मराठीचे आधुनिकीकरण

आजच्या काळात इंग्रजी भाषेला तिनं उभा केलेला 'विचारांचा दैदीप्यमान डोलारा' पाहून समृद्ध भाषा मानले जाते. खंरतर इंग्रजी भाषा ही फक्त 'समृद्ध' नसून 'साधन समृद्ध' ही आहे. तिनं उभं केलेले हे 'वैचारिक साम्राज्य' हे इंग्रजी भाषिकांच्या 'सकारात्मक वारंवारीते' चा परिणाम आहे. तिच्याकडे असणारा 'साधन समृद्ध' हा गुण जरी इतर कुठल्याही भाषेने आपला 'बाज' सांभाळून योग्य बदलासह स्वतः मध्ये अंगिकारला तरी ती भाषा 'साधन समृद्ध' होऊ शकेल.
'साधन समृद्धातता' म्हणजे काय?
'इतर सर्व गोष्टी एक समान आहेत' असं गृहीत धरले तर, युद्धात ज्या योद्ध्याकडे अगदी प्रगत युद्धसाधने, अवजारे असतील, त्या योद्ध्याचा त्याच्या समोरील पारंपरिक युद्धसाधने, अप्रगत अवजारे असणार्‍या योद्ध्यावर विजय निश्चितच शक्य आहे हे ओळखता येईल.
आणि म्हणूनच सुखासीन आयुष्य जगण्यासाठी व आपली 'साधन समृद्धतता' टिकविण्यासाठी प्रत्येक मानवाला वा समजाला सतत प्रयत्नशील रहावे लागते.
जो सजगपणे 'प्रयत्नशील' असतो, तोच 'प्रगतिशील' असतो.
कॄतिशीलतेच्या अशा सकारात्मक वारंवारतेलाच 'आधुनिपणा' म्हटले पाहिजे.
सुखासीन आयुष्य जगण्यासाठी 'सकारात्मक वारंवारितेचे ' चक्र फिरणे पुढील दोन गोष्टींवर अवलंबून असतं -
१. काम करण्याची पद्धत
२. आपले विचार दुसर्‍या व्यक्ती पर्यंत पोहचविता येणं.
ह्या दोन गोष्टींमध्ये नैपुण्य मिळवायचे असेल तर, आजच्या काळाचे 'संगणक'रुपी महाहत्यार, हे स्वकर्तुत्वार हस्तगत करणं क्रमप्राप्त आहे. संगणकाला मराठी भाषेच्या 'प्रत्यक्ष' अंमलाखाली आणायचे असेल तर खालील टप्पे पार करावे लागतील.-
पहिला टप्पा >
सध्याच्या 'बाळबोध' लिपी मध्ये ('देवनागरी' मध्ये) सुधारणा करणे.
अस्तित्व टिकविण्यासाठी काळानुसार अनेक बदल आपलेसे करावे लागतात. इंग्रजी भाषेच्या रोमन लिपीचे वैशिष्ठं हे आहे की त्यातील प्रत्येक 'अक्षर' /'अल्फाबेट' एकामागे एक, उजवीकडून डावीकडे ठेवता येतात. या एका वैशिष्ठ्यामुळे इंग्रजी भाषेचा मुद्रण तंत्रातून, टंकन यंत्राकडे व तिथून संगणकापर्यंत वापर व विकास झपाट्याने व अचंबित करण्याजोगा झाला. मी, प्रस्तुत लेखकाने मराठी साठी सद्ध्याच्या 'बाळबोध' लिपीत याच भुमिकेतून काही बदल सुचवित नव्या युगासाठी 'सुबोध लिपी' साकारलेली आहे. वाचकांनी माझ्या सुबोध लिपी संकेतस्थळाला भेट देवुन, ती जाणून घेण्याची व 'जरुरी' वाटल्यास सुचना करण्याची तसदी घ्यावी हि विनंती!
दुसरा टप्पा >
'टंकन यंत्र' तसेच संगणकाच्या 'कळफलकाच्या स्वरुपाचे' प्रमाणीकरण करणे व त्याच्या सार्वत्रिकरणावर भर देणे.
कुठल्याही भाषिकाला एखादा विचार त्याच्या पद्ध्तीने उच्चारण्याची तसेच लिहिण्याची 'सहज प्रवृत्ती' असते. तो भाषिक ज्या समाजात लहानाचा मोठा होतो त्या समाजालाच ह्या प्रवृत्तीला 'वळण' लावण्याचा अधिकार असतो. अशा 'वळण' लावण्याच्या घरगुती प्रक्रीयेला 'संस्कार' तर सामाजिक प्रक्रीयेला (प्राथमिक)'शिक्षण' म्हणतात. अशा प्रकारेच एखाद्या समाजाची मानसिकता ‘एकजीव व एकमुखी’ होऊ शकते.
इंग्रजी भाषा व त्या भाषेला केंद्रस्थानी मानून तयार करण्यात आलेली प्रगत 'इलेक्ट्रॉनिक माध्यमे' वर उल्लेखित 'सहज प्रवृत्ती' ला तसेच त्या लगोलग एखाद्या समाजाच्या 'एकजीव व एकमुखी' मानसिकतेला अडसर बनू पहात आहेत. 'युनिकोड' नावाचे तंत्र हे 'सुखसाधनांवरील मक्तेदारीच्या' अमेरिकी मानसिकतेची पताका आहे. 'आम्ही सार्‍या जगाचा विचार करतो' असं ठसवून, बिंबवून जगातील प्रत्येक भाषेच्या संगणकाच्या कळफलकाच्या स्वरुपाची मांडणी देखील तेच ठरवू पहात आहेत. स्पष्टीकरणार्थ - ज्यांनी पद्धतशीरपणे टंकलेखनाचे सरकारमान्य प्रशिक्षण घेतले आहे त्यांना आज 'युनिकोड' तंत्रामुळे संगणकावर टंकन करण्यासाठी खूप आटापिटा करावा लागतो. 'गमभन' किंवा 'बरहा' सारख्या सेवा उपलब्ध असूनही मराठी भाषिकाला 'm' म्हणजे 'म्' व त्याचबरोबर 'maa' म्हणजे 'मा' असं डोक्यात घोळवत रहावे लागते. मुळात म्हणजे हि गोष्ट त्या व्यक्तीच्या स्वतः च्याच समाजाने शिकविलेल्या नव्हे वळण दिलेल्या 'म' ला काना 'मा' या मानसिकतेला ला विरोध करते. राज्यात ज्या सर्व-सामान्य जनतेने संगणक हाताळता यावा याकरिता सरकार मान्य 'टंकन प्रशिक्षण' केंद्रात टंकनाचे रीतसर प्रशिक्षण घेतले आहे, त्यांची संगणकाच्या समोर बसल्यावर काय भावना असते? हे कुणी जाणून घेण्याचा हि प्रयत्न करु नये. आज कुणी मराठी भाषेच्या कळफलकाचे प्रमाणीकरण झाले असे मानले तरी अनेक प्रश्न पडतात. अजूनही भिन्न वर्णाकारांचा (fonts चा) वापर करताना कळफलकांचे स्वरूप वेगवेगळे का असते? इंग्रजी भाषेसाठी सर्व ठिकाणी एकच 'स्वरुप' असलेला कळफलकाचा वापर का अंगिकारला जातो? त्यात कोणी फेरबदल का करत नाही? ह्या सर्व प्रश्नांचे उत्तर एकच असू शकते ते म्हणजे तंत्रज्ञान व त्यावर आधारीत साधने विकसित करण्यामागचा 'हेतू' व 'दृष्टिकोन'.
अमेरिकेच्या सरकारचा खाजगी संस्थांकडून 'संगणक तंत्रविज्ञान' विकसित करून घेण्या मागचा हेतू, 'आपल्या देशाची सुरक्षितता जपणं' व त्यांचा त्यामागचा दृष्टिकोन, 'दुसर्‍या देशांवर कुरघोडी करणं' हा होता. या अगदी उलट भारताच्या सरकारचा 'संगणक तंत्रविज्ञान' विकसित करण्या मागचा हेतू, 'आम्ही भारतीय हे इतर पुढारलेल्या देशांपेक्षा अगदीच काही मागासलेलो नाहीत तसेच आम्हीही ते जे 'तंत्र' (त्यांच्या गरजांनुसार) विकसित करत जातील ते आम्हीही (प्रसंगी त्यानुसार आमच्या गरजा बदलून) आत्मसात करू शकतो हे दाखवून देणं' हा होता/ अजून ही आहे.
संगणक तंत्र असो वा इतर कोणतेही विद्न्यान त्याच्या अभ्यास, शोध व विकासामागचा हेतू ' ज्ञान हे नवनिर्मितीतून प्रकट होवून बहुतांशी समाजाच्या उपयोगी पडावयला हवे' असा भारतीय परंपरेला साजेसा, 'राजमान्य' व्हावयास हवा.

