दि वर्स्ट काइंड ऑफ पेन

आजच एक बातमी वाचली सीएनएनच्या संकेतस्थळावर. "दी वर्स्ट काइंड ऑफ पेन" ( पिळवटून काढणारे दु:ख)..
http://www.cnn.com/2008/US/03/18/iraq.war.irpt/index.html

अमेरिकेतून इराकमध्ये लढाईच्या कामासाठी चाललेल्या तरूण सैनिकांच्या कुटुंबांची गोष्ट. यात एक बाई लिहीते - "दोन वर्षांपूर्वी माझा सतरा वर्षांचा मुलगा सैन्यात भरती होण्यासाठी माझी परवानगी घ्यायला आणि फॉर्मवर सही मागायला आला. मी त्याला म्हटले - कितीही वेळा विचारलंस तरी परवानगी देणार नाही. त्याने भिती आणि रागाने माझ्याकडे पाहिले". ती म्हणते की तो त्यावर जे म्हणाला ते माझ्या अजूनही लक्षात आहे. तो म्हणाला -" आई, मी माझ्या देशाला हे देणे लागतो".

आज दोन वर्षे लष्करी शिक्षण घेतलेला हा १९ वर्षाचा असलेला हा मुलगा इराकमध्ये चालला आहे. ती पुढे म्हणते की आता पुढे काय काय वाढून ठेवलेले असेल त्याची मला कल्पना आलेली आहे. त्याच्याबरोबर जाणारे इतर तरूणच आहेत, पण पुरूष आहेत. लहान नाहीत. पुढे ती जे म्हणते ते मला मनाला स्पर्श करून गेले. ती म्हणते -" ९/११ तर काल झाल्यासारखे वाटते. माझ्या या तेव्हा सातवीत असलेल्या मुलाच्या चेहर्‍यावरची भिती शाळेच्या बसने तो घरी आल्यावर आणि दूरदर्शनवर पुढच्या घटना घडताना पाहताना बघितलेली मला आठवते. आज हाच मुलगा सैनिक म्हणून समोर उभा आहे, आपण आपल्या घरांमध्ये सुरक्षित असावे यासाठी त्याचे रोजचे स्वातंत्र्य तो समर्पित करतो आहे. "

हे वाचताना जाणवले की खरेच, ९/११ होऊन लवकरच सात वर्षे होतील. त्यावेळी माध्यमिक शाळेत शिकणारी मुले आज तरूण झाली आहेत. गेल्या सहा सात वर्षांत एवढे मोठे निर्णय घेऊ लागली आहेत. बुशच्या शासनाचे कसलीही पर्वा न करता बेधडक घेतलेले निर्णय राबवायला तयार आहेत. सातवीत असताना गाडीत घालून आई/वडिलांना क्लास/शाळा/गेम्सना घेऊन जावी लागणारी ही मुले एवढी पटकन मोठी झाली कशी याचे भिती मिश्रित नवल वाटते. गेल्या सात वर्षांत त्यांनी नक्की काय पाहिले आहे, कसला परिणाम त्यांच्यावर झाला आहे ज्याच्या आधारावर आयुष्याचे एवढे मोठे निर्णय ते एवढ्या लहान वयात घेऊ शकतात? का आपणच मुलांना नको एवढे जपतो, गोंजारतो, लहान करून ठेवतो? आपले आयुष्याचे निर्णय बरोबर आहेत का नाहीत याची जाणीव खरेच १७ व्या वर्षी आलेली असते का? असे निर्णय घ्यायला लागणारा पूर्ण तपशील या तरूण मुलांकडे उपलब्ध असतो का? यात पालकांनी हस्तक्षेप करावा का करू नये? असे अनेक प्रश्न पडले. यावर तुमचे काय मत आहे जाणून घ्यायला आवडेल.

