कर्ज नको, कर्जमाफीही नको

केंद्रीय अर्थसंकल्पांत शेतकर्‍यांच्या कर्जमाफीसाठी ६०,००० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या कर्जबाजारीपणाचा प्रश्न सध्या सुटल्यासारखा दिसत असला तरी तो कायमचा निकालांत निघालेला नाही. कर्जबाजारीपणा - आत्महत्त्या - कर्जमाफी -पुन्हा कर्जबाजारीपणा - पुन्हा आत्महत्त्या - ..... हे चक्र चालूच राहील. ते भेदायचे असेल तर देशाच्या शेतीविषयक धोरणांत आमूलाग्र बदल करायला हवा. त्यासाठी एक पर्याय :

बहुतांश शेती पाण्यावर अवलंबून असणे व पावसाची अनिश्चितता ही, माझ्या मते, शेतकर्‍याच्या कर्जबाजारीपणाची प्रमुख कारणे आहेत. शेतकर्‍याच्या व्यक्तिगत पातळीवर याबद्दल काही करणे अशक्य आहे. म्हणून सरकारनेच हा व्यवसाय हाती घ्यावा. त्यासाठी सर्व शेतजमिनी सरकारने ताब्यांत घ्याव्या. शेतीचे औद्योगिकीकरण करावे. त्यांत सध्या शेतीव्यवसायांत असलेल्यांना अग्रहक्काने रोजगार द्यावा. त्यांना किमान वेतन कायदा लागू करावा व सवलतीच्या दराने अन्नधान्य द्यावे. पाण्याच्या उपलब्धतेचा व अन्नधान्याच्या गरजेचा व नगदी पिकांच्या मागणीचा विचार करून पिके कशी घ्यावी याचा निर्णय सरकारी पातळीवर घ्यावा. त्यासाठी आवश्यक ती आर्थिक तरतूद सरकारने करावी. म्हणजे शेतकर्‍याच्या डोक्यावर कर्जाचा भार येण्याचा प्रश्नच उद्भवणार नाही. शेतीचा अर्थसंकल्प रेल्वेच्या अर्थसंकल्पाप्रमाणे संसदेंत वेगळा सादर करावा.

या धोरणाचा आणखी एक फायदा म्हणजे विशेष आर्थिक क्षेत्रासाठी शेतजमिनी देण्याच्या निर्णय प्रक्रियेंत फारशा अडचणी येणार नाहीत.

आपणांस काय वाटते? पर्याय कम्युनिस्टी थाटाचा वाटतो. नाही का?

लेखनविषय: दुवे:

Comments

रोगापेक्षा इलाज भयंकर

असे झाले तर शेतकर्‍यांच्या जमिनी घ्यायला टपलेले धनदांडगे सरकारशी हातमिळवणी करतील. आधुनिक तंत्रज्ञान, आधुनिक प्रशिक्षण, सहकार शेती, शेती करणारी आधुनिक कंपनी त्यात शेतकरी हा भागधारक वगैरे पर्याय आणता येतील
पारंपारिक शेती हा छुप्या बेरोजगारीसारखाच असतो.
प्रकाश घाटपांडे

रोगापेक्षा इलाज भयंकर

आमच्याही मनात हेच आले. रोगापेक्षा इलाज भयंकर...
चर्चा करायला विषय चांगला आहे. पण तुमचा एक मुद्दा पुर्णपणे पटला नाही. तो म्हणजे, बहुतांश शेती पाण्यावर अवलंबून असणे व पावसाची अनिश्चितता ही, माझ्या मते, शेतकर्‍याच्या कर्जबाजारीपणाची प्रमुख कारणे आहेत. माझ्यामते कर्जबाजारीपणा का आहे? हा पहिला चर्चेचा विषय आहे. तुम्हाला काय वाटत?





कर्जबाजारीपणाचे कारण

माझ्यामते कर्जबाजारीपणा का आहे? हा पहिला चर्चेचा विषय आहे.

अपेक्षेप्रमाणे पीक आले नाही व उत्पन्न मिळाले नाही की शेतकर्‍याला कर्ज फेडता येत नाही. म्हणून तो कर्जबाजारी होतो.

