एक विशेष विभक्ती उपयोग

आम्हाला विभक्ती चे उपयोग शिकवताना ज्या वेळी रुच् धातुचा उपयोग करायची वेळ
आली तेव्हा मान्य गुरुवर्य श्री. जगदीश इंदलकर यांनी एक अतिशय सुंदर वाक्य सांगितले.

ते म्हणाले, "रुच् धातुला चतुर्थीची अपेक्षा असते. अश्या वेळी आपण मह्यं संस्कृतभाषा रोचते असे म्हणू शकतो मात्र त्या पेक्षा सुंदर वाक्यरचना म्हणजे संस्कृतभाषायै अहं रोचे । "

खरोखरच ही कल्पना किती रोचक आहे. तुम्हाला काय वाटते?

लेखनविषय: दुवे:

Comments

संस्कृत भाषा मुळीच समजत नाही!

खरोखरच ही कल्पना किती रोचक आहे. तुम्हाला काय वाटते?

माझ्यापुरतं बोलायचं झालं तर मला काही वाटण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, कारण आपल्या लेखनातील एक शब्दही समजला नाही!

असो, पुढील लेखनाकरता शुभेच्छा!

तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

रोचक

खरंच सुंदर आहे कल्पना. अशी अजून उदाहरणं द्या की...

- मेघना भुस्कुटे

कल्पना विलास

हाच संस्कृत भाषेचा सौंदर्यपाया होय. उदा. एक संस्कृत साहित्यात वाक्य आहे की उत्तम शिष्य / अभ्यासक मिळण्याने विद्या अधिक गुणवती होते (मूळ संस्कृत वाक्य आत्ता आठवत नाही).

संस्कृत साहित्यात अशी शब्दक्रीडा जागोजागी आढळते.

आणखी काही गमतीदार उपयोग

१. रक्ष् धातूला पञ्चमीची अपेक्षा असते.
राजा चौरेभ्यः रक्षति।
याच्या ऐवजी
चौरा: राज्ञः रक्षन्ति।
(चोरी झाल्यावर राजाच्या करमागणीतून मनुष्य वाचतो.)

२. भी धातूला पञ्चमीची अपेक्षा असते.
बालकः सर्पात् बिभेति।
याच्या ऐवजी
सर्पः बालकात् बिभेति।
(साप आपणहून कोणाला त्रास देत नाहीत.)

३. क्रुध् धातूला चतुर्थीची अपेक्षा असते.
अहं व्याकरणाय क्रुध्यामि।
याच्या ऐवजी
व्याकरणं मह्यं क्रुध्यति।
(खूप प्रयत्न करूनही मी मराठीत काहीकाही भन्नाट चुका करतो. त्या पाहून दुसरे वाक्यच मला फिट्ट लागू होते.)

धातू?

१. रक्ष् धातूला पञ्चमीची अपेक्षा असते.
२. भी धातूला पञ्चमीची अपेक्षा असते.
३. क्रुध् धातूला चतुर्थीची अपेक्षा असते.

धातू म्हणजे काय? कृपया खुलासा करावा.

आम्हाला सोनं, चांदी, तांबं, पितळं इत्यादींनाच 'धातू' असं म्हणतात एवढ ठाऊक आहे. पुरषांच्या वीर्यामध्येही धातू नांवाचा एक पदार्थ असतो अशीही माझी माहिती आहे. 'हस्तमैथूनामुळे होणार्‍या वीर्यस्खलनामुळे वीर्यामधला धातू फुकट जातो' असंही काही रस्त्यावरच्या वैदूलोकांच्या बोलण्यातून मी ऐकलं आहे.

तरी कृपया धातू या शब्दाचे अधिक काही अर्थ असतील तर तेही सांगावे, तसेच 'व्याकरणातला धातू', 'सोन्याचांदीला संबोधतात तो धातू', आणि 'वीर्यामधला धातू', या तीनही धातूंच्या व्युत्पत्तीबद्दलही जाणकारांनी खुलासा करावा, ही विनंती!

असो..

