सर्वात्मका सर्वेश्वरा

बरेच दिवसांनी 'सर्वात्मका सर्वेश्वरा' हे पद पं. जितेंद्र अभिषेकींच्या आवाजात ऐकले. यातील काही ओळींबद्दल काही प्रश्न पडले.

१. 'ऋग्वेद या हृदयात व्हा' याचा अर्थ काय? याचा संबंध पुढच्या ओळीतील आर्यतेशी आहे असा नंदनचा इंटरेस्टींग मुद्दा आहे.
२. हे कुणाला उद्देशून आहे? प्रथमदर्शनी ईश्वराला असे वाटते, पण मग 'जे जे जगी जगते तया, माझे म्हणा करूणाकरा' याचा अर्थ ईश्वराला दयाळू होण्याचा उपदेश केल्यासारखे वाटते.
३. हे ययाति-देवयानीमधील आहे इतकेच माहित आहे. याचा नेमका संदर्भ काय आहे? (हे कळाल्यास प्रश्न २ चे उत्तर मिळायला सोपे जाईल असे वाटते. )

या निमित्ताने कुसुमाग्रजांच्या साहित्यावर चर्चा झाल्यास दुधात केशर.

लेखनविषय: दुवे:

Comments

संक्षिप्त पसायदान

ह्या गाण्याला/कवितेला "कुसुमाग्रजांचे पसायदान" आहे असे कोणीतरी म्हणल्याचे आठवते. एकदा त्या नजरेतून पाहीले की यात व्यक्तीमधे शक्यतितक्या चांगल्या गोष्टी असाव्यात/जागूत व्हाव्यात असे म्हणले असल्याचे जाणवेल.

हे गाणे ईश्वराला उद्देशूनच आहे. ते ईश्वरालाच म्हणत आहेत की "या जगातील चराचरावर" करूणा करा म्हणून.

"ऋग्वेद ह्या हृदयात व्हा" चा अर्थ ऐकलेला नसला तरी काय वाटला ते सांगतो: - ऋग्वेद हा पहीला ग्रंथ समजला जातो. त्या अर्थी पहीले (पुस्तकी नसले तरीही) अधिकृत ज्ञान निर्मिती अथवा ज्ञानाचे "compilation" आहे - म्हणून ज्ञानाचे प्रतिक आहे. तिमिरात आदीत्य होणे म्हणजे अंधारात प्रकाशमय अर्थात अज्ञान दूर करून ज्ञानी करणे, हृदयात ऋग्वेद होणे म्हणजे ज्ञानाचा उपयोग हा केवळ डोक्याने न करता हृदयाने करायची बुद्धी देणे (ईश्वरासारखी करूणा ही हृदयातून येऊ शकते, केवळ डोक्याने नाही) असा अर्थ होऊ शकेल.

"सुजनत्व द्या, द्या आर्यता" - आर्य ह्या शब्दाचा अर्थ चांगला माणूस "Noble Person" हा आहे. आर्यता म्हणजे Nobility. "कृण्वंतु विश्व आर्यंम् " म्हणजे "we will spread Nobility in the world"असा अर्थ होतो. म्हणूनच आमच्यातील माणूसपण जागे होवू देत असा या ओळीचा अर्थ आहे. त्या अर्थाने म्हणाल तर तिन्ही ओळी एकमेकींशी जोडलेल्या आहेत, असेच म्हणावे लागेल.

या गाण्याचा ययाती-देवयानीतील संदर्भ माहीत नाही.

अवांतरः कधी काळी ८०च्या दशकात महाराष्ट्र सरकारला हे गाणे खूप चांगले वाटले आणि तत्कालीन जे कोणते सरकार (काँग्रेसच असायची त्यावेळेस) होते त्यांनी हे शाळांमधे सुरवातीस म्हणायला सांगितले. पण आमच्या अल्पसंख्यांक बंधूंनी त्यावर धार्मिक भावना दुखावतात म्हणून निषेध केला आणि परीणामी सरकारने माघार घेतली....ह्यावरून तळवळकर अथवा गडकर्‍यांचा तिळपापड झालेला अग्रलेख वाचल्याचे आठवते आहे.

एक (ऐकीव) सुधारणा

"सुजनत्व द्या, द्या आर्यता" नसून "सृजनत्व द्या, द्या आर्यता" आहे/असावे असा अंदाज.

अनुदारिता ?

"अनुदारता" (हे माझ्या मते बरोबर) [दुरिता हरा ...] ऐवजी अभिषेकी "अनुदारिता" का म्हणायचे हे समजलेले नाही.
की अनुदारिता असा शब्द (कुठल्या तरी भाषेत) खरोखरच आहे व त्याला काही (या गीताच्या संबंधात) अर्थ आहे ?
याचे उत्तर बहुधा वाचक्नवींनाच द्यावे लागेल असे वाटते.
टाका बोवा कोणीतरी आमच्या ज्ञानात भर.