तिसरा टप्पा >
मराठी साठी 'कॅरेक्टर एनकोडींग प्रणाली' विकसित करणे.
जेवढं टंकन सोपं, तेवढं संगणकाला हाताळणं सोयीस्कर होणार. सध्याच्या 'बाळबोधलिपी' मुळे, विभिन्न पद्ध्तीची जोडाक्षरं असो वा ईकारान्त-ऊकारांत स्वरचिन्हे असो, संगणकाच्या कळपटावरील कमीत कमी कळांच्या सहाय्याने जलदगतीने व सहजासहजी टंकीत करणं कठीण जातं.
जर संगणकाला मराठीतून सुचना देण्याच्या ह्या पाहिल्या टप्प्यातच जर एवढा वेळ जात असेल तर त्या सुचना संगणकापर्यंत पोहचविणार्‍या विविध कार्यप्रणाली, मिळालेल्या संकेतांना समजून घेणारी ऑपरेटिंग सिस्टम मराठी भाषेतून बनवून घेणं कसं बरं शक्य होईल?
या अडचणी मागचे काही मुद्दे -
१. वर्णाकारांमधली (Font मधली ) वैविध्य हे सामान्य जनतेसाठीच्या सामान्य कामात तितके गरजेचे नाही.
२. संगणकाच्या वापरात मराठीचा 'सहज, सोपा, सर्वत्र' वापर होणं महत्वाचं त्यासाठी एकच मराठी धार्जिणी ''कॅरेक्टर एनकोडींग प्रणाली' असेल तर विविध कार्यप्रणाली, ऑपरेटिंग सिस्टम मराठी भाषेतून बनवून घेणं शक्य होईल. संगणक वापराचे दोन स्तर विभागता येतील अनुक्रमे - 'स्थानिक' वा 'प्रांतीक' व दुसरा 'वैश्विक'.
३. संगणकावर मराठीचा वापर फक्त नेट सर्फिंग, ब्लॉग लिहीणं ह्या उच्चभ्रू हौसेपुरता मर्यादित रहाता कामा नये.
४. गावागावात मराठीतून त्यांच्या गरजेनुसार 'संगणक आज्ञावली' लिहिता येणारे तज्ञ युवक घडावेत अशी व्यवस्था निर्माण करणं.
कारण अशाप्रकारेच 'साधन' काबीज करण्यानेच 'सुखसमृद्धी - ऍश्वर्या' वर हक्क सांगणं व तो जपणं शक्य होणार आहे.

