प्रकल्प : मराठी मुक्त शुद्धलेखन चिकित्सा


मराठी मुक्त शुद्धलेखन चिकित्सा

दुवा : सद्ध्या अस्तित्वात नाही

१) मागणी
जाळ्यावर मराठीकरता मुक्त शुद्धलेखन चिकित्सेची सोय उपलब्ध करून देणे.

२) विचारसरणी
प्रत्य्क्षात केलेली मागणी पुरवताना ती विकासकाला त्याच्या सुविधेत जोडताना अतिरिक्त श्रम कारावे लागू नयेत. किमान आयई/फायरफॉक्स वर ही सुविधा विनासायास वापरता यावी. दस्तऐवज उत्तमरित्या तयार करावा जेणेकरून आज्ञावली समजण्यासाठी आणि नवे बदल करण्यासाठी त्रास होऊ नये. ड्रुपल वर जोडता येण्यासारखी सुविधा असावी. शब्दभांडाराला जोडणी शक्य व्हावी. नव्या शब्दांची भर पडत रहावी.

३) आखणी
तंत्र : जावास्क्रिप्ट, एचटीएमएल, मायएसक्यूएल, पीएचपी, अजॅक्स,ड्रुपल, अपाचे इ.
वेळ, पैसा, मनुष्यबळ यांची आखणी कारवयाची आहे.हा टप्पा प्रतिसादांच्या रूपात प्रतिक्षेत आहे.

४) बांधणी
मूळ गाभा तयार आहे. ( पीएचपी)
इतर सुविधांबरोबर जोडणे हे महत्त्वाचे काम चालू करावयाचे आहे ( उदा. शब्दभांडार, लेखनपाट्या, नव्या शब्दांची भर घालण्याकरता सोय इ.)

५) चाचणी
हा टप्पा प्रतिसादांच्या रूपात प्रतिक्षेत आहे.

६) श्रेणी
हा टप्पा प्रतिसादांच्या रूपात प्रतिक्षेत आहे.

७) मोजणी
हा टप्पा प्रतिसादांच्या रूपात प्रतिक्षेत आहे.

८) जोडणी
इतर सुविधांबरोबर जोडणे हे महत्त्वाचे काम चालू करावयाचे आहे ( उदा. शब्दभांडार, लेखनपाट्या, नव्या शब्दांची भर घालण्याकरता सोय इ.) हा टप्पा प्रतिसादांच्या रूपात प्रतिक्षेत आहे.

९) परतावा
हा टप्पा प्रतिसादांच्या रूपात प्रतिक्षेत आहे.

ही सुविधा मोफत द्यावयाची असून याचा स्रोत मुक्त असेल.

लेखनविषय: दुवे:

Comments

आखणी : प्लगीन

आपले म्हणणे पटते.फायरफॉक्स प्लगीन बाबत माहितीसाठी शोधाशोध करता येईल, आयईसाठी प्लगीन लिहिण्यासंबंधी काही तांत्रिक माहिती उपलब्ध आहे काय? टेक्स्ट फाईल वापरून शब्दशोध कसा घेता येईल याबद्दल काही माहिती मिळेल का?
माझी सद्ध्याची सुविधा सर्वरवर चालते (पीएचपी) आणि मायएसक्यूएल चे विदागार वापरते. आपण म्हणता त्याप्रमाणे टंकलेखन करून झाल्यावरच अशी सुविधा वापरता येईल. त्याचप्रमाणे अशी सुविधा टंकपाट्यांबरोबर जोडणे हे देखील एक आव्हान आहे.
त्या अनुषंगाने विचार करता क्लायंटसाईड सुविधा निर्माण करणे हा चांगला पर्याय आहे. साठवणक्षमता ही ह्याबाबत मुख्य अडचण ठरू शकेल असा माझा प्राथमिक अंदाज आहे. प्लगीन मध्ये जवळपास ५०,००० शब्दांचा तरी साठा ठेवावा लागेल. तो अद्ययावत ठेवण्यासाठी साप्ताहिक अथवा पाक्षिक पद्धतीने नवे शब्दसंच उतरवून घेण्याचीही सोय उपलब्ध करून द्यावी लागेल.
दोन्ही करता आल्यास कसे?

पडताळणी

फाफॉ १+ बरोबर स्पेलबाऊंड चालतो.
फाफॉ २+ मध्ये शुद्धलेखन चिकित्सा अंतर्भूत आहे. यात स्पेलबाऊंड चालत नाही. याकरता केवळ मराठी शब्दकोश बनवण्याची गरज आहे.
आयई करता संपादनयोग्य प्लगीनची शोधाशोध करतो आहे.
फाफॉ आणि आयई दोन्ही करता सर्वरवर चालणारी मुक्त स्रोत, संपादन करता येण्याजोगी सुविधा शोधतो आहे.

