संत तुकाराम गाथा
सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा!
या गुढीपाडव्यापासून एक नवा प्रकल्प सुरु करण्याचा विचार आहे.
संत तुकारामांची गाथा युनिकोड स्वरुपात कोठे उपलब्ध नाही असे वाटते. ती येथे तशी उपलब्ध करून देता येईल का?
अनेक विद्वान मंडळी येथे सदस्य आहेत. तुकारामांची गाथा येथे युनिकोड स्वरुपात दिल्यास त्यातील अभंगांवर चर्चाही करता येईल.
तुकारामांचे विविध आवृत्यांमध्ये साधारण ४८०० च्या आसपास अभंग आहेत. तुकाराम गाथा येथे गाथेची देहू आवृत्ती ऑनलाईन उपलब्ध आहे. परंतु ती युनिकोड स्वरुपात नाही आणि त्यामध्ये शब्दांचे अर्थही दिलेले नाहीत.
या अनुदिनीवर काही अभंग अर्थासहित उपलब्ध आहेत. परंतु त्यांची संख्या खूपच कमी आहे. (या अनुदिनीचे लेखक उपक्रम सदस्य रा. शंतनू ओक हेच आहेत का?)
या प्रकल्पाबाबत उपक्रमींचे मत जाणून घ्यायला आवडेल. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुस्तक स्वरुपात ती बांधता येईल. मात्र सध्या गाथा कोणत्या स्वरुपात असावी, कशी असावी याबाबत आपले विचार येथे मांडावेत.
माझ्याकडे शंकरमहाराज खांदेरकर यांचे श्रीतुकाराममहाराजगाथाभाष्य आहे. त्यामध्ये सर्व अभंगांचे अर्थ दिलेले आहेत. रोज १० अभंग येथे टंकित केल्यास खंदारकर यांच्या अर्थासोबत उपक्रमी सदस्यांचे त्या अभंगांवरील विचारही येथे वाचता येतील.
Comments
वा!
+१
अतिशय उत्तम विचार आहे.
चर्चेची वाट पाहतो आहे
आपला
गुंडोपंत
प्रस्ताव
प्रस्ताव खरंच चांगला आहे. 'लोकमान्य ते महात्मा' या ग्रंथाचे लेखक प्रा सदानंद मोरे हे संतसाहित्याचे अभ्यासक आहेत. तसेच ते तुकारामांचे वंशज आहेत. 'तुकारामांच्या अभंगात प्रक्षिप्त भाग हा आलेला दिसतो. त्यामुळे मूळ अभंग हे शोधणे हे अवघड बनते.' असे ते सांगतात.
प्रकाश घाटपांडे
जरूर
अत्यंत स्तुत्य प्रयत्न.
मदतीस तयार आहे.
+१
जमेल तशी मदत करायला तयार आहे.
वाचायला तर तयारच आहे.
ही काय विकिवर आहे!!
विकिबुक्सवर युनिकोडमध्ये ही आहे की तुकाराम गाथा
अर्थात ती योग्य आहे का नाही याची फेरतपासणी करता येईल आणि अभंगांच्या अर्थांवर विचार/चर्चा करता येईल.
शुभेच्छा!
धन्यवाद
हे तर फारच सोपे काम झाले. गूगल केल्यावर मला हा दुवा सहजासहजी मिळाला नाही. आश्चर्य आहे.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
किऱकोळ चुका
तुकाराम गाथेत किरकोळ चुका आहेत, एखाद्या मूळ प्रतीशी तुलना करून सहज दुरुस्त करता येतील. अर्थमात्र प्रत्येक ओवीनंतर टंकित करावा लागेल.--वाचक्नवी
उत्तम
उत्तम कल्पना. मानसशास्त्र, व्यवस्थापन आणि तत्वज्ञान या तिन्हींचा उत्कृष्ट संगम तुकोबांच्या अभंगांमध्ये बघायला मिळतो. गाथेतील अभंगांचे अर्थ जाणून घ्यायला आणि विवेचन वाचायला नक्कीच आवडेल.