- दिगम्भा

आभार

चर्चेत भाग घेणार्‍यांचे आभार. विकास यांनी सांगितलेला अर्थ पटतो. पसायदान म्हणून घेतल्यास याचा अर्थ बराच बदलतो. विकास यांनी सांगितलेला "ऋग्वेद ह्या हृदयात व्हा"चा अर्थ आवडला. इंग्रजीत एखादी सवय किंवा विचार 'सेकंड नेचर' होणे बहुधा यालाच म्हणत असावेत.
मुक्तसुनित यांचा प्रतिसाद वाचल्यानंतर परत गाणे ऐकले. मला तरी सुजनत्व असेच वाटते आहे. चूभूद्याघ्या. सुजनत्वचा अर्थ इथे आहे.
दिगम्भांची शंका रास्त वाटते. शिवाय अनुदारिताचा अर्थ मोल्सवर्थवर सापडला नाही.

विरंगुळा : टगेरावांनी 'जे जे जगी जगते तया, माझे म्हणा' ही चायनिज कुझिनची व्याख्या सांगितली आहे. :-)

अवांतर : अशाच शंका 'आनंदवनभुवनी' आणि 'कोन्या राजानं राजानं' या गाण्यांबद्दलही आहेत. त्याविषयी पुन्हा कधितरी.

अती अवांतर : 'आनंदवनभुवनी' गाण्यात लताला श्वास घ्यायला संधी कधी मिळते हे न कळाल्याने ऐकताना आपल्यालाच दम लागतो.
----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.

विरंगुळा +

विरंगुळा : टगेरावांनी 'जे जे जगी जगते तया, माझे म्हणा' ही चायनिज कुझिनची व्याख्या सांगितली आहे. :-)

एकदम मस्त!

त्याच पद्धतीचा पण वेगळा शाब्दीक विनोद पुलंनी केला होता - चीनी खाद्य पाहील्यावर "सर्वात्मका" या शब्दाचा अर्थ समजतो!

अती अवांतर : 'आनंदवनभुवनी' गाण्यात लताला श्वास घ्यायला संधी कधी मिळते हे न कळाल्याने ऐकताना आपल्यालाच दम लागतो.

आनंदवनभूवनी गाताना त्यांना साथीला काही जण तरी आहेत. आशाचे "जीवलगा राहीले दूर घर माझे" ऐका, कुठेही न थांबता अथपासून इतिपर्यंत आहे! तिच्याच एका मुलाखतीत तीने "बाळ"बद्दल लाडाने तक्रार करताना (की त्याची गाणी फक्त मला आणि दिदीलाच जमू शकतात) ह्या गाण्याबद्दल सांगीतले होते.

इडागम

मराठीत क्रियापदाच्या प्रत्ययापूर्वीच्या अक्षराला अनेकदा इडागम होतो. 'दळता, कांडता' ऐवजी दळिता, कांडिता तुज गाईन अनंता. . किंवा 'जेवत' ऐवजी गोविंद गोपाळ हे दोन बंधू, जेवीत होते दहिभात लिंबू. वगैरे. (अवांतर:कधीकधी असा इडागम भासणारा 'इ' बोलीभाषेत निघून जातो. 'साठी' अशा अर्थाचे शब्दयोगी अव्यय 'करिता'. याचे बोलीभाषेत 'करता' होते. शनिवारचे असेच बोली-रूप शनवार केले जाते. )
संस्कृतात मत्वर्थीय प्रत्ययांमधला एक प्रत्यय - इत(च्‌). -तदस्य संजातं तारकादिभ्य: इतच्‌ ।(पाणिनी ५.२.३६). तारका इत्यादी नामांना हा लागतो आणि चांगला झालेला वा उत्पन्न केलेला असा अर्थ बदलवतो. तारका-तारकित(आकाश),
रोमांच-रोमांचित(काया), निद्रित, अनुदानित वगैरे. अनुदार हे जेव्हा विशेषण असते तेव्हा त्याला हा लागणार नाही. परंतु, 'अनुदार' नाम असेल तर अर्थ होईल अनुदार मनुष्य. (उदा. या सभेत अनुदारांचा भरणा आहे.) तरीसुद्धा अनुदारित आणि अनुदारिता ही रूपे सहजी शक्य होणार नाहीत. विदारित हे रूप होते कारण, विदारितमध्ये धातू वि +दॄ आहे. अनुदार आणि अनुदानित मध्ये दा(यच्छ्‌‌).
त्यामुळे जितेंद्र अभिषेकीं सारख्यांनी 'अनुदारिता' असे का म्हटले असावे ते समजत नाही.

सृजन म्हणजे उत्पत्ती . हे मुळातच भाववाचक नाम आहे. त्याला ता लावून उत्पादनक्षमता असा अर्थ होईल. तो गाण्यात अभिप्रेत नाही, त्यामुळे सुजनता हेच बरोबर असले पाहिजे.
--वाचक्‍नवी

आभार

वाचक्‍नवी,
विस्तृत खुलासा केल्याबद्दल अनेक धन्यवाद. एकूणात अनुदारिताचा प्रश्न बराच अवघड दिसतो आहे.
----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.

