मारिच-३

"आईये श्रीमान, आईये.... बसा आपण" बापूंनी प्रेमभरानं त्यांना आपल्या जवळ बसवून घेतलं. "साधना तो चल रही है ना? निरंतर चलनी चाहिये. साधना हीच प्रक्रिया माणसाचं जीवन उजळवते."
राजपाठकांनी बापूंना नम्रपणे नमस्कार केला. "फर्स्ट आय हर्ड यू इन मुंबई बापू... आजचा दिवस केंव्हा येईल हीच आस होती. सब आपकी दुवा बापू, सब आपकी कृपा."
बापूंनी त्यांच्या डोक्यावर प्रेमभरानं हात ठेवला. "कृपा आमची नव्हे साधक. परमात्म्याची. आमच्या फक्त सदिच्छा. रामकृष्ण हरी! पण साधक, आश्रमासाठी तुम्ही इतकं सगळं करताय. आप व्यावसायिक हो. व्हॉट डू यू डू फॉर अर्निंग?"

राजपाठक गंभीर झाले. खूपच गंभीर. त्यांनी खिशातून कार्ड काढताना एक प्रदीर्घ सुस्कारा टाकला. " तुमच्यापासून लपवून काय ठेऊ बापू..... इटस अ रादर पर्टिक्युलर ऍक्टिव्हिटी.... फार बाहेर बोलताही येत नाही"
बापू हसले. त्यांच्याही भक्तांमध्ये सगळ्या प्रकारचे लोक असत, हे त्यांना माहिती होतं. "इतनी गुप्तता, साधक.... आपण अपवित्र तर काही नाही ना करत?"

"बापू... पवित्र, अपवित्र तुम्हीच ठरवा. खूप टेन्शन्स असणारा व्यवसाय आहे माझा. मोठेमोठे राजाकारणी, त्यांचे ट्रस्टस, इंडस्ट्रियल टायकून्स यांचे नं २ चे बेहिशेबी पैसे मी परदेशात सुरक्षित फायद्यात गुंतवून देतो. त्यांचे तिकडचे प्रॉफिटस भारतात; पण जास्त करुन फॉरेन कंट्रीमध्ये मॅनेज करतो. आयल ऑफ मान, पनामा, स्वित्झर्लंड या देशामध्ये. खेळ मोठा आहे, पण दोन्हीकडून धोका. सततची टेन्शन्स... इसिलिये मन:शांती की उम्मीद रखके यहाँ आता हूं. मी आहे इन्व्हेसटमेंट एक्सपर्ट आणि चार्टर्ड अकाउंटंट.... तरी टेन्शन रहातंच." एका दमात राजपाठकांनी आपली व्यथा ऐकवली. क्षणभर बापूंनी डोळे मिटले. अशाच तर अनेक मंडळींना अंतर्गत शांततेची आस, सहानुभूती, वात्सल्याची आस जास्त असते, हे आत्तापर्यंत त्यांना चांगलं ज्ञात होतं.

"राम कृष्ण हरी!" ते म्हणाले. "पण साधक, तुम्ही यात आहात, याला आपल्या देशातले आर्थिक कायदेकानू जबाबदार आहेत, जे अशा इन्व्हेस्टमेंटस मजबूर होऊन या लोकांना करायला भाग पाडतात. सारा दोष अपने सरपर क्यूं लेते हो?" राजपाठक काहीसे सावरत होते. डोळे मिटून बापू पुन्हा चिंतनात गेले.

खरंतर त्यांच्या मनात एक वेगळा विचार चमकून जात होता. गोशाळेपासून ते मिशनच्या कॉलेज पर्यंत आणि श्रीलंकेपासून नॉर्वेपर्यंत पसरलेलं त्यांच्या आश्रम - मिशनचं अवाढव्य विश्वही याच, अशाच प्रश्नात अडकलं होतं. त्यांच्या विविध संस्थांच्या एकमेकांमध्ये झालेल्या व्यवहारांमध्ये सुमारे साठ लाख रुपये असे काही निर्माण झाले होते, जे कुठंच दाखवता येत नव्हते. प्राप्तिकर काय, चॅरिटीवाले काय, आजवर शांत राहिले.... उद्याची काय शाश्वती? आता निदान हे कळू शकणारा, त्यांच्याच पंथाचा माणूस त्यांच्यासमोर होता. खुणेनंच त्यांनी राजपाठकांना बाहेर एक पाच मिनिटं थांबायला सांगितलं.

