही पहावी. अधिक माहितीसाठी संस्कृत भारती ह्या संस्थळाला भेट द्यावी.

शेवटी असे आहे की झोपलेल्याला उठवता येते पण झोपेचे सोंग घेतलेल्याला नव्हे.

तात्या व बिरुटे सर हे काही संस्कृतचे विरोधक नव्हेत. पण संस्कृत विषयीच्या अस्मिता जेव्हा टोकदार व्हायला लागतात त्यावेळी त्यांची असहमती म्हणजे विरोध असे समीकरण बनले जाते.

सदर व्यक्तींशी माझे दूरान्वयाने ही भांडण, विसंवाद नाही. इथेच काय पण इतर सर्वत्र मी अजातशत्रु मुलगा आहे आणि माझे फक्त राधिकाबाईंशी तात्विक मतभेद आहेत.

बेडकाच्या उदाहरणात बेडकाचा सुप्तावस्थेत असलेला कालावधी हा समजा संस्कृतच्या अस्तित्वाला दिलासा देणारा वाटला तरी तो केवळ भाषिक वारसा जतन करण्यासाठी उपयोगाचा आहे. न जाणो भविष्यात संस्कृतला उर्जितावस्था आली तर ?

वैदिककाल हा पाश्चात्यांच्या मते इ.स. पूर्व ५००० मानला गेला आहे (भारतीय विद्वान् इतिहासकार आणि ज्योतिषी यांच्या मते तो अजून कितीतरी जास्त आहे). त्यात सध्याची २००८ मिळवली की एकूण वर्षे ७००८ होतात त्यातील ५०० वर्षाचा संस्कृतच्या सुप्तावस्थेचा काळ म्हणजे १०% सुद्धा नाही हे आपण लक्षात घ्याल तर बरे आणि ज्या वेगाने लोक परत संस्कृत वळत आहेत त्या वेगाने संस्कृतला उर्जितावस्था नक्कीच आली आहे. मी तर म्हणेन आपण डोक्यावरून पांघरूण घेतले तरी सूर्य उगवायचा राहात नसतो.

भाषिक संचलनालयाला उद्या पुराणभाषा जतन केंद्र स्थापन करायला लागले तर नवल नाही. संस्कृत, पाली, अर्धमागधी सारख्या अनेक बोली व प्रमाण भाषा व लिप्या जतन करण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न होतील आणि व्हावेत.

देव करो आणि ही वेळ उद्या आपल्या मायमराठीवर न येवो. कारण ज्या वेगाने मराठी शाळा बंद पडत आहेत ते पाहता काळजीच वाटते.

*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*

संस्कृतस्य महिमवर्णनेन नास्ति साधितम् । सततसंभाषणेन तस्य जीवनं स्थिरम् ।।

मजकूर संपादित. व्यक्तिगत स्वरूपाचे आणि चर्चेत अनावश्यक असणारे आणि सदस्यांवर व्यक्तिगत टिका करणारे प्रतिसाद खरडवही किंवा व्य. नि.तून द्यावेत. -संपादन मंडळ

आपण आणि इतरेजन

प्रियाली ह्यांनी लिहील्याप्रमाणे " .... ब्रिटिशांनी इंग्रजी शिकवण्यावर भर दिला. भले याचे कारण त्यांना राज्य चालवायला बाबू हवे होते असेही असेल. त्यात अमुकांनी ती शिकावी आणि अमुकांनी ती शिकू नये असे नियम घातले नसावेत. (चू. भू. दे. घे.) स्वतः ब्रिटिश आपल्या नोकरांशी बोलताना हीच भाषा वापरत गेल्याने ती रुळत गेली."

हे नुसत्या व्यापारउदीमाच्या हेतूतून आलेले नाही. परक्या देशात जाऊन तेथले राज्यशकट चालवायची महत्वाकांक्षाही ह्यामागे होती.

ह्याउलट अदिती लिहीतात "कुठलीही विद्या नेहमी पात्र शिष्यालाच द्यावी असा दंडक गुरूला घालून दिलेला आहे. अशिष्याला विद्या देणार्‍या गुरूचीच विद्या नष्ट होते म्हणतात. कदाचित संस्कृत भाषेच्या गुरूंबद्दल असंच काहीसं घडल्यामुळेच आज तिच्यावर अशी स्वत।लाच सिद्ध करून काही असंस्कृत लोकांकडून प्रशस्तिपत्रक मिळवण्याची पाळी आली असावी. "

हे जर खरे असले तर संस्कृतचे 'मारेकरी' तिचे गुरूच होत. कारण ते प्रथम समोरच्याला नीट पारखून, निरखून घेणार, त्याचे 'कप' रिकामे आहेत की नाही ते तपासणार, तसे दिसत नसल्यास तसे त्यांना ठणकावून सांगून विन्मुख पाठवणार!

