जाहिरातीचा प्रभाव.

आजानुकर्णाच्या गोरी गोरी पान या लेखाला अनुसरुन हा लेख लिहीत आहे.

जाहिरातीचा प्रभाव म्हणजे काय हे अगोदर समजुन घ्यायला हवे. आपणास कोणीतरी काहीतरी शिफारस करतो आणि आपण ते डोके गहाण ठेऊन तसेच स्विकारतो आणि काळाच्या ओघात लक्षात येते की आपण किती गाढव ठरलो आहे अथवा अश्या गोष्टीपासून मुक्त होणे किती अवघड आहे.

उदाहरण म्हणून सांगायला हरकत नाही, महाविद्यालयीन जीवनात माझ्या एका मित्राने सांगितले की सकाळी मस्तपैकी ऊठावे, दात घासावे, फोरस्वेअर सिगारेट ओढावी आणि त्यानंतर मस्त पैकी स्पेशल चहा प्यावा. पूर्ण दिवस फ्रेश ( ताजातवाना ) जातो. त्याने ज्या पध्दतीने सांगितले, आवाजाचा चढ उतार, डोळ्यांचे मिचकावणे, सिगारेट पिण्याच्या झुरका इत्यादी इत्यादी. मला क्षणभर वाटले की खरेच किती मज्जा येत असेल बरे, तात्पर्य, सिगारेट कशी सोडावी यासाठी मला जे काही प्रयत्न करावे लागले तर त्यावर एक कांदबरी अथवा प्रबंध होऊ शकेल. सकाळी सकाळी मी बर्‍याच तरुणांना सिगारेटीचे झूरके ओढतांना पाहतो तेंव्हा खरेच वाईट वाटते. कधी कधी मुलींना सुध्दा सिगारेट ओढतांना पाहतो तेंव्हा मला तो दिवस प्रचंड अस्वस्थ वाटत असते. वाटते यांना अशीच दिक्षा मिळाली असेल का?

हे एक उदाहरण झाले पण आपल्या दैनदिन जीवनात बघितले तर मुलांच्या गोळ्या-बिस्किटे इत्यादींच्या जाहिराती, सौंदर्य प्रसाधनाच्या जाहिराती, औषधाच्या जाहिराती, गाड्यांच्या जाहिराती इत्यादी इत्यादींनी आपले जीवन भारुन टाकले आहे. अनेक वेळेस आपण आपली कुवत अथवा गरज न पाहता पैसे खर्च करत असतो. ( इतरत्र वेदनाशामकाच्या औषधावर लेख आहे तोही मूळातच वाचावा).

आता माझा प्रश्न असा आहे की यापासून मूक्त कसे व्हावे, नीरक्षीरविवेक कसा जागृत करावा? शेवटी पैसे कमावणे हा कोणाचा उद्योग असू शकतो परंतु आपण मात्र त्याच्या जाहिरातीपासून कसा आपला बचाव करू शकतो?

Comments

बचावासाठी जाहिरात

बचावासाठी खालील जाहिराती
१)सिगारेट/ दारु कशी सोडावी याची जाहिरात
२) आमच्या व्हीसीडी/नियतकालिक/संकेतस्थळ इ वर जाहिरात नसते याची जाहिरात
३)आम्हाला जाहिरातीची गरज नसते. आम्हाला प्रसिद्धीची हाव नाहि.आम्ही अमुक अमुक कार्यक्रमाद्वारे लोकांपर्यंत पोहोचतो याची जाहिरात
मे सो। जा व्हावे
"मेहेरबान साहेबास जाहीर व्हावे"हा विनंती अर्जाच्या शेवटी असलेला मजकुर ही विनंती जाहिरात आहे असे म्हणले तर आज शासकीय दरबारात अशा जाहिराती रोज असतात.

जाहिरातींपासून बचाव करणे आहे अशी एखादि जाहिरात देउन बघावी
प्रकाश घाटपांडे

मस्त

जाहिरातींपासून बचाव करणे आहे अशी एखादि जाहिरात देउन बघावी

मस्त! आवडले!!

आपला
एके काळचा जाहिरात वाला
गुंडोपंत

जाहिरातीचा नीरक्षीरविवेक

हा एक मोठा कूटप्रश्न मांडला आहे. जाहिरात ही व्यापार आणि व्यवहाराचा आवश्यक भाग आहे.

नेहमीच्या खरेदी-विक्रीत "आपल्याकडे विकण्यासाठी माल आहे" हे सांगावेच लागते. नाहीतर गिर्‍हाईक येणारच नाही. पण पैसे नसलेल्या व्यवहारातही आपण सारखे एकमेकांचे लक्ष वेधायचा प्रयत्न करत असतो. कित्येकदा अशा प्रसंगी बहुमोल वेळ वाया जातो. मला हा अनुभव टीव्हीच्या अनुषंगाने आला आहे. मी अमेरिकेत आलो, तेव्हा सुरुवातीला मला न आवडणारे कार्यक्रमही रात्री बारा वाजेपर्यंत बघत असे, असे काही त्याचे लक्ष वेधण्याचे चेटूक होते. (सवय मोडण्यासाठी एके दिवशी टीव्ही उचलून कोणालातरी देऊन टाकला!)