Comments

निर्णय

प्राप्तेतु षोडशे वर्षे पुत्रं मित्रवत् आचरेत् | हे जरी असले तरी आयुष्यातले महत्वाचे निर्णायक क्षण हे जर लवकर व स्वतंत्रपणे घेण्याची वेळ आली तर ते पेलवतील की नाही याबद्दल साशंकता प्रत्येक पालकाच्या मनात असतेच.
प्रकाश घाटपांडे

निर्णय - न सांगता आणि सांगून

जवळचे माहीत असलेले (भारतातील) उदाहरणः

एका हुशार / प्रथितयश कुटूंबातील मराठी मुलगा. वडील शास्त्रज्ञ तसेच सर्व विस्तारीत (एक्स्डंडेड) कुटूंब पण विद्यावंत आणि प्रथितयश. हा मुलगा तसा नुसता पाहीला असता तर त्यात काही विशेष जाणवले नसते. पण या पठ्ठ्याने कुणाला न सांगता स्वतःच वडिलांची सही करून सैन्यात जाण्याचा निर्णय घेतला. घरी पत्र आल्यावर घरच्यांना समजले...! काय झाले असेल याचा विचार करा... कसे ते माहीत नाही, पण तो निर्णय मान्य झाला. नंतर तो हवाईदलात चांगल्या हुद्यावर गेल्याचे त्याच्या भावाकडून समजले. त्यालापण आता १०-१२ वर्षे झाली असतील. पण अशी जाणारी मुले असतात.
-----
तसेच आत्ता दुसरा असाच एक अगदी जवळचा (एकुलता एक) हुषार मुलगा सैन्यात जाण्याची इर्षा ठेवून आहे. फरक इतकाच की त्याच्या आई-वडीलांना माहीत आहे आणि त्यांच्यासकट घरच्यांचा त्याला पाठींबा आहे. त्याच्या वडीलांना म्हणले तुमच्या सर्वांचे कौतुक आहे, तर ते म्हणाले की त्यात काही विशेष नाही. लोकं उगाच घाबरतात जर काही होयचे असले तर ते खाली उतरून रस्ता ओलांडताना पण होऊ शकेल...त्या पेक्षा तो त्याला जे हवे आहे ते तो मनापासून करतोय त्याला यश मिळेलच.

अधिक संभाषणाची गरज

सर्वप्रथम या सुंदर विषयावर चर्चा सुरू केल्याबद्दल आपले अभिनंदन!

साहस आणि तारतम्य ही तारेवरची कसरत आहे हे तर खरेच. तारूण्यात असतांना प्रायः साहसी असणारे विचार कामाच्या रगाड्यात आणि काळाच्या तडाख्यात क्रमशः अधिक सावध निर्णयप्रकियेकडे झुकावयास लागतात. दिशा योग्य असण्याची शक्यता वाढणे हा तारतम्याचा लाभ असली तरी त्या दिशेपर्यंत अंततोगत्वा पोहोंचण्याची ऊर्जा साहसानेच मिळते.

मुलांना निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आणि त्या निर्णयाच्या योग्यायोग्य परिणामांची जबाबदारी दिल्याशिवाय त्यांची निर्णयक्षमता सुयोग्य रितीने विकसित होणे अवघड आहे. मात्र, त्यासोबतच परिणांमांची सूक्ष्म आणि विवेचनात्मक अशी विस्तृत चर्चाही त्यांच्या सोबत करायला हवी. म्हणजे पुढील आयुष्यात त्यांचा सार्थ आत्मविश्वास वाढतांना पाहून आपलाही उत्साह दिवसेंदिवस वृद्धींगत होत जातो.

स्नेहांकित,
शैलेश

आयुष्याचे निर्णय

आपले आयुष्याचे निर्णय बरोबर आहेत का नाहीत याची जाणीव खरेच १७ व्या वर्षी आलेली असते का?

आयुष्याचे बरोबर किंवा योग्य निर्णय घ्यायची जाणीव १७ व्याच काय पण त्यानंतरही अनेक वर्षे (कधीही न येण्याचीही शक्यता आहे) येत नसावी. बरेचदा माणूस प्राप्त परिस्थितीतून निर्णय घेत असतो तर कधी आजूबाजूच्या समाजाचा त्यावर प्रभाव पडल्याने निर्णय घेतो तर कधी बंडखोरी प्रवृत्ती निर्माण झाल्याने घेतो परंतु हे निर्णय बरोबर आहेत का चुकीचे हे चटकन कळण्याची जाणीव त्याला किंवा त्याच्या पालकांना असेलच असे नाही.

