'यूनिकोड'साठी प्रतिशब्द.. 'एककूट' - चर्चेचा प्रस्ताव.

'यूनिकोड'साठी प्रतिशब्द.. 'एककूट' - चर्चेचा प्रस्ताव.

नमस्कार. ह्या ठिकाणी आपण सगळ्यांनी आंग्लभाषी शब्दांचे मराठीकरण करण्याचा अत्यंत स्तुत्य असा उपक्रम चालवला आहे, त्यास माझ्या शुभेच्छा. ह्यामुळे येथे वाचन करताना मध्येच् 'वड्यात खडा' लागल्यासारखे होत नाही, अगदी शुद्ध-शुद्ध वाटते.. अभिनंदन.

एक सूचना मात्र करावीशी वाटते, ती अशी.. 'यूनिकोड' ह्या आंग्लभाषी शब्दासाठी येथे 'यूनिकोड' अशीच शब्दयोजना करण्यात येत असल्याचे लक्षात आले. त्याऐवजी आपण 'एककूट' हा सोपा तसेच सुटसुटीत शब्द वापरू शकू. 'यूनिकोडिंग्' साठी 'एककूटिकरण' अशी शब्दयोजना करता येईल. दाक्षिणात्य भाषाभगिनींनी देखिल 'यूनिकोड' ह्या आंग्लभाषी शब्दासाठी अशाच प्रकारची शब्दयोजना स्वीकारली आहे.

चर्चा व्हावी.
कळावे, लोभ असावा.
हैयो हैयैयो!

लेखनविषय: दुवे:

Comments

एककूट

एककूट चांगला प्रतिशब्द वाटतो. संगणक जसा अंगवळणी पडला तसा हा प्रचलीत होण्यास अडचण नसावी. सोपा आहे. पण प्रत्येक तांत्रिक शब्दाला प्रतिशब्द हवाच का? हा मुद्दा मात्र दुर्लक्षिला जाउ शकत नाही.
प्रकाश घाटपांडे

मलाही आवडला.

एककूट - साधा, सोपा आणि मराठी वाटणारा.

यूनिकोड

यूनिकोड यातला यू मुळात दीर्घ असला तरी शब्द मराठीत वापरायचा असेल तर यु र्‍हस्व करायला हवा. युनिव्हर्सिटीत असतो तसा. (नियम: मराठी शब्दातले उपान्त्यपूर्व इकार उकार र्‍हस्वच असतात.)
दुसरे, युनिकोडमध्ये युनि म्हणजे एक आणि कोड म्हणजे कोडे नव्हे. युनि म्हणजे युनिव्हर्सल-वैश्विक, जागतिक, सर्वसमावेशक, सार्वत्रीकृत; आणि कोड म्हणजे संकेत. त्यामुळे एककूट शब्द अर्थहीन. युनिकोडला शब्द बनवला तर आन्सीला हवा, आणि इतर अनेक टंकसंकेतांना. त्यामुळे बनवूच नये. पण हवाच असेल, तर एककूटपेक्षा सार्वसंकेत हा अधिक योग्य शब्द. यूनिकोडिफ़िकशन-सार्वसंकेतन. वगैरे. अर्थात युनिकोड(यु र्‍हस्व) सर्वात चांगला!!--वाचक्‍नवी

प्रेषक श्रीयुत प्रकाश घाटपांडे यांसी सादर प्रणाम करोन..

प्रेषक श्रीयुत प्रकाश घाटपांडे यांसी सादर प्रणाम करोन..

प्रत्येक तांत्रिक शब्दाला प्रतिशब्द हवाच, असा अट्टाहास नाही. तरीही, ज्यांना तो हवा आहे, त्यांच्यासाठी एक सोय म्हणून असा शब्द असावयास हवा असे वाटते.

ज्यांच्या अंगवळणी तो पडणारच नाही, ते मूळ आंग्लभाषी शब्दयोजना करू शकतील!

हैयो हैयैयो!

हं

हं आपला मुद्दा पटला
मात्र् आपले नाव असे आहे की आपण कितीही प्रामाणिक पणे व सिंसियरली सांगितले तरी शेवटी
हैयो हैयैयो! असे म्हंटले की असे वाटते चांगली खिल्ली उडवताय... ;))

आपला
गुंडोपंत

प्रेषक श्रीयुत वाचक्नवी यांसी

प्रेषक श्रीयुत वाचक्नवी यांसी..

माझ्या वाचनात सकाळ-संध्याकाळ अनेक प्रकारची हिंदी-मराठी शासकीय कागदपत्रे येतात. (बांबे सरकार चे ग्याझेट् वगैरे.) त्यात मी आजपर्यंतच्या माझ्या कारकिर्दीत Code ह्या आंग्लाभाषी शब्दाचे मराठीकरण 'कूट' असेच वाचले आहे.

उदा:

  1. STD Code = अस्थानीय दूरभाष कूट;
  2. ISD Code = आंतरराष्ट्रीय अस्थानीय दूरभाष कूट;
  3. Code Language = कूटभाषा;
  4. Pin Code = पीन कूट इत्यादि इत्यादि.

तरीही आपण म्हणता ते खरे असू शकेल. कसे ते आपण सांगावे.

हैयो हैयैयो!

हिंदी-मराठीतला फरक

मराठीत कूट म्हणजे चूर्ण किंवा कोडे . त्यामुळे कोड लॅंग्वेज म्हणजे सांकेतिक भाषा--कूटभाषा नाही. बाकीचे आपण लिहिले आहेत ते हिंदी शब्द आहेत, त्यांच्याशी आपल्याला काही देणेघेणे नाही. अस्थानीय असा शब्द मराठीत नाही. स्थानीयपण नाही, स्थानिक असेल. दूरभाष नाही. हिंदीत प्रेक्षकाला दर्शक(म्हणजे दाखवणारा) म्हणतात. मालकीचा वगैरे दावा करणार्‍याला दावेदार म्हणतात. मराठीत म्हणता येईल? मेलेल्या माणसाच्या नावामागे स्वर्गीय लावतात, आपण लावू? आपल्याकडे फक्त अप्सरा आणि त्यांचे सौंदर्य स्वर्गीय असते. किंवा डोंगरावरून दिसणारा एखादा देखावा. मराठी माणूस मेला तरी स्वर्गीय होत नाही. हिंदीत जिवंत पुरुषाच्या नावामागे श्रीमान किंवा माननीय लावतात. मराठीत श्रीयुत आणि श्रीयुतच! परंतु, मराठीत पदनामाच्या मागे मात्र माननीय लावता येते, जसे- माननीय मुख्याध्यापक, संपादक वगैरे; आणि तेही 'मा.'असे संक्षिप्त रूप न करता. 'मा.' हे मराठीत कसलेच अधिकृत संक्षिप्त रूप नाही, असलेच तर ते माजीचे किंवा माजलेल्याचे? आणि एक, पिन्‌ला पीन कधीच म्हणणार नाही, पीन म्हणजे पुष्ट, लठ्ठ. पिन्‌कोडला मराठीत संकेतांक म्हणतात. कुठलाही सरकारी(शासकीय ?)किंवा अन्य शब्दकोश पाहून खात्री करून घ्यावी.--वाचक्‍नवी

 
^ वर