आपला,
(सोनं हा धातू आवडणारा) तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

रामरक्षेंतील गंमत

रामरक्षेंत खालील श्लोक आहे :

रामो राजमणि: सदा विजयते रामं रमेशं भजे
रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नमः
रामान्नास्ति परायणं परतपं रामस्य दासोस्म्यहं
रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धर

वरील श्लोकांत 'राम' या शब्दाची प्रथमा ते संबोधन विभक्तीची एकवचनी रूपे क्रमाने आली आहेत. ज्या शब्दांत आली आहेत ते जाड टाइपांत आहेत.

(श्लोकांतील तिसर्‍या ओळींतील 'परतपं' शब्दाच्या अचूकपणाविषयी खात्री नाही).

परतरं

>> श्लोकांतील तिसर्‍या ओळींतील 'परतपं' शब्दाच्या अचूकपणाविषयी खात्री नाही

परतपं नसून परतरं आहे.

अर्थ?

रामो राजमणि: सदा विजयते रामं रमेशं भजे
रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नमः
रामान्नास्ति परायणं परतपं रामस्य दासोस्म्यहं
रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धर

याचा अर्थ काय? मला काहीच संस्कृत समजत नाही हो कोर्डेकाका. कृपया अर्थही स्पष्ट करावा. माझ्या माहितीप्रमाणे हे मराठी संस्थळ आहे, त्यामुळे इथे अन्य कुठल्या भाषेत लिहिल्या गेलेल्या मजकुराचा मायमराठीमधला अर्थ मला कळावा अशी माझी माफक अपेक्षा आहे...

प्रथमा ते संबोधन विभक्तीची एकवचनी रूपे क्रमाने आली आहेत.

म्हणजे काय? व्याकरणाची विशेष ओळख नसल्यामुळे वरील वाक्य समजले नाही. असो..!

तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

विभक्ती म्हणजे...

विभक्ती म्हणजे काय यासाठी संस्कृत यायची गरज नाही, मराठी, हिंदी, इंग्रजी किंवा दुसरी कुठलीही भाषा येत असली तरी चालते. वरील श्लोकात राम या शब्दाची जी रूपे आली आहेत त्यांना विभक्तिरूपे म्हणतात. राम,रामास, रामाने, रामाला, रामाहून, रामाचा, रामांत, आणि रामा-- ही राम शब्दाची प्रथमा ते संबोधनाची रूपे. हे तात्यांना नक्की माहीत असणार. त्यांनी कितीही वेड पांघरून पेडगावला जाण्याचा आव आणला तरी!--वाचक्‍नवी

इंग्रजी माध्यमातला मुलगा

परवा मुंबईत एका इंग्रजी माध्यमातल्या शाळकरी मुलाला आम्ही जमेल तेवढ्या सोप्या भाषेत विभक्तिप्रत्यय म्हणजे काय
ते समजावण्याचा प्रयत्‍न करीत होतो. नॉमिनेटिव्ह, ऍक्युझेटिव्ह, इन्स्ट्‌रु'मेन्टल वगैरे विभक्त्या सोदाहरण शिकवण्याची डोकेफोड केल्यावर आम्ही सप्तमी-संबोधनाला अडखळलो. इंग्रजी शब्द आठवेना; पुस्तकात शोधायला लागलो. तेवढ्यात तो मुलगा म्हणाला. "सप्तमी म्हणजे लोकेटिव्ह आणि संबोधन म्हणजे व्होकेटिव्ह." झालं! आमची बोलती बंद झाली. आमच्यापेक्षा त्याचे विभक्तिप्रत्ययांचे ज्ञान चांगले होते. आमची सर्व मेहनत म्हणजे भरलेल्या घड्यात पाणी भरणे. यापुढे, इंग्रजी माध्यमातल्या मुलाशी संस्कृतविषयी काही बोलायचे असेल तर सावधगिरी बाळगायला पाहिजे असे मनात ठाम ठसवले. --वाचक्‍नवी

रामो राजमणि: चा अर्थ -

रामो (राम: - राम हा राजा) राजमणि: (राजांचा मणी, सर्व राजांमध्ये मुख्य) सदा (नेहमी) विजयते (विजय मिळवतो).

