आश्रमानुभव

हा लेख आधी मनोगतवर प्रकाशित झालेला आहे.

~~~

वृद्धाश्रमांमध्ये जाऊन तिथल्या आजीआजोबांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणे, व्यसनमुक्त होऊ इच्छिणाऱ्यांना मदत करणे किंवा कुठल्या रक्तदान शिबिरात भाग घेणे तर कधी पोलिओ लसीकरणाच्या कार्यक्रमात भाग घेणे असे माझे उद्योग हेच काय ते माझे सो कॉल्ड समाजकार्य होते. या सगळ्या उचापतींनी बाकी काही नाही तरी चांगल्या गोष्टी करण्यासाठी इतरांना बऱ्यापैकी उद्युक्त करू शकते असा विश्वास मला स्वतःवर वाटायला लागला होता. एक वेगळा वयोगट हाताळायला मिळाला तर छान होईल असं वाटलं आणि नेमकं तेव्हाच आमच्या कंपनीतर्फे अशी एक संधी मिळाली जी मी सोडली नाही. ती संधी होती - एड्सने पिडीत अथवा ग्रस्त मुलांच्या अनाथाश्रमातल्या मुलांसोबत ( वय वर्षे ३ ते १६ ) खेळण्याची, त्यांना वेगवेगळ्या गोष्टी शिकवण्याची - त्यांची ताई बनण्याची. लहान मुले हा माझा अत्यंत आवडता प्रांत आहे आणि त्यामुळे या संधीत अपेक्षित काम काही खास अवघड जाईलसं वाटलं नाही. त्यातून काही शिकायला मिळेल का? याहीबद्दल साशंकता होती. दर महिन्याला एकच शनिवार जायला परवानगी मिळणार होती. त्यात जे काही अनुभव आले ते सांगावेसे वाटत आहेत म्हणून हा लेखनप्रपंच...

पहिली भेट :

त्या आश्रमामध्ये जाण्याची पहिलीच वेळ होती, त्यामुळे तिथल्या व्यवस्थापकीय लोकांशी जुजबी ओळख/गप्पा केल्या आणि आवश्यक गोष्टींची पूर्तता करून परवानगी मिळताच मी तिथल्या मुलांमध्ये गेले. काही मुलं मी त्यांच्यात जाताच माझ्याभोवती जमा झाली आणि 'ताई.. ताई..' करून माझं लक्ष वेधून घ्यायचा प्रयत्न करायला लागली. काही क्षणातच अखंड बडबड, प्रश्नांचा पाऊस, एकापाठोपाठ एक खेळांचा सपाटा.. असा एकंदर धमाल कार्यक्रम चालू होता आम्हा सर्वांचा. सर्वांचा?? खरंच? नाही. तिथल्या मुलांपैकी काही मुले माझ्याशी बोलायला अजिबात तयार नव्हती. कसलासा राग होता त्यांचा माझ्यावर की काय ते कळायलाही काही मार्ग नव्हता. या माझ्याशी भांडण असल्यासारखं वागणाऱ्या मुलांचं मन जिंकण्याचा प्रयत्न करायचा असं मी ठरवलं आणि यात ज्यांनी मला आपसुकच त्यांची ताई मानलं होतं त्यांची मदत होणार होती. त्यांच्याशी खेळताना मीही त्यांच्यातलीच एक आहे हे त्यांना वाटेलसे वागण्याकडे माझा कल होता, जेणेकरून त्यांचा माझ्यावर विश्वास बसेल. मी त्यांच्याशी खेळताना मुद्दामहून चुका करत होते, ज्या माझ्या लक्षात आणून देण्यात त्यांना मजा येत होती. मीही तोंड वेडवाकडं करत, "बऽऽरंऽ ! माझं चुकलं.. बस्स?" म्हणून चुका मान्य करत होते आणि त्या पुढे होणार नाहीत याची खबरदारी (!!) घ्यायचा प्रयत्न करतेयसं दाखवत होते.

दोरीच्या उड्यांचे नवीन प्रकार शिकवताना, ते प्रकार मी स्वतः खेळून जमाना झालेला असल्याने माझी दोरी सारखीसारखी पायात अडकत होती. दोरी अडकली की लगेच त्यांचा ओरडा सुरू व्हायचा,"ताई आऊट ताई आऊट" आणि मी एवढंसं तोंड करून बाजूला व्हायचे. त्यांच्या ताईला आऊट झालेलं पाहण्यात त्यांना जबरदस्त आनंद होत होता आणि त्यांना आनंदी बघणे हेच केवळ मला हवे होते. जे दोरीच्या उड्यांचे प्रकार ( कैची, रिंगण वगैरे ) मला स्वतःला आता जमेनासे झाले आहेत ( मी पुनश्च श्रीगणेशा करतेय ते शिकण्यासाठी.. बघुया ! ) ते प्रकार त्यांना शिकवता आले आणि ते त्यांना आता अगदी सहजगत्या खेळताही येतायत हे पाहून मला कोण आनंद झाला हे शब्दात सांगणेच शक्य नाही !

