शोभा डे आणि मराठी बाण्याचा "साक्षात्कार"

"मराठी अभ्यास केंद्रा"च्या चर्चेमधे शोभा डे यांच्या वक्तव्याच्या निमित्ताने पाच-सहा लोकांनी वेगवेगळी मते मांडली. या निमित्ताने वेगळ्या चर्चेला प्रारंभ करता येईल असे वाटते. म्हणून माझा या विषयाचा आजचा प्रतिसाद मी येथे चिकटवून सुरवात करतो आहे. अजानुकर्णाच्या त्या अनुषंगाने आलेल्या प्रतिसादालाही इथेच डकवित आहे.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
शोभा डे आणि मराठी भाषा व मराठी संस्कृती यांचे नातेसंबंध तपासून पहाणे ही एक रोचक प्रक्रिया ठरू शकेल. आणि त्यामागील डेबाईंच्या ३ दशकांच्या कारकिर्दीचा, बदलत्या बाजारपेठेचा संबंधही लक्षात घ्यावा लागेल. सुमारे २००० सालापर्यंत बाईंनी मराठी भाषेत एक अक्षर लिहीणे-बोलणे , मराठी साहित्य-वृत्तपत्रकारिता-संवादमाध्यमे यांच्याशी दूरान्वयानेही संबंध येऊ देणे , आपला मराठी भाषेशी सुतराम संबंध येऊ देणे हे सर्व कटाक्षाने टाळले आहे. सत्तरीच्या दशकात त्या मॉडेलींगनंतर "स्टार-डस्ट्"सारख्या इंग्रजी मासिकामधे गॉसिप् लिहायच्या आणि नंतर त्याच्या जोरावर त्या संपादिका बनल्या. त्यांच्यापूर्वी जर गॉसिप् पत्रकारिता सूचक, "टंग् इन् चीक्" होती तर त्यांनी घडविलेल्या "क्रांती"मुळे ती कसलेही धरबंध न राहिलेली "खुल्लम्-खुल्ला" बनली. आपल्या या भारदस्त अनुभावाच्या जोरावर त्यानी इंग्रजी ललित-लिखाणाच्या पाण्यात मुटका मारला. बस्स्. "फूल्स् रश् इन्, व्हेअर् एन्जल्स् फिअर् टू ट्रीड्.." अशातली गत. ललित लिखाणात तर "निर्मितीक्षमतेला" भरपूर वाव. मग वास्तवजगातल्या माणसांवर बेगळ्या नावाचे मुखवटे चढवून त्यांच्यावर नवनवीन "मसालेदार" वैशिष्ट्यांचे आरोपण करून कथा-कादंबर्‍या आल्या. याच लोकप्रियतेच्या यानावर स्वार होऊन मग टाईम्स् ऑफ ईन्डीया मधे पदार्पण. ९० च्या दशकात "टाईम्स्" सुद्धा "टॅब्लोईड्" बनण्याच्या दृष्टीने कूस बदलत होताच. डे सारख्यांचे टाईम्स् मधील पदार्पण आणि दीर्घ वास्तव्य ही घटना अर्थपूर्णच आहे.

मग , मराठी संस्कृतीच्या वार्‍यालाही उभे नसणार्‍या अशा व्यक्तिमधे अचानक "मराठी बाणा" कुठे आला ? त्याचे असे झाले की, मुक्त बाजारपेठेच्या कालावधीमधे मराठी समाजाचेही उद्योग-मनोरंजनादि "ग्लॅमर" आणि वैभवी-दिमाखदार क्षेत्रांमधे प्रतिबिंब पडायला लागले. मराठी लोकंकडेही पैसा खेळू लागला. मुख्य म्हणजे , डे बाईंच्या पुस्तकांची मराठी भाषांतरे झाली, हातोहात खपली. बस्स्. अचानक "आपल्या रूट्स्" कडे वळणे क्रमप्राप्त होतेच. "सामाजिक समालोचक" अशा पदवीप्राप्त व्यक्तिने इतर ठिकाणी जे केले तेच येथेही : टीका, समालोचन, मतांच्या पिंका , उपदेश, मराठी माणसांच्या चुका दाखविणे. सौ गॉसिपकॉलम के चूहे खाकर डेमॅडम् निकली पंढरपूर यात्रापे.

