श्रमप्रतिष्ठा

दोन ऐकीव गोष्टी. ऍशेस मालिका खेळण्यासाठी एकदा इंग्लंडचा चमू ऑस्ट्रेलियात गेला होता. विमानतळावर त्यांचे स्वागत करण्यासाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेटशी संबंधित काही लोक आले होते. त्यांच्यामधलीच एक साधारण वृद्ध अशी व्यक्ती इतर मजूरांबरोबर इंग्लिश संघाचे सामान बसमध्ये चढवण्यास मदत करत होती. इंलंड संघाचे सदस्य हास्यविनोदात मग्न होते. बस निघायची वेळ झाल्यावर इंग्लिश संघाच्या कर्णधाराने शिष्टाचार म्हणून इतरांबरोबर त्या व्यक्तीचेही आभार मानले आणि औपचारिकता म्हणूनच त्या म्हातार्‍या माणसाला विचारले,
"आपण... ऑस्ट्रेलियन क्रिकेटशी संबंधित होतात का?"
"अं.. हो. होतो." तो माणूस म्हणाला.
"काय.. कोणत्या अधिकारात? काय करत होतात आपण?"
"आय यूज्ड टू बॅट अ बिट" तो माणूस म्हणाला.
"आणि आपलं नाव काय म्हणालात?"इंग्लिश कर्णधाराने विचारले.
म्हातारा हसला. "दे कॉल मी डॉन. डॉन ब्रॅडमन." तो म्हणाला.
दुसरी कथा अब्राहम लिंकनची. राष्ट्राध्यक्ष असताना त्याला भेटायला एक व्यक्ती आली. लिंकन जमीनीवर बसून बुटाला पॉलिश करत होता. पाहुण्याला धक्काच बसला. "मिस्टर प्रेसिडेंट, आपण स्वतःच आपल्या बुटांना पॉलिश करता?" पाहुण्याने विचारले.
"का? आपण कुणाच्या बुटांना पॉलिश करता?" लिंकनने मिश्किलपणे विचारले.
या गोष्टी खर्‍या की काल्पनिक हा मुद्दा गौण आहे. वस्तुस्थिती अशी आहे, की शारीरीक कष्टाचे काम करणे हे एकंदरीत खालच्या दर्जाचे, कमीपणाचे मानले जाते. एकदा दिवाळीत आमच्या इमारतीत साफसफाई करणार्‍या बाई आठवडाभर सुट्टीवर गेल्या होत्या. इमारतीच्या गच्चीवर आणि आसपास फटाक्यांच्या कागदांचा खच पडला होता. मी इमारतीतल्या कच्च्याबच्च्यांना (सगळे दहा - बारा वर्षांच्या आतले) हाताशी धरले आणि हा सगळा परिसर झाडून काढला. ते करत असताना जवळजवळ प्रत्येकाने "अहो, तुम्ही कशाला हे असले ( असले बरं का!) काम करताय, बाई येतील की उद्यापरवा..." असे म्हणून घेतले. स्वतःची गाडी धुवायला घेतली तरी लोकांच्या नजरेत 'काय दिवस आलेत बिचार्‍यावर... गाडी आहे, पण ती साफ करायला माणूस ठेवणं परवडत नाही याला' असा भाव असतो. आमच्या शेजारच्या आजींचा चष्मा वर विसरला म्हणून दोनच जिने चढून मी वर आलो तर 'अहो, तुम्ही कशाला त्रास घेतला, मी प्रज्ञाला पाठवणारच होते..' असं त्यांच्या सूनबाई म्हणाल्या. यात इतरांना त्रास नको, ही भावना असेलही, पण माणूस एका विशिष्ट वयाचा झाला (किंवा लायकीचा झाला म्हणूया, पाहिजे तर) की त्याने अशी अंगमेहनतीची कामे करता कामा नयेत, असा एक विचार दिसतो.
कामात हलक्या दर्जाचे असले काही असते का? कोणतेही काम प्रतिष्ठेचेच असते, जर ते स्वतःचे असले तर ते करण्यात लाज कसली वाटायची, हा विचार लोकांना का पटत नाही? अगदी दुसर्‍याचे जरी काम असले तरी त्यात उच्च दर्जाचे आणि नीच दर्जाचे असले काही नसते, हा विचार का रुजत नाही? कारकुनाने स्वतःची पिशवी आणि डबा आपल्या हातात धरला तर चालते, पण साहेबाची बॅग पट्टेवाल्यानेच उचलली पाहिजे ही अपेक्षा कालप्रवात वाहून का जात नाही? साहेबाने स्वतःची गाडी तर चालवायची नाहीच, पण ड्रायव्हरने गाडीचे दारही उघडून उभे राहिले पाहिजे या सरंजामशाही अपेक्षेतला पोकळपणा आपल्या कधी ध्यानात येणार?