तसाच काहिसा प्रकार क्रोशाच्या विणकामाचा झाला. काही मुली मोबाईलचे कव्हर्स वगैरे विणत होत्या तर मी त्यांच्या विणण्यातल्या चुका लक्षात आणून दिल्या आणि बरोबर कसं विणायचं तेही सांगितलं. मला विणता येतं हे बाकीच्या मुलींना कळल्याने मग त्या माझाकडे आल्या आणि "ताई, मलाही शिकव" म्हणाल्या. तिथल्या मोठ्या ताईंना क्रोशाच्या सुया आणि लोकरीबद्दल विचारलं तर त्यांनी मला ज्या सुया आणि लोकर आणून दिली ती बघूनच मला कसंतरी झालं. तरीही त्या मुलींचा उत्साह पाहून मी त्याच साहित्यात त्यांना खांब-साखळ्या शिकवायला सुरूवात केली. या शिकण्याशिकवण्याला थोडासा वेळ झाला असेलनसेल एक मुलगी माझ्याजवळ येउन बसली आणि म्हणाली,"दीदी, मुझेभी सिखना है बुनाई करना।" तिच्या हातातली सुई-लोकर घेऊन तिलाही साखळी कशी घालायची ते समजवून सांगितलं. तिचा चेहरा तरीही संभ्रमितच दिसत होता. मग मी तिचा हात हातात घेऊन कसं विणायचं ते समजवून सांगितलं आणि 'कळलं का?' विचारलं तर कसनुसं 'हो' म्हणाली आणि जसं सांगितलं तसं विणायचा प्रयत्न करायला लागली. नवीन कुठलीही गोष्ट शिकायला वेळ लागतोच असं मनातल्या मनात म्हणून मी बाकीच्या मुलींचे विणण्यातले प्रश्न सोडवायला लागले. थोड्यावेळाने बघते तर ही मुलगी चमत्कारिकच विणत होती.. ज्या हातात सुई धरायला पाहिजे त्या हातात तिने लोकर धरली होती आणि ज्या हातात लोकर धरायला हवी त्या हातात सुई धरलेली ! बरोबर कसं धरायचं आणि विणायचं ते तिला समजवावं असं माझ्या डोक्यात आलेलं पण अचानक एक प्रश्न विचारला गेला,"तुम बाये हाथसे काम करती हो क्या?". आधीच नाराज दिसत होती ती आणि त्यात माझ्या या प्रश्नाने भर पाडल्यासारखं वाटलं. तिच्या शेजारी बसलेली एक सहजपणे विणणारी मुलगी म्हणाली,"तोच तर प्रॉब्लेम आहे ताई तिचा. कित्तीवेळा शिकवलं तिला पण ती अशीच उलटं करून ठेवते म्हणून तिला कोणी शिकवायलाच जात नाही आता." मला एकदम पोटातून ढवळल्यासारखं झालं. मी स्वतः डावखुरी आहे पण मला डाव्या हाताने विणायला जमत नाही, या गोष्टीचं आयुष्यात पहिल्यांदा वैषम्य वाटलं मला. इतर मुली विणताना अडकत होत्या तेव्हा त्यांना हाताला धरून बरोबर कसं विणायचं ते मी शिकवू शकले पण हिच्या बाबतीत ते मला जमणार नव्हतं. "देखो, मैं तुम्हे हाथ पकडके तो नहीं सिखा सकती, लेकीन तुम जहां गलती करोगी वहा बता सकती हूं। चलो, शुरू करते है।" डावखुरी आहे कळूनही मी तिला शिकवू इच्छिते ही गोष्ट तिला आवडली होती आणि म्हणूनच की काय तिचा चेहरा थोडासा खुलला होता. निघायची वेळ होईतो ती बऱ्यापैकी चांगलं विणायला लागली होती आणि मूळ म्हणजे आपणही विणू शकतो हा आत्मविश्वास तिला आला होता, यातच सगळं कमावलं असं मला वाटलं.

दुसरी भेट -

यावेळी मला ज्या मुलांनी आधी रागारोसाने वागवलं होतं, त्यांनीही हसतखेळत प्रतिसाद दिला. सगळ्याजणांची चिवचिव चालली होती माझ्याभोवती. कोणाला त्यांच्या शाळेतल्या गमती सांगायच्या होत्या तर कोणाला दोरीच्या उड्या खेळून दाखवायच्या होत्या. कोणाला विणलेले मोबाईल कव्हर्स दाखवायचे होते तर कोणाला येत्या आठवड्यातला त्यांचा होणार असलेला नाच करून दाखवायचा होता. माझ्याकडून काहींना नवीन गोष्टी शिकायच्या होत्या त्यामुळे त्यांनी मला 'टीचर' म्हणायला सुरूवात केली तर काही त्यांना सांगत होते की "वो टीचर नहीं, दीदी है !"