असो. एखादी व्यक्ति काय म्हणते आहे याचे महत्त्व मी नाकारत नाही. पण त्या त्या म्हणण्याला काय काय संदर्भ आहेत हे माहित असणे केव्हाही योग्य. मराठी मणसांबद्दलच्या डे बाईंच्या मुद्द्याला विरोध नाहीच. त्या म्हणतात ते एक सामान्य ज्ञान आहे. पण त्यांच्या भूमिकेमागची कथा ही अशी आहे.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

अजानुकर्ण उवाच :

सुंदर प्रतिसाद.

शोभाबाईंविषयी म्हटलेच आहे

माकडाच्या गळा रक्त कुळांगना | सांडूनिया सुना बिदी धुंडी ||
तुका म्हणे ऐसा व्याली ती गाढवी | फजिती ते व्हावी आहे पुढे ||

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
मूळ लेखातील विषयांतरीत परंतु वरील लेखाला धरून आलेले प्रतिसाद येथे हलवण्यात येत आहेत. - संपादन मंडळ.

लेखनविषय: दुवे:

Comments

न्यूनगंड

<परदेशातसुद्धा लोकांना आपली मातृभाषा मराठी आहे याचा न्यूनगंड असतो. > याचे उदाहरण इथे वाचा. --वाचक्‍नवी

फाडफाड

चांगले उदाहरण आहे. आपल्याकडे मुलांना लहानपणीच फाडफाड इंग्रजी आले पाहिजे म्हणजे ते 'स्मार्ट' होतील अशा मनोवृत्तीचा याच्याशी संबंध असावा असे वाटते.
अवांतर : शोभा डे यांची मातृभाषा कोणती आहे याविषयी उत्सुकता आहे.

----
"Those are my principles. If you don't like them, I have others." -- Groucho Marx

शोभा डे

शोभा डे यांची मातृभाषा मराठी आहे.
त्यांचे माहेरचे आडनाव राजाध्यक्ष.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

धन्यू

हे माहित नव्हते. गलती से मिष्टेक हो गया :-)

----
"Those are my principles. If you don't like them, I have others." -- Groucho Marx
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

शोभा डे

शोभा डे यांचा भिंत शिष्टपणाची हा लेख इथे वाचा.
प्रकाश घाटपांडे

उतार वय

उतार वय गाठेपर्यंत -तशा शोभा डे उतारवयीन दिसणार नाहीत... अँड द क्रेडिट गोज टू, हर ऑव्सम ब्रदर! - शोभा डेंनी आपण मराठी असण्याबद्दल कधी अवाक्षर काढलेलं आठवत नाही. आताच मराठी माणसांवर टिका करण्याची संधी चालून आली असं दिसतंय.

तनुजा आणि नूतन नावाच्या दोन गुणी "हिंदी" अभिनेत्रींवरही वय उतरल्यावर मराठीचे प्रेम दाटून आल्याचे आरोप झाले होते ते आठवले.

मला तर मागे कुठेतरी आम्ही महाराष्ट्राबाहेर वाढल्याने मराठीशी आमचा काही संबंधच नाही असे विधान या बाईंनी केलेले आठवते.

न्यूनगंड कोणाला कसे असतील याचे काही सांगता येत नाही.

-राजीव.

सहमत आहे

शोभा डेंच्या वागण्याला 'सोयीचा मराठी बाणा' म्हणता येईल. ;)

हे पहा एक फॉरवर्ड


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

तुका म्हणे....

अहो हा आजार फार जुना आहे. म्हणून तर तुकाराम म्हणतात की "तुका म्हणे ऐशा नरा मोजुन माराव्या पैजारा".

आपण मात्र सर्वसामान्यांनी मराठी बोलण्याचाच वसा घेतला पाहिजे.

उथळ फॉरवर्ड

'राखी सावंत' आणि 'मीना वझे' (कोण ह्या?) ह्यांच्या वक्तव्यांवरुन जर मराठी 'खतरेमे' आहे असे वाटत असेल तर अवघड आहे.

आश्चर्य आहे.