फाफॉ २+ मध्ये शुद्धलेखन चिकित्सा

फाफॉ २+ मध्ये शुद्धलेखन चिकित्सा कशी करता येते ते या चित्रावरून स्पष्ट होईल.

क्लाएंट साइड उत्तर शोधावे

सर्व्हर साइड मार्ग शोधण्यापेक्षा क्लाएंट साइड उत्तर शोधावे अशी मी विनंती करीत आहे. इंटरनेट जोडणी महाराष्ट्रातील कित्येक ठिकाणी शक्य नाही. (वीज, जालजोडणी व इतर अनेक कारणांमुळे) इंटरनेट जोडणीशिवाय चालणारा मुक्त सरोत शब्द शूची मराठी भाषेच्या प्रगतीसाठी अत्यावश्यक आहे.
मनोगतच्या संपादकांना मी या संदर्भात केलेले अनाहूत आवाहन येथे वाचायला मिळेल.

आयई?

आयई वर क्लायंटसाईड सोय कशी करणार? विन्डोज बेस्ड ३२ बिट आज्ञायन करून हे उद्योग करावे लागतील. सद्ध्या हे काम फार वेळखाऊ आहे. सर्वरसाईड स्वतंत्रपणे काम करणारी शुद्धलेखन चिकित्सा बनवता येणे शक्य आहे. क्लायंटसाईड स्वतंत्रपणे काम करणारी सुविधा बनवण्यासाठी काही विचार केला आहे का? सुचवण्या मिळाल्या तर विचार करणे शक्य होईल. अस्तित्वात असलेली काही उदाहरणे मिळाली तरी कामाची रूपरेषा ठरवता येईल.

ओपन ऑफिस व सध्याची शब्दसूची

ओपन ऑफिस मध्ये सध्याची शब्दसूची कशी वापरायची ते येथे वाचता येईल. मी ही सूची एका सीडी वर उपलब्ध केली आहे. कोणाला हवी असल्यास मला इ-मेल करा, ही सीडी मी माझ्या खर्चाने पाठवीन. ही प्रणाली सध्या अल्फा (खेळणे) या अवस्थेत आहे व सी - डेकचा केवळ १०,००० शब्दसाठा असल्यामुळे मीदेखील ही प्रणाली वापरत नाही. पण एक दिशादर्शक म्हणून या सीडी चा नक्कीच उपयोग होण्यासारखा आहे.
अवांतर: मराठीची पीछेहाट (जर खरोखरच होत असेल तर) ती इंग्रजी अथवा हिंदीच्या आक्रमणामुळे होत नसून अशुद्धलेखनामुळे होत आहे असे मला वाटते. म्हणून हा प्रपंच.
इ-मेल - shantanu.oak@gmail.com

मीपण

आपणास माझी काही मदत होण्याजोगी असल्यास मी तयार आहे. माझ्या कामाविषयी अधिक माहिती व आपल्या प्रकल्पाविषयी प्रश्न व्य नि ने २-३ दिवसात पाठवते.

बांधणी - सर्वर साईड सुविधा

सर्वर साईड सुविधा

क्लायंट साईड सुविधा विचाराधीन असताना,एकीकडे सर्वर साईड आज्ञायन झाले असल्याने ते प्राथमिक चाचणी स्वरूपात चालू करायचे आहे. याकरता नीलकांत यांनी पीएचपी, मायएस्क्यूएल् असणारी मोफत सुविधा पुरवाणारे संकेतस्थळ दिले आहे (www.ej.am) परंतु मला ते अजून नीटसे वापरता आलेले नाही.
कोणाकडे अशी मोफत होस्टींगची सुविधा उपलब्ध असल्यास कृपया संपर्क करावा/ मदत करावी ही विनंती.

याचे प्राथमिक स्वरूप पुढील प्रकारे असेल.

शब्दशोध आणि सुचवण्या -
प्राथमिक स्वरूपात एकच शब्द शब्दकोशातून शोधता येईल. शब्दकोशात शब्द आढळल्यास तो सुचवण्यांमध्ये एकमेव असेल. शब्द चुकीचा असल्यास अथवा बरोबर असूनही शब्दकोशात नसल्यास त्याच्या जवळपासचे शब्द सुचवण्या म्हणून दिसतील.

शब्दभरणा -

शब्दकोशात नसलेले शब्द चढवत येतील. ह्या सुविधेअंतर्गत शुद्धलेखन तपासलेला अनेक शब्दांचा मजकूर दिल्यास त्यातील एकेक शब्द आपोआप संचित होईल. मदतनीसास एकेक शब्दच चढवण्याची सक्ती राहणार नाही. तपासणी नंतरच हे शब्द शब्दकोशात समाविष्ट होतील

तपासणी-

होतकरू शुद्धलेखन चिकित्सक भरणा केलेले शब्द तपासतील. जे शब्द योग्य असतील ते त्यांना केवळ चेकबॉक्स वापरून (बरोबरची खूण करून) शब्दकोशात समाविष्ट करता येतील. याचसोबत भरणा केलेले पण चुकीचे अथवा अस्तित्वात नसलेले शब्द वेगळे काढता येतील. त्यांचा शब्दकोशात समावेश होणार नाही.

