सेतू: ताजप (१)

आई, आज मी 'ताजप' बघितला. रूमवर येऊन खूप रडलो. असं वाटलं आपली स्टोरी आमिरखानला कशी काय कळली. तुम्ही नक्की पाहा."

"खरं सांगू, मला पहायची हिम्मतच होत नाहीये. आपण केलेल्या चुका परत आपल्या डोळ्यासमोर दिसतील."

"आई, तू वाईट वाटून घेऊ नकोस. बारा वर्षापूर्वी लोकांना अशी काही अक्षमता असते हे माहीत सुद्धा नव्हतं. तुम्ही योग्य ती पावलं उचलली आणि मला त्याचा फायदाही झालाय. हो किनई?"

"हो रे बाबा, हे सगळ्ळं खरंय पण हे आम्हाला आधी सुचलं असतं तर... आताही काही वाईट झालेलं नाहीये पण तुझं बालपण आनंददायी गेलं असतं"

"तू उगीच खंत करत बसू नकोस. त्यावेळी ह्या विषयावर फारसं लिखाण उपलब्ध नव्हतं. त्या शाळेची मुख्याध्यापिका मानसशास्त्रात पदव्युत्तर असूनही तिला तरी कुठे माहिती होतं अश्या कितीतरी प्रकारच्या अक्षमता असतात म्हणून. आमिरखानला मेल पाठवायचाय 'कॉन्ग्रॅटस'. खरंच खूप छान काम केलंय त्यानं. बरं ते जाऊ दे नक्की पहा सिनेमा."

"सध्या तिकीट मिळत नाहीयेत, जरा गर्दी ओसरली की नक्की पाहीन."

शनिवार रविवारशिवाय पाहायला वेळ नव्हता आणि ह्या दोन्ही दिवशी हाऊसफुल्ल त्यामुळे माझ्या पथ्य्यावरच पडत होतं. दोन दिवसांनी स्नेहाचा फोन आला. "मंजूताई, सेतूची बैठक सोळा तारखेला ठरवली आहे. आपलं मागे बोलणं झालं होतं त्याप्रमाणे विषय आहे 'ताजप'. श्री व सौ परांजपे ह्या विषयावर बोलायला तयार आहेत तसेच तुम्हीपण बोलावं अशी आमची इच्छा आहे. शेवटी पाहिला का नाही 'ताजप'?"

"नाही अजून पाहिला नाही. पण मला बोलायचं आहे म्हटल्यावर त्याआधी नक्कीच पहावा लागेल."

'ताजप'वर भरपूर वाचून झालं होतं. सेतूत बोलायचं होतं, आता टाळता येणं शक्य नव्हतं. शेवटी चौदा तारखेला पूर्णवेळ डोळ्याला रुमाल लावून सिनेमा बघितला.

"आज 'ताजप' बघितला. पण आत्ता मी काही फार बोलण्याच्या मनस्थितीत नाहीये. पण तू म्हणालास त्याप्रमाणे आमिरखान व त्याच्या टीमचं जेवढं कौतुक व अभिनंदन करावं तेवढं थोडंच आहे."

पंधरा तारखेला मी, स्नेहा व स्वप्ना (समुपदेशक) एकत्र बसून मुलाखतीतून माहिती द्यायची असं ठरवलं. मी जशी श्री व सौ परांजप्यांना भेटायला उत्सुक होते तसेच तेही मला भेटायला. ही उत्सुकता भेटल्यावर एकमेकांच्या चेहर्‍यावर सहज वाचू शकत होतो. इतर सगळे लोक यायला सुरुवात झाल्यामुळे फारसं बोलता आलं नाही. स्वप्नाने सूत्र हातात घेवून ठीक सहा वाजता कार्यक्रम सुरू केला. आपण सगळ्यांनी 'ताजप' पाहिलाच असेल. सगळ्यांना तो नक्कीच आवडला असेल आणि कदाचित तुम्ही अंतर्मुखही झाला असाल.ह्या चित्रपटामुळे 'ईशान' सारख्या मुलांना मदत मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलू शकेल. पालक आणि शिक्षक लगेच अशा मुलांचा स्वीकार करतील, सगळीच परिस्थिती बदलेल अशी एकदम अपेक्षा कोणीच करणार नाही पण कुठेतरी सुरुवात झाली ह्याच श्रेय तर आमिरखनला नक्कीच द्यायला हवं

मुलांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचा अक्षमता असतात जश्या डिसलेक्झिया, डिसग्राफिया, डिसकॅलक्युया, डिसप्रेझिया. ह्यातली फक्त 'डिसलेक्झीया" ही समस्या ताजपमध्ये हाताळल्या गेली आहे. ह्या चित्रपटात ज्याप्रकारे समस्या हाताळल्या गेली आहे त्याप्रमाणे प्रत्यक्षात ह्या समस्येला तोंड दिलं आहे त्या मंजुताई व सध्या देत आहेत ते दाम्पत्य श्री व सौ परांजपे आज आपल्या इथे उपस्थित आहे. मंजुताईंचा मुलगा जो सौम्य डिसलेक्झिक होता तो आज इंजिनियरिंग नंतर एमबीए करतोय. परांजप्यांचा मुलगा रौनक आज पाचवीत शिकतोय त्याची तीव्रता जरा अधिक आहे. ह्या समस्येविषयी त्यांच्याकडून जाणून घेऊ या.

ताजप पाहिल्यावर काय वाटलं?

मी: आमिरखानला आपली स्टोरी कशी काय कळली. पालकांचे व शिक्षकांचे डोळे उघडण्याच काम आमिरखाननी केलंय.

परांजपे: अगदी हीच प्रतिक्रिया आमचीपण होती. आम्ही डोळ्याला रुमाल लावूनच पूर्ण सिनेमा बघितला.

तुमच्या केव्हा लक्षात आलं?

मी: अशी काही समस्या असते हे आम्हाला माहितीच नव्हतं. सिनेमात दाखवल्याप्रमाणे सगळीच लक्षणं होती. स्पेलिंग्ज कितीही पाठ करून घेतली तरी टेस्टमध्ये एखादंच बरोबर असायचं, शेवटची अक्षरं हमखास उलटी असायची पास्ट टेन्स करतेवेळी इडी च्या ऐवजी डीई प्ल्युरलमध्ये एसई, हस्ताक्षर तर आप लिखे खुदा पढे, डावा उजवा बूट कळायचा नाही, तीन वर्ष लहान बहिणीला बुटांची लेस बांधता यायची पण ह्याला येत नव्हती पण काहीतरी गडबड आहे असं वाटायचं नेमकं काय आहे ते मात्र कळत नव्हतं. अभ्यासात धड लक्ष नसतं, वेंधळाच आहे असं वाटायचं. घरी आम्ही नियमित अभ्यास करून घ्यायचो. तोंडी उत्तरं द्यायचा पण उत्तरपत्रिकेत काहीच लिहिलेलं नसायचं. शिक्षकांकडून काहीच सहकार्य मिळायचं नाही. 'ढ" आहे, अभ्यास करत नाही, लक्ष नसतं, तुम्ही घरी लक्ष द्या असंच सांगितलं जायचं. रागावून, मारून अभ्यास करून घ्यायचो पण निकाल काही पास म्हणून यायचा नाही. असं चक्र आठवीपर्यंत चाललं. आधीची शाळा केंद्रीय बोर्डाची होती ती बदलून राज्य बोर्डात टाकायचा निर्णय घेतला. पण नापास मुलाला कोण प्रवेश देणार?

क्रमशः

लेखनविषय: दुवे:

Comments

वाचत आहे.

वेगळ्या विषयावर वाचायला आवडत आहे.

पुढचा भाग लवकर येउ दे.

+१

क्रमशः वाचत आहोत.
विषय वेगळा, महत्त्वाचा, आवडला +१

आवडले.

लेखाची पद्धत आणि सादरीकरण एकदम आवडले. मंजु ने हा चित्रपट अगदी व्यक्तिगत पातळीवरुन हाताळल्यामुळे लेखाला वेगळा आशय प्राप्त झालेला आहे.

आमिरखान ने खरेच कमाल केली.

या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी माझ्या मुलाच्या शळेच्या मुलांना बोलावण्यात आलेले होते त्यात तो आणि त्याचे मित्र दिसत होते. कोणती घटना कधी आणि कसे आपल्या मनाला साद घालेले हे सांगता येत नाही हेच खरे.

मंजु दुसर्‍या भागाची वाट पाहत आहे.

उत्सुकता

'ताजप'ची कथा, हाताळणी, अभिनय इ. सगळेच हृदयस्पर्शी आहे. 'ताजप'मधील पालकांसारख्या परिस्थितीतून गेलेल्या पालकांकडून त्यांचे अनुभव वाचायला मिळणे हा एक वेगळाच अनुभव आहे. हा भाग आवडला, पुढील लेखांची वाट पाहतोय.

हे ही पहा

अभ्यासक्रमात तारे जमीन पर..

अभिजित...

वा..

छान विषय.. पूर्ण लेखा नंतर एकत्रच प्रतिक्रिया देतो

 
^ वर