>>शोभा डेंनी आपण मराठी असण्याबद्दल कधी अवाक्षर काढलेलं आठवत नाही. आताच मराठी माणसांवर टिका करण्याची संधी चालून आली असं दिसतंय.<< आश्चर्य आहे! मी माहेरची राजाध्यक्ष असे शोभा डेंनी म्हटलेले यापूर्वी एकदा मी ऐकले आहे. --वाचक्‍नवी

मराठी

शोभा डे मूळच्या राजाध्यक्ष असल्याचे माहीत असल्यास त्यांच्या टाईम्स मधल्या लेखात बर्‍याचदा डोकावल्यासारखे वाटले. हल्लीच राज ठाकरेंच्या पवित्र्यानंतरही त्यांनी याच अनुषंगाने लिखाण केल्याचे स्मरते.

अवांतर- 'डे' हे 'दे' या बंगाली नावाचे इंग्रजाळलेले रूप आहे.

हल्ली मराठीत लिहितात.

===========================
मराठी भाषा हा माझा प्राणवायु आहे.
===========================
हल्ली अधनं मधनं मराठीत लिहितात. मध्यंतरी एक दिवस मटाच्या "पाहुण्या संपादक" म्हणून होत्या.
कदाचित हल्ली इंग्लिशमध्ये कुणी फारसे विचारत नसावे असेही असेल.

शोभा डे

शोभा डे यांच्याबद्दल मुक्तसुनीत यांनी केलेली मिमांसा पटण्यासारखी आहे.

तरी, राहून एक प्रश्न पडला. सकाळमध्ये त्यांचे जे "मराठी"तून लेख प्रसिद्ध होतात ते त्या स्वतः लिहितात का..... म्हणजे त्यांचे अचानक उत्पन्न झालेले मराठीचे ज्ञान इतके चांगले आहे की ही सकाळच्या संपादकांची कृपा?

अज्ञानातील सुख

शोभा डेंचे विशेष लिखाण वाचलेले नाही. नाही म्हणायला साताठ वर्षांपूर्वी टाइम्समध्ये त्यांचा कॉलम यायचा, तो वाचत असे. तो वाचताना तरी त्या मराठी आहेत अशी शंका कधी आली नाही. त्यांचे विषय नेहेमी कॉस्मोपॉलिटनच असायचे. म्हणूनच त्या मराठी हे ज्ञानकण वर वेचल्यावर थोडा धक्का बसला. पॉप्युलरमध्ये टीपी करताना त्यांच्या कादंबर्‍या चाळल्या आहेत, पण कधी वाचायचे धाडस केले नाही. त्यामुळे त्यांच्या ललितलेखनावर मत देऊ शकत नाही.

इथे त्यांच्यावर इतकी चर्चा झाल्यावर उत्सुकता म्हणून थोडी शोधाशोध केली. तर त्यांची 'कॉफी विथ करण' वर मुलाखत सापडली.
(वैधानिक इशारा : यात करण जोहर आहे. आम्हाला आत्मपीडा चालते, तुमचं तुम्ही बघा! )
यात शोभा डे स्वतःला रतन टाटा, सचिन, नारायण मूर्ती यांच्या रांगेत बसवतात. इथे आमची मती कुंठित झाली.
(नंतर विजय मल्या स्वतःची बिल गेट्सशी तुलना करतात.)

----
"Those are my principles. If you don't like them, I have others." -- Groucho Marx

पटला

हा लेख/चर्चा छानच आहे. विशेष करून त्याचा गोषवारा (मला वाटलेल्या) एका वाक्यातला भावला:

एखादी व्यक्ति काय म्हणते आहे याचे महत्त्व मी नाकारत नाही. पण त्या त्या म्हणण्याला काय काय संदर्भ आहेत हे माहित असणे केव्हाही योग्य.

उखाळ्यापाखाळ्या-लेखन

कॉलेजमध्ये असताना शोभा दे (डे? उच्चार काय आहे. करणबुवा "डे" म्हणतो, पण शोभाबाईंकडून आडनावाचा उच्चार ऐकू आला नाही) यांचे लेखन कुठल्यातरी मासिकात वाचले होते. उखाळ्यापाखाळ्या (गॉसिप) सुद्धा काही लोक मस्त लिहितात. पण दे यांचे लेखन लक्षात राहिलेले नाही. त्यामुळे त्यांचे इंग्रजी लेखन उत्तम आहे की नाही हे माहीत नाही.

मराठी घराबाहेर बोलण्याचा मला फारसा सराव नाही, आणि मराठी लिहिणे मी हल्लीहल्लीच सुरू केले आहे. त्यामुळे वयात उशीरा मराठी रचना करणार्‍यांबाबत मला सहानुभूती वाटते. शोभा दे यांचे मराठी लेखन, संपादकाच्या मदतीने का होईना, फार प्रामादिक नाही, हे ऐकून बरे वाटले.

