अनुराधा नक्षत्र

Almost every man or woman whose Moon AND Venus are in Anuradha (Delta Scorpi) will have a girl or boy friend (of opposite sex) other than his/her spouse..............

इतकं उत्कंठावर्धक वर्णन दुसर्‍या कोणत्या नक्षत्राचे केले गेले नसेल.

अनुराधाला पाश्च्यात ज्योतिषात Delta Scorpi असे नाव आहे.

याचे स्थान राशीचक्रात २१३-२० ते २२६-४० अंशांपर्यंत आहे. या नक्षत्राचे चारही चरण हे वृश्चिक राशीत येत असल्यामुळे हे चतुष्पाद नक्षत्र आहे.

या नक्षत्राची नाडी मध्य असून योनी मृग आहे. हे देवगणी नक्षत्र असून याचा आराध्यवृक्ष नागकेशर मानला गेला आहे. हे पृथ्वीतत्वाचे नक्षत्र आहे.

हे राशीचक्रातील १७ वे नक्षत्र आहे. या नक्षत्रात चार तारे असून ते भाताच्या ढिगासारखे दिसतात.

या नक्षत्रावर जन्मणार्‍या व्यक्ती कला कौशल्याची आवड असणार्‍या, नाट्य, संगीत, नृत्य इत्यादि गोष्टीत रस असणार्‍या असतात. त्याचप्रमाणे त्यांना खाण्यापिण्याची खूप आवड असते आणि थोड्या बाहेरख्याली वृत्तीच्या असतात.

गाड्या, उंची कपडे, दागदागिने, अत्तरे याचे हे लोक शौकीन असतात. स्त्रियांना मेकअप, बांगड्या, कानातले, ड्रेसेस, पार्ट्या ह्यात फार रस असतो. चित्रकला, रांगोळी, शिवणकाम, कशिदा वगैरे गोष्टींची त्यांना मनापासून आवड असते.

तसे हे लोक प्रामाणिक आणि विश्वासू असतात. त्याचप्रमाणे निश्चयी असतात. पण भावनाप्रधान आणि विकारवश असतात. हे नक्षत्र कामातूर आहे. पुराणात हे नक्षत्र नायकिणींचे मानले गेले आहे.

या नक्षत्रात मंगळ शुक्र युती असता, विषयवासना जबरदस्त असते. मोहाला बळी पडून हे लोक नको तिथे भरकटत जातात.

या नक्षत्रावर जन्मणा‍र्‍या पुरूषांचा बांधा आडवा, धडधाकट असतो. चेहरा गोल आणि हसरा असतो. शारिरीक शक्ती आणि रोगप्रतिकारक शक्ती चांगली असते. मात्र पुरुषांना लागणारे गुण धाडसीपणा, खंबीरपणा, अधिकारलालसा, शौर्य, पराक्रम ह्यांचा अभाव असतो. हे शरीराने पहिलवान पण मनाने पुचाट असतात. बुध्दी आणि हुषारी सामान्य असते. हे नक्षत्र बिघडल्यास अनेक अशुभ गोष्टी बघायला मिळतात. उदा. अतिमद्यपान, बाहेरख्यालीपणा वगैरे वगैरे.

स्त्रियांना हे नक्षत्र वरदान आहे. सौंदर्य, रूप, धन, बुध्दी, कला ह्या सर्व दृष्टीने चांगले आहे. ह्या स्त्रियांचे सौंदर्य हे सात्विक नसून मादक असते. त्यांच्या एका कटाक्षाने अनेक पुरूष घायाळ होऊन त्यांच्या पायाचे दास बनलेले दिसतात.

असे म्हणतात की, पुनर्वसू नक्षत्राची स्त्री ही वेलीवरच्या कळीसारखी असते, हस्ताची स्त्री ही वेलीवरच्या नुकत्याच उमलत असलेल्या फुलासारखी, रोहिणीची स्त्री ही उमललेल्या टपोर्‍या गुलाबासारखी, तर अनुराधा नक्षत्राची स्त्री ही झाडावर लागलेल्या रसरशीत आंब्यासारखी असते.

