दोन् रट्टे दिले की निट ठिकाणावर.

अहो ते काय आपले आहेत का?
शेवटी गेला ना जातीवर?
अहो ते लोकच तसे आहेत, जमातच नको ती भारतात!
कापुन काढा साल्यांना, सगळ्यांना हाकलून द्या.
पण कुठे?

-------------------------

अरे पण मग कुठे जायचे त्यांनी? बरं! ते सोडा तुम्ही इथलेच का?
हो! इथलेच माटुंग्याचे... म्हणजे...
म्हणजे?
म्हणजे तसे आमचे आजोबा रत्नांगीरीहून आले होते.
अच्छा म्हणजे तुम्ही मुळचे इथले नाही तर...
तो काही विषय नाही पण ते इथले नाहीत हे महत्वाचे!
शेवटी आपण आपण आहोत हा आपला देश आहे.

मग कुठले आहेत ते?
ते? ते पाकिस्तानी नाहीतर तिकडचे कुठले आखातातले, जा म्हणा तिकडेच.

--------------------------------

ये लोगा तो ऐसेच है!
इतन तरास तो पैले बी कबी नई था.
क्या तरास है भाईसाब?बाब क्या बतऊ साहब? कल पुलीस आई बोले राडे मे तुम थे करके उठाके ले गई, भौत मारा साब सब बदन दुक र्‍हा है साब क्या बताऊ?
मै तो किसीमेच नै साब. मेरा क्या कसूर? मैअ हात पे रोजीवाला बालबच्चीदार आदमी है साब.
मेरी बीबी रात भर बच्चोंको लेके पुलीस थाने के पास बैटी र्‍हयी साब.
कल पकडा तो मेरी फुरुट (फ्रुट) की गाडी बी गयी साब! अब मै क्या करू? कैसे पेट भरू साब बच्चोंका?
इतनी नुस्कानी...

कैसे क्या करू साब? कैसे क्या जीने का साब? किधर जाने का?

-----------------------------------

पण मी म्हणतो आज तुम्ही कोणताही पेपर उघडा का बरं सगळे गुन्हेगार त्यांचेच असतात?
अहो आमच्या ओळखीचे एक पोलिसवाले आहेत ते पण हेच सांगतात.
राडा झाला की आधी आम्ही त्या वस्तीत जातो नि धरतो.
दोन् रट्टे दिले की निट ठिकाणावर.

----------------------------------

हे पहा ते मला काही सांगु नकोस! मित्र चांगले हवेत शाळेत. असले काय तुझे मित्र?
चांगले मित्र असले तर चांगले वळण, संगतीचा परिणाम होणार मग तुझ्या अभ्यासावर.
आम्हाला तुझ्याकडून अपेक्षा आहे. तू पण आपल्या अनंतमामा सारखंच इंजिनियर व्हायचंय.
पाहिलंस ना कसा आता यु एस ला आहे तो?

---------------------------------

एक समाजाची मुख्य धारा आहे. या धारेत सगळेच लोक असणार आहेत. मात्र त्याच वेळी समाजाचा एक भाग मुख्य धारे पासून विलग ठेवणे धोक्याचे आहे.
विलग ठेवणे म्हणजे त्यांना सतत 'तुम्ही इथले नाही' याची जाणीव देत राहणे. यातून रोजच्या जगण्यात एक असुरक्षितता निर्माण होते. ही 'असुरक्षिततेची खात्री' समाजाच्या मुख्य धारेपासून लोकांना अजूनच दूर नेते.

पण समाजही काही उगाच असे करत नाही. शाळेतून आजूबाजूला घडणार्‍या घटनांतून अनेक गोष्टी समाजाला एकत्रीतपणे जाणवत राहतात. जेंव्हा एक मोठा समाज छोठ्या समाजाला चिरडण्याचा प्रयत्न करतो तेंव्हा त्यात ऐतिहासीक संदर्भापासून वैयक्तिक दुष्मनी पर्यंत सर्वकाही सामील असते.