लेखनविषय: दुवे:

Comments

प्रास्ताविक पटण्यासारखे, टप्पे विचार करण्यासारखे

> खंरतर इंग्रजी भाषा ही फक्त 'समृद्ध' नसून 'साधन समृद्ध' ही आहे.
हे पटण्यासारखे वाक्य आहे. अनेक यंत्रे इंग्रजी लेखन-वाचनासाठी सोयीची आहेत हे खरे. बिगर-इंग्रजी रोमन-लिपिक देशांत कळफलक वेगळा असतो, हेही खरे.

पण तुम्ही सुचवलेले उपाय कळले नाहीत :

> पहिला टप्पा > सध्याच्या 'बाळबोध' लिपी मध्ये ('देवनागरी' मध्ये) सुधारणा करणे.
येथे "बाळबोध" म्हणजे काय? बाळबोधचा सामान्य अर्थ हा की "अति-सरल असल्यामुळे गुंतागुंतीचे कार्य करता येत नाही". हा तुमचा अर्थ नसावा, असे वाटते. तुमच्या "rawlesatish.info" संकेतस्थळावर गेलो. पण तिथे कुठलेच दुवे सापडले नाहीत.

दुसरा टप्पा > 'टंकन यंत्र' तसेच संगणकाच्या 'कळफलकाच्या स्वरुपाचे' प्रमाणीकरण करणे व त्याच्या सार्वत्रिकरणावर भर देणे.
पटण्यासारखा विचार. अशा प्रकारचे सार्वत्रीकरण सरकार किंवा अन्य एकाधिकार असलेली संस्थाच करू शकते.

> अजूनही भिन्न वर्णाकारांचा (fonts चा) वापर करताना कळफलकांचे स्वरूप वेगवेगळे का असते?
या वाक्याचा अर्थ समजला नाही. जर वेगवेगळ्या फाँटच्या एन्कोडिंगचे ग्लिफशी मॅपिंग (कुठला आकडा/संख्या कुठल्या चिह्न/आकाराशी संबंधित आहे) वेगवेगळे असले तर कळफलक वेगवेगळे असणार त्यात शंका काय? दोन फाँट एकच एन्कोडिंग वापरत असतील, तर कळफलक सारखाच असेल.

तिसरा टप्पा > मराठी साठी 'कॅरेक्टर एनकोडींग प्रणाली' विकसित करणे.
म्हणजे डावीकडून उजवीकडे चिह्ने जोडाक्षरांचे आकार न बदलता लिहीत जाणे असे म्हणायचे आहे काय? प्रयत्न करून बघणे शक्य आहे.

सोय-गैरसोयीचा (उपलब्धी आणि किंमत = बेनेफिट आणि कॉस्ट) चांगला हिशोब लावणे महत्त्वाचे आहे.

उदाहरणार्थ, अन्य देशांत काही प्रमाणीकरणाचे, त्याच्या सार्वत्रीकरणाचे प्रयोग सफल झाले आहेत, तर काही सपशेल आपटले आहेत.
उपलब्धी : तुम्ही म्हणता तशी.
तोटे आहेत : १. पूर्ण प्रौढ जनतेला पुन्हा साक्षर व्हावे लागेल. २. सध्याचे सर्व लिखित साहित्य नवीन लिपीत लिप्यंतरित करावे लागेल.

लिप्यंतराचे दोन-तीन प्रसिद्ध प्रयोग सफल झाल्याची उदाहरणे आपल्याला दिसतात. (१) तुर्कस्तानातली लिपी अरबी-सदृश होती, ती बदलून रोमन-सदृश करण्यात आली. (२) चीनची पारंपारिक लिपी बदलून "सोपी" करण्यात आली. पण त्या दोन्ही उदाहरणांत त्या-त्या देशात साक्षरांचे प्रमाण फार कमी होते, आणि दोन्ही ठिकाणचे नेते, आतातुर्क आणि माओ ज़दोङ् (माऊ त्से तुंग) हे दोघे पुरातन ज्ञानाचा/संस्कृतीचा नायनाट करण्याची ईर्ष्या जनतेत पेटवू शकणारे हुकुमशहा होते. त्यामुळे त्यांच्या कार्यपद्धतीचा अनुसार करण्याची शक्यता महाराष्ट्रात फार कमी आहे.

महाराष्ट्रात मराठी शुद्धलेखनाचे नियम बदलण्याचा सफल प्रयत्न झाला आहे. पण तुम्ही म्हणता तशी लिपी बदलणे हे त्या मानाने फारच कठिण असे मला वाटते. आणि एखाद्या सरकारी मंडळाने म्हटले तर सर्व छापखाने नवीन खिळे आणतील असे वाटत नाही. शुद्धलेखनातील बदलामुळे छापखान्यांचे खिळे बदलावे लागले नव्हते, तसे करणे महागाचे आहे, हे लक्षात असावे.)

(स्वानुभव : मी स्वतः अनेक वेगवेगळ्या लिपी शिकलो आहे - ज्या बाळपणी शिकलो, त्या आत्मसात झाल्या, ज्या प्रौढवयात शिकलो त्या शिकायला बराच त्रास झाला, आणि वाचन अत्यंत हळूहळू होते. मला अभ्यासासाठी भरपूर आरामाचा वेळ असून इतका त्रास झाला, होतो. रोजच्या कामात व्यस्त प्रौढांना नवी लिपी शिकण्यास भाग पाडणे हे योग्य वाटत नाही.)

> संगणक वापराचे दोन स्तर विभागता येतील अनुक्रमे - 'स्थानिक' वा 'प्रांतीक' व दुसरा 'वैश्विक'.
याला तात्विक विरोध नाही. पण ग्रामीण शाळांमध्ये पैकी कुठला स्तर शिकवणार? त्यामुळे शैक्षणिक स्तरांनी विभागलेली समाजव्यवस्था जन्माला न यावी.

तुम्ही कष्ट करून काही नवे घडवू बघत आहात. अभिनंदन आणि शुभेच्छा.