एक सहज उदाहरण म्हणून दिव्या भारती नावाच्या अभिनेत्रीचे उदाहरण आठवले. कमी वयात ही अभिनेत्री यशाच्या शिखरावर चढली, जर जगली असती तर आज सफल अभिनेत्री ओळखली गेली असती पण अकाली मृत्यूमुळे लहान वयात सिनेक्षेत्रात येण्याचा निर्णय चुकीचा होता असे म्हणता येईल.

पालकांना थांग न लागू देता मुले पटकनच मोठी होतात. या वयांत आपल्याला पालकांपेक्षा जास्त समजते अशी त्यांची समजूतही असते. पालक म्हणून आपण त्यांना गोंजारत असतोच पण मुले आपल्यापासून दूर जाऊ लागली की पालकांच्या जीवनात कसोटीचे क्षण येतात.

माझं अगदी व्यक्तिगत मत द्यायचं झालं तर, मुलांना चांगल्या वाईटाची जाणीव करून द्यावी. गरज पडेल तेव्हा हस्तक्षेप करावा पण बळजबरी करू नये. चुकत असतील तर सांभाळून घ्यावे आणि इतका जीवही लावू नये की तुमचे प्रेम त्यांच्या पायांतील बेड्या बनतील.

असो, चर्चा आवडली.

असेच

माझं अगदी व्यक्तिगत मत द्यायचं झालं तर, मुलांना चांगल्या वाईटाची जाणीव करून द्यावी. गरज पडेल तेव्हा हस्तक्षेप करावा पण बळजबरी करू नये. चुकत असतील तर सांभाळून घ्यावे आणि इतका जीवही लावू नये की तुमचे प्रेम त्यांच्या पायांतील बेड्या बनतील.

अगदी योग्य विचार.

हे निर्णय बरोबर आहेत का चुकीचे हे चटकन कळण्याची जाणीव त्याला किंवा त्याच्या पालकांना असेलच असे नाही.

हाही मुद्दा योग्य. पण अनेकदा पालकांना निर्णयप्रक्रियेतील टोकांची जाणीव असते, त्याकडे व्यक्तिस्वातंत्र्याच्या किंवा प्रायव्हसीच्या चुकीच्या कल्पनांमुळे दुर्लक्ष तर होत नाही ना हे पहायला हवे असे मात्र वाटते.

शैलेश म्हणतात, साहस आणि तारतम्य ही तारेवरची कसरत आहे हे तर खरेच. तारूण्यात असतांना प्रायः साहसी असणारे विचार कामाच्या रगाड्यात आणि काळाच्या तडाख्यात क्रमशः अधिक सावध निर्णयप्रकियेकडे झुकावयास लागतात.
हे योग्य आहे, साहस पाहिजेच. पण तारतम्य आहे का केवळ एका भावनिक क्षणी घेतलेला आणि आयुष्यभर ज्याचा पश्चात्ताप होईल असा निर्णय? ह्यात फरक करणे कठीण आहे.

प्रकाशराव म्हणतात त्याप्रमाणे होते खरे. शांत असण्याचा वरून कितीही आव आणला तरी मुलांच्या निर्णयाबद्दल धाकधूक, शंकाकुशंका पालकांना काळजीपोटी/प्रेमापोटी येतच राहतात. आपण मध्यमवर्गीय पठडीतले विचार करतो म्हणून असे होते की काय असे मला वाटते.

सार

माझं अगदी व्यक्तिगत मत द्यायचं झालं तर, मुलांना चांगल्या वाईटाची जाणीव करून द्यावी. गरज पडेल तेव्हा हस्तक्षेप करावा पण बळजबरी करू नये. चुकत असतील तर सांभाळून घ्यावे आणि इतका जीवही लावू नये की तुमचे प्रेम त्यांच्या पायांतील बेड्या बनतील.