यावेळेस त्यांनी लोकरीचे वेगवेगळे प्रकार विणायला शिकले. रिचा आणि अनिलची परवानगी घेऊन मी त्यांच्यासाठी सुया आणि लोकर नेली होती. यावेळेस गंमत म्हणजे त्या मुलांना संभाळण्यासाठी असलेल्या त्यांच्या खरोखरीच्या टिचर्ससुद्धा विणकाम शिकायला बसल्या होत्या !

तिसरी भेट -

माझ्या बाबांची तब्ब्येत खूपच खालावलेली असल्याने त्यांना भेटायला मी घरी गेले होते. आश्रमाचा पहिला शनिवार चुकतोय हे लक्षात आलं होतं पण इलाज नव्हता. आश्रमाची परवानगी घेऊन मग मी चौथ्या शनिवारी गेले तिथे. ताई पहिल्या शनिवारी येणार म्हणून पोरं वाट बघत बसली होती कळताच मला गुन्हेगार वाटलं. काही मुलं पुढल्या आठवड्यात त्यांच्या शाळेच्या गावी जायची असल्याने त्यागोदर मला भेटायचं होतं त्यांना. मुलांमध्ये गेले तेव्हा कळलं की बाबांच्या आजारपणाबद्दल त्यांना आधीच कुठुनतरी कळलेलं होतं.. त्यामुळे लगेच प्रश्न सुरू झाले.. "दीदी, तुम्हारे पापाको क्या हुआ?" वगैरे.. बाबांची तब्ब्येत बरी झाली असली तरीही खूप काही बरी होती असं नव्हतं, त्यामुळे माझीच मानसिक अवस्था धड नव्हती. मलाही कदाचित आधार हवाच होता कोणाचातरी. मुलांमध्ये तो आधार शोधायला गेले असं म्हणून कदाचित मुर्खात काढेल मला कोणी पण तसं झालं खरं तेव्हा. मी गोष्ट सांगावी तसं त्यांना सांगत बसले की बाबांनी कसे हालाखीत दिवस काढले आणि कुटुंबाला इतकं सुंदर आयुष्य मिळवून दिलंय वगैरे.. त्यांची तब्ब्येत आता बरी राहत नाही म्हणून मी घरी गेले होते सांगितलं. बोलल्याने मला बरं वाटत होतं. मी काहिशी माझ्या भावविश्वातून बाहेर आले होते. मुलांना हे सगळं सांगायला नको होतं असं एकदम वाटून गेलं आणि मी बघितलं तर तीही त्यांच्या भावविश्वात गुंगलेली दिसली. बाहेरच्या जगातली माणसं नेहमी खोदूनखोदून त्यांच्या आयुष्याबद्दल विचारतात असं कळलं ( तुझ्या आईला एडस झालाय की वडलांना? असेही प्रश्न त्या चिमुकल्यांना विचारलेले ऐकून मी हादरलेच होते ! ) पण कोणी स्वतःच्या कुटुंबाबद्दल, त्यांच्या प्रश्नांबद्दल सांगत नव्हतं त्यांना. बाहेरची माणसं नेहमी त्यांच्याकडे मदतीच्या वस्तू फेकून देऊन चालू लागतात, त्यांच्याशी अंतर ठेवून वागतात असं कळलं. अजाणतेपणी का असेना पण मी हे अंतर पार करून त्यांच्यात जाऊन मिसळले होते, त्यांना माझी सुखदुःखं सांगत होते याचं त्यांना कुठेतरी समाधान मिळाल्यासारखं वाटलं. माझ्यावरचा विश्वास वाढल्यानेच की काय त्यांनी त्यांच्या आयुष्यातले 'खरे'प्रश्न मला सांगायला सुरूवात केली. शप्पथ ! त्या जगातली जबरदस्त भीषणता पहिल्यांदाच लक्षात आली माझ्या. मदत म्हणून देण्यात आलेल्या वस्तू प्रत्यक्ष त्या मुलांपर्यंत पोहोचतच नव्हत्या, तिथल्या काम करणाऱ्या बायका त्यांना दुखलंखुपलं तरी लक्ष द्यायच्या नाहीत वगैरे वगैरे.. हे सगळं ऐकून मला माझं दुःखं एकदम किस झाडकी पत्ती वाटायला लागलं. मी या विचारात गुंग असताना तिथे एक अंथरूणाला खिळलेला मुलगा मला म्हणाला,"तु.. तुम.. चिंता मत.. करो.. दीदी.. अंक..ल ज..ल्दीही.. ठी..क हो जा..एंगे". त्याचे हे शब्द ऐकून स्वतःच्याच रडण्याला रडत बसलेल्या माझ्या कोत्या मनाची लाज वाटली मला. त्याची शारिरीक अवस्था पाहून मला त्याच्याशी हातमिळवणी करावी असं धाडसच होत नव्हतं मला. मनात कुठेसं असा आखडता पवित्रा घेणं पटत नव्हतं. आजवर कधीही कुठलेही मूल मला ताई, मावशी, आत्या म्हटलंय आणि मी त्याच्याशी प्रेमाने वागले नाही असं झाल्याचं मला आठवत नाही. मग आजच असं का होतंय ते कळत नव्हतं पण चमत्कारिक शक्ती मागून ओढत असल्यासारखंही वाटत होतं ! मला साधा हात मिळवावासा वाटत नव्हता त्याच्याशी आणि तो मात्र मला इतक्या प्रामाणिक सदिच्छा देऊन मोकळा झाला होता !!! डोळ्यातले अश्रू गालावर कधी ओघळले माझं मलाच कळलं नाही. त्याला खूप त्रास होत होता आणि तो पलंग पंख्याखाली हलवायला सांगत होता. तो म्हणाला,"तुमने जो इन सबको सिखाया है, वो चीजे बेचने के लिये मैं दुकान निकालूंगा ! " जेव्हा मी त्याला म्हणाले की आपण तुझं हे दुकान नक्की काढुया तेव्हा त्याला अत्यंत आनंद झालेला दिसला पण का कोण जाणे मला मात्र माझं मन खात होतं कारण इतर कोणाला कळलं नसलं तरी मला कळत होतं की मी त्याच्यापासून जाणूनबुजून एक हात दूर राहत होते !