लेखनविषय: दुवे:

Comments

हा हा

अहो, किती गोष्टींचा त्रास करून घ्यायचा मनाला!

पाप हे थोर लोकांचे। सांगावे कवणापुढे|| असे तुकोबांनी म्हटलेच आहे!

आमच्या कंपनीच्या चहापानखोलीत 'स्वत:चे कप स्वतःच्या हाताने धुवावेत' असा स्पष्ट रंगीत फलक लावला आहे. मात्र चहा कॉफी घेतल्यानंतर कप धुणारे लोक १% हून कमी असतील आणि बोंबलत नंतर 'आपल्याकडे सगळे मूर्ख आहेत. कोणी नियम पाळत नाहीत. राजकारण्यांनी देशाची वाट लावली आहे. धिस कंट्री इज गोईंग टू डॉग्ज. मुसलमान, रिझर्वेशन, ओसामा, सेतुसमुद्रम, काँग्रेस' असे बरळत असतात.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

चांगले विचार

श्रमाचे मोल फार कमी आहे. (जसे बाजारात तसे आपल्या मनातही.)
असे असू नये हे लेखातून चांगल्या रीतीने पटले.

विचार प्रवर्तक

विचार प्रवर्तक लेख आहे. पाश्चात्य देशांमध्ये बर्‍याच प्रमाणात स्वतःचे काम स्वतः करण्याची पद्धत आहे. याच कारणासाठी बर्‍याच ठिकाणी प्यून नावाचा प्राणीच नसतो. त्यामुले फाइल देणे-घेणे इ. काम लोक स्वतःचे स्वतःच करतात. आणि घरी नोकर ठेवायचे म्हटले तर त्यांचा पगार परवडणारा नसतो.
----
"मेरा अखबार कहां है? सब चीज टाइम टू टाइम होनी चाहिये."

+१

असेच.

सुरूवातीला इथल्या मंडळात कामे करताना कळले - कार्यक्रमाचे आयोजन करताना लोक किती कष्टांची कामे करतात. सामान आणणे, नेणे, खुर्च्या लावणे, त्या नंतर बंद करून जागेवर ठेवणे इत्यादी. फॅक्स वगैरे पाठवायला, कागदाच्या प्रती करायला कोणी माणसे नसतात, तेव्हा प्रथम झेरॉक्स मशीन स्वतः कसे वापरायचे, काही प्रश्न आले तर कसे सोडवायचे इत्यादी गोष्टी शिकून घ्याव्या लागल्या. दुपारी चहा हवा असल्यास स्वतः उठून तो करावा लागतो, किंवा उठून विकत आणावा लागतो असेही अनुभव येतात. पण सवय होते आणि अशा "कष्टाच्या" कामातही सफाई येते. पण हे माझे काम नाही असे म्हटले की संपलेच.

श्रम

विषयाची व्याप्ति मोठी आहे. अनेक स्तरांवर मला अशी अनेकानेक उदाहरणे आठवत आहेत , ज्यामधे लौकिकार्थाने यशस्वी माणसे प्रतिष्ठेचा कसलाही बाऊ न करता हलकी समजली जाणारी कामे हसत हसत करताना दिसतात. आणि दुर्दैवाने असेही पहायला मिळते , जिथे विशीची मुले घरची कामे "शान के खिलाफ" असल्याच्या गुर्मीमधे वावरतात.
आज इतक्या वर्षांनंतर आता डोक्यात फिट्ट् बसलेले समीकरण असे , की , झडझडून कसलेही काम करणे ही गोष्टच - मग ते करणारी व्यक्ती लैकिकार्थाने यशस्वी असो की नसो - इन् इटसेल्फ् - एक सन्मानप्रद गोष्ट आहे.