(मला मात्र वाटते की वाचा/ध्वनी लेखीत एन्कोडिंग करणारी यंत्रे लवकरच विकसित होऊ शकतील. मग संगणकासाठी "म-ला काना 'मा' किंवा 'm+a+a' काहीच अनैसर्गिक प्रकार लक्षात ठेवण्याची गरज राहाणार नाही. हस्तलेखनासाठी देवनागरी, संगणकासाठी गमभन/बरह मला बर्‍यापैकी सोयीच्या वाटतात. "यूनिकोड" हे "कल्याणकारी अमेरिकन साम्राज्यवादाचे" प्रतीक मला वाटत नाही. [मीटर-किलो-सेकंद यास कल्याणकारी फ्रेंच साम्राज्यवादाचे प्रतीकही मी मानत नाही.] म्हणून तुमच्या प्रयत्नांना शुभेच्छांपेक्षा अधिक सक्रिय प्रतिसाद मी देण्यास मला स्फूर्ती वाटत नाही.)

सुधारणा(?)

> संगणक वापराचे दोन स्तर विभागता येतील अनुक्रमे - 'स्थानिक' वा 'प्रांतीक' व दुसरा 'वैश्विक'.
याला तात्विक विरोध नाही. पण ग्रामीण शाळांमध्ये पैकी कुठला स्तर शिकवणार? त्यामुळे शैक्षणिक स्तरांनी विभागलेली समाजव्यवस्था जन्माला न यावी. <<
अगदी असेच, परवा एका शिक्षणतज्‍ज्ञाने मराठीत दोन प्रकारचे शुद्धलेखन असावे असे म्हटले होते, एक खेड्यांसाठी आणि एक शहरांसाठी! काय सांगावे? होईलही तसे.
>>दुसरा टप्पा > 'टंकन यंत्र' तसेच संगणकाच्या 'कळफलकाच्या स्वरुपाचे' प्रमाणीकरण करणे व त्याच्या सार्वत्रिकरणावर भर देणे.
पटण्यासारखा विचार. अशा प्रकारचे सार्वत्रीकरण सरकार किंवा अन्य एकाधिकार असलेली संस्थाच करू शकते. <<
आजमितीला किती प्रकारचे देवनागरी कळफलक असावेत? गोदरेज(२), रेमिंग्टन, अक्षर, प्रकाशक, शब्दरत्न, डीओई, मोड्यूलर, स्क्रिप्ट, इन्स्क्रिप्ट, देवयानी(२),गमभन, भारतभाषा, आय्‌टी‌आर, इंग्लिश फोनेटिक, फोनेटिक ८६, फोनेटिक ८८, एपीज्‌, सिट्रॉनिक, जिस्ट, रोमा, श्रीलिपी, सीडॅक, गांगल, सुबोध, संस्कृत ९७,९९, आणि हिंदीतले धरून आणखी कमीतकमी २५.
कळफलकाचे प्रमाणीकरण करणे शक्य आहे? परत हिंदीसाठी वेगळा, इतर भारतीय भाषांसाठी वेगळा. हे संपवायचे असेल तर हल्लीचा क्‍वेर्टी कळफलक सर्वात उत्तम!
>>महाराष्ट्रात मराठी शुद्धलेखनाचे नियम बदलण्याचा सफल प्रयत्‍न झाला आहे.<<कुणी सांगितले, सफल म्हणून? नियम बदल्यामुळे नवीन प्रश्न निर्माण झाले आहेत, आता परत (अनुच्चारित व्युत्पत्तीने सिद्ध न होणारे अनुस्वार वगळून) अनुस्वाराचे आणि लेखनाचे जुने नियम परत आणावे अशी मागणी वाढत चालली आहे. याउलट कविता महाजनसकट ८० टक्के लोकांना न-ण चा फरक समजत नाही, त्यामुळे यांतले एकच अक्षर ठेवावे अशी मागणी आहे. दीपावलीतला दी आणि क्रीडामधला क्री र्‍हस्वच कसा योग्य, यावर एक शुद्धलेखन तज्ज्ञ एका कार्यशाळेत परवा हिरीरीने भांडले.
>>सध्याच्या 'बाळबोध' लिपी मध्ये ('देवनागरी' मध्ये) सुधारणा करणे.<<म्हणजे ते बाळांना समजणार नाही इतपत अवघड करणे. नुसती मराठी लिपी बदलून चालणार नाही, हिंदी, नेपाळी, संस्कृत बदलाव्या लागतील. लिपीत सुधारणा करण्याच्या मल्याळी प्रयोगाने आता त्यांची लिपी ना जुन्या लोकांना वाचता येते ना नवशिक्यांना!

स्वरचिन्ह व्यंजनाच्यापुढे लिहावीत अशी एक सूचना पूर्वी होती. म्हणजे पुस्तकाची पाने ६०-७५ टक्क्यांनी वाढणार. किंमती दुपटीने आणि खप निमपट. त्यापेक्षा छापणेच बंद करावे. छान सुधारणा! १९९९ मध्ये ऊंझा साहित्यसंमेलनात ठराव पास झाला आहे की गुजराथीत यापुढे फक्त दीर्घ ईकार आणि र्‍हस्व उकार राहतील. रोमन लिपीचे पुरस्कर्ते श्री. म.ना.गोगटे मराठीत फक्त दीर्घ ईकार-ऊकार असावेत असे प्रतिपादन करतात. उर्दूत इकार-उकार-एकार-औकार नाही लिहिले तरी चालते, मराठीत असे करायला काय हरकत आहे. कानेही गाळून टाकले की लिपी अतिशय सोपी होईल. मला वाटते, तमिळ-चिनी यासारख्या अनेक लिप्यांमध्ये जोडाक्षरे नाहीत. हेही करून बघावे. तमिळमध्ये ऋ, अनुस्वार आणि विसर्ग नाहीत. ख, ग, घ सारखी सुमारे १५ अक्षरे नाहीत. आपणही करावे. म्हणजे मराठी लिपी सर्व परभाषकांसाठी सोप्पी होईल.--वाचक्‍नवी

पुन्हा शुद्धलेखन !!!