चौथी भेट -

आज मी मनाशी पक्कं केलं होतं की त्या आजारी मुलाशी खूप गप्पा मारायच्या. त्याचे प्रश्न, दुःखं समजून घेऊन त्यावर उपाय शोधायचा प्रयत्न करायचा. त्याला विनोद सांगून हसवायचं, त्याला जे खायला आवडत असेल ते व्यवस्थापनाची परवानगी घेऊन त्याला आणून द्यायचं. मूळ म्हणजे मागल्यावेळी या माझ्या भावापासून उगाचच दूर रहायची केलेली चूक सुधारायची असा मी चंग बांधला आणि मगच तिथे गेले. आश्रमाच्या ऑफिसमध्ये गेल्यावर मी माझी इच्छा तिथल्या टिचरना बोलून दाखवली तर पहिल्यांदा तर त्यांना खूप आश्चर्य वाटलं की मला तो मुलगा कसा माहिती आणि मी त्याला कशी काय भेटू शकले वगैरे. सर्व कळल्यावर त्या म्हणाल्या,"तुझी इच्छा खूप चांगली आहे पण ती आता पूर्ण नाही होऊ शकणार." कारण विचारता कळलं की तो मुलगा १५ दिवसांपुर्वीच वारला होता ! आसपासच्या सगळ्या वस्तू माझ्या भोवती गोलगोल फिरतायत असं वाटलं मला. "दीदी, तुम चिंता मत करो.."शब्द माझ्या कानात घुमायला लागले. डोळ्यात पाणी आणि विषण्ण मन झाल्याने काही समजेनासंच झालं मला. त्या टीचरने समजुतीचे शब्द सांगितले आणि याबद्दल आपण काही करू शकत नाही म्हणाल्या. त्याच्या आजाराबद्दल मी काही करू शकणार नव्हते हे जरी सत्य असलं तरी किमान त्याने पुढे केलेला हात तर अव्हेरायचा नव्हता ना मी.. त्याला भेटून त्याची माफी मागायची होती पण आता सगळंच संपलं होतं. एका अजबशा पोकळीने मला घेरून टाकलं होतं आणि मी घरी जायला निघाले. कुठल्या तोंडाने मी मुलांसमोर जाऊ असं वाटलं मला. ऑफीसमधून बाहेर पडत नाही तर एक छोटा मुलगा माझ्याकडे येऊन म्हणाला,"ताई, आज आपण काय खेळायचं?" काय उत्तर देणार होते मी त्याला? त्या मुलांमधून वाट काढून घरी जाणे शक्यच नव्हते. त्या दिवशी मी खेळले (?!) तर सही त्या मुलांशी पण त्यात राम नव्हता हे माझं मला जाणवत होतं.

आजही तिथे जाते तेव्हा 'ताई.. ताई..' म्हणणारे असंख्य आवाज ऐकू येतात पण तरीही 'दीदी' म्हणणारा तो आवाज ऐकू यावा असं खूप मनापासून वाटतं ! ही टोचणी आता कधीही पूर्णपणे जाईलसे वाटत नाही पण त्याच्यासारख्याच इतर मुलांशी एका 'ताई'प्रमाणेच वागून ती कमी करता आली तरी मिळवले असे म्हणता येईल. बघुया कितपत जमतेय ते..

- वेदश्री.
०९.०७.२००७

लेखनविषय: दुवे:

Comments

प्रतिसाद

लेख वाचता वाचता खूप वाईट वाटून गेलं.

ज्यांचे आयुष्य फुललेही नाही आणि कदाचित फुलायचेही नाही त्या कळ्यांना अशाप्रकारचे आश्रित, परावलंबी जिणे जगावे लागते आहे हे मनाला खट्टू करून जाते.

बाहेरची माणसं नेहमी त्यांच्याकडे मदतीच्या वस्तू फेकून देऊन चालू लागतात, त्यांच्याशी अंतर ठेवून वागतात असं कळलं.