असं कसं बॉ?

उखाळ्यापाखाळ्या (गॉसिप) सुद्धा काही लोक मस्त लिहितात. पण दे यांचे लेखन लक्षात राहिलेले नाही.

म्हणजे डे बाईंचे लेखन लक्षात नाही पण त्या उखाळ्यापाखाळ्या मस्त करतात असें का डे बाईंचे लेखन लक्षात नाही पण या चर्चेत लोकांनी उखाळ्यापाखाळ्या मस्त केल्या आहेत असें?

मन्ना आपल्या आडनावाचा उच्चार डे करत का दे?

मराठी घराबाहेर बोलण्याचा मला फारसा सराव नाही, आणि मराठी लिहिणे मी हल्लीहल्लीच सुरू केले आहे. त्यामुळे वयात उशीरा मराठी रचना करणार्‍यांबाबत मला सहानुभूती वाटते. शोभा दे यांचे मराठी लेखन, संपादकाच्या मदतीने का होईना, फार प्रामादिक नाही, हे ऐकून बरे वाटले.

बाई कफ परेडला राहतात त्यामुळे त्यांच्याकडे ब्यागी प्यांट आणि ढगळ टी-शर्ट घालून फिरणार्‍या लोकांवर टिकास्त्र सोडण्याचे लायसन्स दिसतें. लेखातील अनेक संदर्भ मला तरी प्रामादिक वाटलें.

रतन टाटा, सचिन, नारायण मूर्ती , शोभा डे आणि धनंजय यांना एका पंक्तित बसता येईल.... हे मात्र ह. घ्या.

-राजीव देदें

लेख वाचलाच नव्हता

त्यामुळे लेखात चुका आहेत की नाही हे प्रतिसाद लिहिताना माहीत नव्हते. वर कोणीतरी म्हटले की मराठी भाषा ठीकठाक आहे, त्याविषयी बरे वाटले.

उच्चार काही का असेना, शुद्धलेखन "डे" असेच आहे, असे सकाळमध्ये आता लेख वाचून कळले.

शिवाय ऍमॅझॉन.कॉम वर जाऊन जितके काय इंग्रजी लेखन मोफत वाचता आले तेवढे वाचले. बहुतेक पुस्तके विकत घेणार नाही.

सकाळमधील लेखाबद्दल : साधारण अशाच काही मथितार्थाचे लेख कुठल्या-कुठल्या मराठी संकेतस्थळांवर अनेकदा वाचलेले आठवतात. त्यामुळे तपशिलात चुका असल्यात तरी त्या एखाद्या मराठी लेखिकेने केलेल्या चुका वाटू शकतील. लेख "ट्यूरिंगच्या चाचणीत" मराठी लेखिकेचा/लेखकाचा म्हणून उत्तीर्ण होऊ शकेल.

गॉसिपचे हवे तितके चटपटीत नाविन्य जाणवले नाही. उखाळ्यापाखाळ्या माझ्या टवाळ मित्रमंडळात उच्च कोटीच्या होतात, त्यापेक्षा डे यांच्या सुमार वाटल्या. मुद्दामून शोधून सकाळमधले त्यांचे पुढचे लेख बहुतेक करून मी वाचणार नाही.

असल्या

गुळगुळीत मुखपृष्ठाच्या गॉसीप राणी ला इतके काही मनावर घेवू नका मुक्तसुनीतराव.
इतके काही मराठीतले महत्वाचे व्यक्तीमत्व मला ते वाटत नाही.
शिवाय त्यांचा सांगण्याचा मुद्दा हाच आहे की त्या काहीही करून कसं इंग्रजीतच बोलणार आहेत.
हा निष्कर्ष कशा वरून तर एका माणसाशी त्या आगावूपणे बोलायला गेल्यावर त्याने इंग्रजीत प्रतिसाद दिला म्हणून.
त्या माणसाची काय बाजू आहे हे कुणाला माहीत?