----
"Those are my principles. If you don't like them, I have others." -- Groucho Marx
+१
असेच म्हणतो.
संपूर्ण गाथा अर्थनिरूपणासकट टंकित करणे हा फारच महत्त्वाकांक्षी प्रकल्प होईल. ठराविक ओव्यांबद्दलचे विवेचन/चर्चा या द्वारे विषयप्रवेश करता आला तर आवडेल.
चांगला उपक्रम्
पाडव्यानिमित्त शुभेच्छा! नववर्षांचा हा उपक्रम छानच वाटला. मध्यंतरी विकीबुक्सवर तुकारामाची गाथा वाचायला घेतली. पण त्यातील सर्व संदर्भ कळले नाहीत. काही जर अर्थपूर्ण संदर्भ लक्षात घेउन हे करता आले तर छान होऊ शकेल. शंकरमहाराज खांदेरकर यांचे श्रीतुकाराममहाराजगाथाभाष्य अथवा इतर काही पुस्तकं निदान आत्तातरी येथे जवळ नाहीत त्यामुळे टंकायला मदत होऊ शकणार नाही. नजीकच्या भविष्यात पुणे वारीत तसे पुस्तक घेता येईल!
मस्त!
मस्त उपक्रम छान.. पण व्यावहारिकतेबद्द्ल साशंक आहे. कारण ते पुस्तक प्रत्येकाजवळ नसल्याने एकानेच् टंकन करणं थोड अवाजवी वाटते.
असो. सुरवात करण्याआधीच नन्नाचा पाढा नको ;) काहि मदत करता येणार असेल तर जरूर कळवावे.
उपक्रमास अनेक शुभेच्छा!
-(शुभेच्छुक) ऋषिकेश
उपक्रमाला शुभेच्छा !!!
आमच्या लाडक्या तुक्याचे अभंगाचे अर्थ इथे वाचायला मिळत असतील तर खूपच आनंद होईल.
आपल्या या उपक्रमास आमच्या मनपुर्वक शुभेच्छा !!!
आम्ही दिलीप चित्र्यांचे 'पुन्हा तुकाराम' या पुस्तकातील अभंग आणि अभंगाचा अर्थ इथे टंकू .अर्थात कॉपी राइट वगैरे.... याचाही विचार करावा लागेल ? :(
पुन्हा तुकाराम
वा वा बिरुटे सर. मी नेमाड्यांचे 'तुकाराम' संपवून चित्र्यांचे 'पुन्हा तुकाराम' नुकतेच वाचायला घेतले आहे. पुस्तके चांगली आहेत. नेमाड्यांनी दिलेले तुकारामांचे संक्षिप्त चरित्र तर फारच सुंदर आहे. तुम्ही 'पुन्हा तुकाराम'बद्दल अवश्य लिहावे असे वाटते.
दोन्ही पुस्तकांमधील थोडासा भाग किंचित द्वेषमूलक वाटतो. मात्र त्यामागची कारणे समजली नाहीत. :(
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
युनिकोड का?
नुसतेच वाचायचेच असतील तर युनिकोडित कशाला पाहिजे? कुठलेही कोडित असले तरी वाचता येईलच, फारफारतर तो फॉन्ट उतरवून घ्यावा लागेल.
तुकारामाच्या गाथेचे 'डिजिटलिझेशन'चे काम जोरात चालू होते, आता संपत आले असेल. पुण्यात सकाळ-नगरमध्ये कार्यालय असलेल्या 'मल्टिव्हर्सिटी'तली विजय भटकर, प्रमोद तलगेरी, वसंतराव गाडगीळ वगैरे मंडळी ह्या कामात गुंतलेली आहेत. काही नव्याने करण्यापूर्वी तिकडे चौकशी केलेली बरी. उगीच निष्कारण मेहनत नको. --वाचक्नवी
महत्त्वाचा मुद्दा
अशी डिजिटाईझ्ड गाथा आयती उपलब्ध असेल तर मग मेहनत नक्कीच वाया जाईल. :(
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
निवडक अभंग
गाथेतील बहुतेक अभंग सोपे असले तरी बर्याच शब्दांचा अर्थ व ओव्यांचे संदर्भ लागत नाही. ते निवडक अभंग घेऊन येथे चर्चा करणे अधिक सोयीचे व कमी मेहनतीचे होईल.