मात्र ही सदैव डोक्यावर टांगुन ठेवलेली ही असुरक्षितता समाजाचेही बंधन पाळण्याच्या पलिकडे जाते, तेंव्हा हिंसेचा जन्म सहजतेने होतो.
कारण समाजाने त्यांचे सगळेच जगण्याचे आशेचे मार्ग बंद केले असतात.
मग त्या समाजाचा सूड घेण्याच्या विचाराची प्रक्रीया वेग घेवू लागते.
हे सम विचारी व सम अनुभवी लोक एकत्र भेटू लागतात. याच वेळी तरूण रक्ताला भडवण्यासाठी कोणतेही छोटेसे आगखाऊ भाषण पुरेसे असते.
यातूनच एकतर संघटीत गुन्हेगारी जन्म घेते किंवा दहशतवाद.
मग हे सोडवण्यासाठी सामाजिक उपक्रम राबवण्याचे निर्णय होतात. या निर्णयांमध्ये जर पैसे गुंतलेले असतीत तर प्रश्न लगेच मिटतो व बहुदा गल्लीचा हमीदभाई मोटारीतून फिरू लागतो. परत परिस्थिती जैसे थे!

मात्र जर खरंच काही घडवण्याची इच्छा यंत्रणेकडे असेल तर मुहल्ल्याच्या कमिट्या काम करू लागतात. गुन्हेगारी अचानक काबूत येवून जाते.
समाजाचा एक वर्ग शिक्षण व अर्थ यातली दरी कमी करत योग्य दिशेने मार्गक्रमणा करू लागतो.
आपल्याला काय वाटते? जगण्याच्या पद्धतीमध्ये दुमत तर असणारच आहे. पण आज कुणाला चांगले घर एक चांगली नोकरी व सुखी आयुष्य नको आहे?

"दोन् रट्टे दिले की निट ठिकाणावर." ही काही मंत्र नाही की सगळे प्रश्न मिटतील. उलट पुढच्यावेळी यापेक्षा जास्त निर्ढावलेपण येईल यातून.
म्हणजे पोलिस यंत्रणेला वेगळ्या प्रकारे काम करण्याची आवश्यकत आहे.
गळचेपी करून हे आयुष्य नाकरले गेले तर यातून अजून स्फोटक परिस्थिती जन्म नाही का घेणार?

पण 'ते इथे नकोतच' हा विचार कुठे नेतो आपल्या सगळ्यांना?

तो प्रत्य्क्षात शक्य तरी आहे का?

कुठे जाणार मग ते?

लेखनविषय: दुवे:

Comments

जे शक्य नाही त्याचा विचार नको.

जे शक्य नाही त्याचा विचार करणे वेडेपणाचे. त्यापेक्षा त्यांना आपल्यात घ्या. देवळात एक रिकामी चौकट ठेवा. तिच्यात काहीतरी नक्षी काढा, आणि एक दाढीवाला बाडगा ब्राह्मण ठेवून त्याच्याकडून त्या चौकटीची हळद,कुंकू, गुलाल, बुक्का आणि सबजाच्या पानांनी सकाळ-संध्याकाळ पूजा करवा. समोर धूप लावा. हा विष्णूचाच अवतार होता असे सांगा. त्यांच्या स्त्रियांना देवळात बुरख्याशिवाय प्रवेश द्या. पहा, हळूहळू ते आपले होतील. --वाचक्‍नवी

क्रांतीकारी

त्यापेक्षा त्यांना आपल्यात घ्या.
असे घडले क्रांतीकारी ठरेल.
इतका मोलाचा विचार आहे हा.
यातून अनेक बाटवलेल्या मुसलमानांना परत येण्याचा रस्ता मिळेल यात शंका नाही.

आपला
गुंडोपंत

प्रश्न आणि प्रश्न

गुंडोपंतांनी विषय अगदी सनसनाटी घेतला आहे. कळीचे मुद्दे कळवळीने मांडलेत.