बरेचदा आपण चांगल्या मनाने मदत करण्याचे ठरवतो परंतु ती मदत एकदा सोपवून टाकली की पुढे काही करायला वेळ आणि तयारी नसते. मुद्दाम असं केलं जातं असं नाही परंतु ते रोजच्या धकाधकीतून अनेकांना शक्यही नसते परंतु ज्यांना ही मदत दिली जाते "त्यांना बाहेरची माणसं नेहमी त्यांच्याकडे मदतीच्या वस्तू फेकून देऊन चालू लागतात" अशी अनुभूती येत असावी अशी जाणीव हा लेख वाचल्यावर झाली. तुला हे काम करण्याची इच्छा झाली त्याचे कौतुक वाटते.

मदत म्हणून देण्यात आलेल्या वस्तू प्रत्यक्ष त्या मुलांपर्यंत पोहोचतच नव्हत्या, तिथल्या काम करणाऱ्या बायका त्यांना दुखलंखुपलं तरी लक्ष द्यायच्या नाहीत वगैरे वगैरे..

हे आपल्या देशातील खरंच भीषण सत्य आहे आणि हे सर्वत्र वाचल्याने अनेकजण मदत करायला धजावत नाहीत असेही पाहिले आहे... कारण कष्टाचे पैसे असे एकाच्या नावे देऊन तिसर्‍याच्याच कारणी पडावेत ही कोणाचीच अपेक्षा नसते. मुलांना ज्या वयांत आपल्या आईवडिलांची किंवा घरच्या प्रेमाची गरज असते ती त्या काम करणार्‍या बायकांकडून भागली जाणे कठिण असले तरी दुखल्या खुपल्यातही दुर्लक्ष होते हे खेदजनक आहे.

असो,
तुमच्या कंपनीने याबाबत उचलले पाऊल आणि तूही तुझ्यापरीने घेतलेला भाग स्पृहणीय आहे. जमल्यास त्या संस्थेचे नाव आणि पत्ताही द्यावास असे वाटते.

आभार

प्रियाली,

लेख वाचता वाचता खूप वाईट वाटून गेलं.

जे प्रत्यक्षात ऐकलं, अनुभवलं त्या प्रमाणात तर हा लेख हिमनगाचा दृश्य भाग देखील नाही, असे सांगावेसे वाटते. कुठल्या भीतीने म्हणा वा आणिक कशाने मी खूपच कमी लिहिलेय लेखात, प्रत्यक्ष परिस्थिती ही अत्यंत भयकारी आहे.

हे आपल्या देशातील खरंच भीषण सत्य आहे आणि हे सर्वत्र वाचल्याने अनेकजण मदत करायला धजावत नाहीत असेही पाहिले आहे... कारण कष्टाचे पैसे असे एकाच्या नावे देऊन तिसर्‍याच्याच कारणी पडावेत ही कोणाचीच अपेक्षा नसते. मुलांना ज्या वयांत आपल्या आईवडिलांची किंवा घरच्या प्रेमाची गरज असते ती त्या काम करणार्‍या बायकांकडून भागली जाणे कठिण असले तरी दुखल्या खुपल्यातही दुर्लक्ष होते हे खेदजनक आहे.

तिथले सगळेचजणं धन वा प्रसिद्धीलोभी आहेत असे नाही. काहीजणं अगदी प्रेमळ आणि मनस्वी आहेत. तिथे काम करणारी एक टीचर चोरूनलपून गोष्टी आणून द्यायची मुलांना. याबद्दल तिला बोलणी पडायची म्हणे पण तिचे म्हणणे की 'मलाही दोन पोरं आहेत. जीव तुटतो या पोरांसाठीही माझा.' ! ती मात्र गोष्टी मनाला लावून घेण्यात अगदीच पटाईत म्हणायला हवी. तिच्या मते योग्य असलेली गोष्ट तिने केली आणि त्याबद्दल तिला कोणाकडून बोलणी पडली तर ती गोष्ट ती इतकी मनाला लावून घ्यायची की त्यावेळचे जेवण करायची नाही ! पोरांना हे समजले की ते तिला द्यायचे त्यांच्या जेवणातलं जेवायला, जे ती खायची ! जो वारला त्या दीपकला ती आईसारखी वाटायची. ती रात्री नसते म्हणून मला खूप एकटं वाटतं म्हणाला होता तो. २-३ ऑपरेशन्स झाली होती त्याची ज्या जखमा बर्‍या व्हायचे नामोनिशाण दिसत नव्हते.. दिवसभर आसपास पोरांचा वावर असायचा, बोलवलं तर पोरांचं लक्ष असायचं त्यामुळे तो वेळ जायचा त्याचा निघून पण रात्री त्याला सगळ्या वेदना प्रकर्षाने जाणवायला लागायच्या म्हणे. वेदनाशामक गोळ्या दिल्या जायच्या की नाही कल्पना नाही पण सहनशक्तीच्या पलिकडे जेव्हा वेदना जायच्या तेव्हा तो लडखडत-लंगडत कसाही फिरायचा सगळीकडे, अंगावरचे कपडे फाडून टाकायचा, ओरडूनओरडून