आणि मराठीतच बोलायचे तर अनेक प्रकारांनी हे साध्य करताच येईल.
त्यासाठी चीनच्याच भींतीवर जायची काय गरज?
या शिवाय बंगु, गुज्जु आणि पंजाबी खरंच असं त्यांनी सांगितले आहे असे वागतील?
छट्! किती पंजाबी कुटूंब मी पाहिली आहेत् की ते इथे भारतातच इंग्रजी शिवाय कोण्त्याही भाषेत बोलत नाहीत.
उगाच काय तरी फेकाफेक करते ही बाय नि तुम्ही मनावर घेता राव!

आपला
गुंडोपंत

शोभा डे स्वाहा, तक्षकाय स्वाहा !

गुंडोपंतांसारखाच मुद्दा अजून एका उपक्रमी स्नेह्याने विरोपावाटे मांडला :
>>> शोभा डे बद्दल प्रेम असे नाही पण जो मेला आहे, जे सुर्यप्रकाशाइतके स्पष्ट आहे त्याला कशाला धोपाटायचे म्हणून तिथे माझा प्रतिसाद नाही.

मला असे वाटते की मराठी आडनाव असणार्‍या परंतु मराठीपणाशी जाणीवपूर्वक दूर रहाणार्‍या (आणि प्रसंगी मराठी लोकांच्या नावाने नाके मुरडणार्‍या ) व्यक्तिंचे प्रतिनिधित्व शोभा डे करतात. अशांची संख्या कमी असेल , परंतु हा प्रकार अभ्यसनीय आहे. शोभाडे यांच्या कडे विक्रीकलेची हातोटी आहे; "पेज ३" वाचणार्‍या तरुण पीढीकरता त्या आदर्श ठरतात. काळाच्या बदलणार्‍या पावलांना ओळखून त्या जेव्हा आपले "मराठी" पान खेळतात , तेव्हा त्यांच्या सगळ्या आविर्भावाला भलेभले लोकही भुलतातच. एक अगदी छोटे उदाहरण द्यायचे तर मला धनंजय आणि राजेंद्र या दोन सभासदांच्या विचारांबद्दल कमालीचा आदर वाटतो. पण ज्ञानी अशा या दोन मराठी व्यक्तिंना डेबाईंची ही बाजू ज्ञात नव्हती. तस्मात्, त्यांचे स्वरूप आणि संदर्भ समजावून घेणे हा एक नॉन्-ट्रिव्हियल् एक्सरसाइज् (मराठी शब्द ? ) ठरतो.

डेबाईंच्या थोड्या आधीच्या काळापासून त्यांच्यासारख्या पीतसदृषपत्रकारितेतल्या , त्यांच्या इतक्याच "मसालेदार" लिहिणार्‍या देवयानी चौबळ नामे एका गॉसिप् लेखिकेची या निमित्ते आठवण आली. चौबळ बाईना काळाची साथ लाभली नाही म्हणा किंवा त्यांना डेबाईंच्या इतके सरड्यासारखे रंग पालटणे जमले नाही म्हणा; पण आज त्या काळाबरोबर विस्मृतीच्याही आड पोचल्या आहेत.

चौबळ

<<तस्मात्, त्यांचे स्वरूप आणि संदर्भ समजावून घेणे हा एक नॉन्-ट्रिव्हियल् एक्सरसाइज् (मराठी शब्द ? ) ठरतो.>>

सहमत आहे.

देवयानी चौबळांचे मात्र थोडे वेगळे आहे (होते). त्या ना. सी. फडकेंच्या शिष्या होत्या आणि फडकेंच्या शेवटच्या दिवसात त्यांना (फडकेंना) अतिशय आवडणारे मोगर्‍याचे गजरे घेऊन चौबळ त्यांना भेटावयास गेल्या होत्या, त्याची साद्यंत हकिकत सुधीर गाडगीळांच्या एका लेखात वाचल्याचे स्मरते. मराठी विश्वापासून त्यांनी शोभा डेप्रमाणे पूर्ण फारकत घेतली नव्हती.

डेचा भाऊ गौतम राजाध्यक्ष मराठीत लिहीतो. त्याचे त्याच्या जडणघडणीविषयी माहिती देणारे लेख वाचल्याचे स्मरते. तसेच पूर्वी संदीप पाटिलच्या 'चंदेरी'त तो नियमीत स्तंभलेखन करी.

