ट्यूब विरहित टायर

बाळ पालथे होणे, बसणे  रांगणे, उभे राहणे आणि मग चालणे या काही अश्या हालचाली आहेत ज्या आपल्या वाढत्या वयाचे मैलाचे दगड म्हणून ओळखले जातात. मग शाळा आणि मग शाळेला जाणे. या शाळेला जाण्यात आपल्या आयुष्यात स्वतःचे मालकीचे वाहन येते ते सायकल. अन त्या सायकलची देखभाल हा आपला एक छंदच बनून जातो. हा छंद जपताना आपल्या आवाक्या बाहेरची देखभाल म्हणजे पंक्चर. मग "येथे पम्चर/पंचर/पंक्चर काढून मिळेल" असा फलक शोधायची गरज लागते ती लहानपणा पासून ते जो वर स्वतः वाहन (दुचाकी/चारचाकी) चालवतो तोवर. बरं सायकलच ठीक आहे हो. पंक्चर झालेले चाक उचलून नेणे शक्य असते. पण इतर वाहनांचे काय? मग ती दुचाकी असो वा चार चाकी. वाहनचालक जर स्त्री असेल तर मग हतबलता आणखीनच तीव्र अन मदतीची गरज जास्तच. पंक्चर झाल्या झाल्या गाडीचे टायर खाली बसलेच म्हणा, जर मोटर सायकल असेल तर खोळंबा, अतिरिक्त चाक वाली दुचाकी असेल तर चाक बदला. अन चारचाकी असेल तर अतिरिक्त चाक बदलण्याचा खटाटोप वेगळा. अतिरिक्त चाक असले तरी ही ते योग्य स्थितीमध्ये असलेले हवे हे सांगायला नको.  एकूणच गाडी पंक्चर होणे हा प्रत्येक प्रवासातला अप्रिय, अकल्पित आणि खोळंबा करणारा प्रकार.

या अप्रिय, अकल्पित आणि खोळंबा करणारा प्रकारा पासून थोडासा दिलासा मिळतो आहे. बाजारात आता आलेल्या ट्यूब विरहित टायर हे जनसामान्यांची हि अडचण ओळखून तंत्रज्ञान विकसीत झालं आहे.

सामान्य टायर ट्यूबची माहिती:
सर्वसाधारणपणे गाडीचे चाक म्हणजे कणा, कण्यावर फिरणारी धातूची रीम, रिमवर बसवलेले रबर-धातू तारा यापासून बनवलेले टायर, टायर आणि रीम यांच्या पोकळीमध्ये असलेली ब्युटीलची ट्यूब, अन त्या ब्युटीलच्या ट्यूबला असलेल्या अन रिममधुन बाहेर आलेल्या व्हॉल्व मधून भरलेली काँप्रेस्ड हवा. हे सर्व मिळून तयार होते एक चाक.  खालील चित्रावरून या ठेवणीची कल्पना येईलच.

चाकाची ढोबळ रचना

चाकाच्या या सर्व भागांमध्ये सर्वात स्वस्त म्हणजे हवा. पण जेव्हा याच हवेची गळती होऊ लागते तेव्हा मात्र तोंडचे पाणी पळते. अन चालकाचा त्याचा जर अंदाजच आला नाही तर गाडीवरचे नियंत्रण जाऊन प्रसंगी जीव गमावण्याची सुद्धा शक्यता असते.

सामान्य टायरची रचना खालील चित्रावरून लक्षात येऊ शकेल.

सामान्य टायरची रचना

धातूच्या तारा, ज्यामुळे रिमची पकड घेतली जाते, तारांचाच आधार घेऊन असलेली वेष्टणे आणि त्याला आच्छादणारे वेगवेगळ्या जाडीचे रबर (रस्त्याशी संपर्क न येणार्‍या दोन बाजू आणि रस्त्याशी संपर्क येणारा भाग) या पासून टायर बनते. टायरची रस्त्याशी संपर्क येणारी बाजू अनेक देशात वेग वेगळ्या हवामानाचा आणि त्यामुळे रस्त्यावरील पकडीचा विचार करून बनवलेली असते.
ट्यूब ब्युटीलची असते. वाहनाची रचना/वजन यावरून या ट्यूबमध्ये किती दाबाची हवा असली पाहिजे ते ठरवले जाते. कमी दाबाची हवा वाहनासाठी आणि प्रवास्यांसाठी धोकादायक ठरू शकते. तसेच वाहनाच्या इंधनक्षमतेवर सुद्धा परिणाम करू शकते. वाहनाची इंधनक्षमता कमी होते अन इंधनाचा खर्च आपोआपच वाढतो.