जीव गोळा करायचा.. कदाचित हे सगळे रोजचेच झाले असेल म्हणून की काय त्यावेळच्या लक्ष द्यायला असलेल्या टीचर्स त्याला खोलीत बंद करून टाकायच्या आणि त्याने लाखवेळा ठोकले तरी लक्ष द्यायच्या नाहीत ! हा तर झाला वेदनांमुळे असलेला प्रकार पण साधे त्याला संडासला जायचे असल्यासही कोणी सोबत यायचे नाही.. इतर पोरंच मदत करायची नाहीतर वर उल्लेखिलेल्या टीचरसारखी कोणी मूर्ख टीचरच काय ती मदत करायला जायची तेव्हा असेल तर ! आंब्यांचा मौसम होता त्यावेळेस तर हापूस विचारू नका, पायरी विचारू नका.. टोकर्‍यांनी दिले गेले होते आंबे तिथे ! पण ते पोरांपर्यंत न जाता परस्पर खाल्ले जाऊन तरीही उरलेले सडल्यावर सरळ कचरापेटीत जायचे, पण या पोरांना नाही. त्यातली काही पोरे शातिर डोक्याची होती, चोरीमारी करायला शिकली होती, खोटे बोलायला शिकली होती. दीपकदादाला कोल्ड ड्रींक हवंय, असं सांगून कोल्डड्रींक घेऊन येऊन स्वतःच प्यायची !!! दीपकला याबद्दल काही विधीनिषेध नसायचा कारण तो तर खाण्यापिण्यातून जवळपास उठल्यातच जमा होता. ती त्याने मानलेली मायाळू आईच काय ते जबरदस्ती त्याला खायला घालेल तेच काय ते ! त्याच ताइंनी मला सांगितले की दीपकच्या आईचा एड्स लास्ट स्टेजमध्ये होता तेव्हा याचा डिटेक्ट झाला होता. जेमतेम सात-एक वर्षांचा असेल तेव्हा त्याची इथे आश्रमात रवानगी केली होती त्याच्या आईने.. आणि मी जेव्हा त्याला भेटले तेव्हा तो १६ वर्षाचा होता !!! तब्बल ९-१० वर्षे तो मुलगा असे जगत होता.. खरंच आयुष्य किती चिवट असते याचा इतका जिवंत आणि हृदयद्रावक अनुभव परत कधीही, कोणालाही येऊ नये असे वाटते मला.

या सगळ्या पार्श्वभूमीवर बघायला जायचे म्हटले तर माझा प्रयत्न हा तद्दन स्वार्थीपणातून सुरू झालेला होता असंच म्हणावे लागेल. ते छोटे देवदूत खरंच आयुष्याचं खरं तत्त्वद्न्यान शिकवायलाच माझ्या आयुष्यात आलेसे वाटते.

पाय धरावेसे वाटतात

प्रसंगी तुम्ही दरिद्री आणि ती अनाथ मुले श्रीमंत आणि उदार दिसलीत असा प्रसंग तुम्ही सांगितला. भले करणार्‍याला देखील काही शिकावे लागते, हेच खरे. यात तुमचेही मोठे मन दिसते.

तुमच्या लेखाने भावनांना स्पर्श केला. आणखी काय लिहावे ते कळत नाही.

+१

अधिक काही लिहीवत नाही. तुम्ही जे करता ते करायला करुणेइतकेच धैर्यही लागते. धनाची आणि वस्तूची मदत करणे सोपे आहे. पण आपला वेळ देणे, त्यांना हवा असणारा ओलावा दाखविणे, साध्यासाध्या गोष्टीतून आपलेपणाची ऊब देणे या गोष्टी विशेष आहेत. आजकालच्या भीषण वेगाच्या जगात असे करू शकणारे लोक विरळा आहेत.

आभार

मुक्तसुनीत,

अगदी खरे सांगायचे तर तुम्ही म्हणता ते धैर्य माझ्यात अजिबात नाही. प्रस्तुत प्रसंग घडल्यावर मला कशातच गम्य वाटेनासे झाले होते, शेवटी लिहिलेला सुटकेचा मार्ग सुचासमजापचवायला बराच काळ गेला. पोरांना खेळवायचं, शिकवायचं ना? त्यात काय मोठे? चुटकीसरशी करेन मी.. अशा काहिशा आत्माभिमानाने पूर्ण मी तिकडे गेले होते.. जे परत येताना त्या पोरांकडून जीवनातले अवघड पाठ कसे गिरवायचे असतात ते शिकून आले. सगळंच तसे म्हटले तर अनपेक्षित होते माझ्यासाठी .. धैर्याची जेव्हा खरोख्खर परिक्षा बघितली गेली तेव्हा मी तयारच नव्हते त्याकरता.. वाट लागली होती. आजही स्वप्नात दिसला दीपक तर झोप उडून जाते ती परत लागतच नाही.

सहमत

धनंजय यांच्याशी सहमत आहे. अशा वेळी शब्द सापडत नाहीत. तुमच्या धैर्याला आणि करूणेला सलाम!