जाहिरात करणार्‍याला काही विकायचे आहे, हे नेहमी लक्षात ठेवले तर बरे. तो आपल्याला पूर्ण माहिती देत नाही, केवळ आकर्षक तेवढीच माहिती देतो. यात जाहिरातकाराची काही चूक नसते. अर्धसत्य असले म्हणजे काही ते खोटे नव्हे. उलट, आपल्याला ती वस्तू विकत घ्यायची असेल तर ती जाहिरात आपल्याला फार उपयोगी पडते. अर्धसत्याचा उरलेला भाग आपल्यापाशी असतो: जाहिरात ऐकताना हे सारखे मनात असावे - "ही वस्तू मला विकत घ्यायची आहे का? का विकत घ्यायची आहे?"

जुन्या पद्धतीतही व्यापारी जाहिराती करत. गल्लीतून जाताना भाजीवाला "ताजी भाजी" ओरडतो. पण या सामान्य जाहिरातींचे एक चांगले असते. भाजीवाल्यापाशी जाऊन आपण भाजी बघून म्हणू शकतो - "ही कसली रे ताजी!" किंवा एकदा वाईट अनुभव आला की पुढच्या वेळेला त्याच्या जाहिरातीकडे साशंक नजरेने बघतो.

नशेच्या वस्तूंच्या जाहिरातीबाबत मात्र मागचा वाईट अनुभव फारसा कामी येत नाही. उदाहरणार्थ लेखात आलेले सिगारेटचे व्यसन, किंवा मी अनुभवलेले टीव्हीचे व्यसन, चाखल्यानंतर नावडले तरी चिकटतेच. लहान मुले जाहिरातीतील माहितीचा डोळस उपयोग करू शकत नाहीत कारण त्यांच्या अनुभवाचा विस्तार कमी असतो. "या जाहिरातीपेक्षा चांगला खाऊ, चांगली खेळणी त्या तिकडे मिळतात" हा विचार करता येत नाही. अशा प्रसंगी जाहिरात नियंत्रित करावी, अशा विचाराला काही समर्थन मिळते.

नियंत्रणाचे एकवेळ सोडा. "जाहिरातीतली माहिती पूर्णसत्य नसते" हे तत्त्व लहानपणापासून बालकांच्या मनात रुजवले तर त्यांना आयुष्यभर फायद्याचे होईल. मग प्रत्येक जाहिरातीबाबत हा विचार करू "उरलेले सत्य कुठे मिळेल?" आणि अशा प्रकारे फसगत टळेल, कमी प्रमाणात फसगत होईल.

जाहीरात

जाहीरात हे वर्षाला कोट्यावधी डॉलर्सनी लोकांचा गैरसमज वाढवण्याचे साधन आहे असे कुठेतरी वाचले आहे.

जाहीरात अथवा लोकशिक्षण ह्या एकाच नांण्याच्या दोन बाजू आहेत. दोन्ही प्रभावी पद्धतीने वापरल्यास उद्देश सफल करण्यास उपयोग होवू शकतो असे वाटते. एकदा ऐकले होते की लोकांना कुठलीही गोष्ट ही ७ वेळेस समजावून सांगावी लागते (मग डोक्यात जाते)... पण त्यात प्रभाव पण महत्वाचा असतो...

जाहिराती.

त्याला जाहिराती आवडतात. हा चघळण्याचा विषय आहे. उत्पादनांकडे फारसे लक्ष न देता, जाहिराती मागच्या कल्पकतेचा आस्वाद घेत चला.

अवांतर - मागे फेविकॉलने बिन-जाहिरातीच्या 'अतूट' चित्रपटांना प्रायोजित करण्याची शक्कल लढवल्याचे आठवते. (तशा त्यांच्या बर्‍याच शकला भावतात.)

जाहिराती कशा असाव्यात व कश्या नसाव्यात याचेही संकेत (७-८ ?) आहेत. (हाती लागताच इथे पुरवले जातील.)

याच संदर्भात - 'लगती हे प्यारी पर बोझ है भारी' या मॅक्सच्या (?) खास मुलींसाठीच्या विम्याच्या जाहिरातीवरील नुकतीच घातली गेलेली बंदी आठवते. 'फेअर ऍन्ड ल्व्हली' सारख्या प्रसाधनांची जाहिरात म्हणजे तारेवरील कसरत आहे. हीच बाब किंगफिशर सोड्याची :)

कला

जाहिरात हि ६५ वी कला आहे असे म्हणतात. असे ऐकले होते. चुकीचे असु शकेल.
नेते मंडळी स्वतःची जाहिरातबाजी करतात निवडणुकीसाठी त्यापासून समाजाचा/देशाचा बचाव कसा करावा?





 
^ वर