"दोन् रट्टे दिले की निट ठिकाणावर." ही काही मंत्र नाही की सगळे प्रश्न मिटतील. उलट पुढच्यावेळी यापेक्षा जास्त निर्ढावलेपण येईल यातून.
म्हणजे पोलिस यंत्रणेला वेगळ्या प्रकारे काम करण्याची आवश्यकत आहे.
गळचेपी करून हे आयुष्य नाकरले गेले तर यातून अजून स्फोटक परिस्थिती जन्म नाही का घेणार?


खरं आहे गुंडोपंत. वेगळ्या प्रकारे काम करण्यासाठी पोलिस यंत्रणा समजाउन घ्यावी लागेल. ती यंत्रणेतील लोकांनाच नीट समजली नाही. वेगळ्या प्रकारे , पारदर्शी पद्धतीने काम करताना येणार्‍या अडचणींना तोंड देताना आपल्याला प्रवाहा विरुद्ध पोहावे लागते. स्वकीय हेच शत्रू होतात. बाहेर पडाव लागतं खात्यातून. जगा आणि जगू द्या हे तत्व काही काम करत नाही. आम्ही जगतो तुम्ही मरा. 'आपण' व 'ते' यात जात पात धर्म यांच्या पलिकडे पहाणार्‍यांचा बळी जातो.

बळी -प्रकाश घाटपांडे

साहेब

पोलीस दल अजूनही 'साहेबाच्या' राज्यातच राहून गेलंय.

पोलिस यंत्रणेला ते काय करू शकतात हे अजून उमगलच नाहीये हे मात्र १००% खरं आहे.
यात ट्रेनींगचाही खुप मोठा भाग आहे. योग्य प्रशिक्षण नाही आणि दिशा नाही. मात्र प्रेशर चहू बाजूंनी.
आपले विचार नक्कीच समजू शकतो मी.
आणि तुमच्या सारखा माणूस जर काही काम करण्याचा प्रयत्न करत असेल तर आपल्यावर काय वेळ या लोकांनी आणली असेल याची कल्पनाही करवत नाही.

आपला
गुंडोपंत

सोप्पीकरण

हा प्रश्न खरे तर पोलिसांचा नाही. मूळ प्रश्न हा समाज प्रगतिपासून वंचित का, हा आहे. आणि ह्यामागे त्यांच्याच रूढी (व धार्मिक) समज कारण आहेत. कुटुंबनियोजन करायचे नाही, कारण ते मानत नाहीत. एकेका जोडप्याला सर्वसाधाराणपणे चार मुले असतातच. ही जी भाराभार मुले होतात, त्यांचे पालणपोषण करण्याची त्यांची क्षमताच नसते. मग आयतीच ती मुले समाजकंटकांच्या हाती पडतात. शिक्षणापासून वंचित होतात, याचे दुष्परिणाम त्यांच्या कौटुंबिक व समाजस्वास्थ्यावर होतात.

आणि हे असे सगळे फक्त भारतातच आहे असे नव्हे. ब्रिटन, फ्रान्स व युरोपातील अन्य प्रगत देश, जिथे हे स्थलांतरित झाले, तिथेही तेच आहे.

ह्या 'मोठ्या' कुटुंबांची मी स्वतः पाहिलेली उदाहरणे: मुंबईत माझ्या मित्राकडे ड्रायव्हर जो आहे, तो कुर्ल्याच्या एका झोपडपट्टीत रहातो. घरत तो एकटा कमाविणारा... त्याचे दोघे (का तिघे) भाऊ उंडारत फिरत दिवस काढतात (पोलिस अधूनमधून पकडून नेतात). ह्याला स्वतःला चार मुले. त्यांचे शिक्षण म्हणजे त्यांच्या धार्मिक शाळेपुरते.