शब्दशोध आणि शब्दभरण्याचे काम मदतनीस करू शकतील. तपासणीचे काम केवळ शुद्धलेखन चिकित्सकच करू शकतील.

शब्दकोश जसजसा श्रीमंत होत जाईल तसतशा चुकीच्या शब्दांकरता मिळणार्‍या सुचवण्या अधिकाधिक सुयोग्य होत जातील.
आपल्या मदतीची वाट पाहतो आहे.

आभार!!!!

शंतनू ओक यांनी लागलीच सुविधा विनासायास, विनातक्रार उपलब्ध करून दिली आहे. मी त्यांचा सर्वांतर्फे अत्यंत आभारी आहे.

पुढील कामे करण्यास वेळ,श्रम देऊ शकणार्‍यांनी कृपया शंतनु ओक अथवा मला व्य.नि. मधून तसे कळवावे.

शब्दभरणा ( शब्दशोध आणि त्या त्या वेळी उपलब्ध नसलेले शब्द पुरवण्याकरता )
तपासणी (शुद्धलेखनाबाबत उत्तम जाण असणार्‍यांसाठीच)

सद्ध्या शब्दभरणा करण्याकरता जास्तीत जास्त ५ आणि तपासणीकरता ५ इतक्या सदस्यांची गरज आहे. येत्या २ दिवसांत व्य. नि. पाठवणार्‍यांपैकी निवडक सदस्यांना या सुविधेच्या वापराबाबत माहिती पुरवण्यात येईल. ही सुविधा सद्ध्या परवानगीप्राप्त सदस्यांनाच वापरता येईल ( ऑथेंटिकेटेड युसर्स).

ही सुविधा इथे उपलब्ध आहे : शब्दसंपदा

काही दिवसांच्या अवलोकनानंतर शब्दभरण्याकरता सदस्य वाढवायचा विचार आहे.

कळावे,कळवावे.

मान्यताप्राप्त?

ही सुविधा सद्ध्या परवानगीप्राप्त सदस्यांनाच वापरता येईल ( ऑथेंटिकेटेड युसर्स).

असे का बरे? सर्वांना वापरण्याची परवानगी देण्यामागे काही तांत्रिक अडचण आहे का?

सावधानता

शब्दभरणा करताना परवानगीप्राप्त सदस्यच असले तर विदागारावर अतिरिक्त भार पडणार नाही. दुर्दैवाने कोणी विनाकारण अर्थहीन, मिळतील ते शब्द शब्दभरण्यात घातले तर विदागार अनावश्यक शब्दांनी भरेल. हे टाळण्याकरता केवळ इच्छुक सदस्यांकरता प्रारंभी शब्दभरणा आणि तपासणी चालू करावी लागेल. सद्ध्या तरी काही तांत्रिक अडचणी नाहीत. केवळ सावधानता हा एकच निकष आहे.

सद्ध्या ही सुविधा "वापरणे" म्हणजे शब्दशः वापरणे अर्थाची नाही. चाचणीमात्र सुविधेत सद्ध्या केवळ एका वेळेस एकच शब्द तपासतो येतो आहे. त्यामुळे शुद्धलेखन तपासणीकरता ह्याचा सद्ध्या फारसा उपयोग नाही. शब्दसंच वाढवणे आणि विदागारतले शब्द तपासणे ही प्राथमिक स्वरूपाची कामे सद्ध्या वापरणे ह्या अर्थाने आली आहेत. स्वतंत्रपणे चालणारा शुद्धिचिकित्सक बनवण्याचे काम सद्ध्या हाती घेतो आहे. तोवर प्राथमिक स्वरूपात वरील कामे चालू राहतील.

विविध प्रकारच्या संचिका

पुरेसा शब्द संग्रह झाल्यावर ते शब्द दोन प्रकाराच्या संचिकेत उपलब्ध करून द्यावे लागतील.
१) एस्पेल - ऑनलाईन शुद्धलेखन चिकित्सेसाठी.
(हिंदीचे उदाहरण पाहा
) याचे मूळ ओरेंगू या २७ भाषेत शब्दांची चिकित्सा करणाऱ्या प्रणालीवर आधारीत असून त्याच्या आज्ञावलीचा गाभा येथून उतरवून घेता येईल.
२) हन्स्पेल - ओपन ऑफिस व फायरफॉक्ससाठी.
हन्स्पेल इंजिन दोन वेगळ्या पद्धतीने उपलब्ध करून द्यावे लागेल. ओपन ऑफिस साठी हे असे तर फायरफॉक्स साठी हे असे. शब्दांच्या डब्यांना हे कसले कसले इंजिन जोडावे लागते बुवा? असा प्रश्न कोणाला पडला असेल तर विकिपीडियाचे हे पान पाहावे.