या प्रकारच्या टायर ट्यूब पंक्चर झाल्या तर पंक्चर करणारी वस्तू (अनेकदा खिळा) टायरमध्ये रुतून बसतो, ट्यूबला भोक पडते आणि हवेची गळती सुरू होते. हवा ट्यूबमधून, व्हॉल्व खराब झाल्यास व्हॉल्वमधून आणि टायर ट्यूबच्या पोकळीमधून वाहून जाते. खिळा टायरमध्ये राहिल्याने ट्यूबची अक्षरशः चाळणी होण्याची शक्यता असते. पंक्चर झाल्या झाल्या तत्काळ हवा जायला सुरू होते आणि प्रवास तिथल्या तिथे थांबतो. गाडीचे चाक बदलणे अथवा जवळच पंक्चर काढणारा अण्णा शोधणे या शिवाय पर्यायच नसतो. सर्वात महत्त्वाचा तोटा म्हणजे गाडी भरधाव वेगात असेल आणि चालकाला वेग नियंत्रित नाही झाला तर जीवघेणा अपघात होण्याची शक्यता जास्त असते.

ट्यूब विरहित टायरची थोडक्यात माहिती :

नावाप्रमाणेच या प्रकारच्या टायरला वेगळ्या ब्युटील ट्यूबची गरज नाही. टायर,  रीम आणि टायरमधले इनर लायनिंग असे मिळून चाक तयार होते. या प्रकारात हवा भरायचा व्हॉल्व रिमवरच लावला जातो. टायर, रीम आणि हवा असे मिळून एक हवाबंद पोकळी तयार होते. हवा भरायची ट्यूब नसल्याने, चाक आणि इनर लायनिंगच्या घट्ट पकडीमूळे, हवा जाण्याचा एकच मार्ग उरतो. तो म्हणजे ज्या ठिकाणी पंक्चर झाले आहे असा तो भाग. हा भाग शक्यतो छोटा असल्याने नेहमीच्या टायर प्रमाणे हवा पंक्चर होता क्षणीच न जाता हळूहळू जाते व परिणामी पंक्चर झाल्यावर सुद्धा गाडी न थांबता काही अंतर योग्य नियंत्रणात चालवणे शक्य होते.

ट्युबलेस टायर

ट्युब विरहित टायरचे चित्र

ट्यूब विरहित टायरचे फायदे:

  1. पंक्चर झाल्यावर गाडी न थांबता चालवली जाऊ शकते.
  2. चाकाचे एकूण भाग कमी झाल्याने सुटसुटीतपणा.
  3. भाग कमी झाल्याने वजन कमी अन त्यामुळे इंधन क्षमता जास्त.
  4. तत्काळ हवा जात नसल्याने गाडीवरचे नियंत्रण जात नाही. त्यामुळे वाहन आणि प्रवास्यांची सुरक्षा जास्त.
  5. दुरुस्तीला सोपे.
     

टायरवरची माहिती कशी वाचावी याचे आंग्लभाषेत माहिती देणारे हे एक चित्र:

आशा करतो की माहिती सदस्यांना उपयोगी पडेल. जाता जाता २ गृहपाठ देतो आहे. उत्साही सदस्यांनी आणखी काही माहिती मिळवावी हा त्यामागचा मुख्य उद्देश आहे.

गृहपाठ

ट्युब विरहित टायरचे पंक्चर काढण्याचे ३ मुख्य प्रकार आहेत. ते कोणते?
पाश्चिमात्य देशांमध्ये हिवाळ्या आधी आणि नंतर गाड्यांचे टायर बदलले जातात. असे का?

अवांतर
भारतात पंक्चर काढणारे लोक हे प्रामुख्याने केरळचे कमी शिक्षित अण्णा लोकं असतात. त्यांच्याकडे जी साधन सामुग्री असते ती पारंपरिक पद्धतीची असते, तसेच त्यांना या टायर बद्दल तांत्रिक माहिती नसल्याने ते लोक या टायर बद्दल अनेकदा गैरसमज पसरवतात.