उदा.
४
राजस सुकुमार मदनाचा पुतळा । रविशशिकळा लोपलिया ॥१॥
कस्तुरीमळवट चंदनाची उटी । रुळे माळ कंठीं वैजयंती ॥२॥
मुगुट कुंडले श्रीमुख शोभलें । सुखाचें ओतलें सकळ ही ॥३॥
कासे सोनसळा पांघरे पाटोळा । घननीळ सांवळा बाइयानो ॥४॥
सकळ ही तुह्मी व्हा गे एकीसवा । तुका ह्मणे जीवा धीर नाहीं॥५॥
सावळा सुंदर देव, सुकोमल आणि जणू मदनाचा पुतळा आहे. त्याच्या तेजात सूर्यचंद्राचे तेज लोपले आहे. कपाळावर कस्तुरीचा मळवट, अंगाला चंदनाची उटी व गळ्यात वैजयंती माळ शोभते. मुकुट कुंडलांनी श्रीमुख शोभले असून जणू हे देवाचे रूप सुखाचेच ओतलेले आहे. ज्याच्या कंबरेला भरजरी पीतांबर आहे व ज्याने भरजरी शेला पांघरला आहे. हे बायांनो, असा तो मेघाप्रमाणे निळा सावळा देव पाहण्यासाठी आता मला धीर धरवत नाही, तुम्ही सर्वजणी बाजूला व्हा!
यामध्ये पाटोळा या शब्दाचा अर्थ काय आहे?
गरुडाचें वारिकें कासे पीतांबर । सांवळें मनोहर कैं देखेन ॥१॥
बरवया बरवंटा घनमेघ सांवळा । वैजयंतीमाळा गळां शोभे ॥२॥
मुगुट माथां कोटि सूर्यांचा झळाळ । कौस्तुभ निर्मळ शोभे कंठीं ॥३॥
ओतींव श्रीमुख सुखाचें सकळ । वामांगीं वेल्हाळ रखुमादेवी ॥४॥
उद्धव अक्रूर उभे दोहींकडे । वणिऩती पवाडे सनकादिक ॥५॥
तुका ह्मणे नव्हे आणिकांसारिखा । तो चि माझा सखा पांडुरंग ॥६॥
गरुडावर बसलेले व ज्याच्या कंबरेस पीतांबर शोभत आहे असे सावळे सुंदर रूप मी डोळ्याने केव्हा पाहीन? उत्तमातील उत्तम, सजल मेघाप्रमाणे सावळे आणि ज्याच्या कंठात वैजयंतीमाळ शोभत आहे, आणि ज्याच्या मस्तकावर कोटी सूर्यांप्रमाणे तेजस्वी मुकुट व कंठात निर्मळ कौस्तुभमणी शोभत आहे. सर्वसुख जणू ओतून तयार झालेले ज्याचे श्रीमुख असून डाव्या भागास सुंदर अशी रूक्मिणी देवी उभी आहे. उद्धव आणि अक्रूर हे दोघे दोहीकडे उभे असून ज्याच्यापुढे गुणवर्णन करत आहेत. जो इतरांसारखा सामान्य नाही तो पांडुरंगच माझा आवडता देव आहे.
अक्रूर म्हणजे कोण? उद्धव हे विष्णूचेच एक नाव आहे असे वाटते. आणि पांडुरंग म्हणजे कृष्णाचे एक रूप. कृष्ण हा विष्णूचा अवतार. म्हणजे उद्धव = पांडुरंग असा संदर्भ लावू शकतो का? की येथे अभिप्रेत असलेला उद्धव वेगळाच आहे?