हे मत तार्किक व व्यवहार्य आहे. पुर्ण पणे सहमत.

प्रकाश घाटपांडे

चांगला विषय

माझ्याकडून काही मौलिक माहिती नसली तरी लक्षपूर्वक वाचत आहे.
(वाचक) धनंजय

अतिसामान्यीकरण म्हणून अवांतर?

प्रियाली/चित्रा यांच्या या उपप्रतिसादांवरून


माझं अगदी व्यक्तिगत मत द्यायचं झालं तर, मुलांना चांगल्या वाईटाची जाणीव करून द्यावी. गरज पडेल तेव्हा हस्तक्षेप करावा पण बळजबरी करू नये. चुकत असतील तर सांभाळून घ्यावे आणि इतका जीवही लावू नये की तुमचे प्रेम त्यांच्या पायांतील बेड्या बनतील.... अगदी योग्य विचार.

खलील जिब्रानच्या "प्रेषित" मधील एक परिच्छेद आठवला :

तुमची मुले तुमची नाहीत.
खुद्द आसुसलेल्या जीवसृष्टीची ती अपत्ये आहेत.
ती तुम्हांवाटे येतात पण तुम्हांकडून नाहीत,
आणि ती तुमच्यापाशी असली तरी तुमच्या मालकीची नाहीत.
तुम्ही त्यांना तुमचे प्रेम द्यावे, पण तुमचे विचार नाहीत.
कारण त्यांच्यापाशी त्यांचे स्वतःचे विचार आहेत.
तुम्ही त्यांच्या देहाला घर देऊ शकता, पण त्यांच्या आत्म्याला नाही -
कारण त्यांचे आत्मे भविष्यकाळाच्या घरात राहातात, आणि तिथे तुम्ही स्वप्नातही भेट देऊ शकत नाहीत.
तुम्ही त्यांच्यासारखे व्हायचा प्रयत्न करू शकता, पण त्यांना तुमच्यासारखे बनवाला बघू नका.
कारण जीवसृष्टी मागे जात नाही की भूतकाळापाशी घुटमळत नाही.
तुम्ही ते धनुष्य आहात ज्यातून तुमची मुले जिवंत बाण म्हणून पुढे धाडली जातात.
धनुर्धर अनंताचा वेध घेतो, आणि तो तुम्हास त्याच्या सर्वशक्तीनिशी वाकवतो, ज्यायोगे त्याचे बाण वेगाने आणि सुदूर जातील.
धनुर्धराच्या हातातील तुमचे वाकणे आनंदाचे असू दे;
कारण झेपणारा बाण जसा त्याला प्रिय आहे, तसेच सुस्थिर धनुष्यही त्याला प्रिय आहे."

इंग्रजीतील दुवा.

मौलिक विचार - एम्प्टी नेस्ट सिंड्रोम

सुरेख! खलिल जिब्रानचे मौलिक विचार या निमित्ताने वाचायला मिळाले. भिंतीवर डकवून* रोज वाचावेसे आहेत.

* अमेरिकेत मुले १८ वर्षांची झाल्यावर शिक्षण किंवा इतर कारणांनी घरे सोडून वेगळी राहू लागतात तेव्हा बर्‍याच पालकांना नैराश्याचा झटका येतो असे ऐकून आहे. याला एम्प्टी नेस्ट सिंड्रोम म्हणून ओळखले जाते. प्रसंगाला सामोरे जाण्याची तयारी आतापासून करायला हरकत नाही असे वाटते.

खरे?

एम्प्टी नेस्ट एक्स्पेक्टेशन" आहे असे वाटते आहे.

का खरेच आहे? मला माहिती आहेत ज्यांची मुले कॉलेजमध्ये आहेत त्यांचे लक्ष कसे मुलांकडेच असते ते जाणवते. हं, ते भले बर्म्युडा आणि अलास्काला ट्रीपा का करेनात वरकरणी..

एवरीबडी लव्ज....

कधी मुले कालिजात जातील, ह्याचीच बहुतेक परिचित वाट पाहताहेत.