परवा एका शिक्षणतज्‍ज्ञाने मराठीत दोन प्रकारचे शुद्धलेखन असावे असे म्हटले होते, एक खेड्यांसाठी आणि एक शहरांसाठी! काय सांगावे? होईलही तसे.

नाहीतरी आता तसेच आहे. ग्रामीण साहित्य आणि शहरी लोकांच्या साहित्य लेखनामधे हे फरक विशेषकरुन आहेत.
'कळफलकाच्या स्वरुपाचे' प्रमाणीकरण करणे व त्याच्या सार्वत्रिकरणावर भर देणे.
सहमत.

अनुस्वाराचे आणि लेखनाचे जुने नियम परत आणावे अशी मागणी वाढत चालली आहे.
आता हे शक्य नाही. आम्ही अनेक दिवसापासून एकच नियमाची मागणी करतो की उच्चारानुसार लेखन करण्यास हरकत नसावी.
(आम्ही असे म्हणालो की, लोक आमचेच शुद्धलेखन तपासायला लागतात. )

याउलट कविता महाजनसकट ८० टक्के लोकांना न-ण चा फरक समजत नाही,
बरोबर आहे. :)

त्यामुळे यांतले एकच अक्षर ठेवावे अशी मागणी आहे.

हाहाहाहा:))))))))))) चालेल, चालेल.

मराठीत असे करायला काय हरकत आहे. कानेही गाळून टाकले की लिपी अतिशय सोपी होईल.
काहीतरीच काय मराठी लेखनात हे शक्य तरी आहे का ?

मराठी लिपी, लेखन सोपे होण्यासाठी व्याकरणाचे जे स्तोम माजलेले आहे, ते कमी झाले पाहिजेत. तरच मराठी भाषा सर्वांची होईल.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

देवनागरी कळफलक

हिंदी-मराठी-नेपाळी-संस्कृतकरता कळफलकावर एकच फॉन्ट असणे ही अक्षम्य त्रुटी आहे. मराठीसाठी आदर्श फॉन्ट 'मनोगत'चा. किंवा श्रीलिपीचा. उपक्रमवर नैर्‌ऋत्य शब्द ऋवर रफारचिन्ह देऊन टंकता येत नाही. ढ ची गाठ छोट्या अक्षरदंडाला चिकटते. त्यामुळे अक्षर बेढब दिसते. ळ ची दोन पोटे असमान, मराठी शेंडीफोड्या श किंवा ल येत नाहीत. र्‍हस्व ऌ , नुक्त्यावाल्या ढ़-च ची बाराखडी(ढ़ ढ़ा ढ़ि च़ च़ा च़ी) वगैरे बर्‍याच गोष्टींसाठी फॉन्ट् बदलावा लागतो. आपल्याला अजून मराठीकरता फ़ॉन्ट बनवता येत नाहीत, आपण लिपी काय सुधारणार?--वाचक्‍नवी

हिंदी-मराठी-संस्कृत

हिंदी-मराठी-संस्कृत.

हिंदी-मराठी-संस्कृत ह्या भाषा एकाच लिपीत लिहिल्या जातात म्हणून त्यांच्यासाठी एकच फॉण्ट् आहे.

हिंदी भाषा ही १९३० पर्यंत बोली भाषेच्या स्वरुपात होती. तिला राष्ट्रभाषा करण्याचे नक्की झाले तेंव्हा महात्मा गांधी ह्यांनी 'जर ती अरबी लिपीमध्ये लिहिल्या गेली तरच ती राष्ट्रभाषा होईल' अशी भूमिका घेतली. परंतु श्री. पुरुषोत्तमदास टंडन ह्यांच्या अथक प्रयत्नाने हिंदी भाषेला देवनागरी लिपी प्राप्त झाली.

मराठी भाषेस जवळजवळ १९४७ पर्यंत अधिकृत लिपी नव्हतीच. लेखनासाठी मोडी लिपी आणि मुद्रणासाठी देवनागरी लिपी अशी व्यवस्था होती, आणि ह्या व्यवस्थेतदेखिल सुरळितपणा नव्हता. महाराष्ट्र शासनाने १९४७ मध्ये अधिकृतपणे देवनागरी लिपी स्वीकृत केली.

इ.स.४०० पुर्वी संस्कृत भाषा ही सार्‍या भारतभरात 'ग्रंथ' नामक दाक्षिणात्य लिपीत लिहिल्या जात असे. दक्षिणेत अगदी अलिकडेपर्यंत (१९८०) ग्रंथलिपीचा उपयोग होत असे. माझ्याकडिल काही संस्कृत पुस्तके ही ग्रंथलिपीत छापलेली आहेत.

हैयो हैयैयो!

लिपीमध्ये बदल करण्याची आवश्यकता खरेच आहे काय?

लिपीमध्ये बदल करण्याची आवश्यकता खरेच आहे काय?

मला असे वाटत नाही. आत्ताच तंत्रज्ञान इतके प्रगत आहे, की आंग्लप्रभृति भाषा आपण उच्चरिताच संगणकाच्या पडद्यावर आपोआप टंकून येतात. (पहा: http://www.nuance.com/naturallyspeaking/).

ह्याप्रकारचे तंत्रज्ञान भारतीय भाषांसाठी विकसित केल्यास, (जे भविष्यात होईलच अशी आशा आपण बाळगू या!) निव्वळ कळफलकावरच अवलंबून राहण्यापेक्षा आपण इतरही शक्यतांचा विचार करावयास हवा; जेणेकरून आपल्याला आपल्या शास्त्रशुद्ध लिपींच्या वारशाला धक्का न लावता आणि त्यात ढवळाढवळ न करतादेखिल प्रगती साधता येईल. आणि येता काळ हा ध्वनिमाध्यमातून आज्ञा देण्याचा काळ असणार आहे. कोणास ठाऊक, उद्या संगणकाचा कळफलक हा आजी-आजोबांच्या वस्तुंच्या यादीतही जाऊन बसेल...!