अक्रूर आणि उद्धव
अक्रूर हा यादवांचा एक प्रमुख असून बहुधा कंसाच्या चाकरीत होता. कंसाने कपटाने श्रीकृष्णाला मुष्टीयुद्धाचे आमंत्रण दिले तेव्हा त्याने अक्रूराला ते आमंत्रण देण्यास धाडले. अक्रूराला कंसाचे कपट माहिती असले तरी साक्षात् श्रीकृष्णाला भेटण्याचा स्वार्थ त्याला पूर्ण करता येणार होता म्हणून त्याने श्रीकृष्णाकडे वृंदावनात जाऊन त्याला कंसाच्या कपटाची पूर्वकल्पना दिली. अक्रूर हा श्रीकृष्णाचा परमभक्त मानला जातो.
उद्धव हा श्रीकृष्णाचा नातेवाईक होता असे वाटते. चू. भू.दे.घे. मित्र नक्की होता आणि प्रिय भक्त होता. त्याबद्दल अधिक माहिती येथे आहेच. तेव्हा टंकण्याचा कंटाळा करते.
दोन भावगीते
ही दोन नावे मराठी भावगीतांत आली आहे. १. अक्रूराऽऽ नेऊ नको मथुरेला. २. उद्धवा सांतवन कर जा त्या गोकुळवासिजनांचे.
प्रियालींच्या दुव्यात बरीच माहिती आहेच, पण इथे अधिक..उद्धव हा देवभाग नावाच्या यादवाचा पुत्र. आईचे नाव कंसा. ह्याला चित्रकेतु आणि बृहद्वल नावाचे दोन वडील भाऊ होते. याने बृहस्पतीकडून नीतिशास्त्राचे ज्ञान मिळवले होते. यादवसमाजात याला फार मान होता. हा कृष्णाचा चांगला मित्र. अगदी जवळचा नातेवाईक नसावा. याच्याबरोबर कृष्णाने एकदा नंद, यशोदा आणि गोप-गोपींसाठी सांत्वनाचा संदेश पाठवला होता. (म्हणून ते भावगीत!) याने लिहिलेल्या उद्धवगीता किंवा अवधूतगीता याबद्दल दुव्यात माहिती आहेच. हा उद्धव द्रौपदीस्वयंवराला हजर होता. याच्या आयुष्यातले शेवटचे दिवस बदरिकाश्रमात गेले. --वाचक्नवी
उद्धवा अजब तुझे सरकार
उद्धवा, अजब तुझे सरकार
लहरी राजा, प्रजा आंधळी, अधांतरी दरबार
या गाण्यामध्ये अभिप्रेत असलेला उद्धव हा नक्कीच मथुरावासीय नाही. तो वैकुंठवासीय आहे असे वाटते.
आम्हाला 'उद्धवा सांतवन कर जा' ही कविता अभ्यासक्रमात होती. मात्र ती 'उद्धवा शांतवन कर जा' अशी बालभारतीकृत पुस्तकात छापली होती. ही मुद्रणातील चूक की दोन्ही समान अर्थाचेच शब्द आहेत?
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
शांतवन आणि सांत्वन
शांतवन, सांतवन आणि सांत्वन एकाच अर्थाचे तीन शब्द. भावगीतातात शांतवन असावा.--वाचक्नवी
चुलत भाऊ?
वसुदेवाला देवभाग आणि आणि देवश्रवा नावाचे दोन भाऊ होते. उग्रसेनाच्या अनुक्रमे कंसा आणि कंसवती यांची लग्ने या दोन भावांशी झाली होती. यातल्या देवभागाचा पुत्र म्हणजे उद्धव. म्हणजे हा कृष्णाचा चुलत भाऊ होईल. --वाचक्नवी
भीमसेन
राजस सुकुमार मदनाचा पुतळा .. हे अभंग भीमसेनांनी खूपच सुरेख म्हटले आहेत, बहुतेकांनी ऐकले असतीलच, पण नुकतेच परत ऐकताना अधिकच आवडले.