उपाय नसला तरी दिलासा

अपेक्षेप्रमाणे पीक आले नाही व उत्पन्न मिळाले नाही की शेतकर्‍याला कर्ज फेडता येत नाही. म्हणून तो कर्जबाजारी होतो

बर्‍याच शेतकर्‍यांना बँका कर्जे देऊ शकत नाहित. ते शेतकरी जमिन/घर वगैरे तारण ठेऊन सावकारांकडून कर्ज घेतो. त्यांचा व्याजदर इतका प्रचंड असतो की जरी शेतकर्‍याने वर्षात दोनदा १००% पीक जरी काढले तरी ते फेडणे कठीण असते. आणि त्यात पीक झालं नाहि तर हा डोंगर वाढतच जातो. अशी वेळ येते की उत्तम पाऊस वगैरे होऊनसुद्धा शेतकर्‍याच्या हाती काहिच रहात नाहि.

यावर आपण सुचवलेला उपाय इतरांनी म्हट्ल्याप्रमाणे रोगापेक्षा इलाज भयंकर वाटला. हे म्हणजे भ्रष्टाचाराला मुक्त कुरण झालं.

असो, यावर कर्जमाफि हा कायमस्वरूपी उपाय नसला तरी दिलासा निश्चितच आहे.

-ऋषिकेश

शेती, शिक्षण आणि कर्ज

शरदकाका (शरद या नावाला महाराष्ट्रात बराच मान आहे ना!!),
शेतकरी आणि कर्ज यांचा संबंध लावायला गेल्यास बरेच असे धागे मिळतील की त्यात राजकारण आणि हे कर्ज दूरच राहतील.

शेती आणि शेतकरी :
भारतात शेतकरी कोण आणि त्याच्याकडे शेतजमीन किती? हा एक प्रश्न आहे. मागे वळून पाहिल्यास आज आपल्याला अनेक अल्पभूधारक दिसतात. मागच्या १-२-३ पिढ्यांपासून लोकांकडे जमीन होती. आजोबां - वडिल आणि नातवंडे असा विचार करू. आजोबांच्या पिढीत आजोबांकडे समजा १० एकर शेती होती. सगळं काही संमृद्ध होतं. अगदी रामराज्यच म्हणाना. त्यात देवावर प्रचंड श्रद्धा. देवाच्या कृपेने सगळ एकदम छान होतं. आजोबांचा संसार एकदम फुलला होता. आजोबांना ५ (सर्वसाधारणपणे हा आकडा एकदम सामान्य आहे त्या काळासाठी) मुलं होती. त्यातले ३ अभ्यासात हुशार म्हणून त्यांना शिकवलं. बाकीचे २ बेताचे म्हणून त्यांना शेतीत ओढंल. आजोबा जिवंत असे पर्यंत सगळंच छान होत. शिकलेले भाउ शहराकडे साहेब झाले. पण गावाशी, शेत जमीनीशी नातं मात्र घट्ट होतं. पण आजोबा गेल्यावर तंटा सुरू झाला. ५ भावांना एकत्र ठेवणं आजीला जमेना आणि मग वाटण्या झाल्या. प्रत्येकाला २ एकर जमीन. सगळं बेताच चालंल होतं. प्रत्येक भावाला २ अपत्यं. मग प्रत्येकाची जमीन अशीच वाटली गेली. प्रत्येकाला १ एकर जमीन. त्यात शिकलेल्यांनी शेतीकडे म्हणावं तेवढं लक्ष नाही दिलं. काहींच्या जमीनी कुळकायद्याने गेल्या. जे शेती करत होते ते पारंपारीक पद्धतीने. शिक्षण नसल्याने फारसा अभ्यासू विचार नाही. गरजा वाढलेल्या. उत्पन्न करायला म्हणावी तेवढी जमीन नाही. त्यात भर म्हणून निसर्गाची अवकृपा. गावाकडचे भाउ, सहकाराच्या वाटेला जाउन तिथल्या राजकारणात पडले आणि शेतीकडे दुर्लक्ष करू लागले. मग गरज लागेल त्या प्रमाणे कर्ज काढू लागले. या आशेवर की या वेळी उस घेउ. कारखान्यात आपला वट आहे. दर चांगला मिळेल. पण तिथे गब्बर लोकांनी आपलेच खिसे भरून घेतले. म्हणावं तेवढा मोबदल मिळाला नाही. नैराश्य आले. दारू सुरू. सगळ अगदी धुळीला मिळालं. मग पत राखण्यासाठी जोरदार लग्न. त्यासाठी सावकारी कर्जे. सावकार म्हणजे परत राजकारणींच. निवडणुकीत त्यांच्या प्रचाराला जाणं आलंच. असलेल्या शेतीकडे परत दुर्लक्ष. शेताचा खर्च परवडत नाही. कुठेच काहीच आशादायक राहिलेलं नाही. मग एकच उपाय. आत्महत्या. निदान माझ्या पुरता तरी प्रश्न मिटवला.