तात्पर्यः सध्या उपलब्ध असलेल्या तंत्रज्ञानासाठी आपल्या लिपींशी तडजोड करण्यापेक्षा, आपल्या लिपींशी जुळवून घेता येण्याजोगे नवे तंत्रज्ञान निर्माण करण्यात यावे.

धन्यवाद.

हैयो हैयैयो!

'तडजोड' करण्यामागची भुमिका

सुबोध लिपी - एक नवी सुरवात
तात्पर्यः सध्या उपलब्ध असलेल्या तंत्रज्ञानासाठी आपल्या लिपींशी तडजोड करण्यापेक्षा, आपल्या लिपींशी जुळवून घेता येण्याजोगे नवे तंत्रज्ञान निर्माण करण्यात यावे.

आयुष्य म्हणजेच 'तडजोड'.
मर्यादा पाळली तरच ->'तडजोड' -'तड्'..'जोड'
कशाने तरी जिथे 'तडा' जातो, तिथे काहीतरी नवीन 'जोडले' जाते. ('अर्धनारीनटेश्वर' चा अर्थ काय? तो विषयच वेगळा आहे म्हणुन तुर्तास बाजूला ठेवू.)
जुन्या विचारांना, संकल्पनांना, नाते संबंधाना 'तडा' जाणं.
नव्या विचारांना, संकल्पनांना, नाते संबंधाना 'जोडले' जाणं.
या जगात नवे बदल झाले, होत आले तेव्हा कुणाच्याही भावनांचा विचार 'बदलत्या काळाने' केला नव्हता.
अधिक स्पष्टीकरणासाठी दोन दुवे देण्यात आले आहेत ते आपल्या वाचनात येवोत.
http://rawlesatish.info/ranjak/tadjod.htm

http://rawlesatish.info/ranjak/Prastavna/prastavna-7.htm

अगदी मान्य!

>>मला असे वाटत नाही. आत्ताच तंत्रज्ञान इतके प्रगत आहे, की आंग्लप्रभृति भाषा आपण उच्चारिताच संगणकाच्या पडद्यावर आपोआप टंकून येतात.<<
अगदी मान्य. पण त्यासाठी प्रत्येकाला प्रमाण मराठीत बोलावे लागेल, किंवा प्रत्येकाच्या बोली- मराठीसाठी वेगळी 'प्रणाली' लागेल.
म्हणजे परत प्रमाणभाषेचे प्रामाण्य मानावेच लागेल.--वाचक्‍नवी

बोलीभाषा

>>आता हे शक्य नाही. आम्ही अनेक दिवसापासून एकच नियमाची मागणी करतो की उच्चारानुसार लेखन करण्यास हरकत नसावी.
(आम्ही असे म्हणालो की, लोक आमचेच शुद्धलेखन तपासायला लागतात. )<< अहो पण कुणाचे उच्चार? तुमचे उच्चार तुमच्या घरातल्यांना सोडून शेजार्‍यांनातरी समजतात का?
मला काही वर्षांकरिता सौराष्ट्रात जावे लागले होते. जाण्यापूर्वी मी गुजराथीचा पंधरा दिवस भरपूर अभ्यास करून रेल्वेने प्रवास सुरू केला. अहमदाबादपर्यंत प्रवाशांशी खूप गप्पा मारल्या, चर्चा केल्या आणि विनोदी गोष्टी सांगितल्या-ऐकल्या. पुढे गाडी बदलल्यावर असे दिसले की, नव्या गाडीतील लोकांना माझे बोलणे समजायचे, पण त्यांचे मला काहीच समजेना. अंतिम स्टेशनवर उतरून गावात गेल्यावर ज्या खाद्यालयात रोज जेवायचे ठरवले, तिथल्या गप्पिष्ट म्हातार्‍या मालकाला दात नव्हते. आधीच स्थानिक गुजराथी उच्चार समजत नव्हते त्यातून हे उच्चार. जर ह्या उच्चारांनुसारी लिखाण केले तर अहमदाबादपर्यंतच्या गुजराथ्यांना समजेल? शक्य नाही.
बोलीभाषा ही लेखीभाषा व्हायला शेकडो वर्षे जावी लागतात. आपल्याला स्लॅंग/ कॉक्नी इंग्रजी कळते? मध्य प्रदेशात जेव्हा घर करून राहावे लागले तेव्हा लक्षात आले की, पुस्तकी हिंदी न शिकलेल्या आमची आईशिवाय, कुणालाच तिथल्या मोलकरणींची हिंदी समजत नव्हती. आईचे बालपण भारतभर भटकण्यात गेले,तिला काहीच अगम्य नव्हते. --वाचक्‍नवी

काळाच्या ओघात..

काळाच्या ओघात..

आपण म्हणता ते ‘तडजोडी’बद्दलचे सर्व मुद्दे अगदी योग्य आहेत, अगदी व्यवहार्य आहेत. त्याबाबत माझे काहीएक म्हणणे नाही. कोणताही बदल होत असताना 'बदलता काल' कुणाच्याही भावनांचा विचार करित नसतो हेदेखिल मला मान्य आहे. परंतु येथे मुख्य प्रश्न भावनांचा नसून व्यवहाराचा आहे.