मी रहातो तिथे एका भारतीय रेस्टॉरंटमध्ये जे 'संगीत' चालते, त्यात तबला वाजवणारा गृहस्थ मी जवळून पाहिला. मूळचा दिल्लीचा. गाणे-बजावणे हा त्यांचा पिढीजात व्यवसाय. हा थोडासा शिकला (कॉलेजात जात होता म्हणे). पण लवकरच परदेशात रेस्टॉरंट्समध्ये वाजवण्यास बाहेर पडला. सुमारे दहा वर्षांपूर्वी तो इथे आला, तेव्हा त्याला एक लहान मुलगा होता. गेल्या वर्षी तो इथून भारतात परत गेला (आर्थिक स्थिती हलाखीची झाली, म्हणून), तेव्हा त्याला चार् मुले होती.

ही ऍकेकडोटल उदाहरणे असली, तरी ती पुरीशी प्रातिनिधीक आहेत.

आतंकवादाचे मूळ बरेचदा गरिबीत असते, ह्यात फार तथ्य नाही.

आपली उदाहरणे

प्रदीपराव,
आपली उदाहरणे अनेकच ठिकाणी बघायला मिळतील.
आणि सर्वसाधारण पणे हीच परिस्थिती असते यात शंका नाही.

म्हणूनच मदरसे चालवण्यासाठी सरकारने मदत द्यावी. यामुळे सरकारी नियंत्रणात व कक्षेत हे शिक्षण येईल. एकदा हे नियंत्रण असले तर काही होणे शक्य आहे.
मात्र जास्तीत जास्त लोकांना एकतर धर्मापासून विलग करता यावे किंवा लोकसंख्याचा स्फोट करण्यापासून तरी रोखले पाहीजे.
या विषयी काय करता येईल हे मात्र मला सुचत नाही.

हे शिक्षण कसे झिरपावे या समाजात?
आतंकवादाचे मूळ बरेचदा गरिबीत असते, ह्यात फार तथ्य नाही. हा मुद्दा काहीसा मान्य आहे. आणि म्हणूनच मदरश्यांवर त्यातील शिक्षणावर नियंत्रण आणणे फार महत्वाचे आहे असे मला वाटते.

आपला
गुंडोपंत

क्लिशे

काही विधाने नेहमीच्या क्लिशेस पैकी. कुटुंबनियोजन नको, चार मुले वगैरे. प्रत्येक जनगणनेतून हेच दिसले आहे की जननदरात काही फार फरक नाही. चार मुले इत्यादि असण्याचे, शिक्षण नसण्याचे प्रमाण गरीब समाजापैकी सर्व गटांमध्ये सारखेच असते.

गुंडोपंतांची मांडणी उत्तम.

(जुना धागा असल्याचे लक्षात न येऊन प्रतिसाद दिला. क्षमस्व)

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

सरकार जबाबदार

यांच्या मागासलेपणाला सरकारही तितकेच जबाबदार आहे. उर्दू शाळा, मदरसे हवेत कशाला? कोकणातल्या दापोलीपासून जवळ असलेल्या खेड्यातील एका उर्दू शाळेला मी एकदा भेट दिली होती. शाळेला भव्य इमारत होती. शाळेत पहिली ते चौथी चार वर्ग. प्रत्येक वर्गाच्या दोन-दोन तुकड्या. त्या हिशोबाने कर्मचारी-वर्ग. शाळेत एकूण ५ मुले होती. शाळा सरकारमान्य. शाळेला मोठे मैदान होते. समोरच मराठी शाळा होती. तीही फार छान होती, पण शिक्षकांची कमतरता.
प्रत्येक मराठी माध्यमाच्या शाळेत उर्दू शिकायची सोय झाली की उर्दू माध्यमाच्या शाळा व मदरसे बंद पडतील. आजच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी बढाई मारली आहे की महाराष्ट्रात मराठीशिवाय इतर भाषा माध्यम म्हणून घेऊन मॅट्रिक पास होता येते.(माझ्या मते ही फार चांगली गोष्ट आहे, पण असेच इतर प्रांतांनी करावे.) --वाचक्‍नवी

दोन भाग

गुंडोपंतांचा लेख/चर्चा विचार करायला लावणारा आहे. अल्पसंख्यांक आणि त्यातही मुस्लीम धर्मीयांबाबत बोलताना दोन भाग करावेसे वाटतातः

१. म्हणजे जो काही वर प्रदीप आणि वाचक्नवी यांनी लिहीलेला भाग - शिक्षणाचा भाग. जो पर्यंत शिक्षण सुधारणार नाही आणि कायदा समान पद्धतीने वापरला जाणार नाही तो पर्यंत ह्या गोष्टी अशाच चालू शकतात.