आता आपण अजून दुसरीकदे वळून पाहू: चिनी भाषेचीही संस्कृतएव्हढीच परंपरा आहे. ती भाषाही क्लिष्ट, लिहाय- वाचायला कठीण (चित्रलिपी असल्याने). ह्यामुळे ती जनमानसात सहज वापरता यावी, देशाची साक्षरता वाढण्यास मदत व्हावी, ह्याकरता वर्षानूवर्षे तिचे सोप्पीकरण करण्याचे प्रयत्न चालू होते- असे पहिले ठोस प्रयत्न २० च्या शतकाच्या सुरुवातीस झाले. मग चीनमध्ये कम्युनिस्ट राजवट आल्यावर त्यांनी हे प्रयत्न नेटास लावले. सुमारे पन्नाशीच्या दशकाच्या मध्यापासून तिथे 'सोप्पी चिनी' (Simplified Chinese)लिपी कायद्याने अंगिकारली गेली.

अर्थात भाषा लोकाभिमुख करायचीच नसेल अथवा तशी ती झाली नाही तरी पर्वा नाही असा पवित्रा असेल, तर मग बोलणेच खुंटले.

सहमत आहे

प्रदीप यांचेशी सहमत आहे. सुंदर विश्लेषण.
प्रकाश घाटपांडे

वर्तुळ पूर्ण

अर्थात भाषा लोकाभिमुख करायचीच नसेल अथवा तशी ती झाली नाही तरी पर्वा नाही असा पवित्रा असेल, तर मग बोलणेच खुंटले.
प्रदीप यांनी ऋजु यांचाच मुद्दा मांडल्याने एक वर्तुळ पूर्ण झाले आहे. ऋजु यांनी खालील वर्गातील लोकांना दोषी मानले आहे:

>>> मुलांच्या मनांत संस्कृत विषयी घृणा निर्माण कशी होईल हे पाहाणे हे एकमेव कार्य ही पाठ्यपुस्तकी विद्वान मंडळी करतात.
>>> जागोजागी अवजड संस्कृतभाषा वापरून समोरच्याला गारद करू पाहाणारे
>>> संस्कृत शिकवताना व्याकरणावर अवाजवी भर देणारे (लहान मूल पण आधी भाषा शिकते मग तिचे व्याकरण)

प्रदीप यांनी तोच मुद्दा मांडला आहे. आपण सर्व एकमेकांपेक्षा फार वेगळे बोलत नाही आहोत याचे हे एक छोटे उदाहरण आहे.

सुसंस्कृत?

'मारेकर्‍यांना गारद करणे' हा सुसंस्कृत विचार नव्हे. उलट जे तथाकथित मारेकरी आहेत ते संस्कृतासाठी निदान 'काहीतरी' करत आहेत हे ही नसे थोडके. नाहीतर ज्या भाषेचा दैनंदिन जीवनात (फक्त न कळणारे श्लोक म्हणून बक्षिसे मिळवणे किंवा मि, वः ,मः पाठ करून बर्‍यापैकी मार्क मिळवणे या पलिकडे) काहीच उपयोग होत नाही त्या भाषेकडे कोण पाहील?

एकूणच जगाचा वेग फार वाढला आहे. त्यामुळे जे झटकन उमगते तेच उचलले जाते हा नियम झाला आहे.

काही सन्मान्य अपवाद वगळता सर्वसामान्यपणे आज संस्कृत ज्ञानभाषा म्हणून सोडाच पण एक मृतभाषा म्हणूनही अभ्यासली जात नाही. केवळ जुने ऐतिहासिक, पौराणिक आणि तात्विक ग्रंथ त्या भाषेत लिहिले गेले इतकीच तिची आजची ओळख आहे.
जिथे खणखणीत जिवंत, बोली भाषांतील विद्वज्जड ग्रंथ फारसे वाचले जात नाहीत तिथे या क्लिष्ट भाषेची काय कथा?
या भाषेतले साहित्य अभिजात आहे हे नि:संशय! पण त्याची सोप्या समकालीन भाषेतली भाषांतरे उपलब्ध आहेत. मग मूळ भाषा कशासाठी शिकायची?
अनेक 'घरांमध्ये' जरी ती बोलली जात असेल तरीही त्या घरातले लोक घराबाहेर पडल्यावर त्या भाषेत बोलू शकणार नाहीत हे निश्चित.