हे बहुधा एम्प्टी नेस्ट सिंड्रोमला सामोरे जावे लागू नये म्हणून घेतलेली खबरदारी असावी. मीही बहुधा हेच करेन.

असो, यावरून "एवरीबडी लव्ज रेमंड"मधील एक वाक्य आठवले.

४०+ चा रॉबर्ट (रेमंडचा भाऊ) अद्याप आई-वडिलांसह राहात असतो पण एका प्रसंगी घर सोडून इतरत्र जाऊ इच्छितो. सर्वजण पाठींबा देतात परंतु फ्रॅंक (रेमंडचे वडिल) कासावीस होतो आणि हळूच सांगतो "डोन्ट् गो! इफ यू लीव देन देअर विल बी मी अँड हर!!!"

तेव्हा, सर्वांनी गंभीरपणे विचार करा. :))

ह. घ्या.

कविता

सुरेख..

ती तुम्हांवाटे येतात पण तुम्हांकडून नाहीत,
आणि ती तुमच्यापाशी असली तरी तुमच्या मालकीची नाहीत.

ही तर दोन वाक्ये फारच छान!

आय ऍम जस्ट...

त्यामुळे "ज्यांना मी फायनान्शियली सपोर्ट करतो, त्यांच्याबद्दल मला टॅक्स क्रेडिट घेता यावे" अशी सुमार इच्छा बाळगून, मी माझ्या मुलांबद्दल पूर्ण मालकीहक्क्क मागतो.

बॉस्टनमधील ऐकलेली एका भारतीयाच्या(च) घरची गोष्ट : त्याच्या चुणचुणीत लहान मुलीचे (पुलंच्या भाषेत "कार्टीचे") - बाबा यू डोन्ट लव्ह मी, फॉर यू आय ऍम जस्ट अ डिडक्शन!

बाकी...

तुम्ही त्यांना तुमचे प्रेम द्यावे, पण तुमचे विचार नाहीत.

मग खलील जिब्रान का इतरांना विचार देत सुटला? ... :)

ह .घ्या.

असेच

माझ्याकडून काही मौलिक माहिती नसली तरी लक्षपूर्वक वाचत आहे.
म्हणतो. लेख आणि चर्चा दोन्ही छान आहेत.

----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका, विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.

+१

माझ्याकडून काही मौलिक माहिती नसली तरी लक्षपूर्वक वाचत आहे.

असेच म्हणतो... छान विषय

(अजून एक वाचक) ऋषिकेश

अंशतः मान्य

काळजाला पिळवटणारे दु:ख वाटतच असेल, तर ते हा गधडा हरामखोर अजूनही प्रेसिडेंट आहे म्हणून.

अंशतः अशासाठी की आज त्याच्याविरूद्ध बातम्या देणारी चॅनेल्स, त्याच्या नावाने ओरडणारे बहुसंख्य डेमोक्रॅटिक/रिपब्लिकन राजकारणी त्याला इराकमध्ये जाताना पाठिंबा देत होते.. मुलांवर असे परिणाम करायला टीव्ही चॅनेलवाले लोकही तेवढेच कारणीभूत आहेत. शॉक अँड ऑ इत्यादी गोष्टींना दिलेली प्रसिद्धी मुलांच्या मनावर परिणाम करायला कारणीभूत ठरली असेल. यासंबंधी गोरचे "असॉल्ट ऑन रीझन" वाचण्यासारखे आहे.

अजून एक यासंबंधी बातमी - अमेरिकेकडून इराकमध्ये सैन्यात जाण्यासाठी सिटीझनशिपही नको, ग्रीनकार्ड पुरेसे आहे.. http://www.cnn.com/2008/US/03/19/greencard.marine/index.html
एरवी सुरक्षेची कारणे देऊन खाजगी कंपन्या ( (डिफेन्सची कंत्राटे मिळालेल्या ) मधूनसुद्धा नागरिकत्व असल्याशिवाय काम दिले जात नाही. तेथे ग्रीनकार्डही पुरेसे नाही.

चाणक्य सर्किट


सगळे नियम मोडून युद्ध मोडायला तयार आहे..