सहमत!

आज इतक्या वर्षांनंतर आता डोक्यात फिट्ट् बसलेले समीकरण असे , की , झडझडून कसलेही काम करणे ही गोष्टच - मग ते करणारी व्यक्ती लैकिकार्थाने यशस्वी असो की नसो - इन् इटसेल्फ् - एक सन्मानप्रद गोष्ट आहे.

सहमत.
पण हल्ली दिसेनाशी झालेली एक दुर्मीळ गोष्ट!

आपला
गुंडोपंत

खरे आहे

खरे आहे..

अगदी वरवर विचार करुन लिहतोय, कदाचित चुकीचे असेल पण मानसिकता, भारतातील उपलब्ध मनुष्यबळ व नजरेसमोर असलेली शिकवण/ आदर्श ह्या तीन गोष्टी??

अवांतर - मी देखील कधीना कधी ह्या घटनाक्रमातुन गेलो आहे. पण शेवटी स्वता मेल्या शिवाय स्वर्ग दिसत नाही उक्तिप्रमाणे मलाच काम करावे लागते. बुटाला पॉलीश केले म्हणजे बुट व पॉलीश यांचा संपर्क घडवुन आणला गेला व काम झाले असे समजले जाते मग नोकराला [कायद्यात मान्य अश्या] शिव्या देउन स्वताच दोन्ही बुटांना समसमान चमकदार केले!!. हे काय् मेज पुसले का? इथे डाग दिसत नाही का? आण ते फडके... भारतातील मालकवर्गात श्रमप्रतिष्ठा जोपासण्यात सफाई कामगारांचा मोठा हात आहे. ;-) कृ. ह. घ्या.

हा ट्रेनिंग

हा ट्रेनिंगचा इश्युअ आहे. आपल्याकडे कोणत्याही टेक्निकल ट्रेनींगची धड सोयच नाही... मग कसे होणार?
आता बुट पॉलिशचे उदाहरण घेतली तरी त्यात. जर रोजगार आहे तर व्यवस्थित एक प्रशिक्षण असायला नको?

त्यात

  • बुट पॉलिश का करावे
  • बुट पॉलिश कसे करावे
  • बुटांचे व त्यावरील पुटांचे प्रकार
  • पॉलिशचे प्रकार
  • सिझन नुसार पॉलिश
  • पॉलिश च्या व्यवसायाचे एकुण स्वरूप
  • व्यवसायाला लागणारे परवाने
  • व्यवसायाला ठेवाव्या लागणार्‍या नोंदी
  • व्यवसाय कसा वाढवाल
  • व्यसायातील चांगल्या व वाईट प्रवृत्ती
  • कस्टमर सर्व्हिस स्किल्स

असे भाग सहज येवू शकतील आठ दिवसांचे एक प्रशिक्षण
किती मोठा बदल घडवून आणेल बरे?
हे गरीब आर्थिक स्तरावरील लोकांसाठी सरकारी खर्चातून होणेही सहज शक्य आहे.
स्टेशन वर बसण्यासाठी हे प्रशिक्षण केलेले असणे महत्वाचे मानले जावे.