७.०४.२८- बांधणी पूर्ण झाली!!!

गमभन शुद्धलेखन चिकित्सा गमभन शुद्धलेखन चिकित्सा आता सर्वांसाठी खुली केली आहे. आपण लिहिलेला मजकूर येथे डकवून अथवा तेथेच मजकूर लिहून आता शुद्धलेखन चिकित्सा करू शकाल.
शब्दसंपदा वाढवता यावी याकरता विदागारात शब्द भरणा करणे आणि शब्द तपासून पाहणे या करता स्वयंसेवकांची गरज आहे. इच्छुकांनी josh9383@gmail.com या पत्त्यावर संपर्क करावा.

ही सुविधा इथे उपलब्ध आहे : शब्दसंपदा

नमुना

नमुन्यादाखल खालील चित्र पहा -

अभिनंदन

शब्दसंपदेला भेट दिली, सोय आवडली.
१. तिथेच 'शब्दकोषात भर घाला' अशी एखादी सोय देता येईल का? जेणे करून एका वापरात आलेले शब्द आपोआप शब्दसंपदेत भर घालतील.
२. शब्दसंपदेच्या सुचवण्या नाकारलेले शब्द साठवून त्यांची भर घालता येईल ना?
३. ही सोय वापरणार्‍यांनाच 'योग्य शब्द ओळखा*' स्वरुपात माहिती पुरवत शब्दसंपदेत भर घालता येईल का? * पुढील पैकी बरोबर पर्याय निवडा : चिकटणे, चिटकणे, दोन्ही. (हॉट ऑर नॉट च्या धर्तीवर.)

'तो 'मराठी विकिपीडिया चा सदस्य आहे.

अडसर

अशी सोय आहे परंतु ती सर्वांसाठी सद्ध्या खुली नाही. याबाबत मदत करण्याकरता मी वरती आवाहन केले आहे. सर्वच्या सर्वच सदस्यांना अशी सोय उपलब्ध करून देण्यात काही तांत्रिक आणि सिक्युरिटी संबधीत बाबींचे अडसर आहेत. ज्यांना इच्छा आणि आवड आहे त्यांनी माझ्या इमेल पत्त्यावर संपर्क करावा.

अभिनंदन

मी देखिल भेट दिली, सोय चांगलाच आकार घेईल.

उत्तम विषय !!

आपले सर्वांचे अभिनंदन. मी काही मदत करू शकतो का? माझा टंकनाचा वेग तसा बरा आहे. आपल्या तपासणीच्या कामात मी मदत करू शकेन

प्रसाद

अभिनंदन

इथे जे काही चालू आहे ते खूपच सही आहे आणि मला त्यात काही सहभाग द्यायला आवडेल. फक्त प्रश्न हा आहे की माझी यातल्या बर्‍याच विषयांशी तोंडओळख पण नाहीये. असो, मला शिकायला आवडेल आणि मी बर्‍यापैकी शुद्धाशुद्ध ओळखू शकतो याचा काही उपयोग होण्यासारखा असेल तर नक्की सांगा.

होणार्‍या प्रगतीचे कुणी संकलन करू शकत असेल (म्हणजे जसे वर आखणी बांधणी जसे लिहिलेय तशीच होणार्‍या सुधारणेची भर घालायची) तर तेही उत्तम ठरेल, म्हणजे प्रगतीचे मोजमाप करता येईल.

गूगलची सोय

गूगल ने ब्लॉगरवर हिन्दी साठी एक सोय केली आहे तीत शब्दांना पर्याय येतो लिहिता लिहिता, याचा काही उपयोग होत असल्यास बघा. (ट्रान्स्लिटरेशन म्हणतात बहुतेक त्याला.)

निरीक्षणे

मी शब्दसंपदा तपासतो आहे. अनेक शब्दांची भर घालणे आवश्यक वाटते. अर्थात प्रकल्प तसा बल्यावस्थेत असल्याने हे अपेक्षीत आहे. काही सुचना:

  1. आपल्याला श्ब्दसंपदेचा एकुण दिसणारे रूप मराठी करता येईल का?
  2. तपासनिसाची नवीन उघडणारी खिडकी ऐवजी, त्याची इतर व्यवस्था करता येइल का?

रुपडे

१) हो तसे करता येईल, त्याकरता एखाद दिवसाचा अवधी पुरेसा आहे. पण अग्रक्रमानुसार हे काम नंतर करता येऊ शकेल.
२) इतर व्यवस्थ म्हणजे नेमकी कशी? त्याच पानावर ही सुविधा उघडता येऊ शकेल परंतु त्याकामी बरीच मेहनत घ्यावी लागेल असे वाटते. राईट क्लीकवर अशी सुविधा देता येईल का याची तपासणी चालू आहे.

