कुत्र्याचा पाठलाग करणारा ससा !

नमस्कार !
शनिवारवाड्याबद्दल असे ऐकले होते की त्या भूमीवर एका कुत्र्याच्या मागे ससा पाठलाग करताना दिसला. ते पाहून वाड्याची जागा हीच असावी असे निश्चित केले. या वाड्याची जागा निश्चिती, भूमीपूजन इत्यादी महत्त्वाच्या घटना शनिवारी घडल्यामुळे याला शनिवारवाडा असेच नाव पडले.
कुत्र्याचा वा कोल्याचा पाठलाग करणारा ससा हा प्रसंग बहुधा हरिहरराय-बुक्क यांनी सुद्धा पाहिला आणि आपल्या राज्याची राजधानी त्या ठिकाणी करण्याचे त्यांनी योजले.
या सारख्या काही अख्यायिका आपण् ऐकलेल्या असतील. त्यातील सत्यासत्य आपण जाणत असाल तर कृपया येथे लिहावे ही विनंती. तसेच या सारख्या विलक्षण अख्यायिका / सत्य घटना इतर काही ऐतिहासिक स्थळांबाबत माहित असल्यास त्या सुद्धा येथे द्यावात. माहितीपूर्ण आणि रंजक चर्चा होईल.
-- लिखाळ.

लेखनविषय: दुवे:

Comments

रंजक गोष्टी

अशा रंजक गोष्टी बरेचदा माहिती असतात पण आज का कोणास ठाऊक एकही आठवत नाही. :-(

बाय द वे, हरिहरराय बुक्क कोण? हक्का-बक्कावाले का? ;-) म्हणजे विजयनगरचे शासक का?

त्यांच्याबद्दल एक आख्यायिका आताच समजली की या दोघा भावांना मुहम्मद बिन तुघलकने बळजबरीने धर्मांतर करण्यास भाग पाडले होते पण ते पळून गेले आणि पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश करून त्यांनी विजयनगर राज्याची स्थापना केली.

हिंदू धर्मात परत येण्याचे हे सर्वात आद्य उदाहरण समजायला हवे.

बळजबरीने धर्मांतर नव्हते बहुदा

संदर्भ, स्थळांची नावे अन तपशिल निटसा आठवत नाही पण त्यांचे धर्मांतर बळजबरीने नव्हते बहुदा. त्यांनी मुस्लिम धर्म स्विकारुन, मुघलांच्या सैन्यात प्रवेश करुन, दिल्लीत मुघलांबरोबर राहुन पातशहाची मर्जी संपादन केली होती. नंतर दक्षिणेतील एक जहागिरी (बहुदा बंगळुर चु.भु.ग द्या घ्या) मिळवुन, सगळी जमवाजमव करुन स्वतःला हिंदु राजा म्हणुन घोषीत केले, असे काहिसे स्मरते आहे.

वरिल उतार्‍यासाठी चु.भु.ग द्या घ्या.

कश्याचे प्रतीक?

"कुत्र्याचा पाठलाग करणारा ससा" हे कश्याचे प्रतीक आहे?

सहभागाबद्दल आभार

सहभागाबद्दल प्रतिसादकर्त्यांचे आभार.

"कुत्र्याचा पाठलाग करणारा ससा" हे कश्याचे प्रतीक आहे?
नक्की कल्पना नाही. बहुधा शिकारीप्रण्याची हुसकावणी साध्या प्राण्याकडून होते म्हणजे तो जास्त पराक्रमी बनला आहे. हे वास्तूसाठी शुभचिन्ह मानले असावे. कारण राजाच्या राहण्याचे ठिकाण निवडायचे होते.

--लिखाळ.

निर्धास्तपणा

मलाही असे वाटते. जिथे ससाही कुत्र्याचा पाठलाग करू शकतो त्या जागेवर राहणारे लोक निर्धास्त असावेत असा संकेत असावा.