सदर लेख लोकमित्र मंडळाने वापरण्यास माझी हरकत नाही.

लेखनविषय: दुवे:

Comments

माहितीपूर्ण लेख.

अत्यंत माहितीपूर्ण लेख.
लेखनशैलीही आवडली.
ता.क. अशा ट्यूबलेस टायर्समध्ये गळतीछिद्र आपोआप बंद करणारे रासायनिक संमिश्रण भरलेले असते.
(उदा. होंडा स्कूटरचे टायर.) त्याचीही माहिती द्यावी.

(लोकमित्रमध्ये छापण्यायोग्य.
शेवटचे एक सोडून बाकी चित्रे दिसत नाहीत. :( )

माहिती

विसुनाना, धन्यवाद. जमल्यास आपण म्हणताय ती माहिती देण्याचा लवकरच प्रयत्न करेन.





मिश्रण

माझ्या माहिती प्रमाणे हे मिश्रण थोडे द्रव स्वरुपात असते. हवेचा दाब कमी होउअ लागताच ज्या ठिकाणी हवा गळते आहे तिथे जाउन ते गोठते/घट्ट होते.





माहितीपूर्ण

चाणाक्य यांनी त्यांच्या आतापर्यंतच्या वाटचालीला अनुरूप असा आणखी एक माहितीपूर्ण लेख लिहिला आहे. सचित्र , सांगोपांग माहिती , नेमकेपणा , मूळ विषय खुद्द लेखकाला नीट समजलेला असल्याने, त्या विषयातील खाचाखोचा आणि हे सर्व मोजक्या शब्दात. धन्यवाद ! (होम्-वर्क् जमेल तसे करेन म्हणतो :-) )

धन्यवाद

प्रतिसादा बद्दल धन्यवाद. लेखनाचा मुळ हेतू असा आहे की तांत्रिक माहिती सर्वसामान्यांपर्यंत साध्या सोप्या भाषेत जावी.





+१

माहितीपूर्ण लेख, आणि सचित्र म्हणून समजण्यास सोपा.

चाणक्य यांस धन्यवाद.

छान लेख

नेहमी प्रमाणे माहीतीपूर्ण आणि सोप्या शैलीतील लेख. बाकी गृहपाठाबद्दल विचाराल तर मी त्या फंदात जास्त पडत नसल्याने ट्रीपल ए - अमेरिकन ऑटोमोबाईल असोसिएशनला बोलावतो. बहुतांशी ते टायर जिथे पंक्चर झाले (ते सहज समजू शकले तर. उ.दा. खिळा दिसणे वगैरे) विशिष्ठ ट्यूब इन्जेक्ट करून ते पंक्चर बंद करतात.

आता गाडीला टायर प्रेशर सेंसर हा भाग पण लावलेला असतो. जर प्रेशर कमी झाले तर तो दिवा लागतो. खिळा जरी गाडीत गेला तरी त्यामुळे लगेच दिवा लागतो (जरी प्रेशर पूर्ण गेले नसले तरी). त्याचा चांगला उपयोग होऊ शकतो. त्यातील एक तोटा इतकाच असतो की थंडीत जर १-२ पीएसआय ने पण प्रेशर कमी झाले तरी तो दिवा राहतो आणि कधी कधी मग डिलर कडे जाऊन तो रीसेट करावा लागतो.

लेख आवडला

लेख आवडला. अत्यंत माहितीपूर्ण. अजून येऊ देत!

एक शंका: टायरवरची माहीती फकत भारतीय/फक्त अमेरीकन/एखाद्या प्रांताला लागू आहे की ही डिझाईन्स वैश्विक आहेत?आमच्या नाक्यावरच्या मेकॅनिककडचे टायर कोणतेही निखाण नसलेले पाहिले आहेत ;)

असेच

लेख आवडला. सोप्या भाषेत उपयुक्त माहिती.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

वैश्विक

ती माहिती वैश्विक असते. आपल्याकडे टायर रिमोल्डींग हा प्रकारामुळे टायरचे रबरची झीज झाली की त्यावर आणखी एक आवरण चढवतात. त्यामुळे कदाचित तु म्हणतोस तसे असावे.





लेख आवडला.