मुदलांत ‘तंत्रज्ञानासाठी आपण’ की ‘आपल्यासाठी तंत्रज्ञान’ हा व्यवहारातील एक महत्त्वाचा प्रश्न ठरतो. ह्याबाबत आपली धोरणे निश्चित करणे मला महत्त्वाचे वाटते. देवनागरी लिपी ही इतकी मोडकळीस आली आहे काय, आणि ती इतकी टाकावू झाली आहे काय, की तिची डागडुजी करणे भाग पडावे? सद्यक्षणी, निदान मला तरी, असे वाटत नाही. ब्रिटिशपूर्व कालापासूनच देवनागरी लिपीमध्ये सुधार करण्याचे ६० हून अधिक प्रयत्न झाले आहेत. काळासंगे चालण्यासाठी आवश्यक असणारे सर्व बदल देवनागरीने हसतां हसतां स्वीकृत केले. पण त्यावेळीचे तंत्रज्ञानच आजपेक्षा वेगळे होते.

आजच्या घडीस ‘कळफलक’ ह्या मुद्द्याला आपण जेवढें महत्त्व देता आहात, तेवढे महत्त्व देणे अनाठायी आहे असे मी प्रामाणिकपणे आणि नम्रपणे सांगू इच्छितो. कळफलकाला थोडा वेळ दूर ठेवून येत्या काळात टंकनप्रक्रियेत काय बदल होऊ बघत आहेत, ह्याकडेसुद्धा आपण लक्ष पुरविले पाहिजे. पूर्वी सांगितलेली ‘ध्वन्योच्चारानुसारी टंकनप्रक्रिया’ ही अत्यंत सुलभ अशी आहे आणि ह्याबाबत शक्यतो कोणाचे दुमत नसावे. आपण जसा उच्चार कराल (किंवा करत असाल), तसेच ते टंकून येणार. आता ह्यातही काहीजणांना अत्यंत व्याकरणशुद्ध असे लेखन हवे असल्यास त्यानुसारही तंत्रज्ञान निर्माण/विकसित करता येईल. सद्यस्थितीत आंग्लप्रभृति भाषांसाठी Spell Check - Grammar Check इत्यादि सुविधा उपलब्ध आहेत, तद्वतच ह्या सुविधा भारतीय भाषांसाठीसुद्धा उपलब्ध करून देता येतील. जेणेकरून कुणा एखाद्या बिचाऱया व्यक्तीस जर प्रमाणभाषा येतच नसेल (आणि त्यास ती शिकण्याची आसही नसेल), तरीही त्याच्या अप्रमाण लिखित भाषेचे तंत्रज्ञानाच्या सहाय्याने प्रमाणभाषेत सहजगत्या रूपांतर करता येऊ शकेल - अगदी आपणास हवे असेल तेंव्हा आणि तसे!

येत्या काळात असे भरभक्कम तंत्रज्ञान हाताशी येऊ शकणार असेल, तर काय म्हणून आपण आज आपल्या लिपींशी खेळावे? उपलब्ध तंत्रज्ञान अपुरे पडत असल्यास आपण नवे तंत्रज्ञान विकसित करून ते आत्मसात करावे. असे झाल्यास प्रत्येकाच्या बोली-मराठीसाठी वेगळी 'प्रणाली' लागण्याचीदेखिल आवश्यकता भासणार नाही, अन् प्रत्येकावर ‘प्रमाणभाषेतच बोलण्याची सक्ती’ही करावी लागणार नाही. दात नसलेल्या मनुष्याचे काय करावे हा प्रश्न आपण नंतर सोडवूया! ;-)

मुदलांत प्रमाणभाषेचे प्रामाण्य मानणे - न मानणे हा ज्याचा - त्याचा प्रश्न आहे. स्वतः तंत्रज्ञान असे कोठलेही अंतर मानित नाही, हेही लक्षात घ्यावे. केवळ आंग्लप्रभृतिभाषांसाठी निर्माण झालेल्या तंत्रज्ञानाशी 'तडजोड' करण्यासाठी आपण आपल्या शास्त्रशुद्ध लिपींशी 'मोडतोडी'चा खेळ करत असू, तर कालौघात ते खचितच स्वीकारार्ह ठरणार नाही.

हैयो हैयैयो!

-

जीर्णोद्धार

>>केवळ आंग्लप्रभृतिभाषांसाठी निर्माण झालेल्या तंत्रज्ञानाशी 'तडजोड' करण्यासाठी आपण आपल्या शास्त्रशुद्ध लिपींशी 'मोडतोडी'चा खेळ करत असू, तर कालौघात ते खचितच स्वीकारार्ह ठरणार नाही.<<
संपूर्ण सहमत.
शुद्‌धलेखन(शुद्‌-धलेखन), बालोद्‌-यान(हे कुठले यान?), द्‌वंद्‌व-- असले चुकीचे उच्चार होणारे शब्द लिहू नका. असलेली मुळाक्षरे कमी करू नका. उलट, मराठीतले व इतर परकीय भाषेतले जे उच्चार मराठी लिपीत लिहिता येत नाहीत त्यांसाठी, जरूर पडल्यास, निदान व्याकरण आणि शब्दकोशापुरती तरी नवी मुळाक्षरे/अक्षरचिन्हे निर्माण करा, आणि ती नित्य वापरा. च़, छ़, ज़, झ़, फ़,ड़, ख़, ग़,ळ्ह, व़, अशी अक्षरे गरज असेल तेथे आवर्जून बिनधास्त लिहा. गाळलेली अनुस्वारचिन्हे निदान अर्थ स्पष्ट करण्यासाठी व्याकरणाच्या आणि कायद्यांच्या पुस्तकात अवश्य लिहा, म्हणजे विपरीत अर्थ होणार नाहीत. आज नव्याने इंग्रजी शिकणार्‍या मुलांना ते म्हणजे इट् पण, आणि दे सुद्धा, हे समजायला त्रास होतो. 'ते' वर अनुस्वार दिला की समजूत पटते. गरज नाही म्हणून एकदा वगळलेले अनुस्वार बोलीभाषेच्या मिषाने मागील दाराने परत आणू नका; आणायचेच असतील तर राजरोस आणा.