मेक्सिको शहर

आस्तेक (Aztec) लोक वणवण फिरत असताना त्यांना एका तळ्यात बेटावरती निवडुंगावर बसून एक गरुड सापाशी झुंजताना दिसला. वस्ती करण्यासाठी तीच दैवी खूण (शकुन) ते शोधत होते. त्या बेटावरती त्यांनी आपली राजधानी वसवली. आजच्या वाढलेल्या मेक्सिको शहरात ते तळे पूर्ण बुजवून टाकलेले आहे. पण मेक्सिकोच्या झेंड्यावरती सापाशी झुंजणारा गरुड अजून आहे.

flag of mexico
मेक्सिकोचा ध्वज

वा !

छान माहिती. अशीच्झ माहिती-कथा या चर्चेत याव्या असे वाटते आहे.
आभार.
--लिखाळ.

गॉर्डियन गाठ

या चर्चेपेक्षा थोडासा वेगळा प्रतिसाद पण असे प्रतिसादही चालून जावेत असे वाटते. "टू अनटाय गॉर्डियन नॉट" (एखादी कठीण गोष्ट एका झटक्यात सोडवणे) आख्यायिका पुढीलप्रमाणे -

तुर्कस्तानाजवळ पर्शियन पठारावर पूर्वी फ्रिजिया नावाचे एक राज्य होते. या राज्याला योग्य राजा राहिला नव्हता. राज्याचा राजा कसा निवडायचा यावर गावातील मांत्रिकाचा (ओरेकल) सल्ला घेण्यात आला. "गावाच्या वेशीतून येणारा पहिला मनुष्य राजा होईल" असे भाकित मांत्रिकाने केले. मजेशीर गोष्ट म्हणजे, वेशीतून पहिला प्रवेशणारा माणूस बैलगाडीतून येणारा एक सामान्य गावकरी होता; पण मांत्रिकाच्या कृपेने त्याला राजा होण्याची संधी मिळाली.

आपल्यावरील अनुग्रहाची परतफेड म्हणून या राजाने आपली बैलगाडी झ्यूसला अर्पण केली आणि देवळासमोर एक विशिष्ट प्रकारे गाठ बांधून उभी केली. मांत्रिकाने लगेच दुसरी भविष्यवाणी केली की "ही गाठ जो सोडवून दाखवेल तो आशियाचा* राजा होईल." अनेकजणांनी अनेक प्रयत्न केले पण ती गाठ कोणालाही सोडवता आली नाही.

त्यानंतर कित्येक वर्षांनी अलेक्झांडर आपल्या सैन्याला घेऊन फ्रिजियात दाखल झाला. झ्यूसच्या देवळात त्याने प्रश्न केला की "ही गाठ कशाप्रकारे सोडवली जाते याला महत्त्व आहे का?" गावकर्‍यांनी तो प्रश्न महत्त्वाचा नाही म्हणताच त्याने तलवारीने दोराचे दोन तुकडे केले आणि गाठीचा प्रश्न झटक्यात सोडवला. ;-) त्यारात्री विजांचा कडकडाट होऊन प्रचंड वादळ झाले आणि झ्यूसने पुत्राला कौल दिला असे मानले गेले.

* त्या काळचा आशिया हा पर्शियापर्यंतच खंडित होता. अलेक्झांडर भारतात पोहोचण्यापूर्वीच आशियाचा सम्राट झालेला होता.

छान

प्रतिसाद फारसा अवांतर नाही :)
छानच अख्यायिका. प्रतिसाद आवडला.
आभार.
--लिखाळ.

अवांतर प्रतिसाद

शीर्षक वाचून ही बातमी आठवली. वॉल स्ट्रीट जर न्यू जर्सीत या ठिकाणी हलवली तर कायम तेजी राहील :) ['बेअर' आसपास फिरकणार नाही ]

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

हा हा

मजेदार प्रसंग. शनिवार वाड्याच्या जागेवर असेच काही झाले असणार :)
--लिखाळ.

दन्तकथा

आपल्याकडे खेडोपाडी अशा प्रकारच्या अनेक दन्तकथा आढळतात. महाराष्ट्रातल्या एका गावात अनेक वर्षे वीज नव्हती कारण वीज आल्यास अपशकुन होईल असे लोकाना वाटत असे.

 
^ वर