२. दुसरा भाग (ज्याचा ओझरता उल्लेख गुंडोपंतांच्या लेखात आहे) म्हणजे भारतीय स्थलांतरीत आणि बाहेरचे बेकायदेशीर स्थलांतरीत यात फरक करणे. बांग्लादेशी स्थलांतरीतांचा प्रश्न भयंकर आहे आणि तो वाढू शकतो. आज तो जरी कमी केला तरी मुंबईचे अनेक स्थानीक प्रश्न (कायदा आणि सुव्यवस्थेच्या पलीकडील) कमी होऊ शकतील. मला आठवतयं की बाळासाहेब ठाकर्‍यांनी जेंव्हा त्याविरुद्ध आवाज उठवला तेंव्हा काँग्रेस, बंगाली कम्यूनिस्ट आणि इंग्रजी माध्यमांनी गळे काढायला सुरवात केली. पण तोच प्रश्न नंतर विलासरावांना पण बोलायला लागला..

बाकी "विविधतेत एकता" म्हणायचे असेल तर सर्वांमधील चांगल्या गोष्टी निदान कायद्याने/समाजाने मान्य करणे महत्वाचे वाटते. याचाच अर्थ जे चांगले नाही त्याला विरोध करणे पण गरजेचे ठरते. तो भाग होताना दिसत नाही. स्वतःचे जेंव्हा चांगले चालले असते तेंव्हा निधर्मीपणा म्हणायला / हिंदूंना नावे ठेवत मुसलमानांना चुकीच्या पद्धतीने गोंजारताना बरे वाटते. पण अशी उदाहरणे माहीत आहेत की जेंव्हा स्वतःचे पोरं (मुलगा/मुलगी) हे जेंव्हा असे लग्न करायचे ठरवते तेंव्हा मात्र भंबेरी उडते, सेक्यूलॅरीझम विसरला जातो, अरे/अग जात कुठलीही चालेल पण आपल्यातली बघ असेही सल्ले दिले जातात - मजा म्हणजे अशा निधर्मींना धर्म मान्य नसला तरी जाती मात्र डोळ्यात आणि डोक्यात असतात! - ते मान्य नसायचे कारण ही सरळ असते - तुम्हाला असे लग्न करायचे असेल तर प्रथम धर्मांतर करा हे सांगीतले जाते. माझ्या जवळच्या माहीतील एका मुस्लीम मुलीचे लग्न एका हिंदू मुलाशी तीला (आणि त्याला) ठरवायचे होते तेंव्हा, घरच्यांसाठी म्हणत त्या मुलाला अशीच गळ घातली. म्हणलं दोन्ही पद्धतीने लग्न केले तर काय होईल? तुला कोणी धर्मांतर करायला सांगत नाही मग त्याला कशाला करायला हवे? तर (हेल्पलेस) उत्तर मिळाले की, "आमच्यात तसे (म्हणजे धर्मांतर न करता) लग्न एकवेळ ख्रिश्चन अथवा ज्यूशी केले तर चालते. पण हिंदू असल्यास धर्मांतर करावेच लागते..!"

थोडक्यात ही सामाजीक तेढ मोठी आहे. आणि ती जाण्यासाठी नुसतेच "आपले ते कार्टे आणि दुसर्‍याचा तो बाब्या" असे म्हणून/वागून चालणार नाही. त्यासाठी बर्‍याच गोष्टी करण्याची गरज आहे - सरकार पासून ते सामान्यांपर्यंत. त्यात कुणाचाच "फक्त द्वेष" वाढेल असे काही होऊ नये इतके मात्र नक्की वाटते.