माझ्या प्रतीतील पाठ्य

१. अर्थ विकास यांनी दिल्यासारखाच.
२. ईश्वराला उपदेश नसून "माझे म्हणा" अशी आळवणी आहे.
३. हा संजीवनी मंत्र आहे, किंवा मंत्राच्या संदर्भात आलेले प्रार्थनागीत आहे.

(प्रसंग असा : ययाती देवयानीच्या शापाने गलितगात्र पडलेला आहे. कच देवयानीला समज देतो, देवयानीला म्हणणे पटते. कच संजीवनी मंत्राने ययातीला पुन्हा यौवन देण्यास तयार होतो. प्रसंग शेवटच्या पानावर आहे.)

देवयानी : ...माझी प्रार्थना ... तुमच्या मंत्रयज्ञात असुरासारखी व्यत्यय मात्र आणील...
कच : असं होणार नाही. तुझ्या अहंकाराचं आणि त्यातून निर्माण झालेल्या क्रोधाचं या शुभ घटनेला विसर्जन होत आहे. परमेश्वरासंबंधी शंका बाळगू नकोस. जे मनानं येतील त्यांच्यासाठी त्याच्या कृपेची दारं सदैव मोकळी आहेत. देवी, केवळ ययातीच्या नव्हे, तर तुझ्याही पुनर्जन्माचा हा मंगल क्षण आहे. जोड, हात जोड, आणि ययातीसाठी, माझ्या मंत्राच्या यशासाठी, आणि स्वतःच्या हितासाठी, ईश्वराची प्रार्थना कर.
देवयानी : हो - करते.
[हात जोडून इतरांप्रमाणे उभी राहते. कच प्रार्थनागीत म्हणतो -]
सर्वात्मका सर्वेश्वरा
गंगाधरा शिवसुंदरा ।
जे जे जगी जगते तया
माझे म्हणा करुणाकरा ॥
आदित्य या तिमिरात व्हा
ऋग्वेद या हृदयात व्हा
सुजनत्व द्या, द्या आर्यता
अनुदारता दुरिता हरा ॥

कच : (क्षणभराने) ऊठ ययाति ऊठ! तुझ्या शरिरातील वृद्धत्व नाहिसं झालं आहे, सर्व व्याधीतून तू मुक्त झाला आहेस. तू पूर्वीसारखा तरुण, तेजस्वी, रूपवान आणि बलसंपन्न झाला आहेस. सर्व चराचर विश्वाला आपल्या हृदयाशी धरणार्‍या त्या सनातनाच्या कृपेनं, देवयानीनं दिलेला शाप तुझ्या देहावरून, मनावरून आणि जीवनावरून बाजूला होत आहे. दशदिशांत वास्तव्य करणार्‍या हे अष्टपालांनो, पृथ्वीवरच्या मातीला पावन करणार्‍या हे पार्थीव तत्त्वांनो, आकाशावर अधिपत्य गाजवणार्‍या हे प्रकाशदेवतांनो, हृदयस्थ उच्चारानं प्रगट झालेल्या माझ्या संजीवनीमंत्राला आपल्या त्रिविध दयाशील शक्तींचा आशीर्वाद द्या आणि त्याचे आवाहन फलद्रूप करा. सेमम् नो अध्वरम् यज - सेमम् नो अध्वरम् यज - सेमम् नो अध्वरम् यज.
[झोपेतून जाग आल्याप्रमाणे... ययाति हलके हलके उठतो...]

(ययाति आणि देवयानी. वि. वा. शिरवाडकर; पॉप्युलर प्रकाशन, १९७४ आवृत्ती, २००० साली पुनर्मुद्रण)

सुंदर

धनंजय,
हा प्रसंग इथे दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार. संदर्भ कळाल्यानंतर बर्‍याच गोष्टी स्पष्ट झाल्या. यानंतर नाटक वाचण्याची उत्सुकता आहे. हे पद आधीही आवडत होतेच, पण आता परत जेव्हा ऐकेन, तेव्हा मनातील संदर्भ नक्कीच बदललेले असतील. कलांच्या बाबतीत स्वतः अनुभव घेणे महत्वाचे आहेच, शिवाय असा अनुभव घेतल्यानंतर जे आपल्याला भावते* त्याबद्दल अधिक माहिती मिळाली तर रसग्रहण अधिक चांगल्या रीतीने करता येते. (सगळीकडे 'असे मला वाटते'.)

*इथे जे आपल्याला भावते हे महत्वाचे आहे. मग त्याला नोबेल/ऑस्कर मिळाले असो वा नसो, (अमवा).
----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका, विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.

असेच

म्हणतो. संदर्भाबद्दल धन्यवाद.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

 
^ वर