आपला
व्यवसाय व तांत्रीक प्रशिक्षणवाला
गुंडोपंत

श्रमप्रतिष्ठा

भारतात तरी श्रमप्रतिष्ठा या शब्दाचा अर्थ "दुस-याच्या श्रमाने मिळणारी स्वतःची प्रतिष्ठा" असा होतो.
आपले काम स्वतः करणे या बाबत काही भारतीय व्यक्तींचा उल्लेख करणे मला उचित वाटते.
त्या व्यक्तींमध्ये मी सर्वात वरचे नाव घेईन ते टाटांचे. फार जुने उदाहरण देत नाही.
रतन टाटा एका विमान प्रवासाहून मुंबईत परत आले होते. विमानतळावर उतरल्यावर त्यांनी आपला ड्रायव्हर आला आहे याची खात्री केली. त्या ड्रायव्हरने जागेवरून हात करून त्यांना मी इथे आहे याची जाणीव करून दिली व आपल्या गाडीकडे गेला. रतन टाटा यांनी स्वतः आपले सामान गोळा केले व गाडीकडे गेले. तोपर्यंत ड्रायव्हरने गाडीची डिकी उघडून ठेवली होती. रतन टाटानीं स्वतः आपले सामान त्यात ठेवले, डिकी बंद केली व गाडीत जाऊन बसले.
समजा या प्रसंगात एखादा मंत्री असता तर काय झाले असते?
नितीन

गॅझेटेड ऑफिसर

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
आमच्या कॉलेजमधे माझे एक सहकारी आणि मी एकाच खोलीत बसत असू.एकदा ते काही लिहित असता कागद खाली पडला. त्यांनी घंटा वाजवली.बर्‍याच वेळाने शिपाई आला. खाली पडलेला कागद त्याने उचलून दिला.
"तुम्ही स्वतः उठून कागद घेतला असता तर एवढ्यात काय ते लिहून पुरे झाले असते." मी म्हणालो.
"छे छे ! गॅझेटेड ऑफिसरचे हे काम नव्हे. कागद शिपायाने उचलायचा."
तर बर्‍याच जणांची मानसिकता अशी असते. खरे तर कोणतेही काम करण्यात कमीपणा वाटू नये.जो शारीरीक कष्ट करतो त्या कामगाराला कधीही कमी लेखू नये. श्रम करण्यात कोणतीही अप्रतिष्ठा नाही. हे मुलांच्या मनावर लहानपणातच बिंबवायला हवे.त्यासाठी कष्टकरी लोकांशी बरोबरीच्या नात्याने वागायला हवे, असे मला वाटते.

साहेब

'सगळीच काम सायबान केली तर मग यान्ला काय काम राह्यल' "ज्याची काम त्यान करावीत" " अहो नुस्ती खोगीत भरती ; काडीच ही काम येत नाही ; संभाळुन घ्याव लागत" "सवलती घ्यायला पुढ आन चार काम सांगितल की लगे अळम् टळम्""काय उपकार करतो का? शासन पैसे देतय महिन्याच्या महिन्याला. बाहेर कुत्र बी इचारनार न्हाय"" आता हायेत मान्स म्हनुन सांगतोय काम नसती तर झक मारत सोताला कराव लागल् असत. घरी कर्तोच कि काम अस्ली " " काय काम असतात हो यान्ला ? नुस्त फुकट बसून पगार घेतात" ही स्पंदन शासकीय कार्यालयात नेहमीच दिसतात.
सायबांच्या पुढून आणि गाढवाच्या मागून कधी बी जाउ नये कवा लाथ बसनं हे सांगता येत नाही. आता यात सायबाचा अवमान आहे की गाढवाचा सन्मान आहे हे मात्र मला अद्याप समजले नाही. हे प्रश्न दोघांनाही पडत नसावेत. पण या मानसिकतेत वाढलेला एखादा बुजर्ग आपल्या नवीन सहकाऱ्याला 'साहेबांनी रेडा एका शेर देतो असे म्हणल्यावर आपण सव्वाशेर दूध देतो असे म्हणावे` हा सल्ला मात्र आवर्जून देतो. लांगुलचालन स्पर्धेत आपला नंबर कसा पुढ आणावा याच मार्गदर्शन इथ मिळत.
'आत्मसन्मान' हा गमावण्याबद्दल शासन तुम्हाला पगार देत.'सर्जनशीलता' कमावण्याबद्दल मात्र 'शिक्षा' मिळते.