ह्या नक्षत्राच्या स्त्रियांचे डोळे फार सुंदर असतात. रोहिणीचे नक्षत्राच्या स्त्री चे सौंदर्य तिच्या गुबगुबीत अवयवांत आहे, मृग नक्षत्राच्या स्त्री चे तिच्या हालचालीत आहे, हस्त नक्षत्राच्या स्त्री चे तिच्या लाजण्यात आहे, चित्रा नक्षत्राच्या स्त्री चे तिच्या फणकार्‍यात आहे, तर अनुराधा नक्षत्राच्या स्त्री चे सौंदर्य तिच्या मादक डोळ्यांत आहे. त्यांच्या डोळ्यात अशी जादू असते की त्यांच्या नजरेला नजर भिडली की पुरूषाचे हृदय हरवलेच.

"यौवनाचे रंग सारे पाहिले, पापण्यांचे मी इशारे पाहिले.....
मुग्ध झाल्या सर्व भाषा ज्या क्षणी, लोचनांनी बोलणारे पाहिले".....

तशा अनुराधा नक्षत्राच्या स्त्रिया लोचनांनी बरेच काही बोलतात.

त्यांच्यात टापटीप, नीटनेटकेपणा, व्यवस्थितपणा असतो. त्या चतुर, बुध्दिवान, आणि कर्तव्यदक्ष असतात.

या नक्षत्रावर होणारे रोग फारसे कडक किंवा दाहक नसतात. बर्‍याचवेळा हे रोग त्या व्यक्तिच्या वागण्यामुळे आणि व्यसनाधीनतेमुळे उदभवणारे असतात. हे नक्षत्र अतिशय कामासक्त असल्याने पापग्रहाने बिघडल्यास, गुप्तरोगांची फार भीति असते.

तसेच लघवीचे विकार, किडनीचे विकार, मुतखडा, गळ्याचे आणि घशाचे विकार, वातविकार, मानसिक नैराश्य, स्त्रियांना पाळीचे आणि गर्भाशयाचे विकार होऊ शकतात.

देवगणी असल्याने अनेक शुभ गोष्टींसाठी हे नक्षत्र चालते. विवाह, बारसे, प्रयाण, नवीन वस्त्रधारण, कला शिकण्यास प्रारंभ, फुलझाडे, फळझाडे लावणे वगैरे अनेक गोष्टींना हे चांगले आहे. त्याचप्रमाणे स्त्रियांशी प्रेमगोष्टी करण्यास, प्रेम जुळवण्यास हे चांगले आहे. (संबंधितांच्या सोयीसाठी हे नमूद केले आहे.)

आपला,
(नाक्षत्रपंडित) धोंडोपंत

लेखनविषय: दुवे:

Comments

तात्या

तात्या,

तू या नक्षत्राचे जे वर्णन केलेस ते लाजवाब आहे. या नक्षत्राला भेटायला आम्हाला आवडेल.

आपला,
(सौंदर्यलक्षी) धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

असेच...

लेख जबरी जमला आहे. खुप छान !

जरा अगाऊपणा करतो आहे , पण... अश्याच पुढील २६ लेखांची वाट पाहतो.
तो पर्यंत कुणाचे नक्षत्र कशे शोधावे ते ही सांगा की राव ! कुंडलीत जन्म नक्षत्र असतं तेच का हे?

नीलकांत

वा वा

धोन्डोपन्त, तुमचे आभार कसे मानावे ते कळत नाही!!!!!
तुम्ही ज्योतिशी आहात काय?

नीलकांत, पांडूशेठ हवालदार

नीलकांत, पांडूशेठ हवालदार,

आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. असेच रंगतदार आणि माहितीपूर्ण लेख उपक्रमावर आपणास वाचावयास मिळतील याची खात्री बाळगावी.

आपला,
(आश्वासक) धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

पंत

पंत,

चांगली माहिती देत आहात. अशीच चालू ठेवा.

उपक्रमावरील तुमच्या उपक्रमाला शुभेच्छा.

बापू

तुम्ही वर्णन केल्याप्रमाणे आकर्षक, घारी गोरी नक्षत्र कोकणात प्रत्येक गावात असतीलचं.

हलकेच घ्या.

बापू

हाहाहा

बापू,

खरे आहे. घारीगोरी नक्षत्रे कोकणातच. त्यातही रत्नांग्रीच्या मधल्या अळीत.

धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

 
^ वर