देवयानी चौबळ

ज्यांनी देवी ऊर्फ देवयानी चौबळ यांचे लिखाण वाचले त्यांच्या दृष्टीने त्या किंवा देशभक्तीने ओतप्रोत भरलेले चित्रपट विषयावरचे 'मदर इंडिया' चालवणारे बाबुराव पटेल, कधीही विस्मृतीत जाणार नाहीत. त्यांचे लिखाण चित्रपटसृष्टीपुरते मर्यादित असल्याने त्यांचा त्या काळचा वाचकवर्ग मर्यादितच असणार.--वाचक्‍नवी

असेही असेल

की त्यांना भेटणार्‍या माणसाला त्या शोभा डे आहेत हे आधीच माहीत असेल आणि मराठीत बोलल्यावर या बाई संकुचितपणाचा आरोप करतील म्हणून उगीच 'रिस्क' घेण्याऐवजी तो बापडा इंग्लिशमध्येच बोलला असेल ;)


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

शोभाताईन्ची छबी

चीनमध्ये भेटलेल्या एखाद्या मराठी माणसाने पूर्वी पाहिलेल्या छबीवरून ओळखावे इतक्या काही शोभा डे सर्वपरिचित नाहीत.--वाचक्‍नवी

सर्वे गुणा:

शोभा डेंच्या २००० पूर्वीच्या वक्तव्यांबद्दल विशेष माहीत नाही, पण त्यानंतर त्यांनी त्यांची मराठी ओळख उघड केली हे निरीक्षण अचूक आहे. पहिला प्रसंग बहुधा मॅजेस्टिक/आयडियल गप्पांच्या वेळेचा असावा. उच्चभ्रू वर्तुळात माझी 'घाटन' म्हणून संभावना होते आणि त्याचा मला अभिमान वाटतो, असं त्यांनी केलेलं वक्तव्य लोकसत्ता-मटा ह्या (तेव्हा) दर्जा राखून असलेल्या वृत्तपत्रांच्या रविवार पुरवण्यांत मोठ्या कौतुकानं छापून आलं होतं. इतर विधानं इतकी उघड नव्हती. जसं की, व्हीटीचे 'छत्रपती शिवाजी टर्मिनस' नामकरण झाल्यावर लिहिलेल्या लेखात त्यांनी एक महाराष्ट्रीय म्हणून महाराष्ट्र शासनाला शिवाजी महाराजांव्यतिरिक्त इतर मोठ्या व्यक्तींची (टिळक, गोखले, फुले, राणी लक्ष्मीबाई इ.) आठवण होत नाही, याची मला शरम वाटते असं लिहिणं किंवा यप्पीज सारखी आता मप्पीज (= मराठी यप्पीज अर्थात मराठी अमेरिकनाइज्ड मुलांची पिढी) ची संख्या वाढत जाते आहे, हे निरीक्षण ह्यातूनही हाच प्रयत्न दिसतो.

अर्थात, मुक्तसुनीतांनी म्हटल्याप्रमाणे हे बदलत्या वार्‍याची दिशा पाहून तोंड फिरवणार्‍या वातकुक्कुटाप्रमाणे आहे. हाच धागा थोडा पुढे न्यायचा तर एसओटीसी ने खास मराठी भाषकांसाठी सुरु केलेल्या युरोप टूर्स, मराठी चॅनल्स सुरु करण्याची लागलेली चढाओढ यामागे मुक्त बाजारपेठेमुळे हाती पैसा आलेला मराठी मध्यमवर्ग हेच लक्ष्य आहे. [आता सुमार अग्रलेख लिहायचा असल्यास, मनमोहन सिंगांचे आर्थिक धोरण - राजीव गांधी - आणीबाणी - बांगलादेश युद्ध असे मागे जात रहावे :)] शेवटी 'सर्वे गुणा: कांचनमाश्रयन्ति' हेच खरे. 'आर्थिकदृष्ट्या दुर्बळांच्या भाषेला कोणीही विचारत नाही', असं विधान मागे मनोहर जोशींनी केलं होतं, त्याची यासंदर्भात आठवण येते.