म्हणुनच मी

(वृद्ध) सर्किट

हे मी ( वृद्ध चाणक्य )सर्किट असे वाचतो.
प्रकाश घाटपांडे

मायकेल मूर

बहुधा फॅरेनहाईट ९/११ याच चित्रपटात मूरने बर्‍याच अमेरिक सिनेटर्सना तुमच्या मुलाला सैन्यात दाखल कराल का असे विचारले. एकानेही सरळ हो असे उत्तर दिले नाही.

----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका, विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.

उत्तम विषय

... आणि चांगले प्रतिसाद.

मूळ विषय प्रसरणशील आहे असे मला वाटते. मुलांची वाढ , पालकत्वाच्या जबाबदार्‍या , त्यातले योग्य-अयोग्य ठरविण्याचे कर्मकठीण काम.. अनेक गोष्टी बोलता येतील.

मूळ विषयामधे मुलांच्या खालील प्रश्नाना अधोरेखित केले आहे :

"... त्यांनी नक्की काय पाहिले आहे, कसला परिणाम त्यांच्यावर झाला आहे ज्याच्या आधारावर आयुष्याचे एवढे मोठे निर्णय ते एवढ्या लहान वयात घेऊ शकतात? का आपणच मुलांना नको एवढे जपतो, गोंजारतो, लहान करून ठेवतो? आपले आयुष्याचे निर्णय बरोबर आहेत का नाहीत याची जाणीव खरेच १७ व्या वर्षी आलेली असते का? असे निर्णय घ्यायला लागणारा पूर्ण तपशील या तरूण मुलांकडे उपलब्ध असतो का?"

याच प्रश्नाचा आरसा पालकांकडेसुद्धा वळवता येईल.

मुलाना योग्य ते निर्णय घेण्याइतपत पालक त्याना स्वावलंबी, शहाणे बनवतात का ? आयुष्यातल्या सर्वच नाही पण महत्त्वाच्या गोष्टींबद्दलचे निर्णय मुलाना घेता येण्याकरता आधी पालक तेव्हढे शहाणे असणे आवश्यक आहे. तसे आपण किती असतो ? आणि नक्की कुठले कुठले आणि कितपत शहाणपण आपल्याकडे असायला हवे ? जो तपशील मुलांना उपलब्ध व्हायला हवा , तो मुळात पालक म्हणून आपण माहित करून घेतो का ?

मुळात अगदी लहान मुलांचा एक पालक म्हणून व्यक्तिशः माझ्या मनात तरी, आपण एक पालक म्हणून घट्ट् , हमखास योग्य अशा भूमीवर उभे आहोत/उभे राहू शकू किंवा कसे, ही शंका नेहमी वावरत असते. येणारा उद्या नक्की कसा असेल ? आपण त्यांच्या आर्थिक आणि इतर वाढीच्या गरजा पूर्ण करू शकू का ? आणि , तांत्रिकदृष्ट्या तशा पूर्ण केल्या, तरी , एक पालक म्हणून आपली कर्तव्ये आपण पार पाडली असतील का ?

मूळ विषयापासून भरकटलो असेन तर क्षमा मागतो. पण ही चर्चा वाचताना जे मला सांगावेसे वाटले ते लिहिले आहे.

नाही

अजिबात भरकटला नाहीत, मूळ विषय असाच काहीसा मनात होता. तो प्रसरणशील आहे हे मान्य. आणि त्याबद्दल क्षमस्व. हा विषय सुरू करण्याच्या वेळी जे विचार आले ते पटकन तसेच्या तसे मांडले. हा विषय विस्कळितपणे माझ्या डोक्यात होता. पण आज लिहायला कारण झाली ती सीएनएनची बातमी.