प्रकाश घाटपांडे

हं

लेख छान आहे. लिहिलें ते खरं असलं आणि काहि प्रमाणात चूक असलं तरी भारतासारख्या मुबलक मनुष्यबळ असणार्‍या देशात स्वाभाविक वाटतं.
ज्या गोष्टीं करून फारसा मोबदला मिळत नाही, ते फार कमी किंमतीत करायला मुबलक लोकसंख्या आहे आणि तितपत मोबदला देण्याची ऐपत आहे अश्यावेळी स्वतः काम करणं म्हणजेच श्रेष्ठ असं मी मानतं नाही. (तरीही असे केल्यास तो एक चांगला गुण समजावा पण सगळ्यांनीच असे केले पाहिजे हे म्हणणे चूक वाटते)

माझी गाडी साफ करण्या ऐवजी मी इतर महत्वाची कामे उरकत आहे, त्या वेळेत एखादी व्यक्ती योग्य मोबदल्याने गाडी साफ करत आहे तर काय वाईट हो? जर प्रत्येकाने स्वतः कामे स्वतःच करायची ठरवले तर बुटपॉलिशवाले, वेटर, भाजीवाले, फळवाले, फेरीवाले, अनेक रेल्वे कर्मचारी (तिकिटे वगैरे देणारे), इस्त्रीवाले..... (बरीच लिस्ट सुचते आहे ) असे लाखो काय कोट्यावधी लोक बेरोजगार होतील त्यातून उद्भवणार्‍या सामाजिक समस्यांपेक्षा प्युन्स परवडले असे म्हणावेसे वाटले तर्!!??

जाता जाता: परदेशात स्वतःचं काम स्वतः करतील हो.. पण आजीचा चष्मा आणायला कोणीही वर जाणार नाही हे ही लक्षात असु द्या! खरंतर शेजारच्या आजीना चष्मा हवा आहे हेच कोणाच्या लक्षात येणार नाहि

-ऋषिकेश

असहमती

>>>जाता जाता: परदेशात स्वतःचं काम स्वतः करतील हो.. पण आजीचा चष्मा आणायला कोणीही वर जाणार नाही हे ही लक्षात असु द्या! खरंतर शेजारच्या आजीना चष्मा हवा आहे >>हेच कोणाच्या लक्षात येणार नाहि.

ऋषिकेश यांच्या एकूण भूमिकेबद्दल चर्चा होऊ शकते. पण त्यांच्या वरील विधानामधे एक घाऊक प्रमाणातले स्टीरीओटायपिंग् (मराठी शब्द ?) आहे जे धोकादायक आहे. परदेशात "आजीच्या चष्म्या"बद्द्दल - म्हणजे पर्यायाने वयोवृद्ध माणसे आणि त्यांच्या भावनिक आणि इतर गरजा यांच्याबाबतीतली परिस्थिती वरील दोन व्यंगात्मक विधांनानी सत्याच्या जवळ जात नाही. आणि त्यातील व्यंगामुळे या विषयाबद्दलच्या पाश्चात्य देशातील व्यवस्थेबद्दल वाचकांची दिशाभूल होऊ शकते हे येथे नमूद व्हावे.

प्रश्न तो नाही

>> माझी गाडी साफ करण्या ऐवजी मी इतर महत्वाची कामे उरकत आहे, त्या वेळेत एखादी व्यक्ती योग्य मोबदल्याने गाडी साफ करत आहे तर काय वाईट हो?

काहीच वाइट नाही? प्रश्न असा आहे की गाडी स्वतः स्वच्छ न करण्यामागचे कारण काय? हे काम आपल्या योग्यतेचे नाही, हे 'हलके' काम आहे आणि असले काम मी का करू? असे ज्यांना वाटते त्यांच्याविषयी संजोप रावांनी टिप्पणी केली आहे असे वाटते.

पण स्वतःचे काम स्वतः न करण्यामागे भावना कोणतीही असो त्यातून रोजगारनिर्मिती होते हे एक अर्थशास्त्रीय तत्त्व म्हणून मान्य आहे.