+१


थोडक्यात ही सामाजीक तेढ मोठी आहे. आणि ती जाण्यासाठी नुसतेच "आपले ते कार्टे आणि दुसर्‍याचा तो बाब्या" असे म्हणून/वागून चालणार नाही. त्यासाठी बर्‍याच गोष्टी करण्याची गरज आहे - सरकार पासून ते सामान्यांपर्यंत. त्यात कुणाचाच "फक्त द्वेष" वाढेल असे काही होऊ नये इतके मात्र नक्की वाटते

+१
प्रकाश घाटपांडे

कडवेपणा

नेहमी प्रमाणेच चांगला प्रतिसाद.
अशी उदाहरणे तर चिक्कार पाहिली आहेत.
मग त्या मुलांना समीर/ संजय असली दोन्ही कडे चालणारी नावं दिली जातात.

मुसलमानांचा कडवेपणा कसा कमी करता येईल व
त्यांना मुख्य प्रवाहात आणता येईल हाच तर या चर्चेचा मुख्य हेतु आहे.

कडवेपणा यावर उपाय हवा.

आपला
गुंडोपंत

युनिफॉर्म सिव्हिल् कोड

(मराठी प्रतिशब्द ?)
असे दिसते की, राजीव गांधींच्या काळात "शहाबानो" प्रकरणानंतरच्या जबरदस्त अपयशानंतर "युनिफॉर्म सिव्हिल् कोड" ही (बडबड करण्यापुरती काहोईना ) केवळ भाजपसारख्या हिंदुत्त्ववादी पक्षाची मक्तेदारी उरली आहे. माझ्या मते भारतातल्या प्रागतिक चळवळींचा , प्रागतिक विचारसरणीचा हा मोठा , त्यांची वैचारिक दिवाळखोरी उघड करणारा , पराभव आहे. स्वतःला "प्रागतिक" आणि सेक्युलर म्हणवणार्‍यानी "युनिफॉर्म सिव्हिल् कोड"चा त्याग का केला ? कारण त्याचा पाठपुरावा करणे म्हणजे भाजपसारख्या उजव्या पक्षाचा विजय ! बरे, भाजपने आपल्या कारकिर्दीत त्याचे काय भजे केले ते आपण पहातोच. सत्तालोभापायी त्यानीसुद्धा याचा अगदी सहज परित्याग केला. थोडक्यात , सर्व पक्षानी मिळून या विषयाला , विधेयकाला अनाथ केले आहे,

कॊमन सिव्हिल कोड

युनिफॊर्म सिव्हिल कोड आणि कॊमन सिव्हिल कोड या शब्दांच्या अर्थात बर्‍याच विद्वानात शब्दोच्छल होत असतो. म्हणजे समरुप व एकरुप या अर्थाच्या छटा. सब घोडे बाराटक्के (व्युत्पत्ती माहित नाही) होणे अवघड आहे. विवाह , वारसाहक्क व तदानुषंगिक बाबी यातच खरी मेख आहे. अन्य कायदे समान आहेत. मी तलाक पिडीत मुस्लिम स्त्रियांच्या परिषदेला एकदा गेलो होतो. इतकी वाईट अवस्था आहे. त्यांना समान नागरी कायदा हवा आहे असे एका बाईने सांगितले.
धर्मनिरपेक्ष व सर्वधर्मसमभाव या शब्दांचाहि असाच घोटाळा आहे. सेक्युलर ला मराठी प्रतिशब्द देताना असा धर्मनिरपेक्ष म्हणायच आणि सर्वधर्मसमभाव अशी भोंगळ कल्पना विषद करायची.
प्रकाश घाटपांडे

भयंकर

ग्रामीण भागातल्या
लग्न झालेल्या मुस्लीम स्त्रीयांचीही परिस्थिती ही कल्पनेपेक्षा भयानक आहे.
सततची बाळंतपण आणि दारिद्र्य.