----
"Those are my principles. If you don't like them, I have others." -- Groucho Marx
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

काय बोलू?

धनंजय,

प्रसंगी तुम्ही दरिद्री आणि ती अनाथ मुले श्रीमंत आणि उदार दिसलीत असा प्रसंग तुम्ही सांगितला.

असे मी सांगितले असे नाही, खरेतर तसेच आहे. ज्या मुलाला त्याच्या दुखण्याखुपण्यात अत्यंत हाल होता आणि ९-१० वर्षे तो तळमळत होता, त्याने अगदी सहजासहजी माझ्या बाबांसाठी सदिच्छा दिल्या होत्या ! तो माझ्याशी जसे वागला आणि त्याबदल्यात मी त्याच्याशी जसे वागले, ते बघता तर लाजच वाटते माझी मला. मी खरंच दरिद्री आहे त्याच्या मनाच्या वैभवासमोर ! ते वैभव मला थोडेसे जरी मिळवता आले तरी भरून पावेन मी.

जे का रंजले गांजले

जे का रंजले गांजले... हे खर्‍या अर्थी पहायला मिळाले. वर प्रियालींनी म्हणल्याप्रमाणे अधीक माहीती करून घेयला आवडेल.

आभार

विकास,

जे का रंजले गांजले...

खरंच ! एकदम इतके सगळे छोटेछोटे साधू आजुबाजुला वावरत होते माझ्या.. किती भाग्यवान होते मी.

कौतुकास्पद

चांगला उपक्रम, आणि जाणीवपूर्वक असे काम करण्याबद्दल तुझेही कौतुक करावे असे वाटले. वाचून वाईट अर्थातच वाटले. आत्मपरिक्षण केल्यास प्रत्येकालाच आपण कधीतरी कुठेतरी थोडे का होईना कमी पडल्याची जाणीव होत असावी. ती लक्षात येणे आणि तिचा स्विकार करणे हेही धैर्याचे काम आहे. त्यातून आपल्याला पचेल इतका तरी उपाय करता येतो. आणि तो तू केलास हेही कौतुकास्पद आहे.
अशा लहान मुलांचे प्रश्न पाहिल्यानंतर आपल्या आयुष्यात येणार्‍या त्यामानाने लहानच म्हणावेत अशा प्रश्नांनी आपण किती विचलित होत असतो असे वाटते.

आभार

चित्रा,

त्यातून आपल्याला पचेल इतका तरी उपाय करता येतो. आणि तो तू केलास हेही कौतुकास्पद आहे.

याचे खरे श्रेय जाते ते माझ्या आई आणि दोस्तांना.. नसता माझ्यात कुठे आली इतकी हिंमत की मी त्या धक्क्यातून बाहेर पडून त्रयस्थपणे असा विचार करू धजेन. जाणार्‍याच्या पाठी जाता येत नाही, हा मंत्र सांगून तो पाळायला मदत केल्याबद्दल खरंच आई आणि दोस्तांचे मानावे तितके आभार कमीच आहेत.

नतमस्तक

>लेख वाचता वाचता खूप वाईट वाटून गेलं.

>तुमच्या लेखाने भावनांना स्पर्श केला. आणखी काय लिहावे ते कळत नाही.

>तुम्ही जे करता ते करायला करुणेइतकेच धैर्यही लागते.

सलाम!!

माझ्यात हे धैर्य कधीतरी येउ दे ही मनोमन इच्छा!

आभार

सहज,

माझ्यात हे धैर्य कधीतरी येउ दे ही मनोमन इच्छा!

अशी इच्छा निर्माण झाली ना? अर्धे अंतर कापले गेले समजा. उरलेले पुढील अर्धे अंतर कापले जाण्यास मनापासून शुभेच्छा ! वाट अवघड आहे पण मिळणार्‍या प्रेमाला तोड नाही.. आणि मिळवू शकणे आपल्यावर अवलंबून असलेल्या आनंदालाही !

सलाम

तुमच्या धैर्याला आणि तुमच्यातल्या जाग्या असलेल्या माणुसकीला सलाम!

बाकी एक शंका: नोकर्‍या सांभाळूनही अश्या गोष्टी विकांताला करता येतील का? असल्यास अधिक माहिती कळवाल का?
-ऋषिकेश

आभार

ऋषिकेश,

बाकी एक शंका: नोकर्‍या सांभाळूनही अश्या गोष्टी विकांताला करता येतील का?

का नाही? जरूर ! असे करणारे चिक्कार लोकं आहेत. अगदी वर उल्लेखिलेल्या आश्रमात त्या पोरांचा नाच जो आयोजित झाला होता षण्मुखानंद हॉलमध्ये तो शिकवायला शामक दावर आला होता !

असल्यास अधिक माहिती कळवाल का?