चालेल

चालेल ना..
१. असे झाले तर जास्त छान वाटेल.
२. इतर व्यवस्था म्हणजे संगणकाच्या पडद्यावर अन आपल्या उजव्या बाजूला जर पडद्याचा एक भाग करून केले तर? ते जास्त बरे पडेल असे मला वाटते. उजव्या बटणाच्या जोरावर करणे तर फारच सुंदर.

तज्ज्ञांचे मार्गदर्शन अपेक्षित

ॐकार जोशीच्या कामाचे कौतुक अनेकवेळा केले असल्याने, त्याला राग येऊ नये म्हणून व इतरांच्या सहनशक्तीची परीक्षा घ्यायची माझी इच्छा नसल्याने, अभिनंदन, धन्यवाद अशा औपचारिकता टाळून थेट मुद्द्यावर येतो.
कवितेत आढळणारे, जुन्या संत साहित्यात येणारे तर ग्रामीण भागातील बोली भाषेत रूढ झालेले शब्द मुख्य सूचीत असावेत का?
उदा. मम, मुखा, बरसे, जुळताही, जावा

इंग्रजीत एक मुख्य सूची असून बाकी सर्वांसाठी स्वतंत्र सूची (विकत) घ्यावी लागते.
(हे मला मेडिकलच्या एका विद्यार्थ्याला त्याचा शोधनिबंध टाईप करायला मदत करताना समजले होते. मेडिकल डिक्शनरी वेगळी व महाग असते.)
सामान्य मराठी माणूस मुख लिहिताना चुकून मुखा टंकित करेल, जुळतातही च्या ऐवजी जुळताही असे टाईप करेल.
शुद्धलेखन चिकित्सक असे शब्द बरोबर म्हणून दाखवेल की चुकीचे म्हणून?
तज्ज्ञांचे मार्गदर्शन अपेक्षित.
वरील तीन प्रकारातील व्यवहारात नसणारे व नियमात न बसणारे शब्द मुख्य सूचीत असू नयेत असे माझे मत आहे.

सहमत आहे

म्हणूनच हे शब्द अजूनही विदागारात असले तरी शब्दसंपदेत वापरात नाही. नेमक्या याच कारणास्तव ते तसे पडून आहेत. यावर अधिक साधक बाधक चर्चा झाली तर उत्तम!

मला वाटते

कवितेत आढळणारे, जुन्या संत साहित्यात येणारे तर ग्रामीण भागातील बोली भाषेत रूढ झालेले शब्द मुख्य सूचीत असावेत का?

मला वाटते असू नयेत. कवितेतील, बोली आणि ग्रामीण भाषेतील शब्द शब्दसंपदेत नसावेत, तसेच संस्कृत, हिंदी, इंग्रजीतील सर्रास वापरले जाणारे शब्दही नसावेत.

असो. मी तज्ज्ञ नाही. :) केवळ माझे मत दिले.

माझा काही उपयोग होण्यासारखा आहे का?

एवढ्या महत्त्वपूर्ण घडामोडी होऊन, १ मे नंतर इथले सर्व किरदार भूमिगत झाल्यासारखे दिसतात.

मी वरील सर्व नोंदी वाचल्या. मला ह्या सर्व प्रकल्पाचे महत्त्व पटलेले आहे. तुम्ही सर्व लोक,
विशेषतः ॐकार करीत असलेल्या कामाचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.

मी उत्तम शुद्धलेखन तपासू शकतो. लिहू शकतो. मला मदत करण्याचीही इच्छा आहे. वेळ मात्र मर्यादितच मिळू शकेल.

माझा काही उपयोग होण्यासारखा आहे का?

सर्व किरदार सक्रिय

सर्व किरदार भूमिगत झाले असले तरी सक्रिय आहेत. याचा पुरावा म्हणजे हा...
६ मे रोजी झालेल्या मोजणीत २९७० शब्द होते तर तीच संख्या ५०३९ वर पोहोचली १९ मे रोजी. (२०५९ शब्दांची वाढ केवळ १३ दिवसांत) सध्या त्यात ५२८५ शब्द आहेत. हे शब्द कोणत्या ना कोणत्या तज्ज्ञाने पाहिले आहेत म्हणजे ते ९९.९९% अचूक आहेत. या शब्दांची वर्गवारी अशी आहे.

अ वर्ग 955
क वर्ग 744
च वर्ग 408
ट वर्ग 82
त वर्ग 542
प वर्ग 1280
य वर्ग 1274
(क वर्ग म्हणजे क, ख, ग, घ ने सुरू होणारे शब्द)

आपण हे शब्द वापरून शुद्धलेखन चिकित्सेचा लाभ घेऊ शकता.
आपल्याला यात काही मदत करायची असेल तर या लिंकवर टिचकी देऊन सदस्यनाम व पासवर्ड टाकल्यानंतर प्रवेश करू शकता.
ओंकारच्या परवानगीने पासवर्ड आपल्याला व्य. नि. द्वारे पाठविण्यात येईल.
यात आपला सहभाग फारच मोलाचा ठरणार आहे.
एकदा का आपण प्रवेश केलात की आपल्याला "Scrap words" लिंकवर टिचकी मारून चुकीचे शब्द निवडायचे आहेत. हे शब्द निवडून झाले की "Submit" बटणावर टिचकी द्या. हे शब्द लिस्टमधून नाहीसे होऊन वेगळ्या ठिकाणी सेव्ह होऊन राहतील.