रामं (रामाला) रमेशं (रमापतीला - रामाला) भजे (मी पूजा करतो, मी रामाची पूजा करतो).

रामेणाभिहता. येथे संधी आहे. रामेण + अभिहता. रामेण (रामाने) अभिहता (ठार मारली) निशाचरचमू: (निशाचर - राक्षस, चमू - समूह), रामाय (रामाला) तस्मै (त्या) नम: (नमस्कार असो).

रामात् (रामापासून) नास्ति (नाही) परायणं (ज्याची भक्ती करावी असा), रामस्य (रामाचा) दासोऽस्म्यहम् - पुन्हा इथे संधी आहे - दास: + अस्मि + अहम् (मी दास आहे).

रामे (रामामध्ये) चित्तलय: (मन रममाण) सदा (नेहमी) भवतु (होवो) मे (माझे), भो राम (हे रामा) मां (मला) उद्धर (उद्धार कर - माझा उद्धार कर).

परतरं ?

धन्यवाद प्राणेश. पण तिसर्‍या ओळीतील परतरं हा शब्द तुम्ही गाळलात. कृपया त्याचाही अर्थ सांगावा.

मान्य ज्ञानवृद्ध

श्री. मो. दि. पराडकरांनी दिलेला अर्थ -

रामान्नास्ति परायणं परतरम् = "रामाहून" श्रेष्ठ व ज्येष्ठ कोणी नाही.

*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*

संस्कृतस्य महिमवर्णनेन नास्ति साधितम् । सततसंभाषणेन तस्य जीवनं स्थिरम् ।।

विभक्तीबद्दल थोडंसं...

राम या शब्दापासूनच सुरुवात करूया.

रूप विभक्ती अर्थ
राम: प्रथमा राम
रामम् द्वितीया रामाला
रामेण तृतीया रामाने
रामाय चतुर्थी रामासाठी
रामात् पंचमी रामापासून
रामस्य षष्ठी रामाचा
रामे सप्तमी रामामध्ये
भो राम संबोधन हाक मारण्यासाठी वापरतात.

याच अर्थाच्या विभक्ती कोणत्याही शब्दासाठी वापरता येतात. फक्त सर्वनामाला संबोधन नसते. उदा. हे राम, हे श्याम, असे आपण म्हणू शकतो, पण हे मी, हे तू, असे म्हणत नाहीत.

अन्य काही शंका असल्यास अवश्य विचाराव्यात. यथामती/यथाशक्ती समाधान करण्याचा प्रयत्न करेन.

संबोधन - सर्वनाम

फक्त सर्वनामाला संबोधन नसते. उदा. हे राम, हे श्याम, असे आपण म्हणू शकतो, पण हे मी, हे तू, असे म्हणत नाहीत.

हे बहुधा ठीक नाही.

"ए! कोण आहेस तू तिकडे! अरे तू - तूच! काय करतो आहेस तिकडे?"
असे मराठीत म्हणता येते. तसेच संस्कृतातही म्हणता येते.
"अरे! कोऽसि त्वं तत्र! रे त्वम् - त्वमेव! किं कुरुषे तत्र!"

इथे "रे त्वम्!" हे युष्मद् चे रूप संबोधन म्हणून वापरले आहे.

संबोधन ही विभक्ती नाही, प्रथमेचे विशेष रूप आहे, असे (संस्कृतातून सांगितलेल्या) संस्कृत व्याकरणात मानतात. मराठीतून संस्कृत शिकवताना मात्र विभक्तींच्या तक्त्यात हमखास एक आठवी ओळ "संबोधन" म्हणून असते. ती तिथे असून काय फायदा होतो, ते मला माहीत नाही.

रामरक्षेतला तो श्लोक रचणारा कवी त्या मानाने अलीकडचा होता. किंवा विभक्तींची त्याची प्राथमिक ओळख पाणिनींच्या व्यवस्थेतली नव्हती, असे मानण्यास जागा आहे. (कारण "संबोधन" एक विभक्ती आहे असे दाखवणारी कवीची रचना या कडव्यात आहे.)