सहमत

ज्या गोष्टीं करून फारसा मोबदला मिळत नाही, ते फार कमी किंमतीत करायला मुबलक लोकसंख्या आहे आणि तितपत मोबदला देण्याची ऐपत आहे अश्यावेळी स्वतः काम करणं म्हणजेच श्रेष्ठ असं मी मानतं नाही. (तरीही असे केल्यास तो एक चांगला गुण समजावा पण सगळ्यांनीच असे केले पाहिजे हे म्हणणे चूक वाटते)

माझी गाडी साफ करण्या ऐवजी मी इतर महत्वाची कामे उरकत आहे, त्या वेळेत एखादी व्यक्ती योग्य मोबदल्याने गाडी साफ करत आहे तर काय वाईट हो? जर प्रत्येकाने स्वतः कामे स्वतःच करायची ठरवले तर बुटपॉलिशवाले, वेटर, भाजीवाले, फळवाले, फेरीवाले, अनेक रेल्वे कर्मचारी (तिकिटे वगैरे देणारे), इस्त्रीवाले..... (बरीच लिस्ट सुचते आहे ) असे लाखो काय कोट्यावधी लोक बेरोजगार होतील त्यातून उद्भवणार्‍या सामाजिक समस्यांपेक्षा प्युन्स परवडले असे म्हणावेसे वाटले तर्!!??

सहमत आहे.

पुर्वी मीदेखील स्वतःची कामे स्वतः करावी या म्हणण्याप्रमाणे सगळी कामे स्वतःच करायचे. समाधान भरपूर मिळाले तरी पण मग त्यात भरपूर वेळ जायचा. पुण्यातील एका उद्योगपती दोस्ताशी फोनवर गप्पा मारताना जेव्हा 'मला धुणं धुवायचं आहे.' असं तोंडून बाहेर पडलं, तेव्हा त्याने वेळ व पैसा यांचे नियोजन यावर एक लेक्चर दिलं - ज्यात ऋषिकेशनी मांडलेले मुद्देच मुख्यत्वे सांगितले होते. विचारांती ते विचार मलाही पटले आणि आज मी छान नियोजन करू शकतेय वेळ आणि पैशाचेही.

मोबदल्याबरहुकुम माणसांना वागणूक देण्याची पद्धत बदलू नये, हे मात्र कटाक्षाने पाळले जाते. आमच्या घरी दुपारी चहा केला तर त्यावेळी भांडे धुवायला आलेल्या बाईसाठीही तो केला जायचा, अशा छोट्याछोट्या गोष्टींतूनच हे वळण पडले असावे बहुतेक.

शारीरिक श्रमाला योग्य मोबदला मिळताना दिसत नाही हा खरा कळीचा मुद्दा आहे, ज्याबद्दल आपण काय करू शकतो - असा जर चर्चाविषय असेल तर त्यावरील उपायसूचक प्रतिसाद वाचायला व त्यानुसार मला काही करता येण्यासारखे असल्यास करायला नक्कीच आवडेल.

हम्म

माझी गाडी साफ करण्या ऐवजी मी इतर महत्वाची कामे उरकत आहे, त्या वेळेत एखादी व्यक्ती योग्य मोबदल्याने गाडी साफ करत आहे तर काय वाईट हो?

हम्म. विचार केला पाहिजे...
सन्जोप राव

श्रमप्रतिष्ठा

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.ऋषीकेश लिहितातः:"माझी गाडी साफ करण्या ऐवजी मी इतर महत्वाची कामे उरकत आहे, त्या वेळेत एखादी व्यक्ती योग्य मोबदल्याने गाडी साफ करत आहे तर काय वाईट हो?"
यात काहीच वाईट नाही. हे योग्यच आहे. श्रमप्रतिष्ठा म्हणजे श्रम करणार्‍याची प्रतिष्ठा राखावी. त्या गाडी पुसणार्‍याला तुच्छ मानू नये. प्रत्येकाला आत्मसन्मान असतो .तो मानावा. त्याच्यावर उगीच डाफरू नये. हिडीस फिडीस करू नये. काम व्यवस्थित करून घ्यावे.