लेख आहे. चाणक्य राव.
हे असलचं(ट्युब लेस )टायर प्रायोगिक तत्वावर सध्या काही आघाडिच्या चारचाकी वाहन उत्पादन कंपन्या बनवत आहेत्.
त्यात तर हवा भरायचं पण काम नाही.
दोन जाड पट्ट्या आहेत रबराच्या.त्यादरम्यान् आहेत त्यांना जोडणारे काही दुवे.
जसे की , दोन पट्ट्या दरम्यान त्यांना एकत्र ठेवायला,चिटकवायला (पीठाचे गोळे असावेत तसे)
रबराचे गोळे आहेत.
जर् ही चाके प्रत्यक्षात आली,तर "टायर पंक्चर"ची समस्या जवळ् जवळ् खलास होइल्.
पण ह्या चा़कांच्या त्याच मर्यादा आहेत ज्या भरीव चाकांच्या असतात.
त्या मर्यादांवर हे लोक अधिक संशोधन करताहेत.
(पण त्या मूळ चाकांचा फोटो इथे देउ शकत नाही,कार्यालयात माहिति जालाचा आम्हाला मर्यादित वापर करण्याचे बंधन आहे.क्षमस्व.)
पण त्याच कल्पनेच्या ईतर चाकांचा फोटो देत आहे.

http://officespam.chattablogs.com/archives/michelin-tweel-1-thumb.jpg

जन सामान्यांचे मन

माहिती

माहिती बद्दल धन्यवाद. चाकाचे वजन वाढल्यास इंधन क्षमतेवर परिणाम होतो तसेच जर हवा कमी दाबाची असल्यास सुद्धा. पण जर टायर पुर्णपणे भरीव असावी ही गरज असेल तर इंधन क्षमतेला महत्व नसतेच.





चांगला लेख

नॅनोला हे टायर बसवले जाणार आहेत काय?

माहित नाही

आपल्या प्रश्नाचे उत्तर माहित नाही असेच आहे. :(





माहिती आवडली

सरळ सोप्या शब्दांत व्यक्त केलेली माहिती आवडली.

चाणक्य, असा वेगळा आणि वैज्ञानिक माहितीवर आधारित विषय निवडून त्यावर लेख लिहिण्याची कला तुम्हाला चांगली जमली आहे. पु.ले.शु.

धन्यवाद

प्रोत्साहनात्मक प्रतिसादाबद्दल धन्यवाद. या प्रतिसादांमुळेच थोडे फार जमते आहे.





चांगला लेख

चांगला लेख. ट्यूबलेस टायर्स ची मूलभूत माहिती कळाली. अधिक माहितीची वाट पाहतो आहे.

'टायर' फुटणे

'टायर' फुटून होणारे; खरे तर ट्यूब फुटून होणारे अपघात ट्यूबलेस टायर वापरल्याने आजिबात होणार नाहीत का?

टायर फुटण्याची कारणे

टायर फुटण्याची कारणे हे अशा अपघातांचे मूळ कारण असते. ट्युबलेस टायरचा मुख्य फायदा पंक्चरच्या वेळचा आहे. टायर शक्यतो तापमान वाढीने फुटतात. (माझ्याकडे विदा नाही.) अनियंत्रीत/अतिवेग हे त्यामागचे मुख्य कारण असते. तसेच अनियंत्रीत वेग हे अपघातांचे मुख्य कारण असते. अशावेळी जर चाकात योग्य दाबाची हवा नसेल आणि टायरची देखभाल योग्य प्रकारे घेतली नसेल तर मग अपघात होण्याची शक्यता जास्त आहेच. पण ट्युबलेस टायरमुळे अपघात झाला असे म्हणणे अथवा ट्यूबलेस टायर वापरल्याने अपघात आजिबात होणार नाहीत. असे म्हणणे अतिशयोक्ती ठरेल.





ट्यूबलेस टायर पंक्चर झालेले कसे ओळखावे?

ट्यूबलेस टायर पंक्चर झालेले कसे ओळखावे?

मध्ये माझ्या गाडिचे टायर पंक्चर झाले होते...हवा भरणारा पोरगा म्हणाला साहेब... चाक पंक्चर आहे...
मी बोललो पण चाक बसले नाहीये न...
तर तो म्हणाला हवा टिकत नाही... म्हणून पंक्चर काढायला चाक काढल्यावर १२ पंक्चर निघाले :(

 
^ वर