हे प्रश्न चांगले आहेत आणि चर्चा चांगली होऊ शकते..
पाटोळा म्हणजे काय माहिती नाही - बहुतेक वस्त्राचा प्रकार असावा. नामसाधर्म्याचा विचार केल्यास पटोला साडी माहिती होती :-)
अधिक माहितीसाठी -हा दुवा पहा..
पाटोळा
पाटोला, पाटोळा, पाटोळी या तिन्ही शब्दांचा अर्थ रेशमी वस्त्र. हे म्हणजे पटोळा साडी नव्हे. पटोळा साडी गुजराथची. त्यात तीन प्रकार, पाटण सुरत आणि खंबायत. पण मुख्य केन्द्र पाटण.--वाचक्नवी
धन्यवाद
अर्थ दिल्याबद्दल फार आभारी आहे.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
इंग्रजी भाषांतर -
मिसळपाव डॉट कॉम वरील एक सन्माननीय सभासद आणि माझे स्नेही श्री अशोक गोडबोले यांनी नुकतेच तुकारामाच्या गाथेचे इंग्रजी भाषांतर करावयास घेतले आहे, ही अवांतर माहिती या निमित्ताने येथे द्याविशी वाटते . गोडबोले सरांचा संतसाहित्य, तसेच संस्कृत, हिंदी, इंग्रजी या भाषांवर असामान्य प्रभूत्व आहे. त्यांच्याबद्दल थोडक्यात येथे वाचता येईल..
असो..
तात्या.
न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!
छान
अशोकरावांना हार्दिक शुभेच्छा. दिलीप चित्र्यांच्या 'सेज तुका' या पुस्तकात काही अभंगांचे केलेले इंग्रजी भाषांतर आहे.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
निवडक अभंग
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
"संपूर्ण गाथा अर्थनिरूपणासकट टंकित करणे हा फारच महत्त्वाकांक्षी प्रकल्प होईल. ठराविक ओव्यांबद्दलचे विवेचन/चर्चा या द्वारे विषयप्रवेश करता आला तर आवडेल. "
या श्री. मुक्तसुनीत यांच्या प्रतिसादाशी मी सहमत आहे. त्यांची सूचना व्यवहार्य आहे. गाथेतील निवडक अभंगच घ्यावेत.
मग या उपक्रमात मजा नाही.
श्री यनावाला लिहितात की गाथेतील निवडक अभंग घ्यावेत त्यांच्या प्रतिसादाशी आम्ही सहमत नाही.
सुरुवातीच्या अभंगापासुन ते शेवटच्या अभंगापर्यंत निरुपण व्हावे असे वाटते.
पुस्तके
कुणी
तुकारामांवर/संबंधीत/भाषांतरीत/विवेचित असलेल्या
पुस्तकांची यादी देवू शकेल काय?
मग कोणती पुस्तके कुणाकडे आहेत यावरून कुणी काय टंकायचे याचे विभाजन करता येईल.
-निनाद
कालावधी
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
"श्री यनावाला लिहितात की गाथेतील निवडक अभंग घ्यावेत त्यांच्या प्रतिसादाशी आम्ही सहमत नाही.
सुरुवातीच्या अभंगापासून ते शेवटच्या अभंगापर्यंत निरुपण व्हावे असे वाटते. "
...........प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
............
अवश्य.पण कालावधीचा विचार व्हावा. महाराष्ट्र शासनाने प्रसिद्ध केलेल्या (१९५०) अधिकृत गाथेत (संपादकः पु.मं. लाड) ४६०० अभंग आहेत.तुकारामतात्या पडवळ यांच्या समग्र तुकाराम गाथेत ८४०० अभंग आहेत. दोन्ही गाथा उपलब्ध आहेत.