कदाचित तलाक पिडीत मुस्लिम स्त्रीया बर्‍या असतील. किमान नवरा तरी नाही त्रास द्यायला...
समान नागरी कायदा होणं ही काळाचा गरज आहेच.
खरं तर आता खुप उशीरच झालाय. ३० वर्षांपुर्वीच व्हायला हवा होता तो.

आपला
गुंडोपंत

समान नागरी कायदा

युनिफॉर्म सिव्हिल् कोड = समान नागरी कायदा

माझ्या मते भारतातल्या प्रागतिक चळवळींचा , प्रागतिक विचारसरणीचा हा मोठा , त्यांची वैचारिक दिवाळखोरी उघड करणारा , पराभव आहे. स्वतःला "प्रागतिक" आणि सेक्युलर म्हणवणार्‍यानी "युनिफॉर्म सिव्हिल् कोड"चा त्याग का केला ? कारण त्याचा पाठपुरावा करणे म्हणजे भाजपसारख्या उजव्या पक्षाचा विजय !

त्याग करायला स्विकारला कधी होता? हे काही आजचे नाही आहे हा वाद स्वातंत्र्यपूर्व काळापासून आहे. थोडक्यात याचा संबंध भाजपच्या विजयाशी वगैरे नाही आहे.

बरे, भाजपने आपल्या कारकिर्दीत त्याचे काय भजे केले ते आपण पहातोच. सत्तालोभापायी त्यानीसुद्धा याचा अगदी सहज परित्याग केला.

बरोबर आहे. कडबोळे सरकार तयार करताना "कॉमन सिव्हील कोड" ची जागा "कॉमन मिनिमम प्रोग्रॅम" नी घेतली. माझ्या माहीती प्रमाणे आजही त्यांच्या पक्षाच्या जाहीरनाम्यात (आघाडीच्या जाहीरनाम्यात नाही!) आहे. तीच अवस्था ३७० कलमाची. मला कधीतरी वाचल्याचे आठवते त्या प्रमाणे रा.स्व. संघाने पण मूळ मागणीत समान नागरी कायदा हा बळजबरीने आणू नका अशीच भूमिका घेतली होती.

पण यापुढे जाऊन असे म्हणावेसे वाटते की ते (समान नागरी कायदा वगैरे) जेंव्हा होईल तेंव्हा होईल पण निदान आत्ताच्या कायद्याप्रमाणे आणि सामाजीक सुधारणा म्हणून योग्य त्या गोष्टी करत राहीले म्हणूनही काही बिघडणार नाही. आज या चर्चेसंदर्भात बोलायचे झाले तर गुंडोपंतांनी म्हणल्याप्रमाणे एकी कडे "आम्ही आणि ते" म्हणत "त्यांचा" द्वेष करणारे दरी निर्माण करतात, पण दुसरीकडे "त्यांना" वेगळी वागणूक देऊन स्वतःला सेक्यूलर्स म्हणणारे पण "समाजात दरीच" निर्माण करतात. दोन्हीत उद्देश कुणाचा चांगला आणि वाईट हा प्रश्न नाही कारण त्याचे मिळणारे फळ हे समानच आहे आणि देशासाठी विषारीच ठरणार आहे.

सहमत

दोन्हीत उद्देश कुणाचा चांगला आणि वाईट हा प्रश्न नाही कारण त्याचे मिळणारे फळ हे समानच आहे आणि देशासाठी विषारीच ठरणार आहे.

सहमत आहे.
प्रकाश घाटपांडे

महत्वाचा विषय

विकासराव म्हणाले "गुंडोपंतांचा लेख/चर्चा विचार करायला लावणारा आहे" त्याच्याशी सहमत आहे.

आपल्याकडे कुठल्याही महत्वाच्या प्रश्राला विचार-विनिमय, समितीत म्हणजेच एकंदर राजकारणात अडकुन टाकण्यात परिणिती होते.