सुनीताबाई

सुनीताबाई देशपांडे यांच्या आत्मचरित्रामधे श्रमप्रतिष्ठेबद्दलचे विचार त्यांच्या उत्तम शैली मधे आलेले आहेत. पानापानमधून छोटे छोटे प्रसंग सांगताना, त्या श्रमाबद्दलची स्वतःची मते, त्यांच्या सुविद्य, प्रेमळ, सुसंस्कृत, कर्तबगार, गुणी पतीसकट सर्व आजूबाजूच्या माणसांचा श्रमांबद्दलचा दृष्टिकोन, समाजामधे - आणि समाजाच्या विविध थरांमधे - याबाबत दिसणारे मतप्रवाह यांवरचे सुरेख विवेचन वाचायला मिळते. शेणात फिनेल घालून जमीन सारवणे, प्रसाधनगृहाची स्वच्छता, यांसारख्या गोष्टींपासूनचे सर्व उल्लेख डोळ्यात अंजन घालणारे आहेत. स्वतःच्या श्रमांचा अभिमान आणि श्रमिक वर्गाचा आदर या गोष्टी सांगताना त्या कमालीच्या प्रामाणिक आहेत. ज्याला ज्याला श्रमप्रतिष्ठेचे तत्वज्ञान जगणे म्हणजे काय हे जाणून घ्यायचे असेल त्याला हे पुस्तक वाचण्याखेरीज पर्याय नाही.

कोणते पुस्तक?

तुम्ही 'आहे मनोहर तरी' बद्दल बोलताय की अजुन कुठले आत्मचरीत्रपर पुस्तक आहे त्यांचे??

+१

अगदी, पूर्ण सहमत आहे.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

'आहे मनोहर तरी'

..या बद्दलच लिहीले आहे.

विचार आवडला

पुरवणी: घरातील स्वच्छतागृहे स्वतः साफ करणे हा फार मोठा संस्कार आहे. त्याची फलप्राप्ती सर्वव्यापी आहे.

(खस्ता खाणारा) एकलव्य

स्वच्छतागृहाची सफाई

सरकारी कार्यालयात स्वच्छतागृहांची साफसफाई ही किमान १५ ऑगस्ट, २६ जाने. १ मे वा एखादा व्हीआयपी येणार असेल तर होते.( इतर वेळी आनंदी आनंद असतो) एकदा स्वच्छतागृहातील मुतारी तुंबण्याची प्रक्रिया चालू झाली होती. मी विचार केला कि १ मे चा झेंडावंदना च्या वेळी तरी ती साफ होईल म्हणून काय होते ते बघायचे ठरवले. बघतो तर काय त्या दिवशी पण मुतारी तुंबलेलीच होती. सगळे तसेच . त्या दिवशी अक्षरशः एक काठी व हात घालून मला साफ करावीशी वाटली. मी ती केली. ( नंतर रिन साबणाने हात धुतला)मंथनातून काय निघाले?
१) गुटक्याची पाउचे
२) सिगारेटची थोटके
३) विटकरीचे तुकडे
४) तंबाखूचे विडे
योगायोगाने एकाने कॅमेरा आणला होता. त्यामुळे तो प्रसंग कॅमेरात बंदिस्त केला हा बघा
ShivajiNagar HQ 2
अवांतर- स्वतःचा उदोउदो करण्याची संधी सोडली नाही बुवा अस कुणी तरी कुजबुजलेलं मला ऐकायला आलं
प्रकाश घाटपांडे

वा

आपण खरच आदर्श व्यक्तिमत्व आहात यात शंका नाही.
मला तरी तुमची ही जे करायचे आहे ते केलेच पाहिजे ही व्रूत्ती फार आवडली.

"अवांतर- स्वतःचा उदोउदो करण्याची संधी सोडली नाही बुवा अस कुणी तरी कुजबुजलेलं मला ऐकायला आलं"
ज्यांना अस म्हणायचं असेल त्यांनी आधी तुमच्या पेक्षा जास्त काम केले असले पाहिजे. तरी असे म्हणायचे काही कारण नाहीच.

आपला
गुंडोपंत

 
^ वर