आता "Verification" या लिंकवर टिचकी मारून योग्य शब्द निवडा व परत "submit" बटणावर टिचकी द्या. अभिनंदन! शब्दसंपदेत या शब्दांची भर पडली आहे.

आतापर्यंत जमा झालेले हे शब्द इतरांनी भरलेले आहेत, जर आपल्याला आणखी शब्द जमा करायचे असतील तर "Bulk upload" या लिंकवर टिचकी मारून जितके हवे तितके शब्द आपण भरू शकता. हे शब्द लगेच शब्दसंपदेत सामील होत नाहीत. आपण अथवा इतर संपादक हे शब्द "verification" लिंकवर पाहून मगच शुद्धलेखन चिकित्सेकरता उपलब्ध करून देऊ शकतात. जे शब्द आधीच इतर कुणीतरी जमा केले असतील असे शब्द आपल्याकडून स्वीकारलेच जाणार नाहीत. त्यामुळे आपण अगदी नि:संकोचपणे शब्द टाईप करून अथवा इतर कुठून कॉपी - पेस्ट करून जमतील तितके शब्द जमा करा. मी "य" वरून सुरू होणारे सुमारे ५०० शब्द नीलकांत यांनी पाठवलेल्या एका एचटीएमएल फाइलमधून शब्दसंपदेत जमा केले आहेत. आपण हे "य" वरून सुरू होणारे शब्द बरोबर का चूक हे ठरवण्यापासून आपल्या सहभागाचा श्रीगणेशा करू शकता.

मराठीवर्ड्स पी. डी. एफ. फाइल

ही फाइल आपल्या संगणकावर उतरवून घेऊन त्यात काही चुकीचे शब्द गफलतीने शिरले आहेत का हे कोणी मला सांगू शकेल का? ही मराठीवर्ड्स नावाची (१३५ के. बी.) पी. डी. एफ. फाइल असून पान क्रमांक व शब्द क्रमांक दिले असल्यामुळे आपण सहजपणे कोणता शब्द चुकीचा आहे ते सांगू शकाल. वाटल्यास वरील लिंकवर उजवी क्लिक करून " save as " चा पर्याय वापरूनही आपण ही फाइल सेव्ह करू शकता.

उशीर झाला असला तरी मदतीस सिद्ध आहे.

नमस्कार शंतनू. मी एवढ्या दिवसांनी इथे परतत आहे. क्षमस्व.
मी पी.डी.एफ. उतरून घेतली आहे.

३० वा शब्द 'अंघोळ' हा चूक लिहिलेला आहे. बरोबर 'आंघोळ' असा लिहितात.
९० वा शब्द 'अख्तर' हा मराठीतला शब्द आहे काय?
१०२ वा शब्द 'अग्नि' हा र्‍हस्व न लिहिता दीर्घ 'अग्नी' असा लिहितात.
१२० वा शब्द 'अचंबीत' असा दीर्घ न लिहिता 'अचंबित' असा र्‍हस्व लिहितात.
१३४ वा शब्द 'अजातशत्रु' नव्या शुद्धलेखनाच्या नियमानुसार अशुद्ध ठरतो. १३५ वा 'अजातशत्रू' बरोबर आहे.
१५९ वा शब्द 'अणु' र्‍हस्व न लिहिता 'अणू' असा दीर्घ लिहितात.
१६० वा शवब्द 'अणुरेणु' असा न लिहिता 'अणुरेणू' असा लिहितात (मी थोडासा साशंक आहे.)

ह्यासोबतच माझे २०० शब्द तपासून झालेले आहेत. यथावकाश इतरही पाहतोच. ह्या दुरुस्त्यांची यथायोग्य दखल घ्यावी.