असे होते आहे याचे कारण संस्कृत शिकायला अवघड आहे हे सत्य आहे.
मराठी भाषा संस्कृताची तत्सम/तद्भव असली तरी ज्याला हार्ड कोअर म्हणतात ती संस्कृत भाषा सामान्य माणसाला शिकण्यास अत्यंत
क्लिष्ट आहे.
'अहं लड्डुकम् खादामि| ' असे सोपेसोपे बोलणे वेगळे आणि 'वाक्यार्थविचारणाध्यवसाननिर्वृत्ता हि ब्रह्मावगतिर्नानुमानादिप्रमाणान्तरनिवृत्ता |' हे लिहिणे/वाचणे/समजणे वेगळे. (मला अतर असा संशय येतो की मध्यकालीन ब्राह्मण हेच संस्कृताचे खरे मारेकरी आहेत. त्यांनी संस्कृत भाषा सोपी न करता आणखी अवघड करून ती आपल्यापुरतीच मर्यादित केली, सामान्य जनांपासून दूर नेली. अन्यथा आज काही वेगळे चित्र दिसले असते आणि ही चर्चा अप्रस्तुत ठरली असती. )
बुद्धाने पालीतून, महावीराने मागधीतून आणि ज्ञानेश्वराने मराठीतून आपले विचार मांडले नसते.

इतकेच कशाला? आज पाली , मागधी, आणि ज्ञानेश्वरकालीन मराठी यांचीही संस्कृतासारखीच अवस्था आहे. पाली, मागधी तर नामशेष झाल्या. मराठी काळानुरूप बदलली म्हणून तगली. आज 'आजची मराठी तरी वाचवा' म्हणून हाकाटी करावी लागत आहे. 'दाऊ हॅथ' वगैरे शेक्स्पिअरकालीन इंग्रजीचीही तीच अवस्था आहे. इंग्रजी सोपी होत रहाते म्हणून जिवंत आहे.. अमेरिकन इंग्रजी तर बरीच वेगळी आहे.)

संस्कृतभाषेतील संधी-समास यांचा विग्रह करून आणि अन्वयार्थ लावून सोप्या संस्कृतात जुनी पुस्तके पुन्हा लिहिली गेली तर मध्ये येणारी इंग्रजी-जर्मन भाषांतराची पायरी गाळून जिज्ञासु लोक स्वतःच ती वाचू शकतील.
असे झाले तर पुन्हा संस्कृताला बरे दिवस येतील.
संस्कृतच्या खर्‍या प्रेमीजनांना हे नम्र निवेदन आहे की त्यांनी इतर लोक काय करतात यावर आकसबुद्धी न ठेवता स्वतः पुढाकार घेऊन अशी सोप्या संस्कृतातील पुस्तके प्रसिद्ध करावीत अणि तसे प्रयत्न होत असतील तर ते वाचकांच्या निदर्शनाला आणावेत म्हणजे त्यांना असे ग्रंथ वाचता येतील.

सुसंस्कृत? -असंस्कृत्

अदिती: कुठलीही विद्या नेहमी पात्र शिष्यालाच द्यावी असा दंडक गुरूला घालून दिलेला आहे. अशिष्याला विद्या देणार्‍या गुरूचीच विद्या नष्ट होते म्हणतात.

विसुनाना: मला अतर असा संशय येतो की मध्यकालीन ब्राह्मण हेच संस्कृताचे खरे मारेकरी आहेत. त्यांनी संस्कृत भाषा सोपी न करता आणखी अवघड करून ती आपल्यापुरतीच मर्यादित केली, सामान्य जनांपासून दूर नेली. अन्यथा आज काही वेगळे चित्र दिसले असते आणि ही चर्चा अप्रस्तुत ठरली असती.

मला या दोन्ही वाक्यांत घनिष्ठ संबंध दिसला. नाहीतर, कोणतीही विद्या अशी नाही की जी दुसर्‍याला दिल्याने कमी होते. परंतु एखादी गोष्ट स्वतःच्या ताब्यात रहावी म्हणून किती वाईट प्रयत्न झाले असावेत त्याचे उत्तम उदाहरण येथेच दिसले.

संस्कृत-एक मृत भाषा.

जी भाषा बोलीभाषा नसताना(?) ७००० वर्षे टिकून राहते. ती मृत भाषा? मराठी ही मरणासन्‍न झाली आहे असे मराठीला वाघिणीचे दूध पाजणार्‍या चिपळूणकरांपासून आपण ऐकत आलो आहोत. महाराष्ट्रात कदाचित मराठी संपेल पण ती ज्याप्रमाणे तंजावर, मॉरिशस आणि वाराणशीत टिकून आहे त्याप्रमाणे परप्रांतांत आणि परदेशांत शिल्‍लक राहील. तसेच, जोपर्यंत हिंदी, बंगाली, गुजराथी, तमिळ, तेलुगू , जर्मन आणि इंग्रजी शिल्‍लक आहेत, तोपर्यंत संस्कृत राहणारच!.
अवांतर: वॉशिंग्टन विद्यापीठातील चार्वाकाच्या तत्त्वज्ञानावरील पुस्तके शोधताना हे सापडले.--वाचक्‍नवी