अर्थ,विवरण, प्रतिसाद यांसह इथे प्रतिसप्ताह अधिकतम पाच अभंग होऊ शकतील.म्हणजे ४६०० अभंगांना १६+ वर्षें लागतील.त्यामुळे काही अवघड अभंग(ज्यांचे अर्थ मला समजत नाहीत असे.) राहून जातील असे वाटते. उदा:
कैसे येथे कैसे तेथे|शहाणे ते जाणती |
यज्ञमुखे खोडी काढी |कोण गोडी बोरांची|
तुका म्हणे भावाविण |अथवा सीण केला होय ||
.......(ताकट=ओखट ,घामट असा अर्थ परिशिष्टात दिला आहे.)
यास्तव निवडक अभंग घ्यावे असे म्हटले एवढेच.
सहमत
+१
यनावालांशी सहमत आहे.
मोजके ४ अभंग घ्यावेत असेच मलाही वाटते..
याशिवाय फारसा प्रचलित माहिती मध्ये नसलेला १ घ्यावा.
यामुळे रंगत येईल.
आपला
गुंडोपंत
ताकट
मला वाटते ताकट म्हणजे ताक घुसळताना हाताला किंवा अंगाला लोणी लागल्यामुळे झालेले ओशट(अंग). इथे ओखट चालेल पण घामट? हिंदीत ताकणे म्हणजे टक लावून पाहणे. इथे तो अर्थ चालेल का? तरीसुद्धा या अभंगाचा अर्थ लावणे अवघड आहे हे नक्की.--वाचक्नवी
शाहाणपणे वेद मुका
माझ्याकडे असलेल्या गाथेमध्ये दिलेला अर्थ असा:-
वेद सर्वांत शहाणा असूनही हरीचे वर्णन करण्याविषयी मुका झाला, पण त्या गोपिका ताक पिणार्या अडाणी असूनही त्यांना हरीचे सुख प्राप्त झाले.
येथे असे का? तेथे तसे का? यातील भेद शहाणे संतच जाणतात.
कोणी यज्ञाद्वारा देवाला संतुष्ट करायला पाहतो तर तो देव त्या यज्ञात कोणतीतरी खोडी काढतो. आणि अवदानांचा स्वीकार करीत नाही. पण त्या भिल्लिणीची उष्टी बोरे त्याला किती तरी गोड लागली. भक्तीप्रेमावाचून कोणतीही क्रिया केली, तरी ती देवाला आवडत नसल्यामुळे तसे केल्यास फक्त श्रम केल्यासारखे होते.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
धन्यवाद! धन्यवाद!!
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.आ'कर्ण यांनी लिहिलेला अर्थ एकदम पटला. मी या अभंगावर कितीतरी विचार केला पण काही सुचले नाही. "कोण गोडी बोरांची|" म्हणजे शबरीची बोरे होय? आता समजले. पण कळणार तरी कसे? च्छे ! हा विषय आपल्या आवाक्यातला नाही. तुकोबाची मेख म्हणतात ती हीच! श्री. आ'कर्ण यांचे मनःपूर्वक आभार. आणखी असे अभंग आहेतच.
आणखी एक अभंग
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
आवडी आवडी कळिवराकळिवरी|वरिली अंतरी ताळी पडे||२||
अपूर्व दर्शन मातेपुत्रा भेटी |रडूं मागे तुटी हर्षयोगे ||३||
तुका म्हणे एकें कळतें दुसरे |बरियाचें बरें आहाचाचे आहाच ||४||
...........
या अभंगाचासुद्धा काही अर्थ लागत नाही.
(आहाच= वरवरचे. असा अर्थ दिला आहे.)
आहे ऐसा देव
या अभंगांचे शब्द माझ्याकडे किंचित वेगळे आहेत! तुम्ही बहुधा साखरेमहाराजांची गाथा पाहत आहात.