सहकारः
महाराष्ट्रात सहकार चळवळ खुप जोमाने वाढली. पण त्यांच्यावर राजकारण्यांचा प्रभाव. सहकार नावाखाली अपहार सुरू आहे. सहकाराची चांगली फळे चाखणारे आणि आज सुद्धा राखणारे आहेत. तिथे हा प्रश्न नाहीच. वारणा हा एक असाच समूह.

मानसिकता आणि व्यवस्थापन:
भारतात अल्पभूधारक शेतकर्‍यांची मानसिकता पहिल्यास अत्यंत निराशादायक चित्र समोर येइल. शेतीचे बिघडलेले समीकरण आणि व्यवस्थापन याला जास्त जबाबदार आहे. अल्पभूधारक शेतकर्‍यांची मानसिकता बदलणे हा खरा उपाय आहे. ह्यासाठी मग त्यांना केंद्रस्थानी ठेवून तज्ञ लोकांचे व्यवस्थापन गरजेचे आहे. हे सरकारने करण्यापेक्षा, ह्याच लोकांनी पुढे येउन करणे गरजेचे आहे. हल्ली शरद पवार म्हणतात शेतीत काही नाही. उद्योगधंदा बघा. याचा विचार करायला हवा. त्यांना काय म्हणायचे आहे ते न बोललेले बरे. पण शेती सोबतच अनेक जोडधंदे करता येउ शकतात. पश्विम महाराष्ट्रातले गोकुळ, वारणा हे दुग्ध समूह हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. पारंपारीक विचार सोडा असं नाही. पण त्याला आधुनिकतेची, विज्ञानाची जोड देणे गरजेचे आहे. गावातल्या लोकांनी एकत्र येउन एखाद्या उद्योग समूह तयार करणे. उत्पादने तयार करणे. अगदी मग रद्दी कागदाच्या पिशव्या तयार करणे असो की शेतीमाल निर्यातीसाठी लागणार्‍या इतर गोष्टींचा जोडधंदा.
इच्छा असेल तर मार्ग नक्की दिसेल. पण मुख्य मुद्दा मानसिकतेचा आहे. जोवर शेतकरी स्वतःचा विचार करणार नाही, राजकारण्यांना योग्य अंतरावर ठेवणार नाही, तो वर हा प्रश्न सुटणार नाही.

खरा उपाय आहे तो म्हणजे, आधुनिक सहकार चळवळ करण्याची. त्याला आपण सहकार म्हणण्या पेक्षा प्रत्यक गावाला स्वतःचे उद्योग, स्वतःच्या गरज पुर्ण करण्यासाठी राजमार्गाने जे काही करता येइल ते करण्याची. या विचारांनी भारतीय एकत्र आले तर असे प्रश्न कायमचे निकालात निघतील.

राहिला एक मुद्दा, ज्यांना खरचं आधुनिक पद्धतीने शेती करायची आहे. पण पिढीजात जमीनच नाही, असे लोक शेती क्षेत्रात येउ नयेत अशी योग्य व्यवस्था काँग्रेसने पुर्वीच केली आहे.

शेती, शिक्षण आणि कर्ज यांची सांगड घातली तर भयानक मुद्दे समोर येतील. ते सोडवता येतील. पण कधी? कोणी? कदाचित सरकारने सगळं काही करावं ही मानसिकता या प्रश्नांकडे जाउच देत नाही.

अवांतरः वाजपेयी पंतप्रधान असताना जय जवान, जय किसान, जय विज्ञान घोषणा चांगलीच पेरली गेली होती. पण सोनियाचे दिवस आले आणि मग आमआदमी केंद्रस्थानी आला. कशाला? कर्जमाफीची स्वप्ने पहायला.





गोदान.

