मारिच - ४

महासत्संगाच्या पहिल्या दिवशी राजपाठकांना बापूंशी काहीच बोलता आलं नाही. दुसऱ्या दिवशी कैवल्य त्यांना भेटला. अंगात ताप असूनही ते आले. त्याही दिवशी बापूंची भेट अशक्य होती. त्यांच्या तब्येतीची काळजी वाटून, प्रसाद घेऊन कैवल्य पाचव्या दिवशी त्यांच्या ऑफिसवर गेला. अत्यंत आश्चर्य वाटून त्यानं आसपास पाहिलं. ऑफिसची जागा पूर्ण रिकामी होती. ना कुठला बोर्ड, ना कॉंप्युटर्स, ना एसी. आसपास कुणालाच काही माहिती नव्हतं. काहीतरी विचित्र वाटून परत आल्यावर बापूंना त्यानं ही बातमी सांगितली, तेंव्हा त्यात राजपाठकांबद्दलच्या काळजीचा भाग जास्त होता. फक्त हे ऐकून बापूंच्या डोळ्यांत सेकंदभर जी क्रूर विखारी चमक होती, ती त्याला फार विसंगत वाटली. बापूंनी त्याला सांगितलं, की त्यांना अर्धा तास एकांत हवा होता.

आजवरची संपूर्ण साधना विसरायला लावणाऱ्या अपरिमित क्रोध आणि संतापानं बापूंना काही काळ ग्रासलं. आपली पूर्ण अध्यात्मिक ताकद पणाला लावून ते काही काळ एका जागी बसले. केवळ अकरा लाख रुपयांत कैवल्यचा, बापूंचा विश्वास संपादून, हा महाकपटी माणूस त्यांना साठ लाख रुपयांना गंडा घालून फरार झाला होता. अक्षरशः उचलून घेऊन गेला होता.

काय ते सद्गदित होणं, डोळ्यातले अश्रू, साधनेचं नाटक..... पूर्ण छलकपट. आणि मुख्य म्हणजे अशा अध्यात्मिक संस्थांकडं इतपत आर्थिक, बेहिशेबी संपन्नता असणार, ही त्याला पूर्ण खात्री होती. तिच्याच जिवावर, आपला डाव तो एखाद्या कुशल जुगाऱ्यासारखा खेळला होता. हा मायावी राक्षस, बापूंना भुलवत भुलवत मोहाच्या त्या टोकापर्यंत घेऊन आला होता. बरं काही कायदा, पोलीस किंवा बाहेरुन मदत घ्यावी तर साठ लाख रुपये आणले कुठून, हे सांगावं लागणार, षटकर्णी होणार.

परिस्थिती मान्य करुन बापू उठले. त्या दिवशीच्या सत्संगात त्यांनी मारिच, त्यानं घेतलेलं कांचन मृगाचं रुप आणि त्या मोहानं प्रत्यक्ष प्रभूंचं झालेलं नुकसान याचं रसाळ विवेचन श्रोत्यांसमोर केलं. विषयातली त्यांची तल्लीनता श्रोत्यांना विशेष सुखावून गेली.

(संपूर्ण)

Comments

हपापाचा माल गपापा!

हे असेच होणे क्रमप्राप्त होते. ह्या जगात 'चोरावर मोर'ही असतात हे त्या बापूंना कळू नये म्हणजे त्यांची साधना व्यर्थ ठरली!
हे पाठक म्हणजे ते लखूभाई पाठक(लोणच्याचे व्यापारी आणि तांत्रिक चंद्रास्वामीचे दोस्त ) तर नव्हेत?

मस्त!

साठ लाख रोख रक्कम! बाप रे!
कथा आवडली. मस्त जमली आहे.

छान

कथा आवडली . आमच्या पर्यंत पोहचवल्या बद्दल संजोप रावांचे आभार!

-वरुण

आवडली

कथा खूप आवडली.

ही कथाच आहे ना?

दोन वर्षांपुर्वी इंदौर भागात अशी घटना घडल्याच्या बातम्या ऐकल्या होत्या, त्यातही बापूंचाच उल्लेख होता आणि मारिचाची कार्यशैली सुध्दा अशीच होती. थोडा तपशिलात फरक जाणवला. बाकी कथा झकास झालीय.

नीलकांत

 
^ वर