अंघोळ/आंघोळ

Padmakar Dadegaonkar
प्रिय श्री गोळे आनि उपक्रमवरील इतर सर्व शुद्धशब्दसाधकहो
नमस्कार!
अंघोळ ('आंघोळ' नव्हे) हा शब्द या यादीत आहे. पण केवळ आंधळेपणने मी ही यादी करीत नाही, करू इच्छित नाही. अंघोळ शब्दाची फोड केली तर त्यचे अंग + ओल असे दोन अवयव मिळतील (अंघोळ करतो म्हणजे अंग ओलं करतो!), त्यांची संधी व मराठीकरण होऊन अंघोळ हा शब्द बनतो. उच्चारसुलभीकरणसाठी कदाचित काही जण 'आंघोळ' असा प्रयोग करीत असतील, पण शुद्ध शब्द 'अंघोळ' असाच आहे.
शंतनू आजच्या पत्रात म्हणतात - आपण मराठी भाषिकांना उपयोगी पडेल असा शूची बनवत आहोत त्यांना मराठी भाषा शिकवण्याचा हा प्रयत्न नाही. 'स्वभाषेत टंकलेखन साहाय्य' असा मर्यादित हेतू आहे. - ते मान्य आहे, पण त्या हेतूलाही कुठेतरी नियमांत बसवावेच लागेल, अन्यथा सावळागोंधळ माजेल. " जिथे शब्दाच्या शुद्ध रूपाबद्दल शंका उप्तन्न होईल तिथे त्याच्या व्युत्पत्तीकडे जावे" असा नियम आहे. त्यानुसार 'अंघोळ' शुद्ध ठरतो.

मी जी यादी श्री शंतनू यांच्याकडे पाठवीत आहे ती डॉ. द. न. गोखले यांच्या 'शुद्धलेखन-विवेक' या फुस्तकातून गेतलेली आहे, मो.रा.वाळिंबे यांच्या नव्हे, ती नंतर घेईन; हे केवळ ज्याचे श्रेय त्याच्या नावावर जावे यासाठी.
आपणा सर्वांना दिवाळीच्या अनेकानेक शुभेच्छा! कळावे,
-पद्माकर

खरडवहीचा वापर करावा

पद्माकरसाहेब, मी नरेन्द्र गोळे यांच्या खरडवहीत माझा प्रतिसाद दिला आहे.
http://mr.upakram.org/guestbook/612
ही चर्चा तिथेच पुढे सुरू राहील. उपक्रमावरील सर्वच सदस्यांना या चर्चेत रस असेलच असे सांगता येत नाही. कृपया व्यक्तिगत उल्लेख असेल तेंव्हा खरडवहीचा वापर करावा. कारण इतरांना अशा चर्चांचा संदर्भ लागणार नाही.

आणखी तपास ...

शब्द क्र. मूळ शब्द बरोबर शब्द/शंका/सूचना
२०१ अधोगति अधोगती
२०९ अनन्यभक्ति अनन्यभक्ती
२२७ अनाहृत अनाहत (अनाघ्रात, धक्का न पोहोचलेला)
२३८ अनुत्तर असा शब्द वापरात नाही. 'अनुत्तरित' वापरतात. अनुत्तर ह्या अर्थाचा निरुत्तर शब्द आहे.
२८८ अफसाना हा मराठी शब्द आहे का?
३०९ व ३११ अली व अल्ला हे शब्द मराठी समजायचे का?
४०२ अहमद हे शब्द मराठी समजायचे का? नाव ह्या अर्थी असावेत.
४५४ आगळीक आगळिक
४७१ आजानुबाहु आजानुबाहू

ह्यासोबतच ६०० शब्द तपासून झालेले आहेत.

आणखी तपास ...

७४४ उदासीन उदासिन
८३२ एन्जॉय हा शब्द मराठी नाही.
८५४ ऐकमत्य असा शब्द अस्तित्वात नाही.
९०१ ओढघस्त असा शब्द अस्तित्वात नाही.
९४० औदासीन्य औदासिन्य
९६९ कंदील कंदिल
९७१ कचकचीत कचकचित

ह्यासोबतच हजार शब्द तपासून झालेले आहेत.

शुद्धलेखन चिकित्सकाचा आग्रह

आजच्या (१२ जून ०७) म. टा. तील ही बातमी शुद्धलेखन चिकित्सकाचा धरलेला हा आग्रह कसा योग्य आहे हे अधोरेखीत करते.
"दहावीच्या नवीन अभ्यासक्रमानुसार तयार केलेल्या मराठीच्या 'कुमारभारती' पुस्तकात शुद्धलेखनाच्या अनेक चुका झाल्याने सुमारे १३ लाख पुस्तके 'बालभारती'ला अक्षरशः रद्दीत काढावी लागणार असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. आता मराठीचे नवे बिनचुकांचे पुस्तक बाजारात येण्यासाठी विद्यार्थ्यांना १५ जूनपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे."
यात प्रूफरीडरची चूक तर आहेच पण एरवी इतके प्रगत झालेले तंत्रज्ञान भारतीय भाषांच्या बाबतीत किती कुचकामी आहे हे देखील या निमित्ताने लोकांसमोर आले हे ठीकच झाले असे मी म्हणेन.