तुमचा पालकांबद्दलचा मुद्दा (मनात आलेल्या शंका) या आपल्यासारख्या अनेक लोकांच्या मनात येतात आणि तो मुद्दा मला पटतोही. पण वरचा प्रश्न केवळ आई-वडिल /मुले यांबद्दलचा नाही, थोडा वेगळा आहे असे मला वाटते. ती बातमी वाचली तेव्हा सहा वर्षांमध्ये एका मुलाची ९/११ नंतरच्या बालसुलभ भिती, कुतुहल यापासून केवळ चार -पाच वर्षांत सैन्यात प्रवेश मिळवण्याइतपत निडरपणाकडे (आणि तेही बुशच्या इराक युद्धासाठी ) कशी वाटचाल झाली असेल असे वाटले. नक्की कोणत्या गोष्टी ही निर्णयप्रक्रिया प्रभावित करतात? बातम्यांची चॅनेल्स, सैन्यात भरती करणारे लोक, बाजूचे तरूण मित्र? म्हणजे आई-वडिलांचा या प्रक्रियेत सहभाग काही अंशीच असणार. माझ्या मते इराक युद्धासाठी प्राणांची पर्वा न करणारे तरूण हे केवळ तरूण असल्यामुळेच असे निर्णय घेऊ शकतात. जोखिम जास्त असली तर त्यातून मिळणारे संभाव्य फायदेही तितकेच जास्त असावेत हा जर निर्णयप्रक्रियेमागचा विचार असला तर वरच्या मुलाने घेतलेला निर्णय बहुदा परिणामांचा विचार करूनही केवळ भावनिक पातळीवरच जास्त घेतला जाईल असे वाटते. असे निर्णय कितीही उदारमतवादी असले तरी आई-वडिलांनी मान्य करणे याला एक प्रकारचे धैर्य लागेल असे वाटते. चुकीच्या किंवा चुकीच्या वेळी घेतलेल्या निर्णयांमुळे दुर्दैवाने आयुष्यातून उठवणारे किंवा चुकीच्या दिशेने नेणारे अनुभव मुलांच्या वाट्याला आले तर अशा आईवडिलांना आयुष्यभराचे दु:ख आणि घुसमट होत असेल. म्हणून हस्तक्षेपाचा मुद्दा मांडला होता.

व्यक्तिस्वातंत्र्य आणि व्यक्तिगत वाढ/अनुभव ह्या गोष्टींना मुलांना पारखे न करता समाजाचे (आणि स्वतःचेही) वेडेवाकडे दबाव त्यांच्यावर येऊ न देणे हे किती कठीण काम आहे असा विचार काहीसा मनात आला.

प्रातिनिधिक


मुळात अगदी लहान मुलांचा एक पालक म्हणून व्यक्तिशः माझ्या मनात तरी, आपण एक पालक म्हणून घट्ट् , हमखास योग्य अशा भूमीवर उभे आहोत/उभे राहू शकू किंवा कसे, ही शंका नेहमी वावरत असते. येणारा उद्या नक्की कसा असेल ? आपण त्यांच्या आर्थिक आणि इतर वाढीच्या गरजा पूर्ण करू शकू का ? आणि , तांत्रिकदृष्ट्या तशा पूर्ण केल्या, तरी , एक पालक म्हणून आपली कर्तव्ये आपण पार पाडली असतील का ?


मुक्त सुनित यांची स्पंदने ही प्रातिनिधिक आहेत. त्यांनी ती चांगली शब्दबद्ध केली आहेत.
प्रकाश घाटपांडे

चांगला चर्चाविषय

तसेच वरील बर्‍याच प्रतिसादांशी सहमत.

आजुबाजुचे वातावरण, घटना मित्रपरिवार यांचा बराच प्रभाव असतो तरुण वयातील अश्या निर्णयांना. मला तरी वाटते आजकालची पिढी जास्त हुशार आहे त्यांना फार लवकर पैसा कशात आहे हे माहीत असते.

असो कदाचित ह्या क्षेत्रातील करियर जास्त आकर्षक वाटत असेल काही मुलांना. आपल्याकडे देखील पंजाबातुन सर्रास (जास्त प्रमाणात) युवक आर्मीमधे जॉईन होतात. ती एक करीयर मुव्ह असते. पिढिजात परंपरा असते.