संबोधन

फक्त सर्वनामाला संबोधन नसते

बरोबर. पण संस्कृतात निर्जीव वस्तूंना संबोधन वापरले जाते, ते अधिक हास्यास्पद वाटते!

(भो) सुनील

एक विशेष विभक्ती उपयोग

सौरभ
अहो सुनीलजी, संस्कृतात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्याला विनोदी वाटतात पण त्या संस्कृत भाषेच्य एकन्दर स्वभावाला अनुसरून बरोबरच असतात. तुम्हाला हे महित्ये का, की संस्कृतात, पाणी, दूध, साखर, सोने, चान्दी, माती, लाकूड इ. वस्तूंनाही द्विवचने व अनेकवचने असतात. म्हणजे, एक पाणी, दोन पाणी, बहुत पाणी......एक दूध, दोन् दुधे, बहुत् दुधे.....एक माती, दोन् मात्या, बहुत मात्या.....इ इ.
गम्मत आहे किनई ?
काये, प्रत्येक भाषेला स्वतःचे एक स्वरूप असते.....एक स्वभाव असतो....आणि त्या स्वभावधर्मानुसार ती भाषा अद्वितीय (unique) असते. एखाद्या भाषेला दुसया भाषेचे माप/नियम लावून चालत नाही.
संस्कृतात निर्जीव वस्तूंना सम्बोधन वापरतात ते हास्यास्पद वाटते कारण आपल्याला मराठीत तसे बोलायची सवय नसते. पण थोडा जास्त विचार केल्यावर निर्जीव वस्तूला सम्बोधन वापरणे हे बरोबर कसे ते तुम्हाला कळेल. हे विशेषतः साहित्यात/काव्यात वगैरे वापरले जाते, दैनन्दिन व्यवहारात याचा वापर कमी होतो.

सम्बोधन म्हणजे काय ? तर, कुणालाही हाकारण्यासाठी, बोलावण्यसाठी वपरला जाणारा शब्द किंवा प्रत्यय.
उदा. एखादा कवि जर नदीच्या काठी बसून आपल्या जीवनातील दु:ख नदीला साङ्गत असेल तर तो नदीला सम्बोधन वापरेल किनई ? तो म्हणेल "अगं नदी, तूच माझी खरी सखी आहेस कारण तू माझे दु:ख अगदी शान्तपणे, विनातक्रार ऐकतेस". आता या वाक्यात कवि नदीला सम्बोधून 'अगं नदी' असे म्हणतो, हेंच नदीला वापरलेले सम्बोधन.
आमच्या सारख्या मुम्बई शहरात राहाणार्या मणसांना नद्या वगैरे इतक्या जवळ नसतात. मग आम्हाला आमची दु:खे सिमेण्ट-काङ्क्रिटाच्या इमारतींना किंवा जवळच्या रेल्वे स्टेशनांना साङ्गावी लागतात. अशा वेळेला आम्ही त्या त्या वस्तूंना नक्कीच काही न काही सम्बोधन वापरणरच, हो किनई ?

सौरभ

मराठीतील संबोधन...

संस्कृतात निर्जीव वस्तूंना सम्बोधन वापरतात ते हास्यास्पद वाटते कारण आपल्याला मराठीत तसे बोलायची सवय नसते.

स्वातंत्र्यवीर म्हणतात, ने मजसी ने परत मातृभूमीला (हे) सागरा, प्राण तळमळला...

*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*

संस्कृतस्य महिमवर्णनेन नास्ति साधितम् । सततसंभाषणेन तस्य जीवनं स्थिरम् ।।

संस्कृतातील संबोधन

कथा-कवितेतील एखादे उदाहरण देणे वेगळे आणि सरसकट संबोधनाचा विभक्तीत समावेश करून "हे एक झाडा", "हे दोन झाडांनो", "हे अनेक झाडांनो" अशी घोकंपट्टी करणे वेगळे, नाही काय?

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

 
^ वर