हीच तर सुविधा, सोय आश्रमालाही हवी होती. बापूंच्या मनात विचारांचं मोहोळ उठलं. हे काम या साधकाला सांगण्यात तो गुरुस्थानी मानतो, अशा बापूंवरची त्याची श्रद्धा डळमळीत होण्याचाही संभव होता. पण त्याच वेळी ही अडचण समजून घेऊन सोडवू शकणारीही हीच व्यक्ती होती. याच शहरातून त्याचं कार्यालयीन कामकाजही चाललं होतं. ही पण एक जमेची बाजू होतीच. याच माणसानं आश्रमासाठी पूर्ण ताकदीनिशी निधीही लावला होता. बापू उठून बाहेर आले. राजपाठक बसले होतेच. "कुछ देर के लिये अंदर आओगे, साधक?" बापूंनी त्यांना आत बोलावून दरवाजा बंद केला. "आपल्या आश्रमाचीही अशीच एक मुश्किल आहे, साधक. आप कुछ करोगे?"

राजपाठक काहीसे संभ्रमित होऊन ऐकत होते. "घबराओ नही...." बापूंनी शांत, पण खंबीर आवाजात सुरुवात केली. "इथं अशीच काहीशी स्थिती आहे. ऍज यू सेड, आश्रमसंस्थांच्या व्यवहारात कुल साठ लाख रुपये, ऐसे कुछ जम गये हैं.... न कुछ हिसाब दे सकते हैं चॅरिटीवालोंको, ना किसी बँक में जमा कर सकते हैं. आपकी जो भी गतिविधियाँ, मोडस ऑपरेंडी है, ती वापरा. द्रव्य आहे, चांगल्या जागी जाऊ दे." आता प्रश्नचिन्ह बापूंच्या डोळ्यात होतं.

राजपाठकांनी थोडा विचार केला. "हां बापू, करता तर येईल. मागं सुरेश योगी फाऊन्डेशनच्या स्विस ब्रँचसाठी मी काम केलंय. दे हॅड अ सिमिलर प्रॉब्लेम. करन्सीज कैसी है बापू?" त्यांनी विचारलं.
बापूंनी उठून आपली अलमारी उघडली. बरेचसे भारतीय रुपयेच होते; पण डॉलर्स आणि युरो अगदीच कमी नव्हते. त्यांनी हा अंदाज घेईपर्यंत राजपाठकांनी आपली आपली अगदी उंची कातडी ब्रीफकेस उघडली. "मी हे करणार ते मोस्टली स्विस आणि ऑस्ट्रीयन कॉर्पोरेट कंपनीज... बापू, एनी ऑफ अवर ऍक्टिव्हिटी इन स्वित्झर्लंड?" बापूंनी मान हलवली, "अभी तक नही, नेक्स्ट इयर मे बी."
"ठीक आहे. बापू, या कॅशची तर रिसीट आताच माझ्या सहीनं मी तुम्हाला देतो. सिर्फ आप किसी को नही दिखाना!" राजपाठक सांगत होते. "अनादर थ्री - फोर डेज, उन कंपनियोंके नाम और फिक्स डिपॉझिट रिसीटस आय विल गेट फॉर यू. किसी और जगह रखना. नॉट हिअर."

बापूंना आश्चर्य वाटलं. "इतनी जल्दी? सिर्फ चार दिन?"
"हां बापू. हे मी घेऊन गेल्यावर दुपारीच वर्क आऊट करुन माझे बाहेरचे फंडस उद्याच फोननं तिथं इन्व्हेस्ट करणार. अनफॉरच्युनेटली इंडिया में इसे हवाला बोलते है... पण बापू," ते अजिजीनें म्हणाले, "हीच सिस्टिम सर्वात फास्ट आणि एफिशियंट आहे." त्यांनी आर. पी. फिनान्स कार्पोरेशनचं रिसीट बुक काढलं. "कुछ साठ लाख लिख दूं, बापू?"
"हां, साधक." राजपाठकांना बॅग कॅशसह देऊन बापूंनी त्यांनि दिलेली रिसीट कुलूपबंद केली. राजपाठकांनी बापूंना पदस्पर्श केला. "बापू, तुमचा फार वेळ घेतला का?"
बापूंनी त्यांना आशीर्वाद दिला. "नाही पंथिक.... आपनेही हमारी बडी चिंता मिटाई है. चार दिवसांनी महासत्संग सप्ताह आहे.... आप आईये जरूर."
"जी हाँ, बापू. सब आपकी कृपा है, बापू" राजपाठक निघाले.

(क्रमशः)

Comments

प्रतिसाद

हा हा हा हा
कळल मला...
हा राजपाठक आता हे पैसे घेऊन फरार होणार आणि बापू रडत बसणार.
वा क्या बात है!!!!!!!!!!

 
^ वर