आहे ऐसा देव वदवावी वाणी | नाही ऐसा मनी अनुभवावा ||
आवडी आवडी कलेवरा कलेवरी | वरिले अंतरी ताळा पडे||
अपूर्व दर्शन माते पुत्रा भेटी | रडे मागे तुटी हर्षयोगे ||
तुका म्हणे एके कळते दुसरे | बरीयाने बरे आहाचे आहाच||
देव असा (सत्य-ज्ञान-अनंत) आहे; असा (जगासारखा नामरूपविशिष्ट) नाही. असे वाणीने बोलावे आणि मनानेदेखील तसाच अनुभव घ्यावा.
प्रत्येक देहातील जीवांची आवड भिन्न भिन्न असते, हे खरे असले तरी सुद्धा जशी बाहेरुन एखाद्या व्यक्तीविषयी किंवा वस्तूविषयी आवड असते, तशी ती अंतरात असेल तर मेळ बसतो, अन्यथा तो दंभ होतो.
पुष्कळ दिवसांनी मायलेकरांची भेट झाली तर ते एक अपूर्व दर्शन असते. कारण, मायलेकरांची ताटातूट झाली तर ते दोघे रडतात; व पुन्हा भेट झाली तर ते आनंदित होतात.
एकावरून दुसर्याचे स्वरूप कळते; वरच्या चांगल्या आचरणावरून अंतरातील चांगले व वरच्या खोट्या आचरणावरून अंतरातील खोटे कळून येते.
सारांश, जसे देवासंबंधी बोलावे तसाच त्याचा अनुभवही घ्यावा म्हणजे मेळ बसतो.
सुरुवातीला पहिल्या ओळीचा अर्थ फारच ओढूनताढून लावल्यासारखा वाटतो. देव जसा आपण वाणीने वर्णन करू शकतो तसा वर्णन करावा व जे आपण वर्णू शकत नाही ते मनाने अनुभवावे असे वाटले होते. पण पुढील ओळी पाहिल्यावर मात्र अर्थ पटतो.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
आहे ऐसा देव...
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
**********************************
मजजवळ साखरे महाराजांची गाथा नाही. महाराष्ट्र शासनाची ,(सं. पु.मं. लाड ) गाथा आहे ती सार्थ नाही. शंकरमहाराज खंदारकर यांनी दिलेला अर्थ काही तसा पटला नाही.तरी आता सुसंगत अर्थ लावता येईल असे वाटते.
खप्रे डॉट इन
खप्रे डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध असलेली गाथा जालावरील अधिक्रूत प्रत मानता येईल.
http://tinyurl.com/4xk8ww
इंटरनेट एक्स्प्लोअर मध्ये कोणताही मजकूर कॉपी करता येणार नाही अशी तजवीज खाप्रे साहेबांनी केली असली तरी फायरफॉक्स मधील व्ह्यू - सोर्स या उपायांचा फायदा घेऊन खालील अभंग कॉपी केला. तो मूळ टंकलेखकाची क्षमा मागून येथे देत आहे.
सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती । रखुमाईच्या पती सोयरिया ॥१॥
गोड तुझें रूप गोड तुझें नाम । देईं मज प्रेम सर्व काळ ॥ध्रु.॥
विठो माउलिये हा चि वर देईं । संचरोनि राहीं हृदयामाजी ॥२॥
तुका म्हणे कांहीं न मागे आणीक । तुझे पायीं सुख सर्व आहे ॥३॥
गुगलमध्ये शोधताना संकेतस्थळाचे नाव जोडावे, हे असे.
सदा माझे डोळे site:www.khapre.in
त्यात आलेल्या पहिल्या निकालाच्या खाली दिसणार्या "Cached" शब्दावर टिचकी द्या. गुगलच्या पानावर पोहोचल्यावर व्ह्यू सोर्स या पर्यायाची निवड करा. आता बहुधा आपल्याला हवा तो अभंग कॉपी करता येईल.