इतिहासामुळे भान येणे अपेक्षित असले तरी भारतात तरी लोक "बेभान" होताना दिसतात व "आम्ही आणि ते,असेच असते" जनमानसात भिनते.

याची सुरवात प्रत्येकाने स्व:तापासुन करणे अपेक्षीत आहे. जेव्हा लोक स्व:ता मनापासुन "हम सब एक है" मानतील तेव्हा मग कायद्याची गरजच लागणार नाही. साप वाट बदलुन निघुन गेला तर हातात काठी नसली तरी फारसा फरक पडणार नाही.

साठ वर्षे दुफळी माजवणारे प्रश्र तसेच असल्याचे पाहुन् हे वाटते की "ते व आपण" असा फरक करणार्‍या जुन्या पिढीने निदान एक काम करावे की दुफळी माजवणारी आचार-विचारसरणी, "त्यांच्या इतिहासाचे" ओझे नव्या पिढीला देऊ नये, बाळगायचा आग्रह करु नये.

वा

साप वाट बदलुन निघुन गेला तर हातात काठी नसली तरी फारसा फरक पडणार नाही.
वा काय वाक्य आहे! आवडलं. विचार करत राहिलो या सोल्युशन वर बराच वेळ.
एकिकडे कडवेपणाला (दोन्ही कडील) कडवेपणाने व खंबीर विरोध, त्याच बरोबर समाज जागृती, व प्रगतीचे मार्ग
यातून हा तिढा काहीसा कदाचित मार्गावर येईल.
मात्र हे लोकच वाईट असे म्हणून सोडून देऊन आपले कसे होईल?
शेवटे बरोबर तर रहावेच लागणार आहे. तेंव्हा परिस्थिती बदलण्याचा काही तरी मार्ग काढणे भाग आहे.

आपला
गुंडोपंत

क्षमस्व!

नमस्ते!
काही तात्कालिक कारणांमुळे माझे जालावर येणे खंडीत स्वरूपात झाले आहे.
त्यामुळे मीच टाकलेल्या चर्चेतही भाग घेता आला नाही. क्षमस्व!
चर्चा तशीच सुरु ठेवणार्‍या व 'विचार प्रवर्तक प्रतिसाद' देणार्‍या सर्वांचे आभार. हा विषय खुप मोठा आणि महत्वाचा आहे. तिरस्काराच्या आगीत सगळ्यांचीच होळी होवू देणे हा काही उपाय नाही.

वाचक्नवींनी सुचवलेला द्वि-धार्मीक उपासनेचा उपाय अतिशय विवादास्पद पण खूप परिणामकारक ठरू शकतो. याची सुरुवात स्त्रीयांपासून करणे हा भाग तर अतिशय इफेक्टीव्ह आहे यात शंका नाही.
शिवाय यातून अनेक मुळचे मुसलमान परत हिंदू बनण्याच्या दिशेनेही वाटचाल करू शकतात ( व आवश्यकता वाटणारांना उलटही प्रवास! ;)) . मी म्हणेन की यावर एक वेगळी चर्चा यावी...

बाकी, आपल्या खरडींनाही मी उत्तरे देईनच.

आपला विनित,
गुंडोपंत

त्यांना तरी हे हवे आहे काय?

आहो आपण लाख तयार असु पण त्यांना मुख्य प्रवाहात सामील व्हायचे आहे कि नाही याचा विचार केला का? मी पहिले आहे आणि अनुभवले आहे कि हे मुसलमान नेहमी जात्थ्याने फिरतात आणि झुंडशाही करतात...त्यांना माहिती आहे कि सरकार आपल्या मतांना किमत देते आणि पोलीस काही फारसे त्रास देणार नाही...मी एकदा ह्या अनुभवातून गेले आहे...आणि आतले काय बाहेरचे काय जर त्यांच्या mentality त फरक नाही झाला तर काय उपयोग...त्यांना शिकवा नाही तर नाही ....विचार तेच...काही अपवाद असणारच पण ते प्रातिनिधिक नाही...

 
^ वर