इराकमधे यु एस सोल्जरस् ना दिवसाला ८५ डॉलर्स लग्न झाले असेल तर दुप्पट मिळतात ["दुवा१" दुवा २] पण तुम्हाला दोन ते चार वर्षाचा अनुभव असेल तर तुम्ही ब्लॅकवाटर किंवा असे जगभरच्या प्रोफेशनल प्रायव्हेट सिक्युरीटी फर्म मधे जाउ शकता. ब्लॅकवाटरच्या भाडोत्री सैनीकाला इराक मधे दिवसाला ६०० डॉलर्स मिळतात. पुढे तुमचा अनुभव / हुद्दा जितका जास्त तितके जास्त पैसे. तसेच विशेष अधीकार असल्याने बर्‍याच बाबतीत कायद्याने सरंक्षण आहे.

केवळ अफगाण, इराक येथेच नव्हे तर मिडल ईस्ट, अफ्रीका, लॅटिन अमेरीका, पुर्वीच्या युएसएसआर मधील काही भागात ऑईल कंपन्या आदींना सुरक्षा पुरवणे खुप मोठा बिजनेस आहे.

काही लोकांना हे सगळे, नको रे बाबा कशाला असले धोकादायक प्रकार त्या पेक्षा डॉक्टर, इंजिनीयर, इनव्हेस्टमेंट बँकर, पीएचडी, एमबीए बरे असे वाटत असेल पण काही लोकांना असे धाडसी तसेच खुप पैसा देणारे क्षेत्र जास्त आवडत असेल. प्रायव्हेट सिक्युरीटी फर्म मधे जॉइन होण्यासाठी इराक / अफगणिस्तान युद्धामधील अनुभव आपल्या अर्जात दाखवता येणे ही एक उच्च करीयर मुव्ह आहे. [ह्या जाणार्‍या काही मुलांना, आता हे युद्ध संपायच्या आत, आपल्या नावावर हा अनुभव लागु दे असे नक्की होत असेल. ]

विचार करा अमेरीकेतील खेड्यातुन हॉलीवुडमधे अभिनय, मॉडेलिंग, मनोरंजन क्षेत्रात नाव, पैसा कमवायला घरातुन पळुन आलेला / आलेली १९ ते २२ वयातील युवक किंवा युवती किंवा सैनिकी शिक्षण घेउन एका प्रगत सैन्यदलाबरोबर जाणारा/जाणारी युवक युवती??? अमेरिकेतील पालक कोणाला परवानगी देतील असे वाटते :-)

शिर्षकावरुन सुरवातीला "वर्स्ट काइंड ऑफ पेन" मला पालकांना आपली मुले लवकर देवाघरी गेलीली पहायला लागणे असे वाटले. असो. इतर कुठल्याही वेळी "वर्स्ट काइंड ऑफ पेन" असा विषय वेगवेगळ्या लोकांपुढे निघाला तर जवळच्या कोणाचा अकाली मृत्यु, मुलाला जन्म देणे, दाढदुखी ही टॉप थ्री उत्तरे असतील. :-)

योगायोग

योगायोगाने खाली दिलेला हा दुवा याच विषयाशी संबंधित वाटला.

सुंदर

दुव्याबद्दल धन्यवाद. नेहेमीप्रमाणे याही वेळी त्याला चांगले दुवे कसे सापडतात याचे आश्चर्य वाटले. :-)

----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका, विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.

एक बाजू

आपण दिलेला दुवा : "कल्चरल डिफरन्स" ही गोष्ट वाचली आणि ती एकेरी वाटली अथवा नाण्याची एक बाजू वाटली. असा अनुभव हा भारतातून अमेरिकेत/कॅनडात आधी आलेल्या पिढ्यांना जास्त आला त्याचे कारण संगोपन कसे करायचे हे न समजणे आणि अर्थात आपली कमी दिसणारी माणसे. मी बरेच उलटे पाहीले आहे. सगळ्याच कहाण्या "नेमसेक" होत नाहीत.

असो. तो लेखसंदर्भ एका वेगळ्या चर्चेसाठी चांगला विषय आहे. तेंव्हा येथेच विषयांतर थांबवतो.

 
^ वर