हा विषय वाचताना गोदान या धनपतरायांच्या कादंबरीची आठवण झाली. दारिद्र्य आणि कर्जबाजारीपणा हा शेतकर्‍यांच्या पाचवीलाच पुजलेला आहे. तरी भारतीय शेतकर्‍यांची आपल्या काळ्या आईवर असाधारण अशी प्रिती आहे. आपल्याला अथवा आपल्या वारसाला ही काळी आई मिळणार नाही, आपला यावर मालकीहक्क राहणार नाही ही कल्पनाच हा शेतकरी स्विकारु शकत नाही.

आमच्या एका नातेवाईकाने काही पिढीजात शेती विकली असता त्यांच्या घरातील ज्येष्ठ लोकं अजूनही हळहळ करताना मी पाहत असतो.

त्यामूळे शेतीचे शासकियकरण ही योजना अमान्य.

गोदान

हा विषय वाचताना गोदान या धनपतरायांच्या कादंबरीची आठवण झाली.
मुंशी प्रेमचंद यांचीही गोदान कादंबरी असल्याचे स्मरते. ती हीच की वेगळी?
----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.

अरे वा, म्हणजे..

हरिवंशराय (व पुढे अमिताभ) श्रीवास्तव हे यांचे कोणी नातेवाईक दिसतात :)
- दिगम्भा

धन्यवाद

प्रश्न विचारण्याआधी गूगलून पहायला हवे होते. गलती से मिश्टेक हो गया. :-)
----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.

"कर्जमाफी नको पाणी द्या"

अशी बर्‍याच शेतकर्‍यांची खरी मागणी असल्याचे मध्यंतरी; बहुदा सकाळमध्ये वाचले. पाणी म्हणजे सिंचन या अर्थी.

अधुनिक शिक्षण

वर प्रकाशराव आणि चाणक्यांनी म्हणल्याप्रमाणे हा प्रकार "रोगा पेक्षा इलाज भयंकर" असाच वाटतो. आपला देश मागे राहण्याचे एक मूळ कारण हे बाबूगिरी हे होते. ती जेंव्हा कमी झाली तेंव्हा आपसुकच आपली अर्थव्यवसस्था सुधारायला लागली. (अर्थात सर्व काही खाजगी व्हावे या मताचा मी नाही आहे. सिस्टीम ही चेक्स आणि बॅलन्सची असावी. ती सतत तपासून सुधारण्याची तयारी असावी असे मला वाटते).

शेतकर्‍यांच्या बाबतीत अधुनीक तंत्रज्ञान आणि अर्थकारण याचा त्यांना समजेल अशा भाषेत शिक्षणप्रचार केला पाहीजे. तसेच सामाजीक दबाव कमी होण्यासाठी जागृती कायमच लागते -गेल्या आठवड्यात एकाशी बोलताना गुरगाव, हरीयाणा बद्दल विषय निघाला. तो म्हणत होता की तिथले शेतकरी (अर्थात सर्व नसतील, पण..) दिखाव्यासाठी मोठ मोठी कर्जे काढतात - लग्नसोहळे दिमाखात करतात आणि नंतर कर्जबाजारी होवून सर्व विकून टाकतात... यात सोशल प्रेशर हा प्रकार दिसतो. विदर्भात पण तो आहेच.

मधे सामनामधे एक बातमी वाचली की एका शेतकर्‍याने आत्महत्या केली. त्याच्या कुटूंबियांना हलाखीचे दिवस आले पण हळू हळू वर येत असावेत... त्याच्या मुलीचे लग्न होते. तर स्थानीक शिवसैनिकांनी सर्व मदत केली आणि आमच्या बहीणीचे लग्न म्हणत थाटात साजरे करून दिले आणि त्या कुटंबाला बर्‍याच काळानंतर सुखाचा क्षण दिसला. त्यासाठी मुंबईहून शिवसैनीक पण मदतीला गेले होते. शिवसैनीकांची आपुलकी पाहील्यावर नवरदेवाची आणि सासरच्या मंडळींची आगाऊपणा करण्याची कसली हिंमत होणार! नवरदेव फक्त बिचारा "सावधान" इतकेच लग्नात ऐकत बसला असेल! नाहीतर "कानपिळी" अक्षरशः होणार याची खात्री:). त्यात त्यांचे (शिवसेनेचे) म्हणून राजकारण असेल, पण काहीका असेना समाजकारण पण त्यांनी करून दाखवले. असे अजून ही असतील (ज्यांच्याकडे वृत्तपत्रे नसतील) पण ते अधिकाधिक होऊन काही रीतीभाती बदलणे अवश्यक वाटले असेल.

 
^ वर