थोडे विषयांतर होईल, पण मराठमोळी असणारी आणि हाती पैसा असणारी अशी ही शेवटची पिढी असेल काय? पुढच्या पिढ्यांत मराठी माणसाकडे पैसा येत जाईल हे खरं, पण त्याचं 'मराठीपण' कितपत टिकून राहील? आणि असं झालं तर अशा स्तंभलेखकांचा, उद्योगपतींचा, प्रवासकंपन्यांचा मराठीपणाचा मुखवटा गळून पडलेला पहायला मिळेल.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

काळाची पाऊले

नंदनच्या प्रतिसादातून :

>>>थोडे विषयांतर होईल, पण मराठमोळी असणारी आणि हाती पैसा असणारी अशी ही शेवटची पिढी असेल काय? पुढच्या पिढ्यांत मराठी माणसाकडे पैसा येत जाईल हे खरं, पण त्याचं 'मराठीपण' कितपत टिकून राहील? आणि असं झालं तर अशा स्तंभलेखकांचा, उद्योगपतींचा, प्रवासकंपन्यांचा मराठीपणाचा मुखवटा गळून पडलेला पहायला मिळेल.

डेबाईंबद्दलच्या एकूण विवेचनातला माझा भर जरी त्यांच्या भूतकाळावर प्रकाश टाकणारा असला, त्यांच्या नव्या पवित्र्यामागचे संदर्भ देणारा असला , तरी हे मान्य करायलाच पाहिजे, की काळाची पावले ओळखणे, त्यानुसार स्वतःला बदलणे या गोष्टी त्यांच्याकडून खचित शिकण्यासारख्या आहेत. शेवटी संधीसाधूत्व आणि अडॅप्टॅबिलिटी (मराठी शब्द ?) या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. डेबाईना शेवटी मराठी समाजाकडे वळावे लागावे हेच, बाजारपेठेची परिस्थिती बदललल्याचे द्योतक आहे. राहिला प्रश्न "मराठीपण" टिकून रहाण्याचा. जोवर "मराठीपणा"कडे एका साचलेल्या डबक्याप्रमाणे पाहिले जाईल तोवर त्याच्या अस्तित्वाबद्दल प्रश्नचिन्हे राहतीलच. जर "मराठीपण" ही एक प्रवाही संकल्पना मानली तर मग डेसारखे प्रवाह त्यात मिसळत राहतील ; आणि "मराठीपण"जिवंत राहील. (हीच काहीशी वापरून गुळगुळीत झालेली संज्ञा पुढे न्यायची तर असे म्हणता येईल की, नवनवे वेगळे प्रवाह येणे ठीक; पण प्रदूषित नाल्यांना त्यात येऊ न देणेही आरोग्याच्या दृष्टीने तितकेच महत्त्वाचे :-) )

वरातीमागून

इतके प्रतिसाद आल्यानंतर हा प्रतिसाद म्हणजे वरातीमागून .. प्रमाणे आहे. डे बाई अनेक वर्षांपासून इंग्रजी लेख लिहीतात. लिखाण फारसे लक्षात ठेवण्यासारखे नसले तरी तेवढ्यापुरते चटपटीत असे, असे आठवते. फक्त त्यांनी आता अचानक मराठीपणाचा पवित्रा घेतला आहे, हे मला पटले नाही.

त्या मराठी असण्यापेक्षा उच्चभ्रू मराठी आहेत असे म्हणता येईल. जुन्या मुंबईत मूळ वस्ती असणारी अशी अनेक मराठी उच्चभ्रू आणि काहीशी आंग्लाळलेली कुटुंबे आढळतील. माझ्या ओळखीची काही कुटुंबे अशी नक्की आहेत - साध्या आणि थोड्या चुकीच्या पद्धतीने वर्गीकरण करायचे तर बाकीचे लोक स्टीलच्या ताटांमधून जेवत असताना काचेच्या बशांमधून जेवणारी.. :-) कोणी कृपया यातून काही अर्थ काढू नयेत. हे केवळ उदाहरण म्हणून दिले.. असे म्हणायचे आहे की इतर समाजापासून तुटक वाटू शकणारी ही कुटुंबे अनेकदा मूलतः मराठीच संस्कार सांभाळून असतात असे नीट पाहिल्यास दिसून येईल. याचा अर्थ शोभा डे अशा आहेत असे म्हणणार नाही (मला माहिती नाही म्हणून) कदाचित त्या त्यातही अधिक वरच्या उच्चभ्रू पायरीवरील समजता येतील, पण मला आठवते त्याप्रमाणे त्यांनी याआधी मराठी असण्याचा नसला तरी नसण्याचाही गौरव केला नव्हता. त्यामुळे त्यांना उपरती झाली असे असण्यापेक्षा त्यांना मराठी लोकांकडून आत्ता ओळख प्राप्त झाली आहे असेही असू शकेल...

 
^ वर