सध्याची देवनागरी मराठी दिसायला इतकी आकर्षक आणि सोपी आहे की, तिचे आधुनिकीकरण करायची गरज नाही. करायचाच असेल तर जीर्णोद्धार करा.--वाचक्‍नवी

चर्चा समाप्ति


सुबोध लिपी - एक नवी सुरवात

वरील सर्वांचे लेखाच्या वाचन व त्यावरील प्रतिसाद देण्याबद्दल मी आभार व्यक्त करतो.

येथे लेख लिहिण्यामागचा माझा उद्देश मी साकारलेल्या ''सुबोध लिपी' ला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचविणं' व 'त्यावरील मतांची चाचपणी करणं' हा होता.

'प्रतिसाद' अपेक्षेहून खूप कमी मिळाला. व ज्यांनी तो दिला त्यांनी स्वतः चे बळ पाश्चात्यांच्या तंत्रज्ञानाची 'भलामण' करण्यातच खर्च केले. व तसे करताना त्यांना काहीही वावगं वाटले नाही. मराठी माणूस आपली बुद्धिमत्ता, मिळविलेली माहिती समोरच्या माणसाचे तोंड बंद करण्यासाठीच का खर्च करतो?

'शब्द हेचि ब्रह्म' हे भारतीय तत्त्वज्ञान ते कसे काय बुवा विसरले? जे 'अर्थपूर्ण ध्वनी' आपण उच्चारतो, ते हवेत विरून जातात. फक्त ठराविक बाबतीत ते उच्चारलेले 'अर्थपूर्ण ध्वनी' खरे ठरतात वा आपल्यावर 'बुमरँग' सारखे उलटतात. पण हेच 'अर्थपूर्ण ध्वनी' सांकेतिक पद्धतीने लिहिले तर 'शब्द' बनून अस्तित्वात येतात व त्यांना स्वतः चे तेजोवलय प्राप्त होते.

हे जग सरळ रेषेत चालत नाही. उलट ते 'सर्पिल्या चालीने' क्रमण करीत असते.

'जे डोळ्यांना दिसते तेच सत्य' ह्यावर एवढा विश्वास का?

जे आज दिसते त्याचं 'होत्याचं नव्हतं', हे काही काळात होवू शकतं हे लोकं का बरे विसरतात?

ह्या जगात अनेक राज्यं, अनेक संस्थानं, शाहया, एम्पायर अस्तित्वात आल्या व त्यांची 'घटका भरताच' त्या धुळीस मिळाल्या. Nothing is Permanant' हे आज मराठी भाषिक का बरे विसरलेत? प्रत्येक गोष्टीला एक ठराविक आयुष्य असते. त्या ठराविक आयुष्यात प्रत्येक समाजाने आपल्याला 'नियतीची साथ' मिळाली तर, 'आपण कसे वागू शकतो' तसेच 'नियतीची साथ' नाही मिळाली तर, 'आपण कसे वागू शकतो' हे दाखवून दिलेले आहे. हे आतापर्यंतच्या इतिहासातून कळलं नाही का? 'ध्येयाने झपाटलेल्यांना नियतीचे पाठबळ' मिळते' हे वाक्य काय फक्त 'लिहीण्या-वाचण्यासाठीच' असते का?

'भविष्यात पाश्चात्य मंडळी ध्वनींवर आधारीत तंत्रज्ञान विकसीत करणार आहेत. मग लेखनाची गरज मिटल्यावर तुमची 'लिपी' काय कामाची?, कळफलक प्रमाणीकरण करण्याची गरज काय?' असं मला विचारण्यामागची मानसिकता काय?

स्वतः च्या शब्दांना प्रयत्नांची जोड हवी;

प्रयत्नांना सततच्या कष्टाची साथ हवी;

कष्टाला ध्येयनिष्ठ दिशा हवी;

ध्येयनिष्ठ दिशेला 'नियतीचे' पाठबळ हवे.

माझ्याकडे ते आहे असं मी ठामपणे म्हणू शकतो.

तुमच्या शब्दांमागे एवढी ताकद आहे का?

असं म्हणून मी तुम्हाला 'निरुत्तर' केलं तर चालेल का ? तुमच्या लिखाणातून 'परावलंबी अधीनपणा', 'कष्ट न करण्यासाठी सबबी पुढे करण्याची' म्हणजे 'आयत्यावर कोयता मारण्याची 'वृत्ती' तसेच जर कोणी ध्येयाने झपाटलेला प्रयत्न करीत असल्यास त्याला बुद्धिमंताचा आव आणून 'अपशकून' करणं हे एवढेच का प्रतीत झालं?

काही ठिकाणी 'सहमती' दाखविण्यात आली खरी, पण 'सहमती' ह्या वचनासोबत 'माझ्याकडून अमुक एका बाबतीत मदत मिळू शकते' हे लिहिण्यात कसली बरं आडकाठी आली. 'पोकळ 'सहमती' चा काय बरं उपयोग?

तुमचा दृष्टिकोनातून- पाश्चात्यांच्या कडेवरचं 'तान्हुलं बाळ' होवून जगण्यातच 'सुख' आहे.

माझ्या दृष्टिकोनातून -सामान्य आयुष्य जगता-जगता फावल्या वेळात जेवढं जमेल तेवढं, आपल्या गरजा आपणच भागविण्यासाठी धडपड करणं, प्रयत्न करीत राहणं यात 'सुख' आहे.

'तुटे पर्यंत ताणू नये'

'मोडे पर्यंत वाकू नये'

ह्या न्यायाने 'परस्पर विरोधी दृष्टिकोनामुळे ह्या लेखावरची चर्चा मी माझ्याकडून समाप्त करीत आहे.

'मराठी' चा प्रियकर

सतीश रावले

 
^ वर