पाठ्यपुस्तक मंडळाचा संस्कृतच्या मारेकर्‍यांमध्ये केलेला समावेश

पाठ्यपुस्तक मंडळ -असे म्हटले जाते, जे शिकवतात ते पाठ्यपुस्तके बनवत नाहीत व जे पाठ्यपुस्तके बनवतात ते शिकवत नाहीत. मुलांच्या मनांत संस्कृत विषयी घृणा निर्माण कशी होईल हे पाहाणे हे एकमेव कार्य ही पाठ्यपुस्तकी विद्वान मंडळी करतात.

आजकालच्या पाठ्यपुस्ताकांच्या बाबतीत हे नक्कीच खरं आहे. माझ्या लहानपणी खूप सुंदर आणि सोपी सुभाषितं अभ्यासक्रमात होती. मला संस्कृतचं पुस्तक खूपच आवडायचं. नंतर अभ्यासक्रम बदललला. सहजच पाहिलं तर आठवीच्या पुस्तकात (जिथं विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम म्हणून संस्कृत शिकायला मिळतं) पहिल्याच सुभाषितमालेत खालील सुभाषित होतं :

एकोहमसहायोऽहं कृशोऽहमपरिच्छद: |
स्वप्नेप्यैवंविधा चिन्ता मृगेन्द्रस्य न जायते|

इतकं अवघड सुभाषित देण्याची काही गरज नव्हती असं वाटतं. आणखीही अशीच काही अवघड सुभाषितं होती. आठवीच्या मुलांना संस्कृत आवडेल असा अभ्यासक्रम असावा. बरं हे सुभाषित फार काही बोध देतं असंही नाही. उदाहरणार्थ आमच्या वेळेसच्या आठवीतील एक दोन सुभाषितं पहा.

सदाचारेण सर्वेषां शुद्धं भवति मानसम्|
निर्मलं च विशुद्धं च मानसं देवमन्दिरम्||

नारिकेलसमाकारा दृश्यन्तेऽपि हि सज्जना:|
अन्ये बदरिकाकारा: बहिरेव मनोहरा: ||

ही सुभाषितं गेय तर आहेतच, शिवाय सोपी आणि अर्थपूर्णही आहेत. म्हणून ऋजू यांचं पाठ्यपुस्तक मंडळाचा संस्कृतच्या मारेकर्‍यांमध्ये केलेला समावेश पटला.

हे

मुलांच्या मनांत संस्कृत विषयी घृणा निर्माण कशी होईल हे पाहाणे हे एकमेव कार्य ही पाठ्यपुस्तकी विद्वान मंडळी करतात.

मरापापुनि मंडळाबद्दल खरे असेल मात्र सीबीएसई व इतर काही अभ्यासक्रम बनविणार्‍यांच्या बाबतीत तितकेसे खरे नाही.

मी एकदा आमच्या व्यवसायाच्या ठिकाणी संस्कृत बी.ए.चा अभ्यास करीत होते. अचानक तिथे एक उत्तर प्रदेशी फेरीवाला आला. त्याने तो अभ्यास पाहून सहज विचारले की कुठल्या वर्षाचा हा अभ्यास चालू आहे. मी अभिमानाने म्हटले बी.ए.

मग त्याने शांतपणे विचारले, "मैं फूल सूंघता हूँ यह वाक्य आप संस्कृत में कैसे कहोगी?".* मी गारद.

कारण माझे संस्कृत शिक्षण मराठीतून अनुवाद पद्धतीने. वाक्य बनवायला येणार कुठून. मग त्याने शालिनतेने सांगितले, "अहं पुष्पं जिघ्रामि ।".

त्याचे शिक्षण फक्त ५ वी पर्यंत झाले होते. मात्र ४-५ वी मध्येच त्यांना संस्कृतमधून संस्कृत शिक्षण असते. त्यामुळे केवळ त्याला संस्कृत वाक्येच बनविता येत होती असे नाही तर ४०-४५ वर्षांनंतर तो अभ्यास लक्षात ही राहिला होता.

ह्या फजितीनंतर मी इतरत्र चौकशी करून माझे नाव तातडीने संस्कृत संभाषण वर्गात घातले.

आजही कोणी मला म्हटले की मला संस्कृत येते, मला दहावीला ९४-९५ गुण मिळाले होते की मी लगेच हाच* प्रश्न विचारते. कारण मरापापुनि मंडळाच्या पाठ्यपुस्तकातील संस्कृत हे संस्कृत नव्हेच.

 
^ वर