कसली माहिती? तुम्हाला नक्की काय करण्यात रस आहे हे तुम्ही ठरवायचे, आसपास तशा पद्धतीचा एखादा आश्रम शोधायचा. फोनवरून वा प्रत्यक्ष जाऊन आपली इच्छा त्यांना सांगायची.. बस्स्.. आपोआप मार्ग दिसत जातो. आपल्याला जे येते ते ( जसे की संगणकवापर, चित्रकला, नृत्य, गायन वगैरे ) शिकवण्यात रस असल्यास तसे करता येईल किंवा निरनिराळे खे़ळ योजता येतील. व्यवस्थापनाची परवानगी मिळत असल्यास एखाद्या छोट्याशा सहलीचे देखील आयोजन करता येऊ शकते.

वृद्धाश्रमात मी एक प्रश्नावली तयार करून नेली होती आणि सर्व आजीआजोबांना ते प्रश्न विचारून उत्तरे लिहून काढली होती. धम्म्माल मजा आलेली... प्रश्नच तसे होते ! आयुष्यातला सगळ्यात खट्याळ खटाटोप कोणता केलेलात? लग्न अरेंज्ड की लव्ह? ( याचे उत्तर लव्हसुद्धा मिळाले आहे !!! ) कसे भेटलेलात? लग्नागोदर स्वप्ने पाहिली असतील तर त्यातला राजकुमार/री कशी असावी असे वाटायचे? अशे प्रश्न बनवले होते. दिलखुलासपणे मोनमोकळ्या गप्पा मारत प्रश्नोत्तरे चालली होती.. एका आजींनी सांगितले होते की त्यांच्या स्वप्नात नेहमी यायचे की त्यांचे मालक त्यांना बैलगाडीतून फिरायला घेऊन गेलेत असे पण ते त्यांना प्रत्यक्ष आयुष्यात कधीच अनुभवायला मिळाले नाही. त्यांचे 'मालक' देखील हे ऐकायला तिथे होतेच.. त्यांना या गोष्टीचा पत्ताच नव्हतासे दिसले. पुढे येऊ घातलेल्या आजींच्या वाढदिवसाला आजोबांनी कुठूनशी बैलगाडी अरेंज केली होती आणि त्यातुन ते आजींना घेऊनही गेले फिरायला.. इतका आनंद झाला होता ते पाहून की बस्स् ! :-) हेच क्षण असतात जे जगायची उर्मी देतात असे मला वाटते.

कोणाकडून माहिती घेऊन काही करण्यापेक्षा .. स्वतःच्या मनाला विचारून जसे वाटेल तसे ( अर्थातच तिथल्या व्यवस्थापनाची परवानगी काढूनच ) वागावे हेच योग्य असे वाटते. अर्थात माझा या बाबतीतला अनुभव तसा काही जास्त नाही त्यामुळे कदाचित माझे मत बरोबर नसेलही.

वेदश्री.

हं

कोणाकडून माहिती घेऊन काही करण्यापेक्षा .. स्वतःच्या मनाला विचारून जसे वाटेल तसे ( अर्थातच तिथल्या व्यवस्थापनाची परवानगी काढूनच ) वागावे हेच योग्य असे वाटते

हे खरेच.. अगदी पटले.
अनेक आभार!

-ऋषिकेश

आपण

आपण खरंच खुप छान काम केलेत.
लेख परत् परत वाचला.
आपले प्रामाणिक लेखन् वाचायला खुप आवडले. मनाला भावून गेले!
मनाला चटका लावणारे हे प्रसंग विसरू जाता विसरता येत नाहीत हेच खरे.

या शिवाय साधेसे प्रेम देण्याचा, मनापासून सुख दु:खे सांगण्या ऐकण्याचा, संवादाचा हा प्रश्न किती मोठा आहे
हे परत एकदा समोर आले असेही वाटले.

हीच चर्चा आपण उपक्रमी
दूरगामी पद्धतीने यासाठी काय कायम मदत करू शकू
या विषयाने पुढे नेली तर मला वाटते की वेदश्रींच्या या भावपूर्ण लेखनाला न्याय दिल्यासारखे होईल.

आपले येथील एक उपक्रमी मित्र धनंजय यांनी नुकतीच एक संस्था सुरु केली आहे.
मनातल्या मदतीच्या भावनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी
कदाचित त्याला संलग्न राहूनही काही होवू शकेल असे वाटते.
आपल्या इतर कल्पनांचेही स्वागत आहे.

आपला
गुंडोपंत

कौतुक

आपले कार्य कोणासही प्रेरणा देणारे आहे, आपण या कामासाठी जे धैर्य दाखवले त्याचे कितीही कौतुक केले तरी कमीच आहे.
आश्रमानुभवातला चौथा प्रसंग र्‍हदयात कालवाकालव करणारा आहे. प्रतिक्रिया काय लिहावी बराच वेळ सुचलेच नाही.

सुरेख

सुरेख लेखन.
मदती पेक्षाही दोन जीवाभावाचे शब्दच जास्त महत्वाचे ठरतात,
असा अनुभव मीही घेतला आहे.

-निनाद

 
^ वर