शुद्धलेखन चिकित्सक निर्मितीचे काम

आपले शुद्धलेखन चिकित्सेचे काम अत्यंत प्रशंसनीय आहे.
शुद्धलेखनाविषयीचे काही कोश उपलब्ध आहेत. त्यांचा वापर शब्दसंपदा वाढवण्यासाठी करता येईल का? येथील मंडळींनी शब्द वाटून घेऊन एखाद्या कोशातील शब्द उदा. फडके यांचा मराठी लेखन कोश किंवा यास्मिन शेख यांचा कोश पर्यायांमध्ये शब्द घालण्यासाठी वापरता येईल. अगदी साधे शब्दही त्यात अजून घातले गेले नाहीत सामान्यरूपेही सर्व प्रकारची घातली गेली नाहीत त्यामुळे अजून बरेच काम करावे लागेल. आय आय टी ने अशा जावा आधारित चिकित्सक उपलब्ध करून दिला आहे पण त्याहून हा प्रयत्न अधिक चांगला वाटतो.

प्रयत्न

कार्यबाहुल्यामुळे प्रयत्न कमी पडत आहेत हे मान्य आहे. मुक्त आणि मुफ्त असल्याने आणि काम वेळखाऊ असल्याने शब्दभरणा करणे रोडावले आहे. :(

डबल क्लिकवर शब्द तपासा!

गमभन शुद्धलेखन चिकित्सेची नवी आवृत्ती ०७.०८.०१ आता उपलब्ध आहे.
आता केवळ शब्दावर डबल क्लीक केल्यास सोबतच्या सारणीत सुचवण्या येतात. योग्य त्या सुचवणीच्या दुव्यावर टिचकी मारल्यास लिखाणात तो शब्द जिथे जिथे चुकला असेल तिथे दुरुस्ती होते. सर्व शब्द तपासायला आधीची सुविधा आहेच. परंतु एखाद दुसरा शब्द तपासायला लागणारा वेळ कमी असल्याने डबल क्लीकवरची सोय वेळ वाचवणारी आहे.
चित्रः

gamabhana ajax spell checker
डबल क्लीकवर शब्द तपासा

अजून बरेच काम बाकी

ओंकारचा हा नवीन प्रयत्न खरोखरच कौतुकास्पद असला तरी विदातील शब्दांची संख्या जोवर पुरेशी वाढत नाही तोपर्यंत या सुविधेकडे भविष्यातील पर्याय म्हणूनच बघावे लागेल. सध्या केवळ ५,८०० शब्द या संपदेत असून २,११७ शब्द संपादकांच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. जास्तीत जास्त लोकांनी यात सहभाग दिल्यास हे काम लवकर पूर्ण होऊ शकेल.
हन्स्पेल इंजिनमध्ये हा विदा उपलब्ध झाल्यावर सध्या जसे फ़ायरफ़ोक्समध्ये टाईप करता करता लाल खुणा उमटत जातात, तसे मराठी टाईप करता करता शुचि आपले काम करीत जाईल. ज्यांना डी. टी. पी. चे काम करायचे असेल अथवा कार्यालयीन कामाकरता मराठीतून लिहायचे असेल त्यांना ओपन ऑफिसामध्ये हीच सुविधा आपोआप उपलब्ध होईल. या सर्वांसाठी शुद्ध मराठी शब्दांचा मुक्त स्त्रोत साठा उपलब्ध होणे आत्यंतिक गरजेचे आहे. मराठी माणसांनी याचे महत्त्व ओळखून हा प्रकल्प पुरेशा गांभीर्याने घ्यायला हवा. सी-डेकने दिलेली हन्स्पेल डिरेक्टरी त्यातील असंख्य चुकीच्या श्ब्दांमुळे कुचकामी आहे तर "आयलिप" या प्रणालीतील शब्द पर्याय समाधानकारक वाटत नाहीत. त्यांचा शब्दसाठा मुक्त स्रोत नसल्यामुळे इतर कुठेही वापरता येत नाही. इतकेच नव्हे तर पैसे देऊन लिगल व्हर्जन घेतल्याशिवाय टंकित केलेला मजकूर इतरत्र डकवताही येत नाही. "बरहा" कितीतरी बरे असे म्हणायची पाळी येते. पण त्यातही शुचि नाही आणि एक परीपूर्ण वर्ड प्रोसेसर वापरल्याचे समाधान मिळत नाही. या प्रयत्नाला इंग्रजीत "Proof of Concept" असे म्हणता येईल. लोकांच्या रोजच्या जीवनातील एक अविभाज्य भाग बनवण्याकरता अजून बरेच काम बाकी आहे.

अजॅक्स आणि वेब सर्व्हिस

आता अजॅक्स वापरून वेब सर्व्हिस म्हणून गमभन शुद्धलेखन चिकित्सा शब्दागणिक वापरता येऊ शकते. याचाच अर्थ तुम्हाला तुमचा संकेतस्थळावर शुद्धलेखनचिकित्सा न ठेवता आणि तिथल्या तिथे राहूनही ह्या सुविधेचा लाभ घेता येईल. अधिक तांत्रिक माहिती लवकरच उपलब्ध करेन. :)

 
^ वर